मागच्या आठवड्यात भावाकडे गेले होते तेथे गावावरून आई आली होती मग काय पूर्ण ७-८ महिन्यांनतर आईचे हातचे जेवण मिळणार होते मग सोडणार कोण .मस्त पैकी तिच्या हातची शेवभाजी (खान्देशी शेवभाजी)बनवायला सांगितले .अहाहा काय चव होती ..काहीही केले तरी ती चव कुठेच पुन्हा मिळत नाही ..अगदी मी त्याच पद्धतीने करून बघते पण ती चव खरच येत नाही हे खरेच आहे..
नवऱ्याला हि माझ्या आईच्या हातची त्याच मसाल्यातील कुठलीही भाजी खूप आवडते ..या वेळेस तो सोबत आला नसल्याने त्याला ती खायला मिळाली नाही ...मग काय त्याने फोन करून आईच्या हात चा मसाला बनवून आणायला सांगितले ..मग काय जावयाची इच्छा म्हटल्यावर आईने अगदी अर्ध्या तासात आम्हा तीन माणसांसाठी ७-८ माणसांचा मसाला बनवून दिला ..
अगदी ५ तासांच्या प्रवासानंतर मी घरी आल्यावर तो वाटलेला मसाला शीत कपाटात ठेवून दिला ..
त्याच मसाल्यात मी तीन प्रकारांच्या भाज्या बनविल्या मी शाकाहारी असल्याने माझ्यासाठी शेवभाजी,नवऱ्यासाठी अंडाकरी आणि दुसर्या दिवशी भरली वांगी ..तसेच या मसाल्यात चिकन सुद्धा खूप चविष्ट होते ...
मी विचार केला हि पाककृती मिपा वर देऊयात म्हणून मी आईला फोन करून प्रत्येक पदार्थाचे प्रमाण विचारले तर ती म्हणाली मी असे ठरवून एवढे कधीच काही टाकत नाही नेहमी आपल अंदाजाने घेते ..तरी पण मी प्रमाणाबद्दल सांग असे म्हटल्यावर तिने मला अंदाजे च काही गोष्टी सांगितल्या कि हे एवढे घे ते एवढे घे ...
तेच मी खाली दिलेले आहे
साहित्य: ४ कांदे,अर्धी वाटी सुके खोबरे ,१५ ते १७ लसुन पाकळ्या (हो ती तर यापेक्षा हि जास्त घेते )२ इंच आले ,जिरे २ चमचे ,लाल तिखट ३ चमचे,हळद १ चमचा ,गरम मसाला १ चमचा ,मीठ चवी प्रमाणे ,कोथिम्बिर ,तेल ४ चमचे ,पाणी
कृती: सर्व प्रथम कांदे ,सुके खोबरे खरपूस भाजून घ्या ,mixar मध्ये कांदे -खोबरे ,आले लसुन जिरे ,मीठ ,कोथिम्बिर ,हळद ,लाल तिखट,गरम मसाला घालून पाणी घालून बारीक वाटून घ्या ..त्यापैकी ३/4
तयार मसाला कढाई मध्ये तेल घालून त्यात टाका ..
आणि पाणी न टाकता तेलात शिजू द्या ..
खालील फोटोत दिसत असल्याप्रमाणे तेल सुटू लागल्यावर त्यात थोडे पाणी घाला .
पाणी टाकल्यावर त्याला ७ ते १० मी.उकळू द्या ....
चांगली उकळी आल्यावर आच बंद करून त्यात कोथिम्बिर कापून टाका.
वरील फोटो तयार भाजी चा आहे .मी माझ्यापुरता भाजी काढून घेऊन त्यात उकलेले अंडे घालून पुन्हा
१-२ उकळ्या येऊ दिल्या ..अंडाकरी तय्यार ...
आणि माझ्यासाठी साधी पिवळी शेव ताटात घालून त्यावर तयार रस्सा टाकला ..या भाजीत शेव उकळायचे नसतात ते वरतून टाकावेत ...
दुसऱ्या दिवशी त्याचेच मस्त भरली वांगी करायचे ठरवले ..
