विक्रमादित्य राजा अन वेताळाची कथा पूर्वी चांदोबा या मासिकात क्रमश: येत असे. या कथेमध्ये पुन्हा आणि डोक्याला खाद्य अशा अनेक कथा गोवलेल्या असत. मूळ कथेत एक राजा (विक्रमादित्य) अन एक वेताळ असे. (या वेताळाबद्दल आम्हाला भीतीयुक्त, भयानक आदर वाटत असे. पुढे ‘सज्जन’ नामक अभिनेत्या(?)ने ‘विक्रम और वेताळ’ नावाच्या मालिकेत वेताळाची केलेली भूमिका पाहून, या भीतीयुक्त आदराचे हास्ययुक्त इनोदात परिवर्तन झाले.). हे दोघे नित्य नेमाने एकच उद्योग करीत असत. विक्रमादित्य वेताळाला पाठुंगळीला घेऊन रात्रभर गस्तीच्या पोलीसासारखा रस्त्यावरून फिरत असे अन वेताळ त्याला निरनिराळ्या रसभरीत गोष्टी सांगत असे.
मूळ कथेची पार्श्वभूमी साधारण अशी होती.
राजा विक्रमादित्य हा दानशूर, सत्यवचनी, न्यायप्रिय राजा. एकदा त्याच्या दरबारात एक मांत्रिक आला. राजा विक्रमादित्याने त्याच्या कपटजालाला फसून त्याला तांत्रिक पूजेत मदत करण्याचे वचन दिले.
त्यानुसार राजा विक्रमादित्य अमावस्येच्या रात्री स्मशानात गेला अन पिंपळाच्या झाडाला लटकणारे प्रेत खांद्यावर घेऊन मांत्रिकाकडे निघाला असता राजाला मदत करण्याच्या उद्देशाने वेताळाने त्या प्रेतामध्ये प्रवेश केला. अन ते प्रेत विक्रमादित्याशी बोलू लागले. त्याने राजाला अट घातली की जोपर्यंत राजा काही बोलत नाही तोपर्यंत वेताळ त्याच्याबरोबर येईल. राजाने मौन सोडले की तो परत आपल्या झाडावर निघून जाईल. राजाने हे मान्य केले.
पण वेताळ महा-चावट ! प्रत्येक वेळी तो नवनवीन गोष्टी सांगून अत्यंत जटील असे कूट प्रश्न राजाला विचारी अन वरती ब्लाकमेल करी, की विक्रमादित्याने त्या प्रश्नांची उत्तरे माहिती असूनही दिली नाहीत तर त्याच्या डोक्याची शंभर शकले होऊन त्याच्याच पायावर लोळू लागतील. आता विक्रमादित्य म्हणजे काही संसदेत बसणारा सत्ताधारी पक्षाचा आमदार-खासदार नव्हता, की प्रश्नाला उत्तर देऊ शकणार नाही ! तो तर जात्याच बुद्धिमान ! शिवाय उत्तम अनुभवी अन ज्ञानी शासक. त्याच्या दृष्टीने असले प्रश्न म्हणजे किस झाडकी पत्ती ! तो बरोबर उत्तर देई अन मग राजाने न बोलण्याचे वचन मोडले, की वेताळ पुन्हा जाऊन झाडाला लटकत बसे.
...आम्हा सर्वसामान्य लोकांनाही अलीकडे बरेच जटील असे कूट प्रश्न रोजच्या जीवनात पडतात, की ज्यांची सुयोग्य आणि चपखल उत्तरे आमच्या बाळबोध बुद्धीला सापडत नाहीत आणि विचार करकरून आमच्या डोक्याची शंभर शकले होऊन आमच्याच पायावर लोळू लागतील की काय अशी भीती वाटते.
म्हणून आम्ही वेताळाचा अवतार घेऊन यापैकी काही प्रश्न वाचकरूपी विक्रमादित्यापुढे ठेवले आहेत. फरक इतकाच की वेताळाला सर्व उत्तरे अगोदरच माहिती होती, आम्हाला नाहीत.
