विनयभंग

शितल's picture
शितल in काथ्याकूट
22 Jul 2008 - 5:53 pm
गाभा: 

विनयभंग

Assault or criminal force to woman with intent to outrage her modesty.
Whoever assaults or uses criminal force to any woman, intending to outrage or knowing it to be likely that he will thereby outrage her modesty, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years, or with fine, or with both.

भारतीय दंड विधान ३५४ नुसार विनयभंग म्हणजे काय?आणि त्याला कोणती शिक्षा आहे ?त्याबद्दलची कायद्याची परिभाषा अशी आहे...
विनयभंगः महिलेला लज्जा उप्तन्न होईल ह्या हेतुने केलेला अत्याचार व बळाचा बेकायदा वापर.
शिक्षा: जो कोणी ,जाणता अथवा अजाणता, महिलेवर अत्याचार करेल अथवा बेकायदेशीरपणे बळाचा वापर करुन असे वर्तन करेल त्याला अश्या कोणत्याही कृत्याबद्दल दोन वर्षांपर्यंत कैद अथवा दंड अथवा दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागतील.

विनयभंग! ह्या गोष्टीने स्त्रीच्या शरीराला जितक्या वेदना होत असतील त्यापेक्षा कितीतरी पटीने मनाला वेदना होतात.
भारतीय समाजात स्त्रीयांना सतावणार्‍या अनेक त्रासांपैकी एक त्रास म्हणजे विनयभंग. स्त्री, मग ती समाजातील अगदी उच्चभ्रू स्तरातील असो वा अगदी तळागाळातील असो, काही पुरूषांच्या विकृत प्रवृत्तीचा त्रास हा स्त्रीयांना होतच असतो. स्त्रीयांच्या भाषेत बोलायचे झाले तर पुरूषांच्या अश्लिल प्रवृत्तीचा आणि शेर्‍यांचा त्रास स्त्रीयांना सदैव सहन करावा लागत असतो.
कधीकधी कोर्टात विनयभंगाच्या केसेस दाखल होत असतात, पण त्यातही विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की, कैक स्त्रीया आपली बदनामी नको म्हणुन केसेस दाखल ही करत नसतील, किंवा साधी पोलीसात तक्रारही देत नसतील. पण वस्तुस्थिती अशी आहे की थोड्याफार फरकाने अनेक स्त्रीयांना कधीना कधी कमी जास्त प्रमाणात ह्या गोष्टीला सामोरे जावे लागतेच .

असे म्हणतात की स्त्रीयांना स्पर्शाचे (चांगल्या/ वाईट हेतु )ज्ञान उपजतच असते. मुलगी जेव्हा बाल अवस्थेतून तारूण्यात पदार्पण करू लागते तेव्हा काही पुरूषांचा विकृत स्पर्श, नजर यांची जाणीव तिला निसर्गाकडूनच देणगीच्या स्वरूपात मिळत असते असे वाटते. अशा वेळी तिला परपुरूषा इतकाच धोका तिच्या जवळच्या नातलगांकडूनही असतो. ज्याच्या अंगाखांद्यावर लहानपणी खेळलो असतो अशा लोकांचा वयात आल्यावर सहेतुक स्पर्श कळतो. मनात लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरल्याने मुलीच्या मनाची कुंचबणा होते. जर घरी मोकळे वातावरण नसेल तर ती बोलू ही शकत नाही आणि मनात त्या व्यक्ती विषयी घृणा निर्माण होते. कधी कधी मनात असंख्य विचार येतात, पुरूषांकडे पाहण्याची प्रवृत्ती बदलते. स्वत: बद्दल अपराधी भावना निर्माण होते . कोवळ्या वयात विनयभंगाचा अनुभव आल्यास मुलींच्या मनाची अवस्था अशी होते आणि त्या मनातल्या मनात कुढत बसतात.

आज अनेक ठिकाणी रात्रंदिवस स्त्री आणि पुरूष एकत्र काम करतात. स्त्रीयांना कधी सहकार्‍यांच्या तर कधी साहेबाच्या विकृत प्रवृतीला समोरे जावे लागते, त्यावेळी कामातील लक्ष कमी होणे, सदैव मन अस्वस्थ असणे वगैरे अनुभव येत असतात.
एखाद्या बसमध्ये, ट्रेन मध्ये , बस स्टॉपवर, जेथे जेथे सार्वजनिक ठिकाणे आहेत तेथे छुप्या प्रमाणात कोणत्या ना कोणत्या स्त्रीचा विनयभंग होत असतो. आज काही स्त्रीया ह्या विरोधी आवाज उठवतात पण त्यांचे प्रमाण खुप कमी आहे, कारण किती ही झाले तरी लाज हा प्रकार स्त्रीला जीवाहुन प्रिय असतो. समजा एखाद्या स्त्रीने ह्या विनयभंगा विरूध्द पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोदंविली तरी तिला इतक्या लज्जास्पद प्रश्नानां सामोरे जावे लागते कि तेथेच तिचा निम्मा धीर खचतो. पुढे ती केस कोर्टात उभी राहिली तर उरलेल्या लाजेच्या चिंध्या त्या बचाव पक्षाचा वकिल काढतो. साक्षीदार असला तर ठीक ,पण असून ही तो फितुर झाला तर ती स्त्री लढा हरते. ह्याचमुळे दुस-या एखाद्या स्त्रीला अशाच गोष्टीसाठी लढा देऊन काही उपयोग होईल असे वाटत नाही आणि ती तो अन्याय मुक पणाने सहन करते.

