कालच संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे खास करून मुंबई, ठाणे आणि नाशिक येथे जोशात आणि भक्तिभावात दहीहंडीचा उत्सव पार पडला, म्हणजे साजरा झाला (पडला आणि पर्यायाने जखमी झाला तो गोविंदा)
काही वर्षांपूर्वी दिवसा उजेडी साजरा होणारा हा सण, आता उत्सव बनून संध्याकाळ, अगदी रात्र झाल्याशिवाय रंगातच येतच नाही (ढंगात तर तो केव्हाही नव्हताच). चमचमणारे लाईटस, एलइडी टीवीस आणि कमाई म्हणून मिळणारी भरगच्च रक्कम ह्याचं आकर्षण कोणाला नसणार.
वेगवेगळ्या चाळीतली, मंडळातली, शाखेतली, गडातली तसेच व्यायाम शाळेतली युवा शक्ती, अगदी रात्री उशिरापर्यंत भाड्याने घेतलेल्या (रेंटवर घेतलेल्या) ट्रक्स आणि बसेस भरभरून ह्या उत्सवात सामील झाली होती. आपलं कमावलेलं कौशल्य दाखवीत होती. त्यांच्यातल्या ह्या कौशल्याला, गुणांना प्रोत्साहन द्यायला चित्रपट सृष्टीतील आणि राजकीय पक्षातील नेते मंडळी उपस्थित होती.
आता ही पथके असणार तरी किती, त्यात मानाच्या आणि कमाई मिळवून देणाऱ्या हंड्या तरी असणार किती, तरीही जो उत्साह आणि जी रग त्या युवकांत होती ते पाहण्यासारखे होते. हा उत्साह अगदी सगळ्या न्युज वाहिन्यांवरून देखील ओसंडून वाहत होता.
काही प्रश्न -
इतर राज्यात खासकरून कृष्णाचे आणि त्याच्या लीलांचे आपल्या लोकांएवढे एवढे भक्त नाहीत ही बाब खरी आहे काय. अगदी कृष्णाचा जन्म जिथे झाला त्या राज्यातदेखील अशी भव्यदिव्य हंडी होत नाही. मग दहीहंडी महाराष्ट्रात उत्सव म्हणून एवढा प्रसिध्द होण्यामागे किंवा करण्यामागे काय मुख्य कारण असावे.
दहीहंडी हा जर सामाजिक बांधिलकीचा, भक्तीभावाचा उत्सव आहे इतर उत्सवांसारखा, तर मग ह्या उत्सवा दरम्यान जे अनेक (अ)पारंपरिक उद्योगधंदे होतात त्यासाठी मार्गदर्शक तत्वे / बंधने कोणी आखावीत आणि विशेष म्हणजे ती कोणी पाळावीत. ज्या वाईट पद्धतीने आपले हे सण साजरे होतात खासकरून दहीहंडी आणि गणेशोत्सव, दरवर्षी बहुतेक लोकांकडून ऐकायला मिळते - "हे बघा मराठी लोकांचे धंदे" हे वाक्य अगदी मराठी लोकांच्या तोंडून देखील ऐकलेले आहे.
होते काय की उत्सवात बेधुंद झालेल्या लोकांना हे वाक्य ऐकू येत नाही पण मला ऐकू येते. दरवर्षी वाटते की कदाचित ह्या वेळी असं काही ऐकू येणार नाही पण प्रत्येक वेळेला ते वाक्य आणि "ते धंदे" ह्याची पातळी खाली जात आहे.
ह्या पथकांची युवा शक्ती जो उत्साह आणि शक्ती प्रदर्शन दहीहंडी मध्ये करते तो उत्साह आणि व्यायाम शाळेत कमावलेली हि शक्ती बाकीच्या ३६४ दिवस कुठे असते.
समजा पुढच्या वर्षी दोन मानाच्या हंड्या बांधल्या आहेत, एक राजकीय पक्षाने प्रायोजित केलेली आणि दुसरी मी प्रायोजित केलेली, दोन्ही कडील बक्षिसांची रक्कम समान आहे. पण माझ्या हंडीचे बक्षीस जिंकण्यासाठी मानवी जीवाला धोका होईल असे थर लावण्याऐवजी तुम्ही वर्षभर केलेलं फक्त एक सामाजिक काम दाखवा ज्याचे मुल्य समाजाप्रती निदान एका लाखाचे आहे (उत्तीर्ण विद्यार्थांना वाटल्या जाणाऱ्या वह्या व्यतिरिक्त)
काय वाटतं काय होईल. किती गोविंदा पथके निदान सलामी जाउद्या, उपस्थिती तरी दर्शवतील.
