.
'गाय' चं एक चित्र मुंबईतल्या एका लिलावात सुमारे चोवीस कोटी रुपयात विकलं गेलंय म्हणे.
'गाय' हा थोर आधुनिक भारतीय चित्रकार.
त्यामुळे समस्त थोर्थोर आधुनिक भारतीय चित्रकारांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.
त्यातून 'गाय' हा मराठी माणूस. मुंबईकर.
त्यामुळे तमाम मराठी मुंबईकरांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.
'गाय' थंडीत मफलर गुंडाळून हिंडायचा.
त्यामुळे समस्त थंडीत मफलर गुंडाळून हिंडणार्यांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.
'गाय' बूट घालत नसे, सँडिलं वापरायचा. त्यामुळे तमाम बूट न घालता सँडिलं वापरणारांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे....
***
'गाय'चं एक चित्र चोवीस कोटींना विकत घेणार्या नरपुंगवा, नरशार्दुला, तुला कोटि कोटि प्रणाम.
आता लवकरच तू ते चित्र चाळीस कोटीत विकशील, मग तो चाळीस कोटीवाला पुढे ते साठ कोटीत विकेल....
हे नरपुंगवांनो, 'गाय' जेंव्हा हयात होता, तेंव्हा तुम्ही हेच चित्र खुद्द त्याच्याकडून चोवीस लाखात, किंवा चोवीस हजारात जरी घेता, तर तो औषध-पाणी करता, स्वतःचे घर बांधता, आरामात राहता....
.... पण पाण्यासाठी रानावनात वणवण फिरणारी एकादी गाय हेरून, उंच आकाशात घिरट्या घालत तिच्यावर नजर ठेवणारांची तुमची जमात.
ती गाय शेवटी कोसळली, की मग झडप घालून तुम्ही तिचे लचके तोडणार.
आमचा 'गाय' विझत चालल्यावर तुम्ही त्याच्यावर एक फिल्म बनवून घेतलीत, आणि जगभरात दाखवलीत म्हणे. त्यात 'गाय' च्या स्टुडियोत सर्वत्र ठाण मांडून बसलेली धूळ, जळमटं, आणि त्या सर्वात अगदी अविचल, निर्विकार, पुतळ्यासारखा बसलेला, निर्लिप्त 'गाय' दाखवलाय म्हणे.
गाय कोसळत चालल्याची बातमी पसरवण्याचा हा इशारा तर नव्हता?
आता 'गाय' च्या चित्रांची किंमत सदैव आणखी आणखी वाढत रहावी, म्हणून देश-विदेशात मोठमोठी प्रदर्शने भरवली जातील. थोर-थोर समिक्षकांना हाताशी धरून त्यांच्याकडून 'गाय' वर अखंड स्तुतिसुमने उधळली जात रहातील....
***
गाय, चोवीस कोटींची ही बातमी वाचून मला जुने दिवस आठवले... तेंव्हा तुम्ही साठीत, तर मी तिशीत असेन. तुम्ही माझे आदर्श होता. मी तुम्हाला भेटायला यायचो, तेंव्हा तुम्ही आपुलकीनं चवकशी करायचात, मी करत असलेल्या धडपडीचं, माझ्या चित्रांचं तुम्हाला कौतुक वाटायचं... पण तुम्ही स्वतःविषयी, तुमच्या चित्रांविषयी मात्र कधीच काही बोलला नाहीत.
पुढे पुढे तुम्ही खूप अलिप्त होऊ लागलात. तुमच्या स्टुडियोत सर्वत्र धुळीची पुटं, कोळीष्टकं जमू लागली. मी फार व्यथित व्हायचो हे सर्व बघून. एकदोनदा "रविवारी मी येऊन सगळं स्वच्छ करून देतो" असं मी म्हटलं, त्यावर तुम्ही फक्त 'असू दे तसंच' म्हणालात... काही काळानंतर तुम्ही गेल्याचीच बातमी आली.
गाय, अलिकडे तीन-चार वर्षांपूर्वी दिल्लीतला एक कला-व्यापारी माझ्याकडे हळहळ व्यक्त करता झाला. त्यानं तुमच्याकडून पुष्कळ वर्षांपूर्वी प्रत्येकी शंभर-शंभर रुपयात चार चित्रे खरेदी केली होती. आणि काही वर्षांनी ती सव्वा-सव्वा लाखात विकली होती. अर्थात त्या पाच लाखातून तुम्हाला काही देण्याचा विचार त्याच्या मनात येण्याचा प्रश्नच नव्हता. तर त्यानं माझ्याकडे व्यक्त केलेली हळहळ अशी: " अरे यार, मै और कुछ साल रुकता, तो आज एकेक पेंटिंग सत्तर-अस्सी लाखमे बेचता"
... आता चोवीस कोटींची बातमी ऐकून त्याची हळहळ किती वाढली असेल ?
