मित्रांबरोबरच्या ओल्या कट्ट्याची सांगता करताना हटकुन मागवले जाणारे जे दोन पदार्थ आहेत त्यापैकी पहिला म्हणजे जीरा राईस + तडका मारलेली डाळ आणि दुसरा हा दाल खिचडा. पैकी उपहार गृहातला दाल खिचडा मी हल्ली हल्ली पर्यंत टाळत आलोय. अहो हाटिलात जाउन काय ती पचपचीत पिवळी खिचडी मागवायची? एकदा मित्राला विचारलेही की 'का लेका ती पचपचीत खिचडी मागवतोस?' त्यावर हवेत गिरक्या घेणार्या आपल्या पतंगाला सावरत तो म्हणाला 'आता आणि चावायचे कष्ट कोण घेणार?'
असो, यावेळी अश्याच एका कट्ट्या नंतर चुकुन दाल खिचडा माझ्या पुढ्यात आला. एकदा का ताटात अन्न आलं की मी त्याचा अपमान करत नाही मग ती अगदी शेपुची भाजी असो. पहिला चमचा तोंडात गेल्यावर एखाद्या ४-५ वर्षाच्या पोराने घसरगुंडीवरुन स्वतःला झोकुन द्यावे त्या प्रमाणे तो घास माझ्या बत्तीशीला कसलेही कष्ट न देता जीभेवरुन जो घरंगळला तो थेट जठरातच जाउन विसावला. आणि मला माझ्या मित्राच्या मुक्ताफळाचा अर्थ कळला.
तर अशी ही दाल खिचडी/खिचडा आज (चक्क रैवार असुन) खाण्याचा मुड आला.
साहित्य :
१ वाटी तांदुळ. (आंबे मोहर/कोलम) (शक्यतो बासमती तांदुळ टाळा.)
१/२ वाटी मुगडाळ. (साला सकट मिळाली तर उत्तम.)
२ मोठे चमचे तुर डाळ. (ऑप्शनल.)
१ मध्यम कांदा चिरलेला.
२ मध्यम टॉमेटो चिरलेला.
२-३ हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन.
१ इंच आलं बारीक चिरलेलं.
५-६ पाकळ्या लसुण बारीक चिरलेला.
कोथिंबीर.
२ तमाल पत्रं.
१/२ लहान चमचा हळद.
२ लहान चमचे लाल तिखट.
२ लहान चमचे जीरं.
चिमुटभर हिंग.
कडीपत्त्याची दोन पानं
३ मोठे चमचे साजुक तुप.
मीठ चवीनुसार.
कृती :
तांदुळ आणि डाळी किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे.
एका भांड्यात एक चमचा साजुक तुप तापवुन त्यात भिजवलेल्या डाळी आणि तांदुळ परतुन घ्यावे.
अंदाजे डाळ आणि तांदळाच्या अडिच ते तीन पट गरम पाणी त्यात घालावं. हळद हिरव्या मिरच्या आणि चवी नुसार मीठ घालावं.
झाकण ठेवुन मध्याम आचेवर शिजवत ठेवाव. अधुन मधुन पाण्याचा अंदाज घ्यावा. गरज वाटलीच तर १/२ वाटी गरम पाणी वाढवावे.
खिचडी शिजतेय तो वर एका कढईत २ चमचे साजुक तुप तापवून त्यात तमालपत्र, जीरं, हिंग, आलं-लसुण, कडीपत्ता यांची फोडणी करावी.
नंतर त्यात कांदा घालुन तो पारदर्शक होईस्तव परतुन घ्यावा. नंतर त्यात लाल तिखट आणि टॉमेटो घालुन शिजवावं.
टॉमेटो पार शिजला की त्यात ७-८ मोठे चमचे तयार खिचडी घालुन परतुन घ्यावं. आच बंद करवी.
तयार फोडणी खिचडीत ओतुन खिचडी घोटुन घ्यावी जेणेकरुन भाताची कणी मोडेल. वरुन भरपुर कोथिंबीर घालावी.
वरुन तुपाची धार सोडावी.
तो लो तैयार है खिचडी संग तीन यार दही, पापड और अचार.
प्रतिक्रिया
23 Sep 2012 - 9:22 pm | प्रास
धागा पाहिला.
पहायला आवडला.
