पाककृती - झटपट भ्रमणगाथा लेखन

नाना चेंगट's picture
नाना चेंगट in जनातलं, मनातलं
1 Sep 2012 - 12:49 pm

राम राम मंडळी

आजपर्यंत आपण अनेक पाककृती वाचल्या असतील, करुन पाहिल्या असतील, सांगितल्या असतील वगैरे इत्यादी... असो.

आता आपण एक पाककृती पाहू या !
आजकाल असल्या पाककृतींना फार डिमांड आहे असे म्हणतात.
तर ही पाककृती आहे भ्रमणगाथेच्या लेखनाची. लोकांना आजकाल भ्रमण करण्यापेक्षा भ्रमणगाथा वाचण्यात जास्त विंट्रेस्ट असतो. बरोबर आहे हो.. कोण त्या वाटा तुडवत जाईल, पोटाला खड्डे पाडेल. उगा आचरट लोक मधेच भेटतात त्यांच्याबरोबर रहावे लागेल. त्यापेक्षा कुणाची तरी भ्रम ण गाथा.. माफ करा... भ्रमण गाथा वाचावी, तोंडाने चुक चुक करावे.. वाटल्यास दोन टीपे गाळावी, जमल्यास माफक हसावे आणि जीवन तुम्हा कळले हो म्हणून पावती द्यावी. दोन घटका मनोरंजन तर होतेच त्यात ती गाथा नर्मदा, गाणगापूर, हरीद्वार, काशी असल्या ठिकाणाची असली तर स्पिरीच्युअल एनलाईटमेंट का काय ती पण होते हा बोनस.

पण महत्वाचा प्रश्न आहे तो असा की किती काळ आपण दुसर्‍याच्या गाथा वाचणार?
आपली क्रिअ‍ॅटीवीटी, अवेअरनेस, आणिक काय काय कात चुना असतो तो कधी दिसणार?

मग त्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे असली गाथा आपणच लिहिणे. ही गाथा लिहायची तर तिच्यात मालमसाला हवाच. त्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षांतील अनुभवाचे सार म्हणा आमटी म्हणा जे काही असेल ते काढले असून त्या पाककॄतीला आज तुमच्या समोर आणत आहोत.

साहित्य : शे सव्वाशे पानं, अर्धा बाटली शाई, पेन, नकाशा

कृती :
१) सर्व प्रथम आपण जिथे जाणार आहोत किंवा गेलो होतो असे सांगणार आहोत ते ठिकाण एक तर खुप फेमस असावे किंवा अजिबात फेमस नसावे. अर्धवट फेमस ठिकाणांची गाथा वाचण्यात लोकांना मजा वाटत नाही. सिंहगडाला पायी काय जायचे? त्यापेक्षा मुंबई शिर्डी रुट बरा.

२) ज्याठिकाणी जायचे ते ठिकाण देवदेवतांशी संबंधित, धार्मिक स्थळ असावे. पाप्पूण्याचा हिशेब लावायाला लोकांना आवडते. जे आवडते तेच द्यावे.

३) भ्रमणगाथा लेखक ब्राह्मण असल्यास बर्‍याच गोष्टी सोप्या असतात. नसल्यास ब्राह्मण पात्र कथेत आणावे. त्याचा फार उपयोग होतो.

४) संस्कृत माहित आहे असे दाखवावे. मात्र संस्कृत वाक्य आणू नये. गीताभाष्य किंवा ब्रह्मसूत्रांवरचे भाष्य याचा मोघम उल्लेख अधून मधून करावा.

५) खाण्यासाठी आपण जगत नाही असे दाखवावे मात्र काय खाल्ले पिले याचा डिटेल गोषवारा द्यावा

६) शक्यतो पायी चालण्याचाच सर्वत्र उल्लेख करत रहावा, प्रत्यक्षात तुम्ही गाडी वा पालखी वापरली असली तरी हरकत नाही.

७)समोरचा माणूस कसा भोंदू आहे हे सतत दाखवावे आपण मात्र लै प्युअर आहोत असेच समजून चालावे आणि लिहित रहावे.