***
हे लिलावकर्तेहो, तुम्ही केवळ महान. गीतेत सांगितलंय, 'समत्वं योग उच्यते' तर तुम्ही महान योगीच. परब्रम्हाचे उपासक. आप-पर भेद तुम्हासि नाही. तुमच्या लेखी सर्व सारखे. कुणाचे चित्र, तर कुणाचा पंचा, कुणाची तलवार, तर कुणाचा चष्मा. कुणाची कवळी तर कुणाचे टमरेल. सर्व सारखे. सर्व लिलाव करण्याच्या वस्तु.
तुम्हाला कोटि कोटि प्रणिपात.
***
आता लवकरच बातमी येईल, साबरमतीच्या संतानं वापरलेलं टमरेल अमूक इतक्या कोटीत लिलावातून विकलं गेलं...
... हे ऐकून बोहरा गल्लीतल्या सर्व टमरेलं विकणार्यांचा ऊर अभिमानानं दाटून येईल आणि त्यांची आशा पल्लवित होईल...
... 'साबरमती के संत तुने कर दिया कमाल, रघुपति राघव, राजाराम' या गाण्याची सिडी विकणार्यांचाही ऊर अभिमानानं दाटून येईल, आणि त्यांची आशा पल्लवित होईल...
जय महाराष्ट्र. भारतमाताकी जय. जय हो.
प्रतिक्रिया
23 Dec 2013 - 9:47 pm | राही
लेख प्रचंड आवडला.
पण गायतोंडे स्वतःच लोकांना टाळत होते म्हणतात. खरे आहे का ते?
24 Dec 2013 - 2:47 pm | चित्रगुप्त
माझा स्वतंचा तरी तसा अनुभव नाही. बाकी प्रसिद्ध व्यक्तींना नको त्या लोकांचा उपद्रव जास्त होत असतो, अश्या लोकांना ते टाळत असतीलही.
23 Dec 2013 - 9:49 pm | उद्दाम
चित्रगुप्ताच्या डायरीला लिलावात किती रेट येईल ?
23 Dec 2013 - 9:49 pm | यसवायजी
अगायाया.. २४ करोड??
त्यात २४ कोटीचं काय हाय ते काऊफेसे यांना माहिती.. नाहीतर चित्रगुप्तांना. ;)
आपण फक्त चान चान म्हनायचं..
23 Dec 2013 - 9:56 pm | आतिवास
'साबरमतीच्या संता'विषयी एक परिच्छेद लिहिल्याने लेखात काही विशेष भर पडली असं वाटत नाही; मूळ 'गाय' यांच्यावरचं लेखन पुरेसं (म्हणजे खूपच) परिणामकारक झालंय.
मग गांधीजी मधे आणलेत ते लेखाकडे वाचकांनी पटकन आकर्षित व्हावं म्हणून की काय - असा प्रश्न पडला.
17 Dec 2015 - 11:28 am | प्रभाकर पेठकर
सहमत. त्यात पुन्हा लिलावाच्या गोष्टी म्हणून चष्मा, चरखा वगैरे वस्तू न घेता टमरेल घेतल्यामुळे श्री. गायतोंडेंच्या चित्रांची तुलना टमरेलाशी झाली आहे. अर्थात, लेखकाचा उद्देश तसा नाही हे कोणालाही कळेल. पण शेवटचा परिच्छेद नको होता ह्याच्याशी सहमत.
23 Dec 2013 - 9:57 pm | विकास
लोकसत्तेतील या विषयावरील इतिहासाची बाजारवाट हा अग्रलेख वाचण्यासारखा आहे...
23 Dec 2013 - 10:27 pm | पैसा
आपल्याकडे हेच चालतं ना. माणूस गेला की त्याचे पुतळे उभारा. त्यांना हार घाला. पण तो जिवंत असेपर्यंत कोणाला फिकीर असतेय!
25 Dec 2013 - 10:37 pm | विजुभाऊ
असे कसे म्हणता. मायवतीनी नाही जिवंतपणीच पुतळे उभारलेत स्वतःचे?
23 Dec 2013 - 10:28 pm | धनंजय
कलेच्या बाजारपेठेत किमती ठरवणे, हा प्रकार मोठा कोड्यात टाकणारा असतो, खरा.
23 Dec 2013 - 10:34 pm | मुक्त विहारि
मुंशी प्रेमचंद आठवले....
