मिसळपाववरील बढतीमध्ये आरक्षणावरील चर्चेत अनेकांनी जाती-पातींच्या निराकरण करण्यावर भर दिला आहे, जे स्तुत्य आहेच. यातून आपण जाती किती मानतो याबद्दल एक सर्वेक्षण करायचे मनात आले. त्यासाठी प्रतिसाद-गट म्हणून ऐसीअक्षरे आणि मिसळपाव.कॉम या दोन संस्थळांवरच्या सदस्यांमध्ये एकत्रितपणे हे सर्वेक्षण करत आहे.
या सर्वेक्षणात भाग घ्यायची इच्छा असेल तर पुढील नियम पाळावेतः
१. पुढे जे प्रश्न विचारले आहेत, त्यात तुम्हाला योग्य वाटणारा एकच पर्याय निवडायचा आहे. शक्य होईल तितके प्रामाणिक उत्तर द्यावे
२. 'इतर' हा पर्याय निवडल्यास समर्पक स्पष्टीकरण द्यावे
३. सर्वेक्षणातील प्रश्नांची उत्तरे व्यनीतून कळवायची आहेत. उत्तरे माझ्या म्हणजे 'ऋषिकेश' या सदस्याला व्यनीतून पाठवावीत. आपली उत्तरे प्रतिसादातून जाहिरपणे देऊ नयेत ही विनंती.
४. सर्वेक्षणाचा कालावधी एक आठवडा आहे. सदर सर्वेक्षण २५ डिसेंबर रोजी भाप्रवे रात्री १२:०० वाजता संपेल. त्यानंतर (मला :) ) उपलब्ध वेळेनुसार निष्कर्ष जाहिर केले जातील.
ज्यांना सर्वेक्षणात भाग घ्यायची इच्छा नाही, त्यांनी हे प्रश्न स्वतःच्या मनाला विचारावेत आणि स्वतःपुरता काय तो आरसा धरावा. मात्र कृपया २५ डिसेंबरच्या आधी याप्रश्नांवर अशी जाहीर चर्चा करू नये ज्यामुळे लोकांना प्रामाणिक उत्तरे देणे कठीण जाईल किंवा त्यांच्या उत्तरांवर प्रभाव पडेल.
चला तर सुरू करूया! ज्यांना सर्वेक्षणात भाग घ्यायचा आहे त्यांनी यापुढील प्रश्नांची उत्तरे मला व्यनीतून कळवायची आहेत
===============
सर्वेक्षणपूर्व समज: तुम्ही 'जात' अजिबात मानत नाही असे तुम्हाला वाटते का?
अ. होय
ब. नाही
बेटी व्यवहारः
१. तुम्ही विविहीत असल्यास तुम्ही आंतरजातीय विवाह केला आहे काय?
अ. होय
ब. नाही
क. गैरलागू (अविवाहीत)
२. तुम्ही अ. लग्नेच्छुक असल्यास ब. 'अरेन्ज्ड मॅरेज' असल्यास क. केवळ तुमच्या वैयक्तीक निर्णयावर लग्न ठरेल अशी मुभा असल्यास तुम्ही तुमच्या जातीबाहेरच्या जोडीदाराला प्राधान्य द्याल का?
अ. होय
ब. नाही
क. सांगता येत नाही
ड. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे)
ई. जातीच्या तथाकथित उतरंडीवर आमच्यापेक्षा उच्च जात असेल तरच चालेल
३. तुम्ही अ. लग्नेच्छुक असल्यास ब. 'अरेन्ज्ड मॅरेज' असल्यास क. केवळ तुमच्या वैयक्तीक निर्णयावर लग्न ठरेल अशी मुभा असल्यास तुम्ही तुमच्या जातीबाहेरच्या जोडिदाराचा विचार कराल का?
अ. होय
ब. नाही
क. सांगता येत नाही
क. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे)
ई. जातीच्या तथाकथित उतरंडीवर आमच्यापेक्षा उच्च जात असेल तरच चालेल
४. तुम्ही अ. लग्नेच्छुक असल्यास ब. 'अरेन्ज्ड मॅरेज' असल्यास क. तुमच्या कुटुंबाच्या एकत्रित निर्णयावर लग्न ठरेल अशी परिस्थिती असल्यास तुम्ही जातीबाहेरच्या जोडिदाराचा विचार कराल का?
अ. होय
ब. नाही
क. सांगता येत नाही
क. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे)
ई. जातीच्या तथाकथित उतरंडीवर आमच्यापेक्षा उच्च जात असेल तरच चालेल
५. जर ३/४/५ प्रश्नांपैकी एकाचे उत्तर जातीबाहेरच्या जोडिदाराचा विचार करणार नाही / काही अटींसहीत करू असे असेल तर तसे का?
अ. रोजच्या व्यवहारातील सवयी प्रत्येक जातीत वेगळ्या असतात.
ब. खाण्याच्या सवयी जातीनुसार बदलतात.
क. आम्हाला शेवटी याच समाजात रहायचे आहे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही हो पण मग लोक आम्हाला बाजूला सारतील
ड. इतर
ई. गैरलागू
६. जर तुमच्या अपत्याने अ. स्वेच्छेने आंतरजातीय विवाह करायची इच्छा व्यक्त केली ब. अरेन्ज्ड मॅरेज करायचे असेल तर तुम्ही आंतरजातीय जोडीदार शोधायला परवानगी देऊन त्या प्रक्रियेत स्वतः सहभागी व्हाल का?
अ. होय, आनंदाने
ब. होय पण नाखुशीने
क. परवानगी देऊ पण स्वतः प्रक्रीयेत सहभागी होणार नाही
ड. नाही
७. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानूसार दोघांपैकी एक जोडीदार अनुसुचित जाती किंवा जनजातींपैकी असेल तर अपत्यास आरक्षण मिळू शकते. या कारणास्तव तुम्ही स्वतः अनुसूचित जातीपैकी नसूनही जोडीदार अनुसुचित जाती किंवा जनजातींचा असला तर चालेल का?
