दुर्गम दुर्ग - देवगिरी!!

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in भटकंती
10 Jan 2013 - 12:22 pm

"दौलताबादही पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतू तो उंचीने थोडका, रायगड दौलताबादचे दशगुणी उंच." महाराजांनी आपली राजधानी रायगडावर हलवण्याआधी सभासदाने रायगडाची आणी दौलताबादेच्या किल्ल्याची केलेली तुलना!!

औरंगाबाद दौर्‍याच्या आधीच्या दोन दिवसात आम्ही अजिंठा आणि वेरूळ केल्यानंतर तिसरा आणि शेवटचा दिवस आम्ही देवगिरी या अद्भुत दुर्गासाठी राखून ठेवला होता. मग ठरवल्याप्रमाणे सकाळी ८ वाजता औरंगाबाद सोडलं आणि अर्ध्या-पाऊण तासात देवगिरीच्या पायथ्याला पोहचलो. औरंगाबादपासून वेरूळला जाणार्या रस्त्यावर साधारण १०-१५ किमी गेलं कि डाव्या बाजुला शंखासारख्या आकाराचा देवगिरीचा डोंगर दिसतो.

वेरूळच्या अद्भुत कैलाश लेण्यांसोबतच राष्ट्रकूटांनी ह्या अजिंक्य दुर्गाची निर्मिती केली. मानवी हातांनी तासलेले कडे आणि बालेकिल्ल्याकडे जाणारा भुलभूलय्या ह्या दोन गोष्टी पाहिल्या कि याची खात्रीच पटते. असे म्हणतात कि यादवांचा राजा भिल्लम याने ह्या अद्भुत आणि अभेद्य अशा किल्ल्याचा पाया रचला. पुढे याच यादव वंशाच्या निरनिराळ्या राजांनी देवगिरीवर राज्य केलं आणि ते भरभराटीला आणलं. जवळपास १३५ वर्षाच्या कालखंडात भिल्लम, सिंघनदेव, कृष्णदेवराय, रामदेवराय, शंकरदेव, हरपालदेव अशा राजांच्या काळात देवगिरी समृध्द झालं आणि त्याची किर्ती महाराष्ट्राबाहेर पसरली. महाराष्ट्रात के काही थोडके उत्तम किल्ले आहेत त्यात या राजदुर्गाची गणना होते. देवगिरीसोबतच 'सुरगिरी', 'देवगड' आणि 'धारगिरी' अशा काही नावांचा ह्या किल्ल्याबद्दल केलेला उल्लेख आढळतो.

दक्षिण हिंदुस्थानावर पहिल्यांदाच इस्लामिक आक्रमकांची स्वारी झाली. सुलतान जलालुद्दीनचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजीला दक्षिणेतल्या ह्या ऐश्वर्यसंपन्न राज्यांनी भुरळ घातली आणि सुलतानाला न कळवताच १२९४ मध्ये विंध्याद्री पर्वत ओलांडून दक्षिणेतल्या ह्या अभेद्य अशा दुर्गावर स्वारी करून रामदेवरायचा पराभव केला. हि स्वारी इतकी अकस्मात होती कि अशा लढाईची काहिच कल्पना नसणार्या रामदेवरायाला लढाईसाठी काहीच सिध्दता करता आली नाही. स्वकियांनी केलेल्या फितूरीमुळेच रामदेवरायाला ह्या लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. तह होऊन अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवरायाला आपला मांडलिक बनवले व त्याच्याकडून अपार खंडणी घेऊन तो दिल्लीकडे रवाना झाला.

१३०७ मध्ये अल्लाउद्दीनचा सरदार मलिक काफुर याने देवगिरीवर पुन्हा हल्ला रामदेवरायाचा पराभव केला. पण त्याने अल्लाउद्दीनची तुंबलेली खंडणी घेऊन तह केला. रामदेवरायानंतर त्याचा मुलगा शंकरदेव हा देवगिरीचा राजा झाला आणि त्याने दिल्लीपतीचे स्वामित्व झुगारून देऊन पुन्हा स्वत: राज्य करू लागला. मलिक काफुरला हे कळताच त्याने पुन्हा देवगिरीवर स्वारी केली. या हटातटाच्या लढाईत शंकरदेवाने निकराची झुंज दिली पण अखेर तो मारला गेला. त्यानंतर वेळोवेळी दक्षिणेतल्या ह्या अभेद्य दुर्गावर स्वार्या होतच राहिल्या. १३१८ मध्ये मुबारक खिलजी याने यादवांचा राजा हरपालदेव याला जिवंत पकडून फाशी दिले आणि त्याचबरोबर देवगिरीवरचं १३५ वर्षाचं यादवांच साम्राज्य संपुष्टात आलं.

