सकाळी मुलांना शाळेत सोडुन आले तर दारात डेव्हीड उभा. जरा त्रस्त.
हा माझा शेजारी. वय वर्षे ८९. कॅन्सरन कृष झालेलं शरीर. एकेकाळी म्हणजे दुसर्या महायुद्धात एअरफोर्स मध्ये असणारा हा वैमानिक ब्रिटन मधुन ऑस्ट्रेलियन फोर्स मध्ये पाठवला गेला. जवळ जवळ सार जग फिरुन झालय याच त्या नोकरीत. फार मिश्कील प्राणी. सत्तावीस भाषेत तो You look beautiful! I love you! :-) म्हणु शकतो. का? कशासाठी? तर म्हणे जेंव्हा तेंव्हा फिरतीवर असल्याने पोरी गटवायला वेळ मिळायचा नाही म्हणुन जेथे जाइल तेथे ही दोन वाक्य शिकायची अन पोरींना इम्प्रेस करायच. आता किती जणी इंप्रेस झाल्या देवजाणे पण जी एक याच्या प्रेमात पडली तिने याला सर्वात पहिल्यांदा पाहिले ते हा घाबरला असताना. प्रत्येक वैमानिकाला तेंव्हा लसी टोचुन घ्याव्या लागत अन आकाशात भरारी मारणार्या या वैमानिकाला इंजेक्शनच्या सुईकडे पाहुन घाम फुटला होता. अन त्या घाबर्याघुबर्या वैमानिकाला पाहुन ही बया खो खो हसत राह्यली. तिला अद्दल घडवायला मग या पठ्ठ्याने तिला जी आपल्या बरोबर बांधुन ठेवली ती आजतागायत.
मी गाडी ड्राइव्ह वे वर घुसवली तर हा गडबडीने माझ्या खिडकीशी आला. म्हण्टल,"काय गडबड?" तर अगदी अजीजीने म्हणाला "माझी कार सुरु होत नाही आहे. कालच सर्वीसींग करुन आणलीय. सर्वीसींग करणारे कार मोडुन कधीपासुन द्यायला लागले माहीत नाही पण आत्ता या क्षणी अर्ध्या तासात आर्लेटची सर्जरी आहे. अन मला तिथे पोहोचायच आहे."
म्हंटल "बंदी हाजीर है।" मी हिंदीत बोलुनही त्याला मी काय म्हणतेय ते समजल. गडबडीने आर्लेट्ला आणायला तो पळाला.
हळु हळु दुखरी पावल टाकत आर्लेट गाडीत बसली. त्यांना हॉस्पीटलमध्ये पोहोचवल्यावर, उतरता उतरता आर्लेट माझ्याकडे वळली अन म्हणाली," ओपन्न्ना आय वील टेल यु वन थिंग, नेव्हर गेट ओल्ड!"
गप बसले. तसही बोलायला तोंड उघडल असत तर डोळ्यांनी काठ सोडला असता पापणीचा. इतकी वेदनेत होती आर्लेट.
आता इतक सगळ होउनही घरच सगळ काम हे दोघेच करत असतात. मी घरी आले अन माझ्या लक्षात आल, आता आर्लेट घरी येउन डीनर बनवु शकणार नाही. माझे भारतिय पदार्थ त्यांच्या औषधाच्या मार्याने थकल्या जीभेला सोसत नाहीत. मग गुगल्या देवाला साकड घातल, अन त्यात ही रेसीपी मला आवडली. मग दोन तास खपुन तयार केली. संध्याकाळी नेमका डेव्हीड दारात फुलांचा गुच्छ घेउन उभा. थँकींग फ्लावर्स फ्रॉम आर्लेट! मग त्याच्या हातात हा ग्नॉकी भरलेला डबा खुपसला. आम्ही खाऊ नाही शकत म्हंटल्यावर मी हे नाव सांगायचा प्रयत्न केला तर पठ्ठ्या माझीच शाळा घेउ लागला. दारात उभा राहुन नाक आक्रसुन आक्रसुन "ग्न्यॉक्खी" अस वारंवार म्हणायला लावुन वर मिटक्या मारत डबा घेउन पसार झाला.