या कथेचा उत्तरार्ध म्हणजे वेताळाच्या प्रश्नांची उत्तरे, वाचकांनीच विक्रमादित्य होऊन द्यावी.
**************************************************************************************
राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनपणे मांत्रिकाच्या कुटीचा रस्ता चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ पुन्हा एकदा सजग होऊन बोलता झाला.
‘राजा, तुझी चिकाटी, धैर्य अन सत्यवचनी वृत्ती पाहून मी थक्क झालो आहे. अरे, दिवसा हापिसात आमचा बॉस ब्रम्हसमंध झोपू देत नाही. अन रात्री आमच्या सौ हडळ घोरून हैराण करतात, म्हणून इथं येऊन या प्रेतात शिरून जरा डुलका काढावा म्हटलं तर तू पिडतोहेस. आता एवीतेवी झोपेचं खोबरं झालंच आहे, तर दोघांचाबी टाईमपास म्हणून मी तुला घातपात नगराची कथा सांगतो.
कोणे एके काळी भ्रामकवर्ष नामक देशातील मराराष्ट्र राज्यात एक घातपात नगर नामक शहर होते. घातपात नगर हे मराराष्ट्रातील अन देशातील मुख्य व्यापारी व औद्योगिक शहर होते. मोठे संपन्न शहर. भ्रामकदेशाची आर्थिक सूत्रे इथून सांभाळली जात.
या नगराची लोकसंख्या प्रचंड होती. उंच उंच इमारती, मुंग्यांच्या वारुळासारख्या भरलेल्या लोकल गाड्या, वाहनांनी ओसंडणारे मोठमोठे हमरस्ते, खाद्यपदार्थांची रेलचेल असणारी असंख्य उपहारगृहे अन प्रदूषणाच्या विळख्यात गुदमरणारे शहरवासी, ही या नगराची वैशिष्ट्ये. त्याखेरीज एकसारखे होणारे दंगेधोपे, खूनखराबा, बॉम्बस्फोट अन दहशतवादी कारवायांचे माहेरघर म्हणूनसुद्धा ते मोठे विख्यात होते.
अशा या बहुरंगी, बहुढंगी घातपात नगरात एकदा मोठी सनसनाटी घटना घडली. दहशतवाद्यांनी एक आख्खे हॉटेलच ताब्यात घेतले. तेही पंचतारांकित. आणि हॉटेलमधील फॉरेनर्स, एनाराय अन व्हीआयपी लोकांना ओलीस ठेवले. दे दणादण गोळीबार केला. बक्कळ लोक मेले. करोडो रुपयांचे नुकसान झाले.
भ्रामक देशाची राणी हादरली. तिने प्रधानजीना बोलावले. निवडक सैन्य जमा झाले. व्युह रचला. पहाटेच्या मंद प्रकाशात धडक कारवाई केली. परदेशी अतिरेक्याना शूर सैनिकांनी प्राणाची बाजी लावून यमसदनास धाडले. एक दहशतवादी मात्र जिवंत राहिला. त्यास सैनिकांनी हिकमतीने पकडले. शासनाच्या ताब्यात दिले. खटमल नबाब नावाचा तो अतिरेकी शेजारच्या ‘पापीस्तान’ नामक यवन देशाचा नागरिक असल्याचे स्पष्ट झाले.
भ्रामक शासनाने त्याची चौकशी केली. मग बारकाईने चौकशी केली. पुन्हा कसून चौकशी केली. मग स्पेशल पथकाकडून चौकशी केली. मग अहवाल तयार केले. ते राजा, राणी, प्रधान आणि सर्व व्हीआयपीना दिले गेले. निरनिराळ्या देशांना खलिते गेले. उत्तरे, प्रत्युत्तरे झाली. आरोप-प्रत्यारोप झाले. एकंदरीत मोठा घनचक्कर धुरळा उडाला.
