देवाला रिटायर का करा?

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
24 Nov 2012 - 11:45 pm
गाभा: 

देवला रिटायर करा असा घोषा अनेक लोक लावत असतात.देव ही संकल्पना फोल आहे असे नक्की कोणत्या कारणामुळे अनेकांना वाटत असावे?अनेकदा असे वाटते की अशा मंडळींची तक्रार देवाविरूध्द नाही तर देवाच्या नावाने चालू असलेल्या पूजा-अर्चा आणि कर्मकांडे (त्यातही ओ माय गॉड चित्रपटात दाखविल्याप्रमाणे हजारो लीटर दूधाची नासाडी याप्रकारच्या गोष्टी) या गोष्टी फोल आहेत असे मत बनले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे फारसे काही आहे असे वाटत नाही. पण या कर्मकांडांचे आणि देवाचे काहीतरी रिलेशन आहे हे बहुदा गृहित धरल्यामुळे कर्मकांडांविरूध्द असलेला रोष हा देवाविरूध्द असलेल्या रोषात कधी बदलतो हे समजत नाही.तेव्हा देवाला रिटायर करा असे म्हणणाऱ्या मंडळींना माझा प्रश्न आहे की तुमचा रोष नक्की देव या संकल्पनेविरूध्द आहे की देवाच्या नावाने केल्या जाणाऱ्या कर्मकांडांना आहे हे नक्की तपासून बघितले आहे का? उत्तर दिले नाहीत तरी काही हरकत नाही पण निदान या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न मात्र जरूर करावा अशी नम्र विनंती.

अनेकांना असे वाटते की कोणत्यातरी गोष्टीची भिती दाखविल्याशिवाय किंवा कसलेतरी प्रलोभन दाखविल्याशिवाय आपण चांगले वागूच शकत नाही का?माझ्या मुद्द्याचा नेमका हाच गाभा आहे. मनुष्य स्वभावच (in general) असा आहे की आपल्याला पाहिजे असलेली एखादी गोष्ट दुसऱ्याकडून करवून घेण्यासाठी कसलेतरी प्रलोभन किंवा भिती दाखवावीच लागते.लहान मुलांनाही तुला चॉकलेट देईन हे प्रलोभन किंवा ते चालले नाही तर मार देईन ही भिती दाखवावीच लागते ना?दोन-तीन वर्षाची लहान मुले वागण्यात/ विचारात कोणतीही भेसळ न झालेली म्हणजेच मनुष्यस्वभाव आहे त्याचे अगदी निरागस रूप असतात असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.तरीही त्यांनाही एक तर चॉकलेटचे प्रलोभन नाहीतर माराची भिती यापैकी एक काहीतरी दाखवावे लागतेच ना?बरं मोठे झाल्यानंतर वेगळी परिस्थिती असते का?कारखान्यांमधून प्रदूषण होते आणि त्या प्रदूषणाचे वाईट परिणाम होतात हे सर्वमान्य आहे.पण किती कारखानदार स्वत:हून प्रदूषण कमी करायचा प्रयत्न करतात?त्यांनाही प्रदूषण कमी केल्याबद्दल करांमध्ये सवलतींचे प्रलोभन नाहीतर दंडाची भिती दाखवावीच लागते ना?मी भारतातील माझ्या क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाच्या शिक्षणसंस्थेचा विद्यार्थी होतो आणि अमेरिकेतही reputation च्या बाबतीत मध्यम असलेल्या शिक्षणसंस्थांचा मी विद्यार्थी राहिलो आहे.या संस्थांमध्ये पर्यवेक्षक नसलेली एकही in-class परिक्षा मी अजूनपर्यंत बघितलेली नाही. Take home परिक्षांमध्येही turn-it-in नावाच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने दोन विद्यार्थ्यांनी एकमेकांकडून किंवा आंतरजालावरील कोणत्याही संकेतस्थळावरून कॉपी केली आहे का हे समजू शकते.मी नाकासमोर चालणारा मनुष्य असल्यामुळे मी अगदी टेक-होम परिक्षांमध्येही कॉपी करायच्या भानगडीत कधीच पडलो नाही.अमेरिकेत आमच्या विद्यापीठातच दोन भारतीय विद्यार्थ्यांना असे पकडून त्यांची विद्यापीठातून हकालपट्टी करण्यापर्यंत वेळ गेली होती हे मी स्वत: बघितले आहे.म्हणजे टेक-होम परिक्षांमध्येही त्या सॉफ्टवेअरच्या रूपातून पर्यवेक्षक असतोच.