१३२७ मध्ये महंम्मद बिन तुघलक या विक्षिप्त मुस्लिम सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून दक्षिणेत देवगिरीला हलवली आणि देवगिरीचे नविन नामकरण केले..दौलताबाद!! दौलतींनी आबाद असलेले शहर म्हणजेच दौलताबाद. सहा मण सोने, सात ते आठ मण मोती, दोन मण हिरेमाणकं आणि कोट्यावधी रुपये देवगिरीवरून लुटून नेल्याचा उल्लेख आढळतो आणि मग महंम्मद तुघलकाने दौलताबाद हे ठेवलेले नाव सार्थ वाटते. आणि मग काही काळापुरता का होईना दक्षिणेतल्या ह्या दुर्गाने संपुर्ण भारताचा राज्यकारभार सांभाळला. १३४७ हसन बहामनीने दिल्लीच्या सरदाराने देवगिरीवर सत्ता प्रस्थापित करून पुढे १५० वर्षे राज्य चालवले. १४९९ ला बहामनी साम्राज्याचे पाच भाग होऊन देवगिरीच्या अहमद नगरच्या निजामाकडे आला. औरंगजेबाने देवगिरी त्याच्या ताब्यात असताना १६३५ ला दक्षिणेतील राजधानी म्हणून देवगिरीची निवड केली.

साडे-सातशे वर्षाच्या मोठ्ठ्या कालावधीत राष्ट्रकुट, यादव, खिलजी, तुघलक, बहामनी निजामशाही, मुघल, असफजाही अशा आठ ते नऊ राजवटींनी देवगिरी आपली सत्ता प्रस्थापित केली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबादचे संस्थान खालसा होऊन देवगिरी स्वतंत्र भारतात विलीन झाला.

एका राजवटीकडून दुसर्‍या राजवटीकडे जाताना या दुर्गात बहुतांश बदल केले झाले. त्यामुंळेच कि काय किल्ल्याच्या संरक्षणार्थ एकुण चार कोट या दुर्गाभोवती बांधलेले दिसतात जे या किल्ल्याच्या अभेद्यपणाला अजुनच बळकटी आणतात. चार कोटांपैकी किल्ल्यात प्रवेश करताना आपल्याला तीन कोट लागतात. सर्वात बाहेरचा जो कोट आहे त्यात सध्याचे दौलताबाद गाव वसले आहे. निजामाचा सरदार मलिक अंबर याने या कोटाची निर्मिती केली म्हणून या कोटाला अंबरकोट असे म्हणतात.

मुख्य रस्त्यावरून दिसणारा बालेकिल्ला.
1

मुख्य प्रवेशद्वाराची तटबंदी १
2

मुख्य प्रवेशद्वाराची तटबंदी २
3

किल्ल्याच्या महादरवाजाला हत्तींचा हल्ला थोपवून धरण्यासाठी मोठ-मोठे अणुकूचीदार खिळे बसवण्यात आले आहेत. त्यातून प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजुंना पहारेकर्‍यांच्या देवड्या लागतात. महादरवाजाच्या कमानीची रचना इस्लामिक पध्दतीची आहे.
4

निजामशाहीच्या काळात निजामाचा वजीर मलिक अंबर याने या दुर्गाजवळच खडकाळ भागात खडकी नावाचे शहर वसवले जे आज औरंगाबाद या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात के थोडके भुईकोट किल्ले आहेत त्यापैकी देवगिरीचा किल्ला सर्वोत्तम म्हणता येईल असाच आहे. मुख्य दरवाजातून आत गेल्यानंतर समोर आणखी एक दरवाजा लागतो. या दोन्ही दरवांज्यामध्ये एक मोकळा चौक लागतो त्या जागेत काही पहारेकर्‍यांच्या खोल्या आहेत. त्यातल्या काही खोल्यांमध्ये 'सुतरनाळ' प्रकारच्या आणि काहींमध्ये गाड्यांवरच्या तोफा आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून शत्रू आत आल्यानंतर त्याच्यावर चारही बाजूने हल्ला करता यावा अशी यामागची रचना.

5

त्यातल्याच एका तोफेच्या तोंडाचा हा जवळून काढलेला फोटो.
6

तोफ - १
7

तोफ - २
8

तोफ - ३
9

तोफ - ४
10

या दरवाजातून प्रवेश करताना त्याच्या दोन्ही बाजूस हत्तीचं अतिशय प्रमाणबध्द असं हे शिल्प दिसतं. या हत्तीच्या पायातली साखळदंड, पोटावरची घंटा, अंगावरील इतर दागिने अतिशय सुंदर पध्दतीने कोरलेली दिसतात.
11

दुसरे प्रवेशद्वार
12

वरच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला आणखी एक तटबंदी दिसते.
13

या प्रवेशद्वारातून समोरच उभा असलेला १०० मीटर उंचीचा 'चाँद मिनार दृष्टीस पडतो. १४३५ साली अहमदशहा याने गुजरातवर स्वारी करून त्यावर विजय मिळवला. आणि म्हणून मग त्याच्या विजयाप्रित्यर्थ हा चाँद मिनार उभारला गेला.
वर जाण्यासाठी या मिनाराला आतल्या बाजूने गोलाकार असा जिना आहे. ह्या मिनाराचं बांधकाम इराणी पध्दतीचं वाटतं
14

15

16

मुख्य किल्ल्याकडे जाताना उजव्या हाताला हा मिनार दिसतो आणि याच्या बरोबर डाव्या हाताला हत्ती तलाव आहे. अंदाजे ४० मीटर लांबी आणि ४० मीटर रुंदीचा असा हा मोठा तलाव आहे. ह्याच्या एकूण आकारमानावरूनच ह्याला हत्ती तलाव असं म्हटलं जात असावं आणि त्याकाळी संपुर्ण किल्ल्याचा पाणीपुरवठा ह्याच तलावातून केला जात असावा. यात आत उतारण्यासाठी पायर्‍याही खोदलेल्या आहेत.