८) गुरुचा उल्लेख सतत करावा पण नाव सांगू नये.

९) बायकांशी आपण प्रवासात किती सभ्यतेने वागतो ते सांगावे. त्यांना केलेली मदत विशेष उल्लेख करुन सांगावी.

१०) झालेल्या जखमा मोठ्या करुन सांगाव्या. ज्यामुळे असला प्रवास करण्याची इच्छा लोकांची कमी होईल पण तुम्ही लै भारी म्हणून त्यांच्या मनात प्रतिमा तयार होईल

११) प्रवासात दारु पिली तरी तिचा उल्लेख करु नये, सिगारेट विडी जरुर मारावी.

१२) कुठेही झोपलात तरी देवळात वा धर्मशाळेतच झोपलो असे लिहावे

असे अनेक मुद्दे आहेत. त्यातले महत्वाचे मुद्दे दिले आहेत. बाकीच्या मुद्यांची तुम्ही भर घालू शकता.

तर मंडळी अशीच वरचे मुद्दे घेत केलेल्या लेखनाची झलक पाहू... वरचे मुद्दे कसे आणि कुठे वापरले आहेत हे सुज्ञांच्या लक्षात येईल. ज्यांच्या लक्षात येणार नाही त्यांनी आपल्याला भ्रमणगाथा लिहीता येणार नाही हे पक्के समजावे.

***

अखेरीस दुरवर एक देऊळ दिसलं. फाटलेला झेंडा केविलवाणा हलत होता. भगवा रंग विटून पार पांढरा फटफटीत झाला होता. बरं वाटलं. सकाळपासून भटकत भटकत पायाचा तुकडा पडला होता. त्यात टाचेत घुसलेला दगड. सळ्ळकन रक्ताची चिळकांडी उडाली होती. रुईच झाडं होतं. चिक दाबून धरला. रुमाल बांधला. ठण ठण डोक्यात अजून आग होत होती. रक्त थांबलं होतं पण चालतांना लंगडत होतो. मधून झरा लागला. पाणी प्यायलो. सूर्य डोक्यावर आला होता. पोटात पण आग पडत होती. भोग कर्माची फळं. ब्राह्मण असुन कधी उपास नाही, संध्या नाही. नियती सगळा हिशेब पूर्ण करणारच. ती काय सोडणार. कृष्ण म्हणतो तेच खरं. जन्मजन्माचा प्रवास. गाठोडं पाठिवर घेत जगायचं. हवं ते जमा करायचं. टाकून द्यायला जमत नाही. विरक्त व्हायला हवं. मनात आलं जरा वेळ दुसर्‍या अध्यायावरचे शांकर भाष्य वाचावं. पण सावली दिसत नव्हती. रख रख वाढत होती. एखादी सावली दिसली तर वाचावं. पण आधी पोटात काहीतरी गेलं पाहिजे. उपाशी राहून देव भेटणार नाही. जीवन जगलो तर अध्यात्म जगेल. बुद्ध सुद्धा उपास करु नका म्हणायचा. मला जमेल का बुद्ध होणं, माहीत नाही. आत्मा आहे की नाही बुद्धाला प्रश्न पडत नाही. मला पडतो. का मी पाडून घेतो. समजत नाही. कालचं जेवण मिळालं नसतं तर काय झालं असतं. भली बाई होती. पाणी दिलं. बैस बाबा जेवलास की नाही दिवसभरात विचारलं. चेहरा बराच दु:खी दिसत होता. या बायकांच्या नशीबी कायम दु:ख. पोरगं नाही. पोरगं असलं तर उनाड असतं. उनाड नसलं तर सुन नाठाळ. सुखी रहा आशीर्वाद दिला गरम गरम जेवण झाल्यावर. असा आशीर्वादानं का फरक पडतो. तेवढंच समाधान. तिचा चेहरा उजळला. पडवीत पड बाबा. नको म्हटलं. धर्मशाळेत जातो म्हणालो. जवळ नाही धर्मशाळा. देवळाची ओसरी पडीक आहे. इथंच रहा. सकाळी जा तुझ्या मार्गानं. बरं म्हटलं. कांबळं आणून दिलं. उशी दिली. फार दिवसांनी झोप लागली. सकाळी उठलो. सरळ चालू पडलो. मागे वळून पहायचं नाही. कुठंही गुंतायचं नाही. सक्त ताकीद दिली गुरुजींनी. जाऊन येतो म्हणून आशीर्वादासाठी पाया पडलो तेव्हा. बरं म्हटलो. गुरुजीचं म्हणणं खरं होतं. आठ दिवसामागं असंच एक गाव. गाववाले म्हणाले. बाबा रहा. सोय करतो. देवळाशेजारी खोली आहे. रहा इथंच कायमचं. तुमचं प्रवचन ऐकावसं वाटतं. नको बाबानो. तीन दिवस राहिलो. पुरे झालं. आता सोडा. ऐकेना. रात्रीतून पळालो. अंधारात दोनदा ठेच लागली. दोन दिवस दुखलं. आज बरं वाटलं. तर दगड घुसला. रक्ताच्या थेंबाचा नवस केला होता की काय मागल्या जन्मी. या जन्मी फेडत आहे. समोर देऊळ दिसलं. पायात जरा जोर आला. भरभर पाऊल टाकलं. तेवढ्यात लक्ष इकडं तिकडं गेलं आणि पाय मुरगाळला. बसकन मारुन बसलो. ठणका अजून वाढला काय करावं सुचेना. डोळ्यात पाणी आलं. एक एक थेंब भुईवर पडत होता. माधवाय नमः गोविंदाय नमः... त्रिविक्रमाय नमः.... संध्या झाली. पाय धरुन उठलो. कसाबसा चालत राहिलो. घंटेचा आवाज कानावर आला. चला कुणीतरी दिसतंय. देऊळ जवळ आलं. आतमधे कूणी साधू असावा. थोडा अंधार होता. उन्हातून गेल्या गेल्या काही दिसेना. अंधेरी आली. काय झालं ते कळलं नाही. दारातच धाडकन अंग टाकलं.