अ. नाही
ब. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी संबंध नाही, तसेही चालेल
क. असा जोडीदार शोधायला जाणार नाही पण या निकालामुळे आता मिळाला तर चालेल असे वाटते
ड. गैरलागू (स्वतः त्या जातीतला असल्याने)
ई. इतर
८. जातीच्या उतरंडीवर स्वतःच्या जातीपेक्षा वरच्या जातीचा जोडिदार चालेल का?
अ. होय
ब. नाही
क. गैरलागू (सध्या एका विवाहबंधनात आहे)
रोटी व्यवहार
९. तुम्ही घरी जेवण करायला एखादी व्यक्ती ठेवलीत तर त्या व्यक्तीची जात / धर्म विचारात घेता का?
अ. होय
ब. अजिबात नाही
क. जात नाही पण धर्म घेतो
ड. धर्म नाही पण जात घेतो
१०. जर प्र क्रं ९ चे उत्तर 'ब' नसेल तर, तसे का?
अ. हरेक जाती/धर्माशी निगडीत अशा माझ्या काही स्वच्छतेच्या कल्पना आहेत.
ब. काही जाती / धर्माच्या व्यक्ती सामिष भोजन करतात जे आमच्या घरी वर्ज्य आहे
क. माझ्या कुटुंबियांपैकी काहिंचा अजूनही जातींच्या उतरंडीवर / शिवाशिवीवर विश्वास आहे. त्यांची मने दुखवायची माझी इच्छा नाही
ड. जेवणातून 'संस्कार / विचार' झिरपतात असा माझा समज आहे
ई. इतर
फ. गैरलागू (प्र. ९ चे उत्तर ब)
११. हॉटेलात जाताना तुम्ही मालकाची जात बघता का?
अ. होय.
ब. नाही.
क. सहसा नाही.
ड. सहसा होय.
१२. तुम्ही तुमच्या लहान अपत्याला सांभाळायला एखाद्या पाळणाघरात ठेवत असाल किंवा एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरी ठेवत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीची जात/धर्म बघता का?
अ. होय
ब. अजिबात नाही
क. जात नाही पण धर्म घेतो
ड. धर्म नाही पण जात घेतो
१३. जर प्र क्रं १२ चे उत्तर 'ब' नसेल तर, तसे का?
अ. हरेक जाती/धर्माशी निगडीत अशा माझ्या काही स्वच्छतेच्या कल्पना आहेत.
ब. काही जाती / धर्माच्या व्यक्ती सामिष भोजन करतात जे आमच्या घरी वर्ज्य आहे. त्याव्यक्तीने माझ्या अपरोक्ष माझ्या अपत्याला तसे भोजन दिलेले मला चालणार नाही.
क. सतत सोबत असणार्या व्यक्तीकडून काही 'संस्कार / विचार' झिरपतात असा माझा समज आहे. मला इतर धर्माचे किंवा जातीचे विचार माझ्या अपत्यावर झालेले नको आहेत.
ई. इतर
फ. गैरलागू (प्र. ९ चे उत्तर ब)
इतर व्यवहार
१४. समजा तुमचे एखाद्या व्यक्तीशी भांडण झाले तर तुम्ही त्या व्यक्तीला जातीवरून हिणवता किंवा शिव्या देता का?
अ. होय, बहुतांश वेळा
ब. क्वचित पण होय
क. अजिबात नाही
१५. एखाद्या व्यक्तीची वर्तणूक खटकली किंवा तुमच्यापेक्षा वेगळी वाटली तर तुम्ही त्याचा संबंध (किमान मनातल्या मनात) त्या व्यक्तीच्या जातीशी लावता का?
अ. होय, बहुतांश वेळा
ब. क्वचित पण होय
क. अजिबात नाही
१६. जातींचा आणि आर्थिक परिस्थितीचा, शिक्षणाचा संबंध आहे असे तुम्ही मानता का?
अ. होय, बहुतांश वेळा
ब. क्वचित पण होय
क. अजिबात नाही
१७. जातींमुळे काही व्यक्तींना शिक्षणापासून, नोकर्यांपासून, बढतीपासून वंचीत रहावे लागते असे तुम्हाला वाटते का?
अ. होय, काही वेळा
ब. होय, अनेकदा
क. अजिबात नाही
ड. बढतीमध्ये नाही, बाकी होय
ई. शिक्षणात नाही, बाकी होय
फ. इतर
सर्वेक्षणानंतर आरसा: तुम्ही जात अजिबात मानत नाही असे तुम्हाला वाटते का?
अ. होय
ब. नाही
===============
प्रतिक्रिया
18 Dec 2012 - 12:59 pm | बाळ सप्रे
जर एखादा जात मनत नसेल तर त्याला "तुमच्या जातीबाहेरच्या जोडीदाराला प्राधान्य द्याल का?" असा प्रश्न विचारणेच योग्य वाटत नाही. त्या व्यक्तिच्या दृष्टीने "जात" हा क्रायटेरियाच मुळी अस्तित्वात नाहीये. म्हणजे त्या व्यक्तिच्या इतर क्रायटेरियात (शिक्षण, व्यवसाय, स्वभाव, भाषा, ई.)बसणारा जोडीदार त्याच्याच जातीतला निघाला तर तुमचा सर्वेक्षणानंतरचा आरसा सांगणार - "नाही"
हे म्हणजे "तुम्ही तुमच्या बायकोला मारहाण करणे थांबवले का?" असा प्रश्न विचारण्यासारखे आहे.
