दररोज वृत्तपत्रे, वाहिन्यांवर पाह्तो, आज साईबाबांना ५ किलो सोन्याचा हार अर्पण केला, तिरुपतीच्या हुंडीत अज्ञात इसमाने करोडो रुपये दान केले, लालबागच्या राजाला सोन्याचा पंजा लावला इ.इ.
वस्तुतः हे धन त्या दानकर्त्याने कोणाकडून तरी लुबाडलेले असते, ती बोच जावी म्हणून ही देवाला लाच दिली असते.खरे तर या धनावर नारायणा पेक्षा दरिद्री नारायणाचा हक्क जास्त पोहोचतो. देवस्थानांनीही ह्या धनाचा विश्वस्त म्हणून सुयोग्य वापर करावा असे वाटते.
आज पश्चिम महराष्ट्रातील सोलापूर , सांगली, सातारा, नगर, व उभा मराठवाडा दुष्काळाच्या खाईत लोटला आहे. माणसांपेक्षा गुरांचे काय करावे हे शेतकर्यांना समजेनासे झाले आहे. चांगली गुरे अक्षरशः ५००० रुपयात खाटकाला विकली जात आहेत. सरकारने चारा डेपो बंद करुन चारा छावण्या चालू केल्या आहेत. चारा छावणीत गुरे घेऊन जावे तर सर्व ऊद्योग बंद करुन तेथेच रहावे लागते.
अश्या बिकट परिस्थितीत जर देवस्थानांनी पुढाकार घेवून चार्याची समस्या सोडविली तर हिंदू धर्माचे गोवंश संवर्धनाचे कार्यच होणार आहे.
तसेच देवस्थानांनी काही निधी कृषी विकासाकडे वळवला, बंधारे बांधले, ग्रिन हाऊसेस साठी कर्ज दिले, प्रगत शेतीसाठी निधी वळवला तर हा देश सुजलाम सुफलाम होईल. तसेच पैसा कारणी लागेल.
देवस्थानांची संपत्ती
गाभा:
प्रतिक्रिया
30 Sep 2012 - 1:27 pm | दादा कोंडके
श्रिमंत देवस्थानं हे उत्तम बिझनेस मॉडेल म्हणून काम करतात. म्यानेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा केस स्टडी म्हणून विचार करायला हरकत नाही. त्यांचा एकमेव अजेंड म्हणजे लोकांची अध्यात्मिक भूक वाढवून पैसे उकळायचे. काही लोक/संस्था/प्रसिद्धी माध्यमं (ज्यांचा पैशात हिस्सा ठरलेला असतो) ती अतिशय धूर्त पणे त्यांचं काम करत असतात. एक उदाहरण म्हणून शिवसेना आणि लालबागचा राजा. सामनात अतिशय पधतशीरपणे त्याचं मार्केटींग केलेलं असतं. मुंबईतल्या खड्डयांबद्द्ल कानाडोळा करत गणेशभक्तांचा सोईसाठी परवा दिवसभर शंभर मोफत टॅक्सी दादर ते लालबाग फिरत होत्या. त्याच्या मागं शुद्ध आर्थिक गणित होतं हे ओळखायला अवघड जाउ नये.
30 Sep 2012 - 2:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बापु मामा , हे देवाला धन द्यायची रुढी कधी सुरु झाली असेल कोणास ठाऊक ? देवाला आपल्या संपत्तीतला आठवा भाग टाकला पाहिजे, अशी काही एक वाटणी वाचण्यात आली होती. जुने लोक चिल्लर पैसे, रुपये जमा करुन देवघरात एका लाल चिंधीत बांधुन ठेवायचे, आणि चांगली रक्कम जमली की देववारी करुन यायचे. आता सर्व स्वरुपच बदलून गेलं आहे, देवस्थानचा हा धंदा पाहिल्यावर वाटते, शासनानं एक आदेश काढला पाहिजे देवस्थानात चिल्लर पैशांपासून ते रुपये, वस्तू, सोनं, वगैरे टाकणार्यांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल. आणि अशी रक्कम टाकणार्यांना कमीत कमी सहा महिने जामीन मिळणार नाही, तुम्हाला सांगतो मंदिरं ओस पडतील. ट्रष्टी तर आता जे कायदेशीर वाद होतात ना ते कधीच होणार नाहीत. असो.
