या वर्षीच्या सुरवातीला ०३ जानेवारी ते २५ जानेवारी २०१२ रोजी सुमारे २५० जणांनी “ पुणे ते पानिपत ” असा दुचाकीवर सुमारे ६००० किमी चा प्रवास केला. प्रवासात उन, हाडं गोठवणारी थंडी, मुसळधार पाऊस या सर्वांचा सामना करत हि मोहीम मावळ्यांनी यशस्वी केली. या मोहिमेचं सगळं श्रेय जातं ते आयोजक डॉ. संदीप महिंद यांना. या २३ दिवसांमध्ये आम्ही शनिवारवाडा – तुळापूर – फुलगाव – वढु बुद्रुक – अहमदनगर – घृष्णेश्वर – संभाजीनगर – जालना – सिंदखेड राजा – बुलढाणा – मुक्ताईनगर – इच्छापूर – बऱ्हाणपूर – खंडवा – रावेरखेडी – ओंकारेश्वर – इंदूर – देवास – उज्जैन – शाजापूर – सारंगपूर – ब्यावरा – गुणा – शिवपुरी – झांशी – दतिया – ग्वाल्हेर – धौलपूर – आग्रा – मथुरा – दिल्ली – झिंझोली – सोनीपत – पानिपत – कुंजपुरा – कुरुक्षेत्र – लुधियाना – जालंधर – अमृतसर - वाघ सीमा – फतेहगढसाहिब – अंबाला – हरिद्वार – नजिबाबाद – मुरादाबाद – रामपूर – बरेली – शाहजहॉपुर – सीतापूर – लखनऊ – अयोध्या – सुलतानपूर – काशी – सारनाथ – अहमदाबाद – सतना – मैहर – कटनी – भेडाघाट – जबलपूर – सिवनी – देवलापार – नागपूर – यवतमाळ – माहूर – नांदेड –अंबेजोगाई – तुळजापूर – सोलापूर – पंढरपूर – पुणे असा लांबलचक प्रवास केला. या २३ दिवसांमध्ये आम्हाला खूप काही बघायला, अनुभवायला आणि शिकायला मिळाले.
या मोहिमेच मुख्य उद्दिष्ट होतं पानिपतवर शहीद झालेल्या मराठी वीरांना श्रद्धांजली देणे. १४ जानेवारी २०१२ ला पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला २५१ वर्ष पूर्ण होत होती आणि त्याचचं निमित्त साधून हि मोहीम काढण्यात आली होती. २५१ वर्षापूर्वी ज्या मार्गाने मराठ्यांच्या फौजा राष्ट्ररक्षणासाठी पानिपतावर गेल्या त्या मार्गानेच आम्ही सर्व गेलो. वाटेत आम्हाला अनेक बरे-वाईट अनुभव आले. माझ्या आयुष्यात करत असलेले हे माझ पहिलचं लिखाणं. त्यामुळे कितीतरी चुका लिखाणात होतील त्या तुम्ही दाखवून द्याव्यात हि नम्र विनंती. पानिपत युद्धामध्ये शहीद झालेल्या अनेक ज्ञात-अज्ञात वीरांच स्मरण करून लिखाणाला सुरवात करतो.
लेखामध्ये दोन गावांमधील अंतर तसेच बघितल्या ठिकाणांविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. गावांविषयीची माहिती देण्यासाठी विकिपीडियाचा आधार घेतला आहे.
नुकताचं जीवधन ते खडा पारसी असं Valley Crossing आणि खडा पारसी rappel down करून घरी परतलो होतो. रविवार होता आणि सकाळ ची मैत्र पुरवणी वाचत बसलो होतो. दुसऱ्याच पानावर पुणे ते पानिपत भव्य दुचाकी मोहीम अशी बातमी होती. माझ्यासारख्या भटक्यांना अशाच बातम्यांचे वेध लागलेल असतात. मी लगेचचं आयोजकांना फोन केला. आयोजकांनी जेवण व राहण्याची व्यवस्था ते करणार असल्याच सांगितलं. दुचाकीच्या इंधनाचा खर्च प्रत्येकाला करायचा होता. या वेळेस मुद्दामच अशा कॉलेज मध्ये प्रवेश घेतला होता कि कॉलेजला नाही गेलं तरी काही फरक पडू नये. कॉलेज १५ डिसेंबरला सुरु होणार होतं. आता महत्वाचा प्रश्न हा होता कि मोहीम होती ३ जानेवारी ते २४ जानेवारी, बरं, त्याच्या अगोदरच मी सहयांकनला पण जाणार होतो. त्यामुळे ३ दिवस ते कॉलेज बुडणार होतं. घरी मी पुणे ते पानिपत मोहिमेला जाणार असल्याचं घोषित करताच नेहमीप्रमाणे आईने मी आलं तर चालेल का? असा प्रश्न केला. आता आयांना कस सांगणार समजवणार कि तुम्ही बरोबर असला कि मुलांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर किती गदा येतात ते ? मी पण आपलं, आई आम्ही बाईक वर जाणार आहोत, तिकडे खूप थंडी असते, जेवण-खाण्याचे हाल होतात, आणि सगळ्यात शेवटी अगोदर मी बघून येतो आणि मग आपण घरातले सगळेच बघायला जाऊ अस म्हणून एकदाचा विषय संपवला. बाबांनी नेहमीप्रमाणे नकारात्मक भूमिका घेत इतक्या लांबवर कुठे जातोस बाईक वर, आज काल अपघांताच प्रमाण किती वाढलय, तुझं कॉलेज सुरु होणार आहे ना? अशी कारणे सांगून माझे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु केले आणि शेवटी प्रयत्नांना यश येत नाही म्हटल्यावर जपून जा, थंडी वाऱ्याचे कान झाक असे असंख्य सल्ले देत चर्चासत्र संपवल. मी लागलीच त्यांच्या वेबसाईट वर जाऊन फॉर्म डाऊनलोड केला. मित्रांना इतक्या दिवसाची सुट्टी मिळणं शक्य नसल्याने आता आपल्याला एकट्यानेच जाव लागतं कि काय अस वाटत असतानाच स्वागत यायला तयार झाला. त्याच कॉलेज १० जानेवारीला सुरु होत असल्याने पुढे जे होईल ते पुढच पुढे बघू म्हणत आम्ही आमचे फॉर्म पुण्यातल्या माझ्या मित्राला, श्रेयसला भरायला सांगितले. खरं चित्र सह्यांकन पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार होतं. यथावकाश कॉलेज १५ डिसेंबरला सुरु झाले. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी Course Incharge ने तुम्हाला कॉलेज कसं ६ दिवसांपेक्षा जास्त बुडवता येणार नाही, नाहीतर तुम्हाला उपस्थिती प्रमाणपत्र ( Attendance Cert. ) मिळणार नाही, आणि मग तुमचे ३ महिने वाया जातील, आपले नियम कसे कडक आहेत अशी अनेक कारण सांगत घाबरून सोडलं. मला आता पानिपतची मोहिम निघण्याअगोदरच बारगळणार याचे सुतोवाच व्हायला लागले. स्वागत मला दररोज साऱ्या नक्की जायचं ना रे ? म्हणून विचारत होता आणि मी पण हो रे स्वाग्या १-२ दिवसात नक्की सांगतो म्हणून त्याला टाळत होतो. माझ्या आणि त्याच्या सुदैवाने माझा १२ वीचा वर्गमित्रच क्लास चा monitor झाला. म्हणजे उपस्थितीची नोंदवही त्याच्याकडे असणार होती. त्यातच अजून एका मित्राचा १७ ला संध्याकाळी फोन आला कि साऱ्या ३०,३१,१ ला अलंग मदन कुलंग वर जायचं आहे येणार का ? त्याला म्हणालो नक्की नाहीये पण Count me in. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो वर्गातल्या उपस्थितीचा. म्हटलं बघू पहिल्यांदा सह्यांकन तर करून घेऊ पुढच पुढे. यथावकाश सह्यांकन २३ ते २८ डिसेंबर अस पार पडल. कॉलेजला गेलो तर मित्रांनी ३ हि दिवसाची उपस्थिती लावली होती. चला पानिपत मोहिमेला जायचं नक्की होतं होत तर. रात्री असाच Syllabus बघत असताना उपस्थितीची अट ९० % वरून ७५ % अशी शिथिल करण्यात येते अस कळलं. पण त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण आवश्यक होतं. सगळ अंकगणित केल्यावर १५ दिवस आपण गैरहजर राहिलो तरी कॉलेज आपलं उपस्थिती प्रमाणपत्र थांबू शकणार नाही अस लक्षात आलं. आता अजून कॉलेजला दांड्या नकोत म्हणून अलंग मदन कुलंग चा बेत रद्द केला. खूप वाईट वाटलं. तिसऱ्यांदा माझा अलंग मदन कुलंग हुकणार होता. म्हटलं जाऊ दे “ कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है ” ( अस झाल कि असले घिसे पिटे dialogue मारायचे आणि स्वतःच, स्वतःच सांत्वन करायचं. दुसरं असतं काय आपल्या हातात ) आणि अगदी ३ तारखेपर्यंत नियमित कॉलेजला गेलो. एव्हाना मी पानिपतवर बाईकवर जाणार असल्याच कॉलेज मध्ये बऱ्याच जणांना कळल होत. माडया ( अमेय माडकर ) मला म्हणाला साऱ्या बाईक वर चालला आहेस आणि आपलं सगळ करिअर आपल्या शरीरावर अवलंबून आहे. उद्या पडलास, मोडलास तर करिअरवर पाणी सोडावं लागेल. तेव्हा जाताना तयारीत जा. मग माडया, अंगद आणि मी Lamingaton रोड ला जाऊन हेल्मेट, Hand gloves, arm guards, knee guards असं सगळं साहित्य घेऊन आलो. माडया नि बजावलं काहीही झालं तरी हे न घालता बाईक चालवू नकोस. मोहिमेसाठी काय काय घेऊन जावं आणि काय काय नको यावर माझा आणि स्वागतचा बराच उहापोह झाला. शेवटी १०-१२ T-shirts, ४-५ Jeans, मी मात्र सगळ्या ६ pockets किंवा track pant घेणार होतो, कानटोपी, हातमोजे, Goggle, ६ अंतर्वस्त्रांचे जोड , Sandle, Mobile चे chargers, कॅमेरा आणि बरचं काही नेण्याचं ठरलं. T-shirts मात्र येताना बरोबर न आणता वापरून झाले कि फेकून देऊ अस आमचं ठरलं. स्वागतने जाण्यासाठी एक चांगली Haver-sack विकत घेतली. माझ्याकडे एक चांगली sack अगोदरच होती. प्रवासात कायम बरोबर असावी म्हणून आम्ही एक छोटी sack बरोबर घेणार होतो. म्हणजे त्यात महत्वाच्या वस्तू ठेवता आल्या असत्या. मोहिमेच्या ५-६ दिवस आधी मी आणि विश्वजितने आमचं वेळापत्रक तयार केलं. त्यात कुठलं ठिकाण किती किमी अंतरावर आहे, रोजचा प्रवास किती होणार आहे, जेवण कुठे असेल, मुक्काम कुठे असणार अस सगळ्याच विवरण होतं. स्वागत Fazer घेऊन जाऊ म्हणत होता तर माझं मात्र Unicorn घेऊन जाऊ, Fazer कमी सरासरी देते, आणि बसायला पण आरामदायक नाहीये म्हणून चालू होतं. शेवटी नाही हो म्हणत स्वागत Unicorn वर यायला तयार झाला. स्वागतला २८ लाच सुट्टी लागल्यामुळे आता थेट शनिवारवाड्यावरच ३ तारखेला भेटू असं म्हणून त्याने माझा निरोप घेतला.