त्यासाठी ३ वांगी घेतली ,उरलेला अर्धी वाटी मसाला ,त्यात ३ चमचे शेंगदाण्याचे कुट घातले ,मीठ थोडेसे कारण वाटणात घातलेले होते .टोमाटो चिरून ठेवला
वांग्यांना चीर देऊन त्यात मसाला भरला आणि कुकर मध्ये ३ चमचे तेल घातले ,ते गरम झाल्यावर त्यात वांगी आणि उरलेला मसाला टाकला त्यात १ टोमाटो कापून टाकला .१ कप पाणी घालून १ शिटी होऊ दिली .आणि मस्त भरली वांगी तयार ...
प्रतिक्रिया
2 Mar 2014 - 3:31 pm | जेपी
मस्तच .
2 Mar 2014 - 3:40 pm | अजया
फोटो दिसत नाहियेत.
2 Mar 2014 - 3:41 pm | मोक्षदा
खरच भाजी बघून गावची आठवण झाली आम्हाला आमच्या गावी खानदेशात तुम्ही पोहचवले
मे महिना प्रचंड उन्हाळा त्यात अशा जंग्या पार्ट्याचि मज्जा
घरात शेव आणून ठेवालीच आहे
मुहूर्त काही सपड
त नव्हता आत्ता करतेच लवकर
कृती बद्दल परत धन्यवाद , मुंबईत आमच्या गावासारखी म्हणजे एदलाबाद (सध्याचे
मुक्ताईनगर) शेव मिळत नाही माहीत असल्यास कळवावे
2 Mar 2014 - 3:58 pm | आरोही
मोक्षदा ,
खरेच ग आपल्या गावासारखी (turkhati शेव) येथे मिळत नाहीत ग पण मी आपले साधे त्याच आकाराचे पिवळे शेव घेतले आहेत ..
3 Mar 2014 - 3:30 pm | मधुरा देशपांडे
पाकृ आवडली. मी थोडी वेगळ्या पद्धतीने करते. आता अशी करून बघेन.
कडक शेवेसाठी हल्दीरामचा एक प्रकार मिळतो. त्यातल्या त्यात शेवभाजीच्या शेवेच्या जवळपास जाणारी चव आहे. इकडे मी तीच वापरते.
2 Mar 2014 - 3:44 pm | आत्मशून्य
कातिल प्रकार.
2 Mar 2014 - 3:47 pm | सुहास झेले
मस्तच... :)
2 Mar 2014 - 4:00 pm | आरोही
अरे आधी फोटो दिसत होते आता काय झाले मलाही शेवटचे दोन दिसत नाहीयेत ..गायब कसे झाले ???आता काय करावे ????
2 Mar 2014 - 4:07 pm | किसन शिंदे
मला तर सगळे फोटो दिसतायत. तुमचे फोटो पिकासावर अपलोड करून त्याची युआरएल इथे टाका, सगळ्यांना दिसतील ते फोटो.
2 Mar 2014 - 4:05 pm | किसन शिंदे
भाजीचा रस्सा बनवून वर नुसती शेव टाकलेली भाजी खाण्यापेक्षा त्या भाजी उकळतानाच खाली उतरवण्याआधी रश्श्यातच शेव टाकून ती थोडीशी उकळली की मस्त लागते शेवभाजी. शेवेचा पार लगदा होऊ नये म्हणून रश्श्याचं प्रमाण शेवेच्या थोडंस कमी ठेवावं. एक नंबर शेवभाजी तय्यार होते.
2 Mar 2014 - 4:11 pm | आरोही
माझ्या मते शेव जर कडक असतील तर तुम्ही म्हणत आहात तसे केले तर चालते पण येथे ती शेव फारशी मिळत नाहीत म्हणून मी असे केले आहे आणि हि शेव फारच नरम असतात लगेच त्याचा लगदा होतो हा माझा अनुभव आहे ..
2 Mar 2014 - 4:18 pm | कच्ची कैरी
खानदेशी जेवण म्हणजे माझा जीव कि प्राण !!!!
2 Mar 2014 - 4:20 pm | आरोही
मी पण खानदेशी आहे आणि मला हि आवडते ते जेवण ....same pinch +)
2 Mar 2014 - 4:37 pm | खान्देशी
:)
अप्रतिम !
