तो प्रसंग अजूनही आठवला की गंमत वाटते. जेवत असताना आमच्या टेबलावर तीन अफगाण, दोन पाकिस्तानी व मी एकटा हिंदुस्थानी जेवायला बसलो होतो. आणि अचानक एका अफगाणाने "आप कहाँ से हो?” असा प्रश्न विचारला. “मुंबईसे” असे मी म्हटल्यावर तो क्षणभर चकित झाला. मला सगळ्यांसमोर प्रश्न विचारला, "आप क्या रॉ के आदमी हो?” त्याच्या ह्या अकस्मिक प्रश्नावर टेबलावरील सर्व सज्जन गृहस्थ माझ्याकडे रोखून पाहायला लागले. मी हसून त्याला म्हणालो, "नाही रे, पण तुला असे का वाटले?” त्याने मला सांगितले की, तो पाकिस्तानमध्ये कुठे राहत होता, सध्या तेथे काय परिस्थिती आहे. त्यावर त्याचे काय मत आहे, हे गेला आठवडाभर मी त्याच्याकडून सविस्तर जाणून घेतले. त्याला मी कराचीचा वाटलो, आणि मी मुंबईचा आहे असे आता अचानक कळल्यावर त्या १८ वर्षीय पठाणाने मला हा भाबडा प्रश्न विचारला. मग मी त्याला म्हणालो, "जर मी खरेच गुप्तहेर असतो, तर मी मूळचा मुंबईचा असे चारचौघात सांगितलेच नसते." ह्या युक्तिवादाने त्याचे समाधान झाले अन माझा जीव भांड्यात पडला.
युरोपला मंदीचे चटके बसायला लागले व बुडत्या जहाजातून सर्वप्रथम उंदीर बाहेर पळतात, ह्या न्यायाने मी माझ्या पत्नीसह लंडन सोडले आणि अबुधाबी येथे आलो. तेथे सर्व काही सुरळीत चालले होते. पण माझ्या पत्नीला मात्र येथे तिची मायभूमी जर्मनी व अबुधाबी ह्यांच्यात एक लोकशाही व राजेशाही असलेल्या देशातील फरक जाणवायला लागला आणि आम्ही युरोपात परतण्याचा निर्णय घेतला.
युरोपात जर्मनीने मंदीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले व त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही माझ्या बायकोच्या देशी जायचे नक्की केले. माझ्यासाठी भाषेची प्रमुख अडचण होती, कारण मला जर्मन येत नसले तरी इतके दिवस इंग्रजी भाषेतून आमचा संवाद चालायचा. मात्र जर्मनीत हे चालत नव्हते. जर्मन भाषेची प्राथमिक जाण असणे हे जर्मनीत दीर्घकाळ वास्तव्य करण्याची मनीषा बाळगणार्या परकीय नागरिकांना सक्तीचे आहे.
म्हणून मी प्रथम मुंबईत आलो आणि दीड महिन्यात जर्मन भाषेचा पहिला स्तर उत्तीर्ण झालो. काळा घोड्याजवळ जर्मन दूतावासाच्या अनुदानावर गटे ही जर्मन भाषेची संस्था अल्प दरात जर्मन भाषा शिकवते. जगभर ह्या संस्थेचा दर्जा समान असतो. येथून जर्मन भाषेची प्राथमिक, जुजबी तोंडओळख करून घेऊन मी जर्मनीला आलो. मी आणि माझी पत्नी पंचतारांकित हॉटेलात आधी काम करत असल्याने साहजिकच जर्मनीत आमचा मोर्चा तेथे वळला. माझ्या पत्नीस मनाजोगता जॉब मिळाला. माझे मात्र भाषेवरून अडू लागले. अशात एका हॉटेलातून मला चक्क बोलावणे आले. माझ्या कामाचे स्वरूप हे ट्रेनिंग आणि अजून बरेच होते. माझ्या कामात माझे शिक्षण व अनुभव धरून भाषा - प्रामुख्याने इंग्रजी, उर्दू येणे महत्त्वाचे होते. ह्याचे कारण तेथील हाउसकीपिंगचा ९० टक्के स्टाफ अफगाण, श्रीलंकन (तामिळ निर्वासित), पाकिस्तानी व उरलेले दहा टक्के इराक, इराण, व आफ्रिकेतील काँगो, युगांडा, अशा देशातील होता. जर्मनीमधील फ्रँकफर्ट येथे माझे वास्तव्य होते. माझ्या मते जर्मनीमध्ये जगभरातील सर्वात जास्त निर्वासित राहतात. हे निर्वासित आपल्या मायभूमीला पारखे झालेले