मी किल्ल्यांवर का भटकतो ?

जातीवंत भटका's picture
जातीवंत भटका in भटकंती
17 May 2012 - 10:05 am

खरं सांगायचं तर या उत्तराच्या शोधात मी सुद्धा आहे. त्यामुळेच हा प्रश्न विचारणार्‍या व्यक्तीबद्दल मला प्रचंड सहानभूती वाटते . आत्तापर्यंतच्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम मी या सह्याद्रीवर केलं, त्याच्या अंगाखांद्यावर पहुडलेल्या किल्यांवर केलं. (मला खात्री आहे माझ्या या विधानाचं, माझ्या बायकोलाही वाईट वाटणार नाही. ती ही माझ्यासारखीच भटकी आहे !) गेल्या सोळा वर्षांत अनेक किल्ल्यांच्या, घाटवाटांच्या अनेकदा वार्‍या केल्या. कोणताही किल्ला कितीही वेळा पाहिला असला तरी परत तिथे गेल्यावर तो वेगळाच का भासतो ? हे एक प्रकारचं गूढ आहे माझ्यासाठी.

सह्याद्रीच्या सगळ्या भेटी कायमच अविस्मरणीय असतात. वर्षांतले कित्येक दिवस मी भटकंतीच्या आखण्या करण्यात, नकाशे धुडाळण्यात, भटकण्यात, त्यांच्या चित्रमय आठवणीत घालवतो. हे मोजणंही हल्ली सोडून दिलं आहे. महिन्यात किमान तीनवेळा तरी सह्याद्रीत भटकावं असा अट्टाहास असतो. (प्रत्येक वेळेस तो पूर्ण होतोच असं नाही).

मनात येईल त्यावेळी, हाताला येतील त्या गोष्टी सॅकमधे कोंबायच्या आणि निघायचं. अनेकदा तर कुठे जायचं हे ही ठरलेलं नसतं, मग अशावेळी माझ्या सगळयात जवळच्या स्नेह्याकडे आपोआप पावले वळतात . तो स्नेही म्हणजे राजगड ! माझां सखां, जीवलग! अजूनही विशेषणे लावता येतील पण ती ही कमीच . त्याच्या सानिध्यात सगळ्या जगाचा विसर पडतो. शिवबांच्या हयातीतील उणीपुरी चोविस वर्षे पाहिलेल्या या राजगडाबद्द्ल प्रचंड जिव्हाळा तर आहेच पण थोडा मत्सरही आहे. अजूनही त्या इतिहासाचं अस्पष्ट अस्तित्व जाणवतं मला राजगडावर. पावसाळ्यातल्या शनिवार रविवारी शक्यतो राजगड, तोरणा, राजमाची, तिकोना, मढे घाट, गोप्या घाटात आमचा मुक्काम :)

राजमाचीशी माझी एका वेगळ्याच संदर्भात नाळ जोडली गेली आहे. गो.नि.दां ची "माचीवरला बुधा" ही राजमाचीवरची कथा वाचल्यापासून कमालीची अस्वस्थता होती. त्यानंतर तो बुधा कधीतरी दिसेल या भाबड्या आशेतून पंचवीस ते तीस वेळा राजमाचीवर वेड्यासारखा भटकलो. त्याच्या खोपटाच्या जागेजवळ अनेक रात्री जागून काढल्या. अजूनही मी राजमाचीवर जाताना तीच वेडी आशा बाळगून असतो. माचीवरच्या बुधाचा शेवट वाचताना अंगावर आलेला शहारा आणि त्याच वेळी डोळ्यात आलेलं पाणी अजूनही तितकंच अस्वस्थ करतं.

