गाभा:
१५ ऑगस्ट १९४७ पूर्वी देशात लंडनच्या राणीबाई छापाची नाणी आणि नोटा होत्या.
स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशाचे चलन बदलले. राणीछापी पैसे बदलून एका रात्रीत आपले पैसे कसे आणले गेले? लोकांच्याकडे जे पैसे होते ते त्यान्नी कसे बदलले? याबाबत नेमका जुन्या लोकांचा कसा अनुभव होता? लोकांकडून जुने पैसे घेऊन नवीन पैसे दिले काय? मग ते जुने पैसे घेतले त्याचे सरकारने काय केले? नवीन पैसे लगेच कसे छापले? इ .इ इ.
याबद्दल कुतुहल आहे. त्याच्या चर्चेसाठी हा धागा.
( जुन्या पैशाचे फोटू असतील तर इथे दाखवायला लाजू नये. )
प्रतिक्रिया
14 Sep 2013 - 8:19 pm | पाषाणभेद
राणीछाप रूपयं राज्याक ग्येले. आता बंडला मारूनश्यान काय उपेग?
14 Sep 2013 - 9:06 pm | राही
राणी/राजा छाप चलन एकदम बाद झाले नाही. थोडे दिवस ते व्यवहारात होते. नंतर १९५५-५६ साली चलनामध्ये दशमान पद्धती आणली गेली. चौसष्ठ पैशांचा रुपया जाऊन शंभर पैशांचा रुपया आला. आणे पद्धती मधल्या संधिकाळापुरती चालू राहिली. सहा पैशांचा एक आणा असे साधारण ठरले. असे सोळा आण्यांचे शहाण्णव पैसे होतात. तेव्हा चार आणे, आठ आणे आणि बारा आणे हे प्रत्येकी पंचवीस, पन्नास, पंच्याहत्तर पैशाचे ठरवून हिशोब सोपा केला. तरी पण लोकांचा गोंधळ होतच असे. कारण चवली बारा पैशाची आणि पावली पंचवीसची हा हिशोब त्यांना समजत नसे. मग कालांतराने नाण्यांवरचे दोन आणे, चार आणे, आठ आणे हे शब्द जाऊन पंचवीस पैसे, पन्नास पैसे असे शब्द छापले गेले आणि लोकांच्या तोंडी रुळले. सुरुवातीचे तांब्याचे छोटे-छोटे पैसे (नये पैसे) लोकांना अजिबात आवडले नव्हते. हिंदीत लिहिलेला नये पैसे हा शब्दही लोकांना आवडला नव्हता. पूर्वीचा पैसा, आणा, अगदी पै सुद्धा मोठे आणि जड असत. पूर्वीच्या एकेका पैशात बक्खळ चणेशेंगदाणे, साखर, चहापूड आणता येई. आण्याचा सहावा भाग झालेल्या नया पैशात तितकी वस्तू येईना. लोकांचा चलनावरचा विश्वास उडू लागला तो तेव्हापासून. मग वस्तूंची साठेबाजी, सोन्याचांदीत, जमिनीत पैशाच्या गुंतवणुकीची सुरुवात तेव्हापासूनची. शेअर बाजारात गुंतवणूक खूप उशीरा सार्वत्रिक झाली. जाता जाता : तेव्हा सेंचुरी मिल्सचा शेअर 'ए' ग्रूप मध्ये टॉपला असायचा आणि बाकीचे शेअर दहाच्या किंवा पंचवीसच्या लॉटमध्ये ट्रेड होत असताना सेंचुरीमध्ये मात्र एकेक शेअर ट्रेड करण्याची मुभा होती कारण एका शेअरची किंमतही खूप असायची.
15 Sep 2013 - 7:05 am | आनन्दिता
पुर्वीच्या रुपयाच्या नाण्यावर गव्हाची लोंबीचं चित्र असायचं... एका रुपयात थोडेतरी धान्य विकत घेता येऊ शकायचं.. आत्ताच्या नव्या कॉईन वर ठेंग्याचं चित्र आहे!!!! =))
14 Sep 2013 - 9:33 pm | आदूबाळ
याचे लेखक आणि पुस्तक ओळखल्यास एका मिसळीचे बक्षीस जाहीर करणेत येत आहे ;)
14 Sep 2013 - 10:44 pm | अंतूशेठ
लेखक - पु. ल.
