“पुणे ते पानिपत” भाग १-शनिवारवाडा–अहमदनगर–घृष्णेश्वर: http://www.misalpav.com/node/22952
“ पुणे ते पानिपत ” भाग २ : सिंदखेड राजा - बऱ्हाणपूर - शाही किल्ला - http://www.misalpav.com/node/22967
स्वाग्या........ किल्ला ...................
“चल वर जाऊया” आम्ही दोघांनी एकदमच म्हटले
लागलीच गाडी उजवीकडे वळवून आम्ही किल्ल्याकडे निघालो. वाटेतच आम्हाला आमचे भविष्यातले साथीदार संग्राम आणि रोहन भेटले ते दोघे पण किल्ला बघण्याकरिता वरती निघाले होते.
आयला ,,,, आपल्यासारखे पण आहेत कि ... मी स्वाग्याला म्हणालो
वरती पोहचलो.
अप्रतिम किल्ला होता नाव होत असीरगढ ....
आम्ही फक्त एक तास किल्ला बघत होतो. किल्ला निवांत बघायचा म्हटला तर कमीत कमी ३ दिवस हवेत. वरून आम्हाला मोहीम जात असलेली दिसली.
८०-९० गाड्या एका मागून एक जात होत्या. गुरुजी किल्ल्याची माहिती सांगत होते. आमच्या कानावर मात्र त्यातलं, उजव्या बाजूला असीरगढ दिसत आहे ,,,एवढंच आल.
जे कोणी सह्याद्रीचे भक्त मोहिमेमध्ये असतील त्यांचा नक्कीच जीव कळवळला असणार .
असीरगढ विषयी थोडेसे :
हा किल्ला बऱ्हाणपूर पासून २२.४ किमी वर आहे. खंडव्याच्या दक्षिणेला ४८ किमी वर आहे. बऱ्हाणपूर-खंडवा मार्गावर उजव्या बाजूला एक रस्ता फुटतो. गाडी अगदी वर पर्यंत जाते. रस्ता मात्र बऱ्यापैकी खराब आहे.
जमीनीपासूनची उंची : २५९.१ मी
असीरगढची बाहेरून दिसणारी तटबंदी :
आतमधील जामा मशीद :
किल्ल्यावरील तलाव :
हा “ दख्खनचा दरवाजा ” म्हणूनदेखील ओळखला जातो. किल्ल्यावरती जामा मशीद तसेच शंकराचे देऊळ आहे.
आशा अहिर नावाच्या जाटने किल्ला बांधल्यामुळे नाव असीरगढ पडले आहे असे म्हणतात.पूर्वी किल्ला ‘आशा अहिर गढ’ या नावाने ओळखला जायचा कालांतराने त्याचा असीरगढ असा अपभ्रंश झाला.
हा किल्ला सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसला आहे. बऱ्हाणपूरला ऐतिहासिक महत्व प्राप्त करून देण्यामागे या किल्याचे फार मोठे योगदान आहे. या किल्याची उंची समुद्रसपाटीपासून ७०१ मी आहे. हा किल्ला पूर्वी जंगली क्षेत्रामध्ये येत असे. आता तिथे काही जंगल नाहीये. किल्ल्यावर थोडीफार झाडी आहे. पाण्याची ३ मोठे तलाव आत मध्ये आहेत.हा किल्ला तीन भागांमध्ये विभागला जातो. १.असीरगढ २.कमरगढ ३. मलयगढ .याची पूर्व-पश्चिम लांबी ३३०० फुट असून उत्तर-दक्षिण रुंदी १८०० फुट आहे. किल्ल्याच्या तटांची उंची ८० ते १२० फुट आहे.
