दिल्ली मधील अत्यंत दुर्दैवी घटनेचे भारतातल्याच काय पण जगभरच्या प्रमुख माध्यमांनी प्रसारण केले आणि बहुतांशी ते योग्यच पद्धतीने केले. पण जस जसे मूळ बातमीचा जोर ओसरू लागला तस तसे भारतीय माध्यमांना राजकीय-सामाजीक नेत्यांमुळे खाद्य मिळू लागले. यात कोणत्या पक्षाची व्यक्ती काय म्हणाली या बद्दल बरेच लिहीता येईल. मात्र माध्यमांचा वादग्रस्त सहभाग हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक मोहनजी भागवत यांना ज्या पद्धतीने गोवले त्यावरून झाला आहे... आता सर्वप्रथम, सर्वांना संघाचे कार्य, ध्येय-उद्दीष्ट, मान्य असायला हवे वगैरे म्हणणे नाही हे स्पष्ट करतो. येथे मुद्दा संघ आणि सरसंघाचालकांपेक्षा माध्यमे ही कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतात या संदर्भात आहे.
तर झाले असे. सर्वप्रथम, सिल्चर आसाम मधे एका निमंत्रितांच्या सभेत दिल्ली प्रकरणावरून कोणीतरी, "इंडीया मधे स्त्रीयांवरील वाढत्या अत्याचारावरून" प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले की, हे "इंडीया मधे होते भारतात नाही..." भारत - इंडीया या दोन शब्दातून जे वेगवेगळे अॅटीट्यूड सांगायची पद्धत ही विशेष करून शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात शरद जोशींनी नावरुपाला आणली होती. त्या संदर्भानेच त्यांचा मुख्य मुद्दा हा अॅटीट्यूड आणि अर्थातच सांस्कृतिक होता. त्यावर आणि त्याच्या विरोधात अनेकांनी मतप्रदर्शन केले. अर्थात प्रत्येकाची मते वेगळी असू शकतता, विश्लेषण वेगळे असू शकते त्यामुळे ते स्वातंत्र्य जबाबदारीने वापरल्यास काहीच आश्चर्यकारक नव्हते. पण मला वाटते त्यातून हवी तितकी प्रसिद्धी देता आली नसावी... त्यातून पुढचे अतिशय अप्रामाणिक प्रकरण घडले.
प्रसंग होता स्वामी परमानंदांच्या योग विद्यापिठाचे इंदूर येथे उद्घाटन. तेथे मोहनजी हे भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीतील फरक सांगत होते. तो सांगत असताना, त्यांनी मनुष्य कसा स्वार्थी होत गेला आणि theory of social contract कशी अस्तित्वात आली ज्यात लग्न देखील एक काँट्रॅक्ट समजले गेले, पतीने खाण्यापिण्याची (बाहेरील काम - पैसे) व्यवस्था करायची आणि पत्नीने घरातले सांभाळायचे. आणि मग हे काँट्रॅक्ट पती अथवा पत्नीने पुर्ण केले नाही तर द्या त्यांना सोडून... पण भारतीय पद्धतीत असे नसते, असे म्हणत त्यांनी मग भारतीय तत्वज्ञान आणि त्याचा व्यावहारीक उपयोग या संदर्भात उहापोह केला.