2 Mar 2014 - 4:45 pm | खान्देशी
राजस्थानी मिठाई वाल्याकडे रतलामी शेव मिळते ……बेत जमतो ….
2 Mar 2014 - 4:46 pm | मुक्त विहारि
तुम्ही खान्देशच्या, म्हणजे भुलाबाईची गाणी येतच असतील.
आमचे आणि जळगांवचे संबंध संपलेच आहेत.
पण खान्देश म्हटले की हिरवी भरताची वांगी,पेरू आणि भुलाबाईची गाणी आठ्वतातच.
3 Mar 2014 - 9:46 am | आरोही
मु वि काका ,
भुलाबाई एक दोन ची गाणी येतात आता ..खरच भुलाबाई च्या आठवणीने मन हळवे झाले ..भुलाबाई येणे म्हणजे एक सोहळा असायचा आमच्यासाठी ,किती मजा केलीये त्या वेळी ....
आणि खानदेशी वांग्याचे भरीत जो एकदा खाईल तो दुसरे कुठलेच भरीत खाणार नाही असे माझे मत आहे ...मी बघेन येथे मला कुठे खानदेशी वांगी मिळाली तर मिपाकरांना नक्की पाककृती देईन ...+)
3 Mar 2014 - 10:23 am | मुक्त विहारि
भुलाबाई येणे म्हणजे एक सोहळा असायचा आमच्यासाठी ,किती मजा केलीये त्या वेळी ....
प्रचंड सहमत.
जमल्यास भुलाबाईची गाणी पाठवाल का?
4 Mar 2014 - 12:48 pm | निनाद मुक्काम प...
आमचे पणजोबा रेल्वेतई नोकरी निमित्त पुण्यात आले तरी खानदेशातील आपली शेती ,गाव , भावंडे ह्यामुळे तेथे जाणे चालूच ठेवले. आजोबांनी सुद्धा हाच कित्ता गिरवला.
माझ्या वडिलांच्या आईचा व त्यांचा जन्म जळगावचा
त्यामुळे आजही बाबांचे मामा व मावस भाऊ तेथे राहतात.
व ५ वर्षातून किमान एकदा तेथे आमचे जाणे होते.
घरी खाण्यात आईमुळे वैधर्भीय तर आज्जी मुळे खानदेशी आहार
जेवणात लहानपणापासून खात आलो आहे.
तिखट शेवेची भाजी व पांढऱ्या वांग्यांचे तिखट भरीत म्हणजे पर्वणीच
4 Mar 2014 - 1:07 pm | मुक्त विहारि
आपली पिढी खाण्या-पिण्याच्या बाबतीत खूप नशीबवान.
4 Mar 2014 - 10:26 pm | समीरसूर
खान्देशी भरताची सर जगात कुठल्याच दुसर्या भरताला नाही. आणि त्या बेचव पंजाबी बैंगन भर्त्याला तर अजिबात नाही. काय असतं ते खान्देशी भरीत...वा वा...कांद्याची पात, भाजले गेलेले खोबर्याचे तुकडे, मधूनच लागणारे खमंग शेंगदाणे, झणझणीत हिरवी मिरची...तोंडी लावण्यासाठी टोमॅटोची कोशिंबीर आणि गरमागरम पुर्या...शेतात रंगणार्या भरीत पार्ट्या, झाडाखाली टाकलेली सतरंजी आणि झाडाच्या सावलीत, तुडुंब भरलेल्या पोटामुळे डोळ्यात येणारी सुखद डुलकी....ये मजा और कहां????
