कंट्री क्लब चिकन

स्मिता.'s picture
स्मिता. in पाककृती
26 Nov 2012 - 9:14 pm

कालपर्यंत कधी युरोपियन पदार्थ घरी करून बघण्याचे धाडस केले नव्हते. फारसे मसाले नसलेले पदार्थ घरी केले तर अगदीच बेचव होतील अशी अनाठायी भीती हे त्याचं कारण होतं की आळस हे सांगणं अवघड आहे. पण काल इतर सर्व कामांना आळशीपणामुळेच सुट्टी दिली आणि ही पाकृ करायला घेतली. चवीला फक्कड झाली ही नवर्‍याकडून पावती मिळाल्यामुळे इथेही देण्याचा उत्साह वाटला. इथल्या तमाम बल्लव-सुगरणींना स्मरून सुरुवात करते.

साहित्यः
४ - ६ चिकन ब्रेस्ट पिसेस
१ मोठा कांदा
पाव किलो मश्रूम
१ कॅन क्रीम-मश्रूम सूप (कॅन न मिळाल्यास बाजारात मिळणारे कोणतेही क्रीम-मश्रूम सूप चालेल)
१ सफरचंद
१ कप व्हाईट वाईन (ऐच्छिक)
१ कप किसलेले शेडार किंवा कोणतेही क्रीमी चीज
पाव किलो बारीक फरसबी
बटर/तेल
मीरपूड
मीठ

----

कृती:

प्रथम चिकन व्यवस्थित स्वच्छ करून त्याचे जास्तीचे पाणी टिश्यु पेपरने टिपून घ्यावे.त्यावर सर्व बाजूंनी भरपूर प्रमाणात (आपापल्या कुवतीनुसार) मीरपूड आणि चवीनुसार मीठ घालून बाजूला मुरायला ठेवावे. फार जास्त वेळ मुरवायची गरज नाही. १५-२० मिनीटे पुरेशी आहेत.

चिकन मुरते तोवर कांदा बारीक कापून घ्यावा. सफरचंदाची साल जाड असेल तर ती काढून घ्यावी. साल जाड नसेल तर सफरचंद स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यावे.
मश्रूम स्वच्छ धुवून जरा निथळल्यावर त्यांचे जास्तीचे देठ कापून टाकावे व उभे काप करावे.

ही सर्व पूर्वतयारी झाल्यावर एका सपाट बुडाच्या पसरट भांड्यात बटर किंवा तेल तापत ठेवावे. त्यावर मीरपूड आणि मीठ लावलेले चिकनचे तुकडे दोन्ही बाजूनी जरा ब्राऊन होईपर्यंत शेकून (शॅलो फ्राय) घ्यावे. चिकन साधारण ८०% शिजले पाहिजे.
आता हे शॅलो फ्राय केलेले चिकनचे तुकडे एका चिनी मातीच्या उथळ पसरट भांड्यात (कॅसेरोल) काढून घ्यावेत.

आता त्याच पसरट भांड्याला मध्यम आचेवर ठेवून उरलेल्या बटर/तेलात कापलेला कांदा घालावा व परतावा. २-३ मिनिटानी तो मऊ झाला की त्यात मश्रूमचे काप घालावे आणि सर्व मिश्रण नीट एकत्र करावे आणि २-३ मिनीटे शिजू द्यावे. मश्रूम थोडे मऊ झाले की त्यांना पाणी सुटायच्या आत त्यात बारीक चिरलेले सफरचंद घालावे.

आता हे सर्व मिश्रण ३-४ मिनीटे शिजू द्यावे. त्यात मश्रूमच्या अंदाजाने मीठ आणि मीरपूड घालावी. मात्र मीठ जास्त घालू नये. क्रीम-मश्रूम सूपमधे मीठ असते. यानंतर त्यात व्हाईट वाईन घालावी. वाईन वापरायची नसल्यास त्याच्या जागी चिकन स्टॉक, व्हेज स्टॉक किंवा साधे गरम पाणी वापरता येते.

आता या भांड्यातल्या मिश्रणाला उकळी आली की त्यात क्रीम-मश्रूम सूप घालावे. क्रीम-मश्रूम सूपच्या घनतेनुसार गरज वाटल्यास थोडे गरम पाणी बेतानेच घालावे. (पाणी किंवा स्टॉक खूप जास्त घालू नये. मी नेमके तेच केल्याने ग्रेव्ही जरा पातळ झाली) हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे व ३-४ मिनीटे उकळू द्यावे.

आता कपभर (किंवा जास्तही... विशेष फरक पडणार नाही) किसलेले चीज त्यात घालून ते पूर्ण वितळून एकजीव होईपर्यंत ढवळावे.

