किल्ले विसापूरः एक भन्नाट अनुभव

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
12 Jun 2012 - 7:02 pm

किल्ले विसापूर, पवनमावळच्या संरक्षक दुर्गचौकडीपैकी एक. चौकडीमध्ये आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात उंच. चहूबाजूंनी कातळकड्यांचे नैसर्गिक संरक्षण असलेला पुराणपुरूष.

भटकायला जायचा प्लान अचानक ठरला तो रात्री आलेल्या मित्राच्या एका फोनमुळे. सकाळी ९ वाजता मळवली स्टेशनावर पुणे लोणावळा लोकलमधून उतरलो. कुठे जायचे हे नक्की नव्हतेच. शेवटी भाजे, कार्ले, लोहगड ही असंख्य वेळा जाणे झालेली ठिकाणे वगळून विसापूर गाठायचे ठरले. लोहगडावर तर २०/२५ वेळा जाणे झालेले आहे पण त्याचाच जुळा भाऊ असलेल्या विसापूरला मात्र एकदाच आणि तेही बर्‍याच वर्षांपूर्वी गेलो होतो. विसापूर तीन वाटांनी गाठता येतो.एक वाट लोहगड आणि विसापूर यांमधील गायमुख खिंडीवरून जात फुटक्या तटबंदीतून वर चढते जी आता बरीच रूळलेली आहे. विसापूरला येणारे बहुतेक भटके याच वाटेने वर चढतात. भाजे लेण्यांवरून दुसरी वाट ओढ्याच्या मार्गाने जाते, तर तिसरी वाट पाटण गावातून वर जाते. दुसरी आणि तिसरी वाट वरच्या पठारावर एकत्र होऊन विसापूरच्या पूर्वीच्या राजमार्गाला भिडते. या दोन्ही वाटा आता बुजल्या आहेत.

मळवलीवरून आम्ही डावीकडच्या पाटण गावातल्या वाटेने किल्ल्यावर जायचे ठरवले. गावाच्या अलीकडेच एक पायवाट उजवीकडच्या पठारावर चढत चालली होती त्यावाटेने निघालो. सुरुवातीलाच जमिनीतून बाहेर येणारे फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीसच दिसणारे लालचुटूक रेशमासारखे दिसणारे मृगाचे किडे नजरेस पडले. जगोजागी तुरुतुरु धावणारे खेकडेसुद्धा होतेच.

१ मृगाचे किडे.

२. मृगाचे किडे

आता इथून असंख्य ढोरवाटा फुटत होत्या. नक्की कुठली वाट वर जाते काहीच कळत नव्हते. जी वाट बरी दिसेल त्यावाटेने आम्ही पुढे निघालो. चालता चालता मनसोक्त गप्पा चालूच होत्या. पक्ष्यांचा किलबिलाट, मध्येच तांबटाची कुटुर्र् कुर्र अशी साद ऐकू येत होती. आता करवंदाची जाळी चालू झाली होती. रानमेवा खात खात आम्ही तसेच पुढे जात होतो. आता पायवाटा बुजून दाट झाडीत शिरत होत्या आणि आम्हाला वाट चुकल्याची जाणीव झाली. आता परत मागे फिरण्यात अर्थच नव्हता तेव्हा जाळीतून तसेच पुढे चालत राहिलो. आतापर्यंत हात, तोंड, मान, पाठ सगळे काही ओरबाडून रक्ताळून गेले होते. शेवटी एका सुकलेल्या ओढ्यापाशी आलो. आकाशात ढगांचे आच्छादन असल्याने दमछाक अशी फारशी झाली नव्हती पण वाट काही सापडायला तयार नव्हती. शेवटी ओढ्याच्या उजवीकडेने जात जात करवंदाच्या जाळीतून कारवीच्या गच्च रानात घुसलो. कारवीला धरून धरून वर जात जात पुन्हा करवंदाच्या जाळीत. जवळजवळ दीड दोन तास तसेच त्या भयाभया रानात घुमत होतो.

३. पाटण गावातून दिसणारा विसापूर (उजव्या कोपर्‍यातल्या नाळेतूनच गडावर जायची वाट आहे.)

४. सुरुवातीची पायवाट

५. जाळीआड बंद झालेल्या वाटा

६. कारवीच्या गच्च रानात वाट शोधणारा प्रसाद.