आणि डाळगंडोरी??? अमृतही फीके वाटावे अशी ही आंबटचुका आणि हिरव्या मिरच्यांची भाजी...भाकरी कुस्करावी आणि भरपूर डाळगंडोरी घेऊन ओरपावी.. नंतर एक-दोन वाट्या घटाघटा प्यावी आणि मग खुशाल झोपावे...मुवि म्हणतात ते खरे आहे, सगळीच सुखे महाग नसतात; In fact, best and long-lasting joys of life are always waiting for us and cost just a few awake and informed moments; sad part is we keep waiting for some other ephemeral joys that often cost us a fortune. हेच खरे वाटते कधी-कधी. :-)
परवा मूर्सव्हीलमध्ये एका खान्देशी (पण आता पूर्ण अमेरिकन) असलेल्या कुटुंबाकडे जेवायला बोलावले होते. त्यांच्या मोठ्या घरात शिरल्यावर एकदम शेवभाजीचा घमघमाट नाकात शिरला. गावाकडे शेतात गेल्यासारखे वाटले. अतिशय सुंदर शेवभाजी केली होती त्यांनी. हातचे न राखता भरपेट जेवलो; त्यांना पण मीच आग्रह करत होतो. "अहो घ्या हो; काही होत नाही; आपण खान्देशी आहोत; इतक्या लाल-हिरव्या मिरच्या पचवणारे आपण, आपल्याला काय होणार आहे? घ्या घ्या, थोडी भाजी घ्या..." असं म्हणून मीच होस्ट कपलला आग्रह करत होतो. मग बायकोने आपण त्यांच्या घरी जेवायला आलो आहोत याची हलकेच आठवण करून दिली. मग मी शांत झालो आणि फक्त माझ्या जेवणावर लक्ष केंद्रित केले...पंधरा मिनिटांनी त्याच्या शेवभाजीचे मोठ्ठे बैगुने (पातेलं) पूर्णपणे रिकामे झाले आहे याची खात्री करून घेतली आणि मग भात-पोळीची रसद थांबवण्याची विनंती केली. सुरेख जेवण! पोळ्या, शेवभाजी, साधा भात, कांदा, लिंबू, आणि रिकोटा (बरोबर आहे का हा शब्द?) चीझ केक...देव त्यांचं भलं करेल...
आणि खान्देशी दाळ-बट्टीची महती काय वर्णावी? मोठ्ठ्या मोठ्ठ्या निखार्यांमध्ये भाजलेल्या फर्मास बट्ट्या, साधे वरण, आणि वांग्याची किंवा गंगाफळाची खान्देशी पद्धतीची जबराट भाजी...मोठ्या मोठ्या तपस्व्यांना किंवा ऋषी-मुनींना शेकडो वर्षे तपश्चर्या करून जो मोक्षानंद मिळत नसावा तो आनंद या जेवणानंतर मिळतो. माझा असा अनुभव आहे की असे साधे पण थोडे झणझणीत जेवण जेवल्यानंतर डोक्यातले निराशाजनक विचार किंवा अवास्तव चिंता हद्दपार होतात आणि झटकन चांगले उपाय देखील सुचतात. मनःशांती मिळते. खरे खोटे माहित नाही पण माझा असा थोडाफार अनुभव आहे. काही केमिकल लोच्या आहे की मानसिक आहे हे माहित नाही.
फौजदारी डाळ हा असाच झणझणीत प्रकार. सगळ्या डाळींचे एकत्र वरण म्हणजे फौजदारी डाळ. ठेचा (हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर) आणि गरमागरम कळण्याची भाकरी...पुढचे बोलवत नाही...(आवंढा गिळला गप्पकन).
तर असे हे खान्देशी जेवण! एकमेवाद्वितीय! :-) एकदा ट्राय कराच.
- अस्सल खान्देशी समीर
4 Mar 2014 - 10:44 pm | गणपा
बस कर पगले रुलायेगा क्या?
5 Mar 2014 - 12:36 am | अनन्त अवधुत
+११११११
5 Mar 2014 - 3:28 am | स्पंदना
समीरसूर!
पक्के खवय्ये आहात.
अश्या माणसाला करुन घालायला काहीही कष्ट वाटत नाहीत.
यु आर इन्व्हायटेड सर.
5 Mar 2014 - 8:16 pm | समीरसूर
आमंत्रणाबद्दल धन्यवाद! :-)
आपण मनापासून आमंत्रण दिलेत हीच खरी मेजवानी! :-) शेवटी चव फक्त पदार्थांनाच असते असे नाही; पदार्थांभोवती असणारे सुवास, सदिच्छा, आपलेपणा, आणि प्रांजळपणा यांच्या आणि पदार्थांच्या चवीचा मिलाफ म्हणजे खरी चव! :-)
खरी भूक लागली असता जो फक्त शिळी भाकरी आणि फोडलेला कांदा देखील आनंदाने खाऊ शकतो तो खरा खवैय्या!
