पिंकी प्रामाणिक या नावाच्या खेळाडूने सध्या धुमाकुळ घातला आहे. खरे तर त्निने धुमाकुळ घातला आहे म्हणण्यापेक्षा मिडीयाने घटनांना धुमाकुळाचे रूप दिले आहे. खरे तर पिंकी ही भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवून देणार्या चमुतील एक खेळाडू. एक भारतीय नागरीक आनि सर्वात मुख्य म्हणजे एक 'माणूस'! तिच्यावर एका महिलेने बलात्काराचा (लग्नाचे वचन देऊन फसवल्याचा) आरोप केला आहे व पिंकी ही स्त्री नसून पुरूष आहे असाही दावा केला आहे. या दाव्याची सत्यता पडताळणे हे कोर्टाचे कामच आहे आणि ते झालेच पाहिजे. पिंकीच्या विरूद्ध केलेला दावा खरा असेल तर त्याची शहानिशा कोर्टाने करून मग तिला कायद्याने जी योग्य शिक्षा असेल ती दिली पाहिजे. मात्र तोपर्यंत, पिंकी ही एक स्त्रीच आहे असे मानणे अनिवार्य ठरावे.
याप्रकरणात मिडीयाने जो अश्लाघ्य वार्तांकन केले आहे ते 'जबाबदार पत्रकरीतेला' शोभणारे नाही असेही मला वाटते. जेलपासून कोर्टापर्यंत व परत अश्या क्षणांची सतत दृश्य दाखवणे, 'ये चीज क्या है?" असले प्रश्न पिंकी यांचा चेहरा दाखवून विचारणे वगैरे अपमानास्पद आहे.
मात्र दोन दिवसांपूर्वी जे झाले ते आपल्याला एक समाज म्हणून लांच्छनास्पद होते. पिंकीवर झालेल्या आरोपांची शहानिशा दोन सरकारी हॉस्पिटल्समधे होऊ शकली नाही. तिथे 'खात्रीशीर' चाचण्या करण्यासाठी लागणार्या सार्या सुविधा नव्हत्या. मात्र चाचण्याअ चालु असताना 'कोणीतरी' त्याचे शुटिंग करतो काय, ते इंटरनेटवर चढवतो काय आनि काही तासांत भारतभरात बातमी पसरून अनेक लोक ते बघतात काय हे सारेच एक समाज म्हणून शरमेचे आहे.
पिंकीला पुरूषांच्या जेलमधे ठेवणे, तिला पुरूष पोलिसांनी सोबत करणे तिच्यावर अन्याय्य आहे काय? सतत क्यामेरा घेऊन मागे धावणार्या मिडीयापैकीच एकाने हे शुटिंग केले नसेलच असे खात्रीने सांगता येईल काय? अश्या बातम्या (मिटक्या मारत) चर्चिल्या जातात, असे विडीयो चढवलेले कळताच बघायला झुंबड उडते हे कसले लक्षण वाटते? अशी विकृतता जगभरात असावी असा अंदाज आहे, इतरत्र/यापूर्वी असे काही घडले आहे काय? त्यावर काय अॅक्शन घेतली गेली?
द हिंदुच्या या अग्रलेखात तर सुचवले आहे की हे शुटिंग करायला डॉक्टरांनी परवानगी दिलीच पण तिथे पोलिसही हजर होते (शेवटून दुसर्या वाक्यातील मागणी हेच सुचवते)
या विषयावर तुम्हाला काय वाटते?
प्रतिक्रिया
5 Jul 2012 - 10:00 am | jaypal
>>>>>दोन सरकारी हॉस्पिटल्समधे होऊ शकली नाही. तिथे 'खात्रीशीर' चाचण्या करण्यासाठी लागणार्या सार्या सुविधा नव्हत्या.......................आयला ही काय भानगड. हसाव की रडाव?
मिडीया बेजबाबदारीची बरीच उदाहरणे आहेत. त्यात अजुन एक भर
5 Jul 2012 - 10:13 am | नगरीनिरंजन
भारतातली गिधाडं नामशेष झाल्याची बातमी वाचून आश्चर्य वाटलं होतं की गेली कुठे सगळी?