तर मंडळी मी स्वतः सुद्धा हा पदार्थ खाउन इतकी खुषावले की काय सांगु?
अर्थात जीभेला काहीही चांगले लागले की पहिला मिपावर शेअर करायचे हे ठरलेले. तर मंडळी हाजीर आहे इटालीयन रेसीपी ग्न्यॉक्खी! म्हणा बघु? आधी शिंक आल्यासारकह नाक आक्रसायच अन मग म्हणायच "ञॉ" त्यात "ग" असुन नसल्यासारखा मिसळायचा म्हणजे 'ग' चा नुसता धसका आला पाहिजे, अन मग 'क' म्हणता म्हणता त्यात परत "ख' मिसळायचा.
हे जमल की सामान जमवा.
तर साहित्यः-
पास्ता साहित्य.
५०० ग्रॅम बटाटे.
४ अंड्याचे नुसते पिवळे बलक (अंडी नको असतील तर मोठे ४ चमचे[टेबस्पुन] क्रिम घ्या. प्रोटीन मिसळले बास)
१/२ कप पामेर्सान चीज (खिसलेले)
१ लहान चमचा मिठ
१/२ लहान चमचा काळी मिरी पावडर
१ कप मैदा
भाजी बनवण्यासाठी
३०० ग्रॅम मिक्स भाज्या (मी कॅप्सीकम वापरली होती. पण झुकुनी अथवा फ्लॉवर चालेल)
६० ग्रॅम अन्साल्टेड बटर (मोठ चमचा भरुन घ्या. काही मोजायची गरज नाही)
१०० ग्रॅम चेरी टोमॅटोज (घाला अथवा न घाला)
३ लसणाच्या पाकळ्या (आमचे लसुण हेऽऽ मोठे असतात. आपला भारतातला लसुण घ्यायचा तर अरांउंड ९ पाकळ्या घ्या) अरड्या भरड्या कापुन घ्या.
१ टेबलस्पुन फोडणी साठी तेल. (मी ऑलिव्ह ऑइल वापरते. छान लागत)
१ टेबलस्पुन लेमन ज्युस (ऑपश्नल. मला आवडला नाही)
थोडी कोथींबीर भुरभुरायला. अन परत थोड चिज वरुन भुरभुरायला.
हुइ गवा!
आता कृती:-
बटाटे ओव्हनमध्ये साधारण १८० डीग्रीजवर ४०-५० मिनिटे भाजुन घ्या. नाहीतर मावेत फार सुरकुत्या न आणता भाजता आले तर पहा. मला वाटतय गेसवर भांड्यात घालुन सुद्धा रोस्ट होउ शकतील. फक्त पाण्याशिवाय बटाटे भाजुन घ्या.
जरा थंड झाले, की सोलुन छानसे किसुन घ्या. आता या किसात, चार मोठ्या अंड्याचे नुसते पिवळे बलक, मिरपूड, मिठ अन पारमेसान चिज मिसळा.
१ कप मैद्यातला ३/४ मैदा पण या मिक्स्चर मध्ये मिसळा. अगदी हळुवार हाताने हे सगळ मिक्स्चर एकत्र करा. फार मळायची गरज नाही. बटाट्याचे किसलेले नाजुक तुकडे तसेच राहु द्या इतका हलका हात असला पाहिजे. एक साधारण अर्धा तास हे मिश्रण रेस्ट करा. या मिश्रणाचे चार भाग करुन घ्या.
आता एका पाटावर उरलेला मैदा शिवरुन घ्या. (डस्ट करा एखादा सरफेस) अन त्यावर या मिश्रणाचा गोळा ठेवुन लांबट आकारात रोल करा. हाताला चिकटु नये म्हणुन मैद्याच्या हाताने लांबट रोल करा.
आता पापडाच्या लाटी एव्हढे तुकडे करुन घ्या या रोलचे. असे सगळे तुकडे करुन झाले की एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवा. पाण्यात मिठ घाला. एकदा पाणी उकळु लागल की त्यात या लाट्या सोडा. शिजल्या की या लाट्या (आता पास्ता म्हणायच) वर तरंगायला लागतात. आणखी दोन मिनिट तशाच शिजवुन मग झार्याने काढुन घ्या.
