शिव शिव रे काऊ। हा पिंडाचा घेई खाऊ।
"शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात् आपले प्रेतसंस्कार" या सुधारकातील लेखात आगरकर म्हणतात,
"देशपरत्वे व धर्मपरत्वे उत्तरक्रियांचे अनेक प्रकार आहेत.मेलेल्या माणसाच्या प्रेताचा चटदिशी काहीतरी निकाल लावून मी आपला मोकळा होईन असे कोणालाही म्हणता येत नाही.शवाचा निकाल लावला म्हणजे हे काम आटोपते तर त्याविषयी विशेष चर्चा करण्याची गरज पडती ना.पण या दु:खदायक कामामागे त्याहूनही क्लेशकारक अशा विधींचे दुट्टें प्रत्येक धर्माने लावून दिले आहे. हिंदूंनी हे और्ध्वदेहिक प्रकरण भयप्रद,अमंगळ व कष्टमय केले आहे.गोवर्या रचण्यापासून राख होईपर्यंत आणि नंतरसुद्धा विधीच विधी.
हे भीषण अमंगळ हिंदुधर्मा ! तुझ्या आज्ञेने स्मशानात शेकडो वर्षे आम्ही क्षौरें केली,कणकेचे गोळे करून ते प्रेताच्या अनेक भागांवर ठेवले,गळके मडके डोक्यावर घेऊन प्रदक्षिणा घातल्या,त्याबद्दल तू आम्हांस काय दिलेस?...हिंदूंनो!, तुम्ही इतके गतानुगतिक कशासाठी होऊन बसला आहांत? मनुष्याच्या जन्माला येऊन असे मेषासारखे वर्तन का करता? डोक्यात जो मेंदू आहे त्याची माती का होऊ देता? जिवंत माणसाच्या आहारास लागणारे पदार्थ तुम्ही मेलेल्या माणसास अर्पण करता याचा अर्थ काय? मृत शरीराची राख झाल्यावर त्याच्या नावाने तुम्ही जें अन्न-पाणी देतां त्याचा उपभोग कोण घेतो? आत्म्याला नाक,तोंड,पोट असे अवयव असतात का? असतील तर जिवंतपणा आणि मृतावस्था यांत भेद काय?
खुळ्यांनो! असे पोराहून पोर कसे झालांत? गरुडपुराणातील किळसवाण्या गप्पांवर श्रद्धा ठेवणार्या मूढांनो,अरबी भाषेतील चमत्कारी कथा खर्या मानून त्यांना पुराणांच्या पदवीला चढवाल तर अधिक बरें होईल.अकलेची ऐट मिरविणार्या मतिमंदांनो ’अ’ व्यक्तीचा ’ब’ हा आप्त वारला तर ’अ’ला कोणत्या कारणानें सुतकी,अस्पृश्य मानून त्याला दहा दिवस वाळीत टाकता? ’अ’चा अपराध काय? बाप मेला तर मुलानें क्षौर केलेच पाहिजे असा हट्ट का ? दाढी-मिशा काढून तोंड असोल्या नारळासारखे गुळगुळीत केलें आहे, डोक्यावरील गळक्या मडक्यातून पाण्याची धार अंगावर पडते आहे, कमरेला एक पंचा, बाकी उघडाबंब आहे, असें मुलाचें नटणें मृत बापाच्या आत्म्याला आवडतें हें तुम्हाला कसे कळले ? कुणी सांगितले?" ...(
"सुधारका"तील लेखाचा काही भाग)
.........खरें तर कुणाचा मृत्यू हा दु:खद प्रसंग.पण पिंडदान विधीत जें चालतें तें पाहून हसूं यावे. पिंड ठेवले आहेत .काकस्पर्शासाठी माणसे ताटकळत उभी आहेत.मग मृताचा मुलगा पुढे येऊन हात जोडून म्हणतो," बापू, चिंता करू नका.आत्याला आम्ही अंतर देणार नाही.शेवटपर्यंत सांभाळू."बापूंच्या आत्म्याला हे ऐकू येते.त्याच्या अदृश्य चेहेर्यावरील चिंतेचे भाव जाऊन समाधान पसरते.झाडावरील कावळ्याला हा बदल दिसतो.तो खाली येऊन पिंडाला शिवतो.हे सगळे खरे मानण्यात आपले काही चुकते आहे असे कुणाला वाटतच नाही.