असतात. मात्र निर्वासित असल्याचे पारपत्र त्यांच्याकडे असल्याने हे युरोपात कोठेही जाऊ शकतात. कमी पैशात जास्त काम करण्याची त्यांची तयारी असल्याने हे लोक युरोपातील बहुतांश हॉटेलात श्रमाची कामे करतात. ह्यांना हॉटेल स्वतः कामावर घेत नाही, तर एका मध्यस्थ कंपनीतर्फे घेतात. ही कंपनी बहुधा एखाद्या तुर्की, अफगाणी किंवा पाकिस्तानी माणसाची असते. ही कंपनी ह्या लोकांना ताशी साडेपाच युरो देते आणि जर्मनीत कमीत कमी वेतन ताशी ८ ते ९ युरो आहे. तेव्हा हॉटेलला स्वतःचा कायमस्वरूपी स्टाफ ठेवणे खर्चीकच ठरेल. म्हणून त्यांना ह्या कंपन्यांचा पर्याय परवडतो. जर्मनीत कर्मचार्यांसाठी एक महिना भरपगारी रजा व इतर अनेक सोयी असतात, त्या ह्या कंपन्या निर्वासितांना देत नाहीत. अशा कंपन्यांचे सर्व रेकॉर्ड सांभाळणे, त्यांच्याशी संवाद साधणे (कारण त्यांची भाषा मी सफाईने बोलू शकतो), त्यांना आवश्यक ते ट्रेनिंग देणे, अशा प्रकारचे माझे काम होते.
संध्याकाळी जर्मन भाषेचा वर्ग आणि सकाळी नोकरी, असा माझा दिनक्रम ठरला होता. असेच एके दिवशी मी हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर खोल्यांसमोरून जात असताना, माय नेम इज खान ह्या सिनेमातील शाहरूखचे डायलॉग एका खोलीतून माझ्या कानावर पडले. तेथे जाऊन पाहतो तर पाच ते दहा अफगाण कामधाम सोडून जमिनीवर फतकल मारून बसले होते, आणि अगदी आय.एन.टी. एकांकिकेमध्ये जसे जीव तोडून संवाद म्हणतात त्या थाटात हा १८ वर्षाचा पठाण मुलगा ते संवाद म्हणत होता. मला पाहताच तो एकदम गप्प बसला. मी विचारले, "नाव काय तुझे?” त्यांने सांगितले, “शेर खान” आणि तो मूळचा कंधारजवळचा असून पाकिस्तानात अटकजवळ त्याचे लहानपण गेल्याचे सांगितले. अटक हा शब्द कानावर पडला आणि अटकेपार झेंडे लावलेली मराठी फौज आठवली. येथे माझी आणि शेरखानची पहिली भेट झाली आणि पुढे आमची गट्टी जमली. ह्याचे कारण म्हणजे त्याचे बॉलिवूडवर निस्सीम प्रेम आणि ह्या सर्व लोकांमध्ये तो एकटा जर्मन युनिवर्सिटीत संध्याकाळी जात होता. त्यामुळे ह्या सर्व लोकांमध्ये तो बराच पुढारलेला आणि सुशिक्षित होता. त्याला हाताशी धरल्याने तो पश्तून किंवा डारी भाषेत अफगाण लोकांना काही महत्त्वाची माहिती सांगायचा. पश्तून ही प्रमुख भाषा असली तरी संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये डारी भाषा बहुतेकांना समजते. उझबेक व तुर्कमेनिस्तानी भाषासुद्धा तेथे बोलल्या जातात. जशी पाकिस्तानात उर्दू राष्ट्रभाषा असली तरी पंजाबी भाषेचा तेथे पगडा आहे, तसे अफगाणिस्तानमध्ये पश्तून आणि डारी भाषेचे आहे. ही भाषा प्रामुख्याने इराणलगतच्या अफगाणी भागात बोलली जाते, कारण इराणी भाषा ह्या भाषेच्या अत्यंत निकट आहे. त्यामुळे अफगाण डारी भाषेत सर्व संवाद करत असल्याने इराणी लोकांना आमच्या हॉटेलात ते विनासायास समजायचे. लंडन आणि अबुधाबी येथे माझा पाकिस्तानी लोकांशी कामानिमित्त संबंध आला होता. राजकारण ते सर्व विषयावर चर्चा करताना त्यांची मते, त्यांच्या आपल्याविषयीच्या कल्पना व आपल्या त्यांच्याविषयीच्या कल्पना, असे माहितीचे आदानप्रदान व्हायचे. एक अफगाणी, त्याची कहाणी, त्याच्याच जबानी तो प्रसंग अजूनही आठवला की गंमत वाटते.