23 Dec 2013 - 10:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
चित्रकलेत बराच रस असूनसुद्धा चित्रांची किंमत कशी ठरवतात हे अजून कळले नाही. म्हणूनच इन्व्हेस्ट्मेंट मॅनेजमेंटच्या फायनल पेपरात "चित्रांत इन्व्हेस्ट्मेंट करणार नाही कारण त्यातलं अजून काही कळत नाही. कळायला लागले तर विचार करण्यात येईल" असे लिहीले. पेपर दिला आणि ते लिहिल्याबद्दल रक्तदाब कमालिचा वाढला होता. :( बासल मध्ये इनव्हेस्ट्मेंट कन्सलटंट फर्मचा चेअरमन असलेल्या प्रोफेसराने "A" ग्रेड दिली :) अजूनही चित्रांच्या किंमती अनाकलनियच आहेत.
23 Dec 2013 - 10:44 pm | सुहास..
ट्यांव ...रेपरन्स लागेना हो गुप्त गुर्जी ...जरा ईस्काटुन सांगाल का :(
बावचाळलेला
23 Dec 2013 - 11:05 pm | अमेय६३७७
जे म्हणायचे आहे ते समर्थपणे व्यक्त झाले आहे. कलाकाराच्या कलेला मोल नसते, त्याची किती किंमत व्हावी (किंवा झाली) यावर आक्षेप घेण्याचे कारण नाहीच. मात्र मरणोपरांत लोकोत्तर कीर्ती गाठलेल्या एखाद्याला, हयात असताना त्याची कला समाधानाचे जीवन/ राहणीमान देऊ शकली नाही याची निश्चितच खंत वाटते.
23 Dec 2013 - 11:25 pm | ग्रेटथिन्कर
साबरमतीचं टमरेलं अजून ठीकठाक असेल कशावरुन????... त्यापेक्षा ब्रायटनला जाऊन तिथं एखादं टमरेल शिल्लक आहे का बघा...तिथंले लोक फारच इतिहासप्रिय आहेत..
23 Dec 2013 - 11:56 pm | शशिकांत ओक
व्यापारी वृत्ती मराठी माणसात नाही याचा अभिमान बाळगणाऱ्यांनी आता तरी धडा घ्यावा की जीवन सामान्यपणे जगायला लागणाऱ्या सोई व साधने मिळवण्यात व्यापारी वृत्ती नाही. पण काहींना हट्टापायी गरीब राहाण्यात गौरव वाटत असेल तर...
24 Dec 2013 - 12:41 am | खटपट्या
मला गायतोंडे साहेबांबद्दल जास्त माहित नाही, प्रचंड कुतूहल मात्र आहे. त्यांच्यावर लघुपट बनवणाऱ्या श्री सुनील काळदाते यांचा खालील लेख बरच काही सांगून जातो
http://epaper.loksatta.com/201959/indian-express/22-12-2013#page/9/2
24 Dec 2013 - 6:55 am | कंजूस
काही दधिंचीं'च्या हाडांना फार किंमत येते .
टमरेलचं प्रकरण नंतर येऊ द्या .
24 Dec 2013 - 10:42 am | सौंदाळा
ह्म्म,
रुखरुख वाटली लेख वाचुन. गायतोंडे यांचे आयुष्य हालाखीत गेले हे वाचुन वाईट वाटले.
मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाण्याचाच घ्रुणास्पद प्रकार खुपच फोफावलाय अलिकडे.
असो. इस्पिकचा एक्का यांनी विचारलेलाच प्रश्न मलासुद्धा आहे..चित्रकलेत बराच रस असूनसुद्धा चित्रांची किंमत कशी ठरवतात हे अजून कळले नाही
याबद्दल लिहिण्याची विनंती.
24 Dec 2013 - 2:53 pm | प्रचेतस
हे वर दाखवलेले चित्र हेच विकले गेलेले चित्र असेल तर त्याला २४ कोटी रूपये मिळण्याइतके त्यात काय आहे हे मला खरोखर कळलेले नाहीये.
24 Dec 2013 - 3:17 pm | चित्रगुप्त
वर दाखवलीत, त्यापैकी हे चित्र नाही. या लिलावाचा आणि त्या चित्राचा फोटो हा आहे:
24 Dec 2013 - 3:02 pm | पिंपातला उंदीर
निव्वळ अप्रतिम
24 Dec 2013 - 3:12 pm | ऋषिकेश
मागणी व पुरवठा या तत्त्वाला शरणजावे लागेल असे हे कलेच 'मार्केट' भल्याभल्यांना झेपले/कळले नाही हेच खरे!
बाकी, लेखन/प्रकटन आवडले!
24 Dec 2013 - 3:35 pm | प्रसाद१९७१
चित्रगुप्त जी - हे २४ कोटीला विकले गेलेले चित्र माझ्या सारख्या न कळणार्या लोकांना उलगडुन सांगणार का? एक वेगळा लेख च होईल.
24 Dec 2013 - 3:45 pm | अभ्या..
प्रसादराव उलगडून सांगितले तरी ते आपल्याला कितपत कळेल ही मला शंका आहे. प
चित्रकलेतलेच शिक्षण असून मला अद्याप कळलेले नाही. :-(
कदाचित कला हां एकच पैलू नसावा यात.