नक्की काय करतो मी या भटकंतीत ? कधी रात्री बारा-एक च्या सुमारास घर सोडून एस्.टी. पकडणं, कधी एस.टी. स्टँडवरच पथार्‍या पसरून सकाळच्या पहिल्या गाडीची वाट पहाणं, किल्ल्यांच्या वाटा हुडकणं, त्या बर्‍याचदा चुकणं, कधी कुठल्या गडाचे राकट कडे लांघणं, कधी घाटवाटांच्या गर्द झाडोर्‍यातून तळकोकणात उतरणं, कधी कोण्या तटावर पाय सोडून सैराट वारा छातीत भरणं, रायगडावरच्या सूर्यास्ताच्या एका नेमक्या क्षणासाठी दोन दोनशे फोटो काढणं, कधी एखादया अवखळ ओहोळावर पालथा पडून थंडगार पाण्याने तहान भागवणं, कधी कोसळत्या पावसात चिंब होणं, कधी कुठल्या ओढ्यात, डोहात यथेच्छ डुंबणं, पावसाच्या सरींचे कर्णमधूर संगीत चहाच्या घोटांसवे ऐकणं, कधी कुठल्या धूर भरल्या गुहेत चुलीवर काही बाही शिजवणं, कधी एखाद्या किल्ल्यावरच्या मंदीरासमोरील ओसरीवर उताणं पडून आकाशातलं चांदणवैभव न्याहाळणं, गडमाथ्यावर पोहोचल्यावर क्षत्रियकुलावतंसच्या घोषणेनंतर अंगावर आलेले शहारे अनुभवणं, रात्रीच्या शेकोटीसमोर बसून भूताखेतांच्या गोष्टी सांगणं, शिवथरघळीतल्या जलप्रपाताचे शिंतोडे झेलत मनाचे श्लोक म्हणणं, कधी कोण्या गडावर महाराजांच्या सदरेसमोर नतमस्तक होणं, कधी पावनखिंडीत बाजींच्या बलिदानाच्या स्मरणात नकळत गालावर ओघळलेले अश्रू पुसणं, कधी वैराटगडावर फुटलेल्या तोफगोळ्यांचे कपचे हुडकणं, कधी रात्रीच्या अंधारात राजमाचीची वाट तुडवणं, अन् कधी गो.नि.दां. च्या कादबंर्‍यांतील पात्रं आणि त्यांचे संदर्भ धुंढाळत फिरणं.. या सगळ्यातून काय मिळतं ?? समाधान! एक वेगळ्याच प्रकारचं, अनाकलनीय, गूढ आणि हे गूढ जितकं अनाकलनीय तितकंच जास्त आनंददायी आहे, हवंहवंस आहे, मनाची मरगळ दूर लोटणारं आहे.

पण तरीही मी म्हणेन की , मी किल्ल्यांवर का भटकतो याचं उत्तर अजूनही शोधतोच आहे. आणि मला ते इतक्या सहज मिळू नये असंच वाटतं, जेणेकरून माझ्या भटकंतीत कधीही खंड पडणार नाही !

--
जातीवंत भटका

राजगड

राजमाची

केंजळगड

कलावंतीण सुळका

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 May 2012 - 10:18 am | मुक्त विहारि

पण फोटोही टाका...

जरा आम्हाला पण आस्वाद घेवू देत.

जातीवंत भटका's picture

17 May 2012 - 10:36 am | जातीवंत भटका

फोटो डकवले आहेत ..

--
जातीवंत भटका

मुक्त विहारि's picture

17 May 2012 - 10:52 am | मुक्त विहारि

धन्यवाद...

छान आले आहेत फोटो..

प्रचेतस's picture

17 May 2012 - 10:19 am | प्रचेतस

मस्त मस्त मस्त.

बॅटमॅन's picture

17 May 2012 - 10:44 am | बॅटमॅन

मस्ताड!!!!

शैलेन्द्र's picture

17 May 2012 - 10:52 am | शैलेन्द्र

छान.. अगदी मनातल लिहीलय्सं..

नन्दादीप's picture

17 May 2012 - 10:53 am | नन्दादीप

शेवटून दुसरा..... अप्रतिम रंगांची उधळण....

खरच हेवा वाटतो तुमचा....

हेच म्हणतो.
अप्रतिम फोटो आहे.

सूड's picture

17 May 2012 - 2:15 pm | सूड

+२

रानी १३'s picture

17 May 2012 - 10:55 am | रानी १३

खुपच छान........हेवा वाटतो

पियुशा's picture

17 May 2012 - 11:00 am | पियुशा

सुपर्ब !!!!!!!!!!! क्लास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स फोटो़ज
पावसाळ्यातले तर अगदी जन्नत जन्नत असेल सगळि़कडे :)

