लोहगडाची जत्रा

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in भटकंती
9 Jul 2013 - 12:43 pm

लो. ह. गड - लोकांमध्य॑ हरवलेला गड.

परवा लोहगडाच्या जत्रेला गेलो होतो. दुस-यांदा. पहिल्यांदा गेलो होतो ते मागच्या वर्षी. पावसाळ्याच्या नंतर. पण ती जत्रा नव्हती. तेंव्हा त्याचं ते हिरव्या गार रंगात नटलेलं रूप बघून, चिलखती, दणकट असं रूप बघून भारावून गेलो होतो. खूपच रंजक झाली होती ती भेट. दुस-या भेटीचा अनुभव मात्र वेगळा होता.

आम्ही पोहोचलो तेंव्हा प्रथमदर्शनी दिसली ती केवळ गर्दी. एक क्षण वाटलं की आपण बार मधे वगैरे आलो आहोत की काय!, कारण दारूच्या बाटल्या हातात घेऊन टोळकी वावरत होती. मग वाटलं की आपण पार्टीत वगैरे आलो असू, कलकलाट, स्टीरिओज चा ठणाणा, चाललेले अश्लील नाच, आणि पैशाचं, त्याच्या माजाचं मांडलेलं प्रदर्शन; हे सगळं पार्टीतच असतं ना?

या संभ्रमातच आम्ही गर्दीतून वाट काढत पुढे निघालो. पायाला दारूच्या, पाण्याच्या बाटल्या, चिप्स ची पाकिटं, या गोष्टी लागत होत्या ख-या, पण त्याक्षणी त्यावर भाष्य करण्यात काही अर्थ नव्हता. गर्दीतून ढोसाढोशी करतच आम्ही गडाच्या मुख्य दरवाज्यावर पोहोचलो. आम्ही ढोसाढोशी केली तो नाईलाज होता, पण तिथे आलेल्या बहुतेकांचं तेच उद्दिष्ट होतं

गडावर आल्यावर प्रथम डावीकडे गेल्यावर अष्टकोनी तलाव लागला. तलावाचा सार्वजनिक स्विमिंग पूल झाला होता. लोकं उड्या मारत होते, एकमेकांना ढकलत होते, किंचाळत होते, लक्ष वेधण्यासाठी जमतील ते चाळे करत होते. काहीकाळ त्या चाळ्यांत हरवलेला तो तलाव न्याहाळून पुढे निघालो. दर्ग्याच्या बाजूने चालताना दर्ग्यात बघितलं तर तिथे चार-दोन टकली एकाट बसली होती. गर्दुल्लेच वाटत होते. त्यामुळे तिथे जाण्याची इच्छाही झाली नाही. मग इमारतींचे अवशेष बघत विंचू काट्याकडे जात होतो. ढगाने अवघा परिसर वेढला होता. २० फुटापलिकडे काहीही दिसत नव्हतं. पण गर्दी मात्र चिक्कार होती आणि ती ऐकू येत होती. विंचू काटा दिसणं तर अशक्य होतं. त्याच्या काहीसं आधी एक छोटासा कातळातला उतार आहे. तिथे निसरडं होतं त्यामुळे पुढे फारसं कुणी जात नव्हतं. पण त्या 'स्पॉट' वर फोटो काढण्यासाठी झुंबड उठली होती.

फिरून लक्ष्मी कोठीजवळ येऊन ५ मिनिटं शांत विसावू म्हटलं, आणि त्या दिशेने निघालो. लक्ष्मी कोठी नजरेस पडली. आणि तत्क्षणी त्यातून एक इसम बाहेर पडला, हातात काळी प्लॅस्टिकची पिशवी घेऊन. रिकाम्या दारूच्या बाटल्या असाव्यात. ती पिशवी त्याने सर्रळ वरून खाली धुक्यात टाकून दिली. माझ्याशी नजरानजर केली. आणि पुन्हा आतून ऐकू येणा-या कलकलाटात सामील झाला. इथे आणखीच कुठली तरी 'कोठी' आहे असं वाटलं. 'लक्ष्मी' असं तिथे वाचून हळहळ वाटली. पुढे तिथे थांबण्यासारखं काहीच नव्हतं.

