माझ्या आईची ही रेसिपी. एकदम सोप्पी आणि हमखास सुपर डुपर हिट होणारी आहे.
साहित्य :
मस्त लाल गाजरं - ५-६
लसूण पाकळ्या ५-६
मीठ चवीप्रमाणे
गूळ - चवीप्रमाणे
लिंबाचा रस - चवीप्रमाणे
केप्र कैरी लोणचं मसाला - ४ टॅबल स्पून
फोडणीसाठी तेल - चांगलं वाटीभर
मोहरी
हिंग
कृती:
१. गाजरं अगदी बारीक चिरुन घ्यायची. हे सगळ्यात महत्वाचं ! गाजरं जितकी बारीक आणि एकसारखी चिरल्या जातील तितकं लोणचं छान लागतं आणि दिसतं.
२. लसूण पाकळ्या सुद्धा बारीक चिरुन घ्या.
३. त्यात मीठ, लिंबाचा रस, गूळ आणि लोणच्याचा मसाला घालून मस्तपैकी मिसळायचं.
४. फोडणी तयार करुन त्यात मोहरी आणि हिंग घालून ते तेल गरमच ह्या मिश्रणावर घालायचं आणि मिसळायचं.
एकदम रसरशीत गाजराचं लोणचं तय्यार
लोणच्यासारखं खाल्लं तर १०-१५ जण खाऊ शकतात ;)
अधिक टिपा:
फोडणी घालायच्या आधी सगळं मिश्रण चमच्याने नाही तर हाताने कालवायचं. म्हणजे मस्त छान पाणी सुटतं आणि सगळा मसाला व्यवस्थित लागतो.
ह्यात जर पातीचा लसूण मिळाला तर बेस्ट.
आपली नेहेमीची गाजरं मिळाली तर उत्तम पण केशरी गाजराचं लोणचं सुद्धा झकास लागतं.
गाजरं चिरायच्या ऐवजी किसायची मात्र नाही....मज्जा येत नाही !! थोडी मेहेनत करुन बारीक चिरुनच करायचं लोणचं.
प्रतिक्रिया
26 Dec 2012 - 2:56 pm | सूड
किती दिवस टिकतं ?
26 Dec 2012 - 3:45 pm | जयवी
हे लोणचं फार दिवस टिकत नाही. फ्रीजमधे ठेवावं लागतं. पण हे टिकण्यासाठी उरतच नाही हा माझा अनुभव आहे :)
26 Dec 2012 - 4:06 pm | वामन देशमुख
फोटू छान दिसतोय. चवही मस्तच असणार.
माझ्या घरी असे लोणचे बऱ्याचदा करतात आणि त्यात कांद्याच्या बियांची (कलौन्जी) फोडणी घालतात.
26 Dec 2012 - 4:11 pm | दादा कोंडके
केप्रचं तयार गाजर लोणचं मिळत नाही का? :)
26 Dec 2012 - 6:55 pm | ज्योति प्रकाश
आजच फ्लोवर्,गाजराच लोणचं घातलं.पन लसूण घातली नाही.परत तुमच्याप्रमाणे करून बघेन.
26 Dec 2012 - 7:00 pm | मदनबाण
रसरशीत धागा... ;)
26 Dec 2012 - 7:08 pm | रेवती
अरे वा! सोपं लोणचं आहे. मी हे नक्की करणार. मला केप्रचा मसाला शोधावाही लागणार नाही (वाचतोयस ना परा?). फोटू पाहूनच रसरशीतपणाचा अंदाज येतोय. मस्त. हे लोणचं लोणच्यासारखं खाल्लं जात नाही. ;)
26 Dec 2012 - 9:41 pm | रामदास
येता जाता टपल्या मारायच्या ... वांड असेल पण मनानी अगदी श्यामसारखा आहे हो पोरगा !!!
27 Dec 2012 - 3:40 am | रेवती
कोण? परा? काय म्हणता?
;)
27 Dec 2012 - 11:26 am | परिकथेतील राजकुमार
मी पायाला, मनाला, लेखणीला कुठ्ठे कुठ्ठे घाण लागू नये म्हणून सतत जपत असतो बरे.
बाकी काकूंना तिकडे केप्रचा मसाला कुठे मिळाला म्हणे ? इकडच्या फुजीच्या इंडिया मार्ट मध्ये सगळी बोंबच आहे.
27 Dec 2012 - 7:29 pm | रेवती
इकडे केप्रचा मसाला, भाजणी (साधी/उपासाची), अगदी शेवभाजीचा मसालाही मिळतो (मी तो कधी वापरला नाही). सातूचे पीठ मिळते. आता तू इकडेच का रहायला येत नाहीस? साधा समुद्र तर ओलांडायचाय. ;)
27 Dec 2012 - 10:56 am | ५० फक्त
श्याम कोण ?
27 Dec 2012 - 12:13 pm | कवितानागेश
मानव?! :P
8 Jan 2013 - 9:37 pm | इनिगोय
अंहं, मनोहर.
26 Dec 2012 - 7:12 pm | दिपक.कुवेत
कसलं टेप्टिंग दिसतय. करायला पण एकदम सोप्प...पण आता इथे केप्रचा मसाला कुठे शोधु?
26 Dec 2012 - 8:23 pm | पैसा
मस्तच दिसतय!
27 Dec 2012 - 4:07 am | शुचि
काय सुपर्ब फोटो आहे :)
27 Dec 2012 - 11:13 am | जयवी
धन्यवाद लोक्स :)
27 Dec 2012 - 10:03 pm | अत्रुप्त आत्मा
फो.............टूऊऊऊऊऊऊऊउ
30 Dec 2012 - 5:57 pm | सानिकास्वप्निल
फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटलयं
नक्की नक्की करून बघणार , घरात लोणचं मसाला आहेच :)
धन्यवाद
1 Jan 2013 - 3:38 am | दीपा माने
लोणच्याचा रसरशीतपणा बघुनच तोंडाला पाणी सुटलं म्हणुन लगेच लिहुन ठेवली पण प्रतिसाद द्यायचा राहुनच गेला तो आता देते आहे. जातीच्या कलावंताला काहीही सुरेखच जमते. तुमचे आणि तुमच्या आईंचे आभार.
1 Jan 2013 - 5:24 pm | अनन्न्या
आणि तोंडाला पाणी सुटलं....
10 Jan 2013 - 11:35 am | बॅटमॅन
हे लोणचं तर मातोश्रींनी केल्याकेल्या भाजीगत खाऊन संपवत असू आम्ही. आहाहाहा काय आठवण करून दिलीत वाह!!!!
11 Jan 2013 - 3:08 pm | जयवी
:)
15 Jan 2013 - 7:12 pm | रश्मि दाते
खुप छान रेसेपि आहे,करुन पाहील्,आवड्ले घरी सगळयाना.
15 Jan 2013 - 9:57 pm | दिव्यश्री
पण एक शन्का, केप्र लोणचे मसाला ण मिळाल्यास पर्याय काय?
घरी मसाला करता येइल का?
16 Jan 2013 - 11:32 am | जयवी
धन्यवाद :)
जर्मनीकर...... मसाला मिळाला नाही तर तिखट, थोडी मोहरीची पूड घालून मेकप करता येईल :)
23 Jan 2013 - 6:32 pm | समंजस
गाजराचं लोणचं अतिशय आवडतं (मिरचीच्या लोणच्या व्यतिरीक्त).
मोठ्या लांब फोडी असल्यास उत्तम :)
(घरी केलेलं लोणचं लवकरच खराब होत असल्यामुळे विकत घेणे हाच पर्याय सध्या आहे).