असं काही ऐकलं/वाचलं की कळतं.
5 Jul 2012 - 8:59 pm | शुचि
गिधाडं बरी असतात. निसर्गाचे सफाई कामगार म्हणतात त्यांना.
या अशा भुतावळींना ना जगता यावे ना मरण यावे. खितपत पडावेत.
5 Jul 2012 - 11:25 pm | आनंदी गोपाळ
डायक्लोफेनॅक सोडियम या वेदनाशामक औषधांचा वापर गुरांच्या आजारांना केल्याने, ती मेल्यावर, त्यांच्या शरीरातील ते औषध गिधाडांना मारक ठरते, असे कुठे तरी वाचल्याचे आठवते... अर्थात मी वाचले ते पेपरात होते.
5 Jul 2012 - 10:15 am | शिल्पा ब
OMG!!!
भारतीय मिडीया अतिशय बेजबाबदारपणे वर्तन करत असतो याचे हे एक ठळक उदा.
5 Jul 2012 - 10:48 am | मृत्युन्जय
संपुर्ण प्रकारच घृणास्पद आहे.
पिंकी खरेच स्त्री आहे की पुरुष हे यथासांग कळेलच. पण मुख्य प्रश्न असा आहे की मग इतकी वर्षे आपले क्रीडा प्रशासन झोपा काढत होते काय? जर ती एक पुरुष असेल तर हे आधी कसे कळाले नाही? इतकी पदके तिने मिळाल्यावर प्रशासनाला जाग आली की काय?
पिंकी वर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे. तिची आई मात्र स्वतः म्हणते की ती मुलगीच आहे. जर ती स्त्री वेषात वावरणारी पुरुष असेल तर अश्या पुरुषाबरोबर कुठलीही मुलगी स्वखुषीने रहायला आणि शारीर संबंध प्रस्थापित करायला तयार होइल असे वाटत नाही. हा बलात्कारापेक्षा स्वखुषीचाच मामला जास्त आहे. लग्नाचे आमिष वगैरे हा मला कधीही न झेपणारा प्रकार आहे. लग्न हे आमिष कसे असु शकते ते कळत नाही. शिवाय इतकी वर्षे त्या मुलीला पिंकी स्त्री वेषात देशाला फसवते आहे हे कळाले नाही काय? कळाले असेल तर तिही त्या गुन्ह्यात सहभागी नाही काय?
पिंकी स्त्री असो अथवा पुरुष तिचे नग्नावस्थेत शूटिंग करण्याचे धाडस आणि पातक कोणी करुन कसे शकते? आणि यावेळेस आजुबाजुचे पोलीस आणि डॉक्टर काय करत होत? मूळात एवढ्या सर्व लोकांसमोर तिला नग्न होण्यास प्रवृत्त करण्याचे डॉक्टरांना काय कारण होते? पोलिसांची तिथली उपस्थिती कोणालाच कशी खटकली नाही? शूटिंग करणारी व्यक्ती कोण होती आणी तिला तिथे उपस्थित राहण्याचा काय हक्क होता?
पिंकी पुरुष आहे हे जोवर सिद्ध होत नाही तोवर तिला स्त्री मानणे जास्त सयुक्तिक नाही काय? अश्या परिस्थितीत तिची वैद्यकीय चाचणी पुरुष डॉक्टर कसे घेउ शकतात? तिच्याबरोबर पुरुष पोलिस कसे असु शकतात आणी हे सगळे असतना तिला नग्न कसे केले जाउ दिले जाते? न्यायव्यवस्थेने आणि कायद्याने आणि पोलिसयंत्रणेने आधीच तिला पुरुष मानलेले आहे काय? किंव कुठल्याही इतर अवैध मार्गाने ते आधीच जाणुन घेतले आहे काय?
उद्या पिंकी स्त्री असल्याचे सिद्ध झाल्यास या सर्व मानहानीला जबाबदार कोण? पोलिस, डॉक्टर यांना या मानहनीसाठी का जबाबदार धरण्यात येउ नये? आणि ती पुरुष असेल जरी तरी या मानहानीसाठी त्यांना जबाबदार धरण्यात येउ नये काय?