फिरोजशाह तुघलकाचा शिपाई मलिक ख़ाँचा मुलगा नसीर ख़ाँ फ़ारूक़ी याचा या किल्ल्यावर डोळा होता. तो बऱ्हाणपूरला आला. त्याने आशा अहिरची भेट घेतली व त्याला सांगितले कि "मेरे भाई और बलकाना के ज़मीदार मुझे पेरशान करते रहते हैं, एवं मेरी जान के दुश्मन बने हुए हैं। इसलिए आप मेरी सहायता करें और मेरे परिवार के लोगों को इस सुरक्षित स्थान पर रहने की अनुमति दें, तो कृपा होगी"
आशा अहिर उदार मनाचा होता त्याने नसीर ख़ाँ च्या बोलण्यावर विश्वास ठेऊन त्याला किल्ल्यामध्ये राहायची परवानगी दिली. नसीर ख़ाँ नी पहिल्या काही डोल्यांमध्ये बायका मुलांना पाठवले आणि नंतरच्या डोल्यांमध्ये हत्यारधारी शिपाई पाठवले. आशा अहिर आणि त्याची मुलं त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. जसा डोल्यांनी किल्ल्यामध्ये प्रवेश केला, शिपायांनी डोल्यांमधून अचानक बाहेर पडून बेसावध आशा अहिर आणि त्याच्या मुलांना ठार मारले. आणि अशा प्रकारे किल्ला नसीर ख़ाँ फ़ारूक़ीच्या अधिपत्याखाली आला. आदिलशाह फ़ारूक़ीच्या मृत्युनंतर बहादुरशहा फारुकी सत्तेवर आला.
अकबरला या किल्ल्याची प्रसिद्धी माहित होती. असीरगढ़वर चाल करायच्या हेतूने त्याने दक्षिणेची मोहीम उघडली. जशी फारुकी बादशाहाला हि गोष्ट कळली त्याने किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त केला. हा बंदोबस्त यवढा होता कि किल्ला सर्व बाजूनी वेढला गेला तरी किल्ला १० वर्ष लढला असता. अकबराने किल्ल्याला वेढा दिला आणि दारूगोळ्याचा मारा सुरु केला. रात्रंदिवस तोफगोळ्यांचा भडीमार करूनही किल्ला ताब्यात येत नाही असे दिसल्यावर अकबराने दूत किल्ल्यात पाठवला व तहाची बोलणी करण्यासाठी फारुकी बादशाहाला आमंत्रण दिले. फारुकी बादशाहाने अकबराच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तो तहाची बोलणी करायला बाहेर आला. जशी तहाची बोलणी सुरु झाली त्याचवेळेस अकबराच्या एका शिपायाने फारुकी बादशाहावर हल्ला केला आणि त्याला जायबंदी केले. अशा प्रकारे कुटनीतीने अकबराने फारुकी बादशाहाला कैद केले.
"यह तुमने मेरे साथ विश्वासघात किया" है। यावर अकबरने "राजनीति में सब कुछ जायज है।" असे उत्तर दिले. किल्लेदार आणि शिपायांना सोने-चांदी देऊन किल्ला काबीज केला. अशा प्रकारे १७ जानेवारी १६०१ ला अकबराने किल्ल्यावर जय मिळवला आणि किल्ल्यावर मुघल सत्तेला प्रारंभ झाला.
अकबराने बहादुरशहा फारुकीच्या मुलांना व बहादुरशहा फारुकीला बंदी बनवले. बहादुरशहा फारुकीला ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये तर त्याच्या मुलांना इतर वेगवेगळ्या किल्ल्यांमध्ये बंदी म्हणून ठेवले गेले. ज्या प्रकारे फारुकी बादशहाने कुटनीतीने किल्ल्यावर सत्ता स्थापन केली होती तशाच प्रकारे किल्ला त्याच्या हातामधून गेला. अशा प्रकारे मुघलांचे बऱ्हाणपूरवर आणि असीरगढवर साम्राज्य आले आणि फारुकी वंश नाश पावला. अकबर नंतर १७६० ते १८१९ पर्यंत किल्ला मराठ्यांच्या हातात होता. त्यानंतर किल्ला इंग्रजांकडे आला.
अभेद्य मानल्या जाणाऱ्या किल्ल्यांमध्ये याची गणना होते.
