इथे चाललेल्या चर्चेवरुन परवाचाच एक भष्टाचार आठवला...
शनि-रविवारी गावी गेलो होतो. आईने रयवार सक्काळ्-सक्काळी गादीतून ओढुन काढलं आणी "मुन्शीपाल्टीच्या शाळेत जा आणी आधार कार्ड काढुन घेउन ये. ज्जा." म्हणुन हाकललं. १० वाजता आंघोळही न करता, टी-शर्टवरच मी शाळेत हजर. पाहतो तो काय?? २ टेबलांवर अंदाजे ६०-६५ जणांच्या २ मोठ्या रांगा लागलेत. अर्धा तास रांगेत कंटाळून उभा राहिल्यावर मागच्या माणसाला माझा नंबर धरुन ठेवायला सांगुन पुढे टेबलाजवळ जाउन पाहिले.
'तो' साहेब आणी खेड्यातली 'ती' यांचा संवाद काहीसा असा चालला होता-
तो- बाई नाव काय??
ती- हळक्षज्ञ.
तो- जन्मतारीख?
ती- काय ध्यानात न्हाई ओ. आणी वरीस तर म्हाईत बी न्हाई.
तो- मग ह्यात काय लिहू आता?? बरं, (रेटीना स्कॅनर पुढे करत..) ह्यात बघा
ती- काय दावताइसा ? आज चाळशी आणली न्हाई, :))
तो- (वैतागून..) बाई, बघा म्हटलं की बघायचं. बोटं हितं लावा म्हटलं, की लावायची. मागं रांग बघालैसा न्हवं??
---
च्यायला, या प्रश्नोत्तरांच्या रेटने प्रत्येकी १० मिनीट धरले तरी ६० लोकांना ५ तास. त्यात मधे जेवणाची सुट्टी.
वाटलं रविवार इथंच काढतंय आता.. :( त्याला म्हटलं, "साहेब, काय शॉर्टकट आहे काय?"
तो म्हणाला, "६ ला या".
आम्ही खुश. संध्याकाळी आरामात ६ नंतर गेलो. नो रांग-नो वेटींग. फक्त ५० रुपये त्याच्या खिशात. तेरी भी चूप, मेरी भी चूप.
---------------
घरी आल्यावर बहिणीबरोबर चर्चा-कम-भांडण.
---------------
मी किंवा तो भ्रष्टाचारी झालो काय?
सरकारी वेळ फक्त ६ पर्यंतची होती. ती व्यक्ती त्यानंतर थांबून माझे काम करुन देतो म्हणाली. सरकारी वेळेत नाही. त्याने स्वतः पैशाची मागणी केली नव्हती.
माझ्या त्या ५-६ तास वाचवण्याच्या बदल्यात ५० रुपये द्यायला मी तयार झालो.
या आमच्या सौद्यामुळे कुणाचेच (म्हणजे रांगेतले इतर लोक, सरकार, मी, तो साहेब) नुकसान झाले नाही. उलट सर्वांचा (?) फायदाच झाला.
पण सरकारने अशी काही जादा फी घेणे किंवा व्हॅल्यु/प्लस/प्रो कस्टमर असा भेदभाव केलेला नाही. जर तसे असते तर हे ५० रुपये देणं नैतिक ठरेल काय?
---------------
तुम्हाला काय वाटते??
---------------
.
प्रतिक्रिया
8 Feb 2014 - 1:33 am | मदनबाण
तुम्हाला काय वाटते??
सरकारने अशा फालतु योजना राबवु नयेत ! म्हणजे कोणाचाही वेळ फुकट जाणार नाही ! ;)
8 Feb 2014 - 1:39 am | यसवायजी
+१११११
:D
साला रविवार फुक्कट गेला असता च्यामारी.
8 Feb 2014 - 1:50 am | अस्वस्थामा
हा सरळ सरळ भ्रश्टाचारच की वो.. सरकारी सामान, वीज वगैरे वापरून तुम्ही कमाई करणार आणि भ्रश्टाचार नाही म्हनता व्हय ??
8 Feb 2014 - 2:40 am | प्यारे१
मी स्वतः पैसे घेत नाही.
देतो.
समोरच्याला देणं चुकीचं आहे हे माहिती असताना देतो कारण तसे न केल्यास माझा वेळ, ताकद नि वेळेच्या नि बुद्धीच्या/ शरीराच्या वापराद्वारे मिळू शकणारा पैसा वाया जात असतो. (ठरवून लाच स्वरुपात लाच सुद्धा देतो)
साम, दाम, दंड, भेद ह्या नीतीच असाव्यात. ह्यांचा वापर करुन मी माझं काम करुन घेतो.