24 Dec 2013 - 3:51 pm | प्रसाद१९७१
कळण्याची शक्यता अगदीच थोडी आहे हो. पण उत्सुकता आहे.
24 Dec 2013 - 4:07 pm | चित्रगुप्त
प्रसिद्ध व्यक्तीचे चित्र, चष्मा, टमरेल इ. मोठ्या किमतीला विकले जाणे यात जे अर्थशास्त्र असते, ते अर्थशास्त्रातील माहितगार मंडळींनाच उलगडून सांगता येइल कदाचित. मिपावर असे जे आहेत, त्यांनी यावर प्रकाश टाकावा.
24 Dec 2013 - 4:14 pm | प्रसाद१९७१
चित्रगुप्त जी - मला ते चित्र समजुन घ्यायचे होते. त्याच्या किमती मागचे गणित नाही.
24 Dec 2013 - 4:23 pm | चित्रगुप्त
@ प्रसाद१९७१: अमुक एक चित्र समजून घेणे वा समजावणे, हे अमूर्त कलेच्या बाबतीत तरी जवळ जवळ अशक्यच.
तुम्ही माझे खालील लेख वाचले आहेत का? नसल्यास वाचा, मग पुढे चर्चा करूया.
http://www.misalpav.com/node/18741
http://www.misalpav.com/node/19482
18 Dec 2015 - 7:38 pm | चौकटराजा
अर्थ शास्त्रात एक नियम सांगितलेला नाही तो असा की जसा पैसा जास्त मिळायाला लागतो तसा एक तर माणूस अधिक उदार (बिल गेट्स),अधिक उधळ्या (एम् अम्बानी ) अधिक मूर्ख (या चित्राचा खरेदीदार) होतो !
17 Dec 2015 - 11:42 am | प्रभाकर पेठकर
ती किंमत चित्राची नाही तर जगप्रसिद्ध व्यक्तिची कलाकृती (कशीही असली तरी) माझ्या जवळ आहे, ह्याने माझ्या समाजात माझा सन्मान वाढतो, त्याची असते. शिवाय बोली करणार्या किती जणांवर मात करून मी ही कलाकृती मिळविली हे सांगण्यातही मोठेपणा असतो.
शिवाय लिलावासाठी अशा मनोवृत्तीची समजा १०० माणसे येतात आणि कलाकृती २-४ च असतात मग ती इतरांना मिळू नये आपल्यालाच मिळावी म्हणून जास्तीची बोली लावण्याची चढाओढ लागते आणि त्या कलाकृतीची किंमत (मुल्य) वाढत जाते. पुन्हा ती कलाकृती आपल्याला मिळाली कि ती आपल्या दिवाणखान्यात दिमाखाने लावली जाते आणि येणार्या जाणार्या प्रत्येकाला आपण ही कलाकृती कुठल्या लिलावात कितीला घेतली हे आवर्जून सांगितलं जातं. त्यातून आपल्या श्रीमंतीची जाहिरात होत असते आणि आपला इगो सुखावत जातो.
24 Dec 2013 - 3:51 pm | सुनील
वर काही मंडळी सदर चित्राची किंमत २४ कोटी कशासाठी असे विचारीत आहेत.
त्याचे साधे उत्तर आहे - विकत घेणारा आहे म्हणून. बस्स!
१० ग्रॅम सोन्याची किंमत आज ३३००० रुपये आहे. का?
१० रु फेस वॅल्यू असणार्या ICICI च्या शेअरची किंमत आज ११०० रुपये आहे. का?
उत्तर एकच - विकत घेणारा आहे म्हणून.
बाकी लेख आवडला हेवेसांनल
24 Dec 2013 - 4:11 pm | चित्रगुप्त
विकत घेणारा तरी का आहे? तर त्याला वाटते, की काही काळानंतर त्या वस्तूची किंमत आणखी जास्त वाढेल, तेंव्हा ती मी विकेन. त्याला हे असे वाटायला लावणे, यासाठी जो मोठा बनाव रचावा लागतो, त्यातच सर्व गुपिते दडलेली असतात.
24 Dec 2013 - 4:22 pm | सुनील
हेच! शेअर विकत घेणारादेखिल ह्याच कारणांसाठी घेत असतो. ICICI घेणाराला बँकिंगविषयी किंवा इन्फोसिस घेणाराला आयटीतील शष्पदेखिल कळायची गरज नसते!
चित्राबाबतही हेच!