‘मदार दरवाजा’च्या समोर काळ्या दगडामध्ये अकबर, दानियाल, औरंगज़ेब आणि शाहजहाँचे चार फारसी भाषेमधील शिलालेख आढळतात. या शिलालेखांवर किल्ल्याच्या किल्लेद्वारांवर विजय प्राप्त करणाऱ्यांचे, सुभेदारांचे आणि इतर वर्णन आहे. शाहजहाँच्या शिलालेखावरून ज्ञात होते कि इथे काही वास्तू त्याने बनविल्या.
१५८० मध्ये राजा अली खानने (आदिलशहाने) किल्ल्यावर जामा मशीद बांधली. (याबद्दल देखील वाद आहेत.)
‘मदार दरवाजा’ राजगोपालदास या सुभेदाराने बनवला होता. आतमध्ये जाताच जमा मशिदीचे दोन मीनार स्पष्टपणे नजरेस पडतात. कोणेकाळी किल्ल्यावर शेती केली जात असे. हि मशीद पूर्णपणे काळ्या दगडांमध्ये बनवलेली आहे. हि मशीद फारुकी शासकांच्या वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. हि मशिद बऱ्हाणपूरच्या जामा मशिदीच्या ५ वर्षे अगोदर बांधण्यात आली. हि मशिद ९३५ फुट लांब आणि ४० फुट रुंद आहे. ५० खांबांवर याचे छत तोलले गेले आहे. या मशिदीमध्ये एकाचवेळेस १२०० माणसे सहज नमाज पढू शकत होती. मशिदीच्या मध्यभागी अरबी भाषेमधला शिलालेख आहे ज्यामध्ये मशिदीचे निर्माण वर्ष ९९२ हिजरी असे अंकित आहे.
असा हा किल्ला नीट बघायचा म्हटल्यास कमीत कमी ३ दिवस हवेत.
परत असीरगढ बघायला चांगले ४-५ दिवस काढूनच यायचं, असे मनातल्या मनात ठरवत अशेरीगडाचा निरोप घेतला.
किल्ला बघून आम्ही साधरण ६ च्या सुमारास मोहिमेत येऊन मिळालो. अगोदर ठरल्याप्रपणे मोहिमेला मुक्कामाच्या ठिकाणी पोहचण्यास रात्र झाल्यास, रात्री गाडी चालविताना सर्वानी उजवा दिशादर्शक चालू ठेवावा असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आम्हाला मोहीम सापडण्यास मदत झाली.
संग्राम आणि रोहन पण आमच्याबरोबरच किल्ला बघून निघाले. आम्ही साधरण १५३० च्या सुमारास किल्ला बघून निघालो. मोहीम बरीच पुढे गेली असल्याने आम्ही दुचाकी ९०-१०० नेच मारत होतो.
१७०० वाजले तरी मोहीम दिसायची चिन्हे दिसेनात. आपण रस्ता चुकलो तर नाही ना अशी हि शंका यायला लागली.संग्राम आणि रोहन पण पुढे आहेत कि मागे राहिलेत ते कळतं नव्हते.
शेवटी एकदाची मोहीम दिसली, आमच्या जीवात जीव आला. आजचा मुक्काम बढवाह या ठिकाणी होता.