काल एका पेप्रात चांगली बातमी होती. गुरांना चारा नव्हता म्हणुन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रानावनातून बहुतेक ही रा.से.यो.ची मुलं असावीत. गवताची गाठोडी मोटरसायकलवर बांधुन चारा छावण्यात ही गाठोडी सोडून आलीत, बरं वाटलं.
-दिलीप बिरुटे
30 Sep 2012 - 4:04 pm | प्रभाकर पेठकर
ह्या विषयावर बरेच बोलून/लिहून झाले आहे. तरीपण पुन्हा थोडे....,
शिक्षणाने आणि आधुनिकीकरणातून अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यवसाय संधी उत्पन्न होतील असा सर्वमान्य समज होता. पैकी शिक्षणातून पुस्तकी ज्ञान वाढले, आधुनिकीकरणातून स्पर्धा वाढली. शहरातून पदवीधरांची संध्या एवढी वाढली की त्या रेट्यात स्पर्धेमध्ये स्वतःला इतरांच्या पुढे ठेवण्यासाठी व्यावसायिक ज्ञान, कौशल्य मिळविणे गरजेचे बनले. अर्थात इथे स्पर्धा संपत नाही पुढे नोकरी/व्यवसायातही ह्या स्पर्धेला जन्मभर तोंड द्यावं लागतं. परिणामी वैफल्य वाढीस लागते. ह्या स्वतःच ओढवून घेतलेल्या वैफल्यावर कुठलाच उपाय सहज नसतो. सहज असते एकच गोष्ट..... देवाला साकडे घालणे. आपल्या मागण्या (बहुतेक ऐहिक जीवनाबद्दल असतात, आर्थिक प्रगती विषयी असतात) देवासमोर मांडायच्या. त्या फुकटात कशा मांडायच्या? मग नवस बोलायचे. देवाशी काँट्रॅक्टच करायचं, तू माझ्यासाठी अमुक-अमुक कर मी तुला तमुक-तमुक अर्पण करेन. अगदी मुल होण्यापासून ते खडूस बॉसला हटवेपर्यंत सर्व काही देवावर सोपवायचं. आता, काही व्यावसायिक वृत्तीच्या महाभागांनी 'नवसाला पावणारा देव' ही संकल्पना पद्धतशीरपणे जन्मास घातली. वैफल्याने असहाय्य झालेली व्यक्ती विश्वास असो अथवा नसो सर्व उपाय करून पाहायचे म्हणून स्वतःची सारासार बुद्धी बासनात गुंढाळून 'नवसाला पावणार्या देवाच्या' चरणी धाव घेते. करायचं जास्ती काही नसतं. थोडा खर्च करावा लागतो एवढंच. असा थोडा खर्च करणार्या श्रद्धाळू(?) भक्तांमुळेच हा व्यवसाय भरभराटीला आला आहे. इतर व्यवसायांप्रमाणेच ह्या व्यवसायाच्या यशाकरीताही 'जाहिरातबाजी' अतिआवश्यक बनली आहे. आता, जाहिरात म्हंटली की अतिशयोक्त विधाने ही जाहिरातींचा पाया असतो. तोच इथेही दिसून येतो. म्हणजे, एक लंगडा आला, देवाला साकडे घातले, प्रभूंनी त्याच्यावर दया दाखविली आणि तो त्याच्या दोन पायांवर व्यवस्थित चालत गेला, आंधळ्याला दृष्टी आली, अमुक तमुक बाईला मुल झाले इ.इ.इ.