24 Sep 2012 - 8:11 am | पिवळा डांबिस
धागा पहायला आवडला....
बाकी मसूरीची, शेवळांची, कोलंबीची, मटणाची, आणि खास करून सोड्याची खिचडी खाल्लेली असल्यामुळे............................................. पास!!!!!!!!!!!!!
स्वाद चढत्या क्रमाने घ्यावा!!!!
(ही ह्या धाग्याची कमतरता नाही तर आमच्या रां*च्च्या जिभेची खोड आहे!!!!!!!!!!!!)
:)
हा गणप्या लेकाचा ठाकूरांच्या नांवाला जागणार्या रेसेपी टाकणार कधी, देव जाणे!!!!!!!!!!!!
:(
26 Sep 2012 - 2:27 pm | सोत्रि
>> हा गणप्या लेकाचा ठाकूरांच्या नांवाला जागणार्या रेसेपी टाकणार कधी, देव जाणे!!!!!!!!!!!!
+1 एकदम सहमत!
- (ठाकूरांच्या नांवाला जागणार्या रेसेपीची वाट बघणारा ) सोकाजी
23 Sep 2012 - 9:47 pm | तर्री
आपली प्रत्येक पकृला दाद ध्यावी अशीच !
क्रमशः
23 Sep 2012 - 10:13 pm | प्रचेतस
काय जबरी झालीय पाकृ.
आता केव्हा दाल खिचडा खातोय असे झालेय.
23 Sep 2012 - 10:23 pm | कवितानागेश
माझ्यासारख्या आळशी लोकांचा आवडता पदार्थ! ;)
आज साधारण अशीच खिचडी केली होती.
पण सालवाली मूगडाळ आणि पातीचा कान्दा होता.
23 Sep 2012 - 10:42 pm | पैसा
बाकी प्रतिक्रिया नेहमीचीच! हीच पाक्रु .... वगैरे वगैरे...
23 Sep 2012 - 11:09 pm | माझीही शॅम्पेन
एकदम खल्लास __/|\__ स्वर्ग-वासी झालो
24 Sep 2012 - 1:31 am | किसन शिंदे
एवढ्यातच अजून तर बर्याच पाककृती यायचेत.
24 Sep 2012 - 12:28 am | अत्रुप्त आत्मा
@तो लो तैयार है खिचडी संग तीन यार दही, पापड और अचार.>>>
24 Sep 2012 - 1:45 am | रेवती
ही खिचडी मात्र आयती मिळायला हवी हां, त्याशिवाय मजा नाही. ;)
भारी आलाय फोटू.
24 Sep 2012 - 3:33 am | स्पंदना
एव्हढी सोप्पी असुनही आयती हवीय?
गणपा नेहमीचच्...लय भारी वगैरे वगैरे.
24 Sep 2012 - 8:22 am | रेवती
आज केलीच मी खिचडी आणि कढी!
या तै संपादिका झाल्यापासून आम्ही घाबरलोय.
होय, मॅडम, रोजचा स्वयंपाक आता मीच करीन, भांडी घासीन. ;)
24 Sep 2012 - 3:31 am | प्रभाकर पेठकर
मुगाच्या सालासकट डाळीची थलथलीत, गरमागरम, खिचडी ताटात घ्यायची वर साजुक तुप (कोणी बघत नाही पाहून जरा जास्तच) आणि झणझणीत लोणचं अर्थात साथीला तळलेला पापड आणि बुक्की मारून कांदा. असीम स्वर्गसुखाची बेगमी जणू.
24 Sep 2012 - 8:20 am | यशोधरा
मस्त.
24 Sep 2012 - 8:22 am | यशोधरा
सॉरी, पिडांकाका असे वाचावे.
स्वतःची पोस्ट अजून संपादन करता येत नाही वाटते. :(
24 Sep 2012 - 9:59 am | पिवळा डांबिस
>>>स्वतःची पोस्ट अजून संपादन करता येत नाही वाटते.
नाय ना!!
अजून त्यात वालाची खिचडी द्यायची राहिली!!!!!!
;)
24 Sep 2012 - 10:15 am | अस्मी
नेहमीप्रमाणे मस्स्त पाकृ...एकदम सह्ही दाल खिचडी.