शेवटी सर्वच मार्ग खुंटल्याचे पाहून श्री. विजय उचाडेंना फोन लावला. विसापूरच्या जंगलात अडकलेल्यांसाठी ते रेस्क्यू ऑपरेशनचे काम करतात. त्यांनी वाट नीट समजावून दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही विसापूरच्या कातळाच्या उजवीकडून वर वर जायला हवे होते. तसेच त्या बंबाळ्या रानातून आम्ही एक दिशा धरून कातळाच्या दिशेने चढायला सुरुवात केली. मध्ये दोन तीन वेळा त्यांना फोन करून वाटेची खात्री करून घेतली. जाळीतून ओरबाडून घेत, सरपटत अखेर एका बर्‍यापैकी पायवाटेला लागलो. त्यावरून जाता जाता आता अचानकच आम्ही मोकळवणात आलो. आता उजवीकडे भलेमोठे प्रशस्त पठार आणि त्यावर कातकरींची घरं दिसली आणि विसापूरच्या मुख्य कातळाला अगदी सामोरेच गेलो. आता तिथून एक प्रशस्त पायवाट किल्ल्याकडे जात होती.

७. किल्ल्याची मुख्य वाट

८. नजीकच्या पठारावरची कातकरी वस्ती.

गडाची कातळभिंत उजवीकडे ठेवून ती पायवाट जुन्या कोरीव पायर्‍यांना भिडली. इतक्यात अचानक अंधारून आलं, रौद्र आवाज करत सोसाट्याचा वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. रिमझिम थेंबांचे थोड्याच वेळात मुसळधार पावसात रूपांतर झाले आणि आम्ही चिंब चिंब झालो. पाऊस थांबायची काही लक्षणे दिसेनात म्हणून मग कॅमेरा, मोबाईल सॅकमध्ये टाकून कोरीव पायर्‍यांवरून आम्ही नाळेच्या वाटेला लागलो. इथे तटाचे काही अवशेष आहेत. व मोठमोठ्या दगडांचा अगदी खच पडलेला आहे. त्या दगडांवरून कसरत करत पावसात भिजतच गडाच्या राजमार्गाला लागलो. थोड्याच वेळात खडकात खोदलेल्या दोन प्रशस्त गुहांचे दर्शन झाले. गुहेच्या प्रवेशद्वारावरच मारूतीची एक अतिशय देखणी मूर्ती कोरलेली आहे. वीरासनात उभा असलेला हा मारूती मी पाहिलेल्या गडांवरच्या मारूतीच्या शिल्पांमध्ये सर्वात देखणा ठरावा. त्याचे केस बांधलेले आहेत, गळ्यांत पदक रूळत आहे, हातापायांत तोडे आहेत, कमरेला मेखला आणि शेल्याचा पायघोळ पदर आहे, एक भलीमोठी पुष्पमालाही त्यांच्या अंगावर रूळत आहे, खांद्याला तलवार लटकलेली असून एक हात कटेवरी तर एक हात अभयदान दिल्याच्या मुद्रेत आहे, पायांतळी एक राक्षस चिरडलेला असून फुललेली शेपूट मस्तकावर अगदी छत्रासारखी उभी राहिलेली आहे. अज्ञात कारागिरांनी अगदी निगुतीने हे शिल्प कोरलेले आहे.

९. प्रवेशद्वारावरचा वीर हनुमान

१०. वीर हनुमान

११. भली प्रशस्त खोदीव गुहा.

हे शिल्प नक्कीच शिवकालीन आहे. पण ह्या शिल्पाच्या बाजूच्या खोदीव गुहा मात्र आपल्याला थेट २००० वर्षांच्याही मागे नेतात. खडकात अंतर्भागात खोलवर गेलेल्या ह्या गुहांचे खोदकाम सातवाहनकालीन, छिन्नी, हातोड्यांनी तासून काढलेल्या त्यांच्या खुणा आजही दिसून येतात. आता गडाच्या तितक्याच जुन्या, आजही उत्तम स्थितीत असलेल्या कातळकोरीव पायर्‍या आम्हाला थेट गडमाथ्यावर घेऊन गेल्या. गडमाथा धुकटाचे आवरण घेऊनच बसला होता. गडमाथ्यावर प्रवेश करताक्षणीच एक प्रचंड तोफ जमिनीवर पडलेली आहे. गडाच्या उजवीकडे किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आणि शिबंदीची घरटी आहेत. गडाचा विस्तार प्रचंड आहे. नुसती संपूर्ण तटबंदीला फेरी मारायची म्हटली तरी २ तास हवेत. गडावर पाण्याची विपुल टाकी आहेत आणि मारूतीच्या५/६ मूर्ती आहेत, महादेवाचे एक छोटेखानी मंदिरही आहे. मुसळधार पाऊस आणि ढगांमुळे कमी झालेली दृश्यमानता यामुळे फारसे फोटो काढता आलेच नाहीच.