(* आमचा इंडियाना जोन्स हा कॅमेर्‍याच्या लेन्समध्ये डोळा मारून बसला होता त्यामुळे त्याला हा तलाव दिसला नाही आणि त्याचे फोटो इथे उपलब्ध नाहीत.)

त्याच्या अगदी समोरच भारतमातेचे भव्य मंदीर आहे. त्या मंदिराच्या वाटेवरच मुळच्या शंकर मंदिराचे मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. पुरातत्व विभागाला ह्या सगळ्याशी काहीचं देणघेणं नसावं असं त्यांच्या एकुण स्थितीवरून दिसून येतं.
17

18

भारतमाता मंदिराच मुख्य प्रवेशद्वार.
19

या मंदिराच भव्य प्रांगण.
20

या मंदिराच मुख्य छत गायब आहे पण बाजुचे सगळे खांब अजुनही सुस्थितीत आहे. बहुतेक लोकं हे मुळचं यादवकालीन मंदिर असावं असं म्हणतात. खांबांच्या एकूण शैलीवरून हे शिवमंदिर असावे जे राष्ट्रकुटांच्या काळात बांधले गेले असावे. इस्लामिक राजवटीत याच मंदिराची मस्जिद केली गेली असावी. घुमटासारख्या कळसावरून आणि कमानीच्या एकूण आकारावरून याची खात्री पटते. स्वातंत्र्योत्तर काळात इथल्या मंदिरात आताच्या भारतमातेच्या मुळ मुर्तीची स्थापना करण्यात आली.

प्रागंणाचे शिल्लक राहिलेले खांब. इथे उभं राहिल्यानंतर या मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते.
21

मुळ मंदिराच्या खांबावर भार तोलणारे असे यक्ष दिसतात.
22

भारतमातेची कुलूपात बंदिस्त केलेली मुर्ती.
23

मंदिराचे खांब जे मुळ शिवकालीन मंदिरांची आठवण करून देतात.
24

तिथून पुढे मुख्य देवगिरीकडे निघाल्यानंतर समोरच किल्ल्याची मुख्य तटबंदी दिसते..कालाकोट!
25

26

ह्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एका हेमांडपंथी मंदिराचे अवशेष शिल्लक दिसतात. ज्यातले आजही अगदी व्यवस्थित आहेत. मुघलांच्या काळात बहुदा ह्या मंदिराचीही मस्जिद बनवली गेली असावी. देवगिरी पहायची इथून पुढे खरी सुरूवात होते. कालाकोट तटबंदीच्या दोन्ही बाजुचे बुरूज अजुनही भक्कम स्थितीत आहेत. इथून आत शिरल्यानंतर किल्ल्याच्या मुख्य चढणीला सुरूवात होते. आत शिरल्यानंतर उजवीकडच्या वाटेवर सैन्याची दालने आहेत तिथे समोरच दिंडीदरवाजा लागतो.
27

28

दिंडी दरवाजातून पुढे गेल्यानंतर पडक्या अवस्थेतला दुमजली वाडा दिसतो. यालाच 'चिनीमहल' असे म्हणतात. या वाड्याचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी करत असत. मागे आल्यानंतर थोडंस डावीकडे आलं कि तिथेही एक वाडा दिसतो तो निजामशाही वाडा. ह्या वाड्याच्या एकंदर आकारमानावरून आणि कोरीम कामावरून हा खुप मोठा राजेशाही वाडा वाटतो. या वाड्यासमोरच्या बुरूजावर एक तोफ ठेवली आहे, त्यावरच्या मजकुरावरून तिला किल्ला शिकन म्हणजेच किल्ला उध्वस्त करणारी तोफ असे म्हणतात. पण या तोफेच्या मागील बाजुस असलेल्या मेढ्यांच्या तोंडामुळे 'मेंढा तोफ' हे नाव प्रचलित झालं असावं. हि तोफ बुरूजावर अशा रितीने बसवण्यात आलीय कि हल्ल्याच्या वेळी चारी बाजूंना फिरवता यावी.
29

त्या तोफेवर दोन ठिकाणी मजकूर आहेत त्यापैकी हा एक.. या तोफेच्या मुख्य तोंडाशी 'आलमगीर औरंगजेब' असं फारशी भाषेत लिहीलेलं आढळतं. तोफेवरचं नक्षीकाम अतिशय सुरेख दिसतं.