स्वतःला ह्या सर्वापासून जाणीवपूर्वक दूर ठेवून सदाचरणावर, संतुष्ट राहण्यावर भर दिला पाहिजे. श्रद्धा जरूर जरूर असावी पण श्रद्धेची मर्यादा ओलांडून अंधश्रद्धेच्या अंगणात पाऊल टाकायचे नाही. देव फक्त देवळात आणि तिर्थक्षेत्री नसतो. देव सर्वव्यापी आहे. प्रत्येकाच्या मनांत, प्राणीमात्रात, वस्तूवस्तूत आहे हा विश्वास हवा. दोन हात आणि मस्तक कुठेही टेकले की तो नमस्कार देवाला पोहोचतो. ही सृष्टी निर्माण करणार्याला पैसा, सोनंचांदीची आवश्यकता नाही. तुमच्याकडे जास्तीचे पैसे असतील तर ते जिथे खरोखर गरज आहे तिथे दान करा.
ह्या आवाक्याबाहेर फोफावलेल्या धंद्याचे मुख्य भांडवल आहे भक्तांची अंधश्रद्धा.
'लालबागच्या राजा'ने गल्लोगल्लीच्या राजांना जन्म दिला. 'डोंबिवलीचा राजा', 'कोळ्यांचा राजा', 'चुनाभट्टीचा राजा' इ.इ.इ. अनेक राजे गल्लोगल्ली दिसायला लागले आहेत. राजा म्हंटले की धंदा होतोय नं, म्हणा राजा. तसेच श्रीमंत गणपती. कारवारी लोकांचा गणपती सर्वात श्रीमंत. किती किलो सोनं आहे अंगावर? त्याचे किती कोटी रुपये होतात? अबब! ह्याचीच चर्चा मिडियात दिसते. शिर्डी संस्थानाची आवक किती?, तिरुपती, बालाजी, इथे अर्पण होणारं सोनं नाणं, फकीरीत आयुष्य वेचलेल्या साईबाबांना चांदीचे सिंहासन, सिद्धीविनायकाच्या मंदिराला सोन्याचा पत्रा बसविणं, एक ना अनेक.......लोकं देवांना त्यांच्या आर्थिक श्रीमंतीने ओळखू लागले आहेत.
गणेश विसर्जन मिरवणूक कोणाची किती तास चालते ह्याचीच स्पर्धा. तो गोंगाट, गर्दी, कर्णकर्कश्य वाद्यवृंद आणि बेताल नाचणारी स्त्री-पुरुष तरूणाई. टिव्हीवर पाहताना मनांत विचार आला, हेच जर मुसलमानांनी, ख्रिश्चनांनी केलं असतं तर आपण हिंदूंनी ते खपवून घेतलं असतं? मग आपणच का असं करावं?
ह्या सर्व अध्यात्मिक दलदलीतून बाहेर पडण्याची नितांत गरज आहे. लोकांना आपण सुधारू शकत नाही पण आपल्या पुढच्या पिढीला सुधारणे नक्कीच आपल्या हातात आहे.
श्रद्धा असू दे, अंधश्रद्धा नको. देव सर्वत्र आहे त्याला शोधत देवळात जायची गरज नाही. देवाला आर्थिक आमिषाची गरज नसते.
ह्या त्रिसुत्रीवर अमलबजावणी केली तर सर्व देवस्थानांची 'दुकानं' बंद होतील.
30 Sep 2012 - 5:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संपूर्ण प्रतिसाद आवडला. आणि '
'लालबागच्या राजा'ने गल्लोगल्लीच्या राजांना जन्म दिला. 'डोंबिवलीचा राजा', 'कोळ्यांचा राजा', 'चुनाभट्टीचा राजा' इ.इ.इ. अनेक राजे गल्लोगल्ली दिसायला लागले आहेत. ''
अगदी पटण्यासारखं आहे, हा नवीनच प्रकार आता रुजु लागला आहे.
