“ पुणे ते पानिपत ” भाग ५ : शिंदे छत्री - माधव राष्ट्रीय उद्यान - शिवपुरी

सारथी's picture
सारथी in भटकंती
29 Oct 2012 - 2:28 am

“पुणे ते पानिपत” भाग १-शनिवारवाडा–अहमदनगर–घृष्णेश्वर: http://www.misalpav.com/node/22952

“ पुणे ते पानिपत ” भाग २ : सिंदखेड राजा - बऱ्हाणपूर - शाही किल्ला - http://www.misalpav.com/node/22967

“ पुणे ते पानिपत ” भाग ३ : असीरगढ - ओंकारेश्वर – रावरखेडी : http://www.misalpav.com/node/22988

“ पुणे ते पानिपत ” भाग ४ : उज्जैन –बजरंग गड – शिवपुरी :http://www.misalpav.com/node/22997

आठवा दिवस : १० जानेवारी २०१२

झाशी – दतिया – ग्वाल्हेर

सकाळी उठल्या उठल्या गुरुजींना गाठलं. पहिल्यांदा भ्रमणध्वनी आणि छायाचित्रण यंत्र याबद्दल विचारलं. गुरूजींनी पण सुरवातीला ताकास तूर लागू दिला नाही. पण नंतर मी माझ ब्रह्मास्त्र वापरलं. म्हणालो गुरुजी, अजितने मला सांगितलं भ्रमणध्वनी आणि छायाचित्रण यंत्र तुम्हीच काल काढून घेतलं म्हणूनं.
जर तुमच्याकडे नसेल तर माधव शिंदेंच्या छत्रीजवळ आपलं समूह छायाचित्र कसं काढायचं? मग गुरूजींनी छायाचित्रण यंत्र दिलं आणि भ्रमणध्वनी त्यांच्याकडेच ठेवून घेतला, म्हणाले २०० रु भर मग देतो.

गुरुजींची सवय म्हणजे मराठीत बोलायला लागले कि पूर्णपणे मराठीतच बोलायचे आणि इंग्रजी किंवा हिंदी सुरु केलं कि त्याच भाषेत बोलायचे. धन्य आहे त्या अवलियाची. एकेकाळी पुण्यातल्या बी जे मेडिकल मधून पास झालेला हा अवलिया पुण्यातल्या नामांकित रुग्णालयामध्ये शल्यविशारद म्हणून काम करतं असे.

यावरूनच आठवलेला एक किस्सा सांगतो. स्वागत, माझी वाट बघत शनिवारवाड्यासमोर उभा होता, ओळखपत्र देत आहेत हे कळल्यावर, ते आणायला तिथे गेला. गुरूजींनी विचारलं, तुमचं चित्र द्या, स्वागतला काहीच कळेना, गुरुजी एकदम चित्र का मागतायत ते, तो आपला, अहो मी चित्र नाही काढतं वगैरे सांगायला लागला. शेवटी त्याला कोणीतरी अरे फोटो दे म्हणून सांगितलं आणि स्वागतने सुटकेचा निश्वास सोडला. तर .......

शिंदे छत्री मधील छतावरची कलाकुसर :
.

कोवळ्या उन्हातील छत्रीची झलक :
.

.

आज देखील थंडीचा तडाखा कायम होता. माघ सुरु झाला होता. सकाळी ८ वाजता सगळ्यांनी शिंदे छत्रीच्या दिशेने प्रयाण केले. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात संगमरवरी छत्री मस्तच दिसत होती.मग आम्ही आज सगळ्यांना लाईट पडला कि चमकणाऱ्या ओकम या दगडाची माहिती दिली.सगळ्या मोहिमेचा एकत्रित छायाचित्रण कार्यक्रम फार पडला. परत एकदा आम्ही छत्री दोनदा बघितली म्हणून आम्ही भाव खाल्ला. अमर तर सगळ्यांना रात्री छत्री बघायची मजा काही औरच आहे वगैरे वगैरे म्हणून चिडवत होता. आम्हाला काल रात्री लाईट लावून दाखवले, ते कसे भारी दिसत होते, याचं अगदी तो रसभरीत वर्णन करत बाकीच्यांना जळवण्याचा होईल तितका प्रयत्न करत होता. मग परत एकदा तिथल्या माणसाने लाईट चालू केले, तरी पण अमर, साऱ्या सकाळचं काय भिकार दिसतंय बे, रात्री कस क्लास दिसत होतं अस बोलून शक्य होईल तेवढ त्याने दुसऱ्यांना जळवल. शेवटी एकदाचे मोहिमेने प्रस्थान केले. वेळ ०९३०.