दिवस पहिला : ०३ जानेवारी २०१२
अशी सगळी जय्यत तयारी झाल्यावर निघण्याचा दिवस उजाडला. आता उद्या पासून कॉलेज बुडणार असल्यामुळे ३ ला देखील सकाळी कॉलेजला जाऊन उपस्थिती लावली आणि साग्या ( सागर मोरे ) ला म्हणालो साग्या, आता पानिपत ची माझी मोहीम यशस्वी करायचं तुझ्याच हातात आहे. जितकी शक्य आहे तितकी उपस्थिती लावत रहा.अंगद, काका, माडया, मिहीर सगळ्यांचा निरोप घेतला. म्हणालो शक्य होईल तेवढी proxy मारा. तू काही काळजी करू नकोस, बिनधास्त जा, आम्ही सगळ पाहून घेऊ अशी अनेक आश्वासन घेत मी कॉलेज सोडलं. रूम वर पोहचता पोहचता ३ वाजले होते. मोहीम शनिवार वाड्यावरून दुपारी ३ वाजता निघणार होती. मी मनातल्या मनात भारतीय प्रमाणवेळेनुसार मोहीम काही ५ च्या अगोदर निघणार नाही असा कयास बांधला होता. स्वागत सुट्टीला घरी गेला असल्याने तो थेट शनिवारवाड्यातच मला भेटणार होता. बरोबर त्याचा ३ वाजता फोन आला, साऱ्या कुठं आहेस? अरे लोणावळ्यात पोहचलोय आलोस एक तासाभरात. फोन ठेवला आणि हेल्मेट, Hand gloves, arm guards, knee guards, शूज अशी सगळी हत्यारं घालून मी नेरूळ सोडलं. स्वागतचा सारखा फोन येत होता कारण त्याच्या अंदाजाने जास्तीत जास्त तासाभरात मी शनिवारवाड्यावर पोहचायला हवं होतं.
मी पण बाईक १००-११० च्या वेगातच चालवत होतो. सहसा मी एवढया वेगात चालवत नाही पण आज सगळ किट घातल्यामुळे, रस्ता चांगलाच हाताखालचा असल्यामुळे मी बाईक वेगात हाकत होतो. दुपारची वेळ होती NH ४ सामसूम होता. जसा पुण्यात शिरलो तसा वेग बऱ्यापैकी मंदावला. एका सिग्नलला थांबलो असताना मागून एक दुचाकी स्वार आला आणि त्याने माझ्या बाजूला गाडी थांबवली. त्याने हात दाखवला तशी मी हेल्मेट ची काच वरती घेतली.
खूप लांबच्या पल्ल्यावर निघालायसं का?
हो, पानिपतवर
अरे आम्ही पण जातो, ३ मार्च ला आम्ही जम्मू ते कन्याकुमारी ला जाणार आहे , येशील का?
बघू सांगतो तुम्हाला .
त्याचा संपर्क क्रमांक घेतला आणि मी शनिवारवाड्याच्या दिशेने निघालो.
आणि बरोबर १६४० ला शानिवार वाड्यासमोर दाखल झालो. स्टार माझा कार्यक्रमाचे शूटिंग करत होता. स्वागत माझी वाटच बघत होता त्याने माझ्यासाठी जरीपटका आणि ओळखपत्र अगोदरच घेऊन ठेवले होते. आम्ही दोघांनी आमचे सामान तिथे असलेल्या ट्रक मध्ये ठेवले. जवळपास ५०० च्या वर नाव नोंदणी झाली होती. स्वागतचा आदल्यादिवशी रात्री अकलूज वरून पुण्याला येतं असताना बाईकचा अपघात झाला होता त्यामुळे गाडी मला चालवणे क्रमप्राप्त होत. शनिवारवाड्यावर पेशव्यांचे वंशज त्याचबरोबर अनेक मान्यवर मोहिमेला निघालेल्या सदस्यांचे नातेवाईक, आई – वडील असे अनेक लोक उपस्थित होते. मी पोहचल्यानंतर साधारण १० मिनिटांमध्येच कार्यक्रम संपला.