अपघात झालेल्या गोविंदांची मलमपट्टी आणि जास्त नुकसानीची भरपाई सरकारने का करावी, त्या मंडळांनी का करू नये. जर कोणी मृत झालाच तर त्या मंडळावर किंवा प्रायोजकावर मनुष्य वधाचा गुन्हा का चालवू नये.
एक अवांतर प्रश्न -
अशा अनेक सणांसाठी दिली जाणारी प्रत्येक व्यक्तीमागील देणगी रक्कम आता जीवन विम्याच्या किंवा राष्ट्रीय बचत पत्रांच्या वार्षिक हप्त्यांएवढी किंवा जास्त झाली आहे.
आम्ही सामान्य जनतेने दिलेली ह्या देणग्या सामाजिक बांधिलकीने दिलेल्या आहेत अशा समजून सरकार ह्या देणग्या कर मुक्त करणार का? म्हणजे आम्ही आफिसात ह्या पावत्या दाखवून कर सवलत का मिळवू नये.
प्रतिक्रिया
30 Aug 2013 - 5:02 pm | मुक्त विहारि
अपघात झालेल्या गोविंदांची मलमपट्टी आणि जास्त नुकसानीची भरपाई सरकारने का करावी, त्या मंडळांनी का करू नये. जर कोणी मृत झालाच तर त्या मंडळावर किंवा प्रायोजकावर मनुष्य वधाचा गुन्हा का चालवू नये.
हा तर जास्तच...
30 Aug 2013 - 5:37 pm | ऋषिकेश
हे वाचा
हे उत्सव ही राजकीय पक्षांची कार्यकर्ते निर्माण करण्याची प्रयोगशाळा (खरंतर कारखाना ;) ) आहे
31 Aug 2013 - 10:51 am | रमेश आठवले
दर वर्षी दही हंडी या खेळात हंडी खालचा गोविंदांचा डोलारा बरेच वेळा कोसळतो . माणसे जखमी होतात आणि त्यातील काहींचा मृत्यु होतो. हे अपघात बहुतांशी वरच्या थरातील गोविंदा रस्त्यावर (बहुधा डांबरी) कोसळल्याने होतात. या वर्षी एका वाहिनीने सांगितल्या प्रमाणे फक्त मुंबईत २६७ गोविंदा जखमी झाले होते.
त्यांच्या सुरक्षेसाठी हा विचार मनात आला .
सर्वात खालचे कडे असते त्याच्या बाहेर जमिनीवर अंथरलेले एक गाद्यांचे कडे करावे. ते अनेक सहज जोडता येणार्या आर्क( भूमितीतील मराठी शब्द आठवत नाही) आकाराच्या गाद्या वापरून बनवावे. त्याची रुंदी पुरेशी असावी, म्हणजे donut च्या आकाराचे ची पुरेशी जाड गादी बनवावी. कोसळणारे बरेच गोविंदा या शॉक absorber गाद्यांवर पडतील आणि त्यांचे अगदी किरकोळ जखमांवर निभावेल.
पोलिसांनी परवानगी देण्यापूर्वी सर्व दही हंडी खेळ योजना करणार्या संस्थावर या सुरक्षा कवचाची सक्ती करावी.
प्रेक्षक गादीवरच येउन गोंधळ करणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल.
कदाचीत हा गादी सेट काही वर्षासाठी पुनः वापरता येईल.
31 Aug 2013 - 11:54 am | दादा कोंडके
डीजेंच्या दणदणाटात ध्वनीमर्यादेचे सर्व नियम धाब्यावर बसविणाऱ्या दहीहंडी मंडळांवर पोलिसांनी कोणती कारवाई केली, असा प्रश्न विचारणारे ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर (५३) यांना नौपाडा पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. या प्रकाराने अतिउत्साही नेत्यांच्या दहीहंडी मंडळांना वाचविण्यासाठी खाकी वर्दीतील गुंडगिरीच समोर आली.
संदर्भः http://www.loksatta.com/maharashtra-news/social-worker-beaten-up-in-than...
6 Sep 2015 - 6:31 pm | माहितगार
महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात गोकुळाष्टमीस कानोबा अंगात येतो असे ऐकण्यात आले. त्याबद्दल अधीक माहिती हवी आहे.
6 Sep 2015 - 10:55 pm | काळा पहाड
हे धंदे बंद करा. गणेशोत्सव, दहीहंडी, जयंत्या, मयंत्या वगैरे सार्वजनिक रित्या करण्यावर कायद्याने बंदी हवी.