२५ जून १९७५ ला पंतप्रधान इंदीरा गांधी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी देशांतर्गत आणिबाणी घोषित केली आणि कधी नव्हे ते प्रथमच स्वतंत्र भारताच्या इतिहासात औपचारीकरीत्या हुकूमशाही अस्तित्वात आली. त्यावेळचे अनेक किस्से खूप लहान असून देखील आठवतात - व्यक्तिगत म्हणाल तर अचानक शाळेत कुठलीतरी गाणी म्हणायची सुरवात झाली (सक्ती झाली असावी पण कळले नाही). त्या व्यतिरीक्त काहीच समजले नाही. पण एक दिवस दुर्गा भागवत आणि पुल देशपांडे हे आणिबाणीविरुद्ध कडाडल्याचे समजले. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण (त्यांना हेडमास्टर म्हणायचे) यांनी पुलंना विदूषक म्हणून हिणावले. तेव्हढ्यात जेपींबद्द्लच्या बातम्या ऐकू येऊ लागल्या मग अचानक निवडणूका जाहीर झाल्या आणि ठाण्यात अनेक सभा होऊ लागल्या. त्या सभांना लहान असून देखील घरच्यांबरोबर हजेरी लावलेली आठवते - ठळकपणे आठवतात त्या मॄणाल गोरे, सुब्रम्हण्यम स्वामी आणि जॉर्ज फर्नांडीस यांच्या सभा. त्यात सांगीतले गेलेले अत्याचार आणि दिसला कुठेतरी त्याविरुद्ध किमान मताच्या बळावर उभा राहीलेला सामान्य माणूस.
बघता बघता "गाय वासरू नका विसरू" म्हणणारी काँग्रेस काही काळ पडद्याआड गेली. अनेक ठिकाणी दिग्गज पडले त्यात राजनारायण समोर इंदिरा गांधी पडल्या तर संजय गांधी आणि चांडाळ चौकडी पण काही काळ नामशेष झाली... अर्थात दैव देते आणि कर्म नेते या उक्तिप्रमाणे जनता पार्टी आणि त्यातील सभासद उपपक्षांना लोकशाहीतील सत्ता झेपली नाही आणि बघता बघता खेळ खल्लास झाला!
नंतर परत आणिबाणी आली नाही आणि कुठेतरी दिसलेले सामान्यांचे बळ पण परत दिसले नाही. परीणामी राजकारण खराब होत गेले आणि सत्ताधारी बदलले तरी "लहरी राजा, प्रजा आंधळी.." सारखा प्रकार कायम राहीला... एकीकडे पंजाब, एलटीटीइ , काश्मिर दहशतवाद तर दुसरीकडे इंदीरा गांधी, राजीव गांधी, यांच्या हत्येचे धक्के पचवले, नाणेनिधीचे संकट दूर केले, उपग्रह उडवले आणि अणूबाँब उडवले पण सामाजीक विषमता आणि समस्या या कमी होण्या ऐवजी लोकसंख्येच्या पटीत वाढण्याऐवजी त्याहून अधीक जोरात वाढत असल्यासारखे वाटत आहे...
थोडक्यात तत्कालीन आणिबाणी ही एका नेतॄत्वाला सत्ता टिकवण्यासाठी जाहीर करावी लागली. पण आज देश टिकवणे अथवा बळकट करण्यासाठी लागणारा सामाजीक क्षमतेचा किमान वरकरणी दिसणारा अभाव पाहीला तर आजची परीस्थिती ही खरी आणिबाणीची वाटते, असे म्हणले तर ते १००% बरोबर ठरणार नाही (निदान तशी आशा करतो) पण १००% चूक पण नाही अशी भिती वाटल्यास ती खोटी आहे का?
प्रतिक्रिया
25 Jun 2008 - 10:36 am | विसोबा खेचर
अलिकडच्या काही दशकांच्या काळातील घेतलेला थोडक्यात परंतु छान आढावा!
विकासराव, लेख आवडला.
पण सामाजीक विषमता आणि समस्या या कमी होण्या ऐवजी लोकसंख्येच्या पटीत वाढण्याऐवजी त्याहून अधीक जोरात वाढत असल्यासारखे वाटत आहे...
हे मात्र अगदी खरं!
तात्या.
25 Jun 2008 - 11:02 am | सहज
हं. "चलता है" "बर मगं/ सो व्हॉट" ही एकमेव फिलॉसॉफी, बाजारपेठेचे गणीत व भ्रष्टाचार अश्या शॉर्टकटचा आधार घेउन झुंडिचा प्रवास चाललाय खरा.