-दिलीप बिरुटे
1 Oct 2012 - 3:09 pm | सुधीर
अननुभवामुळे म्हणा वा अज्ञानामुळे काहीवेळा भावूक होऊन, आयुष्याच्या नाजूक वळणावर 'नवसाला पावणार्या देवाच्या' चरणी धाव घेणार्यांना एक ना एक दिवस त्यातला फोलपणा जाणवेलच. "त्यातल्यात्यात" एवढाच एक फायदा की, लिलावातून आलेल्या पैशातून ट्रस्टला समाजोपयोगी कामे करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळतं. अर्थात ट्रस्टने पारदर्शकपणे पैशाचा योग्य वापर करावा ही माफक इच्छा.
30 Sep 2012 - 4:38 pm | बापू मामा
प्रभाकरजी, आपल्याशी पूर्ण सहमत.
लोकं काय , पैसे देतील, शेवटी अंधश्रद्धेवर प्रहार करणारे रामदास- तुकोबांपासून गाडगे बाबांपर्यंत होउन गेले. तरी ती तिळमात्र
कमी झाली नाही. प्रश्न आहे तो त्या पैशाचा विश्वस्त या नात्याने सदुपयोग करण्याचा. आज खरोखरीच मी वर्णिलेली परिस्थिती
मराठवाड्यात व पश्चिम महाराष्ट्रात आहे. किमान हिंदू धर्माचे गो व गोवंश संवर्धनाचे ब्रीदासाठी तरी देवस्थानांनी मदत करावी अशी अपेक्षा आहे. गाडगे महाराजांनी . धर्मशाळा, गोशाळा निर्माण करुन त्या बाबत आदर्श घालून दिला आहे.
30 Sep 2012 - 5:05 pm | यकु
ट्रस्ट, कायदे- पोलिस आणि भक्तांच्या भावना यांचा सक्तीने गळा घोटून देवस्थानांचे सगळे सोने-नाणे- पैसा अडका लुटायला हवा - त्याचा उपयोग जीवंत माणसांना होऊ शकतो - पण हीच माणसं कुठल्या बोगसपणामुळे सोने-नाणे दान देतात देवजाणे. अन्नदान ठिक आहे - अन्नदानासाठी पैसा पुरवणे ठिक आहे, पण देव भारी दिसावा म्हणून सोने-मोती ? बोगस बोगस बोगस त्रिवार बोगसपणा.
कोणत्याही देवाला पैसा, सोने किंवा कुठलीही मूल्यवान वस्तू अर्पण करणे हा तद्दन फालतूपणा आहे.
ही लूट करायचं ठरलं तर बर्याच लोकांकडे माझे नंबर आहेत, मला संपर्क करावा.
आय वील लीड.
30 Sep 2012 - 5:07 pm | प्रभाकर पेठकर
मामासाहेब,
असे दानधर्म अनेक देवस्थाने करीतच असतात. पण ह्याच दानधर्माच्या बुरख्या आड काय भ्रष्टाचार चालतो हे ओळखायला कोणी फार मोठा अभ्यासू माणूस लागत नाही. आणि चिमुटभर दानधर्म करूनही भरपूर पैसे कमाविता येतात हे ओळखुन ह्या धंद्यात उतरायचा अनेकांना मोह होतो. असो.
सावरकरांचे, 'गाय हा एक उपयुक्त पशू आहे' हे विधान मला पटते. त्यांमुळे गो आणि गोवंश संवर्धनासाठी हिन्दू कार्ड खेळणे पटत नाही. गो आणि गोवंश संवर्धनाची जबाबदारी सर्व धर्मियांची आहे. आणि फक्त हिन्दूंनी उचलायची म्हंटली तरी त्याला एवढा पैसा लागणार नाही.
30 Sep 2012 - 5:58 pm | बापू मामा
गाय हा एक उपयुक्त पशू आहे हे विधान मला पटते, परंतु बैल हा तर अजूनही शेतकर्यांना उपयोगी पडतो. एका दुष्काळामुळे
जर शेतकर्याना हा साथीदार सोडावा लागला तर शेती कशी करणार?
