त्याचं झालं असं की डॉमिनोजनी चीज बर्स्ट पिझ्झा चालू केला आणि आम्ही त्याच्या प्रेमातच पडलो.. एकावर एक वेगवेगळे पिझ्झे पोटात रिचवता रिचवता आमच्या ध्यानात आलं की हे प्रेम पिझ्झा या प्रकाराबद्दल निर्माण झालेलं नसून, तुकडा मोडताच त्याच्या पोटातून वाहत येणाऱ्या वाफाळत्या क्रिमी चीज बद्दल आहे. या साक्षात्कारातून आणि देशाभिमानातून एक कल्पना सुचली, की हे वाफाळते चीज भारतीय पदार्थांच्या पोटातून बाहेर पडले तर... आणि यातून साकार झाले... काही चीजाळलेले प्रयोग!
प्रत्यक्ष लिखाण सुरु करायच्या आधी ही गोष्ट नमूद करावीशी वाटते की हे सारे नेहमीचेच पदार्थ आहेत; बदल आहे तो फक्त चीजचा! त्यामुळे साहित्य,कृती इ. तपशीलवार सांगत बसत नाही. वाचकांनी फक्त कल्पना समजून घेऊन बाकीचे पदार्थही करून बघावेत!
अजून एक महत्वाची गोष्ट जी या सगळ्या पदार्थांना लागू पडते: पदार्थ गार झाल्यावर चीज पुन्हा घट्ट होते त्यामुळे हे सर्व पदार्थ गरम-गरमच भारी लागतात.
प्रयोग १: चीज गार्लिक परोठा
हा पदार्थ बऱ्याच पंजाबी हॉटेल मध्ये मिळतो. पण त्यांची करण्याची पद्धत वेगळी असते. हॉटेल मध्ये नेहमीचाच परोठा करून तो पूर्ण तयार झाल्यावर त्यावर फक्त वरून किसलेले चीज घालतात. पण अशा वरवर शिंपडलेल्या चीजमध्ये बर्स्टिंग चीजची मजा नाही! त्यामुळे आम्ही याचे नवीन रूप तयार केले.
स्टफिंगसाठी लसूणपेस्ट(किंवा लसणाचे अगदी बारीक चिरलेले तुकडे) आणि चीज स्प्रेड (ते मोझोरेल्ला, पारमेझान वगैरे काही आम्हाला कळत नाय ओ.. अमूल चीज स्प्रेड बेस्ट बघा) हे एकत्र करून घ्यावे. आम्ही एका परोठ्यासाठी २ पाकळ्या लसूण आणि २ चमचे चीज स्प्रेड वापरले(याचे प्रमाण व्यक्तीगत आवडीनुसार बदलू शकते).
परोठ्यासाठी कणकेची(आम्ही गव्हाचे पीठ वापरले, मैदाही चालेल) पोळी लाटावी. या पोळीच्या आत चीज आणि लसणाचे मिश्रण लावून घ्यावे आणि करंजीप्रमाणे घडी घालून बंद करावे. आणि तसेच तव्यावर तेल सोडून मंद आचेवर खरपूस भाजावे आणि गरम गरमच खावे. (भाजताना घ्यायची खबरदारी म्हणजे परोठ्याला जर भोक पडले तर त्यातून चीज बाहेर ओघळून तव्याचा सत्यानाश होतो, त्यामुळे सांभाळून!)
प्रयोग २: चीज आप्पे
आप्प्यांसारखे आप्पे हो! पण पोटात चीज असलेले. त्यामुळे एरव्ही आप्पे करताना जसे पीठ करतो तसे पीठ करावे. पात्राला प्रथम तेल लावून घ्यावे. आप्पे पात्रात निम्मा गोल भरेल एव्हढे पीठ घालावे. त्यात चीज क्यूबचा छोटा तुकडा (अंदाजे १सेमीx१सेमीx१सेमी) अलगद घालावा. तुकडा घालताना तो पात्राला लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. आता वरून तो चीजचा तुकडा झाकला जाईल इतपत पीठ घालावे. आणि नेहमीसारखे तेल सोडून भाजून घ्यावेत.
प्रयोग ३: चीज मसाला इडली
इथेही वरच्या प्रमाणेच कृती: इडली पात्राला थोडे तेल लावून घ्यावे. ते अर्धे भरेल एवढे पीठ घालवे. त्यामध्ये चीज स्लाईसचा तुकडा घालावा. तो तुकडा झाकला जाईल एवढे पीठ घालावे. आणि नेहमीसारख्या इडल्या कराव्यात!
आम्ही इडलीच्या पीठामध्ये चिरलेला कांदा आणि कोथिंबीर-मिरचीची पेस्ट घातली (पण ते ऑपशनल आहे).
प्रयोग ४: चीज बॉल्स
उकडलेल्या बटाट्यात तिखट मीठ घालून नीट मळुन घ्यावे. त्याच्या छोट्या छोट्या वाट्या कराव्यात. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि मिरची भरावी आणि चीज चा छोटा(पुन्हा १सेमीx१सेमीx१सेमी) तुकडा ठेवावा.
