साहित्य: कणीक, तेल, मीठ, साखर, किसलेली गाजरे व सोलून किसलेली बीटरूटस् एक मोठा बाऊल प्रत्येकी, ३ हिरव्या मिरच्या व पेरभर आलं यांची पेस्ट (चवीनुसार प्रमाण कमी जास्त करावे), लिंबूरस व कोथिंबीर.
कृती: चमचाभर तेल व किंचित मीठ घालून कणीक थोडी घट्ट भिजवावी.
तेलाचा हात लावून बाजूला झाकून ठेवावी.
आता एका पातेल्यात एक टेबलस्पून तेल तापवावे. त्यात आलं, मिरचीची पेस्ट परतावी.
अर्ध्या मिनिटानंतर भाज्यांचे कीस घालावेत. एक वाफ आल्यावर मीठ, साखर, लिंबूरस घालावे.
हलकेच एकत्र करून मिश्रणाला पुन्हा एक वाफ आणावी व कोथिंबीर घालावी.
आता हे सारण ताटलीत पसरून गार करावे. पराठा करण्यासाठी मध्यम आंचेवर तवा तापत ठेवावा.
मोठी पुरी करता येईल इतपत कणकेचे छोटे गोळे करावेत. एक मोठी पुरी लाटून बाजूला ठेवावी.
दुसरी पुरी लाटून घ्यावी व त्यावर दोन मोठे चमचे सारण पसरवावे.
आधी लाटलेली पुरी यावर ठेवून कडा दाबून घ्याव्यात. आता लाटणे हलकेच फिरवून पराठा लाटावा.
तव्यावर तेल सोडून खरपूस भाजावा व लोणचे, दही यापैकी जे आवडत असेल त्याबरोबर गरमगरम वाढावा.
*ही पाककृती एका पाककला स्पर्धेत पहिल्यांदा पाहिली होती व नंतर माझ्याकडील पुस्तकात पाहून करून बघितली.
प्रतिक्रिया
26 Dec 2012 - 7:30 am | रश्मि दाते
मस्त दिसत आहेत आजच करुन पाह्ते नाश्त्याला
26 Dec 2012 - 9:06 am | प्रचेतस
व्वा!! पराठे खूपच छान दिसताहेत.
26 Dec 2012 - 9:20 am | ऋषिकेश
असे पराठे आम्ही करतो पण अशी मांडणी कधी करता येईल तो सुदिन.
पराठे तव्यावरून पानात आणि पानातून पोटात कधी जातात हे पोटालाही कळत नाही ;)
26 Dec 2012 - 6:11 pm | प्रियाकूल
अगदी असेच म्हणायचे होते.
26 Dec 2012 - 11:21 am | सूड
सारण सगळीकडे सारखं लागलेलं दिसतंय !! मस्त !!
26 Dec 2012 - 11:55 am | जयवी
वा मस्त दिसताहेत :)
26 Dec 2012 - 12:03 pm | वामन देशमुख
पराठे, विशेषतः त्यांचे चतकोर ठेवलेले तुकडे अप्रतीम!
केवळ बीटरूटांचे पराठे-धपाटे ही चविष्ट होतात. मी लवकरच त्यांची पाकृ इथे लावीन.
26 Dec 2012 - 12:19 pm | निवेदिता-ताई
व्वा...........काय मस्त दिसताहेत... तो. पा. सु.
त्या शेजारचे लोणचेही चविष्ट दिसते आहे.....
26 Dec 2012 - 12:24 pm | मदनबाण
वाह्ह... :)
26 Dec 2012 - 12:39 pm | पैसा
पराठे एकदम भारी दिसतायत. कात्री इथे पण? :D
26 Dec 2012 - 1:21 pm | सस्नेह
मस्त रंगबिरंगी पराठे !
पण रेवती हे गोड लागत असतील ना ?
