त्या पवित्र कुरू-क्षेत्री पांडूचे आणि आमुचे । युध्दार्थ जमले तंव्हा वर्तले काय संजया ॥ १ ॥
आज अनेक दिवसांनी गीतेमधील पहील्या ओळींची आठवण झाली. कारण काय म्हणून कोणी विचारेल असे वाटत नाही! आता लोकशाहीतले सत्तासंपादनाचे युद्ध केवळ कुरूक्षेत्रापुरतेच मर्यादीत राहीलेले नाही अथवा सर्व देशच कुरूक्षेत्र झाला आहे, असे कसेही म्हणता येईल. मात्र आपण राजकारण, राजकीय व्यक्ती-पक्ष, समाजाची अवस्था, अमुक-तमुक... या सर्वाचा कितीही उपहास करत असलो तरी भारतीय निवडणुक प्रक्रीया ही एक भारतीय म्हणून अभिमानास्पद वाटावी अशी गोष्ट आहे.
युरोपची लोकसंख्या ७३९.२ मिलीयन्स इतकी आहे तर भारतातील नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ८१४ मिलीयन्स इतकी आहे. साधारण साठ टक्के जरी मतदान होईल असे गृहीत धरले तर त्याची तुलना ही अमेरीका आणि पश्चिम युरोप ह्या दोन लोकशाही भूभागांमधील सर्व जनतेने मतदानासाठी जाण्याशी करता येईल. या (भारतीय) मतदारांमध्ये आणि भूभागामध्ये जे काही वैविध्य आहे त्यामुळे रस्ते, रेल्वे, विमान, जेथे विमाने जाऊ शकत नाहीत तेथे हेलिकॉप्टर्स, आणि जेथे गाड्या जाऊ शकत नाहीत तेथे बैलगाड्या, उंट आणि हत्ती यांच्या मदतीने सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जातो.
हे झाले मतदानाचे... ज्यांनी कोणी मतमोजणीची प्रक्रीया जवळून अथवा माध्यमांद्वारे पाहीली असेल त्यांना कल्पना असेल की पुर्वीच्या काळात म्हणजे २००० च्या आधी... मतमोजणीसाठी वेळ खूप लागायचा, भरपूर सरकारी कर्मचारी त्यासाठी बसत आणि त्याव्यतिरीक्त प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी बसत. आता देखील प्रतिनिधी बसत असतीलच पण इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्स मुळे वेळ लागणे हा प्रकार मला वाटते एक चथुर्तांश झाला असेल. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे निव्वळ स्टॅटीस्टीकली नाही तर प्रत्येक मत हे मोजले जाते, जे अमेरीकेत देखील घडत नाही.
१९८५ च्या निवडणुका - त्या वेळेस दूरदर्शन देखील किंचित मोकळे होऊ लागले होते. पत्रकार नलीनी सिंग यांनी निवडणुकांनंतर तयार केलेला एक वृत्तपट पाहीला होता. त्यातील केवळ एक घटना: बिहार मधला एक माणूस पाठमोरा बसलेला. नलीनी सिंग त्याला (असे काहीसे) प्रश्न विचारतात, "आप क्या कर रहे है?" त्याचे उत्तरः "हम बम बना रहे है!". मग पुढे, कशासाठी? उत्तर, निवडणुकीत वापरण्यासाठी. कारण काय? आमच्या जातीसाठी वगैरे... निवडणुक प्रक्रीयेचेच अपहरण करणे (रिगिंग) भरपूर चालत असे. तरी देखील स्टॅटीस्टीकली बर्यापैकी लोकशाहीनेच देशाचे सरकार निवडून आले म्हणायला जागा होती. शेषन आणि त्यांच्या नंतर आलेल्या निवडणूक आयुक्तांनी मात्र बर्याच गोष्टी चांगल्यासाठी कायमच्या बदलल्या. निवडणू़क आचारसंहीता, सुरक्षा, पक्षाला मिळणार्या मतांवरून पक्षाचे पुढील भवितव्य ठरवणे आदी अनेक लहान-मोठ्या गोष्टी त्यात येतील.