माझ्या परिचयाच्या एका गृहस्थाने काकस्पर्शासंबंधीचा एक अनुभव गंभीरपणे सांगितला.तो त्याच्या शब्दांत:--"आमचे एक ब्रह्मचारी काका--म्हणजे माझ्या वडिलांचे धाकटे बंधू--आमच्याकडे राहात.ते वारले.दशक्रिया विधीला पिंड ठेवले.पण कावळा शिवेना.आम्ही दोन तास थांबलो.नाना प्रकारचे सांगणे झाले.पण व्यर्थ.काकांचे एक मित्र विधीला आले होते.ते म्हणाले की काकांना अश्लील पुस्तके वाचण्याची फार आवड होती. मी लगेच स्कूटरवरून घरी गेलो.काकांच्या खोलीतील टेबलावरील एक पुस्तक चाळले. त्यात वाचन खुण होती. म्हणजे गोष्ट वाचून पूर्ण झाली नव्हती.काकांची अतृप्त इच्छा हीच असावी हे जाणून मी ते पुस्तक घेऊन घाटावर आलो.खुणेच्या पानापुढील दोन पाने,काकांना जरा कमी ऐकू येत असे म्हणून, खड्या आवाजात वाचून गोष्ट संपवली. तुम्हांला सांगतो, दोन मिनिटात कावळा शिवला ."
काकांच्या आत्म्याला आपण सद्गती दिली याची कृतकृत्यता त्या गृहस्थाच्या चेहर्यावरून ओसंडत होती....(हा अनुभव ऐकून एक कल्पना सुचली की अनेकांचे असे अनुभव असतील. त्यांचे संकलन केले तर "काकस्पर्श अनुभव बृहत् कोश" सिद्ध होऊ शकेल.त्यात "त्वरित काकस्पर्शासाठी अकरा वचने आणि तेरा सूत्रे "समाविष्ट केली आणि कोशाच्या प्रती पिंडदानाच्या ठिकाणी मिळण्याची व्यवस्था केली तर त्याचा खप घाटोघाट होईल.मात्र अनुभव काल्पनिक नसावे.घाटावर जाऊन,लोकांना भेटून,त्यांना बोलते करून अनुभव संकलित करावे.म्हणजे कोश रंजक होईल.)
कल्पना करा की असले अंत्यविधी प्रकार आपल्याकडे नाहीतच. समजा आफ्रिकेतील एका जमातीत थेट असेच प्रकार रूढ आहेत.एका मराठी मासिकात "ऐकावे ते नवलच!" या सदरात त्या पिंडदान विधीची साग्रसंगीत माहिती छापून आली.आबांनी ती वाचली. तर ते म्हणतील, "काय हे घोर अज्ञान! मृताचा आत्मा तृप्त आहे की नाही ते कावळ्याला समजते म्हणे! एकविसाव्या शतकात कोणी हे खरे मानत असेल यावर विश्वास बसत नाही." यावर तात्या म्हणतील," म्हणजे तुम्हाला हे खरे वाटते की काय? अहो, हे संपादक लोक मासिकाची पाने भरण्यासाठी काही मनात येईल ते छापतात.काल्पनिक लिहावे. पण ते थोडेतरी खरे वाटेल असे असावे. आप्तांची आश्वासने काय,काकस्पर्श काय ,सगळे काल्पनिक.असले कधी कुठे असते काय? आफ्रिकेतील जमात असली म्हणून काय झाले? लोक इतके मूर्ख असणे शक्य नाही. आपले गंमत म्हणून वाचायचे झाले."
आज आपल्याकडे हे वास्तव आहे .प्रत्यही घडते आहे.अशा श्रद्धावंतांना सव्वा शतकापूर्वी "खुळ्यांनो,असे पोराहून पोर कसे झालांत? "असा प्रश्न आगरकरांनी विचारला तो आजही विचारणे योग्य आहे.
***************************************************************************************
प्रतिक्रिया
22 May 2013 - 11:09 pm | अत्रन्गि पाउस
कि कावळा शिवणे हे थोतांड आहे..
पण मग त्या ठिकाणी
फक्त कावळेच कसे येतात? काही मिलीमीटर वर कित्येक वेळ घुटमळणारे कावळे (१ किंवा अनेक) एका विवक्षित वक्तव्या नंतर अचानक पिंडावर तुटून कसे पडतात??
ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिरातील त्या स्थानी थोडेसेच बाजूला शेकडो कबुतरे दाणे टिपत असतात त्यातील एकही ह्या बाजूला फिरकतही नाही हे कसे ?
परंतु त्याचबरोबर आपल्या हिंदू अंत्यविधींमध्ये भेसूरपण कमी करायला पुष्कळ वाव आहे..
विषय नाजूक आहे म्हणा !!!
धागा वाढल्यास अजून मुद्दे मांडीन म्हणतो...
23 May 2013 - 2:05 am | रामपुरी
"विवक्षित वक्तव्या नंतर अचानक पिंडावर तुटून कसे पडतात?"
त्याला 'योगायोग' असे म्हणतात. काहीही असंबद्ध वक्तव्ये जरी केली तरी कुठल्यातरी वाक्याला कावळा अन्नावर तुटून
पडेलच.
"त्यातील एकही ह्या बाजूला फिरकतही नाही हे कसे ?"
कावळ्यांची झुंड फिरकू देत नसावी. दोन चारच कावळ्यांनी घारीला सुद्धा अन्नाजवळून पळवून लावल्याचे पाहीले आहे.
23 May 2013 - 12:47 am | उदय
जानेवारीमध्ये माझी आई गेली. तिने आणि माझ्या वडिलांनी ठरवल्याप्रमाणे आम्ही तिचे देहदान केले. त्यानंतर कुठलेही धार्मिक विधी केले नाहीत. (मी केसही कापले नाहीत.) विधींसाठी खर्च करण्याऐवजी वडिलांनी अनाथ मुलींच्या एका शाळेत त्यांना १ दिवसाचे जेवण दिले. (केवळ १ दिवस जेवण देऊन काय होणार आहे, म्हणून मी त्याच्याशी सहमत न्हवतो, पण ते म्हणाले की त्यांचा किमान १ दिवस तरी चांगला जाऊ दे, म्हणून त्यांना गोडाचे जेवण दिले). त्या ऐवजी मी महर्षी कर्वे यांच्या शाळेत २ विद्यार्थींनींना दत्तक घेतले. (माझी आई अनाथ होती आणि त्या शाळेत शिकली होती म्हणून). अर्थात १ नातेवाईक मला म्हणाले सुद्धा की तू पैसे वाचवायला आईचे देहदान केलेस आणि धार्मिक विधी केले नाहीस. सांगायचा मुद्दा इतकाच की इतर काही केल्याने सुद्धा समाधान मिळते, जे कावळा पिंडाला शिवल्याने मिळाले असते.
23 May 2013 - 1:16 am | बॅटमॅन
टर्मिनॉलॉजिकल अप्रोप्रिएटनेसच्या हव्यासातून लिहिलेला लेख वाटतोय.
23 May 2013 - 2:30 am | प्रभाकर पेठकर
अत्यंविधी करण्याऐवजी देहदान अथवा अवयव दान करावे ह्या मताचा मी आहे.
कांही विधींमागे तार्किक कारणे असावित पण बर्याच रुढी ह्या वाहवत गेलेल्या विचारांनी जन्मास घातल्या आहेत असे वाट्ते.
'आत्याचा सांभाळ करेन, धाकट्याचा सांभाळ करेन, बहिणीला एकटी पडू देणार नाही' वगैरे जाहिर आश्वासनांमुळे 'थोरल्या'च्या खांद्यावर॑ कांही नैतिक जबाबदारी आहे ह्याची जाणिव आणि मुख्य म्हणजे स्विकार अधोरेखित होऊन तो त्या जबाबदारीस बांधला जातो. 'आत्म्यास' दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रयत्नशिल राहतो आणि कुटुंबातील एखाद्या दुर्बल सदस्याचे 'आई किंवा वडिलांच्या' भूमिकेतून रक्षण होते. आई किंवा वडिलांची आपल्या मुलांच्या भविष्याशी निगडीत भावना आणि एखाद्या भावाची इतर भावंडांप्रती असणारी भावना ह्यात फरक असू शकतो. तो राहू नये हाच उद्देश ह्या पाठी असतो.
