भूजलपातळी आणि त्याचे परिणाम

वेदश्री's picture
वेदश्री in काथ्याकूट
22 Jul 2008 - 4:12 pm
गाभा: 

भूजलपातळीवर आज लोकसत्तामध्ये आलेला लेख वाचून मला पडलेले प्रश्न परत डोके वर काढू लागले. त्यात लिहिलेल्या काही मुद्द्यांवर मला जास्त माहिती नसल्याने मला तो पूर्णपणे समजून घेता आला नाही. तसा तो समजून घेता यावा आणि त्यावर साधकबाधक चर्चा व्हावी यासाठी हा चर्चाप्रस्ताव.

१. शिवकालीन पाणी योजना म्हणजे नक्की काय? आणि ती कशी अंमलात आणतात?
२. 'भूजल पातळी खालावलेल्या गावांमध्ये बोअरवेल, विहिरी खोल करणे, हातपंपांची दुरूस्ती अशी ही कामे करण्यात येणार आहेत. ' हे हास्यास्पदपणे गंभीर वाटत नाही का? अगोदरच जिथे भूजलपातळी खालावलेली आहे तिथे आणिक उपसा झाला तर परिणाम महाभयंकर नाही का व्हायचे?
३. दुष्काळी परिस्थिती कधी जाहिर केली जाते? आणि तशी ती जाहिर झाल्यास पीडीतांना काय 'राहत' देण्याचे प्रयत्न होतात? दुबार पेरणी करणे हे हात झटकावे तितके सोपे काम नाही.. शेतकरी आता यामुळे आत्महत्या करताहेत. माझ्या ओळखीच्यात तसे झाल्याने मला प्रचंड धक्का बसला आहे.
४. नद्या जोडण्याच्या कामाचा मुद्दा मागे पडण्याचे कारण काय?
५. रोगट वातावरण येऊ घातलेय/आलेय असे म्हटले तर अतिशयोक्ती होईल का?
६. आता उभ्या ठाकत असलेल्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल उपायात्मक दृष्टीने आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो?

कौटुंबिक पातळीवर पाण्याचा प्रश्न अत्यंत दारूण झालेला मी स्वतः अनुभवते आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरात असल्याने अजून तितकीशी झळ प्रत्यक्ष मला सोसावी लागत नसल्याचे पाहून मला आणखीनच वाईट वाटते आहे. खेडोपाडी राहणारे माझे नातलग/जीवलग ही काय माणसं नाहीत का की त्यांच्या मूलभूत गरजांना शहरी माणसांच्या गरजांपेक्षा दुय्यम स्थान दिले जावे? अर्थात.. हा मुद्दा नंतर पण आधी जर मूळ प्रश्नाला काही पर्याय निघाले तर बरे असे वाटते.

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

22 Jul 2008 - 5:11 pm | विजुभाऊ

उत्तम विषयाला सुरवात केली आहे.
तज्ञ या बाबत माहिती देतिलच
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

धोंडोपंत's picture

22 Jul 2008 - 6:57 pm | धोंडोपंत

वेदूबाळ,

अनेक वेधशाळांनी या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस वर्तवला होता.

पण शनी मंगळ युती होत्याचं नव्हतं करते हे त्यांना कुठे ठाऊक?

ऑगस्टपासून पाऊस पडेल हो !!! काळजी नको.

मंगळ शनीच्या ८ अंश पुढे गेला की,

नभ उतरू आलं
चिंब थरथरं वलं......
अंग झिम्माड झालं
हिरव्या बहरा......

अशी अवस्था होईल.

आपला,
(कोरडवाहू) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jul 2008 - 7:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"भूजलपातळी आणि त्याचे परिणाम" आणि (अ)शनी-मंगळ इत्यादी ग्रहांचा काय संबंध? माझ्या सामान्य ज्ञानाप्रमाणे भूजलपातळी जमिनीतून खूप काळ पाणी उपसत राहिलं आणि ते पुन्हा भरलं नाही तर होते. या वर्षीच्या कमी पावसाचाही संदर्भ लावणं थोडं जास्तच वाटतं. परिस्थिती थोडी गंभीर झाली एवढंच!