5 Mar 2014 - 2:03 pm | आरोही
धन्यवाद समीर ,
मला खरेच माहित नव्हते येथे एवढे खानदेशी लोक आहेत ते ... ...आणि तुम्ही खरेच खवैइये आहात हे पटले ...खानदेशी पदार्थ एवढे लोकप्रिय असतील याची कल्पना नव्हती ...आणि खानदेशी दाल बट्टी बद्दल तर माझ्याकडे काही शब्दच वर्णन करायला नाहीयेत ती फक्त खाण्यासाठी असते ...
लवकरच अजून काही अस्सल खानदेशी पदार्थ येथे देण्याचा प्रयत्न करेन ......+)
5 Mar 2014 - 8:18 pm | समीरसूर
धन्यवाद. आपणांस नवनवीन पदार्थांच्या रेसिपीजसाठी शुभेच्छा! :-)
2 Apr 2014 - 1:41 am | बहुगुणी
यजमानांनाच आग्रह करत खायला घालण्याचं तुमचं वर्णनही लाजवाब!
(दाल-बाटी आणि पंचमेल दाल हे राजस्थानी पदार्थ म्हणून माहीत होते, त्यांना खानदेशी झटकाही आहे हे नवीनच कळलं, माहितीबद्दल धन्यवाद!)
20 Apr 2014 - 5:45 pm | चाणक्य
कस्सला मस्त प्रतिसाद आहे समीरसूर तुमचा. मजा आ गया. व्वाह
28 Nov 2016 - 2:36 pm | मिनेश
+१
2 Mar 2014 - 5:09 pm | garava
मस्त..
2 Mar 2014 - 5:12 pm | सचिन कुलकर्णी
वाचनखूण साठविली गेली आहे.
1 Apr 2014 - 9:20 pm | निवेदिता-ताई
:)
2 Mar 2014 - 5:26 pm | रेवती
कृती चांगलीये पण फोटोंबाबत गणेशा झालाय.
2 Mar 2014 - 6:11 pm | पैसा
पाकृ, फोटो सगळेच मस्त!
2 Mar 2014 - 8:01 pm | स्वप्नालीसा
फार छान !!
2 Mar 2014 - 9:26 pm | आनन्दिता
फोटो दिसेनात! :'(
3 Mar 2014 - 8:11 am | मूनशाईन
तोंडाला पाणी सुटले. सावद्याचे धनजी शेठ यांच्याकडच्या शेवगाठी पाठवून देते.
3 Mar 2014 - 9:55 am | आरोही
मूनशाइन ,
लवकर पाठवा वाट बघतेय ...नाहीतर असे करा न शेव घेऊन या मी रस्सा बनवून ठेवते ...मग पुढे काय ते सांगायलाच नको ...+)
28 Nov 2016 - 2:38 pm | मिनेश
सावदा नाही हो. फैजपुर ला आहे त्यान्चे दुकान.
3 Mar 2014 - 8:53 am | स्पंदना
काय कातील मसाला आहे.
मी तरी रंगावरच भुलले.
3 Mar 2014 - 9:35 am | त्रिवेणी
खान्देशी मसाला वापरुन मी केलेले चिकन.
3 Mar 2014 - 9:48 am | आरोही
त्रिवेणी ,
अगदी same कलर आलाय बघ चिकन च्या रस्याला ..छान...+)
3 Mar 2014 - 9:57 am | आरोही
बाकी सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार ...+)+)
3 Mar 2014 - 10:26 am | मुक्त विहारि
ही खानदेशी पा.क्रु. दिल्याबद्दल
आमच्या सारख्या खवय्यांकडून तुमचे आभार.
अशाच अनवट पाक्रु अजून पण येवू द्या.
3 Mar 2014 - 12:49 pm | गणपा
भिषोण सुंदर !!!
आहाहा काय तो रंग्,तवंग. बघुनच टोंडाला पुर आलाय. :)
3 Mar 2014 - 2:50 pm | सानिकास्वप्निल
काय मस्तं झणझणीत पाकृ आहे सगळ्या :)
शेवभाजी कधी खाल्ली नाही पण कधीतरी नक्की ट्राय करेन.