माझ्या पाहण्यातील कोर्टातील एक केस सांगते जी खुप वर्ष चालली होती.
एक शाळकरी मुलगी होती . एके दिवशी तीची शाळा सुटल्यावर ती घरी गेली आणि घरातून पैसे घेऊन ५० पैशाची पेप्सी मिळते ते आणायला दुकानात गेली. पुढच्या खोलीत दुकान आणि मागच्या खोलीत मकान असा एकूण तिथला प्रकार होता. दुकानदाराने त्या मुलीला आत बोलावले आणि म्हणाला की, " आतल्या खोलीत फ्रीज मध्ये पेप्सी आहे तेव्हा तुच आत जाऊन स्वतःच्या हाताने घे."
ती शाळकरी मुलगी असल्याने तिच्या डोक्यात फारसे काही वेगळे आले नाही (दुकानदाराचा मुलगा आणि बायको गावी गेले होते ) . ही संधी साधून त्याने तिचा विनयभंग केला पण पुढच्या गोष्टी होण्यापासून ती थोडक्यात बचावली, आणि घाबरून पळत घरी आली. मात्र त्यावेळी तिने हे कुणालाच घरी सांगितले नाही. तिच्या रोजच्या वर्तनात मात्र अमुलाग्र बदल झाला होता (मी केस हिस्ट्री आठवुन सांगत आहे, कारण निकाल इतक्या वर्षानी आमच्या कारकिर्दीत दिला गेला असल्याने लक्षात आहे ). तिची भेदरलेली नजर, तिचे विक्षिप्त वागणे, शाळेला न जाणे, आणि कोणत्याही परपुरूषासमोर न येणे हे लवकरच तिच्या घरच्यांच्या लक्षात आले. तिला त्या बाबतीत तिच्या आईने विश्वासात घेऊन जेव्हा विचारले तेव्हा घडलेली गोष्ट उघडकीस आली. मग पोलीसात तक्रार, कोर्ट केस, साक्षीदार, ह्या सगळ्यातुन निकाल लागायला ७/८ वर्ष गेली तो पर्यत ती मुलगी लग्नाला आली होती तरी कोर्टात केस चालु होती. शेवटी सबळ पुराव्या अभावी आणि साक्षीदार कोणी नसल्याने तो आरोपी निर्दोष सुटला. पण त्या पुरूषाच्या विकृत प्रवृतीमुळे त्या मुलीच्या मनावर झालेला आघात ,तसेच तिच्या घरातील लोकांना झालेला मानसिक त्रास हा कधीच न विसरता येणारा अनुभव आहे.
म्हणून मला असे वाटते की,कायद्यात अशी तरतुद हवी होती की ज्यायोगे विनयभंगाच्या केस मध्ये साक्षीदार आणि कागदी घोडे यांचे महत्व कमी असावे आणि अशा प्रकारच्या पीडित स्त्रीची साक्ष महत्वाची ठरवावी म्हणजे आरोपीला शिक्षा मिळण्यास आणि समाजात ह्या गोष्टीचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

प्रतिक्रिया

सुचेल तसं's picture

22 Jul 2008 - 6:13 pm | सुचेल तसं

विनयभंग अथवा बलात्काराच्या बहुतेक केसेसमधे आरोपी आणि पिडीत स्त्री अथवा मुलगी ह्याखेरीज तिसरं कोणीही उपस्थित नसतं. बलात्काराच्या केसमधे "डी.एन.ए" चाचणीद्वारे गुन्हा सिद्ध करता येतो. विनयभंग हा सिद्ध करणं अवघड आहे. साक्षीदार असेल तर ठीक अन्यथा गुन्हेगाराच्या कबुलीजबाबावर, परिस्थितीजन्य पुराव्यांवर (असले तर) केसचं भवितव्य अवलंबुन असतं. आरोपीचं जर काही "क्रिमिनल रेकॉर्ड" असेल तर कदाचित संशयाला पुष्टि मिळत असेल. अन्यथा पांढरपेशी माणसाने जर असं कृत्य केलं (उदाहरणार्थः तुमच्या लेखातील दुकानदार) ते सिद्ध करणं अवघड ठरेल.