शेर खानचे कुटुंब पाकिस्तानात अटकजवळ राहते असे त्याने मला सांगितल्यावर त्याच्याशी गप्पा मारताना माझ्या तोंडातून पेशावर, हिंगोरा दक्षिण, उत्तर वझिरीस्तान अशी नावे किंवा चर्चा करताना बलुचिस्तान ते अगदी कराचीमधील लेहेरी (म्हणजे त्यांची धारावी) परिसरात उसळलेल्या अफगाण विरुद्ध मुजाहीर लोकांच्या दंगली असे विषय असायचे. ह्यामुळे मी बहुधा कराची शहरातील रहिवासी असावा, अशी त्याची समजूत होती. कितीतरी पाकिस्तानी लोकांशी बोलताना मी भारतीय आहे हे पहिल्यांदा स्वतःहून सांगत नाही. कारण जेव्हा आमच्या चर्चेचा रोख भारतावर किंवा राजकारणावर येतो, तेव्हा त्यांची मते, त्यांचे समज, मानसिकता ह्यांचा थांगपत्ता लागतो. शेर खानच्या गावाजवळ तालिबान व रशियन ह्यांच्यात तुंबळ युद्ध झाले, तेव्हा त्याचे घर व काही नातेवाईक पैगंबरवासी झाले. तो पंधरा वर्षाचा असताना तालिबान व अमेरिकन सैन्य यांच्या युद्धात त्यांच्या अर्ध्या गावावर अमेरिकन धार्जिणा असल्याचा ठपका बसला. तेव्हा त्या लोकांना काही काळ तालिबानी हल्ले सोसावे लागले व शेवटी पाकिस्तानातील निर्वासितांसाठी बनवलेल्या छावणीमध्ये त्यांची रवानगी झाली. तेथून त्याचे व त्यांच्या भावाचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाटोच्या अधिकार्यांच्या कामी आले. त्याचा भाऊ दुभाषी म्हणून काही काळ कार्यरत होता. मात्र त्यांच्या कुटुंबाला तालिबानकडून पहिली वॉर्निंग मिळाली आणि दुसर्या वॉर्निंगनंतर त्यांना जर्मनीमध्ये पाठविण्यात आले. आता शेर खानने हे तालिबानी वॉर्निंग प्रकरण थोडक्यात असे सांगितले : त्याचा उस्ताद, जो त्याला अफगाण शाळेत तालीम द्यायचा, तोसुद्धा काही काळ नाटोच्या अधिकार्यांचा दुभाषी होता: त्यास जर्मन, इंग्रजी ह्या भाषा येत होत्या व महिन्याला काही हजार डॉलर इतका त्याचा पगार होता. मात्र तालिबानकडून त्यास पहिली, दुसरी वॉर्निंग आली की, हे काम सोडून दे. पण ह्यावर उत्तर म्हणून त्याची पगारवाढ करण्यात आली व उस्तादने आपले काम चालूच ठेवले. एके दिवशी तालिबानकडून त्याचे अपहरण करण्यात आले व त्याच्या मानेवरून सुरी फिरवण्यात आली. स्थानिक भागात सीडी वाटप करून ह्याचे चित्रीकरण दाखविण्यात आले.