सगळ्या पाकृ बघून तोंपासू
3 Mar 2014 - 3:01 pm | जोशी 'ले'
मस्त...महिन्यात दोन वेळा तरि शेवभाजीचा बेत असतोच घरी :-) तुरकाठी शेव ऎवजी भावनगरी शेव चांगली लागते शेवभाजीत
3 Mar 2014 - 3:39 pm | Mrunalini
आई गं... काय भन्नट दिसतीये ती शेव भाजी. माझ्या मामीची आठवण झाली. ती पण अशीच करायची शेव भाजी. तोंपासु. :)
3 Mar 2014 - 3:57 pm | जासुश
http://www.misalpav.com/node/16885
3 Mar 2014 - 4:08 pm | पिलीयन रायडर
अगं फोटो दिसत नाहीत ग..
3 Mar 2014 - 5:37 pm | आरोही
पी रा हो मला काहीवेळा दिसत नवते पण आता दिसत आहेत बघ सर्वाना ...
3 Mar 2014 - 4:11 pm | अतुल१
अगागा ........भयानक आवडल ..........आज अंडाकरीच.........
3 Mar 2014 - 4:15 pm | शिद
जबरा दिसताहेत सगळ्या पाकृ... एकदम टेम्टिंग... तोंपासु.
बाकी शेवभाजी हा प्रकार नविन दिसतो आहे... ट्राय करायला हवा एकदा.
3 Mar 2014 - 5:30 pm | अत्रुप्त आत्मा
१५ दिवसांपूर्वी सांगवीमधे एक खानदेशी हाटेल मिळाले.अगदी अस्सल आहे. शेवभाजी आणि भाकर्यांचे एक/दोन जबर्या प्रकार खाल्ले! आज या धाग्यामुळे पुन्हा जावे लागणारसे वाटते!
फोटू अफाट काढले आहेत!
3 Mar 2014 - 5:36 pm | आरोही
पुण्यात हॉटेल खानदेश junction म्हणून आहे कुठे ते नित सांगता येणार नाही पण तेथे अस्सल खानदेशी चवीचे जेवण मिळते ..मला हि एकदा यायचे आहे तेथे .....+)
3 Mar 2014 - 10:03 pm | मुक्त विहारि
https://www.google.co.in/maps/place/Hotel+Khandesh+Junction/@18.514538,73.848531,17z/data=!3m1!4b1!4m2!3m1!1s0x3bc2c071262af071:0xb23492db85fa400a
आता बघा, पुणेकरांना पण डोंबिवलीकरांची मदत लागायला लागली.
आम्ही उगाच नाही म्हणत की, डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण आहे.
2 Apr 2014 - 5:59 pm | मनुराणी
डोंबिवली मध्ये पश्चिमेला क्रांती स्टोअर्स च्या डाव्या बाजूला एक पोळी भाजी केंद्र आहे. तिकडे खान्देशी पद्धतीच्या भाज्या भेटतात. शेव भाजी असते बऱ्याचदा. आमच्याकडे पण हे सगळे घरीच बनत असल्याने कधी आणली नाही पण चांगली असते असे ऐकून आहे.
3 Mar 2014 - 9:57 pm | जोशी 'ले'
खानदेशी कळन्याची भाकरी खाल्लीत का बुवा? मस्तच लागते.. शिळी असेल तर ठेचा भाकरी अन् कांदा ...येकदम ट्टाॅक्क :-)
3 Mar 2014 - 11:04 pm | भ ट क्या खे ड वा ला
ती वांगी म्हणजे जणु एक पायाची कोंबडी वाटली.
जाड पांढरी वांगी म्हणजे खानदेशी वांगी का ? डोंबिवलीत बरेच वेळा मिळतात आणि भरीत (कांद्यासह अथवा दह्याचे दोन्ही उत्तम होतात)
3 Mar 2014 - 11:35 pm | मुक्त विहारि
होय.
हिरवट-जांभळी असतात.
बादवे, आपल्या डोंबिवलीत खानदेशी हॉटेल आहे.उद्याच जावून जरा पदार्थ टेस्ट करतो.