अलगद हातानी वाटी उचलून तिचा अगदी हलक्या हातानी बॉल बनवावा. पुरण पोळी करणार्यांना हे अगदीच सहज जमेल.. बाकीचे प्रयत्न करा :)
कॉर्न फ्लोर आणि पाण्याचे सरसरीत (भज्यांच्या पिठापेक्षा पातळ) मिश्रण करून घ्या. त्यात तयार केलेला बॉल घोळवून डीप फ्राय करा. आपला चीज बॉल तयार आहे !!
तयार चीज बॉल फोटो काढेपर्यंत संपून गेले. :P
टीप: या सर्व पाकृसाठी चीज १५-२०मिनिटे आधीच फ्रीज मधून काढून ठेवा. म्हणजे छान चीज बर्स्ट इफेक्ट मिळेल!
प्रतिक्रिया
31 Dec 2012 - 1:16 pm | गवि
उत्तम... प्रयोगशीलतेचं कौतुक..
करुन पाहिले पाहिजेत हे प्रकार...
31 Dec 2012 - 1:21 pm | छोटा डॉन
फोटो बघुन खपलो आहे.
अॅक्च्युअली पिझ्झा, सँडविच खरे तर फक्त चीजसाठीच खावा/खावे, बाकी काय असले काय आणि नसले काय.
- (चीजप्रेमी) छोटा डॉन
31 Dec 2012 - 1:21 pm | मृत्युन्जय
एक्दम झ्याक. :)
31 Dec 2012 - 1:22 pm | अत्रुप्त आत्मा
तुमची प्रत्येक चीज अवडली....! :-)
31 Dec 2012 - 1:37 pm | सविता००१
झकास प्रयोग आहेत. खूप आवडले :)
31 Dec 2012 - 1:50 pm | सस्नेह
ये चीज बडी है मस्त मस्त...
31 Dec 2012 - 1:51 pm | धनुअमिता
खुपच आवडले हे प्रयोग. नक्की करणार.
31 Dec 2012 - 2:02 pm | ऋषिकेश
अरे वा.. आधी इडलीवर प्रयोग करून बगह्तो ;)
31 Dec 2012 - 2:16 pm | प्रचेतस
जाम भारी प्रयोग झालेत.
31 Dec 2012 - 2:20 pm | बॅटमॅन
अतिशय अनवट चीज आहे ही!!!!!! जियो सरजी.
31 Dec 2012 - 2:26 pm | पियुशा
यम यम यम........:)
एका बदलाने साध्या पा.क्रु एकदम रिच्च वाटायला लागल्या बरे ;)
31 Dec 2012 - 2:34 pm | स्मिता.
तुमचे प्रयोग अत्यंत आवडले आहेत. नक्कीच करून पाहिले जातील. चीज असल्याने चवीला मस्तच लागणार यात वाद नाही :)
31 Dec 2012 - 2:57 pm | त्रिवेणी
खूपच मस्त
31 Dec 2012 - 3:12 pm | पिंगू
सर्वच प्रकार चीजी झाले आहेत आणि मला जेरी झाल्यासारखे वाटत आहे.... :)
- पिंगू
31 Dec 2012 - 3:18 pm | गणपा
मस्तच !
एकसे एक चीझी प्रकार.
-चीझवेडा गणा
31 Dec 2012 - 3:23 pm | jaypal
वाचन मात्र सदस्यास प्रतिक्रीया देण्यास उद्युक्त केलेत.
फोतो तरे.................................सिंप्ली सुपर्ब :-)
31 Dec 2012 - 3:45 pm | प्रीत-मोहर
स्लर्प...सल्रर्प. मस्त दिसताहेत हो हे चीझी प्रयोग.
ट्राय मारके बतावत हय
31 Dec 2012 - 4:44 pm | पिंपातला उंदीर
झाली आई बहीण आमच्या वजन कमी करण्याच्या संकल्पाची. खुन्नस काढण्यात येईल
31 Dec 2012 - 4:49 pm | जयवी
क्या बात है......सगळेच प्रयोग अफलातून :)
31 Dec 2012 - 5:04 pm | सानिकास्वप्निल
प्रयोग उत्तम जमलेत :)
एकदम जबरदस्त
इस नाचीज को यह चीज पसंद आ गयी ;)
31 Dec 2012 - 5:41 pm | पैसा
मस्त मस्त मस्त! एकेक प्रयोगावर एकेक लेख लिहिता आला असता. फोटो तर अगदी जबरदस्तच आलेत! वा! पण किती मोह झाला तरी सध्या करणार नाही म्हणजे नाही! :D
31 Dec 2012 - 5:48 pm | स्पंदना
नाही हे दोनदा एका वाक्यात आल की त्याच होय होत.
31 Dec 2012 - 5:49 pm | स्पंदना
मस्त!! करुन पाह्यल जाईल. वजन वाढल की शिव्याही दिल्या जातील.
1 Jan 2013 - 12:46 pm | बॅटमॅन
हे सर्वांत बेष्ट!