हे ऐकून माझी वाचा बंद झाली होती, पण काहीतरी विचारायचे म्हणून उगाच अवसान आणून मी त्याला विचारले, "अरे, सुरी ही नेहमी गळयावरून फिरवतात. मग हे मानेवरून का बरे?” ह्यावर शेर खान म्हणाला, “गळा चिरला की काम लगेच तमाम, मानेवरून सुरी फिरली की तडफड...”
अफगाणिस्तान, आपली मातृभूमी आपल्याला कायमची तुटली ह्याबद्दल खोल वेदना त्याचा बोलण्यातून जाणवत होती. त्याचा भाऊ ह्याच हॉटेलात काम करायचा. त्याने ह्याच्या बॉलिवूड प्रेमाबद्दल सांगितले. शाहरूख, सलमान खान हे पाकिस्तानात आवडते कलाकार. विशेषतः ते पठाण म्हणून ह्यांचा जिव्हाळ्याचा विषय. शाहरूख खानला एकदातरी पाहावे ह्या हेतूने भारतीय व्हिसा घेण्यासाठी शेर खान घरातून चक्क पळाला. पाकिस्तानातील भारतीय दूतावासाच्या बाहेर कितीतरी दिवस रांगेत होता. खिशात पाकिस्तानी दोन हजार रुपये. शेवटी त्याला कसेबसे समजावून घरी आणले.
शाहरूखला प्रत्यक्ष पाहण्यासाठी तो बर्लिनला जाऊन आला. ओम् शांती ओम् च्या प्रीमियरसाठी शाहरूख तेथे आला होता. सलमान आणि कतरिना ह्यांच्या ब्रेकअपची न्यूज वाचून ह्यांचा जीव तडफडला. सगळेच पठाणांना स्वतःच्या कामासाठी वापरून मग वार्यावर सोडतात. सलमानचा वापर करण्यात आला आहे, अशी त्याची ठाम समजूत व त्यास सहानुभूती.
ह्या लोकांच्या डोक्यात कधी काय येईल हे कुणीच सांगू शकत नाही. मात्र तेथे मी एक गोष्ट अनुभवावरून शिकलो होतो : चर्चा राजकारणावर असो किंवा इतर कोणत्याही भाकड विषयावर, ती वादविवाद स्पर्धा आहे असे समजून मी कधीही वाद घालत नाही किंवा प्रतिवाद करत नाही. वाक्यात शक्यतो साखरपेरणी करत एखादा शालजोडीतील हाणून ह्या लोकांना त्यांच्या वाक्यातील फोलपणा किंवा त्यांच्या चुका दाखवतो. वादासाठी वाद करणे म्हणजे सशस्त्र हिंसक कृत्यांना आमंत्रण देणे.
ह्या लोकांचे विश्व वेगळे, ह्यांची मानसिकता व जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. शाहरूखचा माय नेम इज खान हा चित्रपट शेर खानने जर्मनीत सात वेळा थेटरात जाऊन पहिला, तेही युरोमध्ये दक्षिणा देऊन.