31

30

तिथून पुढे गेल्यानंतर आम्ही मुळ बालेकिल्ल्याभोवती खोदलेल्या प्रचंड अश्या खंदकाच्या अलिकडच्या बाजुला पोहचलो. किल्ल्याच्या संरक्षणार्थ चारी बाजूने २० मीटर लांबीचा एक हा खुप मोठा खंदक खोदलेला दिसतो. तो खदंक पार करण्यासाठी जमिनीला समांतर असा एक लोखडांचा पुल अलिकडच्या काळात म्हणजे बहुतेक ६०-७० वर्षांपुर्वी भारतीय पुरातत्व विभागाने बांधला आहे. आणि दुसरा खालच्या बाजुस असलेला दगड आणि वीटांपासून बांधलेला हा पुल पुर्वीपासूनच तेथे आहे. खंदकाच्या अलिकडच्या भागात उभे होतो आणि पलिकडच्या भागात आम्हाला जे दिसत होतं ते केवळ अद्भुत या शब्दाशीच तुलना करता येईल असं. एक संपुर्ण डोंगर, पण अर्ध्या भागापासून खाली टोकापर्यंत चहूबाजुंनी तासत नेलेला. अशक्यप्राय वाटणारे पण मानवी हातांनी केलेले जबरदस्त काम!

मानवी हातांनी तासलेले कडे आणि खंदक
32

अलिकडच्या काळात बांधलेला लोखंडी पुल.
33

खंदकाचा आणखी एक फोटो.
34

छिन्नी हातोड्यांनी तासून काढलेला खंदक
34

खंदकाच्या दोन्ही बाजुस पाणी सोडण्यासाठी धरणं बांधलेली आहेत. संकटाच्या वेळी दोन्ही पैकी एका बाजुचं धरण बंद करून दुसर्‍या धरणातून पाणी सोडत ज्यामुळे दगडी बांधकाम असलेला पुल पाण्याखाली जात असे आणि शत्रुचे किल्ल्यात शिरण्याचे मनसुबे धुळीला मिळत. खंदकातल्या पाण्यात विषारी साप, मगरी यांसारखे प्राणी सोडले जात.

लोखंडी पुल पार करून गेल्यानंतर आपण बालेकिल्ल्याच्या खालच्या भागात पोहचतो, पण दगडी पुल ओलांडल्यानंतर थोडेसे काटकोनात गेल्यानंतर आपण बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारात पोहचतो.
35

आणि इथून पुढे चालू होतो या दुर्गाचा सर्वात महत्वाचा भाग. बालेकिल्ल्यात पोहचणार्‍या वाटांचा भुलभूलय्या!! जो ओलांडणं खंदक पार करून आलेल्या शत्रूला निव्वळ अशक्यप्राय अशी गोष्ट. हि संपुर्ण वाट डोंगरात खोदलेली आहे. शत्रुला मुख्य किल्ल्यापर्यंत पोहचू न देण्याची पुरेपूर व्यवस्था या वाटेवर केलेली दिसते. अनेक अंधार्‍या गुफा, चकवा देणारे रस्ते, शत्रुवर उकळते तेल टाकण्याच्या जागा, दगड-धोंड्यांचा आणि बाणांचा वर्षाव करता यावा म्हणून काढलेले छोटे छोटे झरोखे, शत्रूची दिशाभुल करत त्याला सरळ खंदकात उतरवणारे रस्ते यांनी हि वाट पुर्णपणे भरलेली आहे जेणेकरून शत्रू या वाटेने पुढे जाणं अशक्य होतं. अनेक प्रकारच्या युक्त्या वापरून हा किल्ला जितका होईल तितका अभेद्य बनवण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो.

भुलभूलय्या!
36

इथून आत गेल्यानंतर सुरूवात होते भुलभूलय्याला.
37

38

39

अंधेरीतच खडकात खोदलेल्या या पायर्‍या.
49

भुलभूलय्याच्या खालच्या चौकात उभं असणार्‍या शत्रूवर उकळतं तेल टाकण्याची जागा.
50

मुख्य किल्ल्याकडे जाताना वाटेवरच डावीकडे एक गणपतीचं मंदिर लागतं. हे मंदिर इथे कधीपासून आहे ह्याचा उल्लेख सापडत नाही. मंदिराच्या एकंदर शैलीवरून हे मंदिर अगदी अलिकडच्या काळात बांधले गेले असावे असा अंदाज आहे.

गणपती बाप्पा!
40

मंदिराला डावीकडे ठेवत आपण पायर्‍याने वर चढत डोंगराच्या सपाट भागावर येतो. जिथून समोर आपल्याला एक अष्टकोनी इमारत दिसते. त्या अष्ट्कोनी इमारतीला 'बारादारी' असे म्हणतात. मुघल सुभेदाराचे निवास्थान असलेली हि इमारत खुप प्रशस्त असून तिला बारा दरवाजे आणि बारा कमानी आहेत. पायर्‍यांनी वर पहिल्या माळ्यावर गेल्यानंतर तिथे आपल्याला अष्टकोनी खोल्या, घुमटाकृती छत, सज्जा असं सगळं पाहायला मिळतं.
41

42

इस्लामिक पध्दतीची कमानीची रचना.
43

बारादारी ह्या इमारतीपासून मेंढा तोफ असलेला बुरूज, त्यासमोरचा निजामाचा वाडा आणि खंदक पार करण्यासाठी असणारा लोखंडी पुल ह्या तिन्ही गोष्टी एकदम दिसतात.
56

उजवीकडच्या दरवाज्याने या इमारतीच्या छतावर गेल्यानंतर थोडंस पुढे डोंगरात एक गुहा खोदलेली आहे. त्याच्या बाजूलाच आणखी एक असं दुसरं भुयार दिसतं जे बहूदा अन्न-धान्य साठवण्याची जागा असावी. पहिल्या गुफेतून आत गेल्यानंतर डावीकडे एक रॉकेलचा दिवा दगडात कोरलेल्या पादुकांवर तेवत ठेवण्यात आला होता. ते ठिकाण म्हणजे एकनाथ महाराजांचे गुरू जनार्धन स्वामी महाराजांची समाधी. जे काही काळ या किल्ल्याचे किल्लेदारही होते.