आणि अशा प्रकारे भारतीय प्रमाणवेळेनुसार मोहीम १७२५ ला शानिवारवाड्यावरून मार्गस्थ झाली.
आजचा मार्ग : शनिवारवाडा – तुळापूर – नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा, फुलगाव.
अंदाजे अंतर – २८.५ किमी
मोहिमेमध्ये स्त्री वर्ग हि बऱ्यापैकी संख्येने सामील झालेला दिसत होता. साधारण ११० दुचाकी, ५ चार चाकी आणि सगळ्यात शेवटी सामानाचा ट्रक असे साधारण २५० च्या आसपास मनुष्यबळ मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. शानिवारवाड्यावरून निघालेली मोहीम शंभूराजांच्या पुतळ्याजवळ येऊन थांबली.
शंभू राजांना मानवंदना देऊन आम्ही भोसरीच्या दिशेने मार्गस्थ झालो. भोसरी येथील ग्रामस्थांनी मोहीमेचा स्वागत समारंभ आयोजीत केला होता. स्वागत समारंभ आटोपून आम्ही श्री क्षेत्र तुळापूर च्या दिशेने प्रयाण केले. वेळ १९०५.
शनिवारवाड्याविषयी थोडेसे :
शनिवार वाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते शनिवार वाडा पहिल्या बाजीरावाने बांधला. त्याच्या बांधकामाची सुरूवात जानेवारी १०, इ.स. १७३० रोजी झाली. श्रीमंतांनी स्वतः लाल महालातून माती आणून त्याची पायाभरणीची सुरूवात केली. बांधकाम वेगाने करण्यात आले. अखेर तत्कालीन १६,०१० रुपये खर्चून, शनिवार वाड्याचे बांधकाम जानेवारी २२, इ.स. १७३२ रोजी पूर्ण झाले.
हा वाडा बांधण्यासाठी हीच जागा निवडण्यासंबंधी एक कथा सांगितली जाते. एकदा एक ससा त्या ठिकाणी एका कुत्र्याचा पाठलाग करतांना बाजीराव पेशव्यांच्या दृष्टीस पडला त्यांना तो शुभ शकुन वाटला. येथे वाडा बांधल्यास केव्हाही पराभवास सामोरे जावे लागणार नाही असे समजून त्यांनी हा निर्णय घेतला. इ.स. १८२८ साली लागलेल्या आगीत हा सात मजली वाडा पूर्णपणे जळून गेला. त्यामुळे मूळच्या स्वरूपातील वाडा आपण पाहू शकत नाही. या वाड्याच्या चौथर्यावर बसविलेल्या छोट्या फलकावरून एकेकळी येथे असलेल्या गणेश महाल, रंगमहाल, हस्तिदंतीमहाल, दिवाणखाना, कारंजे इत्यादी गोष्टींची कल्पना करता येते.
जेव्हां श्रीमंत शाहू महाराजांना कळले की पेशवे पुण्यात मोठा किल्लेवजा वाडा बांधत आहेत, तेव्हा त्यांच्या सरदारांना भीती वाटली की पेशवे शिरजोर होऊ पहात आहेत. तेव्हा शाहू महाराजांनी पेशव्यांना लिहिले की तट मातीचे नाही, छातीचे करायचे असतात..
शनिवार वाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली,अलीबहाद्दार किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधॆ असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यांत दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रूंदी १४ फूट आहे. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते.
दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे.
एक मुसलमान सरदार पत्रात लिहितो: "बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो. मात्र आत स्वर्गासारखा दिसतो ”. ( विकिपिडीया वरून साभार )
श्री क्षेत्र तुळापूरला पोहचल्यावर ( वेळ २०३०) शंभूराजांच्या समाधीवर प्रत्येकजण नतमस्तक झाला.
तुळापूर विषयी थोडेसे :
तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.पूर्वीचे नाव 'नांगरवास'.
तुळापूर हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे. तुळापूर आळंदी पासून साधारण १४ किमी वर, तर पुण्यापासून अंदाजे ३० किमी वर आहे. येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
संभाजीमहाराजांचा मृत्यू तुळापूर येथे झाल्याने येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.
शहाजी राजे आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर “ नांगरवास ” गावी पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीची तुला करण्याची इच्छा झाली पण एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची त्याला काही केल्या उकल होईना. मग शहाजीराजांनी पुढे होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा भीमा आणि इंद्रायणी यांच्या संगमातील डोहातल्या एका नावेत चढविण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खूण करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगडधोंडे नावेत चढविले आणि त्या दगडांच्या भाराइतके सोनेनाणे दान करण्यात आले. तेव्हापासून त्या 'नांगरवासास' 'तुळापूर' म्हणू लागले.