आता वरील परीच्छेदातले मुद्दे कोणाला मान्य होतील कोणाला होणार नाहीत. तो मुद्दा नाही. त्यावर तात्विक चर्चा झाली तरी त्यात अयोग्य काहीच नाही... पण लग्न हे काँट्रॅक्ट धरणे आणि त्यात पती-पत्नीने काय करणे हे (कॉट्रॅक्च्युअली) ठरवणे ही पाश्चत्या पद्धत आहे असे भागवतजींचे स्पष्ट म्हणणे होते आणि तसे ते म्हणले होते. पण माध्यमांनी काय करावे? त्या मुद्यावर तात्विक वाद न घालता, "Women should be just housewives and men the earning members, says RSS chief " असले सवंग मथळे देत बातम्या दिल्या त्यावर चर्चा आणि ट्विटरवरील टिवटिव केली... पुर्वीच्या जमान्यात हे खपून गेले असते. पण आता युट्यूबर वर ते भाषण उपलब्ध आहे आणि तसेच सोशल मेडीयामुळे त्यावर आवाज उठवता येऊ शकतो आणि तेच झाले. संघाच्या अधिकार्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या त्यांची चूक लक्षात आणून दिली... त्यावर मग ट्विटरवर खालील प्रमाणे माफी मागितली गेली:
मात्र एक गंमत अशी आहे की हे सर्व ट्विटरवरच झाले... या माध्यमांनी अथवा त्यांच्या संकेतस्थळांनी काहीच बदल केले नाहीत. या संदर्भात खालील संवाद वाचनीय आहे:
ज्या माणसाने ही खोटी बातमी तयार केली, त्याला म्हणे नोकरीवरून काढून टाकण्यात आले पण याच खोट्या आणि चुकीच्या बातम्यांचा संदर्भ घेत मराठी आणि मला खात्री आहे इतर भाषिक वृत्तपत्रांनी देखील टिकास्त्र सोडले आहे.
ही केवळ एकच प्रकाशात आलेली घटना आहे. अशा अनेक, अनेकांबाबत असू शकतात. प्रसिद्धी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ समजले जाते कारण त्यांचे तसे कर्तव्य असते आणि अनेक ठिकाणि (भारतात आणि इतरत्र) तसे त्यांचे कार्य देखील आहे. पाश्चात्य देशात अशी चुक झाली असती तर माध्यमांनी जाहीर माफी मागितली असती आणि दुरुस्ती केली असती. पण तसे ना धड भारतात होत आहे ना धड इंडीयात...
अशा या अप्रामाणिक माध्यमांनी केलेल्या कुठल्याही सामाजिक विषयावरील तात्विक विश्लेषणावर विश्वास कसा ठेवावा?
प्रतिक्रिया
21 Jan 2013 - 2:43 pm | यशोधरा
डॉ. गोडबोलेंचा लेख एकदम उत्तम. टु द पॉइंट आणि मुद्देसूद.इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
सकाळची जी काय परंपरा होती ती परुळेकरांबरोबरच संपली. :(
संघाल आंधळेपणे दोष देणे हा अजेंडा असणार्यांना संघाचं चांगलं काम कधी दिसत नाही का? त्याबद्दल अशांपैकी कोणी चांगलं बोलत नाही? मूल्यमापन करायचं आहे तर ते वस्तुनिष्ठपणे करावं, नुसतीच गरळ ओकण्यात काय साध्य होतं?
21 Jan 2013 - 10:29 pm | आजानुकर्ण
गोडबोले यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की "
"
मात्र विकास यांनी प्रतिसादात दिलेल्या दुव्यात मोहन भागवत यांचे संपूर्ण भाषण आहे (दुवा) तेथे खालील वाक्य लिहिले आहे.
ज्या घटनेसंदर्भात भागवत यांनी प्रतिक्रिया दिली त्याला भागवत यांचा कार्यकारणभाव कसा लावावा हे मला समलजलेले नाही. भागवत यांना बलात्कारित पीडित तरुणीबद्दल अनुकंपा आहे असे गृहित धरुन वरील वाक्य वाचले तर "जिसने भारतसे नाता तोडा उसका यह हुआ हे" मधून त्या तरुणीने भारतसे - किंवा भारतीय संस्कारांपासून आपले नाते तोडले होते असे ध्वनित होते. आजपर्यंत पेपरात वाचलेल्या बातम्यांनुसार त्या मुलीचे वर्तन कोणत्याही प्रकारे उच्छृंखल होते असे वाचनात आलेले नाही. त्यामुळे या वाक्याचा अर्थ लागत नाही. जर भागवत यांना बलात्कार करणाऱ्यांबबाबत हे वाक्य म्हणायचे होते तर त्यां गुन्हेगारांचे अजूनतरी काहीही वाईट झालेले नाही. त्या सर्वांमधील अधिक क्रूर असलेला अल्पवयीन मुलगा लहान वयामुळे वेगळ्या कोर्टात थातुरमातुर शिक्षा होऊन तीन चार वर्षात परत समाजात परत येईल असे दिसते आहे.