ही तयार झालेली ग्रेव्ही कॅसेरोलमधे काढलेल्या चिकनच्या तुकड्यांवर घालावी.
चिकनचे तुकडे आणि ग्रेव्ही घालून भरलेले कॅसेरोल आधीच १७५ डिग्री से. (३५० डिग्री फॅ.) वर गरम करून ठेवलेल्या ओव्हनमधे २५ ते ३० मिनीटे ठेवावे.

मधल्या वेळात या चिकनसोबत पोटभरीचे खाणे म्हणून बीन्स तयार कराव्या. बारीक फरसबी निवडून, साफ करून घ्यावी. एका भांड्यात पाणी उकळायला ठेवावे. पाणी उकळायला लागले की त्यात फरसबी टाकून २ मिनीट ठेवावे आणि लगेच त्यांना चाळणीत काढून निथळून घ्यावे. कॅन मधल्या बीन्स मिळत असतील तर हे सर्व करायची गरज नाही.

ओव्हनमधे ३० मिनीटे झाली की गरम कॅसेरोल त्यातून काळजीपूर्वक बाहेर काढून घ्यावा.

चमच्याने त्यातील चिकन आणि ग्रेव्ही एका प्लेट मधे घ्यावे, त्यावर पार्सली किंवा ड्राईड हर्ब्स भुरभुरावे, बाजूला बीन्स घ्याव्या आणि सोबतीला आवडीचा ब्रेड घेवून ताव मारावा.

---

टिपा:
१. चिकन, क्रीम-मश्रूम सूप आणि चीज हे सर्व जड पदार्थ असल्याने मी सोबतीला कॉम्प्लिमेंटरी भाजी म्हणून बीन्स घेतल्या आहेत. त्याला आवडीप्रमाने बदलण्याकरता अनेक पर्याय आहेत. बीन्स नको असतील तर सोबतील स्पॅगेटी, मॅश्ड पोटॅटो, साधा भात हे पर्यायसुद्धा छान लागतील.
२. घरात ओव्हन नसल्यास किंवा त्यात बेकिंगची पायरी गाळायची असल्यास चिकन शॅलोफ्राय करतांनाच पूर्ण शिजवून त्यावर ग्रेव्ही घालूनही चांगले लागेल.

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Nov 2012 - 9:16 pm | बिपिन कार्यकर्ते

सॉल्लिड!

पैसा's picture

26 Nov 2012 - 9:19 pm | पैसा

क्या बात है! माझ्या पोरांना नक्की आवडेल.

सानिकास्वप्निल's picture

26 Nov 2012 - 9:48 pm | सानिकास्वप्निल

बोले तो झक्कास :)
मस्तच गं

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Nov 2012 - 9:53 pm | निनाद मुक्काम प...

अजून येऊ दे
तुमच्या देशाच्या खाद्य पदार्थांच्या रेसिपी आल्यात तर अजून बहार येईल.

विशाखा राऊत's picture

26 Nov 2012 - 10:31 pm | विशाखा राऊत

मस्तच ग :)

वाह! छान सादरीकरण. वेगळी पाकृ.
चिकन ब्रेस्ट हे ड्रमस्टीक्सपेक्षा लवकर शिजतात का?

स्मिता.'s picture

27 Nov 2012 - 3:21 pm | स्मिता.

मीठ मसाले लावून जरा वेळ मुरवलेले चिकन ब्रेस्ट फ्राय केले तर तसे बरेच लवकर शिजतात. त्यामानाने उकडून शिजायला जास्त वेळ लागतो.
मला वाटतं की चिकन ब्रेस्ट फ्राय करून आणि ड्रमस्टीक्स उकडून शिजवायला साधारण सारखाच वेळ लागतो. एक्सपर्ट्स याबाबतीत जास्त चांगले मार्गदर्शन करू शकतील.

(स्वगतः रेवतीताई शाकाहारी असल्याचं आठवतंय. त्यांच्याकडून चिकन शिजवण्याबाबत शंका हे बदलाचं लक्षण आहे का?)

हो, मी शाकाहारीच आहे पण माझा मुलगा चिकनाहारी आहे. इतके दिवस गणपाला त्रास देऊन तंदूरी चिकनचा घरगुती अवतार म्हणजे बेक्ड चिकन शिकले आहे. ड्रम्स्टीक्सची स्कीन काढणे अवघड वाटते. त्यामानाने चिकन ब्रेस्ट हे मॅरिनेशन आणि बेक करणे एवढ्यावर काही भागतय का हे तपासत होते. ;) सवय नसल्यामुळे चिकनला हात लावताना माझा जो बराच आरडाओरडा असतो तो टाळण्याचा प्रयत्न करत आहे. ;) असो. माहितीबद्दल आभार. :)

स्मिता.'s picture

27 Nov 2012 - 10:07 pm | स्मिता.

सवय नसल्यामुळे चिकनला हात लावताना माझा जो बराच आरडाओरडा असतो तो टाळण्याचा प्रयत्न करत आहे.