तिसर्या फोटोमधला चिरलेला टोमॅटो एकदम भारी!!!
24 Sep 2012 - 10:46 am | पिंगू
वाह.. माझा आवडता आणि सोपा पदार्थ. कधी कधी मूड आला की करतोच, पण इतकं साग्रसंगीत नाही ब्वा..
24 Sep 2012 - 1:48 pm | स्पा
माताय.. लैच खमंग दिसतेय पाक्रु
24 Sep 2012 - 2:03 pm | सुहास..
झक्कास !
ही पाकृ अजुन धम्याने पाहिलेली दिसत नाही ;)
( ते पुनमवाले वेटर लोक्स धम्याचे तोंड पाहिले तरी लगेच दाल -खिचडी करायला घेतात ;) )
24 Sep 2012 - 3:30 pm | धमाल मुलगा
गप की बे. :D
बाकी हे खिचडी म्ह णजे आमची बोलतीच बंद की हो :-)
24 Sep 2012 - 5:28 pm | श्रावण मोडक
नुसती खिचडी नाही. डब्बल की ट्रिप्पल तेज!
24 Sep 2012 - 2:36 pm | Mrunalini
वा...... तोंडाला पाणी सुटले माझ्या..... खिचडी एकदम आवडता प्रकार आहे. :)
24 Sep 2012 - 2:43 pm | स्वैर परी
अशा प्रकारे हि करतात हे माहित नव्हते! आजच करुन बघणार! :) धन्स!
24 Sep 2012 - 2:47 pm | सानिकास्वप्निल
कम्फर्ट फूड :)
24 Sep 2012 - 3:27 pm | गवि
आहा.. हेच्च... फक्त वरुन ताजं खोवलेलं ओलं खोबरं ... आतल्या आत्मारामाला शांतता मिळते खाऊन...
पण इथे नुसत्या फोटोबाने पोटोबा शांत होईना....
24 Sep 2012 - 3:47 pm | llपुण्याचे पेशवेll
वाहवा वाहवा.
24 Sep 2012 - 3:53 pm | प्रभो
हम्म...शेपूच्या भाजीला श्या दिल्याबद्दल निषेध.
24 Sep 2012 - 6:38 pm | चित्रा
+१.
शेपूची भाजी मला भारी आवडते. तसेच टाकळ्याची बाकी काहीही न घालता केवळ मोहरीची फोडणी घालून परतलेली. या दोन्ही भाज्या मऊ पांढरे लोणी आणि भाकरीबरोबर खाण्यातले सुख वर्णन करता येत नाही.
25 Sep 2012 - 4:27 pm | सुर
+१ शेपूची भाजी मला पण खुप आवडते. थोडीशी भिजवलेली मुग डाळ, लाल मिरची आणी भरपुर लसणी वर परतवलेली भाजी नुसती खायला पण मस्त लागते.
25 Sep 2012 - 4:33 pm | गणपा
अर्रर्र
समस्त 'शेपु'प्रेमी मंडळींच्या भावना दुखावल्या बद्दल मंडळ अंमळ दिलगीर आहे. :)
आणि त्यांना विनंती आहे की शेपुची चविष्ट भाजी कशी करावी याचे सचित्र मार्गदर्शन करावे.
24 Sep 2012 - 3:57 pm | मॄदुला देसाई
आज करुन पाहिली एकदम सोप्पी आणि खमंग पाककृती. खुप खुप आभार :)
24 Sep 2012 - 4:40 pm | मोहनराव
एकदम झकास!
24 Sep 2012 - 4:59 pm | जाई.
सुपर्ब
24 Sep 2012 - 6:37 pm | चित्रा
डाळीची खिचडी मला भयंकर आवडते. ही पाककृती तर झकासच. आणि त्या करताना कसलाही पसारा न घालण्यात, आणि त्या सुबकपणे करून वाढण्यात गणपा यांचा हात कोण धरणार?
24 Sep 2012 - 8:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झकास.
-दिलीप बिरुटे
24 Sep 2012 - 9:14 pm | प्रभाकर पेठकर
या! गणपाभाऊ, जेवायला या.
24 Sep 2012 - 9:20 pm | गणपा
फर्मास. :)
25 Sep 2012 - 7:21 pm | रेवती
काकाऽऽ मला वाचवा....... ;)
25 Sep 2012 - 7:42 pm | प्रभाकर पेठकर
राघोबादादाच्या भूमिकेतही ह्या पेशवेकालीन आरोळीने पार हळवे करून टाकले.