पुस्तक - अपुर्वाई
16 Sep 2013 - 10:11 am | आदूबाळ
"अंतूशेठ" या आयडीने हे ओळखावं यातच सगळं आलं :)
14 Sep 2013 - 10:59 pm | अंतूशेठ
मला ठाऊक असलेली माहिती अशी:
पूर्वीची बायनरी पद्धत
२ कवडी = १ छदाम
२ छदाम = १ ढेला
२ ढेला = १ पैसा
२ पैसा = १ अधन्ना
२ अधन्ना = १ आणा
२ आणा = १ दुवन्नी
२ दुवन्नी = १ चवन्नी
२ चवन्नी = १ अठन्नी
२ अठन्नी = १ रुपया
This system was in use even after independence. In 1957, govt. of India launched "Naya Paisa". The value of which was kept as Rs. 1 = 100 Naye Paise
15 Sep 2013 - 12:34 am | बॅटमॅन
१९४८ सालचे राणीछाप नाणे पाहिल्याचे आठवते. बाकी पास.
15 Sep 2013 - 1:23 am | मोदक
हेच का..?
पुण्याच्या जुन्या बाजारात मिळतात - मला २० रू. ला तीन पैसे मिळाले. ;-)
15 Sep 2013 - 4:16 am | प्यारे१
>>>२० रु.ला तीन पैसे?
अरे देवा, कसं व्हायचं रे देवा! मोदका असा कसा रे अव्यवहारी तू? कोण ठमी घालणार माळ तुझ्या गळ्यात? ;)
पैसा मस्त आहे. वरचा! :)
15 Sep 2013 - 1:54 pm | अभ्या..
बर्याचदा जुन्या बाजारात दिली जाणारी अशी अँटिक(?) नाणी जुन्या नाण्याच्या साचावरुन घडविलेली असतात. त्यांची किंमत दर्शनी ३ पैशा पेक्षा जास्त असली तरी २० रुपयापेक्षा कमीच असते.
जुनी नाणी ऑळखण्यासाठी बर्याच सोप्या टेस्ट्स असतात. हिस्ट्री च्यानेल पाहत असालच. ;)
अवांतर: मुंबई मिंटवर एक लेखमाला वाचल्याचे आठवते पण परत मिळत नाहीये. कुणाला माहीत असल्यास सांगावी.
15 Sep 2013 - 2:11 pm | arunjoshi123
आमच्या पिताश्रींनी 'भोक पडका पैसा' चा बर्याचदा उल्लेख केलेला आठवतो.
15 Sep 2013 - 8:12 am | टवाळ कार्टा
माझ्याकडे आहेत घरी :)
15 Sep 2013 - 1:12 pm | चिगो
आमच्याकडे आहेत स्वातंत्र्यपुर्व काळातील राणीछाप नाणी.. त्यांना 'कलदार' म्हणतात. १९१८ ते १९४५ काळातील वेगवेगळी नाणी पाहिली आहेत. आधी त्यांच्यात १००% चांदी असायची, मात्र नंतर त्यांच्यात 'छनक' आणण्यासाठी शिसं मिसळल्या जाऊ लागलं, असं ऎकलेलं आहे. आमच्या वडीलांच्या शब्दात, "नंतर रिजर्व बँकेत हे अस्सल चांदीचे कलदार देऊन कागदाच्या नोटा आणल्या लोकांनी.." हे वाक्य कदाचित राहींनी सांगितल्याप्रमाणे लोकांचा चलनावरुन उडू लागलेला विश्वास दर्शवते..
23 Nov 2013 - 11:20 am | निनाद
मला वाटते कोणत्याही मोठ्या डिनॉमिनेशनच्या नाण्याला जसे की रुपया 'कलदार' म्हणतात.
23 Nov 2013 - 1:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
मात्र नंतर त्यांच्यात 'छनक' आणण्यासाठी शिसं मिसळल्या जाऊ लागलं, असं ऎकलेलं आहे.