सर्वानुमते उद्या भल्या पहाटे ओमकारेश्वराचे दर्शन घ्यायचं ठरलं. आज रात्रीच्या सभेत गुरुजींनी असीरगढ या किल्ल्याविषयी माहिती सांगितली. दररोज रात्रीच्या सभेत गुरुजी कुठल्यातरी विषयावर माहिती सांगत असत. आज रात्री परत एकदा जेष्ठ आणि श्रेष्ठ लोकांनी आम्हाला मोहिमेत पुढ राहू द्यावं असा मुद्दा मांडला. खर सांगायचं तर आम्हाला देखील यामध्ये काही अडचण नव्हती पण व्हायचं काय हि लोकं दुचाकी फार हळू चालवत असत आणि त्यामुळे दोन वाहनांमधील अंतर वाढत जायचे आणि मोहीम मारुतीच्या शेपटासारखी लांबलचक व्हायची. त्यामुळे हा मुद्दा मागं पडला. आता थंडी देखील वाढत चालली होती. लोकांच्या कानटोप्या, हातमोजे, पायमोजे अशा अनेक गोष्टी बॅगांमधून बाहेर आल्या होत्या, आज परत काळे काकांनी मला योगासाठी सकाळची ठराविक २०-३० मि. द्या मि सगळ्यांना योगा शिकवत जाईन. असा मुद्दा मांडला पण आता थंडी चांगलीच वाढत चालली होती आणि नव्याची नवलाई देखील संपली होती. त्यात योग करायला कोण उठतो. माझ्यासारखे आळशी घोडे तर सकाळी उठून थेट दुचाकीवर स्वार होत आणि मग कुठेतरी चहाची टपरी बघून चहा होई आणि अंगात थोडी उब आली कि मग दात घासणे, तोंड धुणे इत्यादी सोपस्कार पार पडत असत. आज तर झोपायला गाद्या आणि रजई होती आणि हे बघितल्या बघितल्याच आमच्या सारख्यांचा तोल ढळला आणि आम्ही लगेच सभागृहात घुसून मित्रांसाठी जागा पकड, mobile charging ला लाव असे उद्योग करायला लागलो. आमचे असे माकड चाळे बघीतल्यावर गुरुजींनी सगळ्यांना बाहेर हुसकावले आणि जेष्ठ ते कनिष्ठ असा न्याय करत आम्हाला सगळ्यात शेवटी सभागृहात प्रवेश मिळाला. रोहन आणि संग्रामनी काळेकाकूंकडे हातमोजे, पायमोजे नाहीत हे बघून त्यांना ते घेऊन दिले.
आजचा प्रवास : १९०.३ किमी
उद्याचा प्रवास : ओंकारेश्वर – सानवाड – भेडीया – रावरखेडी - सानवाड – भेडीया – इंदूर –देवास
पाचवा दिवस : ०७ जानेवारी २०१२
ओंकारेश्वर – सानवाड – भेडीया – रावरखेडी - सानवाड – भेडीया – इंदूर –देवास
काल ठरल्याप्रमाणे सगळेजण सकाळी ५ लाच उठले. आज ओंकारेश्वराच दर्शन घ्यायचं असल्याने मी दात घासले, हात पाय तोंड धुतलं आणि अंतकरण शुद्ध असल म्हणजे झाल अस म्हणत दुचाकीवर स्वार झालो. “अंतकरण शुद्ध असल म्हणजे झाल” यावर बऱ्याच लोकांच एकमत झालेलं दिसत होत. आणि आम्ही सगळे ओंकारेश्वर मंदिराच्या बाहेर पोहचलो. अतिशय सुंदर अस सूर्योदयाच दृश्य तिथल्या पुलावरून दिसत होत.
खळाळत वाहणारी नर्मदा:
नर्मदा खळाळत वाहत होती. मनात म्हटलं नर्मदामाते अशाच एका प्रातसमयी मी माझी नर्मदा परिक्रमा सुरु करेन. माझ्या मनात आहे नर्मदा परिक्रमा करायचं पण करवून घेणारी तूच आहेस तेव्हा लवकरात लवकर तो क्षण येऊ दे म्हणजे झाल. इतर मंदिरांप्रमाणेच ओंकारेश्वराच मंदिर होत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले या मंदिराच्या परिसरात हि अस्वच्छतेचा कळस होता. नर्मदेच्या काठावर अनेक भाविक (???) लोक स्नान करून नर्मदेच पाणी दुषित करत होते.
मला तर त्या ठिकाणी पाण्यात उतरण्याच्या कल्पनेने पण अंगावर काटा आला आणि सर्वात विशेष म्हणजे छायाचित्रणाला बंदी नव्हती.
ओंकारेश्वर विषयी थोडेसे:
१२ ज्योतिर्लिंगांपैकी १. खंडवा ते ओंकारेश्वर – ७२ किमी.
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या बरोबर येथे अमलेश्वर ज्येतिर्लिंग पण आहे.
राजा मान्धाताने या बेटावर कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले. भगवान शंकर प्रसन्न झाल्यवर त्यांना याच ठिकाणी निवास करण्याचे वरदान मागितले. तेव्हापासून हे क्षेत्र ओंकार-मान्धाता नावाने ओळखले जाऊ लागले.