30 Sep 2012 - 7:28 pm | तर्री
लालबागचा राजा आणि सार्वजनिक गणेश मंडळे यांचा धंदा हे १०० % खरे आहे !
पर्यावरणाचा प्रश्न ही बिनतोड आहे !
बंगे चा होणारा त्रास कुणाला दिसेल का ? वक्फ बोर्डाचे पैसे राष्ट्रकार्यासाठी लावावे असे कोणी म्हणेल का ?
30 Sep 2012 - 8:45 pm | दादा कोंडके
सो लेट्स स्टिक टू दी सबजेक्ट ड्युड. टू राँग्स डोंट मेक वन राइट.
बाकी लालबागच्या राजाच्या भक्तीचा आणि पैसे लुबाडण्याचा संबध तर आहेच. काय मंता मंदली? ;)
1 Oct 2012 - 3:53 pm | llपुण्याचे पेशवेll
म्हणणे थोडेसे रास्त वाटते. त्यापुधे जाऊन मी म्हणेन की यच्चयावत सगळे रेस्टॉरंट्स (रेस्तराँ) हे केवळ ऐशबाजी, हॉटेलिंग आणि पैसे उडवणे यासाठीच निर्माण झालेले आहेत. त्या पैसेवाले लोक जातात आणि अन्न टाकून त्याची नासाडी करतात. आणि नंतर ते अन्न गटारात जाते. तस्मात अशा सगळ्या हॉतेलात येणार्यांवर कारवाई करून त्यांचे खिसे रिते करून त्यांना तिथे वरणभात खायला लावून परत पाठवावे. व वरच्या पैशात दुष्काळ निवारण वगैरे करावे.
आहे की नाही वर सुचवलेल्या उपायापेक्षा अधिक बावळट पणाचा उपाय? काहीतरीच.
तुम्हाला कोनी सांगितले हो की अशी मोठमोठी दाने करणारे कायम चोर आणि लुबाडलेले पैसे असणारे असतात म्हणून. तुम्ही काय न्यायाधीश समजता का स्वतःला?
रामदास स्वामींनी म्हटले आहे त्याप्रमाणे 'सोहळा देवाचा करावा'. आम्ही देवाच्या कृपेने इमाने इतबारे नोकरी धंदा करूनही संपन्न आहोत आणि मुख्य म्हणजे आमच्याकडे दानत आहे. नाहीतर खिशात हजारो रुपये असूनही भिकार राहणारे लोक आम्हाला माहीत आहेत. आम्हाला आमचा देव सोन्या चांदीने नटलेलाच पहायला
आवडेल म्हणून आम्ही देवाला सोन्याच्याच मखरात बसवतो. यावर कोणी आक्षेप घेऊ लागला तर पुढे मागे मुसलमानांप्रमाणे अतिरेकी होऊन या लोकांची तोंडे अतिरेकी पद्धतीनेच बंद झाली तर योग्य होईल असे वाटते. आमची सहिष्णुता म्हणजे दौर्बल्य नाही हे कृपया लक्षात असू देणे.
2 Oct 2012 - 10:09 am | तर्री
आपले देव (आणि क्रिकेट ) हया वर कुणी ही उठावे कसे ही बोलावे !
लहान बालकाचे नागडेपण जसे डोळ्याला खुपण नाही तसेच आपल्या देव- देवतांचे झाले आहे. नाटके , चित्रपट , समजत अगदी सहज नकळत घोर विटंबना होत असते.
देवळांचे , देवस्थानाचे व्यवहार हे चोख नाहित - तो आपल्या किडलेल्या समाजाचा भाग आहे. अहो मी एका देवस्थानाच्या ट्र्स्ट चा सभासद असताना चारीटी कमिशनरचे व्यवहार पाहून उद्विग्न झालो होतो.
निसृह लोकांची समाजकार्यातून अलिप्तता हा हे भेडसावणारा व ज्वलंत प्रश्न आहे. एकदा तो सुटला की बरेच प्रश्न सुटतील !