थोडक्यात राजकारण आणि राजकीय पक्ष-व्यक्तींबद्दल जरू भरपूर बोलता येत असेल तरी ज्या एका प्रमुख गोष्टीवर लोकशाही टिकू शकते त्या लोकांना हक्क देणार्या, मतदाराला राजा म्हणणार्या या निवडणूक प्रक्रीयेने मात्र एक पावित्र्य पाळलेले आहे. आता परत एकदा कर्तव्यपूर्तीची वेळ आली आहे ती या मतदार राजाची! इतर माध्यमांप्रमाणेच मिसळपाव.कॉम वर पण आपण माहितीपूर्ण चर्चा करूयात. त्यासाठी राजकारण हे एक विशेष दालन चालू केलेले आहे. माझ्या माहितीप्रमाणेतरी आपल्यातले कोणीच प्रत्यक्ष निवडणूका लढवणार नाही. तेंव्हा व्यक्तीगत चिखलफेकी ऐवजी निवडणूकांच्या निमित्ताने आणि त्या संदर्भाने - राजकीय, सामाजीक, धोरणात्मक, आर्थिक आदी विविध विषयांवर चर्चा करूयात अशी विनंती...
आता हे नमन थांबवताना आपल्याकडून एक नारळ फोडावा म्हणून खालील (जालावर येथून माहीती घेऊन मीच तयार केलेला) नकाशा टाकत आहे. माहिती एकदम अद्ययावत नाही तरीदेखील त्यातून आपले खासदार काय दिवे लावत आहेत याची झलक दिसेल अशी आशा आहे.
प्रतिक्रिया
5 Mar 2014 - 9:47 pm | आदूबाळ
उत्तम उपक्रम! शुभेच्छा!
येत्या निवडणुकीतले तीन/चार प्रमुख उमेदवार, पूर्वीच्या निवडणुकांतला इतिहास वगैरे नकाशावर टाकता आलं तर उत्तम होईल!
6 Mar 2014 - 10:02 am | सौंदाळा
+१ अनुमोदन
5 Mar 2014 - 10:05 pm | सव्यसाची
मी माझ्या मतदारसंघापासून दूर राहत असल्याकारणाने मला यावेळी मतदान करता येणार नाही. परंतु Absentee ballot ची सोय हि सगळ्यांसाठी आहे कि फक्त सरकारी नोकरांसाठी?
6 Mar 2014 - 1:05 am | पिवळा डांबिस
विधायक चर्चेसाठी हार्दिक शुभेच्छा!
बाकी ओसीआय ना मतदान करता येणार होतं असं पूर्वी जाहीर केलं होतं, त्याचं पुढे काय झलं त्याची माहिती आहे का?
6 Mar 2014 - 1:32 am | विकास
शुभेच्छांसाठी धन्यवाद! :)
बाकी ओसीआय ना मतदान करता येणार होतं असं पूर्वी जाहीर केलं होतं, त्याचं पुढे काय झलं त्याची माहिती आहे का?
मला वाटतयं, ओसीआय म्हणजे तुम्हाला पूर्वाश्रमीचे भारतीय असलेले पण आता (ते अथवा त्यांची अपत्ये) परदेशी नागरीक. त्यांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी सर्वप्रथम दुहेरी नागरीकत्व मान्य करायला हवे जे अजूनही कायद्याने मान्य नाही. ओसीआयज् ना थोड्याफार प्रमाणात ग्रीनकार्डसारख्या सुविधा उपलब्ध आहेत पण शेतजमीन, सरकारी पदे आणि मतदान यासाठी परवानगी नाही.