०९३० वाजता आम्ही आमचा मोर्चा तात्या टोपे स्मारकाकडे वळवला. बाकीचे काही तात्या टोपे स्मारकाकडे येण्यास उत्सुक नव्हते. मोहीम कधीच पुढं निघून गेली होती.त्यामुळे मी आणि स्वागत असे दोघंच निघालो. ०९५० वाजता आम्ही स्मारकापुढे पोहचलो. स्मारक सुस्थितीत आहे, हे बघून बरे वाटले. मोहीम पुढे निघून गेली होती.

तात्या टोपे यांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आली होती त्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आल आहे.

तात्या टोपे यांच्या स्मारकाविषयी थोडसं :

तात्या टोपे जन्म : ०६ जानेवारी १८१४
बलिदान दिवस : १८ एप्रिल १८५९

नरवरचा मानसिंग शरण आला आहे असे भासवून, इंग्रजांनी पेरोन च्या जंगलामध्ये लपलेल्या तात्या टोपेला चतुराईने पकडल.तात्या टोपे मन सिंग ला त्याचा मित्र समजायचा आणि त्यांनी पेरोन मध्ये असलेल्या त्याच्या कचेरीमध्ये विश्राम पण केला होता. मान सिंगला भेटण्याच्या ठरलेल्या पूर्वनियोजित जागेवर तात्या टोपे यांना झोपलेल्या अवस्थेत पकडले गेले.पकडल्यानंतर त्यांनी मानसिंगचा तिरस्कार करण्यास सुरवात केली. त्यांना शिवपुरीच्या ऑफिसर बंगला क्र. १७ मध्ये बंदी म्हणून ठेवण्यात आले होते आणि त्यांची ट्रायल पण त्याच बंगल्याच्या तळमजल्याच्या पुढच्या खोलीमधेच घेण्यात आली होती. तात्या टोपे यांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आली होती त्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आल आहे.त्यांना फाशी दिल्या नंतर त्यांना मानणाऱ्या इंग्रजी महिलांनी पण त्यांच्या केसांचे झुपके एकत्रित केले होते.

तात्या टोपेंचा पुतळा :
.

आदल्या दिवशी आमच्या हेरखात्याला लागलेल्या खबरीप्रमाणे माधव राष्ट्रीय उद्यान बघण्यासारखे आहे हे आम्हाला समजले होते आणि रात्रीच्या गुप्त खलबतींमध्ये मोहिमेला पुढे जाऊ देणे आणि मगच राष्ट्रीय उद्यान बघणे हे ठरले होते.

आदल्या दिवशी ठरल्या प्रमाणे आम्ही मोहिमेला पुढे जाऊ दिले होतो व आम्ही माधव राष्ट्रीय उद्यान बघायला जाणार होतो. अमर, बन्या, रुपेश आणि स्नेहल आमची वाट बघत माधव राष्ट्रीय उद्यानासमोर थांबणार होते. कारण आम्हाला तात्या टोपेंच स्मारक बघून यायला थोडा वेळ लागणार होता.आम्ही माधव राष्ट्रीय उद्यानासमोर थांबलो. या चौघांचा काही पत्ता नव्हता. मोबईलला पण रेंज नव्हती. आम्हाला वाटल हे गेले असणार मोहिमेबरोबर पुढ. आम्ही तिथल्या रखवालदाराला विचारलं तो म्हणाला चार चाकी असेल तरच आत जाऊ शकता. आता आली का पंचाईत. म्हणाला पुढं एक ३०० मी वर एक तलाव आहे तिथपर्यंतच बाईक नेऊ शकता. मी म्हटल, स्वाग्या, चल काही न बघण्यापेक्षा थोडस बघू. म्हटलं तू तिकीट काढ, मी गाडी पुढ घेतो.

