परवा कांदेपोहे करायला पोहे भिजवले होते...पण ते जरा जास्तच झाले मग थोडे पोहे वगळले.
मग त्या उरलेल्या पोह्यांचे कटलेट्स करायचे ठरवले :)
साहित्य:-
तीन बटाटे
३ वाट्या जाड पोहे
४-५ ब्रेड स्लाइस
चवीनुसार मीठ
आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट
तळण्यासाठी तेल
बेसन
कृती:-
१. बटाटे उकडून घ्यावेत.
२. पोहे चाळणीत भिजवून निथळत ठेवावेत.
३. ब्रेडचा बारीक चुरा करून घ्यावा.
४. भिजलेले पोहे, कुस्करलेले बटाटे, आले-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट, ब्रेडचा चुरा, मीठ असे सगळे चांगले मिक्स करुन घ्यावे.
५. आता ह्या मिश्रणाला हाताने किंवा साच्याने आकार देउन छान कटलेट्स करुन घ्यावे.
६. नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करत ठेवावे. दोन्ही बाजूने रवा लावून गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
७. सॉस/ चिंचेची चटणी/ हिरव्या चटणी सोबत सर्व करावे.
तय्यार आहेत..पोहे-बटाटा कटलेट्स
P.S. पाकृ टाकण्याचा तसा पहिलाच प्रयत्न आहे..त्यामुळे सांभाळून घ्यावे :)
प्रतिक्रिया
17 Apr 2014 - 8:08 am | स्पंदना
हाय! हाय!!
दिलं कटलेट,कटलेट हो गया!
17 Apr 2014 - 8:37 am | अजया
मस्तच गं अस्मी!
सोपी आणि छान पाकृ!
17 Apr 2014 - 9:19 am | रुमानी
मस्त....! :)
17 Apr 2014 - 10:49 am | दिपक.कुवेत
छान दिसतायेत. एकदा करुन बघतो.
17 Apr 2014 - 10:58 am | आरोही
छान... नक्की करून बघणार .
17 Apr 2014 - 11:20 am | पैसा
कांदेपोहे उरले ही घटना कधीच घडत नसल्यामुळे डायरेक पोह्यांचे करावे लागतील. बघू प्रयत्न करून!
आणि पाकृ आगदी सिस्टिम्याटिक लिहिलीस. नवीन काही केलंस की नक्की इथे टाकत जा!
17 Apr 2014 - 3:38 pm | मधुरा देशपांडे
असेच म्हणते. आवड्ली पाकृ.
17 Apr 2014 - 3:56 pm | प्यारे१
असेच म्हणतो.
पोहे उरतात??????
पी जे: सचिन तेंडुलकर लेट कट मारायचा. त्याला आवडत असतील का कटलेट्स ?
17 Apr 2014 - 5:21 pm | सुहास झेले
यप्प... पोहे कधीच उरत नाही ;-)
मस्त पाककृती :)
21 Apr 2014 - 3:28 pm | अस्मी
बरोबर आहे गं पैसाताई, पण मला पोह्यांचा नीट अंदाजच नाही आला म्हणून थोडे भिजलेले पोहे तसेच वगळले .
21 Apr 2014 - 3:39 pm | पैसा
अग, आमच्याकडे कितीही पोहे भिजवले तरी अजून थोडे भिजवायला हवे होते असंच वाटतं नेहमी!
17 Apr 2014 - 12:03 pm | त्रिवेणी
आज सकाळी केले मस्त झाले.
17 Apr 2014 - 12:15 pm | सानिकास्वप्निल
मस्तं आणी चविष्ट पाकृ :)
17 Apr 2014 - 1:18 pm | सस्नेह
मस्त दिसताहेत कटलेट्स. यात भाज्या घातल्या तर आणखी मजा येईल.
17 Apr 2014 - 3:11 pm | कौशी
आवडली करून बघते..
17 Apr 2014 - 3:46 pm | शिद
मस्त दिसताहेत कटलेट...!!!
17 Apr 2014 - 4:03 pm | अनन्न्या
सध्या सुट्ट्या चालू असल्याने रोज नविन काय मेनु,ते कळतच नाही, यासाठी मिपाचा पाकृ. विभाग खूप मदत करतो.
अजुन नविन रेसिपी नक्की शेअर कर गं!