आता एक गोष्ट सांगा की विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये हे जगातील अगदी सगळ्या शिक्षणसंस्थांच्या संचालकांना वाटत असेल आणि कॉपी करणे अयोग्य आहे याविषयीही दुमत नसावे.पण तरीही प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पर्यवेक्षकांशिवाय परिक्षा होऊ शकत नाही याचे काय कारण असावे?पकडले जायची भिती नसेल तर किती विद्यार्थी "कॉपी करणे वाईट आहे" याच एका कारणावरून कॉपी करणार नाहीत?जर एखाद्या परिक्षेच्या वेळी पाहिजे तितकी तयारी झाली नसेल तर कदाचित माझ्यासारखा मनुष्यही कॉपी करायला उद्युक्त होऊ शकेल.पण पकडले गेल्यास परिणाम वाईट होतील त्यापेक्षा कमी मार्क मिळालेले परवडले असे वाटून माझ्यासारखे अनेक त्यापासून परावृत्त होतील. म्हणजे "पकडले जायची भिती" या स्वरूपात भिती आलीच.

आता एक गोष्ट सांगा की देवाची संकल्पना तरी नक्की काय वेगळी आहे?एखादी वाईट गोष्ट केल्यास त्याचे पाप मला लागेल (आणि देव त्याची शिक्षा मला करेल ही भिती) आणि एखादी चांगली गोष्ट केल्यास त्याचे पुण्य मला मिळेल (आणि कोणत्यातरी स्वरूपात त्याचे बक्षिस मला मिळेल हे प्रलोभन) या कारणामुळे का होईना योग्य त्या गोष्टी केल्या जात असतील तर त्याच वाईट काय?ज्यावेळी आपण काय करत आहोत हे कोणीही बघत नसतो तेव्हा आपण कसे वागतो/काय करतो ही खूप महत्वाची गोष्ट आहे.पण कोणीही बघत नसले तरी देव बघत आहे या जाणिवेतून का होईना जर चांगली कृत्ये केली जात असतील तर त्यात काय वाईट आहे?जर असे कोणतेही प्रलोभन किंवा भिती नसतानाही जर कोणी चांगले वागत असेल तर अती उत्तम पण बहुसंख्य लोक तसे असतात का?आणि अशांसाठी देव ही संकल्पना असणे हे महत्वाचे आहे.

आता एक प्रश्न नक्कीच उभा राहिल की चांगले काय आणि वाईट काय याची व्याख्या प्रत्येक माणसापरत्वी बदलेल.तेव्हा नक्की चांगले काय आणि वाईट काय हे ठरविणार कोण?या दृष्टीने धर्म या संकल्पना महत्वाची आहे असे मला वाटते.म्हणजे नक्की चांगले काय आणि वाईट काय हे (मुळातल्या) धर्मात सांगितले असावे/आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे देवावर विश्वास/श्रध्दा असणे यात दुर्बलता आहे असे अनेकांना का वाटते हे समजत नाही.अमेरिकेत असे असते आणि तसे असते असे इथेच अनेकदा लिहिले जाते.तर मग देवाविषयी त्याच अमेरिकेत काय बोलले/लिहिले जाते हे लिहितो.अमेरिकेच्या सरकारचा अधिकृत मोटो आहे---"In God we trust". अमेरिकेतल्या नाण्यांवर आणि नोटांवर हा मोटो लिहिलेला असतो. अमेरिकेचे अध्यक्ष शपथ घेतात तेव्हा ती शपथ आहे: "I, XYZ, do solemly affirm that I will faithfully execute the office of President of United States and to the best of my ability preserve, protect and defend the constitution of United States. So help me God". जॉर्ज वॉशिंग्टन यांनी पहिल्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेतली तेव्हा शपथ घेतल्यानंतर हे So help me God हे चार शब्द अनवधनाने उच्चारले आणि त्यानंतर हे शब्द शपथेचाच भाग करण्यात आले. (२० जानेवारी २०१३ ला बराक ओबामा दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेतील तेव्हा हे बघायला मिळेल). तसेच अमेरिकेचे राष्ट्रगीत आहे: God bless America my home sweet home. आमचा देवावर विश्वास आहे हे (अजून तरी) महासत्ता असलेल्या देशाला म्हणण्यात कसलेही वैषम्य वाटत नाही तेव्हा देवावर विश्वास/श्रध्दा असणे यात काहीही दुर्बलता नाही हे समजून यायला हरकत नाही. (अमेरिकेत जर काही नसले तर देवाच्या नावावर रस्यावर चाललेला धांगडधिंगा ---जो आपल्याकडे गणेशोत्सव आणि अमक्यातमक्या महाराजांच्या जयंत्यांच्या दिवशी चालू असतो.)