आयुष्य म्हणजे एक सांजवेळ, नानाचा अंगठा, क्षितिजावरचा सूर्य आणि जिवलग मित्र.
आयुष्य म्हणजे रायगडचे टकमक टोक, अंगाला झोंबणारा गार वारा आणि निस्तब्धता.
आयुष्य म्हणजे मेंगाई देवीच मंदिर, पौर्णिमेची रात्र आणि शाळेतले सवंगडी.
आयुष्य म्हणजे जीवधनचा कातळकडा,मधेच अडकलेले तुम्ही आणि मित्राने स्वत:च्या हातावर पेललेला तुमचा भार.
आयुष्य म्हणजे राजांची समाधी आणि तुमची शून्यातली नजर.
आयुष्य म्हणजे पावनखिंड, हातात उचललेली मुठभर माती आणि डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा.
आयुष्य म्हणजे एक रात्र, चार मित्र , नाणेघाटातील गुहा आणि मुगाची गरमागरम खिचडी.
आयुष्य म्हणजे पहाटेची वेळ, कळसूबाईचा पायथा आणि चहाचा मंद सुवास.
आयुष्य म्हणजे नळीची वाट, कोकणकडा आणि तारामती मंदिर.
आयुष्य म्हणजे बालेकिल्ल्यावरचा सूर्योदय, लंगोटी मित्र आणि मित्राने दिलेली "क्षत्रियकुलावतंस ....." आरोळी.
आयुष्य म्हणजे वासोटा, चुकलेली वाट आणि मावळतीला जाणारा सूर्य.
आयुष्य म्हणजे जंगलातून जाणारी वाट, पानांची होणारी सळसळ आणि कॅमेरा ON करेपर्यंत दिसेनासे होणारे नागराज.
आयुष्य म्हणजे जंगली जयगडचा चढ, पाण्याच्या संपलेल्या बाटल्या आणि घशाला पडलेली कोरड.
आयुष्य म्हणजे माझा सवंगडी हा अफाट सह्याद्री....

__/\__

(चेपूवरून...)

तुम्हाला उत्तर मिळाले तर नक्कीच मला पण द्या.....

अश्याच आपल्या समस्त भटकावळ्यासाठी खास लिंगाण्याचा फोटो

परिकथेतील राजकुमार's picture

17 May 2012 - 12:04 pm | परिकथेतील राजकुमार

आपण साला भटक्याच्या भटकंतीचे आणि फटूचे फॅन आहोतच.

बार बार भटकणारा
परा

कपिलमुनी's picture

17 May 2012 - 2:19 pm | कपिलमुनी

चांदनी बार ??

मी-सौरभ's picture

17 May 2012 - 6:28 pm | मी-सौरभ

नाव काही का असेना पुढे बार असणं म्हत्वाचं.
(आणि हो स्नॅक्स बार नाही चालत)

कवितानागेश's picture

17 May 2012 - 12:29 pm | कवितानागेश

आवडलं. :)
सह्याद्रीतून फिरताना खूप 'रिच' वाटते..........
हा 'आपला' आहे हे जाणवते. घरापासून लांब आलो आहोत असे वाटत नाही. उलट अश्या ठिकाणी निघताना, 'घरी जायचे' अशीच भावना असते..........
महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या जवळपास जन्म झाल्याबद्दल आनंद होतो....

सुमीत's picture

17 May 2012 - 1:10 pm | सुमीत

ह्या प्रश्नाला "एक" उत्तर नाही आहे , आपल्या सारख्या कुठल्याच भटक्या कडे नाही.
दहा वर्षांचा होतो तेव्हा पासून गड्-किल्ले भटकत आहे.
रायगड १० वेळा फिरलो , कर्नाळा आणि ते जंगल किती वेळा फिरलो माहित नाही.
कित्येक वेळा तर "एकला चालो रे" च्या थाटात एकटाच भटकलो आहे.
सहयाद्री चढताना त्याची उंची मनात धडकी घालते, तर त्या उंची वर आणि त्याच्या कड्या वरून खाली पाहताना मनात असतो तो फक्त आनंद.

तू म्हणतोस तसे "समाधान! एक वेगळ्याच प्रकारचं, अनाकलनीय, गूढ आणि हे गूढ जितकं अनाकलनीय तितकंच जास्त आनंददायी आहे, हवंहवंस आहे, मनाची मरगळ दूर लोटणारं आहे."
त्या साठीच आणि त्या साठीच आपण गड्-किल्ले फिरतो आणि फिरत राहणार.

जातीवंत भटका's picture

17 May 2012 - 3:21 pm | जातीवंत भटका

एकट्याने गड किल्ले भटकण्यात खरंच खूप मजा येते, राजगडावर १२ वेळा मी एकटा गेलो आहे. एकदा तर एक अख्खा आठवडा राजगडवर मुक्काम करून साधारण १०० एक किलो प्लॅस्टीक कचरा आणि दारूच्या बाटल्या खाली आणल्या होत्या मी .. रोज २ चकरा मारत होतो .. तरी अजून बराच कचरा शिल्लक आहे. यंदाच्या पावसाळ्यात अशीच एखादी मोहीम करण्याचा बेत आहे.

