सेलेब्रेटींनी काहीही केलं तर त्याचा जरा जास्तच उहापोह अन चर्चा होते.
पण अँजेलिना जोलीने जे काही केलं त्याचा मात्र उदो उदो, अन जे काही कौतुक झाल ते मात्र मला खरच कळल नाही.
मी पुन्हा पुन्हा न्युज वाचली, एकच उत्तर ब्रेस्ट कॅन्सरची ८५ टक्के अन ओवरिज च्या कॅन्सरची ५० टक्के शक्यता असल्याने, अॅजलिना जोलीने, मॅसेक्टॉमी करुन घेतली.
आता या सर्जरी दरम्यान तिची मावशी ब्रेस्ट कॅन्सरने वारली अन अॅजेलिना त्या फ्युनरलला जाउ नाही शकली वगैरे वगैरे.
मला पडलेला प्रश्न हा, की कॅन्सर होण्याची शक्यता, अन कॅन्सर होणे यात काही फरक आहे की नाही? प्रिकॉशनरी म्हणुन शरीराचे अवयव काढुन टाकणे कितपत योग्य? एखादा रोग होइल म्हणुन रहाणीमान बदलणे, काळजी घेणे ही एक गोष्ट, पण इतके "अतिरेकी" पाऊल उचलणे कितपत शहाणपणाचे आहे?
८५ टक्के शक्यता जर कॅन्सर होण्याची आहे तर उरलेल्या १५ टक्क्यांना काहीच महत्त्व नाही का? समजा कॅन्सर झालाच नाही, किंवा या आधी एका केस मध्ये http://www.casesjournal.com/content/3/1/51 जेथे या पेशंटच्या नातेवाईकात ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास होता, तस काही होणार नाही कशावरुन?
माझ म्हणन एकच अँजेलीना जोलीने कॅन्सर व्हायच्या आधी कॅन्सर ट्रीटमेंटची जी शेवटची पायरी एखादा अवयव काढुन टाकणे हे कितपत योग्य आहे? आज ती रिकन्स्ट्रक्टीव्ह सर्जरी करुन घेउ शकते, पण मी पाहिलेल्या रोग्यांना ही अशी महागडी सर्जरी परवडेलच असे नाही. दुसरी गोष्ट,' हे होइल, ते होइल ' असा विचार करुन डॉक्टरनी अश्या सर्जरीज करणे कितपत नैतिक आहे? ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय हे अगदी जवळुन पाहिल्याने , अॅजेलीना नक्की कसली बहाद्दुरी करुन गेली हे मला काही कळले नाही. उलट त्यामुळे बाकीचे डॉक्टर पेशंटचा गैरफायदा घेउन अन अॅजेलीना जोलीचा दाखला देउन पेशंटना फसवणार नाहीत का? आधीच भारतात सीझेरीयन्स इतक्या जास्त प्रमाणात होत असतात. तश्यातलाच काही प्रकार आता सुरु होणार नाही
ना हीच काळजी वाटते आहे. अन आज मेडीकल सायन्स अगदी टॉपिकल केमो अन रेडीएशनचा ऑप्शन देत असताना मॅसेक्टोमीची गरज नाही इतकेच नाही तर पूर्या शरीरालाही हानी होण्याची गरज नाही असे औषधोपचार उपल्ब्ध करुन देत असताना, या सर्जरीची काय गरज होती? खरच कोठे बोलाव काही कळल नाही म्हणुन हा उपद्व्याप. अर्थात याला दुसरी बाजु असण्याची शक्यताही आहे, अन ती समजुन घेण्याचीच निकड भासते आहे, नाहीतर अॅजेलिना जोलीचा लोकांना चुकीचे मार्गदर्शन केल्याबद्दल निषेध!
भित्या पाठी....डॉक्टर !!
गाभा:
प्रतिक्रिया
20 Jun 2013 - 11:44 pm | रेवती
मागल्यावेळी हा धागा आला तेंव्हा माझा ल्यापटॉप मराठी लिहू देत नव्हता. नुसतेच प्रतिसाद वाचले. ;)
त्यावेळी हे अँजेलिना प्रकरण समजले. तिच्या बाबतीत किंवा कोणाही शेलेब्रिटीच्या बाबतीत आपल्यापर्यंत पोहोचणार्या बातम्या किती खर्या नि किती खोट्या हे त्यांनाच माहित! त्यांच्याकडे बघून नक्कल करायला जाणारे मात्र फसण्याची शक्यता असते. जिवावरच बेतले म्हणजे झाले कल्याण!