तेवढ्यात तिथे एक बोलेरो आली. माझ्या अवताराकड बघून आतला म्हणाला
Looking very nice!
आता हा chance मी घालवणार नव्हतो.
Thanks a lot for appreciation.
कहा से आ रहे हो ?
हम लोग महाराष्ट्र से आये हुये है. सर अगर आप बुरा ना मानो तो,क्या हम आपके साथ अंदर पार्क देखणे चल सकते है ? ( मी थेट प्रश्न केला, वेळ वाया घालवण्यात अर्थ नव्हता.)
त्याने त्याच्या सहचारीणीकडे कटाक्ष टाकला. मग दोघांमध्ये ऑखं मिचौली झाल्यावर त्याने
ठीक है. कितने लोग हो आप ?
सर, बस हम दो हि लोग है. हम किराया share करेंगे.
स्वागतला माझ्या वागण्याचा एकंदरीत अंदाज आल्याने त्याने तिकीट काढले नव्हते. पण तो अजून counter वरच उभा होता.
स्वाग्या, ठीक आहे ४ तिकीट काढ, आपण यांच्याबरोबर आत जाऊ.

आम्ही दोघ व मार्गदर्शक ( Guide) आत घेऊन जाने आवश्यक असल्याने तो असे तिघेजण गाडीत बसलो.
गाडीने माधव राष्ट्रीय उद्यानामध्ये प्रवेश केला.

स्वागत आणि मी मधल्या सीटवर खिडकीच्या बाजूला तर मार्गदर्शक आमच्यामध्ये बसला होता. तेवढ्यात आम्हाला पुढून दोन बाईक येताना दिसल्या. आणि बाईक बघताच क्षणी हे आमचे चार कार्यकर्ते आहेत हे कळायला वेळ लागला नाही.

स्वाग्या, अमरया आणि रुप्या येत आहेत, खाली वाक, खाली वाक मी दबक्या आवाजात त्याला म्हणालो.
आम्ही दोघे खाली वाकलो, दोन्ही बाईक गाडीच्या बाजूने निघून गेल्या. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.
एका क्षणी वाटलं आपण चुकीच करतोयं, पण आता नाइलाज होता. आम्ही काय त्याच्या बोलेरोची वडाप करू शकणार नव्हतो.

जो अभी बाईक पे गये वो लोग आपके साथ थे ?
हा, पर वो लोग अभी झांशी जा राहे है. हम बाद में जानेवाले है.
आपने खजुराहो देखा?
नही, वो हमारे रास्तेसे काफी दूर है.
एक बार जरूर जाना, बहोत हि खुबसुरत जगह है वो !

गाडी एका तळ्याच्या शेजारी गाईडने थांबवली. या तलावाला माधव सागर असे नाव होते. एकून असे ३ जलाशय आहेत.जाधव सागर आणि साख्या सागर हि बाकी दोघांची नावे. माधव सागर जलाशय शिवपुरीला पाणीपुरवठा करतो.तलावामध्ये एक खंड्या ( White brested Kingfisher) मासे टिपण्यात मग्न होता.

खंड्या ( White brested Kingfisher)
.

तलावाचं पाणी सकाळच्या समयी खुपच मनमोहक दिसत होतं. अजून एक अचंबित करणारी माहिती अशी कि हे ३ हि जलाशय सुनियोजित मानवनिर्मित जलाशय आहेत. आणि या शुष्क प्रदेशाला वर्षभर पाणीपुरवठा करण्याचे काम हे ३ जलाशय करत असतात. हे जलाशय १९१८ साली ग्वाल्हेरच्या राजाने बनवले. जाधव सागर जलाशय हा महियर नदीवर आहे आणि तो या उद्यानाच्या बाहेर येतो. तर साख्या सागर आणि माधव सागर या उद्यानाचाच एक भाग आहेत. जाधव सागर मधून बाहेर पडणार पाणी साख्या सागर मध्ये येत आणि तिथून ते माधव सागर मध्ये येतं, अशा रीतीने हे तीनही जलाशय एकमेकांना जोडलेले आहेत.