आता हा ग्न्यॉक्खी पास्ता तयार झाला. डेव्हीडसाठी बनवताना मी हे सार एका दमात केल होत. पण त्या नंतर शहाणी झाले अन मग नुसता हा पास्ता मी आदल्या दिवशी तयार करुन घेते. जेंव्हा हवा तेंव्हा फ्रिज मधुन काढुन फोडणी घातला की खायला तयार. नो वेटींग.
भाजी बनवायची कृती:-
एका शॅलो पॅन मध्ये (कढई) तेल गरम करा. त्यात सगळ्या भाज्या घाला. जास्त स्टर न करता या भाज्या जरा कॅरमलाइझ होउ द्या. आता त्यात बटर घाला.
वरुन मिठ अन मिरपूड घाला. तयार झालेला ग्न्यॉक्खी पास्ता त्यात घाला अन न हलवता तशीच वाफ येउ द्या. पास्त्याला पण साधारण एका बाजुने ब्राउन कलर येउ द्या. अन मग थोड स्टर करा. आता .....होऽऽ आता या मिक्स्चर मध्ये वरुन ती अरडीभरडी कापलेली लसुण टाका. जरा कढई हलवलीत तर ती लसुण तळाला पोहोचेल अन या क्षणी असा सुंदर फ्लेवर येतो की ही रेसिपी वाचुन इटालियन लोकांना फोडणी कळत नाही अस वाटणारी मी क्षणात दिवानी झाले या रेसिपीची.
आता हवे असतील तर चेरी टोमॅटो अर्धे कापुन घाला. गॅस बंद करा. वरुन कोथिंबीर अन हवा असेल तर लेमनज्युस स्प्रिंकल करुन सर्व करा.
(शेवट पर्यंत लेखन वाचल्याबद्दल धन्यवाद)
प्रतिक्रिया
24 May 2013 - 8:51 am | अत्रन्गि पाउस
वाचल्या सारखे वतते आहे...
24 May 2013 - 8:59 am | पैसा
अपर्णा स्टायल. अंगणात बसून गप्पा मारत सांगितल्यासारखी पाकृ! फक्त गरम असताना चांगली लागेल असं वाटतंय. भाजी तशी सोप्पी आहे. पास्ता करून बघायला पाहिजे.
24 May 2013 - 9:16 am | प्रचेतस
वा!!!!
एकदम न्यारी पाकृ आहे.
24 May 2013 - 10:06 am | सौंदाळा
मस्त पाकक्रुती!!
डेव्हीड आजोबांचे व्यक्तीचित्र पण छान.
अजुन हटके पाकक्रुती आणि लेख येवू द्या.
24 May 2013 - 10:09 am | मोदक
खतर्नाक!!!!
ओ बुवा.. प्लीज लाळ गाळणारी स्मायली टाका हो इकडे.
24 May 2013 - 10:13 am | मदनबाण
कहाणी आणि पाकॄ आवडली...
एक प्रश्न ! हल्ली काही पाकॄ मधे कढई किंवा इतर भांड्यांतील पदार्थ हलवण्याचा डाव हा प्लास्टीकचा वाटतो / दिसतो...नक्की तो प्लास्टीकचाच असतो काय ?
24 May 2013 - 10:33 pm | रामपुरी
सिलिकोनचा असतो. न जळणारा लवचिक आणि सर्व भांड्यात चालू शकेल असा मऊ...
25 May 2013 - 9:58 am | मदनबाण
ओक्के. थांकु. :)
24 May 2013 - 10:20 am | पिलीयन रायडर
पदार्थ छानच असणार..
पन तु तो त्या आजी - आजोबांसाठी बनवला आहेस त्यामुळे तो जास्त भावला...!!
24 May 2013 - 10:23 am | nishant
जबरदस्त लेखन आणि पाक्रु...
24 May 2013 - 10:43 am | चाणक्य
२ जुन ला दहावा आहे माझा.
24 May 2013 - 10:50 am | सस्नेह
पाकृ, ती करण्यामागची भावना अन फोटो सारखेच देखणे !