निराश होऊनच पाय-या उतरू लागलो. गणेश दरवाज्याच्या जवळ असलेल्या दीप लावायच्या खोबणीत चार टपराक मुलांचा जर्दा-मावा बेत चालू होता. तंबाखूत काहीतरी कालवत होते ते. काय ते कळलं नाही पण पिठीसाखर नक्कीच नव्हती ती. अर्थातच दुर्लक्ष करून मार्गस्थ झालो. उतरताना पाय-या जरा निसरड्या झाल्या होत्या. तिथे 'केवळ चार जणांना सांगायला एक स्वकर्तृत्वाची गोष्ट असावी' म्हणून ट्रेकिंग (अर्थात जाणकार म्हणतीलच इथे, की हे काय ट्रेकिंग आहे? ट्रेकिंग करायचं तर इथे इथे चला.... असो.) करायला येणा-या लोकांचं, विशेषत: मुलींचं/बायकांचं आउच्-उफ्फ चालू होतं, आणि त्यांना इथे आणणा-या मुलांची/माणसांची त्यांना हात देण्यासाठीची धडपड चालू होती. (का? ते आपण जाणताच)

चिंब भिजलेल्या अवस्थेत, रिमझिम पावसात मस्तपैकी गरमागरम मसालेदार मक्याचं कणीस खायची मजा औरच. ती मजा घ्यायला एका मावशींच्या टपरीवर गेलो. तिथे 'चुलीतल्या कोळशावर सिगारेट पेटवण्याची मजा काही औरच' म्हणणारं एक टोळकं आलं. चुलीवर सिगारेटी पेटवून आपले माकडचाळे तिथल्या माकडांना दाखवू लागलं.

तिथे एक बोर्ड लावला होता कुण्या वनखात्याने की इतिहास संवर्धन खात्याने. त्यावर लिहिलं होतं, की कचरा करू नका, इतिहासाचं रक्षण करा नि काय काय. त्या माकडचाळे करणा-या टोळक्याने आपली सिगारेटची थोटकं त्याच्च बोर्डाखाली टाकली. माझ्या उद्विग्नतेला कळस चढला. आणखी काही बघायची इच्छा उरली नव्हती. 'लोहगड संपलाय. आता हा एक पिकनिक स्पॉट आहे.' असं माझ्याशीच मी म्हटलं. सिंहगड; रायगड; कळसुबाई; राजमाची; आता लोहगड... अशी एक एक ठिकाणं आपल्यासाठी वर्ज्य होत जातील असं वाटतंय आता. मी ऐकलंय की हरिश्चंद्रगडही पाचनई च्या वाटेने कुण्णीपण करू लागलंय. माझ्यासाठी ड्रीम ट्रेक आहे तो. त्याचा लोहगड व्हायच्या आत तिथे जाऊन आलं पाहिजे बाबा.

(फोटो एकही टाकत नाहीये. काढलेतच कमी. पण दोन तीन आहेत, ते या वर्णनापासून वेगळे ठेवतो. वेगळ्या धाग्यात टाकतो.)

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

9 Jul 2013 - 1:13 pm | पक पक पक

च्च्च्च्च्च.....

कपिलमुनी's picture

9 Jul 2013 - 1:33 pm | कपिलमुनी

सर्व किल्ल्यांच्या वाटा तोडून टाका ... सुरूंग लावून पायर्या उडवून लावा ..
लोहगड , राजमाची , सिंहगड(हो , आमच्या लहानपणी इथे पण किल्ला होता )
जे जे सहज सोपे किल्ले आहेत त्यांची हीच अवस्था आहे ..

बरोबर आहे तुमचे.
इंग्रजांचे आपल्यावर तेवढे तरी उपकार आहेत. त्यांनी किल्ल्यांच्या पायऱ्या फोडल्या नसत्या तर सगळ्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची हीच अवस्था दिसली असती.
आत्ता सुरुंग नाही लावू शकत तरी भुताच्या अफवा पसरवू शकतो. 'सर्फ च्या जाहिराती सारखे कभी डाग भी अच्छे होते हे, तसच कभी कभी अंधश्रद्धा भी अच्छी होती हे.' अगदीच जास्त झाले तर कुठ्ल्यापण दारुड्याला पोत्यात घालून ठेवायचे....असे अनेक उपाय आहेत माझ्या कडे, निसर्ग वाचवायचे. ;)

वेल्लाभट's picture

10 Jul 2013 - 7:10 am | वेल्लाभट

+११११

प्रसाद गोडबोले's picture

14 Jul 2013 - 7:22 pm | प्रसाद गोडबोले

खरच भारी आयडीया आहे !!