पीडित स्त्रीची साक्ष महत्वाची ठरवावी म्हणजे आरोपीला शिक्षा मिळण्यास आणि समाजात ह्या गोष्टीचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

तुमचा हा मुद्दा बर्‍याच अंशी बरोबर आहे. कारण केस जेवढी लांबेल तेवढं त्या पिडीत स्त्रीला अधिकाधिक मानसिक त्रासातुन जावं लागेल. पण दुसरी बाजु अशीही विचारात घेतली पाहिजे की "वैयक्तिक आकसापोटी" अथवा स्वार्थापोटी, एखादी स्त्री खोटा आरोप तर नाही करते ना? अर्थात असं प्रमाण खुपच कमी असु शकेल. तरीही हा एक महत्वाचा मुद्दा आहे.

http://sucheltas.blogspot.com

शितल's picture

22 Jul 2008 - 6:39 pm | शितल

पण दुसरी बाजु अशीही विचारात घेतली पाहिजे की "वैयक्तिक आकसापोटी" अथवा स्वार्थापोटी, एखादी स्त्री खोटा आरोप तर नाही करते ना? अर्थात असं प्रमाण खुपच कमी असु शकेल.
समाजात जशा चांगल्या प्रवृती आहे तशा वाईट ही आहेत, आपल्या येथील कायदा असा म्हणतो १०० अपराधी सुटले तरी चालतील पण एक निरपराधी वाचला पाहिजे.
त्यामुळे कायदा तशा पळवाटा ही आहेत. पण ह्या कायद्यात नक्की बदल करायला हवा.

वरदा's picture

22 Jul 2008 - 6:42 pm | वरदा

शितल तुझं म्हणणं पण सुचेल तसं म्हणतात तशी गोष्ट माझ्या ओळखीच्यात घडलेय्...एका बाईने कंपनीमधून काहीतरी चोरताना तिच्या बॉस ने पाहिलं आणि खूप एक्स्पेन्सिव्ह होतं म्हणून तो तिला बोलायला जाणार इतक्यात तिने विनयभंग केला म्हणून आरडाओरडा केला आणि त्यांनाच पोलिसांनी पकडलं....बिचारे ५-६ वर्ष खेपा टाकत होते कोर्टाच्या आणि नाचक्की झाली नोकरी गेली.घरी गरिबी आली ती वेगळीच.....
सुटले ते पण ती नाचक्की कायम त्यांच्या नावासमोर लागली...
बाकी खरच विनयभंग ही खूप कठीण गोष्ट आहे प्रूव्ह करायला....
सुंदर विचार करायला लावणारा लेख...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jul 2008 - 6:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> बाकी खरच विनयभंग ही खूप कठीण गोष्ट आहे प्रूव्ह करायला....
+१

>> सुंदर विचार करायला लावणारा लेख...
+१

अवांतरः मधे कुठेतरी वाचनात आलं होतं, "मुलगी वयात येताना तिला काय कर, काय टाळ ते सांगतात. पण मुलांना (मुलग्यांना) कधी कोणी आई-वडील असं काही सांगतात का? जबाबदारी फक्त मुलीचीच का?"

संहिता

इनोबा म्हणे's picture

22 Jul 2008 - 7:31 pm | इनोबा म्हणे

विचार करायला लावणारा लेख...
हेच म्हणतो

"मुलगी वयात येताना तिला काय कर, काय टाळ ते सांगतात. पण मुलांना (मुलग्यांना) कधी कोणी आई-वडील असं काही सांगतात का? जबाबदारी फक्त मुलीचीच का?"
+१

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्रकाश घाटपांडे's picture

22 Jul 2008 - 7:18 pm | प्रकाश घाटपांडे

रॅगिंग हा देखील एकप्रकारचा विनयभंगच आहे. तो वेगळा विषय आहे.
स्त्री-पुरुष समानतेच्या युगात अशा घटना होत असतात. जर स्त्री कणखर बनली नाही तर तिला घरातच बसावे लागेल. याचा अर्थ तिने संवेदना हीन बनावे असा नाही. सहसा स्त्रीची तक्रार खरी आहे असे गृहीत धरुनच कारवाई होते. पुरुषाला आपले निरपराधित्व सिद्ध करावे लागते. खोट्या तक्रारींचे प्रमाण आता वाढू लागले आहे. न नोंदवल्या जाणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाण दोन्ही बाजुनी वाढते आहे. निसर्गाने दिलेल्या शरीररचनेचा तसेच मनोरचनेचा भाग हा या ठीकाणी महत्वाचा ठरतो.
प्रत्येक स्रीची विनयभंग या गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टीकोन सारखा नाही. काही स्त्रिया (सहसा भांडकुदळ)त्याचे भांडवल करतात. पण अशा स्त्रियांकडे पहाण्याचा इतर स्रियांचा दृष्टीकोन ही वेगळाच असतो.
माझ्या नातेवाईकांकांच्या सोसायटीत, सोसायटीचे मेंटेनन्स चार्जेस न देता या विनयभंगाची तक्रार करीन अशी धमकी देणारी स्री आहे . सेक्रेटरी पुरुष घरी जाउन मागायला घाबरतात. कारण इतरही इतिहास त्यांच्या पहाण्यात असतो.
प्रकाश घाटपांडे

भडकमकर मास्तर's picture

23 Jul 2008 - 9:40 am | भडकमकर मास्तर

माझ्या नातेवाईकांकांच्या सोसायटीत, सोसायटीचे मेंटेनन्स चार्जेस न देता या विनयभंगाची तक्रार करीन अशी धमकी देणारी स्री आहे . सेक्रेटरी पुरुष घरी जाउन मागायला घाबरतात. कारण इतरही इतिहास त्यांच्या पहाण्यात असतो.__
बापरे ..काय भयंकर लोक आहेत हो... :O
____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्राजु's picture

22 Jul 2008 - 7:36 pm | प्राजु

म्हणून मला असे वाटते की,कायद्यात अशी तरतुद हवी होती की ज्यायोगे विनयभंगाच्या केस मध्ये साक्षीदार आणि कागदी घोडे यांचे महत्व कमी असावे आणि अशा प्रकारच्या पीडित स्त्रीची साक्ष महत्वाची ठरवावी म्हणजे आरोपीला शिक्षा मिळण्यास आणि समाजात ह्या गोष्टीचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल

हे पटले. कायद्यात बदल होणे गरजेचे आहे.