हरवलेली संहिता

वेदश्री's picture

23 Jul 2008 - 11:16 am | वेदश्री

>परिस्थिती थोडी गंभीर झाली एवढंच!
थोडी????!!!! पाण्याच्या टँकरमध्येही जिथे शुद्ध पाणी मिळत नाहीये आणि त्यासाठी तरीही लोकांची झुंबड उडते आहे. पाण्यासाठी बायकांना फिरणे तर शक्यच नाही इतक्या दूरवर जावे लागतेय.. बाप्ये लोक दिवसदिवस त्याच्याच मागे असल्यासारखे फिरत असतात ! थोडेसे पाणी मिळावे म्हणून ५०० रुपये द्यावे लागतात. ही गत जर पिण्याच्या पाण्याची तर वापरायच्या पाण्याची तर बातच सोडा... आणि तरीही अजून परिस्थिती 'थोडी'च गंभीर झालेली आहे.. ! खरेय...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Jul 2008 - 12:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या माहितीप्रमाणे भूजलपातळी ही खोल जमिनीतील पाण्याची पातळी असते. मी (फक्त) या वर्षीच्या पाणी-संकटाबद्दल बोलत नव्हते. मी "थोडं" म्हटलं ते उपहासानी! (माझ्या मांडणीतली चूक मान्य!) जमिनीच्या भेगा हे वरवरचं लक्षण असतं आणि ते तत्कालिक असतं. उदा. जिथे ऊस पिकवतात तिथली भूजलपातळी दरवर्षी कमी होत असल्याची ओरड गेली अनेक वर्षं आहे आणि तेवढीच दुर्लक्षितही आहे. ही सगळी जमीन दरवर्षी दुबार पिकासाठी ओली होते; (या वर्षाचा अपवाद सोडा) पण जमिनीला भेगा नसतात. पाऊस पडल्यावर या भेगा बुजतील. (आणि लोकं पुन्हा ऊसाला जमिनीतून उपसून वारेमाप पाणी देतील.) असं मानू या की शास्त्रज्ञ म्हणतात त्याप्रमाणे या महिनाअखेरीस पाऊस येईल, आणि आशावाद ठेवूया पावसाळा थोडातरी लांबेल त्यामुळे या भेगा बुजतील. लोकांना पिण्यासाठी, वापरासाठी आणि रब्बी पिकांसाठीपण पाणी उपलब्ध होईल. पण म्हणून भूजलपातळी वाढेल असं काही नाही. आपण ज्या प्रमाणात जमिनीतून पाण्याचा उपसा करतो त्याप्रमात ते पाणी "रिफील" नाही केलं तर पाऊस उत्तम होऊनही भूजल वाढवण्यासाठी काही फायदा होणार नाही किंवा अत्यल्प उपयोग होईल. या वर्षी पाऊस नाही आहे आणि म्हणून आपल्याला आज तहान लागल्यावर विहीरींची आठवण होत आहे.

भूजलाची पातळी वाढवणे हे पर्यावरणाच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचे आहे. पण हे काम एका दिवसात, महिन्यात, हंगामात किंवा वर्षात होणार नाही. ही वेळखाऊ (पण अत्यावश्यक) प्रक्रिया आहे. त्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात पाणी जमिनीत मुरलं पाहिजे. जंगलं वाढवणं, पावसाचं वाहून जाणारं, वापरलेलं आणि कमी दूषित पाणी, उदा. आंघोळीचं, भांडी घासलेलं वापरलेलं पाणी, हेही जमिनीत मुरवणं असे उपाय त्यासाठी करता येतील. आणि हे शहरांतही करता येईल. जमीन हा एक उत्तम फिल्टर आहे त्यामुळे घरगुती वापराचं पाणी फार प्रक्रिया न करताच मुरवता येईल.

आपण लेखात आणि प्रतिसादात मांडलेल्या मुद्द्यांशी मी संपूर्णपणे सहमत आहे. लोकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नाही आणि आमच्या ऑफिसात गवतावर पाणी मारतात, म्हणून आम्ही आमच्या परीने आम्ही लोकांशी बोलून टाळण्याचा प्रयत्न करतो. नाहक वीज आणि पाणी फुकट जाणं टाळतो. पण तरीही या गोष्टींमुळे भूजल पातळी वर येणार नाही. पाणी जिरवलंच नाही तर ते वाहून फुकटच जाणार.

पेपरमधल्या इतर अनेक बातम्यांप्रमाणे ही पण बहुतांशी पोरकी बातमी आहे. पोरकी अशासाठी मी म्हटलं की बातमी योग्य आहे, पण आपल्यासारख्या सामान्य माणसांना शिवकालीन योजना वगैरे गोष्टी माहीतच नसतात. मग या बातमीमधून माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना काय बोध होणार? त्यामुळे चर्चा सुरू केलीत माझ्याही माहितीत भर पडली.