24 Sep 2012 - 11:28 pm | अभ्या..
गणपा दादा लैच भारी
त्यातच पेठकर काकांची जुगलबंदी काय वर्णावी.
दोन पट्टीचे बल्लवाचार्य मग काय विचारायचे.
(त्यात साजूक तूप म्हणले की काकांचा प्राण) लगे रहो.
आम्ही दर्शनानंद घेतोय सध्या.
24 Sep 2012 - 11:36 pm | मराठे
पाकृ नेहमीप्रमाणेच चविष्ट ..
विशेष उल्लेख : टॉमेटो काय मस्त कापलाय! बरेचदा टोमेटो कापताना खून झाल्यासारखा सीन असतो आम्च्या स्वैपाकघरात.
4 Oct 2012 - 9:44 pm | विलासराव
>>>>>>>>> बरेचदा टोमेटो कापताना खून झाल्यासारखा सीन असतो आम्च्या स्वैपाकघरात.
आमच्याकडेही.
4 Oct 2012 - 9:46 pm | विलासराव
>>>>>>>>> बरेचदा टोमेटो कापताना खून झाल्यासारखा सीन असतो आम्च्या स्वैपाकघरात.
आमच्याकडेही.
25 Sep 2012 - 3:18 pm | मी_आहे_ना
झकास पाकृ
26 Sep 2012 - 4:32 am | दीपा माने
लहानांपासुन म्हातार्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशीच पाकृ आहे.
4 Oct 2012 - 9:27 pm | प्रियाकूल
मी पण अशीच करते.बटाटा पण घालते.
5 Oct 2012 - 1:53 pm | स्मिता.
व्वा! थंडीच्या दिवसात अशी गरमागरम खिचडी म्हणजे स्वर्गच वाटेल.
पहिले मिळणारा गावराण शेपू त्याच्या उग्र चव आणि वासामुळे मलाही आवडायचा नाही. पण हल्ली जो हायब्रिड शेपू मिळतो त्याच्यात उग्रता कमी असते आणि तो खायला सुसह्य होतो. इकडे शेपू मिळत नाही नाहीतर सचित्र पाकृ दिली असती.
6 Oct 2012 - 9:09 am | ज्ञानराम
ये हात मुझे दे दे ठाकूर...""
अप्रतीम खिचडी...
6 Oct 2012 - 11:43 am | वीणा३
एकदम मस्त झाली, धन्यवाद!!!
7 Oct 2012 - 3:28 pm | मालोजीराव
नादखुळा !!!
16 Oct 2012 - 8:40 am | वीणा३
गेल्या आठवड्यात माझी आणि माझ्या नवऱ्याची तब्ब्येत ठीक नव्हती त्यामुळे जवळपास ३-४ वेळा लागोपाठ केली. खूप आवडली आणि खाताना पण बरं वाटल. धन्यवाद!!!
5 Nov 2012 - 8:31 pm | भोसले.अतुल
!!!!!!!!एकदम मस्त!!!!!!!!
9 Nov 2012 - 10:04 am | मी प्रगती
खुप छान
14 Nov 2012 - 3:30 am | वैद्यबुवा
अप्रतिम!एकदम मस्त!
24 Nov 2012 - 10:37 pm | आशिष सुर्वे
झ्क्याक!
24 Dec 2012 - 5:35 pm | Vikrant
खुपच सुरेख झाली होती
25 Dec 2012 - 12:48 pm | सलिल २४
पण हा पदार्थ करताना पाण्याचे प्रमाण काही जमत नाही अजून खात्रीपूर्वक.फोटो हि छान.
25 Dec 2012 - 1:41 pm | ऋषिकेश
मी याच रविवारी दुपारी बेदम जेवण झाल्याने रात्री हलकाच आहार घ्यावा म्हणून ही खिचडी अध्याप्रकारात केली!
एकाही प्रमाणात, इन्ग्रेडियन्ट्समध्ये, पद्धतीत जराही बदल केला नाही
अहाहा! इतकी अप्रतिम झाली होती म्हणून सांगू (की पुन्हा एकदा बेदम चापली ;) )