आमच्या घरातलाच अनुभव सांगायचा तर माझ्या सासूबाईंच्या आईंना ४५ वर्षांच्या असताना त्यांच्या गर्भाशयात गाठ झाली. त्याकाळचे वैद्यकीय उपाय तेही लहान गावात फारसे असे माहितच नव्हते. डॉक्टरांनी उबलब्ध सोयींमध्ये गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया केली. त्यावेळी झालेल्या जास्त रक्त्स्त्राव व आपल्याला असे काही झाले असल्याचा मानसिक धक्का बसून त्या चार सहा महिन्यात गेल्या. माझ्या साबांचे लग्न होऊन वर्ष झाले होते. आजेसाबांची आणखी एक लहान मुलगी व दोन मुले मात्र लग्नाची राहीली असल्याने प्रश्न उभा राहिला होता.
ही माहिती अर्थातच माझ्यापर्यंत आली ती अशी! मीही जास्त काही विचारले नाही हे खरे!
नंतर दहाएक वर्षात माझ्या सासूबाईंनाही असाच प्रश्न उद्भवला आहे काय अशी शंका त्यांना आली. त्यावेळी त्यांचे वय ३० होते. लग्न होऊन दोन मुले पदरात होती. आपल्या आईचे झाले तसे तर होणार नाही ही भीती होतीच! डॉक्टरांना मनातील शंका काय विचारली, झाले, लगेच शत्रक्रियेचा सल्ला मिळाला. तपासण्या करून दुसर्या डीक्टरांना विचारले. ते नक्की काही सांगू शकेनात. तसे असेलच असे नाही पण नसेलच कशावरून? टाईप बोलले. म्हणजे काय करावे ते समजेना. जरा मनाची तयारी करून एकतिसाव्या वर्षी त्यांनी ही शत्रक्रिया पार पाडली. खरेतर त्याची काहीही गरज नव्हती. न्म्तर जो काही त्रास झालाय (असे त्या मला एकदा सांगत होत्या) की त्यातून सावरायला वेळ लागला. सगळ्ञात मोठा प्रश्न हा मानसिक आधाराचा होऊन बसला. बरे, ४० वर्षांपूर्वी असे फारसे होत नसे (किंवा झालेले कळत नसे) म्हणून अशाप्रकारचे काही झाल्यावर अरे बापरे! या उद््गाराशिवाय काही मदत मिळत नव्हती. क्षणार राग, तर क्षणार रडू असा मूडस् चा मामला बर्याच लहान वयात सांभाळावा लागला.
वरील लेखन पाहून हे आठवले. नंतर असे झाले की साबांच्या ज्या मैत्रिणींना हे प्रकरण माहित होते त्या मात्र थोड्या थोडक्या कारणासाठी लगेच डॉक्टर गाठू लागल्या हा परिणाम!
21 Jun 2013 - 5:49 am | स्पंदना
हो ग! मानसिकरित्या फार परिणाम करुन जातात अश्या गोष्टी. म्हणुन तर मी विरोध करते आहे या अश्या जाहिरातबाजीचा.
21 Jun 2013 - 8:21 am | चित्रगुप्त
अमिताब्बच्चनच्चच्चच्चब्बचब्बचताब्बताब्बच्चन अमूक गुटका खातो, सचिन तमूक पेय पितो, वगैरे सारखी ही जाहिरात सुद्धा असू शकते, तसल्या सर्जरीची.
21 Jun 2013 - 12:26 pm | गवि
नाही. महत्व नाही. किंवा अत्यंत कमी महत्व आहे. कारण ८५% रोग होणं आणि १५% न होणं यात उफराटा रेशो आहे.
जेनेटिक टेस्टिंग एखादीला आर्थिकदृष्ट्या परवडत असेल, आणि त्या टेस्टिंगमधे काही जेनेटिक मार्कर्स सापडले आणि ते कॅन्सरसारख्या जीवघेण्या रोगाची शक्यता ८५% इतकी जास्त दर्शवत असतील, आणि त्यावर उपाय म्हणून तो अवयव काढल्यावरही क्वालिटी ऑफ लाईफमधे (सब्जेक्टिव्ह) फरक पडत नसेल तर अशी मॅस्टेक्टोमी करणं हा उपाय अत्यंत शहाणपणाचा म्हणावा लागेल. त्यात धाडस आहे किंवा नाही हा.. किंबहुना तिने याला धाडस असं म्हटलं आहे का? हा मुद्दा वादाचा ठरु शकतो.