26 Dec 2012 - 2:08 pm | कवितानागेश
मस्त दिसतायत. :)
26 Dec 2012 - 2:08 pm | गणपा
पराठे 'गोड' दिसतायत. :)
बीट आवडत नसल्याने त्याच्या ऐवजी अंडे घालून करावे असा मानस आहे. ;)
26 Dec 2012 - 2:27 pm | स्मिता.
पराठे एकदम मस्त दिसतायेत. बीटसारख्या भाजीचा एवढा चविष्ट पदार्थ केल्याबद्दल रेवतीताईला सलाम!
26 Dec 2012 - 4:46 pm | प्यारे१
आय्च्या गावात... मस्त दिसताहेत.
बाकी रेवती आज्जी, यू टू?????
आता रंगाआबोबा काय करणार? (पळा च्यामारी)
26 Dec 2012 - 5:27 pm | भुषण
छान आहेत .मी इथे नवीन आहे .प्रथमच प्रतिक्रिया देत आहे .
26 Dec 2012 - 5:32 pm | Mrunalini
मस्तच दिसतायत पराठे... करुन बघायला पाहिजे...
26 Dec 2012 - 5:42 pm | परिकथेतील राजकुमार
'परा' शब्द आला म्हणजे सगळे काही उतमच असणार हे नक्की.
चला, आता इकडे सोमालीयात पेरभर आलं शोधणे आले.
26 Dec 2012 - 5:45 pm | स्मिता.
तू सोमालियात कसा काय रे? परवा तर टास्मानियात होतास ना?
26 Dec 2012 - 7:18 pm | रेवती
धन्यवाद मंडळी.
पैतै, कात्रीने नाही उलथण्याने तुकडे केलेत. ;)
स्नेहांकिता, कधीकधी बीटरूटस् गोड असतात पण यावेळी फारशी गोड नव्हती म्हणून अगदी थोडी साखर घातली.
गणपा, बीट आवडत नसले तर फक्त गाजराचे पराठे कर.
परा, पेरभर आलं शोधण्यापेक्षा ते शोधण्यासाठी व्यक्ती शोधून आण.
सर्व प्रतिसादकांचे पुन्हा आभार.
26 Dec 2012 - 7:19 pm | दिपक.कुवेत
पराठे चविष्ट असणार ह्यात शंकाच नाहि...हे पराठे आणि नुसतं जीर/मीठ लावलेलं दहि...बास इस जुम्मे रात यहिच बनाने बोलेगा...
26 Dec 2012 - 11:32 pm | प्रभो
वाह आज्ज्जे!!
30 Dec 2012 - 5:54 pm | सानिकास्वप्निल
गाजर-बीटाचे पौष्टीक पराठे खूपच आवडले गं
मस्तचं दिसत आहे :)
31 Dec 2012 - 11:14 am | रुमानी
मस्त....!
31 Dec 2012 - 12:45 pm | अत्रुप्त आत्मा
3 Jan 2013 - 9:56 am | प्रभाकर पेठकर
बीटरुटच्या 'गोड' स्वभावामुळे वर्ज्य आहे. बीटरुट ऐवजी बारीक चिरलेला कॉलीफ्लॉवर, फरसबी वापरून, व्हेज परोठा करून, पाहिला पाहिजे.
ह्या सारणावर 'चीझ' किसून घातले की मी 'सरणावर' चढायला मोकळा.
4 Jan 2013 - 12:45 am | चित्रा
गुळाच्या पो़ळीसारखे दिसते आहे. पण अर्थातच चविष्ट असणार.
4 Jan 2013 - 6:27 pm | अनन्न्या
यात लसूण कशी लागेल?
4 Jan 2013 - 7:33 pm | रेवती
यात लसूण मला तरी आवडणार नाही. बीट व गाजर हे मुळातच किंचित गोड असतात त्याच्याशी लसणीचा स्वाद जुळत नाही असे वाटते.
8 Jan 2013 - 10:40 am | खादाड अमिता
मी हे पराठे करून बघितले, एकदम चविष्ट झाले. :)