वर सुचेल तसं यांनी म्हंटल्याप्रमाणे किंवा वरदाने दिलेल्या उदाहरणावरून, असं विचारावं वाटतं की, असं कितीवेळा स्त्रीयांनी पुरूषांना उगाचच वेठीस धरले असेल? १०० मध्ये २ नाहीतर ३. पण बर्‍याच वेळा स्त्रीलाच या विनयभंगाच्या अत्याचाराला सामोरं जावं लागतं. तुझा लेख वाचून मला पुन्हा एकदा डेबोरा रोड्रिक्स यांच्या काबूल ब्युटीस्कूल या पुस्तकाची आठवण झाली.
कायद्यामध्ये काही बदल होणं इतकं सोपं नक्कीच नाही. यासाठी घरीच मनमोकळं वातावरण असणं.. आई- मुलीमध्ये मैत्रिणीसारखं नातं असणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलगी वयात येताना, तिच्यामध्ये होणार्‍या शारिरिक तसेच मानसिक बदलांची आईने स्वतः तिला माहिती करून देणं... गरजेचं आहे. अश्लिल शेरे बर्‍याचदा सोडून दिले जातात.. पण तू जी केस इथे सांगितली आहेस.. तशा प्रकारचं कोणी वर्तन केलं तर नक्की काय करायचं हे आईने सांगणं गरजेचं आहे.
जितके जास्त कायदे तितक्या जास्त पळवाटा... ही सत्यस्थिती आहे. एक नविन कायदा अस्तित्वात आला की त्यासाठी हजार पळवाटा निघतात. त्यामुळे स्वसंरक्षण हा एकमेव उपाय आहे.. असं माझं मत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा's picture

22 Jul 2008 - 7:43 pm | वरदा

त्यामुळे स्वसंरक्षण हा एकमेव उपाय आहे.. असं माझं मत आहे.

१००% पटलं...आई मुलगी आणि तसच मुलं आणि त्यांचे पालक ह्यांच्यात सुसंवाद खूप उपयोगी ठरेल हेही एकदम बरोबर..
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

संदीप चित्रे's picture

22 Jul 2008 - 7:44 pm | संदीप चित्रे

शीतल,
विचार करायला लावणारा विषय आहे. गेल्या काही वर्षांत विनयभंगाच्या बातम्या खूपच वाढायला लागल्या आहेत.
एक मात्र खरं की पुरूषांनाही जपून वागावं - बोलावं लागतं. माझ्या माहितीतल्या एका तरूण मुलीला तिचा प्रोजेक्ट लिडर, कामातल्या चुकांबद्दल रागावला होता. ती तिथेच रडायला लागली. जेव्हा प्रोजेक्ट लिडरच्या साहेबाला सगळं समजलं तेव्हा त्याने तिला आधी शांत करून घरी पाठवलं आणि नंतर प्रोजेक्ट लिडरला समजावून सांगीतलं की प्रकरण कुठच्या दिशेला जाऊ शकलं असतं. आता प्रश्न असा आहे की त्या तरूणीच्या जागी जर एखादा तरूण असता तर रडून काम भागलं असतं का? (कृपया हा गैरसमज नको की मी पुरूषकेंद्रित विचारांचा आहे ! )

>> अशा वेळी तिला परपुरूषा इतकाच धोका तिच्या जवळच्या नातलगांकडूनही असतो.
कुठे वाचलं होतं ते आता आठवत नाही पण असं वाचलं होतं की "ओळखीचा पुरूष धोका देतो".

मुलींना लहानपणापासून मानसिकदृष्ट्या सबल करणं हे पालकांचं कर्तव्यच नाही तर तो त्यांचा धर्म व्हावा !!
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

प्राजु's picture

22 Jul 2008 - 8:38 pm | प्राजु

मुलींना लहानपणापासून मानसिकदृष्ट्या सबल करणं हे पालकांचं कर्तव्यच नाही तर तो त्यांचा धर्म व्हावा !