जनार्धनस्वामींच्या पादूका.
44

अन्नधान्यांचे कोठार.
45

त्याच्या थोडंस पुढे गेल्यानंतर एका गोल चौथर्‍यावर एक तोफ ठेवलेली दिसते. त्या तोफेला 'काला पहाड' असं म्हणतात.
कुठली तोफ आहे हे पाहण्याच्या उत्सुकतेने आम्हाला त्या तोफेवर काही अशी नविन नाव मिळाली कि आमची बोटे आश्चर्याने तोंडात गेली. नीट निरीक्षण केल्यानंतर असं कळालं कि किल्ल्याला भेट देणार्‍या पर्यटकांपैकी काही बधीर लोकांनी भांड्यावर नाव कोरायची मशीन सोबत आणून त्या तोफेवर स्वतःची नावं टाकण्याचा पराक्रम केला होता. त्याच वेळी मनात एक विचार असाही येऊन गेला कि त्या मुर्ख माणसाला पकडून ढुंगणावर शंभर चाबकाचे पटके द्यायला पाहीजेत.

काला पहाड.
46

आमचे दोन शिलेदार.
58

बाजुलाच माथ्यावर असणारा हा बुरूज दिसतो. जिथेच झेंडा लावण्याची निशानकाठीही दिसते.
48

थोड्याश्या पायर्‍या चढून वर गेल्यानंतर आधी पाहीलेल्या तोफेपेक्षाही एक अजस्त्र तोफ आपल्याला पाहायला मिळते. तोफेवर 'श्री दुर्गा' अशी अक्षरं कोरलेली दिसली. ह्याच तोफेला धुळधाण किंवा मलिका-ए-मैदान असेही म्हणतात. पंचधातूंपासून अशी तोफ बनवण्याचं तंत्रच इतकं भारी असावं कि दुपारच्या रणरणत्या उन्हातही ती तोफ अतिशय थंडगार राहिली होती. युध्दाच्या वेळी तोफेतून सुटणार्‍या गोळ्यामुळे तोफेचं तापमान खुप वाढतं. मग अशा वेळी तोफेला बत्ती देणार्‍याला त्या गरमीचा त्रास होऊ नये हा त्यामागचा उद्देश असावा.

47

दुर्गा तोफेची मागची बाजू.
51

तोफेवर कोरलेली श्री दुर्गे हि अक्षरे.
52

53

54

55

देवगिरी किल्ल्यावरून दिसणारे भग्नावशेष
34

देवगिरीवरून दिसणारी तटबंदी व समोरची चांभार टेकडी. हीच टेकडी मुघलांनी काबीज करून तिच्यावरून देवगिरीवर तोफंचा मारा केला आणि निजामशाहीला शरण आणले
34

अंबर कोट आणि महाकोटादरम्यान खोदलेले खंदक
34

दोन कोटांमध्ये असलेले खंदक
34

किल्ल्यावरून दिसणारा चांद मिनार व इतर अवशेष
34

किल्ल्यावरून आजूबाजूचा संपुर्ण परिसर दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याची तटबंदी, दौलताबाद गाव, तटबंदीच्या आतूनच वेरूळकडे जाणारा रस्ता हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. ते सगळं नजरेत साठवून घेतलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. अर्ध्या पाऊण तासात खाली उतरून आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. पण त्यापुर्वी औरंगाबाद फाट्यावर उभे असलेल्या बिरूटे सरांना आणि श्रुती तैंना आम्हाला भेटायचं होतं.

(सर्व फोटो आमच्या परम मित्राकडून साभार. :) )

प्रतिक्रिया

अत्यंत थरारक फोटो. कल्प कल्प घडलंय या किल्ल्यावर. तो "तवा" कुठे दिसला नाही कसाकाय? बाकीचे फोटो मात्र अप्रतिमच!!! दुर्गा अन मेंढा तोफा विशेष आवडल्या. तोफेवरचा तुघरा शिलालेखही देखणा आहे. याच किल्ल्यात "नरींद्रबासां भेटि अनुसरण" या धड्यातील प्रसंग घडले असावेत. तो रामदेवराव यादव, ते भटोबास अन नरींद्रबास, ते "ना राजेहो! आमुचेया कवीकुळा बोलु लागैल", हे याच किल्ल्याच्या सदरेवर घडलेले आहे. बाकी भूलभुलैया अन खंदकाबद्दल बोलावे तितके थोडेच!! देवगिरी चखोट किल्ला हे लग्गेच कळतं यावरून.