24 Dec 2013 - 4:28 pm | अभ्या..
बनाव म्हणले की मला ती रैना का नैना पारुलेकर आठवली. ओरिजनल हुसैन वाली. रिक्की बहेल वाली. :-D
25 Dec 2013 - 4:51 am | चित्रगुप्त
@ अभ्या: ती रैना का नैना पारुलेकर, ओरिजनल हुसैन वाली कोण, हा (की ही) रिक्की बहेल कोण, वगैरे काही ठाऊक नाही. जरा इस्कटून सांगता का?
25 Dec 2013 - 3:13 pm | नगरीनिरंजन
अहो ते "लेडीज व्हर्सेस रिकी बहल" नामक हिंदी चित्रपटातल्या पात्रांबद्दल बोलत आहेत.
पुर्वी जसे पुराणातले दाखले दिले जायचे तशी आता हिंदी चित्रपटांतली उदाहरणे दिली जातात.
बॉलिवूडोच्छिष्टं जगत्सर्वम्!
25 Dec 2013 - 7:16 pm | सुबोध खरे
साहेब ICICI बँकेचा समभाग ११०० रुपयाला का आहे याचे काही नक्की कारण आहे. त्या बँकेचा संचित नफा त्यांच्याकडे असणारी स्थावर मालमत्ता आणि त्यांचे समभाग यांचे गुणोत्तर काढले तर प्रत्येक भागधारकाला त्याचा येणारा भाग किती आहे त्याच्या जवळपास येणारी ही किंमत आहे. म्हणजे त्या बॅंकेची मालमत्ता लिलावात काढली तर येणारी किंमत भागधारकाना वाटली तर नक्की काही किंमत येते. त्यात अशा चित्रांच्या सारखी तकलादू गोष्टींची किंमत नाही. त्या चित्रावर चहा सांडला तरी त्याची किंमत नगण्य होऊ शकते.
आपण १०० ग्रॅम सोन्याचे घड्याळ घेतले तर ते चालू असताना त्याची किंमत चार लाख असेल.(तीन लाख सोन्याची किंमत आणि एक लाख वरचे. पण ते बंद पडले किंवा त्यावर हातोडी मारून फोडले तरीही त्याच्या सोन्याची बाजारभावाणे किंमत तीन लाख होईलच.एखादा दागिना आपल्या हातून तुटला तर त्याची फक्त घडाईची किंमत भरावी लागते पण मूळ सोन्याची किंमत तीच राहते. तसेच ICICI बँकेचे दिवाळे वाजले तरी त्यांच्या कडे असलेली स्थावर मालमत्ता विकून बरीच किंमत येईल.
कलेच्या बाबतीत तसे नाही त्याचे भाव नुसते चढविलेले असतात. रस्त्यावर मारुतीचे किंवा देवीचे १२ फुट चित्र काढणारा माणूस कलाकार नाही असे तुम्ही म्हणणार नाही>(आम्ही ३ इंचाच्या चित्रात कुत्रा काढला तर तो गाढवासारखा दिसतो). पण त्याच्या कलेची किंमत कोण ठरवितो? तो माणूस लोकानी फेकलेले पैसेच उचलतो ना? कलेची किंमत ठरविण्याचे कोणतेही निकष नाहीत. आपण जर इंग्रजीत अस्खलीत बोलत असलात (फ्रेंच जर्मन येत असेल तर अजून उत्तम), दक्षिण मुंबईत रहात असलात आणि जहांगीर आर्ट गॅलरीत आपले प्रदर्शन भरविण्याची आपली ऐपत असेल तर आपल्या चित्राला आपण किंमत मिळवू शकता.
आपण आय आय टी मधून अभियंता झाला असाल तर बारावीच्या विद्यार्थ्याना शिकवण्याचे आपल्याला महिना दोन ते पाच लाख मिळू शकतात. मग आपल्या जवळ शिकवण्याची हातोटी आहे की नाही ते नंतर पाहिले जाते.
नाहीतरी सलमान खान इ इ लोक नट म्हणून प्रसिद्ध कसे होतात (अभिनयाचा आणि त्यांचा दुरान्वयेही संबंध नसताना).
संतो कर्म की गती न्यारी
मूरख की तुम राज दीयत हो
पंडित फिरत भिकारी
25 Dec 2013 - 7:45 pm | चित्रगुप्त
अगदी खरे. जंगलाचा कायदाच तिथे चालतो. जिसकी लाठी उसकी भैस.
यावरून हे आठवले:
तेरा वर्षांपूर्वी मुंबईतील एका कितितरी स्टार हॉटेलाने 'मिलेनियम नाईट' ला संगीताचा कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्यासाठी पंडित भीमसेन जोशी यांनी दीड लाख रुपये घेईन सांगितले, तर 'तुनुक तुनुक तुन धा धा धा' वाला सरदारजी (नाव विसरलो) त्याने सत्तर लाख रुपये मागितले. बहुधा हा कार्यक्रम शेवटी झालाच नाही.
