लेख लिहीण्याचा उद्देश : वेळ उपलब्ध असणे (वेळ जात नसणे), विचारवंत म्हणून प्रसिद्धीस येणे, आपोआप प्रकाशित होत असल्याने औत्स्युक्यापोटी इ.
लेखाची प्रेरणा : कान डोळे आणि मस्तिष्कावर आदळणा-या बातम्या, लोकांच्या प्रतिक्रिया, जालीय काथ्याकूट इ.
भारत या देशात नकारात्मक दृष्टीकोण असणारे लोक राहतात असं वाटतं. परवा एका नव्या टीव्ही वाहिनीच्या उद्घाटनास गेलो असता वक्त्यांनी सांगितले कि सकारात्मक दृष्टीकोण ठेवा. सतत नकारात्मक वार्तांकनांमुळे देशाचा दृष्टीकोण नकारात्मक बनत चालला आहे. म्हणूनच या वाहिनीवर फक्त सकारात्मक गोष्टी दाखवण्यात येतील. या सकारात्मक बाबी इंटरअॅक्टीव्ह पद्धतीने प्रेक्षक आणि वाहिनी व्यवस्थापक यांच्यात देवाणघेवाणीद्वारे दाखवण्यात येणार आहेत. मला विचारलं तर काय सुचवावं या प्रश्नावर विचार करता खालील सकारात्मक विचार सुचले.
१. सिलेंडरची दरवाढ : विरोध दर्शवणे चूकच. भारतात चंगळवादाने अति खाणे होत चालले आहे. आरोग्यविषयक सवयी बिघडल्याने लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. जनता लठ्ठ झाल्याने कमी जागेत जास्त नागरिक मावू शकत नाही. सिलेंडरची दरवाढ केल्यास लोक जपून खातील, फिट राहतील. यामुळे देखण्या लोकांचा देश ही ओळख प्राप्त होईल.
२. भ्रष्टाचार : या गोष्टीकडे नकारात्मक नजरेने पाहणे चुकीचे आहे. कै. जसपाल भट्टी यांनी तर सांगितले होते कि लाच कायदेशीर केली कि भ्रष्टाचार बंद होईल. ज्याला आपण भ्रष्टाचार म्हणता आहात तो कार्यक्षमतावाढीसाठी आवश्यक असा प्रोत्साहन भत्ता आहे. आज तो कायद्यात बसत नसल्याने लोकांमधे चुकीचा संदेश जात आहे. जसजसा भ्रष्टाचार वाढतो आहे तसतशी देशाची प्रगती वाढते आहे हे विशेष ! सकारात्मक दृष्टीकोण ठेवून जसपालजींची सूचना अंमलात आणणे गरजेचे आहे.
३. प्रदूषण, भेसळ : एका सर्वेमधे असे आढळले कि जे लोक कायम फिल्टरचे पाणी पितात ते जास्त आजारी पडतात. म्हणूनच एका राकट आणि कणखर अशा देशाचे नागरिक केवळ मनानेच नव्हे तर शरीरानेही कणखर असावेत आणि कुठल्याही प्रकारच्या संकटावर मात करण्यासाठी त्यांची जडणघडण व्हावी या दृष्टीने हे घटक अत्यावश्यक आहेत. शरीरास जितक्या जास्त प्रतिकूल परिस्थितीत न्याल तितकी त्याची प्रतिकारक्षमता वाढत जाते. रोगांशी लढण्यासाठी प्रतिबंधक यंत्रणा शरीरात विकसित होणे गरजेचे असते. हा सर्व सखोल विचार करून प्रदूषण आणि भेसळवाढीसाठी सर्व पावले उचलली जात आहेत.
४. जालीय काव्यचौर्य : जालीय कवींना अनेकदा विनंती करूनही कवितांचा मारा चालूच राहील्याने त्यांच्या कविता आपल्या नावाने बिनदिक्कतपणे डकवण्याचे प्रकार लोकप्रिय होताना दिसत आहेत. अशा प्रकारे आपली बौद्धीक संपदा चोरीस जात असल्याचे पाहून कवितांचे कारखानदार आपले उत्पादन थांबवतील हा एक सामाजिक दृष्टीकोण यामागे असल्याचे समजते.
लेखास मिळणा-या प्रतिसादावरून पुढचे भाग टंकावयाचे कि नाही याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल.
प्रतिक्रिया
10 Nov 2012 - 9:01 am | खटासि खट
या नव्या वाहिनीनी अचानक संपर्क साधल्यास भंबेरी उडू नये यासाठी आपले प्रपोजल तयार ठेवावे ही नम्र विनंती.
10 Nov 2012 - 9:09 am | चौकटराजा
लेख सकारात्मक झाला आहे. जगात अशी कोणतीही वाईट गोष्ट नाही जिला एकही चांगली बाजू नाही.
गुजरातेत म्हणे ट्राफिक वाल्याला दंडाच्या २० टक्के रक्कम चेकने दिली जाते. त्यामुळे त्याना कामात उत्साह वाटतो.
आपल्याकडे ही सोय नसल्याने एकेका चौकात पाच पाच पोलीस गप्पा छाटीत असतात किंवा सावतील उभे राहून" चितन " करीत असतात.