नर्मदा परिक्रमेला येथूनच बहुतांशी लोक सुरवात करतात. अहिल्याबाई होळकर यांनी १८,००० मातीची शिवलिंगे बनवून त्यांची पूजा करून याच ठिकाणी त्यांना विसर्जित केले होते.
अशीच टुकारगिरी:
सकाळी सकाळी काही लहान मुले–मुली शाळेला निघाले होते. मी त्या निरागस चेहऱ्यांचे काही भाव टिपण्याचा प्रयत्न केला.
पुलावर दिसणारं ओंकारेश्वराच मंदिर:
मोहिमेची आवरा-आवर चालली असताना हे पिल्लू दिसलं:
सगळ्यांच दर्शन होता होता ०९४० वाजले आणि मोहिमेने रावरखेडीच्या दिशेने प्रस्थान केले.
रावरखेडीच्या मार्गावर:
वाटेत बेडिया लागलं. मिरचांची मध्य प्रदेश मधील बेडिया हि सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे.
जिकडे बघाव तिकडे नुसता लालभडक मिरच्यांचा बाजार दिसत होता.
मनात आल बर झाल आईला घेऊन नाही आलो नाहीतर आत्ता मिरचांच एक पोत मागं बांधाव लागल असत. हौशी कलाकारांनी मिरचांची खरेदीपण केली. आता आम्ही रावरखेडीच्या रस्त्याला लागलो होतो. आयुष्यात मी बघितलेला सगळ्यात खराब रस्ता असेल तो. आमच्या कितीतरी गाड्या या रस्त्यावर पडल्या. कल्याणगड, मधु-मकरंदगडावर जाणारे रस्ते कितीतरी पटीने चांगले म्हणायची वेळ आली होती.
मोहीम रावरखेडीमध्ये घुसताना :
फोटू काढायची हौस भारी :
गावामाधली पोर-टोर, वयस्कर मंडळी, बायका सगळेजण मोहिमेकडे, पु. लं. च्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे जितक्या नजरेने पाहू शकते तितक्या वेगवेगळ्या नजरांनी आमच्याकडे बघत होते.
गावात घुसलेल्या मोहिमेकडे कुतूहलाने बघताना चिमुरड्या :
आमचे मावळे मात्र चिखलात रुतलेल्या गाड्या काढण्यात आणि उरलेले त्या गाड्यांचे फोटो काढण्यात व्यस्त होते.
सरतेशेवटी १२०० वाजता आमची मोहीम श्रीमत बाजीराव पेशव्यांच्या छत्री च्या इथे पोहचली आणि श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा .... विजय असो च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
श्रीमत बाजीराव पेशव्यांच्या छत्री प्रवेशद्वार :
श्रीमत बाजीराव पेशव्यांच्या छत्री :
छत्रीच्या तटबंदीवरून दिसणारी नर्मदा:
श्रीमंत बाजीराव पेशव्यांबद्दल थोडेसे :
वडील : बालाजी विश्वनाथ
जन्म : इ.स. १७००
पेशवेपदाची सूत्रे हातात घेतली : १७२०
मृत्यू : २७ एप्रिल १७४०
दक्षिणेपासून दिल्ली पर्यंत जरब बसवणारे महान मराठा सेनापती.
विजय : मालवा , गुजरात , दक्षिणेकडील सुभेदार , निजाम त्याचबरोबर दिल्लीच्या बादशहा आणि पोर्तुगीजांना हरवले.गुजरातचे गायकवाड , नागपूरचे भोसले , ग्वाल्हेरचे शिंदे ( सिंदिया ), धारचे पवार, इंदूरचे होळकर यांना एकत्र आणून मराठा संघ बनवला.ग्वाल्हेरचे शिंदे (सिंदिया) सरदारांनी रावरखेडी येथे त्यांची समाधी बांधली.