***

भ्रमणगाथा लेखनाच्या सर्व होतकरु लेखकांना शुभेच्छा !! :)

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

1 Sep 2012 - 12:55 pm | सुहास झेले

फोटो नसल्याने पाककृती बाद केली आहे ;)

नाना साहेब, उत्तम लेख झाला आहे.

अन्या दातार's picture

1 Sep 2012 - 12:56 pm | अन्या दातार

तोंपासू. निव्वळ अप्रतिम. लेखणीस पूर आला.

गणपा's picture

1 Sep 2012 - 12:57 pm | गणपा

ह्याला(धाग्याला) खरचं पाक -क्रुती हा विभाग योग्य आहे का?

-(मुक्ताफळे) उधळी.

अन्या दातार's picture

1 Sep 2012 - 1:09 pm | अन्या दातार

ह्याला(धाग्याला) खरचं पाक -क्रुती हा विभाग योग्य आहे का?

जेलस! जेलस! ;)

(वाटाण्याच्या अक्षता) लावी

गणपा's picture

1 Sep 2012 - 1:10 pm | गणपा

२ मिनीटांत २ गळाला लागले. ;)

गणपा साहेब , जश्या तुमच्या रेसिपी मस्त व फक्कड असतात तसाच हा लेख मस्तआहे.

प्रभाकर पेठकर's picture

1 Sep 2012 - 5:10 pm | प्रभाकर पेठकर

ह्याला(धाग्याला) खरचं पाक -क्रुती हा विभाग योग्य आहे का?

सहमत.

पण गणपा, संपादकांना रुचलं असेल तर वाचकांनी शंका काढण्यात अर्थ नसतो.

नि३सोलपुरकर's picture

1 Sep 2012 - 1:04 pm | नि३सोलपुरकर

गणपा भो,
वाचकांची काही हरकत नसावी.