मोघल बादशहा औरंगजेबाने संभाजी महाराजांना अटक करून बहादूरगडावर ठेवलं होतं. संभाजी राजे तहाला व धर्मांतराला तयार नाहीत हे पाहून संभाजी महाराजांची वढु-तुळापूर इथे क्रूर हत्या करण्यात आली. महाराजांच्या देहावर अग्निसंस्कार होऊ नयेत असं फर्मान काढून भीमा, इंद्रायणीच्या पात्रात त्यांच्या देहाचे तुकडे फेकून देण्यात आले. जनाबाई नावाची एक स्त्री नदीकाठावर कपडे धुत असता तिने हे दृश्य पाहिलं. गावातील इतर महिलांच्या मदतीने रात्रीच्या अंधारात महाराजांच्या देहाचे तुकडे गोळा करून तुळापूर येथील त्रिवेणी संगमावर त्यावर अग्निसंस्कार करण्यात आला. त्यावेळी ज्यांनी महाराजांच्या देहाला स्पर्श केला ते ‘शिवले’ या आडनावाने प्रसिद्ध झाले.
आदिलशहाच्या दरबारातील मुरारजदेवाने रुद्रनाथ महाराजांच्या सांगण्यावरून बांधलेलं संगमेश्वराचं रमणीय देवालय आहे. रुद्रनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यावर तिथे त्यांचं समाधी मंदिर बांधलेलं आहे. तसंच या परिसरात नदीचा घाट सुंदर रीतीने बांधून घाटावर सुंदर मंदिरंही बांधलेली आहेत. रुद्रनाथ महाराजांच्या आशीर्वादाने अंगावरील कोड बरं झाल्यावर हे मंदिर आदिलशहाच्या सेनापती मुरारजगदेवाने बांधलं होतं, असं म्हणतात आणि याप्रसंगी त्याने स्वत:ची तुला करून सोनं दान केलं. म्हणूनच या गावाला तुळापूर नाव पडलं. हा भाग त्यावेळी निजामशाही अमलात शहाजी राजांच्या ताब्यात होता. परंतु मुरारजगदेव शत्रुपक्षाचे सेनापती असले तरी शारीरिक व्याधीने त्रस्त होते. त्यामुळे त्यांना रुद्रनाथ महाराजांच्या सान्निध्यात राहून नंतर मंदिर बांधण्याची परवानगी शहाजीराजांनी त्यांना दिली होती. या गोष्टीवरून शहाजीराजांच्या मनाचा मोठेपणाही दिसून येतो. ( विकिपिडीया वरून साभार )
आमचा पहिला मुक्काम होता फुलगाव येथील सैनिक शाळेमध्ये. शाळेमध्ये आम्ही २१०० च्या सुमारास पोहचलो. सगळ्यांची जेवणें झाल्यावर पहिली सभा घेण्याचे आयोजक डॉ. संदिप महिंद यांनी ठरवले. त्यामध्ये सगळ्यांची ओळख परेड झाली. आणि दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली. आज सगळ्यांना झोपायला गाद्या होत्या. जेवण देखील चांगले होते. जेवायला लांबलचक रांग लागली होती. स्वतःचा आणि स्वागतचा चेहरा सोडला तर सगळेच चेहरे अनोळखी होते. उद्यापासून सर्व दुचाकी एका ओळीत चालणार होत्या. असे केल्यामुळे रहदारी देखील अडथळा येणार नव्हता आणि मोहीम देखील शिस्तीत चालू राहणार होती. ट्रक मध्ये असलेले सामान दररोज ५ जणांनी उतरवायचे आणि सकाळी ५ जणांनी चढवायचे असे ठरले. गुरुजींनी सगळ्यांना मोहिमेमध्ये राहण्यास बजावले. मोहीम सोडून गेल्यास वं एखाद्या दुचाकीचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी पूर्णपणे स्वतःवर राहिलं याची सर्वाना कल्पना देण्यात आली.
फुलगाव सैनिक शाळेच्या बाहेर लावलेल्या गाड्या.
फुलगावामधून निघताना टिपलेला सूर्योदय
उद्याचा कार्यक्रम वढु बु., अहमदनगर, घृष्णेश्वर, औरंगाबाद असा होता.
आजचा प्रवास : २८.५ किमी
दिवस दुसरा :०४ जानेवारी २०१२
वढु बु. – अहमदनगर – घृष्णेश्वर - औरंगाबाद
सकाळी ६ वाजता जाग आली. गुरुजी (डॉ. संदिप महिंद ) सगळ्यांना उठवत होते. पहिलाच दिवस असल्याने सगळेजण वेळेत उठले. उठून बघतो तर काय काळे काका योगाभ्यासाचे वर्ग घेत होते. आजूबाजूच्या खोल्यांमध्ये हि कोणी न कोणी योगाभ्यासाचे वर्ग घेत होते. पहिला दिवस का काय असल्याने बऱ्यापैकी लोकं योगा करत होते. मी देखील थोडे काळे काकांबरोबर अंगाला आळोखे पिळोखे मारून घेतले. सकाळी ७ वाजता सगळे एकत्र जमले. मग प्रार्थना झाली. कितीतरी वर्षानंतर अशी प्रार्थना म्हणताना शाळेची आठवण आली. मग वयोमानानुसार रांगा करण्यात आल्या अर्थात तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. मग थोडासा सगळ्यांनीच warm-up केला. मग Doctor कोण आहे? Engineer कोण आहे? अशा माणसांची चाचपणी झाली आणि सकाळी ठीक ०८०० वाजता मोहीम फुलगाव वरून वढु बु. च्या दिशेने मार्गस्थ झाली.