फोटो अजिबात टाकू नका. उगाच डोक्याला त्रास...

चंबु गबाळे's picture

10 Jul 2013 - 11:37 am | चंबु गबाळे

+१

मॅन्ड्रेक's picture

9 Jul 2013 - 3:56 pm | मॅन्ड्रेक

सर्व किल्ल्यांच्या सहज वाटा तोडून टाका ...

कवितानागेश's picture

9 Jul 2013 - 7:34 pm | कवितानागेश

मान्य.
असा झालेला लोहगड बघवणार नाही आता.

किल्ले दुर्गम राहिलेलेच बरे.

वेल्लाभट's picture

9 Jul 2013 - 10:41 pm | वेल्लाभट

अग्गदी बरोबर. द मोअर इट इज अ‍ॅक्सेसिबल, द वर्स विल इट गेट.

शैलेन्द्र's picture

9 Jul 2013 - 7:06 pm | शैलेन्द्र

परवा, नानेघाटात गेलेलो.. त्याचाही पिकनिक स्पॉट झालाय.. मजा नाही आली..

वेल्लाभट's picture

9 Jul 2013 - 10:40 pm | वेल्लाभट

हम्म. नाहीच येत.

वेल्लाभट's picture

9 Jul 2013 - 7:07 pm | वेल्लाभट

छायाचित्रे इथे

पैसा's picture

9 Jul 2013 - 7:36 pm | पैसा

गर्दी सगळीकडेच वाढते आहे. आणि त्यातले माहिती करून घेऊन आणि खर्‍या ओढीने जाणारे किती जण असतात? लोकांना एकदा एखादे ठिकाण माहिती झाले की हौशे गवशे नवशे सगळे प्रकार सुरू होतातच. फक्त अशा ऐतिहासिक ठिकाणी जाऊन तिथे आपली नावे कोरून ठेवली नाहीत कोणी तर नशीब म्हणायचे!

वेल्लाभट's picture

9 Jul 2013 - 10:42 pm | वेल्लाभट

ते 'याच्यापुढे' काहीच नाही...

यशोधरा's picture

9 Jul 2013 - 7:43 pm | यशोधरा

वाचून अतिशय वाईट वाटले.

प्रचेतस's picture

9 Jul 2013 - 8:03 pm | प्रचेतस

हम्म.
चालायचचं.

वेल्लाभट's picture

9 Jul 2013 - 10:40 pm | वेल्लाभट

चालायचंच कसं हो, वल्ली साहेब? चालवलं की चालायचंच मग.

मुक्त विहारि's picture

10 Jul 2013 - 8:21 am | मुक्त विहारि

आनंद आहे...

किसन शिंदे's picture

10 Jul 2013 - 9:27 am | किसन शिंदे

आत्ता जूनमध्ये तिकोन्याला गेलो होतो. जाताना आम्हाला वाटलं छोटासाच गड आहे, कोणी नाही यायचं...पण तिथे गेल्यावर कळलं, मुंबईच्या एका कंपनीने त्यांच्या कर्मचार्‍यांची ट्रेकिंगची हौस पुरवण्यासाठी नेमकी त्याच तिकोन्याची निवड केली होती. जवळ जवळ १७५-२०० अमराठी लोकं(गुज्जूच फार). नुसते माकडचाळे! बाकी काहीच नाही!!!

वेल्लाभट's picture

12 Jul 2013 - 7:03 am | वेल्लाभट

ढोकळा गँग्स जिथे तिथे जाऊन तिथलं वातावरण दूषित करत असतात.

विक्रान्त कुलकर्णी's picture

10 Jul 2013 - 11:03 am | विक्रान्त कुलकर्णी

किसन, वेल्लाभट आज मितीस महराष्ट्रातील एकही किल्ला नाही जो जाण्यास सोपा आहे पण पिकनिक स्पॉट झालेला नाही. दर शनिवार-रविवार, पावसाळा हिवाळा या दोन रुतुमध्ये मि तरि गेले वर्षभर कोणत्याही किल्ल्यावर जायचे बन्द केले आहे. काय करणार आपल्याला हे बघवत नाही आणि रोखण्याची ताकत नाही.