(तेंव्हा त्या हॉटेलातील एका अधिकार्याने हे सांगितले होते, सदर कार्यक्रम झाला होता का, असल्यास कुणाचा, हे अजून विचारू शकतो)
25 Dec 2013 - 12:40 am | प्रसाद गोडबोले
का कोणास ठाऊक... पण "गाय" ना इमॅजिन करताना डोळ्यासमोर प्यासा मधील गुरुदत्त आला !
बाकी छित्राची किंमत कशी ठरवतात >> माझ्या मते हा वॅल्यु आणि प्राईस ... मुल्य आणि किंमत ह्यांच्यातील अॅप्रॉक्झीमेशन चे क्लासिक उदाहरण आहे ... तसं पाहिलं तर प्रत्येक चित्र हे अमुल्यच असते ... त्याची किंमत हे केवळ त्याचे अॅप्रॉखीमेशन असते . ( अर्थात ह्यात टाईम हाही एक मोठ्ठा फॅक्टर आहे ...)
जरा अजुन खोल विचार केला तर हे केवळ चित्रच नव्हे तर संगीत... साहित्य... शास्त्र... ह्या प्रत्येक बाबतीत सत्य आहे ...
25 Dec 2013 - 8:52 am | चौकटराजा
आमच्या फॅक्टरीच्या ( म्हणजे माझ्या नव्हे) हेड हपिसात ३० फूट उंचीचे, एमेफ हुसेन यांनी चितारलेले घोड्यांचे चित्र होते.
ते काही तरी त्यावेळी २० लाखाला घेतले होते म्हणे. कशासाठी २० लाख दिले असतील असा मला प्रश्न पडे. मी एकाला
वास्तूकार मित्राला तो बोलून दाखविला. "मेरिलिन मनरो ज्या कंचुकीला असाच फार भाव आला होता त्यावेळी असा प्रश्न तुला का पडला नाही?" माझ्या वास्तुकार मित्राचा प्रतिप्रश्न !
25 Dec 2013 - 9:22 am | सोत्रि
नेमका आक्षेप कळला नाही?
चित्रांचे लिलाव होऊ नयेत का? की त्यांना कोटीच्या घरात किंमती मिळू नयेत?
सुनील यांनी समजावून दिल्याप्रमाणे तो एक व्यवसाय आहे. त्यामुळे त्यातही व्यावसायिक गणिते असणारच. त्याचा फायदा घेऊन नफेखोरीही होणार. त्यात वावगे काय?
लेखाच्या शेवटी टमरेलाचा उल्लेख अजूनही कन्फ्युज करून गेलाय? तो अस्थानी आहे कारण त्यामुळे तुम्हीच तुमच्या श्रद्धास्थानाची, 'गाय' यांचण, किंमत कमी करत आहात.
- (पेंटींग्स बाळगणारा) सोकाजी
25 Dec 2013 - 12:48 pm | चित्रगुप्त
या बाबतीत कायदा हवा, तो असा, की कलाकृतीच्या प्रत्येक विक्रीच्या वेळी त्यातील काही भाग मूळ कलावंताला वा त्याच्या वारसांना मिळावा. अर्थात कलेत जो पैसा ओतला जातो तो बहुतेक काळा असल्याने अश्या कायद्याची अंमलबजावणी होणे कठिणच.
लिलावकर्त्यांसाठी कलाकृती आणि टमरेल हे सारखेच, वगैरे त्याआधीच्या परिच्छेदात आलेच आहे.
25 Dec 2013 - 5:53 pm | शशिकांत ओक
कशा कशा साठी कायदा करणार?
कुठली कलाकृती! अन कोणते टमरेल! याच्या व्याख्या तयार होत नाही तोवर श्रद्धा व अंधश्रद्धा सारख्या कायद्याच्या रवंथांची दशा येईल....
25 Dec 2013 - 5:57 pm | चित्रगुप्त
मस्त, अगदी गाभ्यालाच हात घातलात मालक.
25 Dec 2013 - 8:36 pm | शशिकांत ओक
पैसे मिऴवणारे काही ना काही युक्त्या करून धन प्राप्तीच्या नवनव्या वाटा शोधतील. त्यांच्या करामतींना दाद देणारे चित्र रसिक ही मिळतील. यावर काथ्या कुटून कुटून 'गाय'चा चारा शेणात परिवर्तित होईल इतकेच.
सहज या लिंक वर शास्त्रीय गायनातील चीजांचे शब्द, अनेक महान गायकीतील विविध ख्यातनाम कलाकारांच्या चीजांचा सागर खंगाळून त्यातील मौतीक व त्यातील शब्दांचे बारकावे मराठी माणसाला कधी कधी समजायला जड जातात. त्यावर पुर्वीच तयार धाग्यावर मस्त रंगायला होतेय. आता लंगरवा, बैंया, गुईंया म्हणजे काय? टप्पा, ठुमरी, बंदिश, चैति, यांचे अर्थ व त्यातील फरकाच्या छटा वगैरे सांगायला अनेक सरसावलेले पाहून एक वेगळेच मानसिक समाधान मिळाल्याचा आनंद झाला.