१२. कातळकोरीव पायरी मार्ग

लोहगडाचे मुख्य आकर्षण हे त्याचे भरभक्कम दरवाजे तर विसापूरचे प्रमुख आकर्षण म्हणजे इथली अखंड तटबंदी. जवळ जवळ संपूर्ण किल्ला ह्या तटबंदीने मजबूत केला आहे. जागोजागी बुरुज आहेत. चढउतार कराण्यासाठी पायर्‍या आहेत, मारगिरी करण्यासाठी जंग्या आहेत. ३/४ फूट रूंद असलेल्या ह्या तटावरून गडाला सहजी फेरी मारता येते. अर्थात हे तटबंदीचे काम शिवकालातच झाले आहे.
गडावर ऐन तटानजीक एक गोलाकार बुरुज आहे. भोवताली चर खोदलेला आहे. तोफ फिरवण्यासाठीची ही योजना.

१३. प्रशस्त तटबंदी

१४. आम्ही आलो तो जंगलझाडीतला रस्ता आणि डावीकडच्या खालच्या कोपर्‍यातली नाळेची वाट.

१५. किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष.

१६. भरभक्कम बुरुज

१७. तटाबुरुजांच्या भिंती

१८. विसापूराचे प्रशस्त पठार, पाठीमागे लोहगड

१९. गडाच्या कातळभितींमधून खळाळणारे निर्झर

गडाचा इतिहास शोधू जाता तो थेट सातवाहनकाळात जातो. विसापूरातल्या पोटातल्या भाजे लेणी, नजीकच्या बेडसे लेणी इतक्या जुन्या, तर त्यांचे संरक्षण करणारा हा दुर्ग त्यापेक्षाही अधिक प्राचीन असलाच पाहिजे. किल्ल्यावर सातवाहन शैलीत खोदलेली जमिनीच्या अंतर्भागात गेलेली पाण्याची टाकी आहेत. शिवाय सर्वात महत्वाचे काही टाक्यांवर चक्क ब्राह्मी लिपीतले शिलालेखच कोरलेले आहेत. मुसळधार पावसामुळे ते आम्हाला सापडू शकले नाहीत. जुन्या कागदपत्रांत गडाला दिल्ली दरवाजा- जिथून आम्ही आलो तो आणि कोकण दरवाजा- जो लोहगडाच्या बाजूने उतरतो तो अशा दोन प्रवेशमार्गांचे उल्लेख आहेत. पुरंदरच्या तहात लोहगडाबरोबरच विसापूरही मोंगलांच्या ताब्यात गेला. आग्र्याहून सुटकेनंतर तो लगेचच स्वराज्यात परत घेतला गेला. नंतर कान्होजी आंग्र्यांनी गडाचा प्रतिपाळ केला. सन १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरच्या वरवंट्याखाली भरडून निघत गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगडपण सोडून गेले. आजच्या किल्ल्याच्या भग्न, बुजलेल्या वाटा ही इंग्रजांचीच कृपा.

आता आम्ही कोकण दरवाजाने उतरायचे ठरवले. इथून लोहगडाचे अतिशय वेधक दर्शन होते. ह्या वाटेच्या सुरुवातीसच काही पाण्याची टाकी आणि खोदीव गुहा आहेत. इथून फुटक्या तटबंदीतून एक दगडधोंड्यांनी भरलेला तीव्र उतार विसापूरची कातळभिंत संपवून खालच्या गायमुख खिंडीत घेऊन जातो. दगडांवरची ती उतरण थोड्याच वेळात पदरातल्या दाट झाडीत घेऊन जाते. दाट झाडीतून थोड्याच वेळात आम्ही किल्ल्याची ती पायवाट उतरून लोहगड आणि विसापूर यादरम्यानच्या गायमुख खिंडीत पोहोचलो. तेव्हा संध्याकाळाचे चार वाजले होते. पाऊसही थांबला होताच. थोडावेळ तिथे बसकण मारून आम्ही आता किल्ल्याचे खालचे पठार उतरायला सुरुवात केली. लोहगडाला येणारी ही वाट जीप जाईल इतकी प्रशस्त असून अत्यंत मळलेली आहे. इथून उतरताना विसापूर आणि लोहगडाचे विविध कोनांतून होणारे दर्शन अतिशय सुखद भासते.
उतरत असतानांच भाजे लेणी त्याच्या भव्य चैत्यगृहासह सामोरी येते. चैत्य, त्याच्या बाजूचे विहार, लहान लहान स्तूपांची कोरीव ओळ असे ठळकपणे नजरेस येते.