आजी-आजोबांना शुभेच्छा !
24 May 2013 - 11:47 am | आदूबाळ
आहाहाहाहाहाहाहा.............
24 May 2013 - 11:58 am | मालोजीराव
बराच वेळ नावच वाचता आलं नाही…हे जे काही आहे मस्त झालय
24 May 2013 - 12:40 pm | प्यारे१
आपातै की जय.
पाकृ करतच नाही नुसती तर पाकृ भरवते सुद्धा.
पोरं नि नवरा पण मस्त जेवत असणार हिच्या स्टोर्या ऐकत.
मस्त लिहीलं आहेस गं!
24 May 2013 - 1:56 pm | पिंगू
न्यॉकी भारीच आहे.
24 May 2013 - 1:58 pm | श्रिया
लेखन, पाककृती आणि फोटो! एकदम मस्त!
24 May 2013 - 2:13 pm | Mrunalini
मस्त पाकृ... हे ग्न्यॉकी कधी खाल्ले नाही. एकदा ट्राय करायला पाहिजे.
24 May 2013 - 2:19 pm | सुहास झेले
जबरीच ... :) :)
24 May 2013 - 2:39 pm | अजो
मस्त पाकृ. न्योकी खाल्ली आहे पण नेहमी टोमेटो सॉस मधेच. भाज्यान सोबत अत्ता try करेल.
24 May 2013 - 2:47 pm | चित्रगुप्त
"मस्त दिसतोय हा पदार्थ"... असं आताच मी टंकवतो, तोच हिनं सांगितल्याप्रमाणे कूलर मधे पाणी घालायला मी अंगणात गेलो, आणि आत आल्या आल्या:
"अहो, पटकन जाउन जरा पामेर्सान चीज, चार अंडी, अन्साल्टेड बटर, १०० ग्रॅम चेरी टोमॅटोज आणि लेमन ज्यूसची बाटली घेऊन येता का?
'येता का' चा अर्थ 'आत्ताच्या आत्ता घेउन या' हे अनुभवाने शिकलेला मी:
"अगं आता भर उन्हाळ्यात अंडी कशी मिळणार? असली, तरी शिळी असतील".
"अहो, संडॅ हो या मंडॅ, हल्ली वर्षभर अंडी मिळतात. लवकर निघा.
मी: "आणि ते 'अनसाल्टॅड बटर' म्हणजे साधं लोणीच नं, आहे की घरात, आजच केलेलं, आणि लिंबू पण आहे...
"अहो एवढ्या अमेरिकेत राहणार्या बाईंनी लिहिलंय, काहीतरी फरक असेलच ना त्यात."
आणि ते 'पामेर्सान चीज' आणि 'चेरी टोमॅटोज' कुठे मिळणार आपल्या या कुग्रामात?
" अहो जा तर खरे बाजारात, मिळेल. तोपर्यंत मी बटाटे भाजायला घेते...
'त्या' प्रसंगानंतर पाकृ. चा धसका घेतलेल्या मला आता भर उन्हात सायकल पिटाळत निघावं लागणार. जय मिपादेवा. जय पाकृदेवी.
26 May 2013 - 1:08 pm | स्पंदना
सॉरी हो चित्रगुप्त, उगा या कारणाने माझ्या खात्यात काय उण बीण नका करु हं.
एकुण खायला मिळालेला दिसतो आहे पास्ता.
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
26 May 2013 - 9:41 pm | चित्रगुप्त
तुमची पाककृती एकदम झकास आहेच, त्याशिवाय ती करण्यामागील भूमिका जी तुम्ही सांगितलीत, ती अगदी र्हदयस्पर्शी आहे. वृद्ध लोकांना कुणी आपुलकीनं अशी मदत करणारे हल्ली भारतात सुद्धा दुर्मिळ झालेत.
बाकी आमचा थोडा टवाळखोरपणा चालवून घेतलात, हे पण आवडलं.
शुभेच्छा.