+१........ हेच सगळ्यात योग्य.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रमोद देव's picture

22 Jul 2008 - 9:25 pm | प्रमोद देव

मीना नाईक ह्यांचे "वाटेवरती काचा गं" हे नाटक ह्याच विषयावरचे आहे. घरातली ,अगदी जवळची ,नात्यातली वडीलधारी मंडळी लहान मुलींचा कसा गैरफायदा घेतात आणि त्यावेळी त्या मुलींची होणारी कुचंबणा,त्यावर घरातल्या मोठ्या स्त्रियांनी करायच्या गोष्टी की ज्यामुळे मुलींना अशा प्रसंगाना धीटपणे सामोरे जाता येऊ शकते आणि त्या त्या वडीलधार्‍याची वेळच्या वेळी हजेरी घेता येऊ शकते वगैरे विषय ह्यात हाताळले आहेत. कुठे पाहायला मिळाले तर जरूर पाहा.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

भाग्यश्री's picture

23 Jul 2008 - 12:42 am | भाग्यश्री

देवकाकांनी उल्लेखलेलं नाटक खरंच चांगलं आहे या विषयावर.. नक्की पहावं असं..
संहीता आणि संदीप दोघांचंही म्हणणं पटलं.. मुलगा आणि मुलगी दोघांनाही या गोष्टी समजावून सांगितल्या पाहीजेत..
बाकी, नको ते शेरे मारणं, रोड-रोमिओगिरी करणे हा प्रकार मी फक्त भारतातच का पाहीला? बाकी कुठेही मला असं आढळलं नाही.. रस्त्यावरून मनमोकळेपणे बिन्धास्त, कुणाचीही फिकीर न करता इथे जसे जाता येते, तसे भारतात का नाही होत? माझं ऑब्झर्वेशन असं आहे की इथे कुणी कुणाकडे बघत देखील नाही.. पण आपल्याइथे मात्र किती नजरांना , शेर्‍यांना सामोरे जावे लागते.. लोकांची ही मानसिकता बदललीच पाहीजे ही..
शितल, खूप चांगला लेख लिहीलायंस.. कोर्टामधला अनुभव असल्याने तुला हे सगळं जवळून पाहायला मिळत असेल.. सगळे अनुभव शब्दबद्ध कर नक्की! पुढच्या लेखाची वाट पाहाते..

प्रियाली's picture

23 Jul 2008 - 1:04 am | प्रियाली

अनेक स्त्रियांना आयुष्यात विनयभंगाला सामोरे जावे लागते आणि बरेचदा याचे कारण पुरूषी अहंकार हे असते. बाईला तिच्या इच्छेशिवाय स्पर्श करू पाहणार्‍या पुरूषांची भीती न वाटता किव वाटायला हवी आणि ती वाटण्यासाठी स्त्रियांना कणखर होणे गरजेचे आहे.

जिथे पुरूषी वर्चस्व अधिक तिथे विनयभंगाचे प्रकार अधिक घडतात. अरबी राष्ट्रांत अशा प्रकारांसाठी कडक शिक्षा आहेत पण तिथेही असे प्रकार सर्रास घडतात. अमेरिकेत कोर्टातील न्याय चटकन मिळतो (स्मॉल कोर्ट्समध्ये इ.) त्यामुळे इथे तसे प्रकार कमी आहेत. जिथे कोर्ट कचेर्‍यांच्या वार्‍या संपत नाहीत, खटला भरणार्‍या स्त्रीचीच जिथे समाज अवहेलना करतो तिथे हे दुर्दैवी प्रकार घडत राहणार.

तुम्ही ज्या मुलीची गोष्ट सांगितलीत ती अशाप्रकारच्या गोष्टीला सामोरी गेली आहे आणि तिची एक केस कोर्टात उभी आहे, वर्षानुवर्षे चालत आहे असे म्हटल्यावर तिच्याशी लग्न करायला फारजण उत्सुक असतील असे वाटत नाही.

चित्रा's picture

23 Jul 2008 - 1:56 am | चित्रा

बाईला तिच्या इच्छेशिवाय स्पर्श करू पाहणार्‍या पुरूषांची भीती न वाटता किव वाटायला हवी आणि ती वाटण्यासाठी स्त्रियांना कणखर होणे गरजेचे आहे.

अगदी मनातले विचार.. कणखर होण्याखेरीज अशा पुरूषांना असे कृत्य करण्याची भिती वाटली पाहिजे.
अजून एक- स्पर्श हा फक्त physical असतो अशातला भाग नाही. ही वृत्ती नजर, विरोप, निरोप, व्यनि., सार्वजनिक भाषा इत्यादीतूनही दिसते.

सर्किट's picture

23 Jul 2008 - 2:08 am | सर्किट (not verified)

लेख विचार करायला लावणारा आहे.

व्यवस्थापकांना दिल्या जाणार्‍या प्रशिक्ष्हणात, अशा मुद्द्यांवर बराच उहापोह होत असतो. कार्यालयात स्त्री कर्मचारी / पुरुष व्यवस्थापक (अथवा उलटे, अथवा कसेही) ह्यांच्यातील व्यवहार कसे असावेत, ह्याबद्दल "रिस्क मॅनेजमेंट" च्या दृष्टिकोनातून बघितले जाते. त्यात दिला जाणारा पहिला सल्ल, म्हणजे कुठल्याही संबंधांच्या लेखी नोंदी ठेवायला हव्यात. समजा, विनयभंगाची तक्रार तुमच्याकडे कुणी केली, तर ती गंभीरपणे घ्यायला हवी. तसेच विनयभंगाची तक्रार तुमच्या विरुद्ध झाली, तर त्या मीटिंगमध्ये काय घडले, ह्याचा लेखी पुरावा तुमच्या कडे हवा. प्रकरण "दाबून टाकणे" हे हमखास तुमच्यावर उलटते, त्यामुळे त्याचा प्रयत्नही करू नये.