दुहेरी मतदानाच्या संदर्भात तत्कालीन पंतप्रधान नरसिंहरावांना त्यांच्या अमेरीकन दौर्याच्या वेळेस काही एन आर आयज् नी प्रश्न विचारला होता, की असे धोरण सरकार कधी अमलात आणेल. राव साहेबांनी त्यांच्या स्टाईलमधे उत्तर दिले: "दुहेरी नागरीकत्व देणे इतके सोपे असते तर ते माझ्या आधीच्या पंतप्रधानांनीच केले नसते का?" अर्थात भारतीय राजकीय व्यक्तींच्या स्टाईल मधे ह्या उत्तराचा अर्थ आहे, की हे सोपे नाही म्हणून होणे नाही. *sorry2*
6 Mar 2014 - 11:24 am | संपत
तुम्ही जर का आत्ता भारतात राहत नसाल तर मत देण्याचा प्रश्न येतच नाही. ( मतदानाच्या वेळी तुम्ही भारतभेटीवर आला असाल तर गोष्ट वेगळी) जर का तुम्ही आत्ता भारतात राहत असाल आणि रहिवासाचा पुरावा असेल तर बिनधास्त नोंदणी करा आणि मतदान करा. कोण विचारतय ओसीआय वगैरे.. अनेकांना तसे करतान पाहिले आहे. शेवटी मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. हे कायदेशीर आहे का वगैरे विनोदी प्रश्न विचारू नका म्हणजे झाले.
11 Mar 2014 - 11:07 pm | पिवळा डांबिस
हा हा हा!! का सौ टकेकी बात कहे है आपने!! बंबईमां करो या देसमां करो, लेकिन मतदान करो!!! :)
असो. धागा खाली गेला होता म्हणून वर आणला...
-विकासच्या कुरुक्षेत्रावरचा वॉटरबॉय
6 Mar 2014 - 2:28 am | खटपट्या
नकाशावरील लाल ठिपके म्हणजे मतदार संघ आहेत का ?
तसे असेल तर निवडणूक निकालानंतर त्यांचे रंग बदलत जातील अशी योजना केली तर मजा येईल.
म्हणजे कोन्ग्रेस साठी हिरवा रंग , भाजपसाठी भगवा वगैरे
6 Mar 2014 - 2:35 am | विकास
लाल ठिपक्यांवर कर्सर ठेवला अथवा क्लिक केला तर त्या मतदारसंघात कोण खासदार आहे आणि त्यांचे लोकसभेतील कामकाजातील भाग दिसू शकेल. हा नकाशा देखील बदलत आहे. किंचीत वेगळा नकाशा दिसेल.
6 Mar 2014 - 5:27 am | निशदे
आणि यातून सकारात्मक चर्चाच होतील अशी अपेक्षा करूयात.
6 Mar 2014 - 8:00 am | सुनील
चांगला लेख आणि नकाशेदेखिल.
हे समजले नाही.
6 Mar 2014 - 9:14 am | विकास
प्रत्येक मत हे मोजले जाते, जे अमेरीकेत देखील घडत नाही
असे म्हणण्यामागे दोन कारणे होती.
२००० सालच्या बुश-गोर निवडणुकीत वास्तव मतमोजणी पूर्ण होण्यासाठी मला वाटते काही महीन्यांचा कालावधी गेला. पण त्या आधीच गोर यांना पराभव मान्य करायला लागला होता.
दुसरे म्हणजे इलेक्टोरल कॉलेजमुळे वैयक्तीक मतांचा होणारा निकालांवरील परीणाम दुय्यम ठरतो. पॉप्युलर व्होट अधिक मिळून देखील इलेक्टोरल व्होटमुळे निकाल उलट लागू शकतो. (परत बुश-गोर, तसेच मला वाटते केनडी-निक्सन ज्यात निक्सन यांनी हार मान्य केली पण निकाल इतका सरळ नव्हता.)
