आजकाल घरी जितक्या लग्नपत्रिका येतात तितकेच, किंबहुना एखाद दोन चढच, घटस्फोटांचे प्रसंग कानावर येतात. मर्जीप्रमाणे शिक्षण, स्वातंत्र्य, व्यवसाय अन लग्न असूनही घटस्फोटाचे प्रमाण का वाढले आहे ?
दोन घटना अगदी समोर आहेत.
संकेत अभियांत्रिकी पदवीधर. बाळबोध वळणाचे मराठी घराणे. सहा आकडी पॅकेजवाली नोकरी. दिल्लीमध्ये संकेत कंपनीच्या फ्लॅट मध्ये रहात असलेला. कर्नाटक सीमेवरच्या लहानशा गावातली साध्या घरातली मध्यमवर्गीय सुशिक्षित पण जॉब न करणारी मुलगी पाहून लग्न झाले. दोनेक महिन्यांनी वधूवर संकेत अन संमिता दिल्लीला राहावयास गेले. साधारण सहा महिन्यांनी कुरबुरी कानावर येऊ लागल्या. आणखी दोन महिन्यांनी संमिता दिल्लीतून परस्परच माहेरी गेली. दिवाळसण दोघांनी आपापल्या घरीच साजरा केला. चार महिन्यांनी संकेतही नोकरी सोडून महाराष्ट्रात परत आला.
चौकशी नंतर समजले. संमिताला छानछोकीची अति हौस. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त. पगार झाला की नवनवीन खरेदीचा अन रोजच बाहेर खाण्याचा षोक. पगार पुरेना. मग वाद सुरु झाले. काही समजावण्याचा प्रयत्न केला की संमिता वाद घाली अगर रुसून बसे. एकदा मित्र मंडळींच्या समक्ष तिने यावरून संकेतचा अपमान केला. झाले. बोलाचाली विकोपाला गेली अन ती माहेरी निघून गेली.
प्रतिपक्षाकडे मध्यस्थांना पाठवून चौकशी केली तर तिचे म्हणणे नवरा काही हौस मौज करीत नाही. सतत कामात असतो. सुट्ट्या घेत नाही. सदा घरचेच खाणे त्याला हवे असते. माझी कामातून सुटका नाही इ.
किरकोळ कारणे. पण खूपदा मध्यस्थीचा प्रयत्न करूनही वाद शेवट पर्यंत सुटला नाही. परिणाम घटस्फोट.
एक वर्षाने संकेतचे दुसरे लग्न झाले. साधारण तशाच परिस्थितीतील मुलीशी. आता सर्व ठीक आहे. संकेत आईवडिलांच्या घरीच रुपालीसह राहतो अन दोघेही शांत अन समाधानी आहेत.
नेहा बी. ए. एम. एस. पदवीधर. लग्नापुर्वीची मेडिकल प्रॅक्टिस सासू सासऱ्यांच्या विनंतीखातर सोडली. पती राकेश उद्योगपती. १२ तास बिझी. घराचे वळण असे की कामाशिवाय अन सासू- सासऱ्यांच्या परवानगीशिवाय बाहेरसुद्धा पडायचे नाही. नेहाने राकेशच्या कानावर घालून ही पद्धत बदलण्याचा म्हणजे सांगून जाणे ठीक पण परवानगीची गरज आहे का इ. सांगण्याचा प्रयत्न केला. पण राकेशचे म्हणणे तू काहीही कर, माझ्या आईवडिलांना दुखवू नको.
एकदा महिला मंडळाची एक नाटिका होती. त्यात नेहाने भाग घेतला. घरी सांगितले तर परवानगी मिळणार नाही म्हणून फक्त पाहायला जाते म्हणून सांगितले. सासरी सुनेने नाटकात काम केलेले समजताच गहजब झाला. नेहाला जाब विचारण्यात आला. राकेश मध्ये बोलायला तयार नाही. नेहाने खंबीरपणे आपली बाजू मांडली. पण तिच्या म्हणण्याला किंमत दिली गेली नाही.
नेहा माहेरी निघून आली. मध्यस्थीचे प्रयत्न फसले. परिणाम घटस्फोट.