8 Jan 2013 - 8:30 pm | सूर्यपुत्र
दोन शिव्यांच्या मधे चीज घालून द्या, मस्त चीजी शेव्या होतील... :ड
बाकी धागा उघडल्याचे चीज झाले... :)
-सूर्यपुत्र.
31 Dec 2012 - 6:13 pm | प्रभाकर पेठकर
'चिझ बर्स्ट्'च्या अत्यंत आकर्षक छायाचित्रांनीच मन तृप्त झाले. त्यातही, ६वे छायाचित्र, अप्प्यांचे, अगदी लाजवाब.
मसालेदार प्रॉन्सच्या पाककृतीवरही चिझ किसून घातले की 'चिझी प्रॉन्स' झकास लागतात.
31 Dec 2012 - 7:42 pm | मीनल
हे पदार्थ स्वादिष्ट असतीलच. आम्हाल चीज खूप आवडतं. पण डाएट चे काय? चरबी वाढते ना चीज खाऊन! त्यामुळे चीज खाणे कंट्रोल करावे लागते.
31 Dec 2012 - 7:42 pm | मीनल
हे पदार्थ स्वादिष्ट असतीलच. आम्हाल चीज खूप आवडतं. पण डाएट चे काय? चरबी वाढते ना चीज खाऊन! त्यामुळे चीज खाणे कंट्रोल करावे लागते.
31 Dec 2012 - 7:53 pm | रेवती
मला चीज आप्पे व चीज बॉल्स जास्त आवडले.
31 Dec 2012 - 9:38 pm | मित्थु
अप्रतिम. चीज हि आमची पन अतिशय आवडती चीज.. तुमचे कौशल्य मात्र वाखाणण्या जोगे आहे.
1 Jan 2013 - 4:46 am | कौशी
फार आवडल्या पाकक्रुती..
1 Jan 2013 - 7:00 am | चित्रा
तुमची उद्यमशीलता आणि प्रदर्शन छान आहे! :-)
1 Jan 2013 - 9:58 am | अक्षया
धागा उघडुन पाहिल्याचे चीज झाले..मस्तच.
1 Jan 2013 - 10:16 am | किसन शिंदे
अफलातून!!
1 Jan 2013 - 12:50 pm | यशोधरा
झक्कास!
1 Jan 2013 - 1:11 pm | रुस्तम
मी पण घडीचा चीज पराठा बनवतो. मस्त होतो. बाकी आप्पे एकदम भन्नाट.
1 Jan 2013 - 1:12 pm | सर्वसाक्षी
चीज झाल म्हणायच. धन्यवाद.
1 Jan 2013 - 3:15 pm | ज्योति प्रकाश
लई बेश्ट बघा.आवडल्या गेले आहे.मस्तच.
1 Jan 2013 - 9:35 pm | रामदास
असेच म्हणतो.
2 Jan 2013 - 9:36 am | अस्मी
व्वाह!! एकदम भारी!!
सर्व प्रयोग फर्मास जमलेआहेत...
2 Jan 2013 - 4:54 pm | वामन देशमुख
मस्तच फोटूज आणि कल्पनाज, अनुपराव!
लवकरच तुम्ही गणपा, सानिकास्वप्निल, प्रभाकर पेठकर, रेवती... अश्या दिग्गज बल्लवाचार्य/ सुगरणींच्या ओळीत जाऊन बसणार असं दिसतंय !
2 Jan 2013 - 5:14 pm | वेताळ
एकदम झक्कास.....
2 Jan 2013 - 9:48 pm | Mrunalini
मस्तच एकदम... कोणाला चीज आवडत नाही, असे होउच शकत नाही.
2 Jan 2013 - 11:18 pm | ५० फक्त
लई बेक्क्काअर भारी, जर्मन टोस्ट हा देखील प्रकार करुन पहा.
पुण्यात असाल तर या एकदा, बसुयात एखाद्या चीजबरोबर.
1 Feb 2013 - 3:49 pm | II श्रीमंत पेशवे II
प्रयोग खूपच स्तुत्य आहेत.
27 Apr 2016 - 7:16 pm | एस
हे चीझ बॉल्स भारी चविष्ट लागतात. मागे एकदा केले होते. आता परत करणे आले.
27 Apr 2016 - 8:39 pm | भाग्यश्री कुलकर्णी
काय टेंम्पटींग आहेत फोटो.उचलून खावेसे वाटतात चीज बॉल आणी आप्पे.मस्त.
27 Apr 2016 - 8:56 pm | अत्रुप्त आत्मा
कुणी वर आणला हा धागा? दुत्त दुत्त!
28 Apr 2016 - 1:55 am | वीणा३
पराठे करते चीज घालून नेहमी, बाकी पण नक्की करून बघेन. फोटो अतिशय सुंदर!!!
28 Apr 2016 - 9:10 pm | विवान
लसुण (१० पाकळ्या ) + अमुल बटर + चीझ समप्रमाणात( २५ ग्राम प्रत्येकी) एकत्र करावे. पावावर लावुन ओवन मधे रोस्ट करावे. सोपा प्रकार आहे.