अंबाडीची भाजी व कानोले हे गौरी पूजन च्या दिवशी आमच्याकडे करतात. माझी अत्यंत आवडती डिश आज मिपा वर शेअर करावी असे वाटले.माझा हा पहिलाच प्रयत्न तरी चूभूद्याघ्या.
साहित्य:
अंबाडीची भाजी
१ चमचा हरभरा डाळ
२ चमचा शेंगदाणे
१ चमचा ज्वारीच्या कण्या
(ज्वारीच्या कण्या थोडावेळ पाण्यात भिजवून त्याची भरड करून घ्या.मी ज्वारी नसल्यामुळे तांदूळ घेतले होते)
५-६ लसून पाकळ्या
२-३ हिरव्या मिरच्या
मीठ चवीनुसार
तेल
कृती:
कुकरमध्ये एका भांड्यात थोडं पाणी,अंबाडीची भाजी,हरभरा डाळ,शेंगदाणे व ज्वारीच्या कण्या एकत्र शिजवून घ्या.
३-४ शिट्या झाल्या कि भाजीमाधले पाणी पूर्ण काढून टाका नाहीतर भाजी आंबट होते.
एका भांड्यात तेल,मोहरी,जिरे,लसून,आणि मिरच्या ची फोडणी करा आणि त्यात पूर्ण पाणी काढून टाकलेली भाजी टाका.मीठ टाका. गरज वाटल्यास थोडे गरम पाणी टाका व भाजी परतून घ्या.
ज्वारीच्या कण्या थोडावेळ पाण्यात भिजवून त्याची भरड करून घ्या.
कानोले:
कणकेच्या छोट्या, साधारण पुरीएवढ्या पोळ्या लाटून घ्या.त्याला थोडे तेल लावून वाफवून घ्या. अशाच प्रकारे ज्वारीचे पण कानोले करता येतात.
प्रतिक्रिया
5 Oct 2012 - 3:21 pm | गवि
पाककृतीचे नाव वाचून वेगळं काहीतरी मिळणार अशी खात्री झाली आणि आनंद झाला. वाचताना मात्र नक्कीच खूप त्रोटक वाटलं. कानोले तर अक्षरशः गुंडाळले आहेत असं वाटलं ज्यांना ते कानोले काय असतात हेच माहीत नाही त्यांना लहान पोळी बनवून उकडायची /वाफवायची असा काहीतरी अर्धवट अर्थ लागत आहे. पोळी कशी उकडायची?
कानवले म्हणून कायस्थी हॉटेलात जे खाल्लं आहे ते स्टफ्ड करंजी टाईप होतं आणि टेस्टदार होतं. नुसती उकडलेली कणकेची पुरी नव्हती वाटत.
हे दोन्ही पदार्थ एकमेकांसोबत खातात का? की एकाच दिवशी बनवतात इतकाच संबंध?
छायाचित्रांनी आणखी छान वाटेल.
5 Oct 2012 - 9:22 pm | दादा कोंडके
सहमत.
धागा वाचून कानोले खायची इच्छाच मेली.
पण पुपाशु!
5 Oct 2012 - 7:33 pm | रेवती
फोटू व आणखी वर्णन असते तर मजा आली असती.
5 Oct 2012 - 8:31 pm | प्रियाकूल
'कानवले म्हणून कायस्थी हॉटेलात जे खाल्लं आहे ते स्टफ्ड करंजी टाईप होतं आणि टेस्टदार होतं. नुसती उकडलेली कणकेची पुरी नव्हती वाटत.'
कानोले म्हणजे उकडलेल्या पोळ्याच करते मी.हि खूप साधी पाकृ आहे आपण ह्यात अजून बदल करू शकता.
आपण मोदक जसे वाफवतो तसेच छोट्या पोळ्या करून वाफवायच्या.
आणि होय, हे दोन पदार्थ एकमेकांसोबत खातात. :):)
फोटो कसे टाकतात याची माहिती नसल्यामुळे सध्या लिंक देत आहे.
https://picasaweb.google.com/114036770305675218857/MazeKhadyachePrayog?a...
5 Oct 2012 - 8:36 pm | शिल्पा ब
करुन बघते. एकदोनदा आंबाडीची भाजी केली होती पण जमली नव्हती असं मला वाटतं. तुमची कृती करुन बघते जमतेय का.
कनोले करताना दोन पोळ्यांमधे काही घालुन मग उकडायचं का? मोदकासारखं? असेल तर काय घालायचं? जरा विस्त्रुत लिहत चला.