२०. कोकणदरवाजानजीकची पाण्याची सातवाहनकालीन टाकी.

२१. नजीकच्या खोदीव गुहा.

२२. दगडधोंड्यांचा तीव्र उतार

२३. फुटक्या तटबंदीमागे दडलेला गडाच्या अंगचा मूळचा कातळ

२४. पदरातली दाट झाडी

२५. विसापूराची कातळभिंत

२६. लोहगडाचे दरवाजे

२७. विसापूरचे एक आगळेच दर्शन

२८. पश्चिमेकडची तटबंदी

२९. भाजे चैत्यगृह

३०. कोरीव स्तूपांची ओळ

अर्ध्या पाऊण तासातच पायथ्याच्या भाजेगावात पोहोचलो. भाज्यात पर्यटकांची बर्‍यापैकी गर्दी होती. आता २/२.५ किमीच्या कंटाळवाण्या डांबरी वाटेने जात जात शेवटी एकदाचे मळवलीला पोहोचलो ते विसापूरला पुन्हा परत येण्याचा निश्चय करूनच.

श्री. विजय उचाडे यांचा भ्रमणध्वनी क्रमांकः ९८६०३९६१४१ (त्यांच्या पूर्वपरवानगीनेच)

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

12 Jun 2012 - 7:35 pm | मृत्युन्जय

एक नंबर. जियो वल्लीशेठ

मोदक's picture

13 Jun 2012 - 1:09 am | मोदक

+१ हेच बोल्तो...

अन्या दातार's picture

13 Jun 2012 - 9:41 am | अन्या दातार

+२

सुहास झेले's picture

12 Jun 2012 - 7:36 pm | सुहास झेले

मस्त फटू आणि वर्णन... माझा अतिशय आवडता किल्ला :) :)

ज्यांना पाहून दडपून जायला होईल असे कडे, अभेद्य तटबंदी आणि किर्र रान! सगळं तुझ्या कॅमेर्‍याने मस्त टिपलंय आणि नेहमीप्रमाणे ओघवत्या भाषेत लिहून आमच्यापुढे ठेवलंय! वल्ली धन्यवाद!

हरवलात ना? म्हणूनच सांगितलं होतं, नवीन जागी जाताना कोणीतरी बरोबर असू दे म्हणून!

स्वच्छंदी_मनोज's picture

12 Jun 2012 - 7:59 pm | स्वच्छंदी_मनोज

वल्ली मस्तच लेखन आणी फोटो..विसापूर किल्ला तसा वाट हरवण्यासाठी प्रसिद्धच आहे..

अगदी नॉस्टॅल्जीक केलेत... अनेक वर्षांपुर्वी जुलैमध्ये जेव्हा आम्ही विसापूरला जायचे ठरवले होते तेव्हा असेच पाटण गावावरून सुरु केले होते.. वरच्या पठारावर आल्यावर आम्ही कारवी आणी झाडी मध्ये हरवलो व त्याच वेळी प्रचंड पावसाने आम्हाला झोडपले होते... परत फिरण्याचा आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मला आठवते की आम्ही जाताना ज्या वाटेवर पाऊल भर पाणी होते तेथे आता कंबरभर पाणी होते. काही ठीकाणी आम्ही अक्षरशः पोहून वाट पार केली (हो खरय पोहूनच).. वाटेत विसापूर कड्याखाली काही नैसर्गीक गुहा लागतात त्यान अनेक प्राण्यांची हाडे बघीतल्यावर तर आमची पाचावर धारण बसली होती.. मग कसेबसे प्रची ८ मध्यल्या धनगर वस्तीत पोचलो तिथे आम्हाला त्यांनी गरम दुध प्यायला दिले व लोहगडाच्या वाटेला लावले होते..मग आम्ही विसापूरचा नाद सोडून लोहगडावर गेलो होतो.. (त्याच वस्तीच्या पुढून मोठी गाडीवाट विसापुरच्या पायथ्याने गायमुख खिंडीत जाते)..