ह्यामागील कहाणीसुद्धा अशीच रोचक आहे. त्याच्या क्लासमधील जर्मनीत जन्मलेल्या तुर्की मुलीशी त्याची ओळख झाली. शाहरूखच्या सिनेमाला येतेस का? असे तिला त्याने विचारले तर हा अफगाण नागरिक असल्याचे तिला कळले. तेव्हापासून तिने ह्याच्याशी बोलणे टाकले. जर स्वधर्मीय अशी वागणूक देत असतील, तर इतरांकडून काय अपेक्षा करायची? असा प्रश्न त्याला पडला. हा सिनेमा पहिल्यांदा पाहिल्यावर त्याने दुसर्या दिवशी भर वर्गात त्या तुर्की मुलीला, “माय नेम इज खान, अँड आय एम नॉट अ टेररिस्ट” हे जर्मन भाषेत सुनावले. अफगाणिस्तानमध्ये भारतीय विकास कामे करत आहेत, ह्यांचे त्याला कौतुक वाटते. त्याच्या चुलत भावाला रात्री अचानक ताप आला, तेव्हा भारतीय डॉक्टरने त्याला रात्री दवाखान्यात भरती करून त्यांचे प्राण वाचवले, ही गोष्ट आजही त्याच्या मनात घर करून राहिली. म्हणूनच की काय, त्यांच्या छावणीत नामांकित पाकिस्तानी संस्थांचे काही मुल्ला जेव्हा किशोरवयीन मुलांना जन्नतमध्ये जायचा राजमार्ग दाखविण्यासाठी आले होते, तेव्हा त्याने त्या गोष्टीकडे पाठ फिरवली होती.
आपल्या सरकारने अफगाणिस्तानच्या रस्त्यावर प्रवासासाठी काही भारतीय बसेस दिल्या आहेत. त्यावर अफगाणी भाषेत ‘फ्रॉम इंडिया विथ लव्ह’ असे लिहिलेले असते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे अफगाणी जनतेत भारतीयांविषयी चांगली भावना आहे. आय.एस.आय. आणि पाकिस्तानी सरकारची मात्र ‘किराये के कातिल’ अशी संभावना करतात.
गंमत म्हणजे तेथील तालिबान असो किंवा हक्कानी नेटवर्क, भारतीय विकास कामाच्या शक्यतो मध्ये येत नाहीत, कारण ह्या सुविधांची फळे त्यांनासुद्धा चाखायला मिळतात. उर्वरित जग त्यांच्यावर आकाशातून बाँबवर्षाव करत असते.
सतत युद्धाच्या छायेत राहून त्यांच्या पिढीला मानसिक नैराश्य आलेले त्याच्या बोलण्यातून नेहमी जाणवायचे.
तालिबानी हल्ल्यात तुटलेला एक पूल भारतीय लष्कराने काही दिवसात पूर्ववत केला.
कामाचा हा तडाखा पाहून गोरे लोक स्तिमित झाले. इति शेर खान.
मला भारतीय लष्कराबद्दल अभिमान वाटला, त्याच वेळी माझ्या डोळ्यासमोर भारतात लोकशाहीत आमच्या कुर्ल्याचे व सांताक्रूझचे उड्डाणपूल राजकीय दबाव व इतर कारणास्तव ५ वर्ष अर्धवट अवस्थेत पडल्याचे चित्र दिसत होते.
पुढे एका इराकी माणसाशी त्याचा भावाचे कडाक्याचे भांडण झाले. त्या दिवशी अरब व अफगाण भाषेतून अनेक शिव्या कानावरून गेल्या आणि ह्या दोन्ही भावांनी हॉटेल सोडले. भविष्यात डॉक्टर होण्यासाठी मी त्याला शेवटच्या दिवशी शुभेच्छा दिल्या. पुढे फ्रँकफर्ट सोडून आम्ही म्युनिचला राहायला आलो, पण ह्या कामानिमित्त जगभरातील निर्वासित व त्यांच्या विलक्षण कहाण्या माझे अनुभवविश्व समृद्ध करून गेल्या. ह्याच विश्वाचा एक भाग असलेल्या शेर खानच्या आठवणी आज माझ्याकडून लिहिल्या गेल्या.
प्रतिक्रिया
12 Nov 2012 - 11:59 am | विसुनाना
कहाणी अनुभवसमृद्ध करून गेली.
1 Jan 2013 - 7:52 pm | निनाद मुक्काम प...
काळाचा अखंड ओघ कधी थोपविता येत नाही,
नित्य नावीन्याचा सोस कधी पुरविता येत नाही,
नव्या नव्या वळणांवर नवीन क्षितिजे भेटत राहतात,
नववर्षाच्या शुभेच्छाही तुमची वाट पाहत असतात.