१२५० ला आम्ही समाधी सोडली आणि इंदूरच्या दिशेने प्रस्थान केले. वाटेत बराच चिखल असल्याने स्वागत गाडी हळूहळू बाहेत काढत होता आणि मी नर्मदेच्या पाण्यात मासे पकडण्यात मग्न असलेल्या बगळ्याचे फोटो काढण्यात गुंतलो होतो.
याच्यासाठी केला होता अट्टाहास :
गाडी बाहेर आल्यावर स्वागतने मला आवाज दिला, सारखा क्लच आणि ब्रेक दाबून तो पण वैतागला होता. त्यामुळे गाडी मी चालवायला घेतली. काही क्षणातच मला आपल्या हातात gloves नाहीयेत हे लक्षात आल. स्वागतला म्हणालो तू थांब जमल तर मोहिमेबरोबर पुढे जा मी आलोच समाधीच्या इथे gloves बघून.
परत पुलावरून जाताना सहज मगाचच्या बगळ्याकडे नजर फिरवली. तो अजून मासे टिपण्यात दंग होतो.
आणि मलाच माझ हसू आल बरोबर बगळ्याच्या मागे ज्या दगडावर बसून मी बगळ्याचे फोटो काढत होतो तिथेच दोन्ही gloves पडलेले होते. पटकन गेलो gloves घेतले. स्वागत बहुतेक माझ्यावरच लक्ष ठेऊन असावा. त्याला माझे gloves मिळाल्याच लक्षात आल.
आता इंदूर गाठायचं होत. मोहीम जेवणासाठी वाटेत थांबणार होती. आम्हाला शक्य होईल तितक्या लवकर पुढे जाऊन इंदूर मधला होळकरांचा राजवाडा बघायचा होता. वाटेत भूक असह्य झाल्याने एका हॉटेलमध्ये पोट शांत केले आणि पुढे निघालो.
गाडी चालवता चालवत आपल्या गुंगी येत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी गाडी बाजूला घेतली. स्वागत ला गाडी चालवायला दिली आणि जेवल्या जेवल्या पटकन डोळा लागण्याच्या माझ्या सवयीला येथेच्छ शिव्या घातल्या. स्वागत गाडी चालवत होता आणि मी मागे त्याला धरून झोपलो. मधूनच गाढ झोप लागायची आणि तोल जायचा मग स्वागत मला येथेच्छ शिव्या घालत अरे झोपू नको म्हणून सांगायचा आणि माझ परत येरे माझ्या मागल्या सुरु व्हायचं.
( विशेष सूचना : चालत्या दुचाकीवर झोपणे अतिशय धोकादायक आहे, कृपया कुणीही असा प्रयत्न करून बघू नये :) )
इंदूरमध्ये पोहचलो तेव्हा १७१५ वाजले होते. थोडा चहा नाश्ता करून आम्ही होळकर राजवाड्यासमोर पोहचलो. राजवाड्यासमोरच पोलीस काका उभे होते. मग परत एकदा त्यांनी आम्हाला आमचा पोशाख पाहून कुठून आला, कुठे निघालात असे बरेच प्रश्न विचारले आणि शेवटी राजवाडा १७०० वाजताच बंद होतो अस सांगितलं. मी बाहेरून होता होईल तेवढा राजवाडा न्याहाळला.
राजवाड्याचा दर्शनी भाग :
राजवाड्याविषयी थोडेसे :
इंदूर मध्ये असलेला राजवाडा हि माळव्याच्या मराठ्याच्या उत्कर्ष काळातील भव्य इमारत आहे.