राहिता राहिला प्रशन व्हिडियो बघण्याचा तर मला तरी वाटते की ९०% लोकांनी तो व्हिडियो केवळ पिंकी तो आहे की ती हे जाणुन घेण्यासाठी बघितला असेल.
असो एकुण या घृणास्पद प्रकाराबद्दल सरकारने आणि संबंधितांनी पिंकीची जाहीर माफी मागितली पाहिजे " तो " दोषी असेल तरीही.
5 Jul 2012 - 11:11 am | शिल्पा ब
वाक्यावाक्याशी सहमत.
5 Jul 2012 - 10:54 am | ऋषिकेश
याच चर्चेशी समांतर प्रश्न आहेत. मुळ चर्चासंपादन शक्य नसल्याने इथे देतोयः
लिंग बदल वगैरेच्या शक्य असण्याच्या जमान्यात एखाद्या व्यक्तीच्या लिंगाची(जेन्डर) शहानिशा करणे खरच शक्य आहे का? असल्यास कोणत्या चाचण्या केल्या जातात? त्या भारतातील हॉस्पिटल्समधे करणे का कठीण आहे? वगैरेवर येथील वैद्यकीय ब्याकग्राऊंड असणार्यांनी प्रकाश टाकावा.
5 Jul 2012 - 11:29 pm | आनंदी गोपाळ
तुमच्याकडून अपेक्षित नव्हते.
एक्स अन वाय क्रोमोसोम्स जेनेटिक प्रोफाइलात पट्कन दिसतात हो. तो अंतीम पुरावा आहे. कुठेही होतो. त्यानंतर, 'रेप' असेल, तर इरेक्टाईल ऑर्गन अन अॅक्चुअल व्हजायनल पेनेट्रेशन यांचे प्रूफ हवे असते. लिंगाची शहानिशा होते. सोपी असते. पुढली गोष्ट किचकट.
6 Jul 2012 - 9:24 am | ऋषिकेश
बाकी दोन दोन हास्पिटलात फिरूनही जर लिंगनिदान होत नसेल तर असतं काय बॉ हे प्रकरण असा प्रश्न पडणं सहाजिक आहे (असे आपले मला वाटते). अर्थात आता बहुगुणी यांनी छान माहिती दिली आहे, त्यामुळे शंकानिरसन झाले.
आता काय! नाही माहिती काही (खरतर बर्याच) गोष्टी. तुमचा अपेक्षाभंग झाल्याबद्दल क्षमस्व! ;)
5 Jul 2012 - 12:44 pm | चिंतामणी
हा ज्याने शूट केला तो जगातील अत्यंत गलीच्छ व्यक्ती आहे. आणि हे शुटींग होत असताना बघ्याची भूमीका घेणारे विकृत आहेत.
भारतातील मिडीयाबद्दल न बोलणेच चांगले. कारण त्याबद्दल बोलण्यासारखे काहिही राहीले नाही.
5 Jul 2012 - 1:18 pm | मुक्त विहारि
+१
5 Jul 2012 - 7:11 pm | बहुगुणी
'खात्रीशीर' चाचणीसाठी सुविधा नाही हा भंपकपणा आहे!
कॅरिओटायपिंग (Karyotyping) या रंगसूत्रे (chromosomes) ओळखण्याच्या अत्यंत मूलभूत आणि सोप्या प्रक्रियेने ही परीक्षा करता येते, आणि अशी सुविधा कोणत्याही मोठ्या इस्पितळातील Cytogenetics प्रयोगशाळेत ती करता येते, त्याशिवाय भारतात अनेक जीववैद्यकीय संशोधन केंद्रे आहेत जिथे ही परीक्षा सहज रीत्या केली जाऊ शकते. (केवळ मुंबईत निदान १० तरी आधिकृत सायटोजेनेटिक्स प्रयोगशाळा आहेत.) सरकारी इस्पितळांमध्ये ही परीक्षा उपलब्ध नसणे ही लांच्छनास्पद गोष्ट आहे.