1 Oct 2012 - 4:28 pm | मैत्र
देवस्थानाला काही पैसे दिल्याने बरेचदा काही मानसिक समाधान मिळत असतं.
सर्व धर्मांमध्ये हे स्वरुप आहे. त्यामागे आपल्या धार्मिक स्थळाबद्दल जबाबदारी हा विचारही असतो. अगदीच गैरही नाही.
नाहीतर देऊळ, मशीद, गुरुद्वारा, चर्च उभे राहणार तरी कसे आणि त्यांचा खर्च कसा चालणार.
नास्तिक व्यक्ती हेही म्हणू शकतात नंतर की सोने मोती नाही ठिक आहे.. फुलांचा खर्च कशाला. ते दिवे बंद करा. देव माणसात आहे.
प्रश्न सगळा येतो की योग्य अयोग्य खर्च आणि श्रीमंतीची सीमारेषा कोणती आणि ती कोणी ठरवायची?
पेठकर काकांचा प्रतिसाद आवडला. पण म्हणून एकूणात देव , देऊळ, उत्सव ही संकल्पना बंद करून 'फक्त' माणसातला'च' देव शोधणं काही मार्ग नाही.
हे घडण्याचं कारण हेच आहे की भुलणारी त्रस्त, तणावग्रस्त, श्रद्धाळू जनता आहे. आणि नवनवीन 'राजे', 'नवसाला पावणारी 'जागृत' देवस्थानं' निर्माण होत राहतात.
मग एखादाच गणपती "राजा" घोषित करून त्याचं व्यवसायिकरण हे अलिकडचंच.
याला अपवाद अनेक आहेतः
१. इस्कॉन बंगळूर - पैसा काढण्याची वृत्ती दिसते काही प्रमाणात. पण 'अक्षय पात्र' योजनेतून जवळ जवळ एक लाख शालेय विद्यार्थ्यांना मोफत जेवळ दिले जाते.
२. गुरुद्वारा जगभर मोफत लंगर चालवतात. पंजाब मध्ये काहि सार्वजनिक 'सुलभ' धर्तिची प्रसाधनगृहे धार्मिक पैशातुन चालवलि जातात.
३. सत्यसाई मध्ये गरिब रुग्णांवर अत्यंत कमी खर्चात उपचार होतात.
४. आनंद ऋषी रुग्ण्यालय, नगर इथे गरिब रुग्णांवर कमी खर्चात उपचार होतात.
५. तिरुपती मध्ये देवस्थानच्या खर्चाने शाळा, कॉलेजेस इत्यादी चालवले जातात (फुकट नाहिये, सोय केली आहे. )
६. अक्षरधाम (BAPS) मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर पैसा येतो पण बराच फंड हा सामाजिक कामांमध्ये वापरला जातो. यात सहसा मोफत सोयी देण्यापेक्षा लोकोपयोगी कामे करण्याकडे भर असतो.
७. शेगाव संस्थानमध्ये अनेक चांगले उपक्रम आहेत असं ऐकले आहे (मिपावर एक लेखही होता)
अशी अनेक उदाहरणे देता येतील.
पण याचवेळी अनेक paradox (मराठी?) आहेतच हे मान्य केलं पाहिजे. ग्रामदैवत कसबा गणपतीला वर्षातून दोन दिवस मान आणि थोडी वर्गणी. याउलट लक्षाधीश दगडूशेठ गणपतीला सोन्याचे कान अणि पीतांबर, हिर्यांची पदके आणि कोटींचे उत्पन्न. ज्यातून काही अॅम्ब्युलन्स चालवल्या जातात समाजासाठी. इतरही काही चांगली आहेत. पण अर्थात उत्पन्नापुढे खूप लहान.