१७४७ च्या आसपास मल्हारराव होळकरांनी आपल्या परिवाराला राहण्यास्ठीच्या उद्देशाने या वाड्याची उभारणी केली होती. १८०१ मध्ये सिंदिया सेनापती सर्जेराव घाटगेने हा राजवाडा जाळला. १८१८ ते १८२६ च्या दरम्यान आगीपासून वाचलेल्या प्रवेशद्वाराच्या वरचे ५ माजले परत ठीक करण्यात आले.या कार्यामध्ये होळकरांचे पंतप्रधान तात्या जोग यांनी महत्वाची भूमिका बजावली. अशा प्रकारे १८२६ ते १८३३ च्या मध्ये या इमारतीची डागडुजी पूर्ण झाली. दुर्दैवाने १८३४ मध्ये परत आग लागून लाकडाने बनवलेला पूर्ण एक मजला खाक झाला. १८४४ ला तुकोजीराव द्वितीय ला दत्तक घेतले गेले तेव्हा त्यांचा पहिला राजतिलक समारंभ पण याच वाड्यात झाला. १९८४ मध्ये याचा मागचा भाग जाळून गेला. त्यामुळे राजवाड्याचे आता ३ वेगवेगळे भाग नजरेत येतात. पहिले तीन मजले दगडांचे बनवलेले असून राजपूत शैलीची छाप असलेले आहेत. चौथ्या पासून सातवा मजला मराठा शैलीची छाप असलेला आहे. यामध्ये लाकडी कलाकुसरीचा जास्त प्रमाणात समावेश आहे. स्थापत्यकलेच्या दृष्टीने मुस्लीम , राजपूत, मराठा स्थापत्यशैलीचे मिश्रण आहे. याचा दक्षिण भाग मुघल स्थापत्य , पूर्व भाग मराठा स्थापत्य शैलीचा आहे.गणेश सभागृह, दरबार सभागृह फ्रेंच स्थापत्यशैलीचे आहे. प्रवेशद्वाराची शैली हिंदू शैलीच्या राजवाड्यासारखी दिसून येते. याच्या दर्शनी भागातील खिडक्या दर्शनीय आहेत. वास्तूचा दक्षिणी भाग वास्तूचे वारंवार पुनर्बांधकाम झाल्याची साक्ष देतो. वास्तूच्या र्निमिर्तीमध्ये दगड आणि चुना यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला आहे. काष्ठ शिल्पाचा कलात्मकरित्या उपयोग करण्यात आला आहे.
बर इथे अजून काय बघण्यासारखे आहे हे विचारल्यावर प्राणी संग्रहालय आहे अशी माहिती मिळाली. मग आमची स्वारी प्राणीसंग्रहालयाच्या दिशेने निघाली. प्राणीसंग्रहालयात पोहचता पोहचता १८०० वाजले. चौकशी केल्यावर प्राणीसंग्रहालय १८३० बंद होत असल्याचे कळले. बर आत जाव तर तिकीट खिडकी पण बंद झाली होती. आम्ही मग आमच्या कार्यकर्त्यांना ( संग्राम आणि रोहन ) फोन लावला तर दोघेही त्याच भागात असल्याच कळल. मग आम्ही त्यांची वाट बघत प्राणीसंग्रहालयाशेजारीच थांबलो. १५ मि. जोडी आली. मग आम्ही परत एकदा पोटात पाणीपुरी,भेळ अस बरच, आईच्या भाषेत सांगायचं झाल तर अबरट-चबरट खाल्लं आणि मोहिमेत असलेल्या धीरजदादाला फोन केला. धीरजदादाने चांगली बातमी दिली. मोहीम इंदूरवरून न जाता इंदूरच्या बाहेरच्या रस्त्याने देवासच्या दिशेने निघाली होती. आम्ही चौघे परत एकदा देवासला जायचा रस्ता कुठल ? अस विचारत देवासच्या रस्त्याला लागली. मला तर कधी एकदा इंदूर सोडतोय अस झाल होत. भिक्कार traffic, अहो पुण्यातल traffic परवडल. आणि सरतेशेवटी आम्ही इंदूरमधून सुखरूप बाहेर पडलो. आयुष्यात काही लोकांबरोबर आपली wavelength इतकी का जुळावी ? आणि काहींबरोबर का जुळू नये ? याला काही उत्तर नसत. (हे पण पु.लं.चच बर का )
तसंच आमच संग्राम आणि रोहन बरोबर झालं. शेवटी एकदाचे आम्ही मोहिमेला येऊन मिळालो.
मोहिमेचं वडा-चटणी वर ताव मारणं सुरु होतं. आम्ही देखील मग पोट भरेपर्यंत वडे हाणले. उरलेले वडे एका बॉक्स मध्ये भरून घेतले आणि ट्रकमध्ये ठेवले. उद्याच्या नाष्ट्याची तयारी, दुसर काय ?