18 Dec 2012 - 1:56 pm | गवि
यात फरक आहे. जात मानणे / न मानणे यातला "मानणे" हा शब्द बराच विस्कळीत आहे. मानणे याचा या संदर्भात अर्थ केवळ जात ही कन्सेप्ट आणि तिचं अस्तित्व आहे हे मान्य (अॅक्नॉलेज अशा अर्थाचा मराठी शब्द जास्त योग्य) करतो ऊर्फ "जाणीव आहे" अशा अर्थाने घेतला तर अनेक निर्जातीय"वादी" लोकही त्यात येतील.
इथे "जात मानतो का?" याचा अर्थ जात आणि त्यामुळे येणारे उच्चनीच ऑर अदरवाईज फरक योग्य आहेत अशी भावना बाळगतो का? असा अर्थ प्रश्नकर्त्याला अपेक्षित असावा.
अशा वेळी जात मानत नाही याचा अर्थ "डिनायल" मोड मधे जातो आणि जात? छे बुवा.. ते काय असतं.. असं काही नसतंच.. (भूतबीत सब झूठ) असा घ्यायचा नसून जात्याधारित उच्चनीचता या कल्पनेवर विश्वास आहे का असा घ्यायचा असावा.
मग इतर प्रश्न सयुक्तिक ठरतील. बाकी खुलासा धागाकर्ता करेल कदाचित..
एकच उदाहरण घेतो (जुनी खोड):
समजा: माझ्या शेजारच्या फ्लॅटमधे असलम बेग कुटुंबासहित राहतो.
अशा वेळी
१. असलम बेग हा मुस्लिम आहे हे मला माहीत आहे. त्याच्या घरी मांसाहार होतो हेही मला माहीत आहे. त्यांच्या चालीरीती माझ्या घरापेक्षा वेगळ्या आहेत याची मला जाणीव आहे. या सर्वाचा माझ्या आणि असलमच्या सामाजिक नात्यावर काही परिणाम होत नाही. त्याच्या घरी मासे तळतात तेव्हा मात्र त्या वासाचा आम्हाला त्रास होतो आणि तशी स्पष्ट तक्रार त्याच्याकडे करण्याइतका मोकळेपणा आमच्यात आहे. (किंवा उलट : त्यांच्या घरी जी मटण बिर्याणी बनते तशी माझ्या इतर हिंदू मित्रांच्या घरी किंवा हॉटेलात मिळत नाही. ती अस्सल बिर्याणी चापायला मी त्याच्या घरी जातो) == जात धर्म न मानणं.
२. असलम बेगचा धर्म मला माहीत असण्याचं कारण नाही. कोणीच हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही. तो त्याच्या घरी काहीही खात असला मी माझ्या घरी काहीही खात असलो तरी आपण सर्वजण एकच आहोत. आपण सर्व "मानव" आहोत. धर्माचं नाव काढलं म्हणजे आपण धार्मिक झालोच. मी आणि असलम एकच आहोत.. माझी जात मला माहीत नाही. जातीच्या नावानेही मला किळस येते.. == डिनायल मोड.
३. असलम मांसमच्छर खातो. "त्या" धर्माचे सगळे लोक मांस खातात. हे नेमके इथेच राहायला का आले? त्याच्या पोरीपासून आपला पोरगा दूर रहावा हे बरं. सोसायटीच्या मीटींगमधे चर्चा करुन अमुक धर्माच्याच लोकांना फ्लॅट विकता येतील असा नियम करुन घ्यावा हे बरं. === जातीयवादी / धर्मवादी == जातपात मानणारा..
18 Dec 2012 - 2:07 pm | ऋषिकेश
बरोबर आहे.
ज्यांना जात या कन्सेप्टचे अस्तित्त्वच मान्य नाही त्यांच्यासाठी हे सर्वेक्षणच गैरलागू ठरावे.
बाकी टंकनश्रम वाचवल्याबद्दल आभार, गवि! :)
18 Dec 2012 - 3:27 pm | बाळ सप्रे
प्रश्नकर्त्याच्या प्रश्नाच्या अर्थाविषयी अजिबात दुमत नाही. जात मानतो का ? म्हणजे जातीतून येणारी उच्चनीचता मानता का ? असाच अर्थ मीही घेतला.. म्हणूनच पहिला प्रश्नाच्या "नाही" अशा प्रामाणिक उत्तरानंतर आणि पुढील प्रश्न योग्य वाटत नाहीत ..
जर जात हा क्रायटेरिया असेल (कमी महत्वाचा का असेना)रोटी/बेटी व्यवहारासाठी तर पहिल्या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर "हो" असेच असेल..
18 Dec 2012 - 3:33 pm | गवि
हम्म.. बरोबर म्हणताय. सुरुवातीला पूर्णपणे "नाही" म्हणणारे लोक शेवटी "हो" वर येणं. मानणारे लोक वेगवेगळ्या पातळीपर्यंत ती कल्पना मानत असणं त्यामुळे थेट हो किंवा नाही असं बायनरी उत्तर न येणं (उदा: एका गटाला रोटी व्यवहारात फरक पडत नाही, पण बेटी व्यवहारात पडतो.. एका गटाला अरेंज्ड मॅरेजमधे अन्य जात शोधत जाणं अस्वाभाविक वाटतं पण ऑलरेडी प्रेम आदि जमलेलं असेल तर फरक पडत नाही वगैरे) याचा अर्थ ते सर्व दांभिक आहेत असा होत नाही. अधल्यामधल्या मिश्र कल्पनांनीच ही व्यवस्था घट्ट बांधलेली आहे हेही यातून स्पष्ट होऊ शकतं. त्यामुळे प्रश्नावली ठीकच वाटते..