शुद्ध स्वरूपातल्या सोने आणि चांदी ह्या धातूंची नाणी वाकवणे शक्य असते, खूपच लवकर झिजतात व त्यामुळे त्यांचे वजन घटते. हे टाळण्यासाठी आणि नाण्याचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी मिश्रधातूंचा उपयोग केला जातो. त्यांत छ्नक येते ही एक अलाहिदा आलेली गोष्ट आहे.
ह्याच कारणाने २४ कॅरट सोन्याचे दागिने सहसा बनवत नाहीत.
15 Sep 2013 - 2:48 pm | चित्रगुप्त
या संबंधात ऐकलेली एक गोष्ट अशी की इंदुरात होळकरांची चलनी नाणी होती. पुढे ब्रिटिशांनी ती रद्द करून राणीछाप नाणी चालू केली त्यावेळी इंदुरचे प्रसिद्ध धनपती सर सेठ हुकुमचंद यांनी गावोगावी घरांमधे मातीच्या भिंतींमधे चिणून ठेवलेली संपत्ती ती घरे पाडून गाड्यांमधे भरून ब्रिटिश सरकारकडे जमा करायला नेली. याचा नेमका काळ व सत्यता ठाऊक नाही, परंतु हुकुमचंद हे तात्कालीन राजे-रजवाड्यांना कर्ज देत असत, एवढे श्रीमंत होते.
15 Sep 2013 - 3:49 pm | अग्निकोल्हा
ऐकिव माहितीनुसार ही सत्य बाब आहे. अजुनही असे हिडन ट्रेजर आसपासच्या परिसरात अस्तित्वात असुन काहि ट्रेजर्स (नागदेवतेच्या कृपेत) तसेच सुखरुप पडुन आहेत असे सांगितले जाते.
16 Sep 2013 - 11:21 am | रामदास
अंबाडा -बुचडा छाप नाण्याचा भाव सध्या १०००/१००० रुपये आहे.
16 Sep 2013 - 12:58 pm | चित्रगुप्त
आत्ताच ईबे वर बघितले होळकर स्टेटचे (१९४५) एक पैश्याचे नाणे पाचशे रुपयांना आहे.
16 Sep 2013 - 2:01 pm | राही
वर भोकाच्या पैहाचा उल्लेख आहे, त्याला काही जण मुद्रिका म्हणत. हिंदीमध्ये दुवन्नी-चवन्नी-अट्ठन्नी म्हणत तर आपल्याकडे चवली-पावली-अधेली म्हणत. आमच्याकडे दोनतीन पिढ्यांपाऊनचा नाण्यांचा एक छोटाआ अम्ग्रह आहे. (कीबोर्डवर एक अक-र उमटत नाहीय. माफ करून चालवून घ्यावे). त्यात ही नाणी आहेत.
16 Sep 2013 - 4:52 pm | चित्रगुप्त
काही नाणी (जालावरून साभार)
छत्रपतींचा सुवर्ण होनः (१६७४-८० वजनः २.८१ ग्राम)
१६१४-१५ मधील जहांगीरकालीन एक तोळा सोन्याची मोहोरः
१८३२: एक पैसा: ईस्ट इंडिया कं.
१८३५: ईस्ट इंडिया कं. चा १/१२ आणा (याला काय नाव असावे ? ढेला छदाम वगैरे पैकी?)
१८४५: अर्धा आणा: ईस्ट इंडिया कं.
इ.स. १८५७ मधील उठावानंतर ईस्ट इंडिया कं. विलीन होऊन ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली भारत गेला. त्यानंतरची 'राणीछाप' नाणी:
१८६२: राणीछाप चवन्नी
१८९९: राणीछाप अठ्ठन्नी
१८९२: राणीछाप बीकानेर स्टेटचा एक रुपया
१९१८: पंचम जॉर्जचा एक रुपया
१९४७: षष्ठम जॉर्जचा एक रुपया:
16 Sep 2013 - 6:12 pm | अनिरुद्ध प
आत्तापर्यन्त्च्या प्रतिसादातुन एव्हडे कळाले की राणीछाप नाण्याची किमत अधेली पर्यन्त होती रुपया मात्र राजा छाप होता.