23 May 2013 - 3:48 am | अनिवासि
पिंडाला कावळा शिवावा म्ह्णुन 'मी हे करेन - मी ते करेन' अशी आश्वासने देणे म्ह्णजे स्वीकार करणे असा अर्थ कसा होतो? अशी जबाबदारी म्रुत्तु पुर्वीच माहीत असली पाहीजे ( अचानक म्रुत्यु अपवाद). आणि असे आयत्या वेळी दिलेले अश्वासन पुढे पाळले नाही तर काय?
23 May 2013 - 6:46 am | स्पंदना
नक्की काही माहीती नाही,पण एक दोनवर्षापुर्वी काका वारले. मी पोहोचु शकले नाही म्हणुन जन्मात पहिल्यांदाच पंचगंगेच्या घाटावर गेले.
किती जवळ जवळ असतात सारे (काय म्हणायच?) चिता, रक्षा?//???
व्हॉटेव्हर...तर आमच्या बाजुला एका कुटुंबाचा अगदी तासा झाला तरी कावळा शिवला नव्हता. सगळेजण अगदी बसले होते खाली जमिनीवर. त्यांच्याच बाजुला लागुनच आमचे नैवेद्य ठेवले होते. नैवेद्य ठेवुन बाजुला होण्याआधी कावळा खाली येउन शिवुन गेला. तरीही अगदी लागुन असलेला तो दुसरा नैवेद्य तसाच अस्पर्श होता.
बाकिच्या सार्या कर्मकांडाची मला माहीती नाही, पण गावी एका अतिशय गरिब घरातला वेडा मुलगा वारला. आई विधवा. ती ही आजारी होती, अन समशानात स्त्रीया जात नाहीत, म्हणुन घरातच होत्या त्या. पण तिसर्या दिवशी सारे कावळे त्यांच्या घरावर. एकही स्मशानात नाही. शेवटी त्यांना अक्षरशः हाताला धरुन चालवत नदीकडे आणल तर कावळे त्यांच्या मागुन जात असलेली मी पाहिले. त्या कश्याबश्या थोडं अंतर चालल्या जिथुन राख दिसत होती तेथुन त्यांनी हात जोडले, अन कावळे मग नदीवर गेले. हे स्वतः पाहिलेले आहे.
मला प्रश्न पडतो, आज मी अशी वेगळ्या भुमीत रहाते, इकडच्या कावळ्यांना माझ मन माझ्या मृत्युनंतर समजेल का? देव जाणे.
कान्ट अॅक्सेप्ट, कान्ट डिनाय. जेंव्हा हे सगळे विधी बंद होतील तेंव्हा असल काही घडायचही बंद होइल.
तरीही अनाथाश्रमातल्या दोन मुली दत्तक घेणे आवडल.
23 May 2013 - 8:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वालावलकरशेठ, सामाजिक सुधारणेचा विचार नेहमीप्रमाणे आपण तर्कसंगत मांडला आहे. बाकी, धर्मग्रंथातील पारंपरिक विचार आणि व्यर्थ धार्मिक सोहळ्यांचा व्यर्थ अर्थ जेव्हा आधूनिक लोकांना जसजसे समजत जाईल तसतसे बदल होत जाऊन याचे प्रमाण कमी होईलच.
बाकी, वालावलकरशेठ या विधीच्या वेळेस 'शिव शिव रे काऊ' चा अनुभव मोठे गमतीशीर असतात. माझ्या सासर्याचे महिनाभरापूर्वी निधन झाले. सासर्याची आणि माझी मैत्री लैच भारी. सरकारी कार्यालयातून कारकून म्हणून निवृत्त झालेले. आणि अशात खूप थकलेही होते. आपली एक लेक प्राध्यापकाला दिलेली असल्यामुळे त्यांना तर प्राध्यापकाचा खूपच अभिमान वाटायचा, येता जाता पै पाहुण्यांना आमचं कौतुक गिरवायचे. आणि माझाही मूड झाला की मीही त्यांना बाईकवर पोरं कशी भन्नाट गाडी चालवतात तसं त्यांना सुसाट फिरवायचो, ते घाबरायचे, मला मौज वाटायची. बीबी का मकबर्याजवळ उभ राहून मित्रांसारखे फोटो काढायचो. एकूणच काय मी त्यांची खूप गम्मत करायचे. एखाद्या स्टार हॉटेलात त्यांना एखादे दोन पेग पाजायचो आणि ते नॉर्मल होईपर्यंत (सासूला लै घाबरायचे ते) कंपनी द्यायचो. असो.