कधी निव्वळ बोलण्यावर काम होतं कधी पैशांनी. सिंपल.
समोरच्यानं त्याला वाटल्यास पैसे न घेता काम करावं. त्याला काय वाटावं हा त्याचा प्रश्न आहे.
(त्याला त्याच्या कामाचे पैसे मिळतात की तरीही तो आणखी का मागतो, अशी आपली इमानदारी दाँव पे लावावी का इथपासून मग आईबहिणीला, बायकोला .... इ.इ. प्रश्न पडून घेऊ नयेत.)
मला सर्वार्थानं परवडत असेल तर मी योग्य मार्ग वापरेन, परवडत नसेल तर वेगळा मार्ग वापरेन
(कंडीशनः मुळात माझं काम चुकीचं असू नये)
काल कुणी म्हणे एच आर ए, मेडीकल बिल्स, एल टी ए ची बोगस बिल्स वापरली जातात.
माझा प्रश्न का वापरु नयेत???? अनेकदा मेडीकल बिल्स अथवा एल टी ए च्या ऐवजी अनेक प्रकारे खर्च होत असतो. हा अत्यावश्यक खर्च करमुक्तीमध्ये नसतो. त्याचं काय करावं?
कंपनी जॉईन करताना पॅकेज ठरलेलं असतं. त्यात वरच्या गोष्टी दिलेल्या असतात. त्या न वापरल्यास कुणाचंही नुकसान होत नाही. सरकार खजिन्यात कर दिला जात असतो.
सरकारचं नुकसान होतं हा मुद्दा अत्यंत वेगळ्या पद्धतीचा आहे.
(खुलभर दुधाची गोष्ट सांगण्यात येईल काय?)
- धागा धगधगता ठेवण्यासाठी आवश्यक इंधनाची लाच दिलेला. ;)
9 Feb 2014 - 2:20 pm | अनुप ढेरे
हीच आर्ग्युमेंट वापरून बहुतांश लोक भ्रष्टाचाराचं समर्थन करत असतील. म त्यामुळे आपण इतर भ्रष्टाचार्यांना नावं नाही ठेऊ शकत. एक वापरून गुळगुळीत झालेलं वाक्यं आठवल.
People always get the government they deserve.
आपल्याला भ्रष्टाचारीच राज्यकर्ते मिळणार.
9 Feb 2014 - 2:22 pm | अनुप ढेरे
हीच आर्ग्युमेंट वापरून बहुतांश लोक भ्रष्टाचाराचं समर्थन करत असतील. म त्यामुळे आपण इतर भ्रष्टाचार्यांना नावं नाही ठेऊ शकत. एक वापरून गुळगुळीत झालेलं वाक्यं आठवल.
People always get the government they deserve.
आपल्याला भ्रष्टाचारीच राज्यकर्ते मिळणार.
8 Feb 2014 - 7:27 am | जेपी
हे तर साटलोट झाल कुणाच बी नुस्कान झाल नाय .
( 10 रु . देऊन आधार कार्ड काढलेला ) जेपी
8 Feb 2014 - 8:22 am | आतिवास
हो. हा भ्रष्टाचार आहे.
पण जोवर तो करावा लागेल असं आमिष किंवा अशी अपरिहार्यता निर्माण करणारी व्यवस्था आहे, तोवर भ्रष्टाचार होत राहणार.
सध्याच्या व्यवस्थेत अजिबात भ्रष्टाचार करायचा नाही तर - तुमचा मूल्यांवर विश्वास पाहिजे, तुमच्याकडे मूल्यांचा आग्रह धरण्याची किंमत मोजायची तयारी पाहिजे, तुमच्याकडे भरपूर वेळ पाहिजे, तुमच्याकडे जबरदस्त चिकाटी आणि सहनशीलता पाहिजे, तुमच्याकडे जिद्द पाहिजे, तुमच्याकडे हेलपाटे घालायला पुरेसे पैसे पाहिजेत .... आणि हो, मुख्य म्हणजे आपल्या हातून चूक झाली हे कबूल करण्याची मनोवृत्ती पाहिजे (उदाहरणार्थः 'नो पार्किंग' मध्ये गाडी लावली).
खरं तर तक्रारीची दखल घेणारी योग्य यंत्रणा असेल तर यातल्या ब-याच गोष्टी नसतानाही अजिबात भ्रष्टाचार न करता जगता येईल. पण ते सध्या अशक्य नसले तरी अवघड मात्र जरुर आहे.