19 Dec 2012 - 5:46 pm | बाळ सप्रे
बायनरी उत्तर नसते म्हणूनच ..
कदाचित पहिला प्रश्न "आपण जात मानता का?" ऐवजी
"आपल्या जीवनात जातीचे महत्व किती? (१-१०स्केल)" असा चालला असता..
आणि सर्व प्रश्नांच्या उत्तरानंतर तो आकडा किती बदलतो ते दाखवल्यास पुढील प्रश्न योग्य वाटले असते.
19 Dec 2012 - 6:33 pm | गवि
+१
19 Dec 2012 - 6:43 pm | प्रकाश घाटपांडे
सहमत
20 Dec 2012 - 8:41 am | ऋषिकेश
छान कल्पना आहे. मला अजिबात सुचली नाही.
आता बर्याच जणांनी उत्तरे पाठवली आहेत तेव्हा बदल करता येणार नाही.. बघु पुन्हा कधीतरी ही आयड्याची कल्पना वापरू :)
18 Dec 2012 - 1:28 pm | सस्नेह
ऋषिकेश, उपक्रम चांगला आहे. पण केवळ आंजावरिल लोकांच्या मतांचा सर्व्हे केल्याने एकूण समाजाच्या जातिविषयक मतांचा गोषवारा समजू शकेल का, असा प्रश्न आहे.
18 Dec 2012 - 1:48 pm | ऋषिकेश
बरोबर आहे, सगळ्या समाजाचे हे प्रातिनिधीक चित्रण नसेल हे मान्य आहे.
पण 'हे ही नसे थोडके' या न्यायाने काही प्रश्न विचारले आहे. शक्य तितके नेमके प्रश्न विचारायचा प्रयत्न करत आहे. अर्थात नंतर काढणार्या निष्कर्षांमध्ये या सर्वेक्षणाच्या मर्यादा स्पष्ट करणार आहेच
मुद्दामच मिसळपाव आणि ऐसीअक्षरे या दोन संस्थळांवर हे सर्वेक्षण करत आहे, जेणे करून जास्तीतजास्त मते आजमावता येतील.
18 Dec 2012 - 2:40 pm | सुधीर
एकाच व्यक्तीने त्याच्या सर्व डू-आयडींसहीत सर्वेक्षणात भाग घेतला तर सर्वेक्षणाच्या एकंदर निकालावर कसा परिणाम होईल?
18 Dec 2012 - 2:07 pm | ५० फक्त
हे लिखाण जातिवाचक लिखाण या सदराखाली येत नाही का ? यातुन काही कायदेशीर अडचणींना मिपाला सामोरे जावे लागेल काय ?
कारण अशा प्रकारचे लिखाण इतर कुठल्या माध्यमांत सहसा दिसुन येत नाही, म्हणुन ही शंका. आणि हल्ली सगळ्यांच्याच भावना फार हळव्या झालेल्या आहेत, दुखावतात लगेच.
25 Dec 2012 - 11:50 am | खटासि खट
आदरणिय पैसाजी
हे लिखाण जातिवाचक लिखाण या सदराखाली येत नाही का ? यातुन काही कायदेशीर अडचणींना मिपाला सामोरे जावे लागेल काय ? >>>>>
असं वाटत नाही. लिखाणामागचा हेतू महत्वाचा असतो. जातीनिर्मूलनाला कायद्याने विरोध कसा असू शकेल ? कायद्याच्या रक्षकांचं अज्ञान हा चिंतेचा विषय आहे पण त्याकडे दुर्लक्ष करावे. या सर्वेमधून काही झालं तर चांगलंच होईल. प्रामाणिक उत्तरं दिली गेली तर एक सँपल सर्वे म्हणून समाजामधे किती बदल व्हायला हवा हे समजेल. समाज जातींचा मिळून बसलेला आहे. प्रत्येक जात हा एक वेगळा देश आहे. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, रीतभात हे वेगळं आहे म्हणूनच हा सर्वे सर्वसमावेशक आहे याची खात्री असायला हवी. माझ्या मते सदस्याची जात विचारणेही चूक नाही. तरच सर्वेमधे कुठल्या जातीचे किती लोक होते आणि त्यांचा ट्रेण्ड काय हे देखील समजलं असतं. अर्थात ही माहीती उघड न करण्याचे बंधन अशा वेळी सर्वेकर्त्यावर असायला हवे का हा एक प्रश्न निर्माण होईल.
प्रश्नपत्रिका थोडीशी किचकट झालेली आहे. पुढच्या वेळी सोपी प्रश्नपत्रिका असावी. आजच हे पाहील्यानं भाग घेता आला नाही. धन्यवाद.
25 Dec 2012 - 2:15 pm | पैसा
प्रतिक्रिया कोणी लिहिलीय ते वाचून उत्तरे देत चला. तुम्ही अजून भाग घेऊ शकता. ऋष्या थांबेल थोडा.
25 Dec 2012 - 5:37 pm | खटासि खट
असं झालं का ?
बरं बरं. ते आमचे ५० पैसे समजा. आता सगळं कायद्यात बसेल असं वाटतं.
26 Dec 2012 - 8:51 am | ऋषिकेश
+१ तसंही काल रात्रीपर्यंत वेळ आधीच दिला होता. आताही पाठवत असाल तरी कळवा.. कुठेतरी थांबायला हवं म्हणून एक वेळ दिली होती. :)
18 Dec 2012 - 2:15 pm | तर्री
जाती व्यवस्था हे हिंदू धर्माचे एक महत्वाचे अंग आहे.
जात "जन्मानुसार" ठरते हे मात्र निषेधार्थ !
जाती भेद व जाती द्वेष हे मात्र संपता संपत नाहीत हे चित्र उद्विग्न करणारे आहे. काही राजकारणी जाती द्वेष अधिक पसरवत आहेत.