परत काही वर्षांनी अजून दोन वेळा विसापूर ट्राय केला पण एकदा परत पावसाने रस्ता चुकवला (ह्या वेळेला आम्ही भाजे लेण्यामागून जायचा प्रयत्न केला होता)..आणी दुसर्‍यांदा मित्राचा पायात गोळे आल्याने परत फिरावे लागले होते..
आता परत बघू कधी योग येतो ते... पुढच्या वेळेला जाणार असाल तर कळवा नक्की जमवता येईल...

अवांतरः ह्या पाटण गावातही काही खोदकाम झालेल्या मानवनिर्मीत लेण्या आहेत अशी माहीती आहे..त्याही बघीतल्या का? तसेच ह्याच पाटण मध्ये राजा रवी वर्मा यांची लिथोप्रेस होती (बहूदा भारतातील पहीली) त्याचेही अवशेष बघीतले का?

नक्कीच जाउयात.

जनावराची हाडं आजही त्या दगडधोंड्यांच्या वाटेवर भरपूर आहेत. चार्‍याच्या मोहापायी कड्यावरून पडतात बिचारे.
पाटण गावातल्या त्या लेण्यांबद्दल काहिही माहिती नव्हती. आता बघायलाच पाहिजेत. शिळाप्रेस पाहिला नाही.
पुढच्या वारीत पाहीनच.

चौकटराजा's picture

14 Jun 2012 - 3:07 pm | चौकटराजा

मी( डोके खायला) तुमच्याबरोबर येतो पण पावसाळा संपल्याची खात्री झाल्यावर ! पण मावळात पावसाची मजाही काही और असते ना ?पण मी म्हातारा हाय ? चालन का तुमास्नी ? नाही म्हणजे मागं राहिलो तर माझी हाडं....... बापरे !

बहोत खुब व्वाव्वा आवडेश :)

किसन शिंदे's picture

12 Jun 2012 - 9:28 pm | किसन शिंदे

वर्णन आणि फोटोज खास वल्ली स्टाईलचे... :)

मालोजीराव's picture

13 Jun 2012 - 3:02 pm | मालोजीराव

वल्ली दि भटकेश्वर....तुझ्या फोटूनचे प्रदर्शन भरवायला हरकत नाई आता !!!

मुक्त विहारि's picture

12 Jun 2012 - 9:34 pm | मुक्त विहारि

आवडले..

जाई.'s picture

12 Jun 2012 - 9:49 pm | जाई.

छान वृत्तांत

गोंधळी's picture

12 Jun 2012 - 10:18 pm | गोंधळी

या किल्ल्यांचे पुर्वीचे वैभव ( महाराजांच्या काळातले) निदान चित्ररुपात तरि कुठे पहायला मिळेल का?
सर्व किल्ल्यांचे नुसतेच अवशेष उरले (सांगाडे)आहेत.

स्वाती दिनेश's picture

12 Jun 2012 - 10:25 pm | स्वाती दिनेश

फोटो आणि वर्णन दोन्ही मस्तच!
स्वाती

पिंगू's picture

12 Jun 2012 - 11:24 pm | पिंगू

माझ्या पहिल्यावहिल्या ट्रेकच्या आठवणी जिवंत केल्यास रे..

- पिंगू

हल्लीचे येणारे जाणारे धागे पहा, मार्तंडभैरवुश्तापिश्तार्णुमदातिल्यदामन भाषेत लिहिलंय तसं काहीतरी लिहा, का उगा आपलं उठायचं, भारतीय रेल्वेची भर घालायची अन जायचं तंगद्या तोडत, एखादा गुरु गिरु बघा तुमच्या ऐरियात, चित्रं काढायला शिका ते नको, मिळाली सुट्टी की चालले डोंगरात.

आणि काय ते त्याच त्याच स्टाइल मध्ये लिहिता ओ, कंटाळा येतो की वाचायला.

असो, कॅमेराची लेन्स वर्षातुन एकदा तरी पुसावी असं म्हणतात, बाकी इथले तज्ञ सांगतिलच, नाही मग पुन्हा रात्र घालवावी लागते तो धुर अन ढग बाजुला करायला.

बाकी तो मारुती थोडा थोडा मायन संस्क्रुतीतला वाटतो का ओ, होय ना.

अवांतर - तुमच्या धाग्यावर या पुढचा प्रतिसाद सप्टेंबर २०१२ मध्ये दिला जाईल.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jun 2012 - 12:09 am | अत्रुप्त आत्मा

बुलंद गडकरी वल्लीमहाराज की जय हो...!