पण आपण आपल्या झेपेल तितका भ्रष्टाचार करतो, तेव्हा इतरांच्या भ्रष्टाचाराबद्दल आरडाओरडा, तक्रार करायची सोय राहात नाही हेही लक्षात घ्यायला हवं!
भ्रष्टाचार सभोवाताली नको असेल तर फक्त गंभीर परिस्थितीत (आपला स्वतःचा आणि/अथवा अन्य कुणाचा जीव वाचवायचा आहे - उदाहरणार्थ हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावेत) भ्रष्टाचार मला समजेल, मान्य होईल. तुमचा इथला भ्रष्टाचार निव्वळ आळसातून आल्यासारखा दिसतोय. तसंही अजून वर्षभर आधार कार्ड नाही झालं तर काही बिघडत नाही. तुम्ही विचारलात ना प्रश्न - मग आता स्पष्ट सांगितलं नाही, तर तोही एक भ्रष्टाचार होईल :-)
त्यामुळे : हो, हा भ्रष्टाचार आहे. हा केला नसतात तर बरं झालं असतं.
"आय पेड अ ब्राईब" सारखी मालिका मराठीत सुरु करायला हरकत नाही.
8 Feb 2014 - 10:39 am | यसवायजी
>> सध्यातरी आपण याला भ्रष्टाचार म्हणू. भ्रष्टाचार आहे हे सांगितलेत. पण याला भ्रष्टाचार का म्हणावे हे जरा उलघडुन सांगावे ही णम्र विनंती. (कारण भ्रष्ट-आचाराची संकल्पनासुद्धा स्थळ,काळ आणी परिस्थितीनुसार बदलते.)
@ जोवर तो करावा लागेल असं आमिष किंवा अशी अपरिहार्यता निर्माण करणारी व्यवस्था आहे, तोवर भ्रष्टाचार होत राहणार.
>> +१११
व्यवस्था चांगली असती तर? या केसमधे दोनाऐवजी सहा टेबल असते तर मी पण थोडावेळ थांबलो असतो.
.
बाकी आळसाचं म्हणाल तर मी लै आळशी माणुस. पण इथे त्यापेक्षा वेळेला जास्त महत्व होते. महिन्यातुन एकदा गावी घरी जायचं, त्यातपण असल्या फालतू कामासाठी दिवस वाया घालवायचा नाही म्हणून दिडेक वर्ष लक्षच दिले नव्हते. पण कार्ड कधीतरी काढावे लागणारच. आणी इथे पुण्यात काढायचे म्हणजे परत पत्ता कुठला द्यायचा? सपोर्टींग डोक्सची बोंब. आपको तो सिस्टीम पता हैच की. ;)
9 Feb 2014 - 1:22 pm | मारकुटे
आधार कार्ड हाच एक फार मोठा झोल आहे.. त्यामुळे त्यासंबंधित काहीही झोलच :)
9 Feb 2014 - 1:41 pm | कानडाऊ योगेशु
विन विन आहे का नाही हे सांगता येणार नाही.पण उद्या कुणी आर.टी.आय मार्फत तुमच्या आधार कार्डसे डिटेल्स मागवले आणि त्यात तुम्ही जेव्हा आधार कार्ड काढले त्याची नोंद झालेली वेळ पाहीली आणि ती सरकारी कामाची वेळ संपल्यानंतरची आहे हे जर माहीत झाले तर तुम्ही व तो अधिकारी दोघेही गोत्यात येऊ शकता.
मध्ये किरण बेदी बाई नाही का अश्याच बिलांच्या ( हवाईमार्गे प्रवास इकॉनॉमी ने केला व बिझनेस चे चार्जेस लावले असा काहीसा वाद होता तो) माहीतीमुळे गोत्यात आल्या.
अतिवास म्हणतात त्याप्रमाणे
हा मुद्दा महत्वाचा आहे.
9 Feb 2014 - 1:55 pm | मारकुटे
>>त्याची नोंद झालेली वेळ पाहीली आणि ती सरकारी कामाची वेळ संपल्यानंतरची आहे हे जर माहीत झाले तर तुम्ही व तो अधिकारी दोघेही गोत्यात येऊ शकता.
काही संबंध नाही. सहा वाजेच्या आत जेवढे लाईनमधे उभे होते ते पूर्ण केले अस सांगता येतं. बँकेत सुद्धा वेळ संपली की नवा माणूस आत येऊ देत नाहीत. आत मधे जेवढे असतात त्यांना पैसे दिले घेतले जातात. तेच इथे सुद्धा लागू.