18 Dec 2012 - 3:59 pm | इरसाल
मी जात मानत नाही.
माझ्याच गावात मी प्लॉट घेण्याकरिता ब्रोकर बरोबर फिरत होतो. दुपारची वेळ होती मला जबरदस्त तहान लागली म्हणुन रस्त्याच्या बाजुच्या घरात जवुन पाणी मागितले त्यासरशी तो ब्रोकर ताडकन रस्त्याच्या दुसर्या बाजुला जावुन उभा राहिला. मी आपला पाणी प्यायलो आणी गेलो त्याच्या कडे तो मला टाळुन चालत होता. त्या आधी तो मला म्हणतो कसा " तुम्ही त्या घरी पाणी प्यायलात...त्या घरी... तुम्हाला माहित आहे ही गल्ली कोणती आहे ?
मी म्हटलो नाही.मग त्याने ते विषद केले. असो मला त्याचे काही नाही पण नंतरच्या त्याच्या वागणुकीत फरक होता तो होताच.
सरकारी कार्यालयात समजा मला कोणी जात विचारली आणी मी म्हटलो माणुस तर काय होईल ह्याचे उत्तर प्रत्येकाने मनाशी विचारुन बघावे.
अहो एवढच काय मी जातीबाहेर लग्न केले तर माझ्या भावा-बहिणीच्या लग्नाला किती अडचणी येतील ? तेव्हा दबावाखाली का होईना मला "जात" पाळावीच लागेल.
18 Dec 2012 - 10:15 pm | आनंदी गोपाळ
त्या एरियात प्लॉट घेऊ नका. स्वस्तात मिळाला तरी. विकायच्या वेळी तोच ब्रोकर वाट लावील तुमची. गावाची वागणूक त्याने दाखवून दिली आहे तुम्हाला. तुम्ही 'माझ्याच' गावात म्हटलेत तरी तुम्हाला बाहेरचा म्हणून तो खपवतो आहे.
ब्रोकरची जमात लै हल्कट. शेवटी 'दलाल' आहे तो, हे लक्षात ठेवा.
18 Dec 2012 - 6:20 pm | पैसा
मी कोकणस्थ आहे आणि नवरा सारस्वत. बघितलं तर त्या दोन्ही एका जातीच्या पोटजाती आहेत. पण आमच्या घरच्या प्रथा आणि खाण्याच्या सवयी यात भारत-पाकिस्तान इतका फरक आहे. आता हे माझं लग्न आंतरजातीय म्हणावं का हेच माहित नसल्यामुळे पुढच्या प्रश्नांना पास.
18 Dec 2012 - 8:57 pm | नितिन थत्ते
इरावती कर्वे यांच्या म्हणण्यानुसार कोकणस्थ/देशस्थ/सारस्वत वगैरे या "ब्राह्मण" जातीच्या पोटजाती नाहीत. ब्राह्मण अशा नावाची कुठलीही जात नाही. (त्यामुळे तुमचं आंतरजातीयच :) )
देशस्थाच्या दृष्टीने देशस्थ हे ब्राह्मण बाकी सगळे इतर...
कोकणस्थाच्या दृष्टीने कोकणस्थ हे ब्राह्मण बाकी सगळे इतर ... :)
18 Dec 2012 - 9:23 pm | पैसा
हे "इतर" प्रकरण माहिती असल्यानेच गप्प बसत आहे! :D
18 Dec 2012 - 9:32 pm | दादा कोंडके
त्यो मिशीवाला म्हन्ला हिंदू आसा धर्म न्हाई. ही बाई म्हंती बामन आशी जातच न्हाइ. कल्युग आलं जनू.
19 Dec 2012 - 8:53 pm | रामदास
बाकी सगळे इतर .सगळे ओबीसी (अदर ब्राह्मण क्लासेस)
19 Dec 2012 - 4:40 am | Nile
आपण कोकणस्थ असल्याचे सांगण्याची एकही संधी सोडणार नाहीत!!! ;-)
-इतरेतर
20 Dec 2012 - 8:42 pm | पैसा
'कोकणस्थ' शब्द दिसताच झोपी गेलेला जागा झालास काय?
18 Dec 2012 - 6:33 pm | तर्रीबाज
२१ तारखेला जगबुडी व्हतीय म्हनत्यात.
नंतर २५ तारखेला नाताळ हाय.
मंग पिऊन पडन्याचा शीझन हाय.
या पाहनीचा निकाल कवा वाचावा बरं?
18 Dec 2012 - 10:17 pm | आनंदी गोपाळ
पिऊन पडल्या पडल्या, टांगटिंगमधे वाचला तर्री चालेल ;)
18 Dec 2012 - 6:40 pm | यशोधरा
जातीपाती संबंधित धागे मिपावर आणू नये अशी घोषणा झाली होती ना?
18 Dec 2012 - 8:31 pm | विकास
मला केवळ या संदर्भात एकच सांगायचे आहे, (किंबहूना आठवत आहे!): "न जात पर ना पात पर, मुहर लगाओ हाथपर!" ;) बाकी जाती कशा पाळायच्या ते सरकार ठरवेलच. ;)
18 Dec 2012 - 10:19 pm | आनंदी गोपाळ
तरी स्साले येडीझामचे कमळावर बटनं दाबून येतात. काय करावं ब्वा! ;)
18 Dec 2012 - 11:02 pm | मृगनयनी
ह्म्म... ज्यांच्या लग्नकुन्डलीत लग्नी केतू आणि बाय डीफॉल्ट सप्तमात राहू असतो.. अश्या व्यक्ती हमखास इन्टरकास्ट किन्वा इन्टररिलिजन लग्न करतात...किन्वा रिलेशनशीपमध्ये राहतात...