भागवत यांच्या भाषणातील अधिक मोठा भोंगळपणा म्हणजे त्यांना अपेक्षित असलेली भारत आणि इंडिया यांची व्याख्या त्यांनी कुठेही सांगितलेली नाही (किंवा माझ्या वाचनात आलेली नाही). त्यामुळे जो-तो आपल्या मगदुराप्रमाणे अर्थ लावण्यास स्वतंत्र आहे. त्यामुळे अमुकतमुकच व्याख्या बरोबर व इतर व्याख्या चुकीच्या या मुद्द्यावर सर्वचजण योग्य आहेत व ते तसे भांडू शकतात.
21 Jan 2013 - 9:59 am | विटेकर
श्रद्धास्थानाबद्दल वाट्टेल ते खोटेनाटे लिहावे हे लोकांनी खपवून घ्यावे ? त्यांना धमकी देण्याएवजी त्यांचा काय शनवार वाड्यावर सत्कार करावा अशी अपेक्षा होती का ?एवढे होऊनही यांनी अजून जाहीर माफि मागोतली नाही ! आणि तुम्हाला यांचा पुळ्का ? अन्य एखाद्या समाजाबद्द्ल जर ते असले काही बरळले असते तर तुम्हाला वैकुठावर टापशी बांधून डोळे पुसत जावे लागले असते !!
धमकी देणे गैरच आहे पण लातोंके भूत बातोंसे नही मानते ! It is unwise to be wise with unwise people !
21 Jan 2013 - 10:33 pm | आजानुकर्ण
भारतात निदान आजतरी सभ्य भाषेत हवे ते बोलता येते असे वाटते. किंबहुना अशा वागण्यावर एका माजी पंतप्रधानांनी शिस्तीच्या कारणास्तव काही वर्षे बंधने घातली असता 'आणीबाणी'च्या नावाने अनेकांनी शिमगा केला होता असे वाचल्याचे आठवते. हेमंत देसाई यांचे ते मत आहे. त्यांचे मत चुकीचे असू शकते किंवा बरोबर असू शकते पण त्यांना स्वतःचे मत असण्याचा हक्क आहे.
अन्य समाजः अन्य समाजाबद्दल सामना या वृत्तपत्रातून दररोजच बरळलेले वाचायला मिळते. केवळ त्या कारणास्तव सामनाचे आजपर्यंतचे कोणत्याही पदाधिकाऱ्यांसाठी कोणीही वैकुंठावर टापशी पुसत गेलेले नाही.
21 Jan 2013 - 10:08 pm | आशु जोग
धाग्याचे प्रतिसाद पाहीले.
राजेश घासकडवी आणि विक्षिप्त्_अदिती यांचे प्रतिसाद नेहमीप्रमाणेच त्यांच्या बुद्धीचे तेज दाखवणारे आहेत.
पण
एक प्रश्न आहेच
अदिती यांना भारतीय संस्कृतीचा इतका तिटकारा का !
22 Jan 2013 - 1:16 pm | पुण्याचे वटवाघूळ
अहो असा तिटकारा दाखविला नाही तर आपल्या बुध्दीचे तेज सिध्द कसे करता येईल?
22 Jan 2013 - 4:17 pm | अर्धवट
भारतीय संस्कृती म्हणजे येक्षॅक्टली काय हे जरा स्पष्ट केल्यास केवळ आत्मपरिक्षण म्हणून मला असा तीटकारा आहे किंवा कसे हे ठरवण्यास मदत होइल असे वाटते.
22 Jan 2013 - 4:20 pm | बॅटमॅन
+१.
असेच म्हणतो.
22 Jan 2013 - 10:19 pm | आशु जोग
जी रं जी जी
झीलकरी
23 Jan 2013 - 9:24 am | अर्धवट
आशू जोग,
मूळ प्रश्नाचे उत्तर दिल्यास जास्त बरे,
बाकी टीका वैयक्तीक म्हणून दुर्लक्षीत करतो आहे.
अर्थात अशा वैयक्तीक टीकेवर उत्तर देवून वाद पुढे चालवण्याइतका वेळ नाही म्हणून..