माणसाला subconscious mind म्हणून एक अत्यंत सामर्थ्यवान असलेले एक मन असते.कोणत्याही औषधाची चाचणी घेताना नेहमी दोन वेगळ्या गटांवर चाचणी घेतली जाते असे वाचनात आले आहे.पहिल्या गटाला ते औषध देतात तर दुसऱ्या गटाला औषध देत आहे असे सांगून निरुपयोगी आणि निरूपद्रवी असे placebo देतात.आता असे placebo द्यायचे कारण काय असावे? आपल्यावर काही उपचार केले जात आहेत या भावनेतून एक मनाची उभारी येते आणि रूग्णाला बरे करण्यात या मनाच्या उभारीचाही भाग असतोच.तेव्हा औषधाची उपयुक्तता तपासून बघताना मनाची उभारी आणि त्यातून बरे वाटणे हा factor बाजूला काढून केवळ औषधाची standalone उपयुक्तता तपासून बघण्याच्या दृष्टीने placebo देतात. Napoleon Hill या लेखकाचे एक खूप सुंदर वाक्य आहे (आणि मला या वाक्याचा स्वत:ला खूपच उपयोग झाला आहे):"Whatever the human mind can conceive and believe it can achieve". आता ही मनाची उभारी द्यायचे काम देव ही संकल्पना करत असेल तर त्यात काय चुकीचे आहे? देव आपल्याबरोबर आहे तेव्हा आपले कोणी वाकडे करू शकत नाही या भावनेतून मनाची उभारी मिळत असेल तर त्यात चुकीचे काय?अनेक लोक सर्वकाही सुरळीत चालू असते तेव्हा आम्ही हे करू आणि ते करू असे दावे जरूर करत असतात.पण एखाद्या संकटाच्या वेळी मात्र त्यांचे हात देवासमोर आपोआप जोडले जातात हे पण अनेकदा बघायला मिळते.

मला स्वत:ला देव या संकल्पनेचा खूपच फायदा झाला आहे.चार-पाच वर्षांपूर्वी मी करियरविषयक संकटातून जात असताना Norman Vincent Peale या लेखकाने दिलेले prescription मी अंमलात आणले.लेखकाने लिहिले आहे की देवाचे आपल्या आजूबाजूला अस्तित्व आहे हे नुसते मानू नका तर ते feel करा.तसेच "I can do all things through Christ who strengthens me" अशा स्वरूपाची वाक्ये म्हणा.या गोष्टी मी केल्या आणि त्याचा नक्कीच फायदा मला झाला.मी त्या संकटातून बाहेर पडलो त्यात या prescription मुळे मला मिळालेल्या मनाच्या उभारीचा वाटा मी केलेल्या कष्टांइतकाच आहे असे मला वाटते. हे वाचणाऱ्या अत्यंत rational आणि पुरोगामी मंडळींनाही मी सांगतो की तुम्ही कोणत्याही संकटात पडावे ही अजिबात इच्छा नाही पण समजा अशा संकटात सापडलात तर या prescription चा उपयोग करून बघा नक्की फायदा होईल.अर्थातच या गोष्टींचा उपयोग होण्यासाठी थोडेतरी सश्रध्द मन हवे.जर देव अस्तित्वातच नाही असेच गृहित धरून चालले तर या prescriptions चा अजिबात उपयोग होणार नाही.

देवाच्या आणि धर्माच्या नावाने अवडंबर करून रस्त्यावर धांगडधिंगा करणे, कर्णकर्कश लाऊडस्पीकरवर कान फाटायची वेळ येईपर्यंत बोंबलणे,देवा-धर्माच्या नावाने लोकांना लुबाडणे इत्यादी गोष्टींचा मला मनस्वी तिटकारा आहे हे मी याच व्यासपीठावर अनेक वेळा लिहिले आहे.त्याची पुनरावृत्ती टाळतो.या गोष्टी होतात म्हणून देवाला रिटायर करा असे म्हणणाऱ्यांना मी एक प्रश्न परत एकदा विचारतो की तुमचा आक्षेप नक्की कशावर आहे? देव या संकल्पनेला की देवाच्या नावावर केल्या जात असलेल्या धांगडधिंग्याला?

देव आणि धर्म या संकल्पनेची उपयुक्तता याविषयी माझे मत वर लिहिलेच आहे.तरी आपण अमक्या धर्मात जन्माला आलो याचा अभिमान आणि "आमचाच" धर्म कसा श्रेष्ठ या गोष्टी मला अजिबात समजलेल्या नाहीत.पण हा मुळातला विषय नसल्यामुळे याविषयी काही लिहित नाही.

