मराठी नाटक बंगालीत ..

अभिरत भिरभि-या's picture
अभिरत भिरभि-या in काथ्याकूट
4 Jul 2008 - 7:49 pm
गाभा: 

मराठी नाटक देश पातळीवर पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. आपल्या मराठी नाटकांचे अनुवाद, पुनर्प्रयोग इतर भाषांमधे ही होताना दिसतात.शिरिष आठवल्यांचे एक नाटक नुकतेच बंगाली रंगमंचावर सादर झाले. देश नामक एका आघाडीच्या बंगाली मासिकाने यावर नुकताच परिक्षणात्मक लेखही छापला.मि.पा. च्या वाचकांसाठी त्याचा गोषवारा
मुळ लेखक: सुब्रतो घोष .

मानुषेर समान मानुष
बंगाली नाट्यविश्वात असे कित्येक 'दल' आहेत जे भलेही डामडौलात नसले तरी मोठ्या कष्टाने बंगाली नाटक जोपासताहेत. गांधार असेच एक दल.गेल्या शेहचाळिस वर्षात त्यंनी तेवीस एक नाटके मंचस्थ केलीत.अर्थात ते केवळ नाटकांच्या संख्येलाच नव्हे तर दर्जालाही महत्व देतात हे जाणवते.यंदाचे नाटक आहे शिरिष आठवल्यांच्ये मराठी नाटक 'मित्र'; ज्याचा विजयालक्ष्मी बर्मन यांच्या सहयोगाने काछेर मानुष' ( जवळचा माणूस) या नावाने बंगाली अनुवाद केलाय कमल सान्याल यांनी.

वर्ण वा जातीच्या आधारावरची विभागणी माणसाला माणसापासुन तोडू शकत नाही हि गोष्ट हे नाटक पुन्हा सांगु पाहते. ज्या बाबी समाजाला मागे रेटु बघतात त्यात मुख्य असते ही जातीपातीची मानसिकता.याचा उत्तर व पश्चिम भारतातला चेहरा इतका भेसुर की सहज ओळखला जावा. पण या तथाकथित पुरोगामी राज्यात - प. बंगाल मधे - हा चेहरा इतका भिन्न की ओळखु येण्यास उशिर व्हावा.नाटकात शिरिष आठवल्यांचे मराठी वातावरण जरी कायम असले तरी नाटकच्या शेवटी वाटते की नाटककाराला जे सांगायचेय ते ह्या राज्याच्या राजकीय/सामाजिक किंवा आर्थिक परिस्थितीसही पुरेपुर लागु आहे.

दादासाहेब पुरोहित संस्कारांमुळे कट्टर दलितविरोधी परंतु घटनाचक्रामुळे या विधुर गृहस्थाच्या
शारिरीक पंगु अवस्थेतून सोडवणुक करण्यासाठी येते सावित्रीबाई रुपवते नावाची दलित वर्गातील बाई.ददासाहेबांची मुलेबाळे आपापल्या नोकरीधंद्याच्या जागी असतात आणि तेथुनच पित्याची विचारपुस करत असतात. प्रारम्भी जात्याभिमानी दादासाहेब सावित्रीबाईंस काही एक दाद देत नाहीत. दुसरीकडे कामावर निष्ठा असलेली ही स्वाभिमानी बाई - जी स्वत:ला मिसेस रुपवते म्हणूनच ओळखु इच्छिते - कर्तव्यात काडीमात्र कसुर न करता रोग्यास बरे करण्याच्या मागे लागते. दादासाहेब जसजसे ठीक होऊ लागतात मि. रुपवतेंवरचे त्यांचे अवलम्बन वाढत जाते.मुलगी मैत्रेयी जेव्हा दादासाहेबांच्या इच्छेविरुद्ध स्वत:जवळ परदेशी नेऊ बघते तेव्हा दादासाहेब तिला स्वत:च्या इच्छाशक्तीच्या व मि. रुपवतेंच्या सुश्रुषेच्या बळावर खडखडीत बरे होऊन सिद्ध करतात की मुलीपाशी जायचे आता कोणतेही कारण नाही. दादासाहेबांना केवळ शारिरिक जोखडातुनच नव्हे तर जातीच्या खोट्या अभिमानातुनही मुक्ती मिळते
ही कहाणी सरळ सोप्या पद्धतीने सांगितली आहे. नाटककार कोणताही आडपडदा न ठेवता मुळ विषय प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. सारे नाटक घडते ते दादासाहेबांच्या दिवाणखान्यात व स्वयंपाकघरात. दादासाहेबांचे एकाकीपण यामुळे प्रेक्षकांपर्यन्त पोहचते.