नजरा रोखल्या आहेत, हसऱ्या नव्या वर्षा वर,
स्वप्नांचा पाऊस पडतोय माझ्या मनाच्या रानावर,
फुलत आहेत रानफुले, मैत्रीच्या वेलीवर,
स्वागत करत आहे, मनापासून, येणारे संवत्सर.
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
12 Nov 2012 - 12:57 pm | गणपा
निनद तुझं अनुभव कथन आवडलं.
12 Nov 2012 - 1:04 pm | ५० फक्त
मस्त लेखन आवडलं, निनाद तुझं विश्व आहेच असं वेगळं, फाईदारपणे दोन्हीबाजुला न कुरकुरता उघडणा-या दरवाज्याच्या मागची तुमची दुनिया अशा स्वरुपातुन आमच्या पुढं मांडत रहा हेच सांगणं. धन्यवाद.
13 Nov 2012 - 3:04 pm | बॅटमॅन
+१.
असेच म्हणतो. एका पूर्णपणे वेगळ्या दुनियेचे दर्शन वेळोवेळी ताकदीने घडवल्याबद्दल बहुत आभार!!
12 Nov 2012 - 1:37 pm | गवि
निनादचा लेखही उत्तम आहे. आणि ५०रावांच्या कॉमेंटमधला हा भागही खास..!!
12 Nov 2012 - 5:28 pm | प्रचेतस
लेखन अतिशय आवडले.
12 Nov 2012 - 10:52 pm | यशोधरा
सुरेख लिहिलं आहे..
14 Nov 2012 - 12:06 pm | तिमा
लेख आवडला. जर्मनीबद्दल आणखी लिहा, कारण त्या देशातील बिगर्-जर्मन लोकांविषयी आम्हाला काहीच माहिती नाही.
पूर्वी लिहिले असेल तर कृपया लिंक द्यावी.
1 Jan 2013 - 7:53 pm | निनाद मुक्काम प...
काळाचा अखंड ओघ कधी थोपविता येत नाही,
नित्य नावीन्याचा सोस कधी पुरविता येत नाही,
नव्या नव्या वळणांवर नवीन क्षितिजे भेटत राहतात,
नववर्षाच्या शुभेच्छाही तुमची वाट पाहत असतात.
नजरा रोखल्या आहेत, हसऱ्या नव्या वर्षा वर,
स्वप्नांचा पाऊस पडतोय माझ्या मनाच्या रानावर,
फुलत आहेत रानफुले, मैत्रीच्या वेलीवर,
स्वागत करत आहे, मनापासून, येणारे संवत्सर.
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
14 Nov 2012 - 8:53 pm | शशिकांत ओक
निनाद, आपल्या सुंदर व सविस्तर लेखाचे सार
या वाक्यात आहे असे वाटते...
1 Jan 2013 - 7:53 pm | निनाद मुक्काम प...
काळाचा अखंड ओघ कधी थोपविता येत नाही,
नित्य नावीन्याचा सोस कधी पुरविता येत नाही,
नव्या नव्या वळणांवर नवीन क्षितिजे भेटत राहतात,
नववर्षाच्या शुभेच्छाही तुमची वाट पाहत असतात.
नजरा रोखल्या आहेत, हसऱ्या नव्या वर्षा वर,
स्वप्नांचा पाऊस पडतोय माझ्या मनाच्या रानावर,
फुलत आहेत रानफुले, मैत्रीच्या वेलीवर,
स्वागत करत आहे, मनापासून, येणारे संवत्सर.
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
14 Nov 2012 - 10:22 pm | बहुगुणी
लेख आवडला.
निनाद: तुमच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही असावं हे जाणवतं, लिहित रहा, आम्हांलाही तुमच्या अनुभवांनी समृद्ध व्हायला आवडेल.
14 Nov 2012 - 11:29 pm | सोत्रि
+१
- ( अनुभवांनी समृद्ध व्हायला आवडणारा ) सोकाजी
15 Nov 2012 - 10:10 pm | प्रदीप
असे अजून काही लिहा.