तर त्यांचे निधन झाले. करता सवरता मी असल्यामुळे आणि जावयाच्या अधिकारात दोन तासापर्यंत जे पै पाहुणे येतील ते येतील आम्ही कोणासाठी थांबणार नाही, असे स्पष्ट सांगितल्यामुळे सर्व अंत्यविधी लवकर झाले. (खरं तर अंत्यविधीच्या विविध प्रकारावर एक स्वतंत्र धागा काढायला हवा) आणि नेहमीप्रमाणे 'शिव शिव रे काऊचा' प्रसंग आला. आम्ही हजर होतो. विधी करणार्यांनी ते भाताचे गोळे आणि काय काय असेल ते ठेवले. चांगले झाडं बिडं पाहून त्याखाली हा विधी चाललेला होता. काकस्पर्श लवकर कुठे होतो हे बहुतेक ते विधी करणार्याला पक्के माहिती होते त्यामुळे कावळे कुठे लवकर येतात तिकडेच तो आम्हालाही घेऊन गेला होता. विधी चालू होते तेव्हा कावळे झाडावर मला दिसले होते. विधी पूर्ण झाला आणि तो म्हणाला अमूक अमूक म्हणा आणि इथे पाणी टाका. लेकी मनातल्या मनात काही म्हणल्या असतील. मग मलाही जवळचे नातेवाईक म्हणू लागले तुम्हीही मनोमन म्हणा. माझा पडला मिश्किल स्वभाव. कावळे आम्ही उठून जाण्याची वाट पाहात आहेत, हे समजून घेऊन मी सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणालो. बरं का सासरेबॉ, आपली पेंशन जोपर्यंत मिळत राहील तो पर्यंत जावयाचा यथेच्छ पाहूणचार जो होत होता तो अधिक जोमाने यापुढे होईल. कपडे लत्ते सणासुदीला होतील. काय लागलं सवरलं ते सर्व आपल्या पेंशनमधून आम्ही करुन घेऊ, काही काळजी करु नका. निवांत राहा. आम्ही उठलो आणि योगायोगाने काकस्पर्श झाला. दु:खाच्या प्रसंगात सर्वांच्या चेहर्यावर मी हसु फुललेले पाहिले.
सालं मी हे लिहितोय खरं पण लिहिता लिहिता.....मला सासर्याची खूप आठवण येतेय . :(
-दिलीप बिरुटे
23 May 2013 - 8:24 am | चौकटराजा
माझी आई ८५ व्या वर्षी हे जग सोडून गेली. पुण्यातील नातेवाईकांच्या सोयीसाठी मी चिंचवड येथे दहावा न करण्याचे ठरविले.त्यासाठी पुणे येथील ओंकारेशवर घाट हे ठिकाण ठरले. माझा स्वता: चा या पारलौकिकावर अजिबात विशवास नाही. मी हा विधीच ( काकस्पर्श) पूर्णपणे रद्द करण्याच्या विचारात होतो. पण आईच्या तथाकथित आत्म्यापेक्षा नातेवाईकामधील अस्वस्थ आत्म्यांचा विचार करून मी माझा बेत मागे घेतला.
चार जणांचे पिंड चौथर्यावर ठेवण्यात आले. पाच मिनिटे कावळेच फिरकेनात . मी मिश्किलपणे इतर तिघांची उलघाल मधूनच तिरक्या कटाक्षाने पहात होतो. कावळे आले चारही पिंडाभोवती उड्या मारू लागले. शिवेनात. गुरूजीनी दह्याची वाटी दिली. चारही पिंडावर दही. काही सेकंदात कावळ्यांची पसंती.
माझे निरिक्षण असे आहे की पाणवठ्याच्या जवळ हा कार्यक्रम केला तर कावळे येतातही व शिवतातही. बाकी आमक्याच पिंडाला कावळा शिवला का नाही. याचे उत्तर डब्यात आल्यावर माझ्याकडेच चेकरने पहिल्यांदा तिकिट का मागितले समोरच्याकडे का नाही? या प्रश्नाचे जे उत्तर असेल तेच.पिड खाण्याची घाई आत्म्याला नसते ससते ती जिवंताना कारण त्याना दहावा आटोपून ऑफिसात जायचे असते ना !