पहा तिथे चक्कर मारून...
26 Dec 2013 - 2:38 pm | म्हैस
लेख प्रचंड आवडला
6 Jan 2014 - 7:33 pm | चित्रगुप्त
लेखात उल्लेखिलेल्या दिल्लीतील कला व्यापार्याला आजच मी भेटलो, आणि या लिलावाबद्दल त्याचे काय मत आहे हे विचारले. (माझ्या माहिती प्रमाणे हे चित्र कुणी विकत घेतले आहे, ते अद्याप सांगितले गेलेले नाही) त्याच्या मते ही गायतोंडेच्या चित्रांचा बाजारभाव वाढवण्याची एक क्लृप्ती आहे.
17 Dec 2015 - 9:40 am | खेडूत
आज आलेल्या बातमीने हा धागा पुन्हा आठवला!
गायतोंडे यांच्या चित्रांच्या किंमती वाढत चालल्यात असं दिसतंय....
17 Dec 2015 - 11:35 am | सुमीत भातखंडे
आवडला.
चित्र मात्र समजलं नाही.
17 Dec 2015 - 11:47 am | कैलासवासी सोन्याबापु
चित्र अव्वाच्यासव्वा भावात विकले जाणे, आर्ट डीलर्स मतलबी असणे, कलाकारांस वाईट दिवस पहायला लागणे सगळे समजले पण शेवटी ते शेवटी गांधीजींच्या पंच्याला का हात घातला गेला त्यामागचे लॉजिक अन कार्यकारणभाव काही समजला नाही, चित्रासोबत तो ही समजवता आला तर आपले आभारी राहु.
18 Dec 2015 - 6:07 pm | बोका-ए-आझम
कलाविश्वातल्या या व्यवहारांवर फ्रेडरिक फोर्साईथ यांची Art of the matter नावाची अप्रतिम कथा आहे. हा लेख वाचून तीच आठवली.
3 Oct 2019 - 6:56 pm | खिलजि
सुंदर मर्मस्पर्शी लेख लिवलाय , काका .. वाईट वाटलं , हे सर्व वाचून ..
3 Oct 2019 - 7:54 pm | सुनील
काय योगायोग!
मिपाकर रामदास यांच्याकडून परवाच आणलेले गायतोंडे यांच्यावरील पुस्तक वाचायला घेतले आणि हा एक ५ वर्षांपूर्वीचा लेख वर आला.
4 Oct 2019 - 12:52 am | मायमराठी
'गाय', चित्र कोटी व टमरेल या सगळ्यांच्या निमित्ताने बहुमूल्य चर्चा वाचायला मिळाली जिची किंमत ठरवता येणार नाही. हे म्हणजे एखादी गाण्याची रंगलेली मैफिल ऐकून बाहेर पडताना श्रीमंत झाल्यासारखे वाटते असं काहीतरी.
घाईघाईने देवळांत जाऊन देवावर मेहरबानी करून यावी, असा एकदा बालाजीच्या देवळात गेलो होतो. थंडीतल्या संध्याकाळी सातचा सुमार असावा. घंटा आणि नादस्वरम् वाजवत दोन माणसं काहीतरी झटापट करत होते. चपला घालून सटकतच होतो पण पाय निघत नव्हता. अर्धा तास तसाच उभा राहून ऐकत राहिलो. उर्वरीत दुनिया एकडून तिकडून होत होती. मी, ते दोघे आणि बालाजी काळात वितळून गेलो होतो. ती जादू थांबली. त्यांच्याजवळ गेलो विचारलं " क्या बजा रहा थे?" दोघे हसले , हात व मान नकारार्थी हलवून हिंदी येत नाही असं कळवलं. बोऱ्याबिस्तर घेऊन निघून गेले.
माझ्याकरता ते संगीत '२४ कोटी'चं होतं. त्यांनाही ते माहीत नसावं. पूर्वीच्या राजांपैकी असतो तर गळ्यातले दागिने/ मुद्रिका बिद्रिका काढून दिल्या असत्या. चक्रवर्ती राजा सत्कार करतो म्हणजे ते दोघं पण महान होणारच. ते वाजवतील ते उत्कृष्ट असणारच, हाच न्याय ना?