आजचा मुक्काम महाराष्ट्र समाज, देवास येथे होता.
आजचा प्रवास :१९५ किमी
उद्याचा प्रवास: उज्जैन – शाजापूर – सारंगपूर – ब्यावरा
क्रमशः
प्रतिक्रिया
26 Oct 2012 - 4:38 pm | विटेकर
अत्यंत अर्थवाही वर्णन आणि फोटु
26 Oct 2012 - 4:39 pm | विटेकर
अत्यंत अर्थवाही वर्णन आणि फोटु
26 Oct 2012 - 4:44 pm | बिपिन कार्यकर्ते
वाचतोय!!!
बाकी इंदूरला शिव्या घालायचं काम नाही हां! ’हाय कम्बख्त तुने ...’ वगैरे! ;)
27 Oct 2012 - 2:19 am | सारथी
इंदूर भारीच आहे त्यात काय वाद आहे का ????? पण .ट्राफिक.........:(
26 Oct 2012 - 5:18 pm | शैलेन्द्र
तु सहा वाजता इंदोरात होतास आणी राज्वाड्यामागच्या मार्केटमधे जायच तुला सुचु नये? अन्याय केलास तु तुझ्या जिभेवर..
27 Oct 2012 - 2:20 am | सारथी
हे आत्ता वाचून एवढ वाईट वाटतंय ,,,,,कुणाला माहितचं नव्हत रे :( ,,, जाऊ दे , पुढच्या वेळी नक्की :)
26 Oct 2012 - 5:24 pm | केदार-मिसळपाव
अगदी मस्त.. झक्कासच लिहितोयस....
26 Oct 2012 - 5:25 pm | केदार-मिसळपाव
आईच्या भाषेत सांगायचं झाल तर अबरट-चबरट खाल्लं...:ड
26 Oct 2012 - 5:43 pm | अत्रुप्त आत्मा
सलाम.... आणी
26 Oct 2012 - 6:40 pm | बॅटमॅन
बहुत प्रभावी, ओघवते वर्णन आहे. त्याची आणि या एकूण उपक्रमाची प्रशंसा करावी की फटू पाहून जळजळ झाल्याने इनो घ्यावा याचा निर्णय करण्यात बराच वेळ गेला. लै भारी लिहिताय, मजाये चायला!!!
26 Oct 2012 - 8:25 pm | पैसा
ब्याम्याबरोबर बाडिस
26 Oct 2012 - 9:05 pm | जाई.
वर्णनशैली आणि फोटो खास
26 Oct 2012 - 9:05 pm | जाई.
वर्णनशैली आणि फोटो खास
26 Oct 2012 - 9:32 pm | शुचि
फारच सुंदर वर्णन आणि फोटो.
27 Oct 2012 - 5:32 am | श्रीरंग_जोशी
इतरांना हेवा वाटावी अशी मोहीम, बहारदार लेखनशैली, झकास छायाचित्रण, इतिहासाची चांगली जाण अशा अनेक गोष्टींमुळे हि लेखमालिका पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते.
याहूनही मोठ्या मोहिमांमध्ये सहभागासाठी शुभेच्छा.
27 Oct 2012 - 11:51 am | सस्नेह
मनात आल बर झाल आईला घेऊन नाही आलो नाहीतर आत्ता मिरचांच एक पोत मागं बांधाव लागल असत.
ख्या: ख्या: एकदम सह्ही..!
28 Oct 2012 - 8:49 am | दीपा माने
सुरेख लेखन केलं आहे. मोजकेच पण आपल्या वैशिष्ट्याने फोटोंनी लेखात जिवंतपणा आणलाय. पुढील लेख वाचायची उत्सुकता वाढली आहे.
29 Oct 2012 - 1:58 am | सारथी
प्रतिसादाबद्दल सर्वाचे मनापासून आभार :)
29 Oct 2012 - 8:05 am | ५० फक्त
अतिशय सुंदर प्रवास वर्णन्,फोटो देखील खुप मस्त आले आहेत. धन्यवाद.