साहित्य अंगुर रसगुल्ला बनवण्यासाठी:
१/२ लिटर दूध
दीड टेस्पून लिंबाचा रस
३/४ वाटी साखर
दीड वाट्या पाणी
१/२ टीस्पून वेलचीचे दाणे
बर्फ
पत्री खडीसाखर
पाकृ:
जाड बुडाच्या पातेल्या दूध उकळायला ठेवावे.
दूधाला उकळी आली की त्यात हळू-हळू लिंबाचा रस घालणे व सतत ढवळणे.
दूध फाटायला / फुटायला / नासायला लगेल व त्याचे पाणी (व्हे)वेगळे होऊ लागेल. त्यात बर्फाचे खडे टाकून गॅस बंद करावा .
बर्फ पूर्ण वितळला की दूध मलमल किंवा सुती कापडावर ओतून , गाळून घेणे. कापडाला घट्ट पिळून पनीरचे पाणी काढून टाकावे.
थंड पाण्याच्या नळाखाली पुरचुंडी / पोटली धुवावी म्हणजे लिंबाचा वास जाईल.
१/२ तास पुरचुंडी / पोटली टांगून ठेवावी.
१/२ तासानंतर पनीरला एका ताटात काढून चांगले ७-८ मिनिटे मळावे. पनीर अगदी मऊसूत झाले पाहीजे.
थोडे पनीर तळहातावर घेऊन चपटे करा व त्यात पत्री खडीसाखर ठेवा व त्याचा छोटा गोळा बनवा. हलक्या हाताने वळा
एक ही चिर नको. (खडीसाखर चा वापर ऐच्छिक आहे, ती घातल्यामूळे रसगुल्ले आतून पोकळ व हलके होतात, तसेच पनीर चांगले मळले तरी ते हलके होतात)
प्रेशर कुकरमध्ये दीड वाट्या पाणी व वेलची दाणे घालून उकळी काढा. उकळी आली की त्यात साखर घाला व ढवळा.
साखर विरघळली की त्यात तयार केलेले छोटे छोटे पनीर चे गोळे हलकेच सोडा व कुकरचे झाकण बंद करा.
२-३ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा व कुकर लगेच थंड पाण्याच्या नळाखाली धरा म्हणजे वाफ निघून जाईल.
रसगुल्ले तयार होऊन आकाराने दुप्पट झालेले असतील. वेगळ्या बाऊलमध्ये काढून पूर्ण गार होऊ द्या.
साहित्य रबडी /रससाठी:
३ वाट्या दूध
४-५ टेस्पून कंडेन्सड मिल्क
१ टीस्पून वेलचीपूड
१ टीस्पून केशर
पिस्त्याचे काप सजावटीसाठी
उरलेला रसगुल्ल्याचा पाक (गरज पडल्यास)
पाकृ:
दूधातले १/४ वाटी दूध बाजूला काढून ठेवावे .
ते दूध मायक्रोव्हेवमध्ये गरम करुन घ्यावे व त्यात अर्धे केशर घालून मिक्स करावे.
त्यात कंडेन्सड मिल्क घालून एकजीव करावे.
उरलेले दूध उकळवायला ठेवावे. उकळी आली की गॅस बारीक करुन ते घट्ट होईपर्यंत आटवावे.
आता त्यात कंडेन्सड मिल्क व केशर मिश्रीत दूध घालावे व सतत ढवळावे.
गोडपणा कमी वाटत असल्यास रसगुल्ल्याचा पाक आवडीप्रमाणे घालणे. (आमच्यासाठी कंडेन्सड मिल्कचा गोडवा पुरेसा होता.)
हलक्याच हाताने अंगुर रसगुल्ले दाबावे व तयार रबडीत अलगद सोडावे. उरलेले केशर व पिस्ता पण घालावे. ५-७ मिनिटे शिजु द्यावे म्हणजे रस नीट मुरेल .
शेवटी वेलचीपूड घालून मिक्स करणे.
अंगुर रबडी / रसमलाई जरा गार झाली की फ्रिजमध्ये १-२ तास थंड होण्यासाठी ठेवावी.
मग वाट कसली बघताय , मारा ताव ह्या केशर-पिस्ता अंगुर रबडी / रसमलाईवर :)
नोटः
करायला जरी कठीण व वेळखाऊ वाटली तरी तितकी कठीण नाही :)
पनीर थोडे ओलसर हवे व खूप मळावे लागते.
पनीर चांगले मळले तर रवा, मैदा घालायची गरज पडत नाही बाईंडींगसाठी. (घालू पण नका चवीत फरक पडतो)
रसगुल्ले पूर्ण गार झाले की अलगद दाबून आटीव दूधात सोडावे.
प्रतिक्रिया
24 May 2012 - 9:27 pm | प्रचेतस
फार त्रासदायक आहे नुसतेच फोटो पाहाणे.