5 Oct 2012 - 8:43 pm | प्रियाकूल
नाही. मध्ये कोणतेही सारण मी घालत नाही. माझ्या माहितीप्रमाणे ह्यात काहीतरी गोडाचे सारण घालतात पण भाजी तिखट असल्यामुळे मी साधेच करते. बाय द वे फोटो दिसतायेत का ?
5 Oct 2012 - 9:00 pm | रेवती
फटू दिसत नाहीत.
5 Oct 2012 - 8:48 pm | सानिकास्वप्निल
माझ्या सासरी नागपंचमीला अश्या पोळ्या करतात व वाफेवर शिजवतात त्याला आम्ही पानोळे असे म्हणतो. ते त्यादिवशी तांदळाच्या खीरीबरोबर खायला देतात.
गरमच चांगल्या लागतात.
ओल्या नारळाच्या करंज्यांना आम्ही कानवले असे म्हणतो.
5 Oct 2012 - 9:07 pm | प्रियाकूल
https://picasaweb.google.com/114036770305675218857/MazeKhadyachePrayog?a...
5 Oct 2012 - 9:09 pm | सानिकास्वप्निल
तुम्हाला संदेश केलाय फोटो कसे लावायचे त्याबद्दल
5 Oct 2012 - 9:24 pm | अभ्या..
आले आले फोटो आले. बग्ज बन्नी वाले कानोले अंबाडीची भाजी घेऊन आले. :-)
धन्यवाद.
5 Oct 2012 - 11:40 pm | प्रियाकूल
कुकर मध्ये भाजी शिजवतानाच कानोले पण शिजवले. त्यामुळे ते थोडे फोल्ड झाले.मग अशी आयडिया करावी लागली.
6 Oct 2012 - 12:09 am | अभ्या..
असू द्या हो. छान दिसतय. थोडा लिज्जतचा ससा पण वाटतोय.
यालाच सुगरण असे म्हणतात का हो सानिकातै सुगरणतै?
5 Oct 2012 - 11:26 pm | श्रीरंग_जोशी
अंबाडीची भाजी मला फार आवडते. बर्याच वर्षांपासून खायला नाही मिळाली पण तुमच्यामूळे बघायला तर मिळाली.
अनेक धन्यवाद!
सादरीकरण छानच!!
5 Oct 2012 - 11:32 pm | पैसा
आवडले. कानोले हा नवाच प्रकार ऐकला.
5 Oct 2012 - 11:41 pm | प्रियाकूल
याला काही ठिकाणी फळं असेही म्हणतात.
6 Oct 2012 - 3:20 am | धनंजय
"वरणफळे" म्हणजे आमटीत अशा छोट्या पोळ्या शिजवायच्या. पण गोल पोळ्यांऐवजी लाटल्यानंतर (शंकरपाळ्यासारखे) छोटे चौकोन कातरतात.
आमचा कंट्री पास्ता हो...
वाफवून कशा लागतात ते करून बघायला पाहिजे.
6 Oct 2012 - 7:38 am | चित्रा
हे कानोले थोडे अमावस्येच्या 'दिव्यां'सारखे वाटत आहेत. पण दिव्याच्या कणकेत गूळ असतो. आणि एवढे पातळ लाटलेले नसतात. हे कानोले लाटले आहेत त्यापेक्षा थोडे जाडसर लाटून मग उकडले तर भाजीबरोबर अधिक चांगले लागेल का?
कानवले चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंकडे करतात त्या पापुद्रेदार, गुलाबी रंगावर वेळ देऊन तळलेल्या गोडाच्या करंज्या असतात.
बाकी, आमटीतली फळे छान लागतात. माझ्या आईकडे लाटलेल्या कणकेची वर्तुळे कातरत त्याला फळे म्हणत - कणीक जाडसर लाटून त्यावर वाटी उलटी ठेवून कातरता येतात.
त्यात एकदोन मुटकेही करून घालत. मुटके म्हणजे कणीक घेऊन नुसतीच बोटांत दाबून तसेच ते मुटके टाकायचे. त्या मुटक्यांपेक्षा फळेच छान लागतात.
चौकोन कातरतात त्याला काहीजण चकोल्या म्हणतात असे आढळले.
7 Oct 2012 - 7:39 am | धनंजय
हे ज्वारीचे "कानोले" (वरच्या पाकृत सांगितल्याप्रमाणे, म्हणजे दिव्यांप्रमाणे) आणि मुटके (शकुनी उंड्यांसारखे?) आज केले.