24 May 2013 - 4:06 pm | सानिकास्वप्निल
भन्नाट लेखनशैली आणी +१ पाकृ :)
न्यॉकी विथ बेसिल-टोमॅटो सॉस आवडतं पण असे सगळ्या भाज्या घालून कधी खाल्ले नाही ...आता करुन बघेन फ्रॉम स्क्रॅच :)
धन्स अपर्णा ताई.
24 May 2013 - 4:50 pm | रेवती
शेवटचा फोटू भारी आलाय. पाकृहीही आवडलीच. मलाही एकदा अंडी न घालता न्यॉकी करून बघायची आहे.
24 May 2013 - 7:02 pm | इनिगोय
ओपन्ना.. तुझं लिहिणं जास्त टेस्टी की रेसिपी?
आर्लेटला शुभेच्छा.. :-)
24 May 2013 - 8:55 pm | गौरीबाई गोवेकर
मस्त पाककृती.
24 May 2013 - 10:38 pm | रामपुरी
" ओपन्न्ना आय वील टेल यु वन थिंग, नेव्हर गेट ओल्ड!"
.
.
... नि:शब्द
25 May 2013 - 2:48 am | प्रभाकर पेठकर
वेगळीच पाककृती. करून पाहण्यात येईल.
25 May 2013 - 2:55 am | यशोधरा
करुन पाहीन. मस्त अहे पाकृ आणि ज्या प्रकारे तू शेजार्यांचीसुद्धा काळजी घेतेस ते अधिक भावलं. शाणी, गुणाची पोग्गी :)
25 May 2013 - 10:49 am | विसोबा खेचर
मस्तच.. :)
25 May 2013 - 11:28 am | दिपक.कुवेत
नाव जेवढं कठिण आहे तेवढि पाकॄ दिसत नाहि. असो नक्किच करुन बघेन. अशाच सोप्प्या आणि चविष्ट पाकॄ अजुन येउदेत अर्थात खुशखुशीत लेखनासहित!
26 May 2013 - 1:10 pm | स्पंदना
सर्वांना मनापासुन धन्यवाद.
पाककृती करताना जे मनात समाधान नांदत होत ते तुमच्या पर्यंत पोहोचलेलं दिसतय.
आभारी आहे.
26 May 2013 - 1:24 pm | त्रिवेणी
ताई खुप मस्त. आजी आजोबाना गेट वेल सुन.
26 May 2013 - 9:24 pm | अत्रुप्त आत्मा
वेगळीच पा.कृ... मस्त :)
11 Jul 2013 - 12:15 am | इष्टुर फाकडा
या वाक्याचा इतका सुंदर प्रत्यय आला कि विचारू नका. पाक्रु एक नंबर, तुमचे लिखाण चार चांद !! मझा आला :)
11 Jul 2013 - 5:08 pm | नि३सोलपुरकर
आय वील टेल यु वन थिंग...पाककृती एकदम झकास आहे आणी ती करण्यामागील भूमिका......
तुस्सी ग्रेट हो यार. किप ईट अप.
12 Jul 2013 - 12:51 pm | बॅटमॅन
आईचा घो........कस्ला कातिल फटू तेच्यायला!
13 Jul 2013 - 11:11 am | मैत्र
ओपन्ना तै.. मस्त पाकृ.. खाऊन पाहिला आहे पदार्थ.. अर्थात स्वतः केलेला नाही.. कँटीनमधला.
थोडा ब्लँड असल्याने तितका रुचला नाही.. पण आहे छान.. पाकृ माहीत नव्हती..
पैसा तै म्हणते तसा गरम असतानाच चांगला लागेल.
डेव्हिड / आर्लेट अप्रतिम..
आणि इटालियन लोकांना फोडण्या कळत नाहीत ? मला तर वाटतं की आपल्यासारखं तेल तापवून मेटलच्या भांडयांमध्ये लसूण, सनड्राईड टोमॅटो, आलं, आणि इतर गोष्टी घालून एकदम व्यवस्थित फोडणी करून मग पदार्थ करणारे हेच लोक.. इतर cuisines मध्ये अशी पद्धत पाहिली नाही.. (चुभू देघे)
20 Jul 2013 - 4:09 pm | प्राजक्ता पवार
भन्नाट लिखाण . आवडले.