कोणालातरी आवडावं आणि आवडलेली व्यक्ती कोण, ह्यावर पुढील निकष/ व्यवहार अवलंबून असतात. रसिक जेवढे श्रीमंत तेवढी लोकप्रियता अधिक. रेणू मंडल बघा ना, रेल्वे स्टेशनवर भीक मागत गाता गाता लाखो लोक ऐकून, पैसे देऊन गेले असतील. एकानेच व्हिडिओ बनवला व तो हिमेश ला आवडला, मग साठा उत्तराची वगैरे वगैरे. आता तिच्या ताना आपल्या कानावर येऊन येऊन तिला आपण गायिका करून पण टाकू. सापेक्षता नेहमीच चकवते. बाकी ज्याच्याकडे २४ कोटी आहेत तो कशाला वाद घालतोय म्हणा. त्याची मर्जी. मोठी माणसं कोणालाही मोठं करू शकतात निदान प्रयत्न तरी नक्की करतात. बहुधा प्रत्येकाची रसिकतेची व ती पूर्ण करण्याची ऐपत वेगळी असावी. राहिलं टमरेल, फुटलेलं,गंजलेलं का असेना संतांचं म्हणून घरात बाथटब व इतर सुखसोईंनी सज्ज बाथरूम असलेली माणसंसुद्धा ते घेतीलच. मूळात संत पैश्यावर छापलेले आहेतच तर ते विकत घ्यायला पण संतच लागतील.
मूळ धाग्यापेक्षा त्याचा प्रतिसाद 'दोरखंड' झाला, त्याबद्दल क्षमस्व. मनमोकळा लेख व त्याहून खुल्लमखुल्ला चर्चा खरंच आवडली, म्हणून एवढी हिम्मत केली.
इति अलम्।
__/\__
14 Mar 2021 - 10:29 am | तुषार काळभोर
मिपाकर संदीप चांदणे यांनी आज सकाळ मध्ये श्री वासुदेव गायतोंडे यांच्या चित्राला ४०,००,००,००० रुपये (अक्षरी रुपये चाळीस कोटी फक्त) मिळाल्याची बातमी असल्याचे सांगितले.
इपेपर मध्ये बातमी आहे, पण esakal.com वर बातमी सापडली नाही.
एक बातमी टीव्ही9 ची सापडली.
चित्रगुप्त साहेबांचे शब्द सात वर्षांनी खरे ठरले!
14 Mar 2021 - 10:56 am | मदनबाण
६० कोटींना विक्री झाल्यावर हा बहुमुल्य धागा परत वाचायची संधी मिळु दे ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- I'm a Peaky Blinder ( Official Video )
14 Mar 2021 - 12:57 pm | कंजूस
David Hockney - swimming pool painter शोधा.
14 Mar 2021 - 5:34 pm | चौथा कोनाडा
अतिशय रोचक माहिती !
डेवीड हॉकनी यांचे हेच ते पेंटींग : Pool with Two Figures पुल वुईथ २ फिगरः किंमत रू 646 कोटी
आणि ही दोन अडीच वर्षांपुर्वीची बातमी आहे.
16 Mar 2021 - 4:15 pm | Rajesh188
आहेत?
गायतोंडे यांची चित्र अनेकांना एवढी विलक्षण का वाटतात, हे त्या चित्रांचे फोटो पाहून लक्षात येणार नाही. कारण फोटोंमधून चित्राचा आकार, रंगाचे थर, त्यातला प्रवाहीपणा समजून घेता येत नाही.
त्यासाठी ती चित्रं प्रत्यक्ष पाहावी लागतात. अशा चित्रांचा अर्थ लावायचा नसतो, तर अनुभव घ्यायचा असतो. तो अनुभव कधी मनाला शांत करतो, कधी आत खोलवर हादरवून टाकतो, पण काही झालं तरी समृद्ध करून जातो.
2019 साली कलाप्रेमींना असा अनुभव घेता आला. त्यावेळी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात गायतोंडे यांच्या चित्रांचं प्रदर्शन लागलं होतं.
त्यानंतर चित्रकार-गायक सुनील विनायक बोरगांवकर यांनी आपले अनुभव शब्दांत मांडले.
ते लिहितात, " गायतोंडे सरांचं चित्र बघताना, आधी 'संपूर्ण चित्र' दिसतं. 'साक्षात्कारी दर्शन' ! हे दर्शन इतकं गुंतवून टाकतं की आपण नकळत चित्राच्या जवळ, जवळ, अजून जवळ कधी गेलो, चित्रानंच हळूहळू जवळ कसं खेचून घेतलं, खिळवून ठेवलं, हे लक्षात येत नाही.
"अपरिमित शांतता. या साक्षात्कारी अनुभवानंतर भानावर आल्यावर साहजिकपणे मनात सुरु होणारी चल-बिचल. त्यांनी हे कसं केलं असेल, त्यांना हे कसं साधलं असेल, हे सगळं कसं काय जमलं असेल, असं वाटत राहतं आणि पुन्हा ते वाटणंही गळून पडतं
15 Apr 2021 - 8:31 am | चित्रगुप्त
... एकदम बरोबर.