पण विनयभंग हा एक "ग्रे एरिया" आहे, हे मान्य व्हावे. अनेक केसेस बघून मगच हा कायदा तयार झाला आहे. कायद्याला मर्यादा असतात, त्यामुळे असे प्रकार घडूच नयेत, ह्याची मुद्दामून काळजी घेणे आवश्यक आहे.

- सर्किट

चतुरंग's picture

23 Jul 2008 - 2:58 am | चतुरंग

पुरुषी अहंकार आणि वर्चस्वाची भावना ह्यातून घडणारा प्रकार म्हणजे विनयभंग.
मुली आणि बायकांना सर्रास ह्या प्रकारांना तोंड द्यावे लागणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. कॉमेंट्स कडे एकवेळ दुर्लक्ष करता येईल पण शारीरिक जबरदस्तीकडे अजिबात नाही.

अतिशय जवळच्या ओळखीत/नात्यात लहान मुली (आणि मुले सुद्धा) ह्यांच्यावर अत्याचार होतात हे कटु सत्य आहे. वडिलांचे मित्र, काका, मामा, चुलत, मावस भाऊ, आजोबा, शेजारपाजार कोणीही संशयाच्या वर्तुळाबाहेर नाही. लग्न समारंभ, कौटुंबिक-संमेलने ह्यात भरपूर लोक जमलेले असताना सहाजिकच मुलांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढते, बर्‍याचवेळेस अशावेळी हे लोक गैरफायदा घेतात. तेव्हा आपली लहान मुले ही आई-वडिलांनीच सांभाळायची असतात. त्यांना नजरेआड होऊ न देणे हेच खरे. कोणते स्पर्श हे आगंतुक हे त्यांना लहानपणीच समजावून सांगितले पाहिजे.
शी शू बद्दल ट्रेनिंग देताना आई, वडील आणि दोघांपैकी कमितमकी एकजण असताना तपासणीसाठी गरज असेल तर डॉक्टर, ह्यांनीच त्यांच्या खाजगी भागांना स्पर्श करावा अन्यथा इतर कोणीही नाही हे त्यांना स्पष्ट शब्दात सांगावे. मुलांना व्यवस्थित कळते. ती लहान असली तरी प्रचंड समजदार असतात. साधा नजरेतला फरक सुद्धा त्यांना चटकन कळतो.
मुलांच्या मनात आपण विश्वास निर्माण करणे गरजेचे असते की जर काही वेगळा प्रकार घडला तर ताबडतोब आपल्याशी ती बोलतील.
त्यांच्या वागण्याचे बारकाईने केलेले निरीक्षण तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकते.
दुर्दैवाने काळजी घेऊनही काही घडले आणि त्यात अत्यंत जवळचे कोणीतरी सामिल आहे ह्याची खात्री झाली तरीही प्रकरण दाबू नये, त्याने त्या व्यक्तीची भीड चेपते. परिस्थितीनुसार दुसर्‍या सुजाण व्यक्तींना विश्वासात घेऊन दोषी व्यक्तीला जरब बसेल असे केलेच पाहिजे अन्यथा पुढच्या वेळी आणखी एक बळी घेण्यास तुम्ही जबाबदार ठरता.

कार्यालयीन कामासंबंधात स्त्री कर्मचार्‍यांबरोबर काम करताना तारेवरची कसरतच असते. तुमची वरिष्ठ स्त्री असली तरी किंवा कनिष्ठ असली तरीही प्रश्न उभे राहू शकतात. लेखी/ई-मेल च्या स्वरुपात सर्व नोंद असणे त्यावर एका वरिष्ठाची सीसी (कार्बन कॉपी) असणे हे सर्व मार्ग प्रश्न कमी करु शकतात. तरिही शेवटी आयत्यावेळी आलेल्या परिस्थितीतून कौशल्याने मार्ग काढण्याचा प्रयत्न करावाच लागतो कारण असल्या गोष्टींचे ट्रेनिंग वगैरे देता येत नाही!

चतुरंग

हा विषय न संपण्यासारखा आहे..........

या बाबतीत मुलीं ना जितका समजवण्याची गरज आहे, त्याहुनही जास्त मुलांना शिक्षित कराव अस मला वाटत.........

राधे,
तु़झे म्हणने बरोबर आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Jul 2008 - 9:39 am | प्रकाश घाटपांडे