एकूण अमेरीकेत स्टॅटीस्टीकली एकदा ट्रेण्ड समजला की निकाल मान्य करायची पद्धत आहे. अपवाद फक्त फरक नगण्य असला तर. त्यावेळेस फेरमतमोजणी होऊ शकते. मध्यंतरी मिट्ट माहीतीपटाबद्दल लिहीले होते. त्यात एक किस्सा होता. इस्टकोस्ट ते माउंटन भागापर्यंत निवडणुकीचे निकाल लागू लागले होते पण वेस्ट कोस्टचे लागले नव्हते. तरी देखील एकदा का ओहायो आणि फ्लोरीडाचा अंदाज आल्यावर रॉमनी आणि त्याच्या कुटूंबियांनी मनाची तयारी केली आणि प्रेसिडंट ओबामाला फोन करायचे ठरवले आणि पराभव मान्य करणारे कन्सेशन स्पीच देखील तयार केले.
अवांतरः येथे हा किस्सा लिहीला होता का ते आठवत नाही. १९९० च्या सुरवातीस का १९८९ वगैरे मधे "एकच लक्ष विधानसभा - युतीचे राज्य येणार" म्हणून गाजावाजा झाला. पण निकाल तसे लागत नव्हते. तो काळ इंटरनेटच्या प्रभावाआधीचा होता. प्रमोद महाजन टिव्ही माध्यमांच्या समोर उभे होते आणि ठाम आत्मविश्वासाने सांगत होते की आम्ही निवडणूक जिंकणारच. नंतर टिव्ही कॅमेरे बंद झाल्यावर उपस्थित पत्रकारांसमोर ते म्हणाले की मी आमचा पराभव मान्य करतो. एकाने प्रश्न विचारला की पण आत्ताच तर तुम्ही उलटे बोललात? महाजन म्हणाले, कारण त्यांना (टिव्ही माध्यमांना) अजून काही तास परत परत सारखे नवीन काहीतरी सांगत बसावे लागणार आहे, तुम्हाला (वृत्तपत्रकारांना) सांगितले म्हणून काही फरक पडत नाही कारण तुमची बातमी उद्याच्या पेपर करता आहे! :)
11 Mar 2014 - 11:12 pm | निशदे
यामध्ये एक्झिट पोलचे निकाल हे सुद्धा महत्त्वाचे मानले जातात हे लक्षात घेतले पाहिजे. उदा. कॅलिफोर्नियाचे वोट काऊंटिंग सुरू व्हायच्या सुद्धा आधी कॅलिफोर्निया आणि त्याचे ५५ इलेक्टोरल वोट्स डेमोक्रॅट्सला गृहित धरलेले असतात. स्विंग स्टेट्सना(ज्यांमध्ये डेमोक्रॅट्स्/रिपब्लिकन्स हे फायनल झालेले नसते अशी राज्ये. उदा: फ्लोरिडा, ओहायो) त्यामुळे आत्यंतिक महत्त्व येते.
12 Mar 2014 - 12:09 am | पिवळा डांबिस
हं, बोला, टोचून टोचून बोला!!! :(
12 Mar 2014 - 1:35 am | निशदे
वाह.... कधी कधी बर्यापैकी अंधारात मारलेले तीरसुद्धा अचूक बसतात की.. ;) .. :lol:
12 Mar 2014 - 1:57 am | विकास
आता सत्य कटू असले तर तो बोलणार्याचा दोष नसतो. बाकी डेमोक्रॅट्स आल्यापासून कॅलिफोर्नियाच्या तोंडचे पाणि खरेच पळालेले दिसतयं! :)
12 Mar 2014 - 2:33 am | पिवळा डांबिस
:)
मज फूल ही रुतावे, हा दैवयोग आहे!!!
:)
6 Mar 2014 - 8:44 am | तुषार काळभोर
पुण्याचे खासदार ४८% हजर होते हे वाचून आश्चर्याचा धक्का बसला.
6 Mar 2014 - 8:58 am | विकास
खरे आहे.
एक खुलासा. काही लाल दिसणारे ठिपके हे त्या खासदारांची गैरहजेरी दाखवत नसून ते मंत्री असल्याने त्यांची हजेरी त्या पध्दतीने घेतली जात नाही इतकेच. उ.दा. शरद पवारांचा लाल ठिपका दिसेल.
6 Mar 2014 - 8:51 am | मनीषा
चांगला उपक्रम.