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Jul 2008 - 12:40 am | llपुण्याचे पेशवेll

आपण सांगितलेल्या भाकितामुळे माझ्या आशा उंचावल्या आहेत. लवकर पाऊस पडो अशी इश्वरचरणी प्रार्थना.
(आशेचा किरण दिसलेला)
पुण्याचे पेशवे

वेदश्री's picture

23 Jul 2008 - 11:08 am | वेदश्री

>ऑगस्टपासून पाऊस पडेल हो !!! काळजी नको.
मी लहान होते तेव्हा गार्‍यातून पाय उचलत चालायचे म्हणजे एक जबरी व्यायाम ठरायचा गावी.. आता मात्र त्याच जमिनीला भेगा पडलेल्या पाहून जीव कालवतो माझा. परवा गवळ्यांच्या घरी व्यायलेल्या गायीसाठी गावभर फिरूनही एक पेंडी हिरवा चारा मिळाला नाही तेव्हा त्या गवळ्याने स्वतःच अन्नपाणी सोडून दिल्याचे ऐकले आणि हृदयाचे पाणी झाले. माझ्या वाचनात आलेली एक कविता -

कुडाला टांगलेला घागरमाळा
खळकण वाजला
अन् 'बा' चा डोळा
टचकन् भिजला
आमच्यापेक्षा भी ज्यादा
त्याला त्याचीच लय गोडी
सर्जा राजाच्या गळ्यात
असायची ही घागरमाळेची जोडी
पण औंदाच्या काळानं
कहरच केला
अन् आमच्या नशिबी
दुष्काळ आला
पोटाला नव्हतं कुठं
तुकडाभर काही
तरीबी 'बा'नं
बैलजोडी इकली न्हाई
म्हणायचा त्यो इकून त्यास्नी
तेह्याचं रचणार नाही सरण
आपल्यासारखेच त्येबी
त्यायले दावणीलाच मरण
अन् झालंबी तसंच
दोघं बी एक साथ मेले
अन् बापाच्या काळजाचे
तुकडे तुकडे झाले
उभ्या उभ्याच बा पिसा झाला
निस्ता पहात होता उभा राहून
अन् आता बी पाणी येतं डोळ्यातच
त्याच्या फक्त घागरमाळा पाहून
आता बा पार कामातून गेला
घागरमाळा पायतो कोपर्‍यात बसून
बैलासाठी येडा झाला
असे दुनिया म्हणते हासून
दुष्काळात मह्या घरावर
आसूडच ओल्डा
मह्या 'बा'ला साल्यानं
उभ्या उभ्याच पाल्डा.

- किशोर प्रल्हाद माने

या कवितेच्या पार्श्वभूमीवर जर

नभ उतरू आलं
चिंब थरथरं वलं......
अंग झिम्माड झालं
हिरव्या बहरा......

अशी अवस्था होणार असेल तर कोणाला नको आहे? मलातरी हवीच हवी आहे.

मंगळा शनी वगैरे जे काही बोललास ते काय प्रत्येक खेडे,गाव, शहर यांच्यासाठी वायलेवायले असते का? मग आसूड फक्त काही ठराविक ठिकाणीच जास्त जोराने ओढल्यासारखा जाणवतो तो का?

प्रकाश घाटपांडे's picture

25 Jul 2008 - 3:15 pm | प्रकाश घाटपांडे


मंगळा शनी वगैरे जे काही बोललास ते काय प्रत्येक खेडे,गाव, शहर यांच्यासाठी वायलेवायले असते का? मग आसूड फक्त काही ठराविक ठिकाणीच जास्त जोराने ओढल्यासारखा जाणवतो तो का?


पघा ह्य तर विशनुशास्त्री चिपळनुकरांनी निबंधमालेत १८७५ मदीच जरा वायल्या शब्दात लिवलयं!
प्रकाश घाटपांडे

मनस्वी's picture

23 Jul 2008 - 11:11 am | मनस्वी

>ऑगस्टपासून पाऊस पडेल हो !!! काळजी नको.

ए ढाक्कीचिकी ढाक्कीचिकी ढाक्कीचिकी ढा!
:)

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

आनंदयात्री's picture

23 Jul 2008 - 11:30 am | आनंदयात्री

>ऑगस्टपासून पाऊस पडेल हो !!! काळजी नको.

ढिंगच्याक ढिचाक .. ढिंगच्याक ढिचाक .. ढिंग !!!!!!