चावटपणा हा देखील कायदेशीर व्याख्येनुसार व्यक्तीसापेक्ष विनयभंगच आहे. काव्यशास्त्रविनोदात अशा अनेक विनयभंगांना सामोर जाव लागेल. श्रीकृष्णाने केल्या तर त्या लीला इतरांनी केल्या तर मात्र तो चावटपणा! पौराणीक कथात श्रीकृष्णाला अशा अनेक आरोपांच्या पिंजर्‍यात बसवता येईल. पण श्रीकृष्णाने केलेल्या विनयभंगाची इष्टापत्ती ओढवुन घेण्यासाठी अनेक गोपी उत्सुक होत्या.
दे रे कान्हा चोळी लुगडी ! बाल पणी ची अल्लड नाती , मला कवळिले तु एकांती | अजुन का तुज त्या खेळाच्या छंदाची आवडी| ....
आत्म्याने जणु परमात्म्याला अर्पण केली कुडी| दे रे कान्हा चोळी लुगडी!
आपल्या संस्कृतीने विनयभंगाला पण अध्यात्मात कसं पचवुन टाकलयं बघा! तो मी नव्हेच ! मधला राधेश्याम महाराज आठवा.
"विनय" कुणाचा ? त्याचा भंग कुणी ?कसा? कुठे? कधी? केला आहे यावर देखील त्याची व्याप्ति अवलंबुन आहे. एखाद्याची वेदना हा एखाद्याचा विनोद असु शकतो किवा एखाद्याचा विनोद एखाद्याची वेदना असु शकते.
सविनय कायदे भंगा सारखी बेकायदा विनयभंगाची व्याप्ती भंग तो भंगच म्हणुन घेता येणार नाही.
अवांतर- दिली का काडी लावुन असं कोणीतरी तिकड कुज्बुजतयं!
प्रकाश घाटपांडे

सैरंध्री's picture

23 Jul 2008 - 1:47 pm | सैरंध्री

शितल ताई , चांगला विषय मांडलात.
असे प्रकार सर्रास घडतात आणि न्याय तर दूरच पण त्याला कित्येकदा वाचा ही फुटू शकत नाही हे संतापजनक आहे.
>> या बाबतीत मुलीं ना जितकं समजवण्याची गरज आहे, त्याहुनही जास्त मुलांना शिक्षित कराव अस मला वाटत
राधाशी सहमत.

>>रस्त्यावरून मनमोकळेपणे बिन्धास्त, कुणाचीही फिकीर न करता इथे जसे जाता येते, तसे भारतात का नाही होत? माझं ऑब्झर्वेशन असं आहे की इथे कुणी कुणाकडे बघत देखील नाही.-----इतिभाग्यश्री
बरोबर आहे. मीही काही काळ परदेशी राहिली असल्याने मलाही हा अनुभव आहे . तिथे मुली कितीही तोकड्या कपड्यात असल्या तरी रस्त्यावर, मॉल मध्ये वा इतर सार्वजनिक ठिकाणी त्या सहज फिरू शकतात. शेरेबाजी , वाईट नजरा ह्या तर दूरच्या गोष्टी.
माझ्या घराजवळ्च तिथे एक लेक होते. उन्हाळ्यात अनेक मुली स्विमसुट वर अंगावर अर्धवट असा टॉवेल पांघरून पोहण्यासाठी भर गर्दीच्या रस्त्यावरून बिन्धास्त चालत लेक वर जायच्या. पण कधी कुठला अनुचित प्रकार बघितला किंवा ऐकला नाही.
मग भारतातील मुलींना , स्त्रियांना अशा अनुभवांना का सामोरे जावे लागते? योग्य शिक्षणाचा अभाव व परस्त्री विषयी आदर नसणे ही तर मुख्य कारणे आहेतच.

सैरंध्री

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Jul 2008 - 2:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्याहीपेक्षा आपल्याकडे होणारी कुचंबणा, मोकळेपणाचा अभाव हे जास्त महत्त्वाचे घटक आहेत असं मला वाटतं.
उदा: माझ्या कार्यालयात आम्ही मुलं-मुली बय्राच विषयांवर बोलतो पण त्या मुलांतला कोणी असा असेल असं वाटत नाही. जिथे मोकळीक आणि स्वतंत्र्य मिळतं तिथेच जबाबदारीची जास्त जाणीव दिसते.
स्वतंत्र आणि जबाबदार(?) संहिता

आनंदयात्री's picture

23 Jul 2008 - 3:01 pm | आनंदयात्री

लेख. लेखात दिलेले उदाहरण चीड आणनारे आहे. त्या मुलीला पण नंतर ती केस सतत चालत राहिल्याने त्या गोष्टीचा सल घेउनच मोठे व्हावे लागले असेल, याचा तिच्या मानसिक जडणघडणीवर खोल परिणाम झाला असेल हे निश्चित ! ते मानसिक नुकसान न भरुन येण्याजोगे, त्याची भरपाई कदाचितच जगातला कोणता कायदा करु शकेल.

शितल कायद्यांबद्दल सातत्याने लिहतेय ते स्तुत्य. शुभेच्छा.

मनस्वी's picture

23 Jul 2008 - 3:09 pm | मनस्वी

हो. कायद्यात बदल करणे अतिशय आवश्यक आहे.

का य दा!
शेवटी 'त्या' दुकानदाराला शिक्षा झालीच नाही! झाली ती त्या मुलीला.. तिच्या आई-बाबांना!

अशा वेळी कायदा हातात घ्यावासा वाटतो आणि घ्यावा.

जो कायदा मुलीच्या मनस्थितीचा ७-८ वर्षे विचार करू शकत नाही .. 'पुरावा नाही' या कारणावरकायदा 'कायदा' कसला?

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

आनंदयात्री's picture

23 Jul 2008 - 3:21 pm | आनंदयात्री

अशा वेळी कायदा हातात घ्यावासा वाटतो आणि घ्यावा.