सस्नेह's picture

1 Sep 2012 - 1:33 pm | सस्नेह

वा, नानाश्री, आपणाला 'विडंबनसम्राट' पदवी देणेची शिफारस करण्यात येत आहे.
बाकी, त्या कुंट्यांनी 'नर्मदे हर' म्हणून एकदाच धन्य केले अन त्यांचे अनुयायी मात्र आता रोज पिडताहेत....

सानिकास्वप्निल's picture

1 Sep 2012 - 1:43 pm | सानिकास्वप्निल

वाह! वाह!
एकदम रुचकर , लाजवाब लेख आहे :D

स्पा's picture

1 Sep 2012 - 1:49 pm | स्पा

कुणत्यांची शैली परफेक्ट उचलली आहे :)
जबराट

अनुभवाचे सार / आमटी चविष्ट वाटते आहे ..


साहित्य : शे सव्वाशे पानं, अर्धा बाटली शाई, पेन, नकाशा

हे साहित्य किती दिवसांच्या भ्रमणासाठीचे आहे? जास्त दिवसांची अथवा लांबीची भ्रमण गाथा असेल तर साहित्याचे प्रमाण कसे/किती वाढवावे लागेल ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Sep 2012 - 4:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय भारी लिहिला राव शेवटचा उतारा. जसं कै खरोखर्च वर्णन आहे. :)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

1 Sep 2012 - 5:35 pm | प्रचेतस

लै भारी. :)

शुचि's picture

1 Sep 2012 - 5:04 pm | शुचि

नाना शेवटी क्रमशः हा अन्य लोकांच्या पोटात गोळा आणणारा शब्द राहीलाच की हो!!

पैसा's picture

1 Sep 2012 - 5:18 pm | पैसा

पाकृचा फटु कुठे आहे? लेखनाचे उदाहरण झक्कास!

विनायक प्रभू's picture

1 Sep 2012 - 5:34 pm | विनायक प्रभू

खीक।

रमताराम's picture

1 Sep 2012 - 6:53 pm | रमताराम

नाना 'मी समीक्षक होणारच' वगैरे पुस्तक वाचलंय काय अलिकडे? की कणकवलीकरांनी अजून लिहिलं नाही? नसेल तर गोस्ट रायटर म्हणून ल्हिउन टाका.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Sep 2012 - 8:13 pm | अत्रुप्त आत्मा


वाचताना प्रचंड ह.ह.पु.वा. होत होती,अतिशय परिणामकारक उतारा काढलात हो ..!
@पाप्पूण्याचा हिशेब लावायाला लोकांना आवडते. जे आवडते तेच द्यावे>>> --^--^--^--.

गुलाम ज्याचे अंतरमन,तेथे सुटकेचे काय साधन..?
लागे नजर परलोकी, मग सत्य/असत्य नाही विवेकी

आध्यात्माचा चढता पारा,वाटे इहलोक तुच्छ सारा
जरी केला कुणी उपरोध,तरी वाटे तोही तत्व-बोध

कसे कळावे यांना अता,कोणता उपदेश करु जाता
समजती ते बेड्यांना फुले, आणी विषवृक्षाला कंदमुळे

सुटका यांची करता कोणी,असेच झिजायाचे कुणी
व्हाहो गुरु धागाकर्ता,तुमच्याच उपदेशे सुटती आता.

अवांतर---चला...अता तरी त्या र..टा..ळ भ्र-मण कथेतनं सुटका होइल...अर्थात या लेखाचा अजुन १ परिणाम होऊ शकतो... या निमित्तानी गुरुच आपली परिक्षा पहातायत असं वाटलं तर.... ;)

संपत's picture

1 Sep 2012 - 9:52 pm | संपत

धार्मिक स्थळे घालून ही पाककृती बनवायला फार वेळ लागत असेल न? झटपट बनवायची म्हणून गड वगैरे टाकून कशी होते ही पाककृती?

आंबोळी's picture

1 Sep 2012 - 10:10 pm | आंबोळी

छान गं.
मस्त गं
कसं जमतं गं
डोळे पाणावले गं

राजेश घासकडवी's picture

1 Sep 2012 - 10:36 pm | राजेश घासकडवी

यात वाक्यरचनेबाबतही काही सूचना यायला हव्या होत्या. बहुतेक वाक्यं तीन ते चार शब्दांची असावीत. त्याने एक प्रकारचा विरक्तपणा येतो. हे तुम्ही उताऱ्यात दाखवून दिलेलं आहेच...