23 May 2013 - 8:32 am | अत्रन्गि पाउस
डूम्स डे कोन्स्पिरसी ह्या पुस्तकात गुप्तहेर प्रशिक्षणात शिकवल्या गेलेल्या एका वाक्याचा उल्लेख आहे "योगायोग नावाचा प्राणी" अस्तित्वात नसतो...विशेषतः पुनःपुन्हा घडणारे योगायोग तर नाहीच...:-)
हं कार्यकारण भाव शोधावा हे उत्तम...
23 May 2013 - 8:52 am | चौकटराजा
क्वचितच घडणार्या व कार्यकारण न समजलेल्या प्रसंगाचे उत्तर योगायोग असते. ८ ५१ ची लोकल रोज लेट येते याला कोणी योगायाग म्हणणार नाहीत. कावळा शिवायच्या बाबतीत न शिवण्याचे प्रमाण खूप कमी असते. ( रिकामटेकड्या नी ओंकारेशवारजवळ जाउन महिना भराचा डेटा अभ्यासण्यासारखा आहे !!! )
दॉ, वसंत चिपळोणकर लिखित " विज्ञानातील क्रांत्या" हे पुस्तक या बाबतीत पूर्ण विचारधारा बदलणारे ठरावे .
23 May 2013 - 8:47 am | चित्रा
आगरकरांचा लेख अलिकडच्या अनेक लेखांची आठवण करून देतो आहे. अशा लेखांची गरज अजूनही भासते हे दुर्दैव आहे.
हिंदूंनी हे और्ध्वदेहिक प्रकरण भयप्रद,अमंगळ व कष्टमय केले आहे
+१. पण त्याची कारणे/ जुन्या प्रथा असतील.
कावळ्यांनी पिंडास स्पर्श करण्याची वाट बघणे यामागे रुढीपेक्षाही कसलीशी फाजील उत्सुकता असते असे मला वाटते.
असो.
23 May 2013 - 9:31 pm | राजेश घासकडवी
यनावाला,
यात तुम्ही असं सुचवण्याचा प्रयत्न केला आहे की आपला तो बाबा, आणि दुसऱ्याचं ते कार्टं वाटतं; किंवा दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. हे इथे लागू होत नाही. माझ्या मते इतर धर्मियांत तसे दोष असतीलही, पण आपल्या धर्मियांत तसे खचितच नाहीत. :)
24 May 2013 - 1:16 pm | संजय क्षीरसागर
लेखनाचा विषय चुकीची कर्मकांडं असा आहे. लेखकानं कंपॅरिजन करायला नको होती, पण तो चर्चेचा मुद्दा नाही.
24 May 2013 - 12:58 pm | संजय क्षीरसागर
पिंडदान हा एकच विधी तसा नाही. क्रिकेटमधे भारत जिंकावा म्हणून गणपतीला साकडं घालणारेही लोक आहेत.
`आमची श्रद्धा आहे, आम्ही आमचं पाहून घेऊ' असं म्हटल्यावर चर्चा थांबते.
24 May 2013 - 4:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> क्रिकेटमधे भारत जिंकावा म्हणून गणपतीला साकडं घालणारेही लोक आहेत.
कोणत्या मिपाकरांनं अशी साकडं घातली होती हो ? :)
>>>>आमची श्रद्धा आहे, आम्ही आमचं पाहून घेऊ' असं म्हटल्यावर चर्चा थांबते.
चर्चा थांबवू नये,भली श्रद्धा असो वा नसो.
-दिलीप बिरुटे
24 May 2013 - 9:35 pm | संजय क्षीरसागर
आठवलं का?
24 May 2013 - 9:39 pm | संजय क्षीरसागर
25 May 2013 - 8:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आठवलं...! आठवलं...! मिपाकरांच्या नादाला लागून तसं बोललो होतो हे खरं आहे....! :)
हजारो वर्षापूर्वीच्या रक्तात समाजात भिनलेल्या परंपरा विधी एकदम कशा बंद होतील. विविध रुढी,परंपरा हिंदू धर्माचा पाईक म्हणून कसोशीने पाळत आलो आहोत. आता शिकलो, सवरलो थोडं ज्ञानाचा उजेड पडलाय. आता हळुहळु त्यातील थोतांडे बंद झाली आहेत. एकेक करुन ते कमी होतील. आणि आम्ही ती सुरुवात केली आहे. काही शिल्लक राहीले आहेत.