माझ्या अतिशय आवडत्या गुरूजी तालीम गणपतिच्या रथावर "पुण्याचा राजा" नाव वाचून विलक्षण वाईट वाटलं. १००+ वर्षे जुन्या गणेशोत्सवाच्या 'संस्थापक' अशा मानाच्या आणि प्रचंड लोकप्रिय गणपती मंडळालाही अशी कॉपी करण्याची वेळ यावी किंवा इच्छा तरी का व्हावी?
2 Oct 2012 - 1:27 am | मालोजीराव
बापू नाना,
दुध संघ,साखर कारखाने, सहकारी बँका याच्या बरोबरीचे पद देवस्थान कमिटी सदस्याचे समजले जाते यातच सर्वकाही आले !
आता जगदंब जगदंब करण्याशिवाय आपल्या हाती काही नाही !
2 Oct 2012 - 7:51 am | राजेश घासकडवी
देवस्थानांकडे पैसा आहे याचं कारण म्हणजे ते त्यांच्या ग्राहकांना जे हवं असतात ते पुरवतात. विशिष्ट देवाच्या मूर्तीचं दर्शन, त्या मूर्तीसमोर विशिष्ट विधी, पूजा करण्याची सोय, पुजाऱ्यांकडून योग्य त्या प्रमाणात आशीर्वाद. या सेवा ते सचोटीने पुरवतात. समजा जमलेल्या पैशांवर योग्य तो टॅक्स देतात. एवढ्या अटी पूर्ण केल्यावर ते आणखीन गरीबांना का देणं लागतील?
प्रत्यक्ष भगवान कृष्णानेच सांगितलं आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. देवाचं दर्शन घेणं, त्यासाठी देवस्थानच्या बडव्यांना योग्य ती दक्षिणा देणं, हेच आपलं कर्म आहे असं कोट्यवधी लोक मानत असतील तर आपण कोण त्यांना थांबवणारे? त्यांच्यातल्या काहींची इच्छा 'गरीबांचं भलं व्हावं' अशीही असेल. पण तो निव्वळ फललोभ झाला. हा लोभ सर्वांनीच टाळला की सर्वच सुखी होतील नाही का? भगवान बुद्धानेही सांगितलं आहे की 'तृष्णा हे सर्व दुःखाचं मूळ आहे'. ही फललाभाची बालिश तृष्णा लेखातून जाणवते. 'मा फलेषु कदाचन' ही परिपक्व, गंभीर जाणीव दिसून येत नाही. लेखकाला आध्यात्मिक उन्नती साधून घेण्याची गरज आहे, यापलिकडे काय बोलणार?
2 Oct 2012 - 8:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> देवस्थानांकडे पैसा आहे याचं कारण म्हणजे ते त्यांच्या ग्राहकांना जे हवं असतात ते पुरवतात.
अजिबात नाही. देवांच्या कष्टमरांना कोणत्याही सुविधा देवस्थानवाले पुरवित नाहीत. मंदिर आणि परिसर इतका घाणेरडा असतो की दर्शनाला गेल्यावर तोंडात श्लोक यायच्या ऐवजी तोंडात शिव्या यायला लागतात. [थोड्या वेळाने शणिशिंगणापूरचा फोटो डकवतो]
>>>> विशिष्ट देवाच्या मूर्तीचं दर्शन, त्या मूर्तीसमोर विशिष्ट विधी, पूजा करण्याची सोय, पुजाऱ्यांकडून योग्य त्या प्रमाणात आशीर्वाद.
” पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ” [गुगलवरुन साभार.] देवानं आपल्या मुखातून स्पष्टपणे म्हटलं आहे की जो भक्त प्रेमानं, शुद्ध भावनेने मला पान,फुल, आणि फळ अर्पण करील ते मी प्रेमानं स्वीकारतो. त्यामुळे आम्हाला देवांच्या आशिर्वादासाठी कोणतेही मध्यस्थ लागत नाही.
>>>> देवस्थानच्या बडव्यांना योग्य ती दक्षिणा देणं, हेच आपलं कर्म आहे असं कोट्यवधी लोक मानत असतील तर आपण कोण त्यांना थांबवणारे ?