ही परीक्षा एकतर गिम्सा (Giemsa) staining या प्रक्रियेने करता येते, अन्यथा आधिक खर्चाच्या spectral karyotyping अथवा SKY या पद्धतीने [ज्यात प्रत्येक रंगसूत्राला वेगळा "रंग" कृत्रिमरीत्या दिला जातो (digitally pseudocolored)].
Y रंगसूत्राचं अस्तित्व म्हणजे पुरुषत्वाची खूण, २२ इतर रंगसूत्रांच्या जोड्यांबरोबर सामान्यपणे पुरूषांमध्ये Y च्या जोडीने X रंगसूत्र असते (कॅरिओटाईप XY: आईकडून आलेलं X रंगसूत्र आणि वडिलांकडून आलेलं Y रंगसूत्र). दोन X रंगसूत्रांची जोडी असणं ही स्त्रीत्वाची खूण (कॅरिओटाईप XX: आईकडून आलेलं एक X रंगसूत्र आणि वडिलांकडून आलेलं दुसरं X रंगसूत्र - जाता जाता इथे अर्थात् हेही स्पष्ट आहे की स्त्री गर्भाच्या जन्माला कारणीभूत आहेत ते 'बाबा', आई नव्हे!)
कॅरिओटायपिंगच्या प्रक्रियेत साधारणतः गालाच्या आतील बाजूसारख्या सहज पोहोचता येईल अशा ठिकाणावरून ब्रश वापरून काही पेशी खरवडून काढल्या जातात (याने काहीही ईजा होत नाही.) या पेशींना काही काळ विशिष्ट द्रावणात वाढवून मग त्यांचे केंद्रक (nuclei) रासायनिक प्रक्रियेने फोडून त्यातील रंगसूत्रे काढली जातात. या रंगसूत्रांना गिम्सा पद्धतीने रंगवून प्रत्येक रंगसूत्राचे वैशिष्ट्यपूर्ण असे band pattern (Giemsa किंवा G bands) सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले जातात. असे G bands किंवा SKY चित्र खालीलप्रमाणे दिसते (डावीकडे G bands दाखवणारा कॅरिओटाईप, तर उजवीकडे SKY):
पुरूष:
स्त्री:
![](https://lh3.googleusercontent.com/-Cwbv4GE4-gw/T_WYMNC1EiI/AAAAAAAABzA/BqALNzteo4I/s640/XX%2520karyotype.jpg)
5 Jul 2012 - 7:35 pm | सुनील
कालच ठाण्यातील एका गायनॅकोलॉजिस्ट मित्राशी फोनवर बोलणे झाले. विषय अर्थातच सध्या चर्चिला जाणारा स्त्रीभ्रूण हत्या, सोनोग्राफी सेन्टर्स इत्यादि. त्यानेही सांगितले होते की, सोनोग्राफी हा लिंग ठरविण्याचा खात्रीशीर उपाय नाही. १००% खात्री फक्त रंगसूत्रांच्या चाचणीनेच देता येते. अर्थात गर्भाच्या बाबतीत ही चाचणी त्याच्या बाजूकडील द्रव काढून करता येते. (अशी सोय (आणि परवानगी) ठाण्यातील फक्त २ ठिकाणी आहे).
बाकी ज्याने हे विडिओ शूटींग केले त्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
5 Jul 2012 - 7:37 pm | कवितानागेश
खात्रीशीर' चाचणीसाठी सुविधा नाही हा भंपकपणा आहे!>
हा भंपकपणा नसेल.
आतमध्ये 'काहीतरी' शिजत असेल.
कदाचित 'लोकांसमोर' नक्की काय 'सत्य' ठेवायचे, यासाठी 'मांडवली' होत असण्याची शक्यता आहे.
इतका वेळ कशाला लागतोय एक साढीशी गोष्ट ठरवायला.
अवांतरः ते 'लाय डीटेक्टर' मोडले का? आत्ता का वापरत नाहीत?
काही गुन्हा झाला आहे की नाही हे देखिल कळेल.
5 Jul 2012 - 9:08 pm | मन१
शंका अवांतर ठरु शकेल:-
लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर हे XY क्रोमोझोम्सचे लफडे बदलते काय? म्हणजे शरीरातील सर्व पेशी आजवर होत्या त्यापेक्षा एकदम वेगळे गुणधर्म दाखवू लागतात काय?