10 Nov 2012 - 9:12 am | ज्ञानराम
10 Nov 2012 - 12:29 pm | खटासि खट
चौकटराजाजी धन्यवाद. आपला सकारात्मक दृष्टीकोण आवडला. लेखावर किती प्रतिसाद आले हे पाहण्यासाठी लॉटरीच्या तिकिट्च्या उत्सुकतेने मिपावर पुन्हा आलो. पण आपल्या लेखास प्रतिसाद अत्यल्प का यावर चिंतन केले असता असे वाटले कि शीर्षकात काही दम नाही या विचाराने नकारात्मक सदस्यांनी क्लिकण्याचे कष्टच घेतले नसतील. क्लिकल्यानंतरही लेख आवडला नसेल. काही उत्साही क्लिकासुरांनी कोण हा प्रवचनकार म्हणून क्लिकक्लिकाट केला असावा, पण पुढे उत्साह मावळला असावा. काहींना लेख आवडलाही असावा पण लेखाचे उद्देश आवडले नसावे, ज्यांना लेख आवडला आणि उद्देशही खटकले नाही त्यांना पुढील भागाची धमकी चिंताजनक वाटली असावी. या सर्व नकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष करून चौकटराजा यांच्या सकारात्मक प्रतिसादाने उत्साहीत होऊन आणखी काही सकारात्मक निरीक्षणे लवकरच नोंदविण्याचे करणार आहे.
10 Nov 2012 - 2:46 pm | सस्नेह
प्रतिसादांची काळजी करू नका, लिहित रहा.
एकाच पावसात पीक उगवून येत नसते...!
13 Nov 2012 - 7:27 pm | प्यारे१
स्नेहांकिता तैंच्या प्रतिसादाला सुप्परलाईक करण्यात येत आहे....
13 Nov 2012 - 7:32 pm | दादा कोंडके
सहमत. त्याला कंपूगिरीचं खतही आवश्यक असतं. ;)
15 Nov 2012 - 12:01 am | आनंदी गोपाळ
म्हणतात ते हेच काय?
15 Nov 2012 - 11:27 am | श्री गावसेना प्रमुख
कोंबडी खत?
10 Nov 2012 - 12:44 pm | sagarpdy
५. युद्ध , दंगली , साथीचे रोग ई ई - या गोष्टींकडेही सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. लोकसंख्या नियंत्रण तसेच मानवाच्या केवळ चांगल्या जनुकांचे पुढील पिढ्यांमध्ये संक्रमण (उत्क्रांतीचे तत्त्व) होण्यासाठी या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत.
10 Nov 2012 - 1:07 pm | तिमा
सकाळी उठल्यावर बद्धकोष्ठ झाले तर चिंता न करता, तेवढे कष्ट व पाणी वाचले असे म्हणावे.
कॅन्सर झाला तरी आता नवशिक्या डॉक्टरांना आपल्यावर शिकायला मिळेल, हॉस्पिटल, औषध कंपन्या यांचे भले होईल आणि शेवटी एक खाणारे तोंड कमी झाले म्हणून, जगावर उपकार होतील असा सकारात्मक विचार करावा.
10 Nov 2012 - 1:13 pm | अन्या दातार
हीच गोष्ट स्फोट, युद्ध याबाबत लक्षात ठेवावी.
15 Nov 2012 - 12:02 am | आनंदी गोपाळ
युद्धाने पाणी अन कष्ट कसे वाचतील?
10 Nov 2012 - 1:21 pm | ज्ञानराम
तसेच , घरातून पळून जाऊन लग्न करणार्या मुला-मुलींच्या आई वडिलांनी असाच सकारात्मक दुष्टीकोन ठेऊन , ते पळून गेल्याच दु:ख न करता , आपला ल्ग्नाचा खर्च वाचला असे मानून असलेली शिल्लक रक्कम बेंकेत डिपोसिट करावी व निश्चिंत राहावे......... (मग मुलामुलींना घरात घेऊन आपण त्यांना माफ केले सांगून मनाचा मोठे पणा दाखवाव.. आणी येईल तो व्याज बसून खावा)एक तीर से दो शिकार.........
10 Nov 2012 - 9:39 pm | sagarpdy
हा आमच्या एका मित्राने खरोखरच बनवलेला बेत आहे :D
10 Nov 2012 - 10:26 pm | पैसा
प्रतिक्रिया कमी आल्यास तेही सकारात्मक कसे घेता येईल ते पहा.
11 Nov 2012 - 12:00 am | खटासि खट
त्याची योजना तयार आहे. पण गैप्यस्फोट योग्य वेळी करणेत येईल. हा प्रतिसादही अशा प्रकारे सकारात्मक रित्या घेण्यात आलेला आहे.
12 Nov 2012 - 5:53 pm | श्री गावसेना प्रमुख
हा स्फोट लोकसंख्या कमी करण्यासाठी आहे,आमचा पण एक सकारात्मक उद्देश
14 Nov 2012 - 10:49 pm | दिव्यश्री
लेख आणी प्रतिक्रिया दोन्ही छान.....:)
व सकारात्मकही................;)
16 Nov 2012 - 5:21 pm | मदनबाण
(चित्र जालावरुन घेतले आहे.)
वरील चित्र पाहुन मी सकारात्मक विचार करतो....
चांगले बोला
चांगले पहा
चांगले ऐका
यात अजुन एका माकडाची (पक्षी:विचाराची) भर टाकता येईल....
चांगले लिहा. ;)
21 Nov 2012 - 1:16 pm | नक्शत्त्रा
चांगले बोला
चांगले पहा
चांगले ऐका
यात अजुन भर टाकता येईल....
चांगले लिहा.....
मिसळपाव हे अवघड नक्कीच नाही.
23 Nov 2012 - 12:51 pm | खटासि खट
सकारात्मक दृष्टीचा अंगिकार केल्याने आमच्या एका मित्राच्या घरी सर्व बाबा महाराजांच्या तसविरीसोबतच हभप नरेंद्र दाभोळकरांचीही तसबीर पाहील्याचे स्मरते. प्रत्येक मोठ्या माणसाचे म्हणणे योग्यच असते असा सकारात्मक दृष्टीकोण त्यांनी बाळगलेला आहे.
24 Nov 2012 - 1:48 pm | प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅ
लई भारी