अशा पॉझिटिव्ह थिंकिंगसोबत.. समजा कॅन्सर झालाच तर? हा प्रश्नही वैध ठरतो.
तुमचा आक्षेप या निमित्ताने जाहिरातबाजी होतेय आणि / किंवा अन्य स्त्रिया भीतीपोटी उगीचच ही शस्त्रक्रिया करायला जातील असा आहे. हे समजलं.
सर्व सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही अशा स्त्रियांची इथे पिळवणूक होईल असं वाटत नाही. केवळ फॅशन म्हणून श्रीमंत स्त्रिया मॅस्टेक्टोमी करतील असं वाटत नाही. तेव्हा, ज्यांना रिस्क फॅक्टर टेस्ट करता येतोय अशा वर्गातल्या स्त्रिया कदाचित या मार्गाने जातील.
यामधे ती स्त्री आणि तिचे डॉक्टर यांमधला हा प्रश्न आहे.
आपण चांगली आणि योग्य सर्जरी निवडू नये.. आपण चांगलं औषध किंवा इंजेक्शन निवडू नये.. आपण फक्त चांगला डॉक्टर निवडावा.. सेकंड ओपिनियन घ्यावं.
पण ८५% रिस्क दर्शवणारे म्युटेशन दिसत असताना शस्त्रक्रिया करुन घ्यावी असा निर्णय घेतल्यावर "उगीचच स्तन काढले" असा आक्षेप घेण्यासारखी जागा तुम्हाआम्हाला या सर्व प्रकारात आहे असं वाटत नाही.
अजून एक बाजू.. हे सर्व व्यक्तिगत म्हणून केलं तर त्याची इतकी बातमी अन बोभाटा कशाला? असा प्रश्न रास्त आहे. पण लक्षात घ्या, अँजेलिना ही प्रचंड मोठी सेलिब्रिटी असल्याने पापाराझी, आक्रमक पत्रकार हे सदैव अशा बातम्यांच्या मागे कुत्र्यासारखे असतात. अशा बातम्यांचं आर्थिक मूल्य इतकं मोठं असतं की अँजेलिनाने अन्य कुठूनतरी हे सर्व वेड्यावाकड्या पद्धतीने बाहेर येणारच याची खात्री बाळगून त्यापेक्षा खुद्द स्वतःच समोर येऊन हे जगाला सांगण्याचा निर्णय घेतला असावा हे स्पष्ट दिसतं..
टॉपिकल केमो किंवा अन्य काहीही उपाय चांगले निघाले असले तरी सतत स्क्रीनिंग तपासण्या करत राहणं आणि कधीही कॅन्सर होईल अशा दहशतीखाली राहणं हे अशा हाय रिस्क स्त्रीला मनस्तापाचं होऊ शकतंच की.. आणि नेमकं नाही लक्षात आलं वेळेत आणि लिंफनोड्समधे वगैरे पसरल्यावर सापडलं तर पुढचं सर्व टॉपिकल केमोइतकं सोपं असेल? उपचार असले तरी त्याचे भयंकर साईड इफेक्ट्स नसतात?
त्यापेक्षा एखादीने शक्य कोटीतली एखादी शस्त्रक्रिया करुन स्तन काढले आणि ती सेलिब्रिटी असल्याने त्याचा गाजावाजा झाला तर त्यात आक्षेपार्ह किंवा टीका करण्यासारखं काही वाटत नाही बुवा..
21 Jun 2013 - 12:42 pm | गवि
दुसरी बाजू समजून घेण्याची निकड भासते आहे म्हणालात म्हणून हे सर्व लिहितोय. मी काही एखाद्या सेलेब्रिटीच्या वतीने तिची दुसरी बाजू मांडू शकत नाही पण तरीही तुम्ही काही मुद्दे मांडताना नेमका पॉईंट सापडत नाहीये म्हणूनही लिहीतो आहे.
कोणते अवयव काढतो हेही पाहिलं पाहिजे. वयपरत्वे ज्या अवयवाच्या अस्तित्वापेक्षा त्याला कर्करोग झाल्यास अन्य व्हायटल ऑर्गन्सनाही अपाय पोचेल अशी शक्यता जेनेटिक टेस्टिंगने सिद्ध झाली तर असे अवयव काढून टाकण्यात नक्कीच अतिरेक नाही. कॅन्सर होण्याची शक्यता आणि कॅन्सर होणं यातला फरक हा ती शक्यता किती आहे यावरही बराच अवलंबून आहे. शिवाय रक्ताचा कर्करोग, फुप्फुसाचा कर्करोग इत्यादिंसाठी तरुणपणीच दरवर्षी सारं रक्त बदला, फुप्फुस काढा असे उपाय आगोदरच करण्याचा आचरटपणा इथे होत नाहीये.