मी-सौरभ's picture

17 May 2012 - 6:30 pm | मी-सौरभ

कचरा जमवा दौरा कधी काढताय?
तुमच्याबरोबर येता येइल का?

जातीवंत भटका's picture

17 May 2012 - 7:15 pm | जातीवंत भटका

नक्कीच येता येईल. पावसाळ्याच्या थोडं शेवटाला असेल मोहीम. कारण पावसाळ्यात काही नाठाळ लोकं जबरदस्त कचरा करतात.

मी सुद्धा आता गेलो होतो तेंव्हा पद्मावती देवळाच्या बाहेरच्या टाक्यातला सगळा कचरा बाहेर काढून खाली आणला,
जास्त वेळ नव्हताच कारण ९० लोकांना गड फिरवून खाली आणायचे होते त्यामुळे तेवढेच करायला जमले

जातीवंत भटका's picture

18 May 2012 - 11:05 am | जातीवंत भटका

मस्तच ..

मी किल्ल्यांवर का भटकतो ?
मला सुध्दा हा प्रश्न मला फार पुर्वी पडायचा, पण आता मी ह्याचे उत्तर शोधणे मी बंद केले आहे. प्रश्न आपोआप सुटला.

अमृत's picture

17 May 2012 - 2:05 pm | अमृत

सगळेच फोटो जबराट... आणि लिखाणही मस्तच.... अजुन वाचायला आवडेल.

अमृत

श्रावण मोडक's picture

17 May 2012 - 2:06 pm | श्रावण मोडक

गेले जाssssयचे राहून...!

स्वातीविशु's picture

17 May 2012 - 2:21 pm | स्वातीविशु

वॉव्व...... मस्त मस्त फोटो आहेत. विलक्षण हेवा वाटला तुमच्या भटकंतीचा..... :)

तुमच्या गडकील्ल्यांच्या सुंदर सफरी मिपावर अजुन येऊ द्या. :)

जातीवंत भटका's picture

17 May 2012 - 3:17 pm | जातीवंत भटका

धन्यवाद मित्रहो !

यशोधरा's picture

17 May 2012 - 6:56 pm | यशोधरा

भन्नाट, भन्नाट लिहिले आहे! फोटोही अतिशय बोलके आहेत.
माचीवरल्या बुधाबद्दल अगदी, अगदी! :) तो तसा राहू शकला ह्याचाच किती हेवा वाटतो! :)

सोत्रि's picture

17 May 2012 - 7:19 pm | सोत्रि

मस्तच रे!
कधीतरी तुझ्याबरोबर भटकंती करायला मिळेल ह्याची आशा करतो!

- (भटक्या) सोकाजी

फोटू मस्तच आलेत.
वरून तिसरा तर खोटा वाटतोय इतका सुंदर!
तुम्हाला गड किल्ल्यांच्या भेटीदरम्यान काही विलक्षण अनुभव आले असल्यास कृपया लिहा.

स्वाती दिनेश's picture

17 May 2012 - 7:36 pm | स्वाती दिनेश

फोटो फार फार सुंदर... आत्ताच्या आत्ता सॅक पाठीला लावून भटकायला निघावे असे वाटणारे..
स्वाती

पैसा's picture

17 May 2012 - 8:00 pm | पैसा

सगळ्यांनीच फोटोंचं कौतुक केलंय, पण लेखही तितकाच उत्कृष्ट झालाय! मनातलं सगळं इथे उतरलंय! फारच छान!

कौशी's picture

17 May 2012 - 9:15 pm | कौशी

आणि फोटो पण अप्रतिम...

स्वच्छंदी_मनोज's picture

17 May 2012 - 9:55 pm | स्वच्छंदी_मनोज

अगदी मनातले लिखाण...

सह्याद्रीत भटकणे ही एक धुंदी आहे.. जी जडली की सुटता सुटत नाही... आणी ज्याला जडते त्याला ती सोडवायचीपण ईच्छा होत नाही...

मला ह्या धुंदीने अनेक वर्षांपुर्वी गाठलेय.. आता त्या धुंदीतून बाहेर यावेसे वाटत नाही...

कधीतरी एकत्र ट्रेक जमवूयाच.... :)

जातीवंत भटका's picture

18 May 2012 - 9:46 am | जातीवंत भटका

मिपाकर भटक्यांसाठी एक ट्रेक नक्की करुयात या पावसाळ्यात, बरीच मंडळी आहेत तयार.