विजुभाऊ's picture

22 Jul 2008 - 7:26 pm | विजुभाऊ

कदाचित शनी आणि मंगळ यांच्या गुरुत्वाकर्षनामुळे भूगर्भातली पाण्याची पातळी खाली जात असेल. =))
शंका: मग ती तशी वरतीही यायला हवी ना?
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

इनोबा म्हणे's picture

22 Jul 2008 - 7:46 pm | इनोबा म्हणे

कदाचित शनी आणि मंगळ यांच्या गुरुत्वाकर्षनामुळे भूगर्भातली पाण्याची पातळी खाली जात असेल.
:)) ह. हा. पु. वा.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Jul 2008 - 12:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विजुभाऊ,

इथे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे फक्त भरती ओहोटी येतात. आणि त्यांतपण चंद्र भारी आहे सगळ्यात! तर अंतर आणि वस्तूमानाचा विचार केला तर हे सगळे कोण ते शनी-फनी, मंगळ-चंगळ तर लिंबूटिंबूपण नाही भरणार हो! (हवं असेल तर गणित मांडून दाखवेन मी). तुमचं हसणं एकदम मान्य! आणि तुमची शंकापण रास्त आहे. जर एका बाजूने पातळी वर येते तर दुसय्रा बाजूने वर पण येईल.
आता या शनी-फनी, मंगळ-चंगळ यांच्यामुळे पाऊस कसा पडतो हा प्रश्न अजूनही मला सुटला नाही आहे. मला थोडंफार समजतं साधारण याच विषयातलं; पण मी या असल्या चिल्लर वस्तूंकडे नाही पहात; लिंबूटिंबूपण नाही हो हे ग्रह! मी अजून लांबच्या वस्तूंकडे पहाते ... जरा जास्त भारी असतात त्या! पण पुन्हा अंतर आडवं येतं. म्हणून आपला, पृथ्वीचा विचार कराल तर चंद्रच भारी आहे सगळ्यात!

>> पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे >> क्षण आलेच नाहीत
वाट पहात आहे मी, की जर वाईट परिस्थितीमधे पाऊस नाहीच आला तर कृत्रिम पावसाची तयारी सुरु झाली आहे. आणि मग मला तुमच्या वाक्याची सत्यासत्यता पडताळता येईल.

(कोरडी) संहिता

शनि-मंगळ युती ही साधारणपणे दर दोन वर्षांनी होते (दोन वर्षे आणि ~१५ दिवस). मागच्या वेळी युती जून १६-१७, २००६ तारखेला झाली. २०१०, २०१२, २०१४ मध्ये ही युती पावसाळ्यात होणार आहे. (दर द्विवर्षीय युतीत ~१५ दिवसांच्या व्याजामुळे त्यानंतर हळूहळू युती हिवाळ्यात होऊ लागेल.)

या वर्षीचे तर तोंडचे पाणीच पळाले आहे. जून १७, २००६च्या आसपास बहुधा पाऊस पडला नाही, किंवा उशीरा पडला असावा (भारतीय हवामानशास्त्रखात्याने पावसाळ्यानंतर केलेली नोंदणी; Monsoon rains pounded India starting in late May 2006, earlier than the normal June start date. - NASA दुवा; Strong Indian monsoon brings misery but hopes of rich crops USAToday जुलै २००७, दुवा).

हा पॅटर्न लक्षात घेता याच प्रकारे पुढेही जुलै-अंत-२०१०, ऑगस्ट-मध्य-२०१२, ऑगस्ट-अंत२०१४ मध्ये कोरडा दुष्काळ पडू शकेल. हे ध्यानात ठेवून शेतकर्‍यांनी तयार असावे. शेअरबाजारात पैसे गुंतवणार्‍या व्यापार्‍यांनी सारासार विचार करून त्या वर्षांत पैसे अन्यत्र हलवावे.

वेदश्री's picture

23 Jul 2008 - 11:23 am | वेदश्री

>हा पॅटर्न लक्षात घेता याच प्रकारे पुढेही जुलै-अंत-२०१०, ऑगस्ट-मध्य-२०१२, ऑगस्ट-अंत२०१४ मध्ये कोरडा दुष्काळ पडू
> शकेल.

कुठे? आत्ता जिथे आहे तिथेच का? की महानगरींमध्ये?

> हे ध्यानात ठेवून शेतकर्‍यांनी तयार असावे.

तयार असावे? कशासाठी? मरायला? की मारायला?

> शेअरबाजारात पैसे गुंतवणार्‍या व्यापार्‍यांनी सारासार विचार करून त्या वर्षांत पैसे अन्यत्र हलवावे.

नो कॉमेंट्स..

पडताळता बहुधा तोच प्रतिसाद आणखी एक अर्थ दाखवू शकेल.