नको बाबानो. तीन दिवस राहिलो. पुरे झालं. आता सोडा. ऐकेना. रात्रीतून पळालो. अंधारात दोनदा ठेच लागली. दोन दिवस दुखलं. आज बरं वाटलं.

रामपुरी's picture

2 Sep 2012 - 2:58 am | रामपुरी

लगेच कुणीतरी करून बघितली की ही पाककृती

मुक्त विहारि's picture

2 Sep 2012 - 5:41 pm | मुक्त विहारि

ही पाक-क्रुती अंडे घालून करता येईल का?

नाना चेंगट's picture

3 Sep 2012 - 11:46 am | नाना चेंगट

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनापासून आभार :)

चमचमीत पाकृ. चला आता इथे गड्/किल्ले/धार्मिक स्थळे शोधणे आलं !

कवितानागेश's picture

4 Sep 2012 - 6:43 pm | कवितानागेश

ही ही ही! :)

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2012 - 6:53 pm | परिकथेतील राजकुमार

एकच नंबर रे नानबा.

बाकी भ्रमणाला निघताना किंवा भ्रमण करून परत येताना गाडी पंक्चर होणे, बंद पडणे वैग्रे मस्टच आहे रे. तसेच ग्रुप भ्रमण असेल तर अमका फलाना मुंबै वरुन आला, तमका पुण्यावरून आला असले सगळे पण सांगायलाच पाहिजे वाचकांना. नै तर मजा नाही.

इरसाल's picture

5 Sep 2012 - 11:15 am | इरसाल

गाड्यांचे, मित्रांचे, कुत्र्यांचे, म्हातारं माणुस, झाड, किडे इ. फटुही मस्टच नाय कां?

विजुभाऊ's picture

5 Sep 2012 - 5:03 pm | विजुभाऊ

नान्या एक र्‍हयलच की.
अधूनमधून उगाचच रेफरन्स नसलेली वाक्ये फेकावीत.
उदा: सकाळ झाली. सूर्य पेटायला लागतो . कढी खिचडी च्या तयारीला लागलो
अवांतरः
कुणीतरी मुळा मुठा ची परीक्रमा अनुभव लिहाल का? माताय्.आम्ही असे काही लिहिले की पुणेद्वेष्टेपणाचा आरोप होतो. मसालेवाईक अनुभव असतील हे नक्की

खाण्यासाठी आपण जगत नाही असे दाखवावे मात्र काय खाल्ले पिले याचा डिटेल गोषवारा द्यावा
ते कुठून विकत घेतले हे लिहिले नाही तरी 'कुठून विकत घेतले नाही' हे आवर्जून सांगावे.

धनंजय's picture

7 Sep 2012 - 11:04 pm | धनंजय

मजा आली.

या वर्णनात फीट्ट बसणारं एक नावाजलेलं पुस्तक माझ्याकडे आहे. अर्धेअधिक वाचल्यानंतर कंटाळा आला वाचनाचा. बहुतेक ही रेसिपी त्याच पुस्तकाला समोर ठेवून लिहिली असावी.

प्रचेतस's picture

12 Aug 2014 - 4:23 pm | प्रचेतस

कुंंट्यांचं का रे?

धन्या's picture

12 Aug 2014 - 4:44 pm | धन्या

होय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Aug 2014 - 12:14 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला ही पाककृती वाचून मजा आली. आता मी सेडीस्ट ठरते का? म्हणजे कोणी मासोकीस्ट काहीबाही पाकृ बनवतात, त्यांचे हाल पाहून मला गंमत वाटणं हे सेडीझमच म्हणावं लागणार.

पिलीयन रायडर's picture

14 Aug 2014 - 12:47 pm | पिलीयन रायडर

गंमत म्हणुन लिहीलं असलं तरी शेवटचा परिच्छेद खरंच छान लिहीला आहे!