कोट्यवधी लोक काहीही मानत नाहीत, त्यांच्यावर परिस्थिती निर्माण करुन काही गोष्टी लादल्या जातात. खरं तर तुम्हाला सांगणार नव्हतो पण सांगावं लागतंय. उदाहरण म्हणुन सांगायचे तर, दोन चार महिन्यापूर्वी आम्ही मित्र जेजूरीला गेलो होतो. मराठी आंतरजालीय सदस्याची तिथे मोठी वट आहे ते तेथील पुजारीही आहेत. त्यांना फोन केला ते बाहेर होते, मी म्हणालो. ” गर्दी आहे, दर्शनाची अर्जंट काही सोय होईल का ?” तर ते म्हणाले ” काही करायचं आहे का ? " मी म्हणालो ” काहीही करायचं नाही प्रेमानं देवाला नमस्कार करायचं आहे” तर ते ”हम्म ” म्हणाले. आणि एका ठिकाणी पन्नास पन्नास रुपये देऊन पास मिळतात तिथला मार्ग दाखवला आणि अशा रितीने दर्शन पूर्ण झाले. तर सांगायचं असं होतं की आपली गरज, आपली आडमुठी श्रद्धा, या सर्व गोष्टी त्याला जवाबदार आहेत, असं वाटतं.
>>>> भगवान बुद्धानेही सांगितलं आहे की 'तृष्णा हे सर्व दुःखाचं मूळ आहे'......
भगवान बुद्ध असेही म्हणाले की, दु:ख आहे, दु:खाला कारण आहे, दु:ख नाहीसे होऊ शकतात, आणि दु:ख दुर करण्याचे मार्ग. (चुभुदेघे) तेव्हा अध्यात्मिक उन्नती वगैरे ही सर्वं मला व्यक्तिगत ढोंगं वाटतात. अधिक काय बोलावे.
-दिलीप बिरुटे
2 Oct 2012 - 8:41 am | राजेश घासकडवी
>>देवांच्या कष्टमरांना कोणत्याही सुविधा देवस्थानवाले पुरवित नाहीत.
मग भक्त येडे म्हणून कोट्यवधी रुपये देतात असं तुम्हाला म्हणायचं आहे की काय? कदाचित या सुविधा चांगल्या रीतीने पुरवल्या तर अधिक पैसे मिळतील त्यांना हे बरोबर असेल.
>>कोट्यवधी लोक काहीही मानत नाहीत, त्यांच्यावर परिस्थिती निर्माण करुन काही गोष्टी लादल्या जातात.
हे साफ चुकीचं आहे. सगळ्यांनीच जर ठरवलं आपल्याला देवाच्या मूर्तीच्या दर्शनाची काहीही गरज नाही, तर कशाला त्यांना पैसे द्यावे लागतील? तुमच्याच उदाहरणात, तुमचा नमस्कार जर बसल्या जागेहून पोचतो असं तुम्हाला वाटत असतं तर कशाला पन्नास रुपयांचा पास काढण्याची गरज पडली असती? गुगलवरून तुम्ही साभार जे दिलं आहे, त्यावर तुमचाच विश्वास नाहीसं दिसतंय. मग कोट्यवधी लोकांना का दोष द्या?
भगवान बुद्ध आणि भगवान श्रीकृष्ण यांनी जो संदेश दिला तो चुकीचा कसा असेल? त्यांचंच इतरत्र आलेलं म्हणणं सत्याशी कॉंट्रॅडिक्टरी कसं असेल? काहीतरीच तुमचं.
2 Oct 2012 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> तुमचा नमस्कार जर बसल्या जागेहून पोचतो असं तुम्हाला वाटत असतं तर कशाला पन्नास रुपयांचा पास काढण्याची गरज पडली असती? गुगलवरून तुम्ही साभार जे दिलं आहे, त्यावर तुमचाच विश्वास नाहीसं दिसतंय.
हम्म, माझंही थोडं चुकतंय खरं....!
-दिलीप बिरुटे