तुमच्या मूळ लेखाला गंभीर प्रतिसाद मी खाली दिलेला आहे.

तुमचे प्रश्न वाचून मीसुद्धा प्रश्नांकित झालो आहे.

> १. शिवकालीन पाणी योजना म्हणजे नक्की काय? आणि ती कशी अंमलात आणतात?
मला वाटते, त्या काळात लोकसंख्या कमी होती, जंगले अधिक होती, आणि शेती राबवणारे क्षेत्र कमी होते. तरीही हा प्रश्न ऐतिहासिक धडे घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. मलाही कुतूहल वाटते.

> २. 'भूजल पातळी खालावलेल्या गावांमध्ये बोअरवेल, विहिरी खोल करणे, हातपंपांची दुरूस्ती
> अशी ही कामे करण्यात येणार आहेत. ' हे हास्यास्पदपणे गंभीर वाटत नाही का? अगोदरच जिथे
> भूजलपातळी खालावलेली आहे तिथे आणिक उपसा झाला तर परिणाम महाभयंकर नाही का व्हायचे?
मला वाटते की दुरुस्ती तर करावीच. पाणी हे जीवनावश्यक आहे. परंतु पाण्याच्या अनावश्यक वापरावर बंदी आणावी. मी पुणे जिल्ह्यात सरकारी नोकर होतो (१२-१५ वर्षांपूर्वी), तेव्हा आठवते की विहिरीवर गुरे धुण्यावर बंदी होती, वगैरे. जीवनावश्यकही पाणी मिळाले नाही, तर खेड्यातले लोक शहरात येतील, आणि तिथेही त्यांची फरपट होईल.

> ३. दुष्काळी परिस्थिती कधी जाहिर केली जाते? आणि तशी ती जाहिर झाल्यास पीडीतांना काय 'राहत'
> देण्याचे प्रयत्न होतात? दुबार पेरणी करणे हे हात झटकावे तितके सोपे काम नाही.. शेतकरी आता यामुळे
> आत्महत्या करताहेत. माझ्या ओळखीच्यात तसे झाल्याने मला प्रचंड धक्का बसला आहे.
हं... कळायला आवडेल. कोणी जिवातून उठणे म्हणजे कसेसेच वाटते.

> ४. नद्या जोडण्याच्या कामाचा मुद्दा मागे पडण्याचे कारण काय?
याविषयी श्री. विकास यांचा अभ्यास आहे - त्यांनी याबाबतीत काही लिहावे.

> ५. रोगट वातावरण येऊ घातलेय/आलेय असे म्हटले तर अतिशयोक्ती होईल का?
रोगट म्हणजे रोगराई वाढणार, असे म्हणायचे आहे का?

> ६. आता उभ्या ठाकत असलेल्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल उपायात्मक दृष्टीने आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो?
आपण पाण्याची बचत करू शकतो, ती वैयक्तिक. पण भारतातल्या बहुतेक शहरांत पाणी पुवणारे नळ/पाईप व त्यांचे सांधे गळके आहेत. प्रचंड प्रमाणात पाणी उपसले जाते, शुद्ध केले जाते, पण वापर न होता वाया जाते. शहराचे नागरिक म्हणून आपण याविषयी काही कारवाई करू शकतो का?

सर्किट's picture

22 Jul 2008 - 11:04 pm | सर्किट (not verified)

शिवकालीन पाणी योजना, म्हणजे छत्रपतींच्या काळात कात्रजच्या टेकड्यांवर पडलेले पाणी कसब्यापर्यंत कालव्यांतून आणण्यासाठी दादोजी कोंडदेवांनी केलेली सोय. जमिनीतले जल उपसण्यापेक्षा हे असे आकाशातून पडलेले डायरेक्टच मिळावे, हा कसबा पुणे येथील पाणी टंचाईवर दादोजींनी शोधलेला उपाय होता. अजूनही स्वारगेटच्या आसपास ह्या पुरातन कालव्यांचे अवशेष सापडतात. हा कालवा लाल महालाजवळून पुढे मुठा नदीला मिळायचा. शाहिस्तेखान पुण्यात तळ ठोकून होता, तेव्हा महाराजांनी हा कालव्यात धोंडे टाकून पुण्याचे पाणी तोडल्याची इतिहासात नोंद आहे. परंतु, त्यामुळे हाल झाले ते पुण्याच्या जनतेचे. म्हणून महाराजांनी कालवा पूर्ववत केला.

- (ऐतिहासिक) सर्किट

सर्किट, माझ्या पहिल्या प्रश्नाच्या एका भागाचे उत्तर दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्याच प्रश्नाच्या दुसर्‍या भागाचेही उत्तर देऊ शकाल का?