लेखाच्या उर्वरित भागात नेपथ्य / अभिनय वगैरे अंगांवर टीकाटिप्पणी आहे. भाषांतर करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. अनुवाद कृत्रिम वाटल्यास जरुर सांगावे.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

4 Jul 2008 - 10:20 pm | यशोधरा

अजिबात कृत्रिम वाटला नाही अनुवाद. नाटकाचा गोषवारा लिहिणं छान जमलं आहे.
हे मित्र नाटक, डॉ. लागू अन् ज्योती चांदेकर यांच्या भूमिका असलेलंच ना?

अभिरत भिरभि-या's picture

7 Jul 2008 - 7:32 pm | अभिरत भिरभि-या

धन्यवाद :)
मराठीत कोणी भूमिका केल्या याची मला कल्पना नाही हो

भडकमकर मास्तर's picture

5 Jul 2008 - 1:42 pm | भडकमकर मास्तर

उत्तम माहिती...
मराठी नाटकाच्या बंगाली अनुवादाची माहिती छान...

आता मी ऐकलेली थोडी अवांतर माहिती...
२००५ च्या अल्फा पारितोषिकांसाठी या नाटकाची सर्वोत्कृष्ट लेखनासाठी विजेता म्हणून निवड झाली...
गंमत पुढेच आहे... पुरस्कारानंतर नंतर परीक्षण-समितीवरचे हेमु अधिकारी (बहुतेक तेच ) यांना अशी माहिती समजली की हे नाटक एका अमेरिकन कथेवर आधारित अरुण हरकारे लिखित " काळे आणि गोरे " कादंबरीतील अनेक घटनांवर आधारित आहे... मग त्यांनी ती कादंबरी हातात घेऊन हे नाटक पुन्हा पाहिले तेव्हा त्यांना त्यात एखादे वाक्य नाही तर परिच्छेदच्या परिच्छेद त्या कादंबरीतील आढळले... ( अर्थात लेखकाचा असा दावा होता की हे नाटक पूर्ण स्वतःच्या कल्पनेवर आधारित आहे...).. त्यानंतर हेमु अधिकारींनी स्वखर्चाने पेपरात अशा अर्थाची जहिरात दिली की "आमच्या अज्ञानामुळे परीक्षक म्हणून माझी मोठी चूक झाली आहे "....
ही दोन वर्षांपूर्वी ऐकलेली माहिती असल्याने तपशीलात थोडा गोंधळ असू शकतो ... चु. भू.द्या. घ्या.

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

धनंजय's picture

7 Jul 2008 - 11:02 pm | धनंजय

ही कथावस्तू फारच प्रभावी आहे. त्यामुळे वाङ्मयचौर्य असल्यास वाईट वाटते.
वाङ्मयातून स्फूर्ती मिळून लिहिल्याचा अनुभव आपल्या सर्वांना येतो. स्फूर्तिस्थानाचा ऋणनिर्देश केला तर काय कमीपणा येऊ शकतो? नाटककाराने तसे आभार सांगायला हवे होते.

(मध्ये "काय द्याचे बोला" नावाचा विनोदी चित्रपट बघितला, आणि तो आवडला. मग पुढे कळले की "माय कझिन व्हिनी" नावाचा इंग्रजी चित्रपट अगदी तीच कथा घेऊन बनवलेला आहे. वाईट वाटले.)

मृतप्राय वर्णद्वेषी गोरा माणूस आणि त्याचा काळा परिचारक (नर्स) अशी दोन पात्रे असलेले एक नाटकुले मी काही वर्षांपूर्वी बघितले (३एक प्रवेश, एकूण १५एक मिनिटे). त्यात तो माणूस शेवटी मरतो. पण काही समजून-उमजून मरतो. विशेष म्हणजे नर्स-बुवाही बदलतो. सुरुवातीला तो कर्तव्यबुद्धीला जागून चोख काम करत होता, पण रुग्णाबद्दल त्याच्या मनात संताप होता. तो वर्णद्वेषी माणूस पूर्वी सरकारी अधिकारी होता, आणि त्याने केलेल्या अंमलाला पश्चात्तापाचाही काही उपयोग होणार नाही, असे परिचारकाचे ठाम मत होते - आणि इथे तर सुरुवातीला हा रुग्ण पहिल्यासारखाच वर्णद्वेषी होता, म्हणजे किती संतापजन्य! पण शेवटी अगदी मनापासून मायाळूपणे तो रुग्णाचा हात हातात धरून त्याला निरोप देतो. (अशी काही ती कथा मला अंधुक आठवते आहे.)

("रुग्ण आणि सेवादात्यांमधला संघर्ष" ही कथावस्तू कित्येक वेगवेगळ्या स्वतंत्र नाटकांना पुरून उरावी.)