उकडीचे मोदक...
माझे एकदम फेवरेट आहेत. पण जनरली उकडीचे मोदक, पुरणाच्या पोळ्या & so on... यासारख्या पाककृती म्हणजे नवशिक्यांसाठी 'डी' ग्रुपचे Questions असतात. त्यामुळे मी कधीच या पदार्थांच्या मागे लागले नाही. पण या गणेश चतुर्थीला आयते मोदक मिळण्याचे दूरदूरपर्यंत काही चान्सेस नसल्याने 'मोदक पहावे करून' असा विचार मनात येऊ लागला. मग म्हंटलं, ट्राय तर करून पाहू. जमलं तर जमलं, नाही तर नाही.
पहिल्यांदाच मोदक केले आणि छान झाले. त्याचीच कृती इथे देत आहे.
साहित्यः
उकडीसाठी: १ मोठी वाटी तांदूळाची पिठी, १ मोठी वाटी पाणी, चिमूटभर मीठ, १/२ टीस्पून साखर (किंवा २ चिमूट साखर), १ टीस्पून तेल, १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
सारणासाठी: १ मोठी वाटी खोवलेले ओले खोबरे, पाऊण (मोठी) वाटी गूळ, १/२ टीस्पून वेलदोडे पूड, २ टेबलस्पून तूप, १/२ टीस्पून खसखस, २ टेबलस्पून काजू-बदाम-अक्रोड इत्यादी सूक्या मेव्याचे बारीक तुकडे (ऑप्शनल)
कृती:
आधी सारण करून घ्या. म्हणजे उकड करून होईपर्यंत सारण गार होईल.
सारणः
१) एका पॅनमध्ये तूप घेऊन ते गरम झाले की त्यात खसखस घाला. ती परतली की त्यात खोबरे घालून परतून घ्या.
२) आता त्यात गूळ, वेलदोडे पूड घालून चांगले एकत्र परता.
३) ५-१० मिनिटे मध्यम आचेवर (झाकण न ठेवता) मिश्रण चांगले शिजवून घ्या. मग त्यात सुक्या मेव्याचे तुकडे चांगले परतून घ्या आणि गॅसवरून उतरवून ठेवा. सारण तयार.
उकडः
१) १ वाटी पाणी घेऊन ते जाड बुडाच्या पॅनमध्ये/पातेल्यामध्ये/ कढईमध्ये किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये मध्यम आचेवर उकळत ठेवा.
२) उकळी आल्यावर त्यात मीठ, साखर, तेल घाला.
३) मग पॅनच्या मध्यभागी तांदूळ पिठी आणि कॉर्नफ्लोअर घालून एका डावाने चांगले मिक्स करून घ्या. लगेचच त्या पॅनवर घट्ट बसणारे झाकण ठेवा. (ज्यामुळे वाफ आत कोंडून राहील.)
४) गॅस बंद करून पॅन गॅसवरून उतरवून ठेवा. ५-६ मिनिटांनी पॅनवरचे झाकण काढा. उकड खूपच गरम असेल तर १-२ मिनिटे अजून झाकून ठेवा.
५) मग ती उकड एका मोठ्या बाऊलमध्ये/ तसराळ्यामध्ये घेऊन तेलाचा आणि पाण्याचा हात लावून थोडी गरम असतानाच (कणकेसारखी) चांगली भरपूर मळून घ्या. त्यावर झाकण ठेवा. उकड तयार.
मोदकः
१) तयार उकडीचा मोठ्या (जंबो) पेढ्याएवढा गोळा करून त्याची जमेल तितकी पातळ पारी (साधारण तळहाताएवढा किंचित खोलगट द्रोण) बनवून घ्या.
२) मग त्या पारीला दिवाळीतल्या खूप वातींच्या पणतीसारखे फोल्ड्स करून घ्या. मग हलकेच छोट्या चमच्याने त्यात सारण भरून घ्या.
३) आणि त्याचा फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे मोदक करून घ्या.
४) एका चाळणीला हाताने चांगले तेल लावून घ्या. प्रत्येक मोदक तयार झाला की हलकेच पाण्यात बुडवून तो या चाळणीवर थोडे थोडे अंतर ठेवून ठेवावा.
५) मग ही चाळणी कुकरमध्ये किंवा इडली पात्रात किंवा एका मोठ्या पॅनमध्ये १५ मिनिटे वाफवून घ्यावा.
(मी मोदक मोठ्या पॅनमध्ये वाफवून घेतले. यासाठी मी मध्यम आचेवर एक मोठा पॅन थोडं पाणी घालून गरम करत ठेवला. त्यामध्ये मध्यभागी छोट्या कुकरचे स्टीलचे भांडे ठेवले. त्यातही थोडे पाणी घातले. त्यावर ही चाळणी ठेवली आणि वरून ग्लास लिड लावले आणि १५ मिनिटे मोदक वाफवून घेतले.)
टीप:
१) मी फ्रोजन खोबरे वापरले होते. फ्रोजन खोबरे वापरणार असाल तर, शक्य असेल तर, ते १-२ तास आधी फ्रीजबाहेर काढून ठेवावे. माझं ऐनवेळी मोदक करायचे ठरल्याने मी फ्रीजमधून काढून ते लगेचच वापरले. अशा वेळी सारण करताना ते खोबरे तूपावर मंद गॅसवर परतून त्यात डाव खूपसून ते सुटे करण्याचा प्रयत्न करावा आणि साधारण सुटे झाले की मग त्यात गूळ घालावा.