काही प्रश्नः

१. किल्ल्यातील मंदिरे अन खंदक सोडून अ‍ॅक्च्युअल किती बिल्डिंगा यादवकालीन उरल्या आहेत?

२. मेंढा तोफ अन दुर्गा तोफ किती जुन्या आहेत? श्री दुर्गा ही अक्षरे पेशवाई काळात खोदलेली असतील की कशी? कारण पेशवा काळातच देवगिरी मराठ्यांकडे आला होता. आणि बादवे औरंगजेबाचे नाव उर्दू नै तर फारसीत कोरलेले आहे.

आणि जनार्दनस्वामींच्या पादुका हे प्लेजंट सरप्राईझ!!! मस्त :)

किसन शिंदे's picture

10 Jan 2013 - 12:52 pm | किसन शिंदे

दुरुस्तीबद्दल धन्यवाद निखील.

बहुदा असफजाहीनंतर दोनच वर्ष देवगिरी पेशवाईच्या ताब्यात होता त्यानंतर तो निजामाकडे गेला. त्या दोन वर्षात तोफेवर हि नावे कोरल्याची शक्यता नाकारता येत नाही.

बॅटमॅन's picture

10 Jan 2013 - 12:56 pm | बॅटमॅन

होय, हेही शक्य आहे. जमल्यास तोफेवरच्या फारसी लेखाचा समोरून घेतलेला फोटो टाकू शकशील का?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Jan 2013 - 12:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

माहितीपूर्ण आणि समर्पक लेख.
हे सगळं पाहून एकदा जाउन यायची इच्छा झालीये.

माहिती फोटू आवडले.
धन्यवाद. :)

स्पा's picture

10 Jan 2013 - 12:52 pm | स्पा

वाह

जबराट वर्णन .. आणि तितकेच लई भारी फोटू

दिपक.कुवेत's picture

10 Jan 2013 - 12:58 pm | दिपक.कुवेत

हेच बोल्तो....फोटो बघुन लगेच जावसं वाटतय

रुमानी's picture

10 Jan 2013 - 1:00 pm | रुमानी

मस्त......!तसे बरेचदा गेले आहे ईथे.
पण तुमचे फोटो व माहितीपुर्ण लेख बघुन परत जावेसे वाटते आहे.
आता एकदा जाउनच येते.....

मी-सौरभ's picture

10 Jan 2013 - 1:03 pm | मी-सौरभ

वाचनखूण साठवली आहे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2013 - 1:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा. लेख आवडला.

-दिलीप बिरुटे

ऋषिकेश's picture

10 Jan 2013 - 1:44 pm | ऋषिकेश

माहितीपूर्ण लेख
बाकी हा इतका भारी किल्ला बनवणार्‍यांचे आणि तो जिंकणार्‍यांचे अशा सार्‍यांच्या युद्धनितीचे कौतुक वाटते.

पैसा's picture

10 Jan 2013 - 2:01 pm | पैसा

फोटो एक नंबर. ते अपेक्षितच. किसनाकडून अभ्यासपूर्ण लेख. तेही अपेक्षितच. या इतिहासावर बिरुटे सर कधी लिहितायत वाट बघते आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2013 - 5:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> या इतिहासावर बिरुटे सर कधी लिहितायत वाट बघते आहे.
आम्ही जमेल तसं याच विषयावर मिपावर पूर्वी लिहिलं आहे. :)

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

10 Jan 2013 - 5:38 pm | पैसा

२००७ चं मला माहिती नाय हो! आता वाचते लगेच!

प्रचेतस's picture

10 Jan 2013 - 2:59 pm | प्रचेतस

मस्त रे किस्ना.
काही फोटो अजून अ‍ॅडवलेत.
सविस्तर प्रतिसाद थोड्या वेळाने.

व्वा !! किल्ला पाहुन मला आमचा भुइकोट किल्ला आठवला :)

मालोजीराव's picture

10 Jan 2013 - 3:47 pm | मालोजीराव

किल्ला एकदमच जंगी आहे.लांबून घेतलेल्या फोटो मुळे किल्ल्याची भव्यता लक्षात येतीये.आणि मस्त सविस्तर वर्णन आणि लेख धन्यवाद किसनराव.
शिवरायांशी संबंधित घटना म्हणजे शहाजी महाराजांनी केलेली दौलताबाद ची लुट आणि संभाजी महाराजांचा या किल्ल्यावरील जन्म !

विद्याधर३१'s picture

10 Jan 2013 - 7:51 pm | विद्याधर३१

संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यार झाला होता...

प्रचेतस's picture

10 Jan 2013 - 8:07 pm | प्रचेतस

वाटलंच.
हे संभाजी राजे हे शिवाजी राजांचे थोरले बंधू.
यांना अफजलखानाने दगाबाजीने ठार मारवले.