तिथेच बाजूला भिंतीवर एक काळा पडदा होता आणि त्यावर
LIFT THIS FLAP AND SEE THE MOST DANGEROUS SPECIES OF THE WORLD AGAINST ENVIRONMENT CONSERVATION.
अस लिहल होतं. माझ्या आजपर्यंतच्या अनुभवाने त्या काळ्या पडद्यामागे आरसाच असणार याची मला खात्री होती त्यामुळे मी काही तो पडदा उचलण्याच्या भानगडीत पडलो नाही.
आता आम्ही परत गाडीमध्ये बसलो. तलावाच्या एका बाजूने गाडी जात होती.
वो देखो पिकॉक.
गाडीच्या डाव्या बाजूला एक मोर झाडाखाली निवांत बसला होता. मी एक-दोन फोटो घ्यायचा प्रयत्न केला पण झुडुपं मध्ये येत असल्याने फोटो तितकासा चांगला आला नाही.

या मोराची बराच वेळ वाट पहिली पण हा काही त्याचं तोंड दाखवायला तयारच होईना शेवटी कंटाळून याच्या सरकारी जागेचा फोटो घेतला :
.

आम्ही पुढे निघालो. आता आम्ही चितळ रोड नावाच्या रस्त्याला लागलो होतो.
.

आणि अचानक आमच्यासमोरून नीलगाय आडवी गेली. मी परत शक्य होईल तेवढे फोटो घेतले.

नीलगाय (नर) सडक ओलांडताना :
.

एका झाडाखाली उभी असलेली नीलगाय ( मादी) – माझा एक भाबडा प्रश्न : जर आपण गाय आणि बैल असं म्हणतो, तर नीलगायीच्या नराला नीलबैल म्हणावयास हवे ना ?
.

वाटेत बुलबुल आणि इतर असंख्य प्रकारचे पक्षी दिसत होते. गाईडने आता जंगलामध्ये वाघ नसल्याचे सांगितले, पण अजूनही ७ बिबटे असल्याची माहिती दिली. आता आम्ही GEORGE CASTLE नावाच्या गढीपुढे थांबलो.

या गढी विषयी थोडेसे :
हि गढी प्राचीन वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. हि गढी १९११ साली ग्वाल्हेरचे राज्यकर्ते जिवाजीराव सिंदिया यांनी बांधली. हि गढी जंगलाच्या मधोमध बनवण्यात आली आहे. आता हे जंगल उद्यानाचाच भाग आहे. इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा या जंगलांमध्ये वाघाची शिकार करण्यासाठी येणार होता. त्या फक्त एका रात्रीसाठी या गढीची निर्मिती करण्यात आली. पण योगायोगाने राजा जॉर्ज पाचवा ने जंगलात शिरताच वाटेतच वाघाची शिकार केली त्यामुळे तो इथे थांबलाच नाही. हि गढी जंगलातील सर्वोच्च स्थानी बनवण्यात आली आहे. गढीवरून जलाशयाचा आणि करधई जंगलाचा मनोरम्य नजरा दिसतो.

गढी :
.

.

गढीवर गेलो असता हि घार वरती घिरट्या घालत होती :
.

हे जरा वेगळ्याच प्रकारच झाड दिसलं म्हणून क्लिकल :
.

हेच ते बांधकाम, याचं प्रयोजन समजू शकलं नाही :
.

माझी आणि स्वागतची इथे थांबायला मिळाले तर काय मज्जा येईल या विषयावर चर्चा झाली. गाईडला विचारले असता इथे फक्त प्राण्यांची गणना होते त्यावेळेस ते लोक थांबतात असे त्याने सांगितले.
आकाशात घार घिरट्या मारत होती. जंगले, किल्ले बघितलं कि मला सगळ आयुष्य अशा परिसरातच काढावं अस वाटत. अस काही बघायला मिळाल कि मी खुश असतो. तिथे शेजारीच एका चौथऱ्यावर काहीतरी बांधकाम होतं पण नक्की काय असेल ते मात्र कळल नाही.