त्याचप्रमाणे काय हा देव, समाजातले अन्याय आणि इतर वाईट गोष्टी तो थांबवू शकत नाही म्हणून त्याला रिटायर करा असे म्हणणारे लोक असतात.म्हणजे कुठेतरी देव हा या गोष्टी थांबवू शकेल हे त्यांनीही मान्य केलेले असते का अशी शंका वाटल्यावाचून राहत नाही.अशा मंडळींना माझे सांगणे एकच की देव ही एक उपयुक्त संकल्पना माणसानेच निर्माण केली असली तरी त्या संकल्पनेचा उपयोग कसा करायचा हे आपल्यावर आहे.अणुउर्जेचा वापर वीज निर्माण करायला करायचा की बॉम्ब बनवायला हे आपणच ठरवायचे.तीच गोष्ट काहीशी देवाच्या संकल्पनेबाबत.जर समाजात अन्याय करणारे लोक असतील तर त्याचे खापर देव या संकल्पनेवर का फोडता?

तेव्हा देव रिटायर करायचा की त्याच्या नावाने चाललेला धांगडधिंगा रिटायर करायचा याचे उत्तर देवाला रिटायर करायला निघालेल्यांनी शोधल्यास बरे होईल.

Amen.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

18 Aug 2013 - 2:18 pm | श्रीगुरुजी

आपण खूप चांगली कृत्ये करूनसुद्धा आपल्याला वाईटच अनुभव आले किंवा आपण खूप पापकृत्ये करूनसुद्धा आपले तसूभरही वाकडे झाले नाही अशा स्वरूपाचे अनुभव लागूंना आले असावेत व कदाचित त्यामुळेच वाईटाला शिक्षा व चांगल्याला चांगले जीवन देणारी "देव" अशी कोणतीही शक्ती अस्तित्वात नाही असा लागूंचा ठाम समज झाला असावा आणि त्यातूनच त्यांनी "देवाला रिटायर करा" ही चळवळ सुरू केली असावी.

मी आजही घरी देवांची पूजा करतो. गंगा यमुनांना पूजाजलात या असे आवाहन करतो. शंकर, नारायणी, ब्रहमा, विष्णू , गणेश, याना नमन करतो. सर्वजन सुखी होवोत म्हणतो. मला तेजाकडे घेऊन चल म्हणतो. निरांजन ओवाळतो. चांगली सुगंधी उदबत्ती हवी असते मला. गणपती बसवतो. दीड तास वार्षिक पूजा करतो. हो तरीही मी देवाला रिटायर केलेले आहे.

कारण देव हा निगोशिअबल नाही . तो भावाचा देखील भुकेलेला नाही. त्याला जर शक्ती मानलेत तर त्याच्याकडे सत्सद्विवेक नाही. कारण हे का ते असे प्रशन मानवाला पडतात देवाला का पडावेत?. शक्तीला मन नसते. व मन नसल्यामुळे डिस्क्रिशन नसते. मानसिक समाधान म्हणूनही मी वरील कर्मकांड करीत नाही. कारण मला त्यात काही
एक्सप्लॉयटेशनही दिसत व आधारही .केवळ करमणूक बाकी काही नाही !

चौकटराजा's picture

20 Aug 2013 - 5:27 pm | चौकटराजा

कारण मला त्यात काही
एक्सप्लॉयटेशनही दिसत व आधारही .केवळ करमणूक बाकी काही नाही !

हे वाक्य
कारण मला त्यात काही
एक्सप्लॉयटेशनही नाही दिसत वा आधारही .केवळ करमणूक बाकी काही नाही !

अनिरुद्ध प's picture

20 Aug 2013 - 5:39 pm | अनिरुद्ध प

सर्व डोक्यावरुन गेले,खरच देवा मला ईतके बेअक्कल का बनवले?

म्हैस's picture

21 Aug 2013 - 11:54 am | म्हैस

आपण Norman Vincent Peale ह्या लेखकाचे पुस्तक वाचले त्यांचा prescription हि अमलात आणले. चांगली गोष्ट आहे. पण आपल्या धर्मात , संस्कृतीत एकाहून एक अशी अतिशय सुंदर पुस्तकं ह्या विषयावर आहेत. आपण ती हि वाचून बघावीत. इथे प्रतिक्रिया देणाऱ्या अनेकांनी देवाची टिंगल केली आहे. आपण त्याकडे लक्ष देवू नये. देव म्हणजे काय हे प्रत्येकाला वेळ आल्यावर समजतं हा माझा स्वताचा अनुभव आहे.