सर्किट's picture

23 Jul 2008 - 11:32 am | सर्किट (not verified)

इतिहासाविषयी विचारा, सांगू शकेन. पण इतिहासातील कुठल्याही योजनेची वर्तमानकाळात अंमलबजावणी करणे हा आमचा एक्स्पर्टीज नाही. पाणि उताराकडे वाहते. त्यामुळे वर कुठे तरी पाणी पडले, की ते खाली पाठवणाची सोय करणे म्हणजे, ह्य योजनेची अंमलबजावणी होऊ शकेल असा अंदाज आहे. अर्थात हे होण्यासाठी सध्यातरी ग्रह अनुकूल नाहीत. दादोजी कोंडदेवांसारख कुशल व्यवस्थापक मिळण्यासाठी राज्याची कुंडली नीट असावी लागते. ती तशी नाही, हे स्पष्ट आहे.

- सर्किट

वेदश्री's picture

23 Jul 2008 - 12:19 pm | वेदश्री

>पाणि उताराकडे वाहते. त्यामुळे वर कुठे तरी पाणी पडले, की ते खाली पाठवणाची सोय करणे म्हणजे, ह्य योजनेची
> अंमलबजावणी होऊ शकेल असा अंदाज आहे.
पाणीच पडत नाही तर मग या प्रकल्पाची अंमलबजावणी कशी करणार? पाणी टंचाई प्रतिबंधक आराखड्यात शिवकालीन पाणी योजनेची योजना करणे जेव्हा की पावसाचाच पत्ता नाहीये, हा काय प्रकार असावा?

सर्किट, आपण शिवकालीन पाणी योजनेच्या वर्तमानकाळातील अंमलबजावणीबद्दल आपला अंदाज सांगण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद.

सर्किट's picture

23 Jul 2008 - 11:48 am | सर्किट (not verified)

पाणी टंचाई प्रतिबंधक आराखड्यात शिवकालीन पाणी योजनेची योजना करणे जेव्हा की पावसाचाच पत्ता नाहीये, हा काय प्रकार असावा?

त्याचं काय आहे, इतिहासकालीन गोष्टी कशा थोर होत्या, आणि आपला हा ऐतिहासिक वारसा आपण कसा सांभाळतो आहे, हे दाखवून देण्याचे वर्तमानात बरेच प्रयत्न घडत असतात. कुठल्या तरी कालवे खोदणार्‍या कॉण्ट्रॅक्टर ने कुणाचे तरी खिसे गरम करून पाणी आराखड्यात ह्या योजनेचा समावेश करून घेतला असेल. कारण पाऊस पडत नसताना कालव्यांचा, आणि शिवकालीन पाणी योजनेची काय गरज, असा आपल्याला पडलेला प्रश्न, आराखडा तयार करणार्‍यांना पडलेला नाही, हे स्पष्ट आहे.

- सर्किट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2008 - 11:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

२. 'भूजल पातळी खालावलेल्या गावांमध्ये बोअरवेल, विहिरी खोल करणे, हातपंपांची दुरूस्ती अशी ही कामे करण्यात येणार आहेत. ' हे हास्यास्पदपणे गंभीर वाटत नाही का? अगोदरच जिथे भूजलपातळी खालावलेली आहे तिथे आणिक उपसा झाला तर परिणाम महाभयंकर नाही का व्हायचे?

अधिक उपसा झाला तर भूजलपातळी खाली जाईल यात शंका नाही, पण पावसळ्यात जर विहीर,हातपंप,जर पुनर्भरण केले तर यातून मार्ग निघू शकतो.

३. दुष्काळी परिस्थिती कधी जाहिर केली जाते? आणि तशी ती जाहिर झाल्यास पीडीतांना काय 'राहत' देण्याचे प्रयत्न होतात? दुबार पेरणी करणे हे हात झटकावे तितके सोपे काम नाही.. शेतकरी आता यामुळे आत्महत्या करताहेत. माझ्या ओळखीच्यात तसे झाल्याने मला प्रचंड धक्का बसला आहे.

दुबार पेरणी हे सोपे काम नक्कीच नाही, पण ज्यांनी पेरण्या केल्याच नाहीत ते शेतकरी हुशार म्हणन्याची वेळ आली आहे. पाऊस येणारच नाही असे नाही. काल सकाळच्या दैनिकात एक शास्त्रीय विश्लेषन आले होते की पाऊस का आला नाही आणि तो कधी येईल. अठ्ठावीस तारखेनंतर जर पाऊस येत असेल तर शेतकरी अजूनही पीक घेऊ शकतो असे वाटते, नियोजनाच्या अभावी शेतक-याची तारांबळ उडते.