कॅन्सर झाल्यावर तातडीने ही पायरी घेतली गेली नाही तर उशीर होतो. तेव्हा शक्यता ८५% असताना आधीच कृती करण्यात जास्त शहाणपणा नाही का? कॅन्सर होण्याची वाट पाहण्यात काय शहाणपणा?
दुसरा मुद्दा.. आपल्या पाहण्यात असलेल्यांना हे परवडणार नाही म्हणून अँजेलिनाने ते का करु नये? आपली विचारपद्धती जनरली टीकात्मक असते. एखादी चाचणी खरंच स्तनाच्या कर्करोगाची शक्यता दाखवू शकत असेल आणि स्तन काढून टाकल्याने पुढची अपरिमित हानी टळत असेल तर ही टेस्ट महागडीच आहे आणि त्याचा व्यापार होईल अशा शक्यता विचारात घेत बसण्यापेक्षा, या चाचण्या आणखी मोठ्या ग्राहकवर्गात विस्तारुन इतर असंख्य कमोडीटीजप्रमाणे सर्वांच्या आवाक्यात हळूहळू येतील असा विचार का करु नये?
वरीलप्रमाणेच..
बहादुरी केली असं म्हणता येणार नाही हा मुद्दा योग्य आहे. बहादुरी केली असा तिचा सूर आहे का? जाणवला नाही.
ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय ते जवळून बघितल्यामुळे एखाद्या स्त्रीने निव्वळ भीतीपोटी का होईना, पण अशी चाचणी अन शस्त्रक्रिया करुन घेतली असेल तर उलट जास्त समजून घेतलं जाईल असं वाटतं.
21 Jun 2013 - 1:29 pm | सौंदाळा
+१ गवि
कॅन्सरसारखा आजार आपल्याला होण्याची शक्यता ८५% आहे ही बातमीच किती भीषण आहे.
माता-पित्याच्या जनुकपटलावरुन आणि त्याची अपत्याच्या जनुकपटलाशी तुलना करुन अपत्याला होवु शकणारे संभाव्य (दुर्धर) रोग आधीच कळणार्या या शास्त्राबद्दल मला प्रचंड आदर आहे.
(डॉ. रॉबिन कुक यांचे 'मार्कर' नावचे जबरदस्त पुस्तक वाचले होते या विषयावर)
ब्रेकडाउन मेन्टेनन्सपेक्षा प्रिव्हेंटीव मेन्टेनन्स कधीपण चांगला असं वाटतं मला तरी.
21 Jun 2013 - 2:06 pm | पैसा
काही शंका मागच्या वेळी लिहिल्या होत्या, आताही लिहिते.
१) अॅन्जेलिनाने फक्त स्तनांच्या काही भाग काढून रिप्लेसमेंट केली आहे असे वाचले. रिप्लेसमेंट करताना काही कॄत्रिम द्रव्ये वापरली असणार. त्यांच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता राहतेच ना?
२) माझ्या आईच्या घरात तिच्यासकट दहा एक जणांना (जवळचे नातेवाईक) वेगवेगळे कॅन्सर झाले आहेत. त्यापैकी वाचलेले फारच थोडे आहेत. एक नशीबवान माझी आई. तिचे स्तनाच्या कॅन्सरचे ऑपरेशन झाले तेव्हा डॉक्टरनी मलाही सावध रहा असे सांगितले होते. पण स्तनाचाच कॅन्सर होईल असे काही नक्की सांगता येते का? समजा असे ऑपरेशन केलेच तर उद्या दुसरा कसला कॅन्सर होणार नाही कशावरून?
३) तेव्हा डॉक्टरांशी झालेल्या बोलण्यातून रजोनिवृतीपूर्वी स्तनाचा कॅन्सर झाल्यास ओव्हरीज सुद्धा काढून टाकतात असे ऐकले होते. अॅन्जेलिनाने तसे काही करून घेतल्याचे ऐकले नाही. मग ओव्हरीच्या कर्करोगाची शक्यता स्तन काढून टाकून कशी कमी होईल?