परत आम्ही गाडीत बसलो. आता हरणांचे कळप दिसायला सुरवात झाली होती.
रानमांजर ... मी ओरडलो.
सगळ्यांनी डावीकडे बघितलं. लांबवर रानमांजराच पिल्लू त्याच्या आईशी लाडू लाडू ( लाडात येणे- हा माझ्या भाचाने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे ) करण्यात व्यस्त होते. त्याची आई त्याला अगदी प्रेमाने चाटत होती.
.

भैया, इसको जंगली बिल्ली कहते है. Guide ने हिंदीत माहिती पुरवली.

अजून पुढं गेलो तर नीलगाय पाणी पिताना दिसली.यावेळेस मी गाडीतून खाली उतरून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. तरीही ती अजिबात हलली नाही. मग मी मनसोक्त बघून झाल्यावर गाडीत जाऊन बसलो.
.

आता आम्ही मन्नो साहीब रोड वर आलो होतो. दीदींना मगर बघायची फारच ओढ लागली होती.
त्या सारख्या गाईड ला भैया crocodile देखने मिलेगा ना ? crocodile देखने मिलेगा ना ? अस वारंवार विचारात होत्या.
गाईड, पण हा मॅडम जरूर मिलेगा म्हणत होता.
आता आम्ही मगरीच्या पाणवठ्यावर आलो होतो. मगरी मस्तपैकी ऊन शेकत बसल्या होत्या.
.

तेवढ्यात झाडीतून रानडुक्कर आणि त्याची पिल्ले वेगात पळताना दिसली. ते बघून मला आमच्या चौथीतल्या “पाणवठ्यावरची संध्याकाळ ” या धड्याची आठवण आली. आजूबाजूला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. पक्षांबद्दल वाचायला सुरवात केली पाहिजे, मी मनातच म्हटले.
.

दीदींच मनसोक्तपणे मगर निरीक्षण झाल्यावर आम्ही गाडीकडे फिरलो. मी देखील टील्लूचे काही फोटो काढले.

आमचा टिल्लू :
.

वाटेतच वठलेल्या झाडावर पाणकावळयांनी मुक्काम ठोकला होता.
.

जलाशयाच्या शेजारीची मगर ऊन शेकत बसली होती. मी गाडीतून उतरलो,तशी ती पटकन पाण्यात घुसली.

तलावाच्या किनारी वेगवेगळ्याप्रकारचे पक्षी, बदकं, हरणं,काळवीट, सांबर वावरत होते.
.

.

.

.

.

.

.

सगळ्यांनी मनसोक्तपणे बघितल्यावर गाडी पुढे निघाली. स्वागतला झाडावर काहीतरी दिसले.
अरे वेगळाच प्राणी होता, इथेच होता कुठे गेला ? अशी बरीच त्या प्राण्याची शोधाशोध झाल्यवर आम्ही पुढे निघालो. माझ्या मते त्याला खार दिसली असावी आणि कधी कधी खारी झाडाला चिटकून झोपतात त्यामुळे त्यांचा आकार थोडा वेगळा भासतो.
खार अशीच कितीतरी वेळा झाडाला चिटकून बसते :
.

अशा रीतीने आमची माधव राष्ट्रीय उद्यानाची यात्रा सफल संपूर्ण झाली.

माधव राष्ट्रीय उद्यानाविषयी थोडेसे:
हे उद्यान शिवपुरीमध्ये स्थित असून ग्वाल्हेर पासून १०० किमी वर आहे. शिवपुरी हि ग्वाल्हेरच्या सिंदिया घराण्याची ग्रीष्मामधील राजधानी. या उद्यानाचा विस्तार ३५४ वर्ग किमी आहे.

.

दादांना थोडे जास्त पैसे आम्ही देऊ केले पण त्यांनी ते घेतले नाहीत. टिल्लूला आणि त्याच्या मम्मी –पप्पांना टा टा करून आम्ही १२५० ला उद्यान सोडले आणि झाशीच्या दिशेने बाईक सुसाट सोडली

क्रमशः

प्रतिक्रिया

तुमची फोटो काढण्याचं कौशल्य चांगलं आहे. धन्यवाद.