6 Mar 2014 - 10:05 am | सुहासदवन
लोभ जीभेचा जळूं दे, दे थिजूं विद्वेष सारा
द्रौपदीचे सत्वं माझ्या लाभूं दे भाषा शरीरा ।
हे किंवा असंच काही, ह्या आधी, इतर कोणाच्या तरी, आयडी खाली वाचलेलं आठवतय!
6 Mar 2014 - 11:48 am | ऋषिकेश
उपक्रम चांगला आहे, फक्त इन्कम्बन्ट खासदार निवडणुकीला उभा नसेल तर हे निरूपयोगी आहे.
दुसरे असे की किती उपस्थिती आहे यापेक्षा उपस्थित राहुन काय योगदान दिले ते ही बरेच अधिक महत्त्वाचे आहे.
6 Mar 2014 - 1:06 pm | श्रीगुरुजी
>>> ज्यांनी कोणी मतमोजणीची प्रक्रीया जवळून अथवा माध्यमांद्वारे पाहीली असेल त्यांना कल्पना असेल की पुर्वीच्या काळात म्हणजे २००० च्या आधी... मतमोजणीसाठी वेळ खूप लागायचा, भरपूर सरकारी कर्मचारी त्यासाठी बसत आणि त्याव्यतिरीक्त प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी बसत. आता देखील प्रतिनिधी बसत असतीलच पण इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्स मुळे वेळ लागणे हा प्रकार मला वाटते एक चथुर्तांश झाला असेल.
मॅन्युअल मतमोजणीत जी मजा यायची ती मतदान यंत्राच्या मोजणीत येत नाही. सध्याच्या काळात ४-५ तासात संपूर्ण राज्याचे/देशाचे निकाल जाहीर होतात. पूर्वी मतमोजणी २-३ दिवस चालत असे व ट्रेंड सारखे बदलत असत. त्यात खूप मजा यायची. आता ती मजा गेली.
>>> १९८५ च्या निवडणुका - त्या वेळेस दूरदर्शन देखील किंचित मोकळे होऊ लागले होते. पत्रकार नलीनी सिंग यांनी निवडणुकांनंतर तयार केलेला एक वृत्तपट पाहीला होता. त्यातील केवळ एक घटना: बिहार मधला एक माणूस पाठमोरा बसलेला. नलीनी सिंग त्याला (असे काहीसे) प्रश्न विचारतात, "आप क्या कर रहे है?" त्याचे उत्तरः "हम बम बना रहे है!". मग पुढे, कशासाठी? उत्तर, निवडणुकीत वापरण्यासाठी. कारण काय? आमच्या जातीसाठी वगैरे... निवडणुक प्रक्रीयेचेच अपहरण करणे (रिगिंग) भरपूर चालत असे.
हे चित्रण १९८५ नसून १९८९ च्या निवडणुकीत केलेले होते.
10 Mar 2014 - 4:45 pm | पैसा
बरीच नवी माहितीही आहे. नकाशा आवडला. आम्चे एक भावी पंतप्रधानपदाचे इच्छुक सुद्धा मौनीबाबा राहतील किंवा लोकसभेबाहेरून देश चालवतील अशी लक्षणे जोरदार दिसत आहेत.
Symbol*:
MP name: Rahul Gandhi
State: Uttar Pradesh
Constituency: Amethi
Political party: Indian National Congress
Educational qualifications: Post Graduate
Debates: 1
Questions: 0
Attendance: 43%
10 Mar 2014 - 6:16 pm | काळा पहाड
एखादा माथेफिरू त्यांच्या घराण्याच्या परंपरेचा मान राखत त्यांना "वर" पाठवेपर्यंतच.
11 Mar 2014 - 11:31 pm | दिव्यश्री
धागा आवडला ...चांगला उपक्रम सुरु केलात . :) ...पहिल्याच लाल ठिपक्याला रोचक (Thanks मिपा.) माहिती समोर आली ... :P :D
धन्यवाद.