16 Sep 2013 - 6:50 pm | चित्रगुप्त
राणीछाप रुपया १८८२:
राणीछाप दहा रुपये १८७० आणि १८७८:
..
वरील नाणी साडेपाच हजार ते आठ हजार ब्रिटिश पौंड किंमतीत विकली गेलेली आहेत. (संदर्भः)
https://www.numisbids.com/n.php?p=lot&sid=451&lot=707
16 Sep 2013 - 7:01 pm | चित्रगुप्त
१८७० च्या नाण्यात 'क्वीन व्हिक्टोरिया' तर १८७८ च्या नाण्यावर 'एम्प्रेस व्हिक्टोरिया' असे लिहिलेले आहे कारण १ मे १८७६ पासून तिचे 'एम्प्रेस ऑफ इंडिया' हे बिरूद देखील चालू झाले.
(स्वगतः आम्हाला गांधी-न्हेरूं पेक्षा छत्रपती, चौदावा लुई, नेपोलियन, बाजीराव, सयाजीराव, अहिल्याबाई, तुकोजीराव इ.इ. जास्त जवळचे वाटतात)
16 Sep 2013 - 7:07 pm | अनिरुद्ध प
सचित्र माहितीबद्दल आभार.
16 Sep 2013 - 8:39 pm | पाषाणभेद
विषय निघालाच आहे तरः
नाशिकहून त्रंबकेश्वरच्या रस्त्याला अंजनेरीजवळ नाणेसंशोधन संस्था आहे. ती आशियातील एकमेव आहे असे म्हणतात. (माझी खात्री नाही. चुकीच्या माहीतीबद्दल (म्हणजे 'एकमेव' असण्याबद्दल) दोष देवू नये.)
असो. तर या संस्थेचे तेथे बघण्यासारखे संग्राहालय आहे. त्रंबकेश्वरला जात असाल तर भेट अवश्य द्या. सध्या पावसामुळे त्रंबकेश्वराचे वातावरण खुपच मनमोहक आहे.
आजच्या बातम्या संपल्या.
16 Sep 2013 - 8:45 pm | पाषाणभेद
आताच हाती आलेल्या ताज्या बातमीनूसार आधी दिलेल्या बातमीमध्ये त्रंबकेश्वरच्या रस्त्याला अंजनेरीजवळील नाणेसंशोधन संस्थेचा आंतरजालीय पत्ता देण्याचा राहून गेला होता. तो पुढीलप्रमाणे आहे:
त्रंबकेश्वरच्या रस्त्याला अंजनेरीजवळील नाणेसंशोधन संस्था -
The Indian Numismatic, Historical and Cultural Research Foundation (INHCRF)
16 Sep 2013 - 9:14 pm | सुनील
राणी छाप नाहीत पण राजा छाप आहेत -
१. सहाव्या जॉर्जची छबी असलेला १९४२ सालचा १ रुपया
२. १९४७ सालचा अर्धा रुपया
३. १९४७ सालचे २ आणे
४. १९४७ सालचे १ आणि २ पैसे (फोटो नीट आलेले नाहीत. जमल्यास उद्या पुन्हा डकवीन)
५. ब्रिटिश राज्य गेल्यानंतर परंतु आपण दशमान पद्धत स्वीकारण्यापूर्वी प्रचलीत असलेले १९५०-५१ सालचे १/२ आणि १/४ रुपये
16 Sep 2013 - 9:24 pm | मदनबाण
माझ्याकडच्या जुन्या नाण्यांचे जुने फोटो :-
23 Nov 2013 - 1:45 pm | सुहासदवन
डकवण्यासाठी इथे आलो होतो. मी देखील जमवले आहेत.
अवांतर : वडिलांनी सांगितल्याचे आठवते की ह्या वीस पैशाच्या नाण्यात खऱ्या सोन्याचा अंश आहे म्हणून. माझ्याकडे जवळ जवळ दोनशे नाणी आहेत. टेस्ट केलेली नाही अजून.
23 Nov 2013 - 11:27 pm | राही
अशी अफवा होती खरी. त्यामुळे लोकांनी ही पिवळी नाणी वितळवली. अर्थातच ती चलनांतून अदृश्य झाली.