वेल्लाभट's picture

12 Jul 2013 - 7:05 am | वेल्लाभट

रोखायला हवं ना पण !
मी कुठल्याशा ब्लॉग वर एका राजकीय संघटनेचं एक कार्य वाचलेलं. किल्ल्यावर जाऊन थेरं करणा-यांना कशी त्यांच्याच हस्ते शिक्षा करतात ते. स्तुत्य. केलंच पाहिजे हे.

सोत्रि's picture

14 Jul 2013 - 11:02 pm | सोत्रि

१. रोखायला हवं ना पण !

२. मी कुठल्याशा ब्लॉग वर एका राजकीय संघटनेचं एक कार्य वाचलेलं. किल्ल्यावर जाऊन थेरं करणा-यांना कशी त्यांच्याच हस्ते शिक्षा करतात ते. स्तुत्य. केलंच पाहिजे हे.

मस्त! शिवाजी जन्माला यावा पण तो शेजार्‍याच्या घरात, ब्येस्ट!!

- (दुर्गप्रेमी) सोकाजी

वेल्लाभट's picture

15 Jul 2013 - 7:19 am | वेल्लाभट

हा हा हा. साहेब ५०-६० लोकांना ४-५ जणांनी अडवायचं म्हणजे लैच फिल्मी सीन होईल.

मस्त. सिनेमा असावा तर साउथ इंडियन. ब्येस्ट !!!

उदय के'सागर's picture

10 Jul 2013 - 11:24 am | उदय के'सागर

महिन्याभरा पुर्वी प्रतापगडावर गेलो होतो... पूर्ण वर पर्यंत गेलो तरी गड काही दिसलाच नाही... नुसतेच टोप्यांचे, ताक -लिंबू सरबतच्या, भज्याच्या आणि खानावळीच्या जागा ... भवानी मंदिराच्या आवारात शांत बसू तर कसलं काय.. तिथेही 'हस्तकला' प्रदर्शन लागलं होतं...... अगदी पायथ्यापासून (जूटच्या वस्तू आणि फळं विकणारे) ते वरपर्यंत व्यापारीकरण केलय त्या प्रतापगडाचं.... संतापापेक्षा कीव वाटली. :(

लोकसंख्येचा झालेला विस्फोट अन् मोकाट सुटलेली माकडं !

वेल्लाभट's picture

12 Jul 2013 - 7:06 am | वेल्लाभट

असं आहे की हा विस्फोट कुठेही झाला तरी धूर मुंबईतच येतो त्याचा.

ऋषिकेश's picture

10 Jul 2013 - 12:14 pm | ऋषिकेश

मराठी आंजावर अनेकदा किल्यांचे "संवर्धन" करत नाही, डागडुजी करत नाही म्हणून सरकारवर टिका करणारे लेखही वाचले होते. आता नक्की करायचं काय? डागडुजी करायची की आहेत त्या अपयर्‍या तोडायच्या? ;)

सुहास झेले's picture

10 Jul 2013 - 1:59 pm | सुहास झेले

या कारणामुळेच शुक्रवार-शनिवार आणि रविवार कुठल्याही किल्ल्यावर जात नाही... लोहगड आन विसापूरला उद्या एक धावती भेट देणार आहे.... :)

आता या ऐतिहासिक वास्तुंचं काय करायचं ? गड कसा राखायचा ? किती फौजफाटा ठेवायचा ?किती पायऱ्या तोडायच्या ?किती पाट्या लावायच्या ?किती भुतं नाचवायची ?(बेवडे नी वेडे भुतांना घाबरत नाहित ). डोंबिवलीत एक गरीबांची आंबोली (भोपर टेकडी) आहे .तिथे प्रेमी युगुले जातात .तिथे एक पाटी लावली आहे ."चाळे केल्यास पोकल बांबूचे फटके मारण्यात येतील ".तसेच गाववाले अतिशय कडक आहेत अशा जोडप्यांना हाकलतात .

वेल्लाभट's picture

12 Jul 2013 - 7:06 am | वेल्लाभट

ब्येश्ट. पोकल बांबू रूल्स!

IMG_20130711_145509
काल तुळापुरला होतो तेव्हा असा बोर्ड पाहतांना बरं वाटलं. पण, जरा भिमा,भामा,आणि इंद्रायणीचा संगम खाली उतरुन पाहावा म्हणुन गेलो तर घाटावर, झाडांच्या आजुबाजुला 'तो' आणि 'ती' च्या अनेक जोड्या गहन विचारात बुडालेल्या दिसल्या.