हा हा हा... चिकनला हात न लावता मॅरिनेशन करणं शिकवू शकते कारण मीसुद्धा तेच करत असते. (साफ करायचं काम नवर्‍याकडे ;))

मग जरा प्लीज आम्हाला सांगा की हात न लावता कसं म्यारिनेट करायचं?

इरसाल's picture

28 Nov 2012 - 9:27 am | इरसाल

ग्लोव्ह घालुन दाताने स्किन काढायची हाय काय नाय काय.हात लावायचा प्रश्नच नाय

उसगावात तुकडे केलेली कोंबडी मिळेना व्हय? आयला आमचं लॅगोस गाव बरं. ;)
असल्या कामासाठी (स्वतःचा) नवरा हे (लाईफ टाईम सर्व्हीस देणारं) उत्तम उपकरण आहे. तेच वापरावे.
अन्यथा चमचे उलथणे वैग्रे वैग्रे आहेतच. :)

स्मिता.'s picture

28 Nov 2012 - 2:15 pm | स्मिता.

अगदी असेच सांगणार होते. जिथे चिकनला हात लावणं अनिवार्य आहे ते काम नवरा उपकरणाकरून करून घ्यावे. बाकी मॅरिनेशन वगैरे कामं चमचे, उलथणे, इ. उपकरणे वापरून सहज होतात.

उसगावात तुकडे केलेलं, स्कीन काढलेलं असे सगळे प्रकार मिळत असतील पण मी जिथे जाते त्या दुकानात ऑर्ग्यानिक विभागात ड्रमस्टीक्स स्कीनवाल्याच मिळतात. स्कीन हाताने काढताना फारच बुळबुळीत असते. शेवटी कात्रीने कापत जाते. बाकी नवरा काय आणि कोणावरही अवलंबून न राहता कामे करून टाकत असते. शेवटी काय मला कोणी सोपी पद्धत सांगितली नाहीच! गण्या, तुझं लॅगोसच काय ते त्रिखंडात चांगलं आहे बरं!

पैसा's picture

28 Nov 2012 - 6:08 pm | पैसा

मेरा भारत महान! मी रॉयल फूड्स नावाच्या कंपनीच्या दुकानात जाते तिथली पोरे "ताई, कोणत्या साईजचे तुकडे पाहिजेत?" असे विचारून पाहिजे तस्से तुकडे, स्किन वैग्रे काढून देतात. मासे घेऊन येणारी मावशी जरा विनंती केली की मासे पण साफ करून पाहिजे तसे कापून देते! आहे की नाही भारी प्रकार!

परिकथेतील राजकुमार's picture

28 Nov 2012 - 6:15 pm | परिकथेतील राजकुमार

आता इकडे लिबियात चिकन घेऊन येणारी आणि जरा विनंती केली की पाहिजे तस्से तुकडे, स्किन वैग्रे काढून देणारी मावशी शोधणे आले.

पुतनाप्रेमी

पैसा's picture

28 Nov 2012 - 6:20 pm | पैसा

मला सांगितलंस गुजरातला जातोय म्हणून?

परिकथेतील राजकुमार's picture

28 Nov 2012 - 6:30 pm | परिकथेतील राजकुमार

पैसातै तुला कोणी संपादक केले गं? :P

तो प्रतिसाद एकदा अभ्यास वाढवून पुन्हा निट वाच. तरी देखील नाही समजला, तर चार दिवस परदेशात जाऊन रहा (अर्थात गोवा हा प्रदेश भारताबाहेरच मोडतो हा भाग वेगळा). आणि तरी देखील नाहीच समजला तर व्यनी कर.