तसेही लिंगबदल जमले म्हणून हर्षवायू झाल्यासारखे अचानक जाहिरात करीत सुटलेल्या मिडियातील कित्येक जण लिंगबदल हा काही खरोखरिचा स्त्रीचा परिपूर्ण पुरुष किंवा पुरुषाची परिपूर्ण स्त्री बनवू शकत नाहित हे कधीच सांगत नाहीत, गैरसमज पसरतील इतकेच ते सोयीने बोलत राहतात.
5 Jul 2012 - 10:48 pm | बहुगुणी
लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर XY / XX रंगसूत्रांमध्ये काहीही बदल घडत नाही. ही gender reassignment शस्त्रक्रिया म्हणजे फक्त बाह्य लिंग आणि त्याला जुळणार्या अंतर्गत नलिकांमध्ये शल्यक्रियेने घडवून आणलेला physical बदल (थोडक्यात, फक्त 'प्लंबिंग' बदलतं!), या physical बदलाचा मूळ genetic characters वर काहीही परिणाम होण्याचं कारण नाही. पण इथे अर्थात् हे लक्षात घेतलं पाहिजे की बरेचदा मुळात असे लिंगबदल करावेसे वाटणं हा रंगसूत्रांमधल्या परिस्थितीचाच परिपाक असतो.
थोडं संबंधितः Androgen insensitivity syndrome (AIS) या नावाने ओळखल्या जाणार्या वैद्यकीय परिस्थितीतील व्यक्तिंमध्ये 46XY (म्हणजे genetically पुरुष) अशी रंगसूत्र-रचना असूनही शरीरात निर्माण होणार्या टेस्टेस्टेरॉन (testesterone) या पुरूष हॉर्मोनला त्यांच्या पेशी प्रतिसाद देत नसल्याने त्या व्यक्ति स्त्री म्हणून वाढतात आणि जगतात. अशा AIS प्रकारच्या शांती सुंदरराजन या महिला अॅथलीट वर २००६ साली आशियाई खेळांमध्ये मिळवलेलं रौप्य पदक परत करायची वेळ आली होती.
AIS या स्थितीत ओळखल्या गेलेल्या या काही स्त्रिया; यांपैकी कुणी रस्त्यावर भेटली तर ती स्त्री नाही हे म्हणायची निदान माझी तरी हिंमत नाही!
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c0/Orchids01.JPG/238px-Orchids01.JPG)
इथे एक महत्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो: आपल्यापैकी बहुतांश सामान्य लोक आपापल्या आई-बापांनी, वडिलधार्यांनी आणि डॉक्टरांनी सांगितलेलं लिंगनिदान आपल्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी मान्य करतो, कुठलीही शास्त्रीय कॅरियोटायपिंग परीक्षा न करता. किंबहुना, AIS सारख्या इतर अनेक अनुवांशिक परिस्थितींचं ज्ञान, त्या त्या परिस्थितीत जन्माला आलेल्या लोकांना अर्ध / पूर्ण आयुष्य संपेपर्यंतही होत नाही. आणि बरेचदा त्यांच्या आयुष्यात त्याने काही दुष्परिणामही होत नाहीत, अज्ञानात आनंद, असं म्हणायचं का? जोपर्यंत दुष्परिणाम दिसत नाहीत तोपर्यंत तसं म्हणायला हरकत नाही.
6 Jul 2012 - 9:32 am | ऋषिकेश
अनेक आभार. फक्त पुरुष म्हणजे XY आणि स्त्रीया म्हणजे XX या गोष्टी शाळेतल्या पोर्शनमधून गाळलेल्या धड्यात होत्या (म्हणूनच वाचल्याने) इतकेच आठवतेय.
डॉस्पिटल बघा काय म्हणतेय
There was ambiguity in the reports we got. We don't have the facilities for chromosome and hormone tests. We did the ultrasonography, but all the tests could not be done
मात्र मिपाकरांच्या माहितीनूसार जर chromosome and hormone tests करणे हे इतके सोपे असेल तर पाणी इतरत्र मुरत असावे असे मानायला जागा आहे.