जमल्यास एखादा कट्टा इथे पण करू.
7 Mar 2014 - 3:28 am | निनाद मुक्काम प...
आमेन
2 Apr 2014 - 6:03 pm | मनुराणी
डोंबिवली मध्ये खास जळगाव, भुसावळ कडून भाज्या (भरताची वांगी, पोकळ्याची भाजी आणि बऱ्याच भाज्या) विकायला येतात. बुधवारी का शुक्रवारी पश्चिमेला मच्छी मार्केट रोडवर असतात.
3 Mar 2014 - 11:37 pm | मुक्त विहारि
"हिरवट- पांढरी " करायला हवे.
(स्वसंपादनाची सोय हवी का नको?)
4 Mar 2014 - 2:07 am | गणपा
मिशन सस्केसफुल.
किंचीत केलेला बदल म्हणजे मसाला परतुन झाल्यावर टॉमेटो अॅडवले आणि ते शिजल्यावर पाणी टाकुन उकळी आणली.
सोबतीला बाजरीची धिरडी केलीत. या जेवायला.
5 Mar 2014 - 1:29 am | आयुर्हित
जबरीच फोटो आहेत हो.व्वा क्या बेत है!
बाजरीची धिरडी ची कल्पना मनापासून आवडली. धन्यवाद.
कृती पाठवा आता लवकर.
9 Mar 2014 - 9:40 pm | आरोही
गणपा जी ,अंडाकरी मस्त दिसत आहे आणि बाजरीचे धिरडे कसे करतात जरा कळू द्या आम्हाला ...
4 Mar 2014 - 2:18 am | सखी
वाचुनच पाणी सुटले. मी शाळेत असताना माझी मैत्रिण असा मसाला वाटायची तेव्हा अगदी पाटा+वरवंटा होता फार मस्त लागायचे ते वाटण, गरम किंवा शिळ्या भाकरीबरोबर, सोबत कांदा, लसणीची कोरडी चटणी असेल तर अहाहा - स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असावा!!
अद्वेय---मला एकही फोटो नाही दिसत (बरचं आहे म्हणा...अजुन जळजळ झाली असती).
गणपाभाऊंचे दिसले.
4 Mar 2014 - 2:37 am | अनन्त अवधुत
मनासारखी शेव काही मिळत नाही त्यामुळे पर्याय म्हणून भावनगरी शेव वापरतो.
आता शेवभाजीची आठवण काढलीच आहे तर मिरच्याच्या भाजीची (भजी नाही भाजी) पण पाकृ येऊ द्यात.
झक्कास पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद.
4 Mar 2014 - 10:28 am | त्रिवेणी
@ अनन्त अवधुत
तुम्हाला मिरचीची पातळ हिरव्या रंगाची भाजी ह्वी आहे का?
5 Mar 2014 - 12:39 am | अनन्त अवधुत
मला ती भाजी ओरपता येते पण बनवता येत नाही. ते काम आईचे.
5 Mar 2014 - 2:07 pm | आरोही
माफ करा पण मला अजून तुम्ही कोणत्या भाजीबद्दल बोलत आहात ते कळले नाही ..तुम्ही जर शेंगदाण्याचे आणि हिरव्या मिरचीचे वाटण लावून केलेल्या मेथी वैगेरे अशा पातळ भाजी बद्दल बोलत असाल तर तसे सांगावे मी नक्की यथे देण्याचा प्रयत्न करेन .....+)
2 Apr 2014 - 1:04 am | अनन्त अवधुत
त्याला जळगावला बहुधा डाळगंडोरी म्हणतात. आम्ही मलकापूर - खामगाव कडे मिरच्यांची भाजी म्हणतो. खर्याखुर्या तिखट हिरव्या मिरच्यांचे आंबटचुका घालून केलेले वरण.अर्थात आंबटचुक्यासोबत त्यात बाकी मसाला (शेंगदाणे , खोबरे, ई. ) पण असतो.
2 Apr 2014 - 5:55 pm | मनुराणी
आमच्याकडे म्हणजे जळगाव, भुसावळकडे या भाजीला डायगंडोरीची भाजी म्हणतात. आणि माझ्या माम्या इतकी चविष्ट बनवतात कि कितीही खाल्ली तर मन भरत नाही.