मालोजीराव's picture

11 Jan 2013 - 11:54 am | मालोजीराव

:D :D :D

प्रचेतस's picture

10 Jan 2013 - 4:46 pm | प्रचेतस

भिल्लम (पाचवा) याच्या एका ताम्रपटात 'सुरगिरिं स्वदुर्गं व्यधात' असा गौरवपर उल्लेख आला आहे. म्हणजे हा सुरगिरी नावाचा किल्ला भिल्लमाने बांधला. पाचव्या भिल्लमाचा कार्यकाळ इ.स. ११८५ ते ११९३ इतकाच आहे आणि या काळात त्याला असंख्य युद्धे करावी लागली. तेव्हा त्याने हा अभेद्य किल्ला बांधला असणे शक्यच नाही. राष्ट्रकूटांच्या मूळच्या किल्ल्यावर याने पुढे असंख्य बांधकामे केली असावीत हे नक्कीच. यादवांचे कमळचिन्हही येथे जागोजागी दिसते. आपली राजधानी त्याने येथेच हलवली असावी.

वेरूळच्या एकाश्म कैलास मंदिराची संकल्पना राष्ट्रकूट सम्राट दंतिदुर्ग याने मांडली. व पुढे हे मंदिर निर्माण राष्ट्रकूट राजा कृष्ण याच्या कारकिर्दीत सुरु होऊन पुढे कित्येक पिढ्या चालले. देवगिरीसारख्या भक्कम दुर्गाच्या पाठिंब्याशिवाय वेरूळचे अद्भूत कैलासमंदिर साकारणे शक्यच नाही. शिवाय वेरूळची कैलास लेणी आणि इथला खंदक याच्या खोदाईत कमालीचे साम्य आहे. अंधेरीचे (भुलभुलय्या) बांधकाम पण याच काळातले. यादवकाळात ही पृथ्वीच्या अंतर्भागातील ही कोरीवकामाची कला जवळपास लुप्त झाली होती. अजून एक पुरावा म्हणजे देवगिरीच्या प्रवेशद्वाराच्या एका तटबंदीतल्या एका खडकावर तसेच भारतमाता मंदिर परिसरातल्या काही भग्नावशेषांवर भगवान महावीर यांच्या मूर्ती कोरलेल्या आढळतात. यादवकाळात जैन धर्माला फारसे महत्व नव्हते. तथापी राष्ट्रकूट कालावधीत ते खूपच होते. राष्ट्रकूटांच्या काही राण्या या जैन घराण्यातल्या होत्या. वेरूळ लेणीसमूहातील जैन लेणी सुद्धा राष्ट्रकूटांनीच खोदलेल्या आहेत.

तेव्हा या किल्ल्याची मूळ निर्मिती ही राष्ट्रकूटांचीच याची कसलीही शंका नाही आणि तोही दंतिदुर्गाने बांधलेला असावा. ह्या दंतिदुर्गानेच नंतर श्रीवल्लभ अशी पदवी धारण केली.

बाकी ते दरवाजानजीकच्या हत्तीचे शिल्प मुघलकालीन असावे. अहमदनगरच्या निजामशाहीचे ते राजचिन्ह (चुभूदेघे) हत्तीच्या पायातले साखळदंड म्हणजे मुघलांनी नमवलेली निजामशाही राजवट.

मस्त माहिती रे वल्ली. धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

10 Jan 2013 - 5:51 pm | चित्रगुप्त

वाहवा. सुरेख फोटो आणि उत्तम माहिती.
... चाळीस वर्षांपूर्वी अजिंठा, वेरूळ आणि देवगिरी बघायला इन्दौरहून सायकलीने गेलो होतो, तेंव्हाच्या स्मृती जाग्या झाल्या. धन्यवाद.

मनराव's picture

10 Jan 2013 - 6:03 pm | मनराव

मस्त सफर........ देवगिरिला जायची इच्छा लवकर पुर्ण होणार अता.....

मस्त फोटोज. सुरेख माहिती. चला तुमच्या निमित्तान पहायला अन वाचायला मिळाल.

jaypal's picture

10 Jan 2013 - 6:39 pm | jaypal

भटकंती आणि फोटो आवडले.

मोदक's picture

10 Jan 2013 - 8:50 pm | मोदक

झकास फोटो.. धन्यवाद्

बाकी त्या अणुकूचीदार खिळ्यांच्या प्रवेशद्वारापाशी कोण वेडा लॉटरीची तिकीटे विकतोय..? ;-)

धन्या's picture

10 Jan 2013 - 9:33 pm | धन्या

बाकी आपलं डोकं ठीकाणावर ठेऊन समोरच्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर चढत जाणारा रागाचा पारा पाहणं, त्याचा राग "पिक"ला पोहचला आहे असं लक्षात येताच दोन पावलं मागं येऊन त्या रागाचा पारा पुन्हा हळूहळू उतरताना पाहणं हा विलक्षण अनुभव असतो हे मला याच गडावर कळलं.

प्रचेतस's picture

10 Jan 2013 - 9:38 pm | प्रचेतस

धन्या...=))

मोदक's picture

10 Jan 2013 - 10:32 pm | मोदक

का रे..?