०८४५ ला वढु बु. ला पोहचलो. परत एकदा सर्वजण संभाजी महाराजांच्या व छंदोगामात्य कवी कलश यांच्या समाधी पुढे नतमस्तक झालो.
वढु बु. विषयी थोडेसे :
श्रीक्षेत्र वढू, ता. शिरूर, जि. पुणे या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजीराजे यांची समाधी आहे. ११ मार्च १६८९ ,फाल्गुन अमावस्या, सकाळी १० च्या सुमारास संभाजीराजांना वढू येथील बाजारात आणले. प्रथम कवी कलशाची मान उडवली आणि नंतर संभाजीराजांचे मस्तक धडावेगळे करून शरिराचे तुकडे तुकडे करण्यात आले. वढू च्या ग्रामस्थांनी पुढाकार घेत, जीव धोक्यात घालून, भीमा ओलांडून आणि मुगली सैन्याला चकवून त्यांनी संभाजी महाराजांची मिळतील ती अंगे गोळा केली आणि विधिवत अंतिम संस्कार केला. अंतिम संस्कार करण्यापूर्वी ज्या लोकांनी ते तुकडे शिवले त्यांना शिवले असे आडनाव प्राप्त झाले असे म्हणतात. ( आंतरजालावरून साभार )
ठीक ०९१५ वाजता वढु बु. वरून निघालो व अहमदनगरला १२३० वाजता पोहचलो.अहमदनगरला शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला हार घातला आणि मोहीम शहरामधून फिरली. अहमदनगरला माझी मावशी व मामा राहत असल्याने स्वागत आणि मी जेवायला मावशीकडे गेलो. मावशीने नेहमीप्रमाणे आता हिंडायचं कमी कर ,घरी जास्त वेळ थांबतं जा अशा सूचना केल्या. मावशीने मस्तपैकी चिकन केलं होत.आम्ही दोघांनी त्यावर आडवा हात मारला. काका, मावशी, मामी, आजोबा सगळ्यांचा नेहमीप्रमाणे माझ्याशी भरपूर गप्पा मारायच्या होत्या. पण वेळ कमी असल्याने परत नक्की येतो असे सांगून आम्ही परत साधारण दुपारी २ च्या सुमारास मोहिमेला येऊन मिळालो.
अहमदनगरविषयी थोडेसे :
अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात अगस्त्यनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर (आत्ताच्या नगर जिल्ह्याच्या परिसरात) वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे आस्तित्व सिद्ध झालेले आहे. १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्हाणशहा,सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये नगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.
.मोगल बादशहा शाहजहान ने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला तर १८१७ रोजी ब्रिटिशांनी अहमदनगरवर विजय मिळवला. शहरात अहमदनगरचा किल्ला, रेणुकामाता मंदिर (केडगांव) व चांदबीबी महल अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या शहराला नगर या नावानेसुद्धा ओळखतात.
मराठ्यांच्या कर्तुत्वाचा उदय ज्यावेळी झाला त्यात प्रमुख घराण्यांपैकी विठोजी भोसले, मालोजी राजे भोसले, लखुजी जाधवराव निंबाळकर पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्यावर फितवा करून मिळू दिल्या बद्दल साक्री आणि रुई ही गावे दौलताबाद ( किल्ले देवगिरी ) वरून इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे विजापुरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापुर ( कर्नाटक ) येथे मृत्यू झाला. आजही ह्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि बाजी (तिसरे ) हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्या कडे किल्ले राजगडची तट सरनौबती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम जिंकल्यावर येथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी आपले पूर्ण योगदान स्वराज्यासाठी अर्पण केले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुषांनी आपला देह हिंदू धर्म रक्ष्यण्यासाठी अर्पण केलेला आहे. आज हि कदमांकडे पारंपारिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्रे जपलेली आहेत. ह्यात धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, धाली, बिचवा, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत. ( विकिपिडीया वरून साभार )
मोहिमेमध्ये सगळ्यात पुढे रुग्णवाहिका असे त्याच्या मागे भारतचा ध्वज असलेली दुचाकी, मग भगवा ध्वज असलेली दुचाकी, मग सरदारांचा ध्वज असलेली दुचाकी.ध्वज असलेल्या दुचाकींच्या दोन्ही बाजूला हातात तलवार घेतलेलं रक्षक असत. शनिवारवाड्यावरून बाहेर पडताना आमची बाईक सगळ्यात पुढे असल्याने रक्षकाची जबाबदारी आमच्या देखील खांद्यावर येऊन पडली होती. आमच्या बरोबर असलेला रक्षकांपैकी एकजण उगाचच मोहिमेला थांबा, हळू चला, पुढे गतिरोधक आहे असे सल्ले देत होता. मी त्याला “स्वयंघोषित कार्यकर्ता” अस नाव पडल. पुढं मोहिमेत तो याच नावाने ओळखला जाऊ लागला . मोहिमेमध्ये सगळ्यात शेवटी सामान असलेला ट्रक असे. सर्व दुचाकीस्वारांनी रुग्णवाहिका आणि ट्रक या मधेच चालावे असा नियम होता. आता पुढे आमच्या सारख्या नाठाळ मुलांनी तो कितीतरी वेळा मोडला.