बाकी तिकडचा बोंडे मसाला पण खूप प्रसिद्ध आहे. यावेळी आणला आहे पण अजून वापरला नाही.
4 Mar 2014 - 2:58 pm | इरसाल
इथे कोणी आहे का खान्देशी ? ;)
4 Mar 2014 - 10:28 pm | समीरसूर
जमली आहे पाककृती! लिखाण देखील छान!
समीर
5 Mar 2014 - 1:35 am | आयुर्हित
मन वढाय वढाय, उभ्या पिकातले ढोर सारखीच आमची गत झाली बघा.
जबरदस्त फोटो व पाकृ आहे. उद्याच करून पाहतो मी.
आणि हो एकदा खानदेशी वन भोजनाचा कट्टा करायला हवाच!
5 Mar 2014 - 8:39 am | प्रमोद देर्देकर
अरे रे सकाळी सकाळी असा अत्याचार ना. फटू जबराट आले आहेत.
आम्ही कधी खानदेशी जेवण जेवलेलो नाहिये म्हणुन ही पा.कृ. पाहुन तों.पा.सु.
एकदा ही भरली वांगी खावुन बघितली पाहिजेत.
5 Mar 2014 - 2:16 pm | मृत्युन्जय
मूळ धाग्यातले आणि गंपाचे दोन्ही फोटॉ लै कात्तिल आलेत.
5 Mar 2014 - 5:34 pm | भावना कल्लोळ
छळ मांडीयेला मिपाच्या या धाग्यावरती, भुकेने कासावीस झाले मिपाकर सारे रे …
8 Mar 2014 - 4:38 pm | सुहास..
खल्लास !! आवडेश ..
तेव्हढ चक्रीफुल अंमळ वाटुन घालायला विसरलास वाटत ;)
8 Mar 2014 - 11:23 pm | आनंदी गोपाळ
हात तुम्हनी तं तुम्हले मरीमाय खायजो, बाट्टोडहो!
आठे शेवभाजी आन अंडानं बट्टं अन भरीत - कयान्यानी भाकरन्या बाता करी र्हायनात आन एकले बी अहिरानीमा लिखानी याद नही उनी?
असा कसा खान्देशी शेतस तुम्ही लोके?
9 Mar 2014 - 9:36 pm | आरोही
'व तुले मरीमाय खायजो 'हे माझीचे नेहमीचे वाक्य असायचे ,मला हि भाषा बोलत येत नाही पण समजते खरेच खूप गोड असते हि भाषा मस्त वाटते ऐकायला ...+)
9 Mar 2014 - 3:40 pm | त्रिवेणी
बठासले आखाजिन आवतण आतेच दी द्या. मंग आपण समदा जमिसन अहिराणी कट्टा करसू.
9 Mar 2014 - 3:46 pm | प्यारे१
धुळे, मालेगाव ना?
लई गोड वाट्टे ही भाषा कानाला. समजत फार नाही काही पण दोन तीन मित्रांच्या तोंडी ऐकलीये. भारीच्च्च!
तो खानदेशी मसाला बघून 'गार' झाल्या गेले आहे.
9 Mar 2014 - 3:58 pm | त्रिवेणी
हो
आणि जळगाव सुध्दा.
9 Mar 2014 - 4:02 pm | प्यारे१
ज'ड'गाव म्हणायचं ज'ड'गाव! ;)
9 Mar 2014 - 4:06 pm | त्रिवेणी
ड हा उच्चार जास्त करुन रावेर, भुसावळ, सावदा साईडला जास्त होतो.
9 Mar 2014 - 9:44 pm | आरोही
बाकी सर्वांनी एवढ्या मस्त प्रतिक्रिया दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार ...+)
9 Mar 2014 - 11:20 pm | भाते
बोंबललो ना मी आता! झोपायच्या आधी शेवटची पाकृ म्हणुन वाचायला घेतली आणि पाकृ वाचुन संपेपर्यंत पुन्हा भुक लागली ना मला! काय करू मी आता? :(
पुढल्या विकांताला नक्की करून बघावी लागेल हि अंडाकरी.
धन्यवाद अद्वेय. अप्रतिम पाकृ.