अवांतर वरील सर्व प्रतिसादांत पइ (पै) या नाण्याचा उल्लेख कोणी केलेला नाही. १९५६ पूर्वी रुपये-आणे- पै असा हिशोब असे कारण चलनाला किंमत होती त्यामुळे अगदी थोडे सामान घ्यायचे असल्यास पैशापेक्षा कमी मूल्याच्या नाण्याची गरज भासे. पै हा एक पैशाचा तिसरा भाग. म्हणजे आण्याचा बारावा हिस्सा. तीन पयांचा एक पैसा असे. पै-पैसा, पै-पै करून हे वाक्प्रचार या पैवरूनच आले आहेत.
24 Nov 2013 - 6:57 am | बहुगुणी
काही ओळखीची, काही नवीन माहिती, चांगला धागा.
वाक्प्रचारात पूर्वी 'त्याच्याकडे दमडीची शिल्लक नाही', किंवा 'बाजारात त्याला दीड-दमडीची किंमत नाही' असा वापर असायचा, यातली 'दमडी' म्हणजे काय किंमतीचं नाणं? आणि पाढ्यातल्यासारखी 'दिडकी' ही नाण्यांतही असायची का?
24 Nov 2013 - 7:06 am | निनाद
दमडी हे चामड्यापासून बनवलेले नाणे असेल का?
24 Nov 2013 - 7:24 am | बहुगुणी
पण जालावर 'दमडी' शोधलं तर ही पाठ्यपुस्तकातली कथा सापडली!
24 Nov 2013 - 2:30 pm | रविंद्र प्रधान
माझ्याकडे असलेली व्हिक्टोरिया छाप चांदीची नाणी.
24 Nov 2013 - 2:39 pm | रविंद्र प्रधान
फोतो अपलोड होत नाहीत.
24 Nov 2013 - 2:48 pm | राही
नवव्या शतकाच्या अखेरीस सिंध प्रांतावर हिबारी घराणे राज्य करू लागले. त्यांनी धाम्म या नावाची चांदीची अगदी लहान (१०/१२ मि.मि.) नाणी चलनात आणली. दिल्लीच्या शेरशहाने मोहर हे सोन्याचे, रुपया हे चांदीचे तर अल्प किंमतीचे दाम हे तांब्याचे नाणे पाडले. अक्बर काळातही हा दाम होता. कमी मूल्याचा असल्यामुळेच बहुधा, दाम आम आदमीचा आवडता बनला. दाम करी काम, नाही वेचिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, विकत घेतला श्याम, अशा वाक्प्रचारांतून, गीतांतून साहित्याचे लेणे बनला. किंबहुना दाम म्हणजे पैसे, धन असा अर्थविस्तार झाला. (डालडा,सर्फ्,कोलगेट ही अलीकडची उदाहरणे.) दमडी हे दामचे क्षुल्लकीकरण असू शकते. जसे थेरडी, माजोरडी, कुतर्डी. दीड दमडी म्हणजे दीड दाम असावे. त्यालाच दीडकी म्हणत असावेत. दीड दमडी म्हणजे अगदी नगण्य मूल्य. पाढ्यांतली दीडकी अर्थातच वेगळी. ती दिडकी हे एक ते शंभर या संख्यांच्या दीडपटीचे कोष्टक आहे.
जाता जाता - इंग्लिश्मधला 'टु गिव इट अ डॅम' हा वाक्प्रचार या दाम वरूनच आला असावा अशी एक उपपत्ती आहे.
24 Nov 2013 - 3:01 pm | बॅटमॅन
वाह! मस्त प्रतिसाद, दिल खूष हो गया. व्युत्पत्ती रीझनेबल वाटते खरी.
24 Nov 2013 - 6:02 pm | पैसा
Dirham drachma Dinar हे सगळे त्याचेच भाऊ म्हणावेत का?
24 Nov 2013 - 6:28 pm | बॅटमॅन
बाकीचं माहिती नाही पण द्राक्मा हे चलन ग्रीसमध्ये किमान १००० वर्षे वापरलं गेलेलं आहे आणि तेसुद्धा दोन हजार वर्षांपूर्वीपासून.