स्मिता.'s picture

28 Nov 2012 - 7:14 pm | स्मिता.

उसगावात चिकन लेग पिसेसला ड्रमस्टीक्स म्हणतात होय? मी आपलं त्यांना शेवग्याच्या शेंगा समजले होते :P

सानिकास्वप्निल's picture

28 Nov 2012 - 8:32 pm | सानिकास्वप्निल

फक्त उसगावातचं नाही काय राणीच्या देशात ही चिकन ड्रमस्टीक्स म्हणतात :D

बघा बघा, आज उसगावच नाही तर आम्ही पण आम्ही पण म्हणणारे किती प्रतिसाद आलेत. गणपाचे लेगॉस, माझे उसा, पैतैचा भारत तर सानिकाचा राणीचा देश. खर्‍या अर्थाने आज ड्रम्स्टीक्स ग्लोबल झाल्या. ;)

सोत्रि's picture

27 Nov 2012 - 12:29 am | सोत्रि

झक्कास!
अशा, वेगवेगळ्या, सॉसमध्ये लडबडलेल्या डिश म्हणजे माझा जीव की प्राण! :)

१. पार्स्लेच्या हिरव्यागार पानांचे गार्निशिंग आणि
२. जोडीला व्हाईट वाइनचा ग्लास

ह्यांनी ह्या कंट्री क्लब चिकनला अजुन चार चांद लागले असते :D

पण ब्रेस्ट चिकन किंवा स्टेक बहुदा कसल्यातरी बेडवर (राइस किंवा नुडल्स इत्यादी) सर्व्ह केले जातात (चूभुदेघे).

- (कंट्री क्लबचा खादाड मेंबर) सोकाजी

स्मिता.'s picture

27 Nov 2012 - 3:32 pm | स्मिता.

अहो काय सांगू सोत्रिण्णा, ऐनवेळी जवळच्या दुकानात पार्सली मिळाली नाही आणि घरात वाईनसुद्धा नव्हती.

पण ब्रेस्ट चिकन किंवा स्टेक बहुदा कसल्यातरी बेडवर (राइस किंवा नुडल्स इत्यादी) सर्व्ह केले जातात (चूभुदेघे).

नक्कीच! खरंतर हा पदार्थ स्पॅगेटी, नूडल्स किंवा भातासोबत ही चिकन डिश छानच लागेल. हाटेलातही बहुतेक वेळी तसंच देतील. पण मी टिपेत लिहिल्याप्रमाणे मुख्य डिशमधे चिकन, चीज, क्रीम सूप असं सगळं असल्याने जोडीला स्पॅगेटी घेतली तर पोटाला जड होईल म्हणून मी बीन्सचा पर्याय निवडला.

गणपा's picture

27 Nov 2012 - 1:08 am | गणपा

भन्नाट !!!
वेगळ्या चवीचे चिकन आवडल्या गेले आहे.
लवकरच करुन पहावे म्हणतो.

दीपा माने's picture

27 Nov 2012 - 8:23 am | दीपा माने

पाकृ आवडली.

स्पंदना's picture

27 Nov 2012 - 8:36 am | स्पंदना

कॉक !! कॉक!! कॉक!!! चिकनच चिकन!
अन वर रेवती विचारतेय, ब्रेस्ट्पिस लवकर शिजतात का म्हणुन.

तिकडे मालवनी, इकडे कंट्री, क्या बात है। क्या बात है।

करुन बघण्यात येइल अन मग इकडे आव्र्जुन सांगण्यात येइल.

पियुशा's picture

27 Nov 2012 - 10:38 am | पियुशा

बै ग बै ..स्मितुडी ...भन्नाट जमलय कंट्री क्लब चिकन :)

मालोजीराव's picture

27 Nov 2012 - 3:12 pm | मालोजीराव

हा नवीन प्रकार आवड्ण्यात आला आहे ! प्रयोगशाळेत पुढील विकांताला करोन फीडब्याक देतो !

त्या पाहता फटूला , कलिजा खलास झाला |
पोटात भूकसंदेश, की आरपार गेला ||

स्वाती दिनेश's picture

27 Nov 2012 - 3:29 pm | स्वाती दिनेश

सहीच दिसते आहे चिकन!
स्वाती

सुहास झेले's picture

27 Nov 2012 - 4:11 pm | सुहास झेले

अल्टीमेट !!!

जयवी's picture

28 Nov 2012 - 9:18 am | जयवी

आई गं.... यम्म्म्मी !!
अगदीच निराळी डीश दिसतेय. फोटू एकदम ढिन्च्याक :)
सध्या चिकन प्रेम ऊतू जातंय त्यामुळे हे वेगळं चिकन नक्की करुन बघेन.

सस्नेह's picture

28 Nov 2012 - 1:42 pm | सस्नेह

फोटो अन पाकृ दोन्ही चिकने दिसताहेत !

परिकथेतील राजकुमार's picture

28 Nov 2012 - 4:45 pm | परिकथेतील राजकुमार

उत्तम दिसते आहे हो. वास देखील भन्नाट आहे.

चित्रगुप्त's picture

29 Nov 2012 - 10:23 pm | चित्रगुप्त

छान स्मिता.
फोटो आणि वर्णन उत्तम.