आता आमरसाच्या दिवसात रसमलाई खाणे आले.
24 May 2012 - 9:35 pm | गणामास्तर
चला, मग आता या विकांताला कुठे जमायचं रस मलाई हाणायला?
25 May 2012 - 8:28 am | निवेदिता-ताई
अर्थातच सानिकाकडे.... :)
24 May 2012 - 9:32 pm | जेनी...
:(
24 May 2012 - 9:34 pm | jaypal
फोटो पाहुन......................................बोलणे खुंटले

26 May 2012 - 6:21 pm | सुहास झेले
अगदी ह्येच म्हणतो..... :)
अवांतर: पारसी डेअरीमधून रसमलाई मागवण्यात आली आहे ;)
24 May 2012 - 9:53 pm | सूड
....जेवलो असलो तरी गोड खावंसं वाटतंय. रेसिपीत म्हटल्याप्रमाणे पनीर तयार व्हायला लागलं की बर्फ टाकण्याचं काही विशेष कारण आहे का ?
24 May 2012 - 10:12 pm | सानिकास्वप्निल
बर्फ टाकण्याचं कारण म्हणजे पनीर जास्तं शिजु द्यायचे नाही (ओव्हर कुक) कारण मग ते रबरासारखं लागतं :)
24 May 2012 - 10:04 pm | अत्रुप्त आत्मा
अता ही रेशिपी मात्र करणारच... त्याशिवाय मुक्ति नाहीच.
24 May 2012 - 10:11 pm | प्रचेतस
मुक्ती का तृप्ती?
24 May 2012 - 10:12 pm | प्रचेतस
मुक्ती का तृप्ती?
25 May 2012 - 12:01 am | JAGOMOHANPYARE
छान
25 May 2012 - 12:26 am | रेवती
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग!
मस्त फोटू. कृतीही चांगली लिहिलियेस.
कंडेन्सड् मिल्कची ट्यूब मिळते हे माहीत नव्हते.
साहित्य छान दिसते आहे.
शेवटच्या फोटूबद्दल मला काहीही म्हणायचे नाहीये.;)
मागल्या विकांताला मैत्रिणीकडे जेवणानंतर हा पदार्थ शेवटी होता.
आधीच पोट भरल्याने खाता आला नाही. ;)
25 May 2012 - 2:11 am | कौशी
आवडली,करून बघणार.
25 May 2012 - 8:29 am | मदनबाण
आहाहा...! :)
25 May 2012 - 8:41 am | पिंगू
आता अंगूर-रबडी किलोने विकत आणावी म्हणतो...
- पिंगू
25 May 2012 - 9:19 am | चिंतामणी
या पुढे सानीकाच्या पाकृ बद्दल एव्हढीच प्रतिक्रीया देण्यात येइल.
धागा वाचण्यात आला आहे.
25 May 2012 - 9:53 am | इरसाल
सहमत.
25 May 2012 - 9:48 am | स्वैर परी
सानिका ताई. छान आणि सोपी आहे क्रुती. वेळखाऊ आहे पण विकांताला करावी ईतपत आटोपशीर आहे. सो.... लेट्स सी! ;)
25 May 2012 - 11:26 am | उदय के'सागर
क्या बात! माझा अवडिचा पदार्थ...
दुकानातुन आणलेली रसमलई कितीहि खाल्ली तरी पोट भरत नाहि... पण अशी घरी केली तर हवी तेवढी बनवता येईल आणि पोटभर खाता येईल. म्हणुन नक्किच बनवुन बघितली जाईल. खुप धन्यवाद हि पाकृ टाकल्याबद्दल आणि ती सोप्पी आहे हे "जाणवुन" दिल्याबद्दल :)
25 May 2012 - 11:39 am | निश
सानिकास्वप्निल जी मस्त रेसिपी
ह्या दाट आटलेल्या दुधात दुध दाट आटत असताना तांदळाच पीठ घातल की झाली फीरनी तयार.
मस्त
25 May 2012 - 11:39 am | सुप्रिया
सुपर्ब! मजा आली फोटो आणि रेसिपी बघायला.
25 May 2012 - 11:54 am | प्यारे१
नुसती बघायची??????
ह्यो अन्य्याव हे! :(
25 May 2012 - 1:42 pm | धनुअमिता
मस्तच. खुप दिवसांनपासुन शोधत होते ही रेसीपी.
नक्की करुन बघेन.
25 May 2012 - 4:35 pm | हसरी
मस्त आणि सोपी पाककृती :-)
नक्कीच करून पाहणार. पण काही शंका आहेत - पहिली म्हणजे रसगुल्ल्यांसाठी दूध फॅटलेस म्हणजे गाईचं घ्यावं का? की म्हशीचं दूध घेतलं तरी चालेल?
