मीरा.
हिचं आणि कॄष्णाचं ते नातं. कृष्ण राधा आणि द्रौपदीचाही होता, पण मीरेची भक्ती आणखीनच वेगळ्या जातकुळीतली.
कोण्या देशाची राजकन्या, का, कशी, कधी.. पण कधीच न भेटलेल्या कॄष्णात गुंतली.. इतकी, की तो तिच्या जगण्याचं, असण्याचं समर्थनच होऊन गेला. कोणत्याही विरोधाला, आक्षेपांना न जुमानता ती त्या 'व्हर्च्युअल' नात्याला सत्य मानत जगली. तिचं मानणं इतकं ठाम, की ती म्हणे अंती त्या कृष्णातच विलिन होऊन गेली!
भास-आभासाच्या सीमेवरचं असं कोणतंही नातं कायमच मला भूलवतं. नकळत्या वयात जवळ आलेली एक मूर्ती मीरेसाठी इतकी सत्य ठरली की तिने आपलं असणंच त्या मूर्तीला अर्पून टाकलं. प्रेमाचा तो कोमलभाव ती स्वतःच होऊन गेली. त्या सत्यासाठी जगत असताना इतरांशी संघर्ष करण्याइतकंही तिने स्वतःला विचलित होऊ दिलं नाही. इतकी अडिगता कशी आली असेल त्या जगावेगळ्या मुलीत? स्वतःखेरीज अन्य कोणालाही न पटणार्या गोष्टीसाठी जन्मभर एकनिष्ठ राहण्याची ताकद तिला तिच्या विश्वासानेच दिली असेल का? प्रसंगी मॄत्यूलाही सामोरं जाण्याची नीडरता कुठून लाभली तिला?
द सिक्रेट या पुस्तकाचा आणि मीरेचा माझ्याशी परिचय होण्याचा काळ साधारण मागेपुढेच. आपल्याला जे वाटतं आणि आपण ज्याचा सदैव विचार करतो, ध्यास घेतो तेच आपल्याकडे चालून येतं, असा तो ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’चा फंडा! समजून घेता घेता, स्वतःला तसं वळवून, वागवून बघता बघता अचानक एका क्षणी ही पुन्हा सामोरी आली.
खरंच की.. लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा जगावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ही मीराच नाही का!
हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या त्या गोपाळाला आजही खरं, स-जीव मानून जगणारी, त्याला भरवणारी, त्याच्याशी बोलणारी, होळी खेळणारी, जगाचं भान विसरून 'माझी प्रीत निभव रे कान्ह्या' असं गाणारी मीरा.
आणि केवळ म्हणूनच त्याच्यातच सामावून जाऊ शकलेली एकमेव.. अशी मीरा!
बराच काळ मी ही अशी मीरामय. अशातच एकदा चक्क एका दुकानाच्या शोकेसमध्ये या मीरेची लहानशी मूर्ती दिसली. विरागी भगवा रंग, एका हातात एकतारी, दुसर्या हातात चिपळ्या, डोळे मिटलेले, आणि उच्चारही न करता हरिनामात, हरिप्रेमात दंग अशा त्या मीरेने अर्थातच लक्ष वेधलं. ती त्याच दिवशी घरी आली नाही, पण मनात मात्र आली. बोलण्यात येत राहिली.
मीरेची मला असलेली आवड लक्षात घेऊन शेवटी कोण्याएका निमित्ताने एका सुहृदांनी ती माझ्यासाठी भेट म्हणून आणली. भगवा नाही, हिचा रंग शांत पांढरा.. बाकी सारे तपशील तेच. काही दिवस शोकेसमध्ये, काही दिवस पुस्तकांच्या कपाटात, काही दिवस तर ड्रॉव्हरमध्येही तिनं मुक्काम केला. अखेर काही महिन्यांपूर्वी तिच्यासाठी खास तिची अशी जागा तयार केली.
आज सकाळी मीरेकडे पुन्हा नजर गेली. तिच्याकडे बघता बघता तिने जगलेलं आयुष्य, तिच्या अविचल श्रद्धा, त्यातून मला उमगलेलं सार पुन्हा एकदा मनात येऊन गेलं. ओढून नेत गेलं..
आकाशाएवढी, काहीशी अगम्य, अथांग, तरीही नितळ अशी मीरा..
जितकं तिला समजून घ्यावं तितकी उलगडणारी मीरा..
भवताल बदलला तरी स्वतःत मग्न राहणारी, अविचल मीरा..
कॅमेर्यात कैद करता करता, आणि नंतर मनात आलं ते शब्दांत मांडता मांडता छायाचित्रांवरच्या तारखा रसभंग करताहेत की काय असं वाटलं क्षणभर.
पण मग, मीरा आजही जर तितकीच आकर्षून घेत असेल, तर या तारखा त्याचीच ग्वाही देत आहेत, असं मानायला
काय हरकत आहे..?
..
प्रतिक्रिया
13 Nov 2012 - 10:38 pm | पैसा
कान्ह्याचा शोध घेता घेता मीरा राजमहालातून बाहेर पडून लोकांमधे सामावली. तिचा सगळाच प्रवास लोकविलक्षण. लेखात आणि छायाचित्रात चान टिपला गेलाय.