६. आता उभ्या ठाकत असलेल्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल उपायात्मक दृष्टीने आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो?

वाया जाणारे आणि अशुद्ध पाणी जमिनीत शास्त्रीय पद्धतीने सोडणे हाच एकमेव उपाय आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

23 Jul 2008 - 12:44 am | चतुरंग

ही अत्यंत गंभीर समस्या आहे, दुर्दैवाने शहरातल्या बहुसंख्य जनतेला अजूनही त्याचे महत्त्व तितकेसे उमगलेले नाही.

हातपंपांची दुरुस्ती ही व्हायलाच हवी कारण त्याशिवाय खेड्यात बायकांच्या नशिबी मैलोनमैल पायपीट येते. त्याखेरीज पुनर्भरण हे ही अत्यावश्यक आहे त्याशिवाय पाणी येणार कुठून.

शहरात राहणारे लोक काय करु शकतात?
१ - गळणारे नळ, तोट्या, पाईप दुरुस्त करावे
२ - भाज्या धुतलेले पाणी झाडांना घालावे
३ - रोजच्या वापरात वॉशबेसीनचा नळ सोडून थेट पाणी वापरण्याऐवजी एक भांडे घेऊन त्यात पाणी घेऊन वापरले तर खूप पाणी वाचते (उदा. तोंड धुताना सलग १ मिनिट नळ चालू राहिला तर सर्वसाधारणपणे ५-६ लिटर पाणी वाहून जाते. तेच तुम्ही भांडे घेऊन तोंड धुतलेत तर केवळ एखाद्या लीटर पाण्यात व्यवस्थित काम होते. एका कुटुंबात सरासरी ४ माणसे * २ वेळा * ३ लि. पाणी बचत * ३० दिवस महिन्याचे = ७२० लि. पाणी वाचते. अगदी ५०% वेळाच हे शक्य झाले तरीही साधारणपणे ३५० लि. पाणी वाचते!) मी स्वतः रोज घरी ह्याच पद्धतीने पाणी वापरतो.
४ - शॉवर घेण्याऐवजी बादलीतून घेतलेले पाणी बरेच कमी पुरते.
५ - स्वैंपाकाचे पाणी रोजचे हंडे, बादल्या रोज ताजेच लागते असे नाही ते ओतून देऊ नये संपेपर्यंत वापरावे.
६ - हाउसिंग सोसायट्यांच्या, बंगल्यांच्या, गच्च्यांवरुन पाणी साठवून जमिनीत पुनर्भरण करुन देण्याचे काम काही लोक करतात.
७ - जमिनीखाली मोठा ५०००-१०००० लि. चा हौद बांधून गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी त्यात साठवून पावसाळा संपल्यावर वापरता येते.

चतुरंग

धोंडोपंत's picture

24 Jul 2008 - 6:57 am | धोंडोपंत

आम्ही वरच्या अभिप्रायात सांगितले की मंगळ शनीच्या ८ अंश पुढे गेला की पाऊस पडेल. काही जणांनी त्यावर अकलेचे तारे तोडून त्याची खिल्ली उडवली. ते असो.

सांगायची गोष्ट ही की , काल मंगळ शनीपासून ६ अंश पार करून पुढे गेल्यावर वातावरण बदलायला लागले आहे. काल रात्रीपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असून थोडासा शिडकावा झालेला आहे. अनेक दिवसात रस्ते ओले झालेले दिसत नव्हते ते आज दिसत आहेत.

मंगळ ८ अंश पुढे गेल्यावर शनी मंगळ युती तुटेल आणि पावसाच्या धारा बरसतील. तीन चार दिवसाचा प्रश्न आहे. प्रचिती देणारे बदल वातावरणात झालेले दिसत आहेत. हळूहळू पावसाचे आगमन होत आहे. चिंता करू नये.

ज्योतिष हे दैवी मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे. गुरूवर्य॑ कृष्णमूर्ती त्याला "डिव्हाइन गाईडन्स " असे म्हणत असतं.

त्याचा अभ्यास न करता त्यावर पिंका टाकण्यापेक्षा त्यात खरोखर काय दडले आहे याचा शोध घेतला तर त्याचा खूप फायदा आहे.