श्री गावसेना प्रमुख's picture

29 Oct 2012 - 10:48 am | श्री गावसेना प्रमुख

२९ सप्टेंबर ईडींया टुडे च्या अंकात तात्या टोपे फांसी नही चढे हा लेख लीहुन आलेला होता तो वाचा
1
2
3
4
चार पेज आहेत्,लिंक मिळाली नाही म्हणुन स्कॅन करुन टाकलेले आहेत.
बाकी फोटो छान आहेत.

मृत्युन्जय's picture

29 Oct 2012 - 12:10 pm | मृत्युन्जय

लिंकेवर क्लिक केल्यावर खालील मेसेज मिळत आहे:

403. That’s an error.
We're sorry, but you do not have access to this page. That’s all we know.

लिंकेवर क्लिक केल्यावर खालील मेसेज मिळत आहे:

403. That’s an error.
We're sorry, but you do not have access to this page. That’s all we know. >>>>=+१

अजून काही माहिती मिळते का बघतं आहे, मला देखील हि माहिती नवीनच आहे.

श्री गावसेना प्रमुख's picture

30 Oct 2012 - 11:02 am | श्री गावसेना प्रमुख

1
इथे प्रयत्न करा.आणी नसेल होत तर मेल करतो

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Nov 2012 - 9:01 am | श्री गावसेना प्रमुख

तात्या टोपे
2
3
4

सारथी's picture

1 Nov 2012 - 2:04 pm | सारथी

खरचं खूप वेगळी आणि रंजक माहिती, मी आपलं जे माहिती होतं आणि आंतरजालावर सापडलं ते टंकल.
माहितीबद्दल आभार.
मी लिहिलेल्या माहितीमध्ये बदल करावा अशी आपली इच्छा आहे का ? ( मी इथे बदल करू शकतो पण पूर्ण आंतरजालावर नाही :( )

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Nov 2012 - 2:42 pm | श्री गावसेना प्रमुख

1राहु देत आपण माहीतीत बदल केला तरी,जनमाणसात तोच इतीहास राहणार आहे.
जसा संभाजी राजांबद्दल आहे.

स्मिता.'s picture

29 Oct 2012 - 4:13 pm | स्मिता.

आतापर्यंतचे सगळे भाग वाचले. प्रवासवर्णन खूप छान, महितीपूर्ण होते आहे. फोटोमुळे तर आम्हीसुद्धा मोहिमेसोबत असल्यासारखं वाटतंय. पुढील भाग वाचण्यास उत्सुक!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Oct 2012 - 5:11 pm | अत्रुप्त आत्मा

तुमची वर्णन करण्याची पद्धत,विषय हताळणी आणी फोटो,सगळं परस्पर पूरक आहे...
आगदी तिथे नेऊनच आणता वाचकांना... मस्त एकदम. :-)

शैलेन्द्र's picture

29 Oct 2012 - 10:59 pm | शैलेन्द्र

लिखानाच्या दृष्टीने हा भाग कदाचीत सगळ्यात चांगला.. लिहीत रहा..

रमेश आठवले's picture

29 Oct 2012 - 11:19 pm | रमेश आठवले

फार छान लेखमाला लिहित आहात. अभिनंदन आणि धन्यवाद.
तात्या टोपे हे १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचे सेनापती. तरी त्यांच्या समाधीवर मृत्यूचे साल १८५६ असे लिहिले गेले आहे. ते चुकीचे असेल असे वाटले म्हणून अंतर्जालावर शोध घेतला असता तात्यांचा मृत्यू १८ एप्रिल १९५९ साली झाला असा उल्लेख सापडतो.

सारथी's picture

30 Oct 2012 - 3:40 am | सारथी

चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ,, योग्य तो बदल केला आहे.

रमेश आठवले's picture

30 Oct 2012 - 10:35 am | रमेश आठवले

माझी सुद्धा चूक झाली. साल १८५९ च्या जागेवर १९५९ असे लिहिले गेले .