तसेच सप्तमात राहूबरोबर गुरु असेल..तर असे इन्टररिलिजन विवाह लाईफ लॉन्ग टिकतात...
त्याचबरोबर गुरुचा खडा- 'पुष्कराज' जर लाभत नसताना बोटात घातला..तर त्याचा (साईड) इफेक्ट हा इन्टररिलिजन अफेअर्स होण्यामध्ये होतो...
आपले आई-वडील, भाऊ-बहीण, जोडीदार कोण असावेत तसेच जातीत किन्वा जातीबाहेर लग्न होणे..किन्वा अफेअर होणे हे पूर्व जन्मीच्या बर्या वाईट ऋणानुबन्धांवर अवलम्बून असते...
बाकी चालू द्या.....
18 Dec 2012 - 11:07 pm | दादा कोंडके
आता हा प्रतिसाद वाचल्यानंतर चालण्यासारखं काय राहिलय? :)
19 Dec 2012 - 12:14 am | विकास
सहमत
19 Dec 2012 - 10:41 am | llपुण्याचे पेशवेll
आपले आई-वडील, भाऊ-बहीण, जोडीदार कोण असावेत तसेच जातीत किन्वा जातीबाहेर लग्न होणे..किन्वा अफेअर होणे हे पूर्व जन्मीच्या बर्या वाईट ऋणानुबन्धांवर अवलम्बून असते...
सहमत.
19 Dec 2012 - 8:43 pm | सुहास..
आपले आई-वडील, भाऊ-बहीण, जोडीदार कोण असावेत तसेच जातीत किन्वा जातीबाहेर लग्न होणे..किन्वा अफेअर होणे हे पूर्व जन्मीच्या बर्या वाईट ऋणानुबन्धांवर अवलम्बून असते...
सहमत.
"फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची " -अरुण म्हात्रे >>>>
सही आणि विचारांमध्ये ईतका डिफर्न्स ????
"जात, ग्रह आणि जोकर्स ज्योतिष्यींना आण समोर कधी,
पैसा हाचि एक धर्म साबित करूनि दाखवितो वा समाधी" -वाश्या कात्रे
19 Dec 2012 - 8:55 pm | रामदास
प्रणयस्थानातला राहू या संदर्भात ?
20 Dec 2012 - 10:48 pm | मृगनयनी
हा 'राहू' कोणत्या राशीचा आहे.. यावर बर्याच गोष्टी अवलम्बून असतात..पण पन्चमातला राहू.. माणसाला कुशल राजकारणी बनवतो..या स्थानचा उच्चीचा राहू उत्तम लीडर बनू शकतो.. हा राहू नाजूक प्रणयापेक्षा उन्मुक्त प्रणयचेष्टा उर्फ रापचिक फ्लर्टिन्ग करायला उद्युक्त करतो. अर्थात शुक्र कोणत्या स्थानी व कोणत्या राशीत आहे.. हे जास्त महत्वाचे आहे. शुक्र नीचीचा म्हणजे कन्या राशीचा किन्वा षष्ठात असेल. किन्वा हर्षल-नेपच्यून बरोबर बिघडलेला असेल. तर या राहूचा काहीही उपयोग नसतो.. अश्या व्यक्तींचा प्रेमामध्ये 'तेरे नाम' मधला सलमान होतो.
* मिथुनेचा राहू उच्चीचा मानला जातो. त्या खालोखाल कन्येचा राहू उच्चीचा मानतात. वृषभेचा रोहिणीचा राहू आयुष्यात काहीही कमी पडू देत नाही. चन्द्राबरोबर राहूची युती त्या व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी विषप्रयोग घडवून आणते. बुध आणि शुक्र हे राहूचे मित्र आहेत.
19 Dec 2012 - 8:59 pm | सुहास..
ह्म्म... ज्यांच्या लग्नकुन्डलीत लग्नी केतू आणि बाय डीफॉल्ट सप्तमात राहू असतो.. अश्या व्यक्ती हमखास इन्टरकास्ट किन्वा इन्टररिलिजन लग्न करतात...किन्वा रिलेशनशीपमध्ये राहतात... >>>
अछ्छा ! म्हणजे कृष्ण आणि राधा यांच्या लग्नकुन्डलीत लग्नी केतू आणि बाय डीफॉल्ट सप्तमात राहू होता तर !! पण मग ते स्साल बायकांचे कपडे पळवुन उगा च्यायला झाडावर बासरीवर 'बायकी राग' वाजवाणारा कुठला ग्रह होता ब्वा ????? बाकी आमच्या एका काळ्या सावळ्या मित्राच्या रिलेशनशीपमध्ये मात्र लयी मोठा धोका झाला म्हणे !! मित्र तीन तोंडाच्या पुरुषाच्या नाभीतून जन्मला नाही म्हणुन का ? की नदीकाठी मेलेल्या गायी-म्हशीचें चमडं गोळा फिरत होता म्हुणुन ??? काय कळत नाय ब्वा ..समजवा !!
तसेच सप्तमात राहूबरोबर गुरु असेल..तर असे इन्टररिलिजन विवाह लाईफ लॉन्ग टिकतात... >>>
राहु मासा लई वेळा खाल्ला आहे मी !! बाकी हे सप्तमात राहूबरोबर गुरु बघायला काही विशीष्ट लोक्स वर जावुन बसलेले असतात का ? काय च्यामायला खर्च त्याच्या !! एखादं वेदकालीन स्पेस - शटल ठेवलेले आहे यांच्या बापाने ते माहीत च नाही मला , असेल तर ( फुकटात ) मी बी येतो ब्वा !!