आणि दुसरी शंका म्हणजे तुम्ही रबडीत रसगुल्ले सोडून पाच-सात मिनिटे शिजू द्यावे असे लिहिले आहे. पण यामुळे रबडी फाटणार नाही ना? की रबडी रूम टेम्परेचरला आल्यावर रसगुल्ले सोडलेले जास्त चांगले?
26 May 2012 - 3:11 pm | सानिकास्वप्निल
गाईचं दूध वापरावे...कमी स्निग्धांश असलेले त्याने रसगुल्ले मऊसूत होतात. फुल फॅट्स असलेले दूध वापरले तर रसगुल्ले कडक व रबरी होतात.
रबडीत रसगुल्ले सोडून पाच-सात मिनिटे शिजू द्यावे हे बरोबर आहे ...रबडी अजिबात फाटणार नाही कारण पनीर आपण चांगले धुवून, शिजवून घेतलेले आहे आणी पूर्ण गार ही करुन घेतलेले आहेत :) निदान मला तरी तसा अनुभव आला नाही गं :)
धन्यवाद
26 May 2012 - 4:15 pm | हसरी
धन्यवाद सानिका. मी नक्की करून पाहीन आणि चांगले जमले तर इथे फोटो देईन, तुला गुरुदक्षिणा! ;-)
26 May 2012 - 7:55 am | सहज
जर आपले नाव सानिकास्वप्नील, स्वातीदिनेश, मृणालिनी, पांथस्थ, गणपा, कुंदन, (अजुन चार पाच विशेष) इ. नसेल
तर नानक ब्रँडची केशर रसमलाई हा एक उत्तम प्रकार आहे. जवळ कुठे मिळत असेल तर ते शोधावे.
सोपे काम!!
26 May 2012 - 10:15 am | कुंदन
माझे नाव दिग्गज्जांच्या बरोबरीने पाहुन अंगावर किलोभर कॅलरीज वाढल्यात, आता इथे जिम शोधणे आले.
बाकी, पाकृ मी वाचलीनाही अन फोटोही पाहिले नाहित. ;-) उगा कशाला रोज रोज ईनो घ्या.
26 May 2012 - 4:19 pm | हसरी
जर आपले नाव सानिकास्वप्नील, स्वातीदिनेश, मृणालिनी, पांथस्थ, गणपा, कुंदन, (अजुन चार पाच विशेष) इ. नसेल >>>>
हे माझ्या प्रतिसादाला उद्देशून लिहिले आहे का?
इथे पाककृती फक्त सानिकास्वप्नील, स्वातीदिनेश, मृणालिनी, पांथस्थ, गणपा, कुंदन, (अजुन चार पाच विशेष) इ. आयडींनीच लिहाव्यात असा काही अलिखित नियम असेल तर एकवेळ समजू शकते, पण त्यांनी लिहिलेल्या पाककृती बाकीच्यांनी करू बघायचा प्रयत्नही करू नये असा काही नियम आहे का?
26 May 2012 - 12:15 pm | michmadhura
मागे एका मिपावरच्याच सदस्याने दिलेली रेसिपी पाहुन घरी केली होती, छान झाली होती. आता परत करेन ( ते बर्फ घालुन ट्राय करेन आता)
27 May 2012 - 10:38 am | पियुशा
खल्लास ___/\___
आपल्याला नै जमायच ब्वॉ हे अस इतक निगुतीन, त्यापेक्षा पार्सल दे ना पाठ्वून सानिका तै ;)
27 May 2012 - 8:58 pm | जयवी
अहाहा......... अंतरात्मा शांत झाला फोटो बघूनच :)
नक्की करुन बघेन आता.
27 May 2012 - 9:22 pm | बिपिन कार्यकर्ते
कंट्रोल गेलाच शेवटी! :(
29 May 2012 - 8:47 am | निवेदिता-ताई
खडीसाखरेची आयडीया छान आहे....:)
29 May 2012 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार
काय लोभसवाणी पाकृ आहे साला !
असो..
आता इकडे पत्री खडीसाखर शोधणे आले.
1 Jun 2012 - 4:31 pm | गोंधळी
वा झक्कास
फो टो बघुन तोंडाला पाणी सुटले.........
4 Jun 2012 - 4:44 pm | मृगनयना
करून पहिली , खूपचं छान झाली . धन्यवाद पाकृ बद्दल ....
22 Feb 2015 - 7:20 pm | सखी
सानिका सुरेख पाकृ. काल वेळ होता म्हणुन ह्या पाकृचा घाट घातला तशी किचकट वाटेल असे वाटत होते, पण इतकी सोपी करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद. घरातील सर्वांना आवडली इतकी फोटो काढायलापण शिल्लक नाही राहीली.