1 Jan 2013 - 7:53 pm | निनाद मुक्काम प...
काळाचा अखंड ओघ कधी थोपविता येत नाही,
नित्य नावीन्याचा सोस कधी पुरविता येत नाही,
नव्या नव्या वळणांवर नवीन क्षितिजे भेटत राहतात,
नववर्षाच्या शुभेच्छाही तुमची वाट पाहत असतात.
नजरा रोखल्या आहेत, हसऱ्या नव्या वर्षा वर,
स्वप्नांचा पाऊस पडतोय माझ्या मनाच्या रानावर,
फुलत आहेत रानफुले, मैत्रीच्या वेलीवर,
स्वागत करत आहे, मनापासून, येणारे संवत्सर.
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
15 Nov 2012 - 4:06 pm | इष्टुर फाकडा
पन्नास रावांना मम म्हणतो.
एक शंका : जर्मन भाषा शिक्षण देणाऱ्या संस्थेचं नाव ग्योथे (Goethe) असं असावं. गटे हे पहिल्यांदाच ऐकलं.
15 Nov 2012 - 7:31 pm | इन्दुसुता
लेख आवडला.
1 Jan 2013 - 7:54 pm | निनाद मुक्काम प...
काळाचा अखंड ओघ कधी थोपविता येत नाही,
नित्य नावीन्याचा सोस कधी पुरविता येत नाही,
नव्या नव्या वळणांवर नवीन क्षितिजे भेटत राहतात,
नववर्षाच्या शुभेच्छाही तुमची वाट पाहत असतात.
नजरा रोखल्या आहेत, हसऱ्या नव्या वर्षा वर,
स्वप्नांचा पाऊस पडतोय माझ्या मनाच्या रानावर,
फुलत आहेत रानफुले, मैत्रीच्या वेलीवर,
स्वागत करत आहे, मनापासून, येणारे संवत्सर.
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
15 Nov 2012 - 7:50 pm | क्रान्ति
आवडला लेख.
15 Nov 2012 - 8:16 pm | स्मिता.
खूप छान लिहिले आहेस. निर्वासीतांच्या व्यथा आपल्य अकल्पने पलिकडच्या असतात आणी त्यामुले त्यांच्यावर निर्वासीत होण्याची वेळ आलेली असते.
तुझ्या लेखनातून आम्हालाही समृद्ध करत रहा.
लाखमोलाचं हे वाक्य आहे. कोणतीही मतं बनवण्याआधी ते आठवावं असं...
16 Nov 2012 - 1:29 pm | नगरीनिरंजन
असेच म्हणतो.
पण लेख थोडा लवकर आटोपता घेतला असे वाटले.
16 Nov 2012 - 2:14 pm | निनाद मुक्काम प...
सर्वांचे मनापासून आभार
जमेल तसे मी अनुभवलेले क्षण किंवा आठवणी येथे लिहित जाईन.
ह्या लोकांची साधलेले संवांद ,आणि त्यांची बोलण्यातून एखाद्या नावाचा संदर्भ लक्षात ठेवून त्याच्याबद्दल आंजा वर शोधणे , आणि काही आंजा वर वाचले असेल तर
त्या बद्दल ह्या लोकांशी चर्चा करणे मला आवडते.
आधीच वायदा केल्याप्रमाणे सौदी व भारत ह्यांच्या बद्दल जमेल तसे लिहीन.
16 Nov 2012 - 4:08 pm | चाफा
एकदम भन्नाट अनुभव, आवडला :)
18 Nov 2012 - 10:32 pm | सस्नेह
सत्य हे कल्पितापेक्षाही अकल्पित असते याची जाणीव करून देणारा.
19 Nov 2012 - 6:28 am | स्पंदना
अतिशय सुरेख मांड्णी !
मला विचाराल तर एका टेबल्वर बसुन पकिस्तान्यांशीब्बोलण हाच एक फार शूरवीरपणा समजते मी.
19 Nov 2012 - 11:10 am | श्रीरंग_जोशी
काही प्रमाणात क्लिष्ट असणारा एक विषय अगदी सहजपणे मांडण्याच्या हातोटीस सादर प्रणाम.
19 Nov 2012 - 12:23 pm | सर्वसाक्षी
लेख आवडला