४) ८ पैकी एका स्त्रीला स्तनाच्या कर्करोगाचा धोका असतो तर ६ पैकी एका पुरुषाला प्रोस्टेट ग्रंथींच्या कर्करोगाचा धोका असतो असे कुठेतरी वाचले होते. (आकडे चूक असू शकतील, पण प्रमाण मोठे आहे हे नक्कीच.) तर पुरुषांनी सुद्धा प्रोस्टेट काढून टाकण्याची शस्त्रक्रिया आधीच करून घ्यावी का?
५) ही जनुकीय तपासणी भारतात होत नाही. तिला ६० ७० हजार रुपये खर्च येतो. रिपोर्ट्स अमेरिकेतून आणवतात. तरीही अनेक स्त्रिया ही टेस्ट करून घ्यायला पुढे येत आहेत अशी काहीशी बातमी परवा पेपरमधे होती. अर्थातच ज्यांना परवडते अशाच स्त्रिया ही टेस्ट करून घ्यायला जातील. तरीही भारतात स्त्रियांच्या आरोग्याबद्दल एकूणच दुर्लक्ष केले जाते त्यामुळे ही संख्या नगण्यच असेल.
६) रजोनिवृत्तीनंतर स्तनाचा कर्करोग फार धोकादायक नसतो. तेव्हा जी शस्त्रक्रिया करणे कदाचित भाग पडले असते ती लवकर करून घेणे यात फक्त नंतर टेन्शन नको एवढाच फायदा दिसतो. बाकी शस्त्रक्रियेचा त्रास वगैरे सगळे सहन करावेच लागेल. त्यातही पुढे दुवा दिला आहे तशी मतेही ऐकायला मिळतात. http://www.thehindu.com/sci-tech/health/not-all-brca12-mutations-result-...
म्हणजे ही जनुकीय तपासणी १००% बरोबर निष्कर्ष देईल असेही नव्हे.
सगळ्या मतामतांच्या गलबल्यात प्रत्येकीने आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा हे उत्तम. अॅन्जेलिनाची खाजगी बाब होती ती तिने खाजगी राहू द्यायला हवी होती. तिला प्रसिद्धी देण्यामुळे त्या सगळ्याला कोणी स्पॉन्सर आहेत की काय अशी शंका नक्कीच येते!
21 Jun 2013 - 2:19 pm | सौंदाळा
कॉलिंग डॉ. सुबोध खरे..
हॅलो..हॅलो..
21 Jun 2013 - 3:04 pm | सस्नेह
तक्षकाची गोष्ट आठवली. अखेर गाठायचे तिथे 'तो' कसंही गाठतोच ! तुम्ही शर्थीचे परीक्षित झालात तरी...
21 Jun 2013 - 4:08 pm | अनिरुद्ध प
डो.सुबोध खरे यान्नी मार्गदर्शन करावे हि विनन्ती.
21 Jun 2013 - 4:16 pm | गवि
सहमत.
कारण वरील सर्व मतं ही मुळात अनेक गृहीतकं धरुन दिलेली आहेत:
-अशा जेनेटिक टेस्टिंगमुळे (सर्व नाही तरी ठराविक प्रकारच्या) कॅन्सरची शक्यता बर्यापैकी अचूक वर्तवता येते
-निरोगी असताना स्तन काढून टाकल्याने किमान स्तनाच्या कर्करोगाची शक्यता जवळजवळ नाहीशी होते (इन जनरल -शस्त्रक्रियेने अवयव काढून टाकणं हा मार्ग ज्या प्रकारच्या कर्करोगांना फीजिबल आणि परिणामकारक आहे त्या कर्करोगांबाबतच ही सर्व चर्चा संभवते.)
-या सर्व चाचण्या या सध्या नवीन असल्याने महाग आहेत आणि बर्याच वर्षांनी का होईना पण भविष्यकाळात त्या अनेकांच्या आवाक्यात येतील.
ही गृहीतकंच चुकीची असतील तर (निदान माझंतरी) मतही चुकीचं ठरेल.
21 Jun 2013 - 7:27 pm | अजो
गविंचा प्रतिसाद आवडला.
अँजेलिना ही प्रचंड मोठी सेलिब्रिटी असल्याने पापाराझी, आक्रमक पत्रकार हे सदैव अशा बातम्यांच्या मागे कुत्र्यासारखे असतात. अशा बातम्यांचं आर्थिक मूल्य इतकं मोठं असतं की अँजेलिनाने अन्य कुठूनतरी हे सर्व वेड्यावाकड्या पद्धतीने बाहेर येणारच याची खात्री बाळगून त्यापेक्षा खुद्द स्वतःच समोर येऊन हे जगाला सांगण्याचा निर्णय घेतला असावा हे स्पष्ट दिसतं..>>>+100