17 Apr 2014 - 5:29 pm | किसन शिंदे
यातले पोहे वगळता अगदी हाच पदार्थ स्नेहातै कोल्हापूरच्या कट्ट्याला घेवून आली होती. मस्त लागतात चवीला.
17 Apr 2014 - 7:41 pm | शुचि
फोटो जबरी आल आहे अस्मि.
17 Apr 2014 - 7:42 pm | रेवती
बेसन सगळ्या मिश्रणातच घालायचे ना? माझ्याकडे आत्ता नेमके २ ब्रेड स्लैसेस आहेत. मग २ बटाटे, २ वाट्या पोहे घेऊन पदार्थ करते.
17 Apr 2014 - 7:43 pm | शुचि
त्या स्लाइसेस पाठीचे पाहुणे का? :)
17 Apr 2014 - 7:45 pm | रेवती
हो ना! ते खपतील यात. लागल्यास ब्रेड्क्रम्स आहेतच!
17 Apr 2014 - 8:27 pm | अस्मी
हो अगं..पाकृत लिहायचं राहिलं. ब्रेड नसेल तर बेसनच घालायचं.:-)
17 Apr 2014 - 8:40 pm | रेवती
ओक्के.
18 Apr 2014 - 2:10 pm | अक्षया
वाह अस्मी मस्त पाकॄ. आणि फोटो.
नक्की करुन बघेन.;:)
18 Apr 2014 - 5:07 pm | सूड
तीन बटाट्यांना तीन वाट्या पोहे म्हणजे अंमळ जास्ती वाटतायेत हो.
18 Apr 2014 - 5:11 pm | यशोधरा
तू पावणेतीन वाट्या पोहे वापरुन करुन बघ. हाकानाका ;)
18 Apr 2014 - 5:23 pm | ज्ञानोबाचे पैजार
ही़ पा.कृ. अंडे घालुन करता येइल का?
18 Apr 2014 - 5:57 pm | तुमचा अभिषेक
संकष्टी नसेल तर घालायला हरकत नसावी :)
18 Apr 2014 - 6:40 pm | सूड
पैजारब्वांचा प्रतिसाद कळलेला दिसत नाय, चला माझ्या प्रतिसादावरुन हिंट देतो.
>>संकष्टी नसेल तर घालायला हरकत नसावी
म्हणजे अशी तिथ बघून अंडी घालता येतात? नाय त्याचं काये, अंडी घालण्याचा अन्भव नाय ना!! ;)
18 Apr 2014 - 5:54 pm | तुमचा अभिषेक
पोहे फार च आवडीचे, बटाटे त्या खालोखाल, कटलेट हा प्रकार मात्र फारसा आवडीचा नाही, दिसतेय तर तसे छानच, पण आमच्याकडे असा खटाटोप करण्यापेक्षा पोहे आवडतात तर गप खा ना तेच असेच सुनावले जाईल याची फुल खात्री ..
19 Apr 2014 - 8:41 am | चाणक्य
केले मी. छान झाले होते. धन्यवाद सोप्या पाकृ बद्दल
21 Apr 2014 - 3:27 pm | अस्मी
सर्वांचे आभार!!
17 May 2014 - 6:59 pm | यशोधरा
आज केले हे. भिजलेले थोडेसे पोहे आणि २ लहान बटाटे होते हाताशी. थोडेसे बदल केले ते असे - म्हणजे जे जिन्नास आयत्यावेळी हाताशी होते ते वापरले - तिखट, गरम मसाला पूड आणि किंचित साखर घातली चवीला. १ टेस्पू बेसनपीठ आणि ३ टीस्पू दही घातलं स्मूथ मळण्यासाठी. कोथिंबीर अगदी बारीक कापून तशीच मिसळली लगद्यात.
आणि कटलेट्स थापली. मस्त झाली होती चवीला आणि लग्गेच फन्नाही उडाला! धन्यवाद अस्मी! :)
19 May 2014 - 6:43 pm | कपिलमुनी
डीप फ्राय की शॅलो फ्राय ?
19 May 2014 - 8:32 pm | सूड
डीप फ्राय केले तर तेलात हसतीलसं वाटतंय. शॅलो फ्राय त्यामानाने कमी जोखमीचं !! ;)
19 May 2014 - 6:47 pm | मदनबाण
मस्त... :)