त्याचबरोबर गुरुचा खडा- 'पुष्कराज' जर लाभत नसताना बोटात घातला..तर त्याचा (साईड) इफेक्ट हा इन्टररिलिजन अफेअर्स होण्यामध्ये होतो... >>>>
च्यायला हे असले खर्च करण्यापेक्षा डायरेक्ट बोट घालण्याने किती 'इन्टररिलिजन अफेअर्स' होतील ...बाकी त्या पुष्कराज ला ईग्रंजी शब्द समजतात हे वाचुन , पामरांस अमंळ मौज वाटली.
आपले आई-वडील, भाऊ-बहीण, जोडीदार कोण असावेत तसेच जातीत किन्वा जातीबाहेर लग्न होणे..किन्वा अफेअर होणे हे पूर्व जन्मीच्या बर्या वाईट ऋणानुबन्धांवर अवलम्बून असते... >>>>
हा हा हा हा हा हा
यु आर माय पम्पकिन पम्पकिन
हॅलो हनी बनी
येडी च्यायला !!
19 Dec 2012 - 9:41 pm | बॅटमॅन
पूर्ण सहमत!!!! (चक्क)
20 Dec 2012 - 10:50 pm | मृगनयनी
@ सुहास.. इयर एन्डिन्ग'ची पार्टी लवकर सुरु केलीत का? :)
19 Dec 2012 - 10:04 pm | बाळ सप्रे
म्हणजे
पूर्वजन्मीचे बरे ऋणानुबन्धांवर => जातीत लग्न
आणि
पूर्वजन्मीचे वाईट ऋणानुबन्धांवर => जातीबाहेर लग्न
असे समजायचे का?
याचा अर्थ ज्योतिष जातीय उच्चनीचता मानते आणि म्हणून ज्योतिष मानणारे जातीय उच्चनीचता मानतात असा निघतो !!
18 Dec 2012 - 10:12 pm | आनंदी गोपाळ
अॅडव्हान्समधे सर्व्हेचं उत्तर किंवा ते काय म्हणतात? 'निष्कर्ष' सांगू का?
(सर्वे मधे asl = वय / लिंग / लोकेशन हे सदर घातले असतेत तर बरे झाले अस्ते असे माझे मत.)
१. रोटी व्यवहारात आजचा कोणताच शहरवासी जातपात पाळत नाही.
२. बेटी व्यवहारात तथाकथित उच्चशिक्षित व स्वतःस जातपात न पाळणारे लोकही कच खातात. विषेशतः धर्माच्या बाबतीत.
इतर जात हवी च असली, तर आपल्या धर्माची, अन शक्यतो आपल्या पेक्षा 'वरच्या' जातीत मुलगी गेली तर हरकत नसावी असाच बहुतेकांचा ओढा असतो.
३. तरुणाईला शष्प फरक पडत नसतो. त्यांना वाट्टेल ते करून मोकळे होतात.
४. लोकांना कितीही समजावून सांगितले, की बाबाहो, २५ तारखे आधी 'चर्चा' करू नकाऽऽऽ तरीही ते करणारच!
19 Dec 2012 - 8:57 pm | रामदास
हे तत्व मी पण इमानेतबारे पाळत होतो.
18 Dec 2012 - 11:56 pm | निनाद मुक्काम प...
मी जातीच्या पलीकडे गेलेलो आहे ,मला हे सर्वेक्षण लागू होत नाही.
आता एक आर्य म्हणून मी आर्य वंशीय मुलीशी लग्न केले हा एक योगायोग होता की माझी नियती हे मला ठाऊक नाही,
आता नक्की आर्य म्हणजे कोण ह्यावर अनेक चर्चासत्र झडतात व दावे पेश केले जातात.
तेव्हा
एकंदरीत अवघड आहे सगळ
आपण बुआ मानवता ही जात मानतो.
जिभेवर गांधी , बुद्ध ही नावे सतत जाणीवपूर्वक ठेवतो,
त्याने जर्मनीत एक भारतीय व हिंदू म्हणून जगणे सुलभ होते.
19 Dec 2012 - 1:35 am | बॅटमॅन
आर्य आणि आर्यवंश वैग्रे प्वाईंट्स काढून आर्यगोळे आपलं चर्चाबाँब नका हो फेकू ;) बाकी शमत हाय हेवेसांनल.
19 Dec 2012 - 8:34 pm | निनाद मुक्काम प...
एखाद्याचा धाग्याने शतक पार पाडले तर त्यात आपला खारीचा वाटा असावा म्हणून हा यत्न
बाकी माझा जाती बाबत एक अनुभव असाही आहे की मी जरी जात विसरायचे म्हटले
तरी इतर लोक मला ती विसरू देत नाही.
परदेशात सुद्धा मला आणि केट ला जेव्हा एखादा भारतीय भेटतो तेव्हा तो माझे आवर्जून आडनाव विचारतो , ह्या मागील गूढार्थ माझ्या पत्नीस कळत नाही की आपल्याकडे नुसत्या आडनावाने एखाद्या व्यक्तीविषयी बरेच काही अंदाज ,बांधले जातात.
ह्या आधुनिक काळात जातीला राजकीय परिमाण लाभल्याने
जात नाही ती जात ही युक्ती नाईलाजाने खरी ठरली आहे.
आपण ती मानली किंवा नाही मानली त्याने काहीही फरक पडत नाही.
25 Dec 2012 - 2:39 pm | परिकथेतील राजकुमार
देश सोडला तरी हे भिकरचोट भारतीय काही पाठ सोडत नाहीत बघा.