२) कृतीमध्ये जिथं १ वाटी लिहिलं आहे तिथे १ मोठी वाटी असंच प्रमाण धराव जे साहित्यामध्ये लिहिलं आहे.
३) सारण खूप वेळ गॅसवर राहिले असता ते ड्राय होते किंवा चिक्कीसारखे घट्ट होते. म्हणून सारण बनवताना खोबरे आणि गूळ व्यवस्थित मिक्स झाले आणि साधारण मऊसर झाले की सारण तयार झाले असं समजावे आणि गॅसवरून खाली उतरवून ठेवावे.
४) उकड खूप चिकट असल्याने प्रत्येक मोदक करताना हाताला तेल लावावे.
प्रतिक्रिया
24 Sep 2012 - 8:59 pm | पैसा
अगदी लग्गेच खावेसे वाटताहेत!
24 Sep 2012 - 9:04 pm | तर्री
प्रकट - झकासच !!!
स्वगत - फक्त ११ (च) मोदक आहेत .....पुरतील !
24 Sep 2012 - 9:17 pm | किसन शिंदे
24 Sep 2012 - 9:19 pm | गणपा
सध्या बधुन इतकेच म्हणतो की....
मोदक देखणे आहेत. :)
घरपोच झाले की पुढील प्रतिसाद मिळेल. ;)
27 Sep 2012 - 8:16 am | Pearl
पत्ता कळवा,
मोदक घरपोच पोहोचवण्यात येतील :-) पण बार्टर सिस्टीम आहे हे लक्षात असू द्या ;-)
24 Sep 2012 - 9:28 pm | जाई.
झकास!!!
24 Sep 2012 - 9:34 pm | तुषार काळभोर
सुबक
24 Sep 2012 - 10:38 pm | मदनबाण
वा ! :)
25 Sep 2012 - 6:20 am | स्पंदना
मस्त!
फक्त एकच फरक आहे, आम्ही सारण गुळ घातल्यावर शिजवत नाही. म्हणजे गुळ कापुन घेउन बाजुला ठेवुन द्यावा अन खोबर गुलाबीसर रंगावर आल की गॅस बंद करुन त्यात हा गुळ लाकडी डावाने मिसळतो. या मुळे सारण खुसखुशीत रहात. चिक्कट नाही होत.
25 Sep 2012 - 8:52 am | नगरीनिरंजन
सुरेख!
25 Sep 2012 - 8:57 am | नंदन
मस्त!
25 Sep 2012 - 10:21 am | प्रास
धागा वाचला.
फोटो पाहिला.
सध्या इतकंच......
25 Sep 2012 - 10:29 am | सूड
मस्त !! सुबक आहेत मोदक.कॉर्नफ्लोर उकडीत घालण्यामागचं प्रयोजन काय ?
27 Sep 2012 - 8:13 am | Pearl
@सूड,
कॉर्नफ्लोर नक्की का घालतात नाहिती नाही.
पण मला वाटतं की मोदक बनवताना त्याला चिरा पडू नयेत म्हणून कॉर्नफ्लोर घालत असावेत.
25 Sep 2012 - 11:15 am | पिंगू
आता फोटो बघून खुष होतो आणि संध्याकाळी मित्राच्या घरी जाऊन चांगले तुपातले मोदक हादडतो.. :)
25 Sep 2012 - 3:00 pm | पियुशा
---/\---
झक्कास !!! मी परवाच ट्राय केलेत :)
अन पुन्हा उकडीच्या मोदकाच्या वाटेला जाणार नाही अशी शपथदेखील खाल्ली ;)
सुगरण आहेस हो अगदी :)
25 Sep 2012 - 3:10 pm | परिकथेतील राजकुमार
अशा युनीक पाककृती हे मिपाचे वैशिष्ठ्य आहे.
25 Sep 2012 - 7:04 pm | bhaktipargaonkar
सुरेखच....मोदकाच्या कळ्या अतिशय सुंदर जमल्यात...नक्की करून बघेन,,,,...बाकी तुमच्या प्रयत्नांसाठी तुमचं हार्दिक अभिनंदन
25 Sep 2012 - 11:04 pm | कवितानागेश
फार सुंदर दिसतायत मोदक.
माझ्यावर जेंव्हा करायची वेळ येते, तेंव्हा मी तेलाऐवजी पाणी हाताला लावून मोदक करते. :)
26 Sep 2012 - 12:13 am | खादाड
खूप आधि मी एका घरि गणपतित ब्राम्ह्ण म्ह्णुन जात असे त्या मराठे काकु हे मोदक बनवायच्या ,मी जेवण नावापुरतं आणि मोदक पोट भरेपर्यंत खायचो आता नक्कीच बनवुन पाहिन!! धन्यवाद!!!:)
27 Sep 2012 - 8:10 am | Pearl
@लीमाउजेट, प.रा., पिंगू, प्रास, नंदन, न.नि., पैलवान, मदनबाण, जाई, पैसा, तर्री, किसन, अपर्णा
धन्यवाद.
@पियुशा,
धन्स गो :-) अगं परत एकदा करून बघ बरं. जमतील तुला. आणि मला तरी तू केलेल्या तशा जिलब्या कुठे जमल्या :-/
@भक्ती, खादाड,
धन्यवाद. नक्की बनवून पहा. छान होतात. प्रमाण तंतोतंत घ्यायचे म्हणजे पा.कृ. चांगली/यशस्वी व्हायचे चान्सेस वाढतात.