(निरागस) मोदक.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jan 2013 - 10:50 pm | अत्रुप्त आत्मा

ऐतिहासिक धागा १ नंबर............. :-)

आणी धाग्यावरची धन्याची ऐतिहासिक प्रतिक्रीया =))

किसन शिंदे's picture

10 Jan 2013 - 11:05 pm | किसन शिंदे

:)

यशोधरा's picture

10 Jan 2013 - 10:37 pm | यशोधरा

सुरेख फोटो आणि माहिती.

झकासराव's picture

11 Jan 2013 - 10:04 am | झकासराव

जबरी फोटो आणि माहिती. :)

सौरभ उप्स's picture

11 Jan 2013 - 11:39 am | सौरभ उप्स

मस्त रे किस्ना, खूप सही आहेत फोटोस, तोफां वरचे डीटेल्स असलेले फोटोस तर मस्तच...

अनिल तापकीर's picture

11 Jan 2013 - 2:44 pm | अनिल तापकीर

जबरदस्त,

सुरेख माहिती आणि छायाचित्र!

कवितानागेश's picture

11 Jan 2013 - 5:18 pm | कवितानागेश

मस्तच आहे सगळं. मजा आली. :)

स्मिता.'s picture

11 Jan 2013 - 5:28 pm | स्मिता.

उत्तम माहिती आणि सुरेख फोटो! लेख अतिशय आवडला हे वेगळे सांगायची गरज नाही. आम्हीसुद्धा देवगिरीला जाऊन आल्यासारखे वाटले.

दीपा माने's picture

12 Jan 2013 - 1:42 am | दीपा माने

शिंदे, तुमच्या फोटोग्राफीने आणि लेखनाने प्रत्यक्ष देवगिरीवरच वावरत असल्याचा अनुभव घेतला. आपणास पुढील भ्रमंतीसाठी शुभेच्छा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jan 2013 - 2:12 am | डॉ सुहास म्हात्रे

फार पुर्वी बघीतलेला आणि केवळ पुसट आठवणीत राहिलेला देवगिरी ! तुमच्या या माहितीपूर्ण लेखाने आणि फोटोंनी आठवणींना केवळ उजाळाच मिळाला असं नाही तर माहिती नसलेला बराचसा इतिहासही समजला.

धन्यवाद !

मेघनाद's picture

12 Jan 2013 - 11:42 am | मेघनाद

छायाचित्रे आणि तुम्ही दिलेल्या माहितीमुळे देवगिरी / दौलताबाद ची अतिशय उत्तम सफर झाली.....त्याबद्दल धन्यवाद

वैभव - वैभव म्हणतात ते हेच. सुरेख सफर घडवलीत. नंदादीप च्या तेवत्या प्रकाशातील जनार्दनस्वामींच्या पादुका छायाचित्र फार आवडले. गणपती, अंलंकृत हत्ती व मेंढा तोफ सुरेखच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2013 - 10:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटु लै भारी..

नीट निरीक्षण केल्यानंतर असं कळालं कि किल्ल्याला भेट देणार्‍या पर्यटकांपैकी काही बधीर लोकांनी भांड्यावर नाव कोरायची मशीन सोबत आणून त्या तोफेवर स्वतःची नावं टाकण्याचा पराक्रम केला होता.

साल्यांना पकडून त्यांच्या टिंब टिंब वर फटके द्यायला हवे होते चाबकाचे..!!!

विशालभारतींचा देवगिरी धागा पाहून आमच्या किसनद्येवांनी लिहिलेला हा सविस्तर लेख आठवला.

एक शंका मेंढा तोफ १८० अंशातुन फिरु शकते, ती किल्ल्याकडे रोखता येत नाही असे कुठेतरी वाचले होते.
लेखात मात्र ती सर्व बाजुने फिरु शकते लिहिले आहे.
नक्की काय बरोबर आहे?

सतिश गावडे's picture

14 Nov 2014 - 12:48 pm | सतिश गावडे

धन्यवाद श्री वल्लेश गडचढवी.

या धाग्याच्या निमित्ताने एका अविस्मरणीय प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या. गेल्या साडे तीन वर्षांत मिपाकरांसोबत जेव्हढी भटकंती मिपाकरांसोबत केली तेव्हढी भटकंती मिपावर नसतो तर आपणहून मी उभ्या आयुष्यात केली नसती.

हल्ली फेसबुकवर कुणाची मैत्री विनंती येते आणि जेव्हा सामायिक मित्रांमध्ये जेव्हा चार पाच पेक्षा अधिक जण दिसतात तेव्हा "हा मिपाकर असणार" असं म्हणून मी डोळे झाकून त्या विनंतीचा स्विकार करतो.

अप्रतिम लेख . आणि फोटो सुद्धा.
मस्त माहिती मिळाली.

वेल्लाभट's picture

14 Nov 2014 - 12:41 pm | वेल्लाभट

ऐशपथ

काहीच्याकाही आहे यार ! जबराट. त्या तोफांचे फोटो.... अरारा! कसले आलेत. वाह.
आणि वर्णन म्हणजे अगदी सढळहस्ते केलंयत राव मझा आला मझा !
आहाहा.

जायलाच्च्च्च्च पाहिजे. सुंदर किल्ला. सुंदर.

वृत्तांत व गगनभेदी फोटोज बद्दल अनेक अनेक धन्स मित्रा !