19 Dec 2012 - 2:25 am | रेवती
ऋ, तुझा वेळ जात नाहीये का? कायतरी दुसरं शोध ना मनुष्या टाईम्पास करायला. जातपात, पापपुण्य, स्त्रीमुक्ती, निवासी अनिवासी, पुणेरी, पुणेकर याशिवाय आणखी एखादा विषय मिळेल का? ;)
19 Dec 2012 - 9:33 am | पंकज
लग्नाच्या जाहिराती पाहिल्या तर समाजाचा आंतरजातीय लग्नाला विरोध नसल्याचे लक्षात येते.
http://epaper.loksatta.com/75525/indian-express/16-12-2012#page/4/3
19 Dec 2012 - 9:47 am | प्रकाश घाटपांडे
उलट आंतरजातीय विवाह हे खूप कमी प्रमाणात आहेत (जातीय विवाहांच्या तुलनेने) हेच जाणवते. फक्त ब्राह्मण वधू वरांसाठी अशा विवाहमंडळांच्या जाहिराती आढळतात.
19 Dec 2012 - 10:35 am | सस्नेह
शाळाप्रवेशापासून रेशनकार्ड्पर्यंत सर्व प्रकारच्या सरकारी/खाजगी अर्जांमध्ये जोपर्यंत 'जात' हा क्लॉज भरणे कंपल्सरी आहे, तोपर्यंत 'जात' जाईलसं वाटत नाही.
19 Dec 2012 - 11:19 am | पंकज
'जात' हा क्लॉज काढला की सरकारी कागदपत्रातून जात नक्की जाईल. पण लग्नाच्या जाहिरातीतील "SC/ST क्षमस्व" ही ओळ काढण्यासाठी बाराच वेळा जावा लागेल.
21 Dec 2012 - 3:54 am | दीपा माने
जोपर्यंत बौध्दिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय फायदे मिळतात तोपर्यंत जात जगातुन जाणार नाही.इथे अमेरिकेत माझ्या मैत्रिणीने तिच्या मुलाच्या बाबतीत तो मुलगा प्राथमिक शाळेत असताना घडलेली वस्तुस्थिती सांगितली. ती म्हणाली, एक दिवस शाळेतून घरी आल्यावर आईला विचारत होता की त्याच्या वर्गातला ब्राम्हण मुलगा टीचरला सांगत होता की तो मुलगा जातीने मैत्रिणीच्या मुलापे़क्षा सुपेरियर आहे.तिचा मुलगा हिरमुसला होवुन आईला विचारत होता की मी काय म्हणुन त्याच्यापेक्षा इन्फेरियर आहे. ज्या घरांमधुन सात समुद्र ओलांडुन जातपातीचा असा बाऊ पुढील पिढ्यांना शिकवला जात असेल तेथे भारतात फोफावलेल्या जातीचा वृक्ष लगेचच कसा उन्मळुन पडेल?
21 Dec 2012 - 4:14 am | दीपा माने
मला थोडे अधिक सांगायचे एवढ्याचसाठी की मैत्रिण जेव्हा दुसर्या दिवशी शाळेत गेली तेव्हा वर्ग टिचरकडुन तो मुलगा कोण आहे ते कळले. माझ्या मैत्रिणीच्या मुलाला त्याचा वर्गबंधु 'ब्राम्हण' जातीचा आहे म्हणजे काय ते माहीत नव्हते. हे त्याची आई वर्गात गेल्यावर सर्व प्रकार त्याच्या टिचर कडून समजला. पण दुसर्या मुलाने त्याचा उल्लेख inferior to him असा केल्याने हे महाशय हिरमुसले. हा मैत्रिणीचा मुलगा पुढे त्याच्या बुध्दिबळाने अति बुध्दिवान मुलांसाठीच्या हायस्कुलमध्ये सिलेक्ट होऊन प्रसिध्द युनिव्ह्र्र्सिटीतुन पदविधर झाला.
21 Dec 2012 - 7:53 pm | विकास
दुर्दैवी उदाहरण आहे. आणि त्याला माझ्या लेखी त्या मुलाचे आईवडील जबाबदार आहेत. आता हा मुलगा प्दवीधर झाला आहे म्हणजे गतकाळातील उदाहरण वाटत आहे. आमच्या शाळकरी मुलीस आणि तिच्या सभोवतालच्या इतर भारतीय (हिंदू) मुला-मुलींना त्यांच्या जाती माहीत असल्याचे दिसत नाही. त्यावरून बोलणे तर लांबच राहूंदेत.
21 Dec 2012 - 11:41 am | अनन्न्या
लहान मुलांना जात वगैरे काही कळत नाही. एकदा माझ्या मुलाने शाळेतून आल्यावर विचारले, आई आपली जात कोणती गं? बाईंनी छात्रबोधिनीत लिहून आणायला सांगितलय! जात अशी कळते. ती आधी सरकारी कागद्पत्रातून काढावी लागेल.
21 Dec 2012 - 12:48 pm | गवि
रा.भा. शिर्के प्रशाला का?
21 Dec 2012 - 6:55 pm | अनन्न्या
छात्रबोधिनीवरून ओळखलत का?
22 Dec 2012 - 8:07 am | गवि
हो.. आठवण आली शाळेची खूप त्या शब्दाने..
22 Dec 2012 - 12:36 pm | यसवायजी
"नावावरुन धर्म आणी आडनावावरुन जात कळते" म्हणुन कदाचित मिपा वर सुद्धा आय्-डी घेतले जातात..
सहमत?
25 Dec 2012 - 10:40 am | ऋषिकेश
सर्व प्रतिसादकांचे आणि सर्वेक्षणात भाग घेणार्यांचे आभार.
ज्यांना या सर्वेक्षणात अजूनही भाग घ्यायची इच्छा आहे त्यांनी आज भाप्रवे रात्री १२ च्या आत आपली उत्तरे पाठवावीत.
यानंतर सर्व उत्तरांचा अभ्यास आणि वर्गीकरण करून निष्कर्ष इथे जाहिर करेन
25 Dec 2012 - 1:58 pm | आनंदी गोपाळ
-आ.गो.