दुपारी २ वाजता नगर सोडले असून देखील आम्हाला घृष्णेश्वरला पोहचता पोहचता १८३० वाजले. मोहीम घेऊन जाण म्हणजे काय असत त्याची एक झलक माझ्या लक्षात आली. वास्तविक पाहता नगर औरंगाबाद अंतर ३ तासाचे आहे . पण गाड्यांमध्ये इंधन भरणे, लघुशंका असे या ना त्या कारणाने मोहीम १८३० वाजता घृष्णेश्वर ला पोहचली. मनात वेरूळ लेण्या, औरंगजेबाची समाधी, देवगिरीचा किल्ला अस बरच काही बघायचं होत पण वेळ मिळाला नाही.घृष्णेश्वरचे दर्शन घेऊन आम्ही औरंगाबाद येथील गुरु तेग बहादूर लंगरसाहिब गुरुद्वारा मध्ये मुक्कामासाठी पोहचलो. वेळ २०००.
घृष्णेश्वर मंदिराविषयी थोडेसे :
घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शिव मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या पौराणिक ग्रंथात या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जिर्णोद्धार केला. सध्याचे आस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. ( विकिपिडीया वरून साभार )
औरंगाबाद मध्ये देखील माझी मावशी राहत असल्याने मी आणि स्वागत मावशीच्या घरी जेवायला गेलो.बऱ्याच वर्षांनी आल्यामुळे घर सापडायला बराच वेळ लागला. मावशीला, काकांना मी कितीतरी वर्षाने घरी आल्यामुळे बरे वाटले. मावशीने मस्तपैकी शेवयाची खीर बनवली होती आम्ही परत एकदा जेवणावर आडवा हात मारला. उन्हाळ्यात भाचेकंपनी आली कि राहायला येतो असे सांगून मी मावशीचा निरोप घेतला. आम्ही परत आलो तेव्हा सगळ्यांच नुकताच जेवण आटोपल होत.मेन गेटला कुलूप लावलं होतं आता गाडी कुठ लावायची या विवंचनेत असतानाच संग्राम आला तो पण मित्राकडे गेला होता, मग त्याने गुरुद्वारातल्या एकाला बोलावून आणले आणि आमच्या गाड्या आत मध्ये लागल्या.
औरंगाबाद येथील गुरु तेग बहादूर लंगरसाहिब गुरुद्वारा
औरंगाबाद विषयी थोडेसे :
काही इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले. मलिक अंबरने ह्या शहराचे नाव फतेहपूर ठेवले. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी / फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आला. १६४४ मध्ये तो आग्र्याला परत गेला. त्या नंतर १६८१मध्ये औरंगजेब मोगल बादशाह असताना पुन्हा ह्या शहरात आला. १७०७ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत औरंगजेब इथेच राहिला. औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलताबाद या छोट्याशा गावात औरंगजेबाची कबर आहे. १७०७ नंतर औरंगाबाद हैदराबादच्या निजाम राजवटीचा भाग म्हणून राहिले. इ.स. १८८९ मध्ये औरंगाबादेत पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली, त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला. निझाम राज्यात हैदराबाद-गोदावरी व्हॅलि रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर इ.स. १९०० च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनींग कारखाने सुरू झाले.मलिक अंबरने इथे त्याच्या कारकीर्दीत एक पाणी-व्यवस्था उभारली होती, त्याच्या एका भागाचे नाव नहर-ए-अंबरी असे होते. तिचे अवशेष आजही दिसतात. ( विकिपिडीया वरून साभार )
आईला रोजची खबरबात द्यायचं ठरलं होत त्यामुळे, आज दिवसभर काय काय केलं याचं रिपोर्टिंग आई-बाबांना रोज रात्री न चुकता व्हायचं.त्यामुळे उद्या कुठे जाणार आहोत? काय करणार आहोत ? अस सगळं काही सांगायचो.
आज मात्र इथे झोपायला गाद्या नव्हत्या. आम्ही आपली सतरंजी सामानातून बाहेत काढली आणि पथारी पसरली. रात्रीची सभा व्हायची अजून बाकी होती. आज रात्रीच्या सभेत जे एकटेच दुचाकीवर आहेत त्यांनी रहदारीला नियंत्रित करावे असे ठरवण्यात आले. खर सांगायचं तर रात्रीची सभा हा फार मोठा मनोरंजनाचा कार्यक्रम असायचा. याच सभांमध्ये कोणाला फेसबुक तर कोणाला गुलाबजामुन, स्वयंघोषित कार्यकर्ता अशी वेगवेगळी नावे पडली.
