पौष्टिक धिरडी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in अन्न हे पूर्णब्रह्म
2 Jan 2013 - 5:52 am

.

साहित्या:

१ वाटी ज्वारीचे पीठ
१ वाटी नाचणीचे पीठ
१ वाटी बाजरीचे पीठ
१/२ वाटी गव्हाचे पीठ
१/४ वाटी तांदळाची पिठी
१ वाटी बारीक चिरलेली मेथी
१/२ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात
२-३ लसूण पाकळ्या ठेचून घेणे
१-२ हिरव्या मिरच्या चिरुन घेणे
१/२ टीस्पून जीरे
१-१/४ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१-१/२ टीस्पून धणेपूड
मीठ चवीनुसार
तेल

.

पाकृ:

एका भांड्यात सर्व पिठं एकत्र करावी.
त्यात जीरे, लाल तिखट, धणेपूड, मीठ, ठेचलेला लसूण, हिरव्या मिरच्या, चिरलेली मेथी व चिरलेली कांद्याची पात घालून एकत्र करावे.
थोडे थोडे करुन त्यात पाणी घालावे. मिश्रण मध्यमसर असावे ,खुप जास्त पातळ नको.(मिश्रणात अजिबात गुठळी राहता कामा नये)
नॉन-स्टीक तवा मध्यम आचेवर तापवायला ठेवावा.
त्यावर थोडे तेल ब्रश करावे किंवा लाकडी चमच्याने / उलथण्याने पसरावे.
डावभर मिश्रण तव्यावर गोलाकार ओतावे व कडेने तेल सोडावे.
झाकून १-२ मिनिटे शिजवावे. एक बाजू शिजली की दुसर्‍या बाजूला धिरडे पलटावे व खरपूस भाजून घ्यावे.
लागल्यास थोडे तेल सोडावे.

.

गरमा-गरम पौष्टिक धिरडे लोणच्याबरोबर, सॉसबरोबर, रायत्याबरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावे.

.

नोटः

आवडत असल्यास ह्यात पालक , किसलेला मुळा,गाजर व बीट ह्यापैकी काही ही घालू शकता.
कांद्याच्या पातीबरोबर कांदा ही चिरुन घालू शकता.
ह्यात जवसाची पूड घालू शकता, जवस कोरडेच मिक्सरला लावून घ्यायचे व ती पूड ह्या पिठांमध्ये मिक्स करायची.

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2013 - 7:02 am | अत्रुप्त आत्मा

लै झ्याक दिसायलीत धिरडी! अशीच गरमागरम खायला मिळालि पायजेत. :-)

एकूणातच धिरडे हा प्रकार माझा आवडता असल्याने मी ही पाकृ करून बघणारच.
फोटू नेहमीप्रमाणेच छान आलाय.

धिरडी जबरदस्त बनली आहेत. भूक लागली...

- पिंगू

धनुअमिता's picture

2 Jan 2013 - 1:21 pm | धनुअमिता

सॉलिड दिसतायेत. बघुनच भूक लागली.

पैसा's picture

2 Jan 2013 - 1:28 pm | पैसा

पोटभरीचं उत्तम खाणं.

वामन देशमुख's picture

2 Jan 2013 - 4:46 pm | वामन देशमुख

पाकृ आणि फोटूज आवडले.

पूर्वी मला पोळ्या करता येत नव्हत्या (म्हणजे आता फार चांगल्या येतात असे नाही) तेंव्हा मी चक्क सरसरीत कणिक भिजवून अशी धिरडी करायचो.

दिपक.कुवेत's picture

2 Jan 2013 - 6:00 pm | दिपक.कुवेत

छान दिसतयात धिरडी....सकाळच्या नाष्त्यासाठि मस्त पर्याय दिलास...थॅक्यु

मी परवाच कणकेची धिरडी केली. जाळीदार , कुरकुरीत आणि पातळ झाली (नाही झाली तरी म्हणायला काय जातं बे ;))

बाबा पाटील's picture

2 Jan 2013 - 8:36 pm | बाबा पाटील

लय लय लय आवडत्यात धिरडी....

मस्तच... मला पण धिरडी, डोसे हे प्रकार जाम आवडतात.. छान आहे पाकॄ. :)

निवेदिता-ताई's picture

2 Jan 2013 - 10:37 pm | निवेदिता-ताई

अहाहा.......मस्तच

प्रभाकर पेठकर's picture

3 Jan 2013 - 11:03 am | प्रभाकर पेठकर

ही पौष्टिक धीरडी माझ्या उपहारगृहात नाष्ट्याला ठेवावीत अशा विचारात आहे, त्यातच सर्व कौतुक आले. अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jan 2013 - 12:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास.

-दिलीप बिरुटे

मी सगळ्या डाळी (चार वाट्या चण्याची डाळ+प्रत्येकी दोन वाट्या मूगाची व उडीद डाळ+प्रत्येकी एक वाटी मसूराची व तुरीची डाळ) आणि तीन वाट्या तांदुळ हे सर्व एकत्र दळून ठेवते. आयत्या वेळी आवडीप्रमाणे लसूण्,कांदा, कोथिंबिर वगैरे मिक्स करावे. ही पण छान होतात.

खादाड अमिता's picture

8 Jan 2013 - 10:33 am | खादाड अमिता

अरे वा! एकदम न्युट्रीयन्ट ओव्हरलोड धिरडी आहेत, मस्त!