नेहमीप्रमाणेच बारिक सारिक तपशिलवार माहिती वाचायला मजा आली. फॉटू पण चांगले आलेत. मला मारुतराय लै अवडले.

jaypal's picture

13 Jun 2012 - 12:17 am | jaypal

टच लेखात जाणवतो आहे. किप ईट अप :-)

वपाडाव's picture

13 Jun 2012 - 12:55 am | वपाडाव

आम्ही वायदे-आझम जाहलो म्हणौन काय आम्हांस कळविणेही गैरलागु होते काय? याच्चाच खेद आहे...
बाकी, उत्तम चालले आहे असे दिसते...

मी ही विसापूरला दोनदा गेलो आहे. विसापूर मस्तच आहे.. वर्णनही छान जमले आहे.
मी पाचेक वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा बहुदा त्या टाक्यांतील शीलालेखांचे फटू काढले होते.. बघतो मिळाले तर

प्रचेतस's picture

13 Jun 2012 - 10:56 am | प्रचेतस

सहीच रे ऋ.

त्याचे फोटो असतील तर अवश्य अपलोड कर. मला हवेच आहेत.

सुहास..'s picture

13 Jun 2012 - 10:57 am | सुहास..

_/\_

ईंडियाना, लई भारी रे !!

वल्लीशेठचे लेख दर वेळेसच भारी असतात पण यावेळचा लेख निव्वळ अप्रतिम :) जियो गडकरी वल्लीमहाराज की जय!!

चिगो's picture

13 Jun 2012 - 1:34 pm | चिगो

सुंदर वृत्तांत आणि छायाचित्रे.. लगे रहो, वल्लीशेठ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2012 - 1:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्लीशेठ, फोटो आणि वर्णन झकास.

-दिलीप बिरुटे

मस्त फोटु :) बाकी व्रुतांतात कंजुसी का केलीत ?

स्पंदना's picture

14 Jun 2012 - 6:13 am | स्पंदना

२० नंबरच्या फोटोत चक्क ढग उतरलाय टाक्यावर 'जणु पाणी प्यायला"

सुरेख वल्ली . हेवा हेवा वाटतो तुमचा.
मारुती रायांच वर्णन तर लय भारी.

अहो तो क्यामेर्‍यावरचा थेंब असेल कदाचित.

गणेशा's picture

14 Jun 2012 - 1:59 pm | गणेशा

छान एकदम,, वाचुन छान वाटले.

तुम्ही विसापुरला होता तेंव्हा आम्ही लोहगडावर फिरत होतो [:)]

मस्त रे वल्ली.. फोटो दिसले नाहीत पण वर्णन आवडले

जातीवंत भटका's picture

14 Jun 2012 - 3:22 pm | जातीवंत भटका

वाट हरवण्यात जी मजा आहे ... त्याला तोड नाही रे ... जबर्‍या

शिल्पा ब's picture

14 Jun 2012 - 10:02 pm | शिल्पा ब

मस्त. काही वर्षांपुर्वी असं भटकायचं वेड फारसं नसावं किंवा असलंच तर इतरांना माहीती उपलब्ध करुन देण्याचं मिपासारखं साधन नसावं. आता लोकांना समजतंय की कुठे काय आहे, कसं जायचं वगैरे.

जे रेस्क्यु ऑपरेशन करतात त्यांना विचारुन त्यांचा फोन नंबर पब्लिश केला तर बाकीच्या भटक्यांना एक सोय उपलब्ध होईल.

बॅटमॅन's picture

14 Jun 2012 - 10:13 pm | बॅटमॅन

+१.

हेच बोल्तो.

सर्वांचे धन्यवाद.

श्री विजय उचाडे यांचा संपर्क क्रमांक त्यांच्या पूर्वपरवानगीने धाग्यावर प्रकाशित केला आहे.

कान्होबा's picture

2 Nov 2012 - 7:25 pm | कान्होबा

सुंदर वर्णन गडपती आम्हालही सांगा कुठे ही जाताना आम्हालाही फिरायला आवड्ते

कान्होबा's picture

2 Nov 2012 - 7:26 pm | कान्होबा

सुंदर वर्णन गडपती आम्हालही सांगा कुठे ही जाताना आम्हालाही फिरायला आवड्ते

सावकार स्वप्निल's picture

2 Nov 2012 - 7:32 pm | सावकार स्वप्निल

सविस्तर वर्णनातुन मन विसापुर कडे आर्कषित झाले .

आनंद आहे !

मदनबाण's picture

3 Nov 2012 - 8:44 am | मदनबाण

मस्त !
बादवे मॄगाचे किडे पहिल्यांदाच पाहिले !