रात्री ०२३० वाजता दोघजण आले. वाटेत कुठेतरी थांबल्यामुळे त्यांना यायला उशीर झाला होता. आणि त्यातच रस्त्याच्या मध्ये कुत्रं आडवं आल्याने दोघ गाडीवरून पडले होते. पायाला बरच लागलं होत. तशाही अवस्थेत त्याने मोहीम पानिपतपर्यंत पूर्ण केली. या पठ्ठ्याने शेवटपर्यंत घरी सांगितलं नाही. तो पण आमच्यासारखाच वल्ली होता. त्याच्याशी गप्पा मारताना त्याने लिंगाणा प्रस्तरारोहण करताना पाय मोडून घेतला होता हे देखील सांगितलं. स्वागतच्या तर घरी देखील माहित नव्हतं कि महाशय पानिपत मोहिमेवर आहेत ते.
आमचा उद्याचा कार्यक्रम सिंदखेड राजा – मलकापूर मार्गे बुलढाणा – मुक्ताईनगर
आजचा प्रवास : ३१० किमी
( क्रमशः )
प्रतिक्रिया
23 Oct 2012 - 8:45 am | शैलेन्द्र
भले शाब्बास..
मस्त जातोयेस.. येवुदे अजुन...
23 Oct 2012 - 8:52 am | गोमट्या
वाचतोय ...येवुदे अजुन
23 Oct 2012 - 9:03 am | स्पंदना
काहीतरी थरारक वाटतय. याचीच गरज आहे आजच्या तरुणाईला. उगा टीव्ही समोर पडुन राहणारी माणस मलातर बोअर करतात.
अभिनंदन सारथी.
23 Oct 2012 - 9:19 am | प्रचेतस
छानच लिहिलंय.
येऊ देत पुढचा भाग.
23 Oct 2012 - 9:36 am | इरसाल
पुढचा भाग लवकरच टाकशील.
23 Oct 2012 - 9:38 am | स्पा
झकास रे सारंग...
परत वाचतोय सगळी सिरीज :)
23 Oct 2012 - 9:52 am | ओल्द मोन्क
छान !
23 Oct 2012 - 10:17 am | ५० फक्त
खुप छान वाटलं, आपल्यापैकी कुणीतरी या उपक्रमात सहभागी झाल्याचं समजल्यावर, लोकांच्या पैशाची उधळपट्टी करुन एव्हरेस्टवर जाण्यापेक्षा हे जास्त चांगलं.
23 Oct 2012 - 10:40 am | बॅटमॅन
सूर खटकला, बाकी ठीक.
23 Oct 2012 - 10:37 am | क्लिंटन
सुरवात तर खूपच छान झाली आहे.पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
(कॉलेजात प्रॉक्सी,मेडिकल सर्टिफिकिटे मॅनेज करणे वगैरे उल्लेख नसते तर जास्त चांगले वाटले असते)
पुढील लेखनास शुभेच्छा.
23 Oct 2012 - 3:43 pm | शैलेन्द्र
भावी पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, आणी असे चिल्लर प्रश्न कसे निकाली काढावे हे सांगण्यासाठी हे उल्लेख अत्यंत आवश्यक होते. :)
23 Oct 2012 - 11:20 am | नि३सोलपुरकर
शाब्बास..रे मित्रा, अभिनंदन
छान लिहिलंयस
पु.ले.शु.
23 Oct 2012 - 12:20 pm | एकुजाधव
लि़अक्खाणाचा पहिला प्रयत्न चान्ग्ला आहे.
पु. ले.उशु.
23 Oct 2012 - 1:41 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्तच! ही लेखमालिका मस्तच होईल! पुढे वाचायला उत्सुक आहे. गावांच्या माहितीबरोबरच, मराठ्यांचं सैन्य पानपतावर जाताना त्या त्या गावात काही घडलं असेल तर त्याचीही माहिती द्यावी!
24 Oct 2012 - 3:03 am | सारथी
नक्कीच, माहिती देण्याचा प्रयत्न करतो, सुचविल्याबद्दल धन्यवाद
23 Oct 2012 - 2:08 pm | Maharani
छान!!पुभाप्र....
23 Oct 2012 - 3:07 pm | सुकामेवा
छान!!पुभाप्र....
23 Oct 2012 - 4:19 pm | सस्नेह
रोचक लेखन आहे. पु.भा.प्र.
23 Oct 2012 - 5:10 pm | पैसा
मिपावर स्वागत! अतिशय उत्तम लिहिलंत. एवढ्या मोठ्या मोहिमेबद्दल वाचायची प्रचंड उत्सुकता आहे. येऊ द्या तब्ब्येतीत!
23 Oct 2012 - 6:53 pm | रेवती
असं वाचून प्रभावित व्हायला होतं पण भाग जरा लहान टाका म्हणजे एका बैठकीत वाचून काढता येतात.
24 Oct 2012 - 2:21 pm | मेघवेडा
क्लिंटननाही +१.
23 Oct 2012 - 9:37 pm | अत्रुप्त आत्मा
मनापासून शुभेच्छा....! :-)
23 Oct 2012 - 10:35 pm | अर्धवटराव
लय भारी !!!
आणखी एक तबीयत से पढनेवाली चीज आलि मिपावर.
असल्या भल्या थोरल्या मोहीमेत भाग घेतल्याबद्दल शुभेच्छा.
अर्धवटराव
24 Oct 2012 - 2:32 am | मोदक
ज ह ब ह रा....
24 Oct 2012 - 3:00 am | सारथी
सर्वांना तुम्ही माझ्या पहिल्याच लेखनास भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
पुढचा भाग लवकरच टाकतो.