सहमत, अशा वेळेस बदला घेतलाच पाहिजे. अन कायदा तरी काय योग्य मार्गाने (किंवा त्याला पटेल त्या मार्गाने) बदलाच मिळवुन देतो ना ? मग पहिलं दान कायद्याला मागायचे अन दुसरे स्वतःच पाडुन घ्यायचे, आपल्याच मनगटातल्या जोरावर.

मनीषा's picture

23 Jul 2008 - 5:46 pm | मनीषा

स्त्री चा विनयभंग हा अनेक प्रकाराने होत असतो, आणि प्रत्येकवेळी त्याचा प्रतिकार करता येतोच असे नाही. स्त्री कितीही कर्तुत्ववान असली तरी या एका बाबतीत ती पुर्णपणे असहाय असते.
या साठी खरच समाजशिक्षणाची जरुर आहे. आपण आपल्या मुलांना शिकवणे जरुर आहे कि स्त्रियांशी वागताना, बोलताना कुठल्या मर्यादांचे पालन करायला हवे. मोकळेपणाच्याही काही मर्यादा असतात.. हे त्यांना समजाउन सांगायला पाहीजे (मुलांना आणि मुलींना )..
इथे परदेशात वावरताना हा फरक खुप जाणवतो... कुठेही public place मधे वावरताना कुठल्याही "टपोरी" लो़कांशी सामना करावा लागत नाही. आपल्या सामाजात स्त्री ला देवी मानतात... आणि तेथेच स्त्रीयांची अशी अमर्यादा केली जाते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jul 2008 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शितल आपण कायद्याविषयी आणि विकृत गुन्हेगारीबद्दल लिहिता ही चांगलीच गोष्ट आहे.

आपल्या लेखातील उदाहरण चीड आणणारे असेच आहे. असे अनेक प्रसंग त्यापुढेही जातात आणि स्त्री कायमची आयुष्यातून उठते.
पण कायद्यात शिक्षेपेक्षा अधिक पळवाटा असतात त्यामुळे कायदा जरा तोकडा पडतो असे वाटते. आणि पुन्हा कोर्ट-कचे-याच्या चक्रामुळे पिडिताला समाजात वावरतांना अपराध्यासारखे वाटते. त्यामुळे कोर्टाकडे फार कमी लोक धाव घेत असतील. अशा प्रकरणांतील आरोपींना ताबडतोब शिक्षा देणा-या कोर्टासमोर उभे केले पाहिजे आणि संबधिताला शिक्षा मिळाली पाहिजे. पण चोर सुटला तरी चालेल पण निरपराधास शिक्षा होऊ नये हे कोर्टाचे धोरणामुळे अडचणी आहेतच, तरीही पुराव्या अभावी अशा प्रकरणांचे निकाल फार समाधानकारक असतील असे वाटत नाही. हा झाला ज्यांच्यावर खरंच अशा विनयभंगाला सामोरे जावे लागले असेल त्यांच्याबद्दल, पण अजूनही काही स्त्रीया या जाणीवपुर्वक पुरुषांना फसवतात असे प्रकरणही माझ्या पाहण्यात आहे. स्त्रीया / मुली पुरुषांना ब्लॅकमेलही करु शकतात त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी एक आव्हानच आहे असे वाट्ते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

24 Jul 2008 - 1:14 pm | विसोबा खेचर

शितल आपण कायद्याविषयी आणि विकृत गुन्हेगारीबद्दल लिहिता ही चांगलीच गोष्ट आहे.

हेच म्हणतो...

शितल, आपले मनापासून आभार. अजूनही असेच कायदेविषयक लेखन येऊ द्या प्लीज..!

तात्या.

डोमकावळा's picture

24 Jul 2008 - 12:10 pm | डोमकावळा

एक गंभीर विषय आपण येथे मांडला आहे.
या सगळ्या गोष्टींमधे एकच वाटते की स्त्री कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा.
तर या प्रकारच्या विकृत गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल.

अमितकुमार's picture

24 Jul 2008 - 2:49 pm | अमितकुमार

बर्‍याचदा अस्तिवात असलेल्या कायद भा वि द ३५४ (विनयभंगा बाबत) चा गैरवापर झालेल्याचे अनेक उदाहरने आहेत.

अमितकुमार's picture

24 Jul 2008 - 3:40 pm | अमितकुमार

आमच्या बॅंकेतले आधिकारी ऐकदा वसूलि साठी एका ५५ वर्षाच्या स्त्रिकडे गेले. हि स्त्री जवळ जवळ सर्व बँकेचे कर्ज बूडवून बसलेली. अधिकारि घरी गेले असतंना त्यानां आत घेउन स्वःता ती बाइ बाहेर आलि व बाहेरून कडि लावून सरळ पोलिस स्टेशन मध्ये स्व:ताच कपडे फाडून गेलि व विनयभंगाचि तक्रार केलि.

१.५ शहाणा's picture

27 Jul 2008 - 7:19 pm | १.५ शहाणा

मुली सुद्धा मुलांसमोर काही चाळे करुन भावना चेतवतात कमी कपडे वापरणे ,आपल्या शरीराचे अनाव्शक प्रद्रशन करणे त्यांची कृती ही कायद्याच्या जाल्यात येत नाही कारण विनयभंग हा केवळ स्त्री चाच होतो?