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

14 Jul 2013 - 2:24 pm | प्रभाकर पेठकर

पाटीवर लिहीलं आहे 'प्रेमवीरांनी आपली प्रेमप्रकरणे इतरत्र उरकावी'. त्यांच्या विनंतीचा मान ठेवून 'तो' आणि 'ती' इतरत्र गेले तर त्यालाही आक्षेप? बिचार्‍यांनी करायचे तरी काय?

स्पा's picture

13 Jul 2013 - 1:31 pm | स्पा

पण आता ती पाटी हटवली आहे.. आणि युगुले राजरोस पणे चाळे करतानाही दिसतात

k

-- डोंबिवली आणि चोळेकर स्पा

कालच (गुरुवारी) भाजे आणि लोहगडावर गेलो होतो आणि वेल्लाभटांच्या अनुभवांच्या संपुर्ण विरुध्द अनुभव घेउन परत आलो.

सकाळी ६.३० ची लोकल पकडली आणि ७.४५ च्या आसपास मळवलीला उतरलो.सगळ्यांनी आपली घड्याळे मोबाईल घरीच ठेवले होते. आमचा ग्रुप सोडला तर अजुन एखादा दुसरा ग्रुप असावा. मस्त शांत निवांत वातावरण होते. आजुबाजुला वार्‍याचा आवाज आणि झर्‍याचा खळखळाट पक्षांचा किलबिलाट या शिवाय काहि ऐकु येत नव्हते.

भाजे लेण्यांमधे सुध्दा दुसरे कोणीच नव्हते. प्रचंड शांततेत आणि निवांतपणे लेणी बघता आली. सगळे मित्र मिपाचे निस्सीम भक्त असल्यामुळे वल्लीबुवांच्या भाजे लेण्यांवरील लेखांचा प्रिंटआउट बरोबर घेउन गेलो होतो. व त्यांच्या नजरेने लेणी पहायचा प्रयत्न केला.लेणी पहायला पहिल्यांदाच इतका वेळ लागला. सगळेजण कागद हातात घेउन गूढ शिल्पे शोधत होते. एखाद्याला सापडले की तो सगळ्यांना बोलवुन घ्यायचा मग सगळे जण त्या शिल्पांचा मनमुराद आस्वाद घ्यायचे.

गडाच्या वाटेवरच्या सगळ्या टपर्‍या ओस पडलेल्या होत्या.प्रचंड धुक्याने वेढला गेलेला लोहगड आम्हाला खुणावत होता. तर डावीकडे विसापुर हिरमुसला होउन धुक्याआडुन आमच्याकडे पहात होता. त्याची समजुत घालत आम्ही लोहगडा कडे वळलो.

पायथ्याशी असलेले टपरीवाले पण निवांत होते. भरपुर पाउस असल्यामुळे गडाच्या पायर्‍यांवरुन सुध्दा धबधब्या सारखे पाणी वहात होते. वातावरणाचा परिणाम इतका जबरदस्त होता की गड चढताना अजिबात दमायला झाले नाही. वर गेल्यावर धुक्यात हरवलेला भगवा दिसला. मग त्याच्या पायथ्याशी वार्‍याचा आवाज ऐकत निवांत बसलो. पाच दहा मिनिटात सगळेजण तिकडे येउन पोचले.

त्रंबक तलावामधे दोनतीन पाणसाप निवांत पोहत होते आणि तलावाच्या काठावर दोन खेकडे एकमेकांबरोबर कुस्ती खेळत होते. धुक्यामुळे समोरचे काहि दिसत नव्हते. गडाच्या सगळ्यात उंच असलेल्या ठि़काणावर जेथे एक कबर आहे तिकडे पोचल्यावर मुसळधार पाउस सुरु झाला (त्या मानाने आता पर्यंत रिमझीमच होती) पाउस थांबे पर्यंत एकाच जागी भीजत उभे होतो. कारण त्या पावसात चालणे अशक्य होते.