श्रावण मोडक's picture

18 May 2012 - 1:54 pm | श्रावण मोडक

बरं... आमंत्रणं लावून घ्यायची कशी, हे आम्हाला कळतं. पावसाळ्यात तयारी नाही माझी, पण ठीके...

जातीवंत भटका's picture

18 May 2012 - 3:21 pm | जातीवंत भटका

साधारण सर्व वयोगटातील मिपाकरांना झेपेल असा निवडतो आहे ;)

श्रावण मोडक's picture

18 May 2012 - 3:36 pm | श्रावण मोडक

मेल्या... माझं वय काढतोस? कुठं फेडशील ही पापं? तो माचीवरला बुधा तुला माफ करणार नाही केव्हाही...

जातीवंत भटका's picture

18 May 2012 - 4:07 pm | जातीवंत भटका

तसं नव्हे मालक .. सगळ्यांनाच असं रानावनात भटकायची सवय नसते म्हणून म्हणालो होतो, आणि वयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते कसं आहे बघा .. कोंबडं कितीबी झाकलं तरीबी आरडायचं र्‍हात न्हाई... ;)

किसन शिंदे's picture

17 May 2012 - 11:45 pm | किसन शिंदे

मी किल्ल्यांवर का भटकतो ?

प्रत्येक ट्रेकला निघण्यापूर्वी माझ्या बायकोचा हा ठरलेला प्रश्न असतो, पण त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नसतंच कारण सह्याद्रीच्या सानिध्यात, महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांवर-किल्ल्यांवर फिरताना जे सुख मिळतं जो आनंद मिळतो तो असा शब्दात वर्णन करणं म्हणजे कर्मकठीण काम!

_/\_
बाकी तुझ्या भटकंतीचा आणि तु काढलेल्या गडकिल्ल्यांच्या फोटोंचा तर मी पुर्वीपासूनच पंखा आहे. :)

Maharani's picture

18 May 2012 - 12:09 pm | Maharani

खुपच छान लेख !!

चिगो's picture

18 May 2012 - 7:07 pm | चिगो

अप्रतिम लेख आणि तितकेच अप्रतिम फोटोज.. अगदी मनातून उतरलाय लेख, आणि सरळ मनात उतरलाय. स्साला, तुम्हां भटक्या लोकांचे सह्याद्री आणि गडकिल्ल्यांवर भटकल्याचे फोटो पाहीले, वर्णन वाचले की त्याच्या कड्या-कपारीत न भटकल्याचे आणि त्याच्यापासून दुर येवून पडल्याचे दुखः आणखीच तीव्र होते.. मग जोपर्यंत ते जमत नाही तोपर्यंत तुमच्या लेखांवर भागवतो ब्वॉ..

सखी's picture

18 May 2012 - 10:09 pm | सखी

हेवा, हेवा वाटतो तुमचा.... खरचं खूप नशिबवान आहात! तरीही वर चिगोने म्हटल्याप्रमाणेच..
सह्याद्रीपासून दुर येवून पडल्याचे दुखः आणखीच तीव्र होते.. मग जोपर्यंत ते जमत नाही तोपर्यंत तुमच्या लेखांवर भागवते ब्वॉ..
फोटो आणि लेख दोन्हीही आवडले.

अत्रुप्त आत्मा's picture

20 May 2012 - 2:23 pm | अत्रुप्त आत्मा

शॅल्यूट :-)

अर्धवटराव's picture

29 May 2012 - 10:50 pm | अर्धवटराव

बापजाद्यांनी एव्हढी इस्टेट कमाऊन ठेवली आहे... ती पोरानातवंडांनी ऐय्याशी करावी म्हणुनच ना. मग कशाला असे प्रश्न मनात आणायचे. बरं चाललय कि जे आहे ते.

अर्धवटराव

स्मिता.'s picture

29 May 2012 - 11:55 pm | स्मिता.

लेख आणि फोटू... दोन्ही पण मस्तच! आताच मोठ्या स्क्रिनवर फोटो पाहिलेत, एकदम क्लाऽऽस दिसत आहेत! आणखी फोटो कुठे बघता येतील?

रघु सावंत's picture

31 May 2012 - 5:07 pm | रघु सावंत

हे एक प्रकारचं गूढ आहे माझ्यासाठी. खरचं नशिबवान आहात. ते उत्तर मिळणारच नाही.