आता बघा "डबेवाला" हा कधी ग्लॅमरचा विषय नव्हता की चर्चेचा पण तरीही विदेशातील प्रमुख विद्यापीठात मुंबईत जेवणाचे डबे पुरवणार्यांची केस स्ट्डी शिकली / शिकवली जाते. तसेच बहुदा हा भारतीय लोकशाहीचा / देशाचा प्रवास कधी काळी आधुनीक स्वतंत्र लोकशाहीचा आदर्श प्रवास म्हणून शिकला / शिकवला जाईल. कारण कोणावरही न अवलंबुन कश्याही परिस्थीतीत शेवटी जमेल तसे बरे आयुष्य करायचा सामान्य माणसाचा जीवनध्यास हे एका चमत्कारासारखेच आहे. सर्व्हायव्हल!!!
फक्त तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!
25 Jun 2008 - 1:44 pm | अनिल हटेला
एग्री विथ सहज!!!!
खर आहे....
कित्तीही नकरार्थी विचार केला तरी,
जे मिळवलये ते नाकारता येणार नाही...
आणी पूर्ण जगात बहुधा आपणच एक लोकशाही राष्ट्र होतो...
आणी आहोत....
आणी लोकशाही म्हणुनच राहू....
येणा-या काही दशकात
जगाला नविन आशेचा किरण बनुन आपणच तारणार आहोत....
हसण्यावारी घेउ नका.....
पण हे होणार च बघा.....
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
25 Jun 2008 - 3:28 pm | भडकमकर मास्तर
२५ जून हा महत्त्वाचा दिवस एकूण...
विकास आणि सहज यांचे पोस्ट आवडले...
...
अवांतर : मी काही महिने आणीबाणीत काढले आहेत..आठवत नाही काही... :(
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
25 Jun 2008 - 9:35 pm | डॉ.प्रसाद दाढे
कोणीही काहीही काम न करता आमची बेनसन ऍन्ड जॉन्सन क॑पनी जशी टिकली आहे तशीच भारतातली लोकशाही आहे.. :)
विनोबा॑च्या अनुयायी निर्मला देशपा॑डे या॑चे नुकतेच निधन झाले तेव्हाही मला खिल्लीतील 'आम्ही सूक्ष्मात जातो" आठवल॑.
(भाईकाका॑चे 'खिल्ली' हे पुस्तक वाचून लोळलेला) प्रसाद
25 Jun 2008 - 10:55 pm | पिवळा डांबिस
आम्हाला काही गंभीर लिहायला आवडत नाही हे आत्तापर्यंत मिपाकरांच्या (चाणाक्ष वगैरे!!) लक्षांत आलं असेलच!:)
परंतू आणीबाणीच्या कालखंडाचा साक्षीदार म्हणून आणि पुढील पिढीला अचूक माहिती मिळावी म्हणून हा लेखनप्रपंच!! ही मूळ लेखावर टीका नाही तर केवळ तपशिलातल्या दुरुस्त्या!! विकासराव, राग नसावा...
पण एक दिवस दुर्गा भागवत आणि पुल देशपांडे हे आणिबाणीविरुद्ध कडाडल्याचे समजले.
दुर्गा भागवत कडाडल्या. पुल बरेच दिवस गप्प होते. पुलंचा या लढ्यातील जाहीर सहभाग निवडणुकांच्या आधी काही काळच सुरु झाला. अर्थात पुल भ्याले होते असा त्याचा अर्थ नव्हे. पुल त्यावेळेला जयप्रकाशांच्या तुरुंगातील डायरीचे मराठीत भाषांतर करीत होते. त्यावेळेस हे काम धोक्याचे असल्याने गुप्तता बाळगणे व कुणाला संशय येऊ न देणे आवश्यक होते. म्हणून पुल व्होकल नव्हते.
तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण (त्यांना हेडमास्टर म्हणायचे) यांनी पुलंना विदूषक म्हणून हिणावले.
शंकररावांनी नव्हे तर यशवंतरावांनी! पुलंनी त्यावेळेस राजकारणावर काही टिप्पणी केली तेंव्हा "विदूषकाला राजकारणातलं काय कळतंय?" अशी ती कॉमेंट होती.
आणिबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला एक काळाकुट्ट कालखंड होता यात संशय नाहीच. आणीबाणी जाहीर होण्यापूर्वी गुजरातेत नवनिर्माण आंदोलन आणि बिहारमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनातूनच जेपींचे नेतृत्व पुढे आले. जेपीच्या त्यावेळच्या भाषणांतून हे स्पष्ट होते की त्यांना निवडणुका लढून लोकशाहीद्वारे सत्ता बदलयची नव्हती, त्यांना संपूर्ण क्रांती हवी होती. त्यातच त्यांनी रामलीला मैदानावर केलेल्या भाषणात "लष्कर आणि पोलीसांनी आपल्याला न पटणारे आदेश मानू नयेत" अशी हाक दिली. आता लष्कर आणि पोलीसांचे काम दिलेल्या आदेशाचे पालन करणे हे असते, त्या आदेशावर विचारमंथन करणे नव्हे! त्यामुळे लष्करी बंडाचा (म्युटिनी) धोका उत्पन्न होऊ शकतो. कोणतेही सरकार अशी चिथावणी सहन करणे अशक्यच आहे. जेपींचे हेतू जरी पवित्र होते तरी या भाषणाने त्यांनी मर्यादा ओलांडली व सरकारला कारवाई करण्यासाठी निमित्त दिले.
सर्व विरोधी नेत्यांना जरी अटक झाली तरी त्यांना राजबंद्यांचा दर्जा दिला गेला होता. त्यांना सक्तमजुरी करावी लागत नव्हती. लिहा-वाचायची, एकमेकांत चर्चा करायची सवलत होती. अपवाद जॉर्ज फर्नांडिसांचा! ते बडोदा डायनामाईट केस मध्ये फौजदारी आरोपी होते. त्यांना या सवलती मिळणे शक्य नव्हते, म्हणून ते भूमिगत झाले. तुरूंगात सगळ्यात त्रास सोसला तो समाजवाद्यांनी नव्हे तर रा.स्व. संघाच्या लोकांनी आणि आनंदमार्गीयांनी!!
काही गंमतीच्या गोष्टी! आता वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल!!
--आणीबाणीच्या या संपूर्ण कालखंडात शिवसेना सत्तारूढ काँग्रेसबरोबर होती. नंतर गांधी फॅमिलीवर टीकेचे आसूड ओढणारे सेनाप्रमुख त्यावेळी यशवंतरावांच्या जोडीने सभा घेत फिरत होते.
--सारी वृत्तपत्रे आणीबाणीला भिऊन होती. अपवाद फक्त एक्सप्रेस ग्रुप (इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता इ.) आणि दक्षिणेत चो रामस्वामींचा! एक्सप्रेस ग्रूपच्या या विरोधामागे स्वतः श्री रामनाथ गोएंकांची प्रेरणा होती. आताचा लोकसत्ता पाहून त्यांनी खचितच आत्महत्या केली असती!!!:)
--या कालखंडात स्मगलर, काळाबाजारवाले, गुंड यांच्यावरही कारवाई झाली. वस्तूंच्या किंमती खाली उतरल्या, स्थानिक गुंडगिरी कमी झाली...
इंदिरा गांघींनी जशी आणिबाणी लादली तशी त्यांनी स्वतःच ती उठवलीही. आणि त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्या संसदेत विरोधी बाकावर जाऊन बसल्याही. आणीबाणी ही जशी भारतीय लोकशाहीच्या इतिहासातली काळीकुट्ट घटना आहे तशीच त्या हुकूमशहाने ती उठवून नंतर पराभव झाल्यावर विरोधी पक्ष म्हणून बसणे ही उज्ज्वल घटना आहे. जगाच्या इतिहासात असे दुसरे उदाहरण नाही.
आणीबाणीच समर्थन करण्याची मुळीच इच्छा नाही. पण आता इतकी वर्षे उलटून गेल्यावर त्या काळाचे भावनारहित विश्लेषण करण्याचा श्री. विकास यांनी जो प्रयत्न केला आहे त्याला हातभार लागावा म्हणून हे लिहीले. यात कोणत्याही नेत्याचे समर्थन वा उपमर्द करण्याचा हेतू नाही. सर्वच जण त्या सर्वशक्तीमान काळाच्या बुद्धिबळाच्या पटावरचे मोहरे होते...
रामकाका म्हाळगींचा स्वयंसेवक,
पिवळा डांबिस
25 Jun 2008 - 11:56 pm | प्रमोद देव
पिवळा डांबिस साहेबांशी सहमत आहे. त्यांनी त्यावेळच्या घटनांचे अगदी अचूक शब्दात वर्णन केलंय.
पिडांसाहेब आपल्या स्मरणशक्तीला दाद देतो.