5 Jul 2012 - 7:21 pm | गणपा
झाल्या प्रकाराचा तिव्र निषेध.
अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणा प्रसंग.
5 Jul 2012 - 7:30 pm | परिकथेतील राजकुमार
अशा प्रामाणिक मुलीला अशी वागणूक ?
ह्याचे परिमार्जन म्हणून, ह्या वेळी पेस बरोबर मिक्स डबल्स आणि मेन्स डबल्स अशा दोन्ही विभागात पिंकीला खेळवावे. स्टॅमीना उरल्यास लेडीस डबल्सला सानीया आहेच.
6 Jul 2012 - 12:50 am | संजय क्षीरसागर
ती स्वतःला पिंकी म्हणतेय ना? मग झालं तर... जीनं रेपची कंप्लेंट केली तिची चाचणी व्हावी असा मिपातर्फे प्रस्ताव ठेवतो.
5 Jul 2012 - 9:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पिंकी प्रामाणिक स्त्री आहे की पुरुष हे वैद्यकीय चाचण्यांनीही ठरविता येईना, हे मला न उमगलेलं कोडं आहे.
पिंकी प्रामाणिकला सामान्य लक्षणांनी स्त्री किंवा पुरुष ठरविता येईना तेव्हा बहुगुणी म्हणतात तसं आता गुणसुत्रांच्या आधारे ती स्त्री आहे की पुरुष ठरवावे लागेल. दोन चाचण्या झाल्या तरी अजूनही काही निष्कर्ष निघत नाही, याची तर कमाल झाली. गुगलुन असं कळतं की अशा चाचणीचा निकाल काहीच मिंनिटाचा असतो.
पिंकी स्त्री की पुरुष हे ठरविण्यासाठी इतका वेळ लागतोय त्यामागे नक्की काहीतरी दडलेलं असावं असं वाटतंय. बाकी, माध्यमांकडून वार्तांकनाबद्दल न बोललेलं बरं.
-दिलीप बिरुटे
6 Jul 2012 - 9:33 am | ऋषिकेश
खरे आहे. पिंकीच्या टेस्टच्यावेळी A medical team comprising a radiologist, a gynaecologist, a psychologist and an anatomist इतकेजण उपस्थित असूनही निदान झाले नाही हे आश्चर्यकारक आहे.
6 Jul 2012 - 1:20 pm | चिगो
"जबाबदार पत्रकारीता" हा काय प्रकार आहे? असली कुठलीही गोष्ट मिडीयाला ऐकून तरी माहीत आहे का? हे प्रश्न पडण्याचे कारण की आजकाल चाललेल्या मिडीयाच्या धिंगाण्यात काहीच नवीन नाही. चीड आणणारी, जबाबदारी सोडाच, साधी माणूसकी नसलेली जिवघेणी स्पर्धा आहे मिडीयावाल्यांची. मग ते कुठल्याही आप्त गमावलेल्या व्यक्तीला "अब आप कैसा महसूस कर रहे है?' हे विचारणे असो, आरुषी केसमधे " आरुषी-हेमराज के संबंधों का नाट्य रुपांतरण" असो, किंवा पिंकी असो.. चीडच नाही तर घृणा येईल, असे वर्तन असते मिडीयावाल्यांचे..
आणखी एक गोष्ट म्हणजे हे लोक स्वयंघोषित "जानकार" असतात. म्हणून मग कोणीही अंटू-बंटू "इस विषय पर अपने विचार" सांगत सुटतो.. अरे चोलन्या, आम्ही काय मुर्ख आहोत का, की आम्हाला काय चाललंय हे कळणार नाही? बातम्या द्या ना, अक्कल कशाला पाजळताय? म्हणून मग टैमपास करायचा असेल तर बाकी न्युज चॅनल्स आणि बातमी आणि माहीती मिळवायची असेल तर गुड ओल्ड दुरदर्शन, हे माझं सुत्र आहे..
बाकी, बहुगुणी आणि मृत्युन्जयशी सहमत..