तितके मजेदार झाले नाहीत. खायला जरा "जड" आणि "बद्द" होते.
ताज्या ओल्या हलदीच्या लोणच्याबरोबर आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर खायला ठीकठाक होते. मळताना खायचा सोडा घालायला हवा होता का? आणखी पाणी घालायला हवे होते काय? असा विचार करतो आहे.
9 Oct 2012 - 8:16 am | चित्रा
प्रेजेंटेशन काळजी घेऊन केलेले आहे. :)
यातले दिव्यांप्रमाणे नक्की काय आहे? लहान गोल आहेत ते का?
मला माहिती आहेत ते मुटके असे दिसतात.
5 Oct 2012 - 11:36 pm | प्रियाकूल
नक्की करून पहा नाहीतर सरळ खायलाच या.:)अगदी अर्ध्या तासात मेनू होऊन जातो. झटपट आणि मस्त.
(ता.क.: ज्वारीच्या कण्याच छान लागतात ह्यात तांदळाऐवजी.)
5 Oct 2012 - 11:46 pm | सूड
कानोले म्हटल्यावर करंजीसारखं (साटं लावून केलेल्या)काही असेल म्हणून उत्साहाने धागा उघडला होता, असो.
5 Oct 2012 - 11:51 pm | अत्रुप्त आत्मा
पाककृती चान चान आहे...पण आंम्हाला अजुन एक *स्मायली मिळाल्याचा आणंद झाला .. ;-)
*शेवटचा फोटू :-p
6 Oct 2012 - 12:04 am | रेवती
अरेच्च्या! मेरेकोईच नै दिखरेला! गणेशाज्वर झाला की काय? ;)
6 Oct 2012 - 12:10 am | रेवती
दिसले हो दिसले.
भाजीचा फोटू चांगला आलाय. कानोल्यांबद्दल अजूनही कफूजन आहे. म्हणजे दिसतायत मला पण आमच्याकडे गूळ खोबर्याचे सारण घालून मग कणकेची पुरी दुमडतात आणि माहेरवाशीण सासरी जाताना तिला खीर कानवले जेवताना वाढतात. कानवले मुरडीचे केल्याने मुलगी पुन्हा लवकर माहेरी येते असे समजले जाते म्हणून. ;)
6 Oct 2012 - 8:22 pm | प्रियाकूल
माझी अपोआप दुमडली. आता जातेच माहेरी..खी खी खी..
6 Oct 2012 - 8:28 am | किसन शिंदे
कानोले वाचून धागा उघडल्यावर फसगत झाली.
शेवटचा फोटो लय भारी.
11 Oct 2012 - 12:26 am | संदीप चित्रे
हे काँबिनेशन वाचूनच दचकलो होतो!
पण कानोले म्हणून दिलेला पदार्थ कानवले / कानोले नाही हे बघून हायसं वाटलं :)
>> कानवले चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंकडे करतात त्या पापुद्रेदार, गुलाबी रंगावर वेळ देऊन तळलेल्या गोडाच्या करंज्या असतात.
धन्स चित्रा :)
बाकी अंबाडीची भाजी आणि दुसरा पदार्थ हे काँबिनेशन म्हणून चांगले असेलही पण प्लीज.... त्या पदार्थाला कानोले म्हणू नका हो!!!!! पूरणपोळीमधे पूरण घातलंच नाही तर होणार्या पदार्थाला पूरणपोळी म्हणावं का? :)
11 Oct 2012 - 3:28 pm | खुशि
अम्बाडीची भाजी आम्हीही अशीच करतो फक्त कोकणात ज्वारीच्या कण्या नाही तर तान्दुळाच्या कण्या{तान्दुळाची जाड भरड} घालतात.आणि वाढताना भाजीवर तेलाची धार सोडतात.कळणाची भाकरी आणि अम्बाडीची भाजी वरती तेलाची धार असा बेत असतो.अहाहा! तोन्डाला पाणी सुटले.
एकनाथ महाराजान्चे प्रसिद्ध भारुड आहे,नुसतीच अम्बाडीची भाजी आनि कळणाची भाकर;वर तेलाची धारच नाही,दादला नको ग बाई;मला नवरा नको ग बाई! प्रल्हाद शिन्दे हे भारुड सुन्दर गात रेडिओवर नेहेमी लागते.
17 Oct 2012 - 5:33 pm | बापू मामा
छान पाक कृती.
ज्वारीच्या कण्याऐवजी वाळलेल्या हुरड्याच्या कण्या वापरून अधिक चव लागेल.