एक छोटीशी भर: आणीबाणी उठल्यावर मटाचे त्यावेळचे संपादक गोविंदराव तळवलकर ह्यांनी , आणीबाणीला विरोध न करता मटाचे धोरण बोटचेपे राहिल्याबद्दल समस्त वाचकांची जाहीर लेखी माफी मागितली होती...हे स्पष्टपणे आठवतंय.
अवांतर:संसदेला ज्या दिवशी घेराव घालण्याचा कार्यक्रम जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली ठरला होता ,योगायोगाने त्याच दिवशी मी आणि माझे काही मित्र दिल्लीत होतो. अर्थात त्या लढ्याशी आमचा अर्थाअर्थी काही संबंध नव्हता ही गोष्ट अलाहिदा! त्या दिवशी आमची झालेली परवड इथे वाचता येईल.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
25 Jun 2008 - 11:51 pm | विकास
अहो डांबिसराव,
इतके मस्त लिहीताना मला राग कशाला येईल. आणि इथे बर्याच लोकांना माहीत आहे पण (फॉर द रेकॉर्ड) परत सांगतो: कधी काही वाद घातला तरी तो मी व्यक्तिगत घेत नाही आणि मनात ठेवत नाही.
माझा लिहीतानाचा उद्देश हा कुठल्याही बाजूने अथवा विरुद्ध लिहीण्याचा नक्कीच नव्हता पण काही नवीन गोष्टी कळल्या तर म्हणून हा प्रपंच नक्कीच होता. आपला विस्तृत प्रतिसाद वाचून तो उद्देश साध्य झाला असे वाटले. थोडीफार जी माझ्या माहीतीप्रमाणे वेगळी माहीती आहे तीचा केवळ उल्लेख करतो पण यात कोण बरोबर आणि कोण चूक हा उद्देश नाही कारण संदर्भ आत्ता डोळ्यासमोर नाहीत. त्याचबरोबर अजून काही पिंका :-)
- तेंव्हा प्राथमिक शाळेत असल्याने, रामभाऊ म्हाळगींची मिरवणूक घरावरून जात असताना नुसतीच (एक्साईट होवून) पाहील्याचे अजूनही आठवत असलेला आणि त्यावेळेच्या घोषणा लक्षात असलेला... :-)
25 Jun 2008 - 11:24 pm | चतुरंग
नेहेमीपेक्षा काहीतरी वेगळेच सुरु आहे हे आजोबा-बाबा-आई इ.च्या बोलण्यातून जाणवे.
वर्तमानपत्रातही वेगवेगळे फोटो येत पण त्यावरुन फार काही कळण्याचे ते वय नव्हते.
आणीबाणी उठली त्यानंतर निवडणुका होऊन जनता पक्षाचे सरकार आले त्यावेळी बर्याच लोकांना आनंद झालेला दिसला.
नंतर मोठा झाल्यावर थोडेफार ह्याबद्दल वाचले आणि जास्त कळत गेले.
पिडाकाका म्हणतात ते खरे आहे - एकदा 'लष्करशाहीच्या रक्ताची' चटक लागलेला नेता सहजासहजी लोकशाही येऊ देत नाही, पण भारतातल्या लोकशाहीचे हे वैशिष्ठ्य ठरले!
आताची परिस्थिती ही कमालीची गोंधळाची आहे. लोकसंख्या हाच एक मोठा प्रश्न बनून राहिला आहे. त्यावर अंकुश आणण्याचे मात्र कोणत्याही राजकीय पक्षाचे धोरण दिसत नाही हे सखेदाश्चर्य आहे. अर्थात आपण सामान्य लोकतरी त्याला कुठे हातभार लावतो म्हणा, पहिली मुलगी झाली की 'ह्म्म, मुलगीच का? आता मुलगा कधी?' म्हणून सूर आळवले जातातच! लोकसंख्या काय फक्त आमच्यामुळेच वाढते आहे का, बाकीच्यांनी नको का विचार करायला? असे सर्वांनाच वाटते! :)
अनेक आघाड्यांवर प्रगती आणि त्याचवेळी अनेक आघाड्यावर परंपरागत अधोगती असे फार टोकाचे संमिश्र चित्र आहे.
चतुरंग
3 Dec 2009 - 3:12 pm | llपुण्याचे पेशवेll
खरे आहे. हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ असे म्हणतात.
सत्ताधारी बदलले तरी "लहरी राजा, प्रजा आंधळी.." सारखा प्रकार कायम राहीला. आणि राहतोच. आज उगाच या लेखाची आठवण झाली.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
3 Dec 2009 - 3:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वा! मस्त आढावादर्शक लेख!
अदिती
3 Dec 2009 - 3:15 pm | ब्रिटिश टिंग्या
सहमत आहे श्री अदितीजी!