यादरम्यान पकडल्या गेलेल्या दहशतवादी खटमल नबाब ची मात्र शाही बडदास्त ठेवली गेली. खाना म्हणू नको, पीना म्हणू नको, सुखसोयी म्हणू नको. गरीब घातपात राज्यातल्या श्रीमंत उद्योगपतीसारखी खटमलची खिदमत केली गेली. अन आजतागायत तो खटमल एखाद्या नबाबासारखा घातपात राज्याचा पाहुणचार झोडत आहे.’
इथे वेताळाने क्षणभर दम घेतला. मग तो पुन्हा बोलू लागला.
‘राजा, ही गोष्ट ऐकून तुला आश्चर्य वाटले असेल. पण तू सूज्ञ व चाणाक्ष असल्यामुळे या मागचे तर्कशास्त्र तुझ्या बुद्धीला उमगणे अवघड नाही. मग आता तू मला सांग बरं. ज्या क्रूर दहशतवादी खटमल नबाबने अनेक निरपराध माणसांची हत्या केली, सर्व देशाला धारेवर धरले, त्याला त्वरित योग्य शिक्षा देण्याऐवजी घातपात राज्यात त्याची शाही बडदास्त का बरं ठेवण्यात आली ? त्याला मशिनगनच्या तोंडी देण्याऐवजी त्याला पंतप्रधानापेक्षा सरस झेड सुरक्षाव्यवस्था का पुरवण्यात आली ? त्याच्या सुखसोयींसाठी भ्रामक देशाचा अनमोल खजिना खुला का करण्यात आला ?
या माझ्या प्रश्नांची समाधानकारक अन योग्य उत्तरे तुला माहिती असूनही तू जर दिली नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील..’
असे म्हणून वेताळ स्तब्ध झाला.
आता वाचकहो, विक्रमादित्याच्या डोक्याची शंभर शकले होऊन त्याच्या पायावर लोळवयाची का नाही , हे तुमच्या आमच्याच हाती आहे.
( वाचकांना आवडल्यास पुढील एपिसोड टंकण्यात येईल. )
नवी वेताळ पंचविशी
गाभा:
प्रतिक्रिया
22 Sep 2012 - 10:29 pm | मन
चांगलय.
पुढील अंकाच्या प्रतिक्षेत.
23 Sep 2012 - 12:02 am | पैसा
या प्रश्नांची उत्तरे सगळ्याना माहिती आहेत पण डोक्यांची शकले कधीच झाली आहेत! तस्मात तुम्ही पुढची गोष्ट लवकर लिहा!
23 Sep 2012 - 10:45 am | तिमा
त्याची एवढी बडदास्त का ठेवण्यात आली, याचे उत्तर फारच सोपे आहे. त्याला जर मारुन टाकले असते तर जग ही घटना विसरुन गेले असते. उलट त्याला कायम जिवंत ठेवल्यामुळे यवन देशाची सतत बदनामी होत राहिली. त्याला चांगले चुंगले खायला घातल्यामुळे मारहाण करुन जे शक्य नव्हते ते सगळे कबुलीजबाब त्याने सहज दिले. 'ह्युमन राइटस' नांवाच्या संघटनेला हात चोळत बसावे लागले. ही कारणमीमांसा सामान्य माणसाला कधीच समजणार नाही. ती फक्त माझ्यासारख्या राज्यकर्त्यांनाच समजते. तेंव्हा पुन्हा नवीन गोष्ट सांगितलीस तर इतके फालतू प्रश्न विचारुन माझा वेळ वाया घालवू नकोस.
23 Sep 2012 - 3:11 pm | स्पंदना
अग स्नेहांकिता ज्याला पकडलय तोच वेताळ आहे अन आपल्या डोक्याची शकल करण्यासाठीच तर त्याला जीवंत ठेवलय.
23 Sep 2012 - 4:08 pm | चौकटराजा
मला याची उत्तर माहिताय असं कसं म्हणायाचं ? कारन भ्रामक देश म्या आयकिलेला नाई ! बाकी गोस्ट लई खास झालीया !