आपला,
(ग्रहांकित) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धमाल नावाचा बैल's picture

24 Jul 2008 - 7:35 am | धमाल नावाचा बैल

धोंडोपंत,

वरती धनंजयने दिलेल्या दुव्यांविशयी आपले काय म्हनणे? मागच्या दोन टायमला शनी मंगळाने धो धो पाऊस पाडला मग आत्ता त्या युतीचा आणि पावसाचा काय संबध? त्याला द्याकी सडेतोड उत्तर!

लोक खिल्ली उडवतात ते तुमी अश्या प्रश्नांना उत्तर देत नाही म्हणुन!

बैलोबा

आयला! नेहमी प्रमाणे धोंडोपंतांचे पुन्हा उत्तर न देता पलायन!!!

धोंडोपंत's picture

24 Jul 2008 - 8:01 am | धोंडोपंत

बैलोबा,

पलायन वगैरे करण्याची आम्हाला आवश्यकता नाही. तो आमचा पिंड नाही. पलायन करण्यासारखे आम्ही काही केलेले नाही.

शनि मंगळ युती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक दाखवते हे तुम्हाला माहित नसेल. तसेच अतर्क्य अद्भुत फलादेश, अपघातप्रवणता, नैसर्गिक उत्पात, कल्पनातीत टोकाच्या गोष्टी ज्यात आत्यंतिक तीव्रता आहे असे या युतीचे फलादेश आहेत. धो धो पाऊस नाहीतर कोरडा दुष्काळ या दोन परस्परविरोधी आत्यंतिक टोकाच्या अतिरेकी गोष्टी आहेत.

हे समजून घ्यायचे असेल तर तो विषय शिका. ते शेवटचे वाक्य खटकले .

धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चित्रा's picture

25 Jul 2008 - 3:03 am | चित्रा

तुमची याविषयी तळमळ जाणवते आणि वाईट वाटते. आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत दु;ख येत नाही तोवर फरक पडत नाही, ही लोकांची सामान्य प्रतिक्रिया असते. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत, पण जे वाटते ते सांगते.

२. 'भूजल पातळी खालावलेल्या गावांमध्ये बोअरवेल, विहिरी खोल करणे, हातपंपांची दुरूस्ती अशी ही कामे करण्यात येणार आहेत. ' हे हास्यास्पदपणे गंभीर वाटत नाही का? अगोदरच जिथे भूजलपातळी खालावलेली आहे तिथे आणिक उपसा झाला तर परिणाम महाभयंकर नाही का व्हायचे?

तहान लागली की विहीर खणणे यालाच म्हणत असावेत. कदाचित माहिती असेल/नसेल, बांगलादेशमध्ये पिण्याच्या पाण्यातील आर्सेनिकचा प्रश्न मोठा आहे - तो बोअरवेलच्या पाण्याचा अधिक उपसा झाल्याने, खोल-खोल नेत गेल्याने झाला आहे.
बांगलादेश आर्सेनिक
महाराष्ट्रात असा आर्सेनिकचा प्रश्न तयार होण्याची शक्यता नसली तरी इतर वाईट परिणाम निश्चित होत आहेत आणि होणारही आहेतच.

हा एक भाग जरी सोडला तरी जर मला पाणी मिळत नसले तर ते कसेही करून (उपसा करून किंवा इतर बर्‍या वाईट मार्गांनी ) मी पाणी मिळवणार हे नक्कीच आहे. पुणे शहरात मध्यमवर्गीय भरवस्तीत सहा मजली इमारतीत जिथे ३० हून अधिक सदनिका (अपार्टमेंट) आहेत तिथेही बोअरवेलने पाणी देण्याची योजना मी पाहिलेली आहे. हे कसे आणि का मान्य केले जाते हे मी सांगू शकत नाही. दुसरीकडे याच ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या बोअरवेलमधून मिळालेल्या पोटाचे रोग तयार करणारे जीवजंतू असलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करणारे गरीब मुसलमान कुटुंब पाहिले आहे. रोगराई वाढणार हे निश्चित.

४. नद्या जोडण्याच्या कामाचा मुद्दा मागे पडण्याचे कारण काय?

मुद्दा काय - कदाचित राजकारण असेल - मला माहिती नाही. पण एक सांगावेसे वाटते, की ह्या प्रकल्पांनी प्रश्न संपतील असे नाही, उलट दुसरे कधीही न पाहिलेले प्रश्न समोर उभे राहतील. जसे - नद्यांच्या जोडणीमुळे जीवसृष्टीवर किंवा त्यालगतच्या शेतीवर होणारे परिणाम. त्यामुळे स्थानिक पाणी नीट मुरवून वापरणे हा अधिक योग्य पर्याय ठरावा.