14 Nov 2012 - 1:06 pm | गवि
पैसाताई.. चान चा अर्थ छान नव्हे हे तुम्हाला माहीत नाही असं समजावं का? ;)
ह्.घ्या.
पैसाताईंशी सहमत .. लेख उत्तम.. चाला वाही देस हे गाणं लताच्या आवाजात कानात ऐकू येऊ लागलं होतं पहिल्यांदा लेख वाचला तेव्हा...
14 Nov 2012 - 10:50 pm | पैसा
ध चा मा झाला. इनिगोय, सॉरी. मला "छान" असंच म्हणायचं होतं. घाईघाईत टाईप केल्यामुळे घोटाळा झाला. लक्षात आणून दिल्याबद्दल गविंना धन्यवाद!
15 Nov 2012 - 10:22 am | इनिगोय
पैसाताई, पहिलीच प्रतिक्रिया तुझी आलेली बघून मला छान वाटलं, त्यात या चान च्यापण भापो झाल्या. ;-)
तुमचे दोघांचेही आभार..
14 Nov 2012 - 12:39 pm | कवितानागेश
आकाशाएवढी, काहीशी अगम्य, अथांग, तरीही नितळ अशी मीरा..
नेमक्या शब्दात वर्णन.
जसा कृष्ण, तशीच मीरा .....
14 Nov 2012 - 12:53 pm | यशोधरा
सुरेख.
16 Nov 2012 - 9:58 am | श्रीरंग_जोशी
सहजसोप्या लेखनशैलीला छायाचित्रांची साथ अप्रतीमपणे लाभली आहे.
संत मीराबाई यांच्यावर बेतलेल्या दूरदर्शन मालिकेचे स्मरण झाले (९८ -९९ साल). मधुरा देव डहाणूकरने मीराबाईंची भूमिका केली होती. कदाचित हा विषय न झेपल्याने ती मालिका अर्ध्यातूनच थांबविली गेली.
19 Nov 2012 - 6:34 am | अर्धवटराव
श्रीकृष्णाशी निगडीत इतर व्यक्तीरेखांवर बर्याच महजनांकड्न बरचंस वाचलं, थोडंफार स्वतः चिंतन देखील केलं... मीरा मात्र नेहमीच एक गुढ बनुन राहिली. श्रीकृष्ण एकटा पुरुष, उर्वरीत चराचर म्हणजे स्त्री असं विदेही तत्वज्ञान जगणारी मीरा नेमकी त्या अवस्थेला कशाच्या भरोशावर पोचली काय माहित... भक्ती भक्ती म्हणतात ते हेच असावं बहुतेक.
>>बराच काळ मी ही अशी मीरामय.
-- भाग्यवान आहात इनीयोग.
अर्धवटराव
19 Nov 2012 - 6:59 am | स्पंदना
खरच! कुणाला भाग्यवान म्हणाव? मिरेच्या भक्तिला, अस्तित्वात असलेल्या हजारो वर्षांच्या दुराव्याने, मुकलेल्या कृष्णाला? की त्याची अशी आस लागुन त्यात पुर्णत्वाने सामावलेल्या मिरेला?
हा कृष्ण असा इतका गुढ का होत जातो? एकच व्यक्तिमत्व अस वेगवेगळ्या रुपांनी इतक आसुसुन अवतरु शकत? इतकी भुरळ पडू शक्ते शकते अजुनही जनमाणसाला याची?
राजस्थानात एकदा या सावळ्याची भक्ती अनुभवली. भजन म्हणता म्हणता तल्लिन होउन एकजण (वृद्धा) उठली अन तालात नाचु लागली. पाठोपाठ दुसरा कुणी मध्येच भान येउन ते खाली बसले अन तोवर दुसरे काही तल्लिन होउन झुलत होते. खर सांगते त्यात तसुभरही शुद्ध नव्हती , कोणत्याही प्रकारचा दिखावा नव्हता अन त्या बरोबरच भान आल्यावर लज्जाही नव्हती. सहज साधारण भाव होता तो!
इनिगोय अतिशय भावपुर्ण लिखाण! किती आवडल ते सांगता नाही येणार .
27 Nov 2012 - 11:08 am | इनिगोय
कृष्ण ही व्यक्तीरेखाच अशी आहे, की तिच्यापर्यंत ज्याला जसं पोचावंसं वाटलं त्या प्रत्येकासाठी त्याचा त्याचा मार्ग तयार होत गेला. त्यातही मीरा विलक्षणच. कारण कृष्णाचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले त्याचे समकालीन भक्त वगळता, त्याच्याशी इतकं एकरूपत्व साधलं ते बहुधा मीरेलाच.
कृष्णाच्या चरित्रात त्याचे दैवी गुणविशेष आणि मानवी भाव-स्वभाव याचं सुरेख मिश्रण आहे. म्हणूनच त्याच्याशी तल्लीन होताना आजही त्याच्या भक्तांना दडपण येत नसावं.
सर्वांचे आभार..
28 Nov 2012 - 7:02 pm | सोनल कर्णिक वायकुळ
खुप सुन्दर, नितळ.मीरेसारखच.