विंचुकाट्याच्या अलीकडच्या रॉकपॅचवर पण आम्ही आणि चारपाच मा़कडे इतकेच होतो. त्या दगडा वरुन पावसचा मारा झेलत खाली उतरलो आणि विंचुकाट्यावर पोचलो. प्रचंड वारा सुटला होता. जमिनीला समांतर असे पाण्याचे थेंब आमच्यावर मारा करत होते. प्रत्येक थेंब एखाद्या सुई सारखा टोचत होता.विंचुकाट्याचा अनुभव प्रत्येकवेळी थरारक असतो. जाणार्‍या रेल्वेगाड्यांचा आवाज येत होता पण एकही गाडी दिसत नव्हती. गाडीच काय दहा फुटांपलिकडचे काहीच दिसत नव्हते. मधेच धुक्याचा पडदा बाजुला झाला की लांबवर पसरलेली पाण्याने गच्च भरलेली भातशेती दिसत होती

परत येताना माकडांना द्यायला म्हणुन केळ्यांची पिशवी काढली पण त्यांना पिशवीतुन केळी बाहेर काढेपर्यंत पण धीर नव्हता. त्यांनी सरळ पिशवीच आमच्या हातातुन काढुन घेतली आणि केळी गिळायला सुरुवात केली.

दिवसभर पडलेल्या पावसा मुळे संध्याकाळ पर्यंत धबधब्यांचा जोर अजुनच वाढला होता. विसापुरच्या पोटातुन निघणार्‍या एका धबधब्यात शिरायचा मोह आम्हाला आवरला नाही. प्रचंड वेगाने कोसळणार्‍या पाण्याने सर्वांगाला मस्त मसाज होत होता. दिवसभराचा थकवा कोठच्या कोठे पळुन गेला. मस्त फ्रेश होउन आम्ही मळवलीच्या दिशेने चालायला लागलो.

तरी सुध्दा परतताना काही सुरापान केलेले मर्कट आणि काही मदहोश लैला मजनु वातावरण दुषीत करताना आढळलेच. त्यांच्या कडे कानाडोळा करत आम्ही लोकल पकडायला निघालो.

दुर्गप्रेमिंसाठी एक वाईट बातमी. मळवली ते लोहगड पायथा असे डांबरी रस्त्याचे काम जोरात सुरु आहे. हा रस्ता अर्धा अधिक तयार झाला आहे. म्हणजे आता लोहगड विसापुरचे शेवटचे काहीच बरे दिवस शिल्लक आहेत.

किसन शिंदे's picture

12 Jul 2013 - 1:25 pm | किसन शिंदे

बुवा, सोमवार ते शुक्रवार कोणत्याही गडावर गेल्यास असेच वातावरण अनुभवायला मिळेल पण शनिवार आणि रविवार या दुर्गांच काही खरं नसतं. ज्यांना 'शिवराय' हे नाव देखील माहीत नसतं अशी माकडं या दुर्गांवर धुडगूस घालताना दिसतात. :(

कपिलमुनी's picture

12 Jul 2013 - 1:26 pm | कपिलमुनी

तुम्ही वार पाळला नं !!

बहुधा सर्व बेवडे गँग विकांतास पडीक असते

वेल्लाभट's picture

12 Jul 2013 - 8:14 pm | वेल्लाभट

खरंय

वेल्लाभट's picture

12 Jul 2013 - 8:14 pm | वेल्लाभट

खरंय

फारएन्ड's picture

13 Jul 2013 - 12:05 pm | फारएन्ड

काही वर्षांपूर्वी पुण्यात युवाशक्ती व आणखी कोणत्यातरी संघटनेचे लोक सिंहगड वगैरे ठिकाणी असले प्रकार रोखायचे. नंतर काय झाले माहीत नाही.

यात गडाचा, त्या वातावरणाचा अपमान होतो याव्यतिरिक्त स्वतःच्या गाड्या घेउन जाऊन दारू पिणारे लोक प्रचंड धोकादायक आहेत. किमान त्यासाठी अशा सार्वजनिक ठिकाणी दारूला बंदी असायला हवी. (प्रेमी जोडप्यांचा निदान इतरांना काही त्रास नाही). अशा गडांच्या परतीच्या वाटेवर पोलिसांनी पिउन गाडी चालवणारे पकडायचे म्हंटले तर त्यांचा वर्षाचा कोटा १-२ वीकेण्डमधेच भरून निघेल.

अप्पा जोगळेकर's picture

13 Jul 2013 - 1:30 pm | अप्पा जोगळेकर

ह्म्म. सगळीकडे हीच अवस्था आहे. सप्त्स्शॄंगी सोडता अजंठा सातमाळ रांग अजून खलास व्हायची शिल्लक आहे. तिथे अजूनही जाउ शकता.