-दिलीप बिरुटे
25 May 2013 - 10:30 am | संजय क्षीरसागर
बघू या.
24 May 2013 - 2:12 pm | प्रकाश घाटपांडे
तिकडचा प्रतिप्रतिसाद कॉपी पेस्ट करीत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच.
बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्या अॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते.
तुमच्या वरील उदाहरणात इतर वेळी तारतम्य बाळगणारी मंडळी देखील तडजोड स्वीकारणे हे तारतम्यच समजत असतात. अनेकदा आपल्याला पटत नसलेल्या गोष्टी आपण नाईलाजास्तव करत असतो. त्यातली ही एक असे म्हणुन मार्ग काढत असतात.
अडीच वर्षांपुर्वी माझी आई गेली. तिने देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिच्याजवळ देहदान हे पुस्तक सही केलेले होते. त्यामुळे मला इतर नातेवाईकांना पटवता आले व देहदान केले. तशी ती पारंपारिक,धार्मिक व श्रद्धाळू होती. मी कुठलेही अंत्य संस्कार केले नाहीत पण त्या निमित्ताने सिप्ला फाउंडेशनला देणगी दिली.. जर तिने देहदानाची इच्छा व्यक्त केली नसती तर काय करायचे हा प्रश्न माझ्यासमोर होताच. पण या निमित्ताने नातेवाइकांना एक प्रकारचे हे धाडस वाटले. नंतर माझ्या मामाचे ही देहदान केले.पण कुटुंबियांनी इतर धार्मिक विधी केले.
समाज हळू हळू बदलतो आहे. हा बदलाचा वेग कदाचित आपल्याला अपेक्षित असा नसेलही.
24 May 2013 - 2:26 pm | उदय के'सागर
खूपच सुंदर प्रतिसाद प्रकाश'जी. विशेषतः पहिल्या दोन परिच्छेदातील मतांशी १००% सहमत (असाच अनुभव व शिकवण मला काही समाजकार्य करतेवेळी देण्यात आली आणि ती खूप उपयोगीही आली)
तुम्ही किंवा इतर कोणी मिपावर देहदान, नेत्रदान ह्या विषयांवर थोडा प्रकाश टाकला तर त्याबद्दल अजून माहिती आणि त्याचा प्रसार होण्यास मदत होईल असे वाटते (थोडक्यात overall process काय असते त्या बद्दल). मला स्वतःला नेत्रदानाची तिव्र इच्छा आहे.
24 May 2013 - 3:39 pm | संजय क्षीरसागर
प्रतिसादातल्या शेवटच्या परिच्छेदाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! खरं तर यापुढे काहीही लिहीणं उचित नाही म्हणून मतांतराबद्दल वेगळा प्रतिसाद देईन.
24 May 2013 - 5:55 pm | पैसा
लेख आवडला आणि प्रतिक्रियाही आवडल्या. पिवळ्या पुस्तकाचा किस्सा भारी आहे. तसंच आफ्रिकेतल्या रूढींबद्दल लिहिलं तेही पटण्यासारखं आहे. पण भारतातल्या अनेक रूढी आताच इतर देशीयांना हास्यास्पद वाटत असतील.
25 May 2013 - 7:00 am | चौकटराजा
जिथे बुद्धी आहे त्याच नाण्याची दुसरी बाजू संभम ही आहे. माणसाइतका मतिवान व संभमित प्राणी कोणी नसेल. जात, धर्म, साकडे घातले असता तुमच्यासाठीच " पेशल" केस करणारा करुणाकर देव ई. भ्रम हे त्याचे फलित आहे. सबब विचित्र समज ही काही भारतीय समाजाचीच समस्या नाही. जिथे मन आहे तिथे हे घडणारच ! फारतर कालौघात बौद्धीक उत्क्रांती होत होता या सर्वाचे प्रमाण कमी होईल हे नक्की. तसे ते झालेले आहे. होत आहे.
25 May 2013 - 9:08 am | टवाळ कार्टा
त्या कावळ्यांना भाताच्या गोळ्यापेक्शा मच्ची मटण दिले तर???
25 May 2013 - 10:47 am | प्रकाश घाटपांडे
त्यांची प्वॉट भरली असतीन तर मंग ते बी खानार न्हाईत.