लेख आवडला!
3 Dec 2009 - 3:17 pm | नंदन
वरील सर्व प्रतिक्रियांशी सहमत आहे. उत्तम आढावा!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
3 Dec 2009 - 3:20 pm | निखिल देशपांडे
अगदी असेच म्हणावेसे वाटते...
राजा प्रजा वाक्य खासच
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
3 Dec 2009 - 4:12 pm | दशानन
सर्वांशी बाय डीफॉल्ट सहमत.
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
3 Dec 2009 - 4:24 pm | धमाल मुलगा
सहमत!
विकासराव उत्तम लेख.
3 Dec 2009 - 3:43 pm | धमाल मुलगा
प्रकाटाआ
3 Dec 2009 - 3:17 pm | निखिल देशपांडे
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
3 Dec 2009 - 3:14 pm | प्रसन्न केसकर
सहमत असेच म्हणावेसे वाटते अनेकदा.
3 Dec 2009 - 3:49 pm | sneharani
असेच म्हणते..
माहितीपूर्ण लेख..!
3 Dec 2009 - 4:06 pm | समंजस
जी गोष्ट सहजपणे मिळते, किंवा जन्मतःच विनासायास मिळते (उदा. स्वातंत्र्य, पैसा, शिक्षण) त्या गोष्टींचे मोल हे सहसा कळत नाही. ह्या गोष्टी मिळवण्या करीता काय कष्ट करावे लागतात, काय त्रास होतो हे जाणवत नाही. ही जाणीव जेव्हा होते, तेव्हाच समाजपरीवर्तन होतं, चांगली कार्ये होतात.
सध्याच्या काळातील समाजाची उदासीन मानसीकता कदाचीत ह्यामुळेच आहे.
3 Dec 2009 - 4:11 pm | विसोबा खेचर
सहमत आहे..
आणि ज्यांना ही जाणीव नसते त्यांना ती वेळीच करून द्यावी लागते..
तात्या.
3 Dec 2009 - 4:55 pm | समंजस
आणि ज्यांना ही जाणीव नसते त्यांना ती वेळीच करून द्यावी लागते..
सहमत..
मात्र खुपच कठीण काम आहे...
3 Dec 2009 - 5:17 pm | यशोधरा
लेख आवडला. पिडांकाकांचा प्रतिसाद व विकास ह्यांचे त्यावरचे उत्तरही वाचनीय.
3 Dec 2009 - 5:19 pm | विजुभाऊ
इंदीरा गांधी असताना त्यानी जागतीक राजकारणात जो कणखर पणा दाखवला , भारतीय अर्थीक आघाडीवर काही अवघड निर्णय घेतले त्याचीच फळे आज आपण उपभोगतोय.
कारगील /कंदहार प्रकरणी त्यांची उणीव फारच जाणवली.
आजच्या इतके बोटचेपे राजकारण त्यानी कधीच केले नव्हते. निर्णय घेतले आणि त्याचे परीणाम कधीच नाकारले नाही.
दुर्दैवाने त्यावेळी साधनशुचितेच्या गप्पा मारणारे तथाकथीत विरोधक आता त्या गप्पाही विसरले आहेत.
निर्णय घेणारा नेता ही एका राष्ट्राच्या समृद्धी साठीची गरज असते.
आणीबाणी पुकारायची भाजप सरकारला जर वेळ आली असती तर त्यानी त्याचे किती गोडवे गायले असते कोण जाणे.
3 Dec 2009 - 6:57 pm | स्वाती२
लेख आवडला. पिडांचा प्रतिसादही वाचनिय.
लोकशाही म्हणजे काय हे ही निटसं कळलं नव्हत अशा वयात आणिबाणी आली. गावातील ओळखीची बरीच माणसे तुरुंगात होती. माझ्या मित्राचा काका संघातला तो भुमिगत झालेला. मित्राची आई साधी गृहिणी पण गुपचूप कार्य करु लागली. माझी आई आणि त्याची आई घरात सतत हलक्या आवाजात कुजबुजायच्या. मग निवडणूका जाहिर झाल्यावर बिल्ले वाटणे, रात्री पोस्टर लावणे चालायच. जनता पार्टी निवडून आली आणि ४-५ महिन्यात गावातील बर्याच काँग्रेसजनांनी पार्टी बदलली. त्यांना स्थानिक पातळीवर सत्ताही मिळाली. 'असे का?' या प्रश्नाचे उत्तर थोडे मोठे झाल्यावर यथावकाश मिळाले.