असे काही ऐकले की मला माझ्या दूरच्या नात्यातल्या सुमा अक्काची आठवण येते. माझ्यापेक्षा ती दहा वर्षांनी मोठी. पन्नाशीत नुकतेच पदार्पण केले असेल. पण ती अन माझे भाऊजी यांना अजुनी एकमेकांशिवाय दोन दिवसही राहवत नाही. सुमा अक्काशिवाय राजा भाउजींचे पानही हलत नाही. ती माहेरी आली की दुसऱ्या दिवशी भाउजी तिच्या पाठी , काही एक विसरलेली वस्तू द्यायला म्हणून येत. मग १ दिवस राहून ते गेले की तिसऱ्या दिवशी तिच्या सासूबाईंचा फोन येई. 'अगं, माझा पाय दुखावला आहे, आज ये तू.' पाठोपाठ भाउजी तिला न्यायला हजर ! झाले ! मग सुमा अक्काचीही लगबग सुरु होई सामान गुंडाळायची. आम्ही भावंडे, सुमा अक्काला २ दिवसांपेक्षा जास्त माहेरी राहू देत नाहीत म्हणून भाऊजींशी वाद घालायचो. भाउजी नुसते हसून उडवून लावीत.
तीन मुले आता मोठी झाली आहेत अन आमच्याबरोबर तीही भाऊजींच्या सारखे ‘सुमा सुमा’ करण्यावरून त्यांची नर्म चेष्टाही करतात. भाउजी म्हणतात, 'काय रे, तुमच्या बायका अन नवरे तुमच्याशी गुलुगुलू करत नाहीत म्हणून जळता काय ?'
कधी कधी निवांतपणे गप्पा मारताना सुमा अक्का सांगत असे.
'अगं, सोळाव्या वर्षी लग्न झालं माझं. हे तेव्हा अठरा वर्षाचे. का S ही समजत नव्हतं. दोनेक वर्षं तर मी सासूबाईंजवळच झोपायची. दिवसभर हे कॉलेजला जात. मी सासुबाईंच्या हाताखाली बारीक सारीक काम करी.
मी काही सुरुवातीला यांच्याशी बोलतच नसे. संध्याकाळी ते आल्यावर बोलायचा प्रयत्न करीत. हळू हळू भीड चेपली. मग एकमेकांची ओळख होत गेली. स्वभावाचे कंगोरे ध्यानात येऊ लागले. एकमेकांमध्ये रस वाटू लागला. कधी बोलावे, कधी गप्प बसावे, अनुभवाने समजू लागले. कधी भांडणे होत. एखादा दिवस अबोल्यात जाई. पण अळवावरच्या पाण्यासारखा तो कधी गळून जाई ते लक्षातहि येत नसे. शिवाय सासू सासऱ्यांची ढाल असेच आडोशाला. तेही आम्हा मुलांच्या या खेळावर मजेने लक्ष ठेवत.
एकमेकांचे बारकावे समजून घेण्याची घाई नसायची. दर दिवशी नवीन ओळख होई एकमेकांचे नवे पैलू समजत. दोघांच्या आवडीनिवडी बरोबरीने विकसित होत गेल्या. लवचिक वयात तडजोड सोपी असते म्हणतात. दुसऱ्याची नावडीची गोष्ट सहज टाळण्यात काही विशेष त्रास वाटायचा नाही.
मुले झाली तीही सर्व पंचविशीच्या आत. तुझे भाउजी मुलांनाही सांभाळण्यात आघाडीवर असायचे. कारण मुलांचे उरकल्याशिवाय त्यांना माझा सहवास मिळणे मुश्कील ! सासुबाई असेपर्यंत तर आम्ही भरपूर हिंडणे फिरणे, उनाडक्या केल्या. त्या गेल्यावर आंम्ही एकमेकांच्या अन मुलांच्या अधिकच जवळ आलो.
अन आता तर मला त्यांच्या अन माझ्या वेगळ्या अशा काही बाबी आहेत असं काही वाटतच नाही. जे त्यांचं ते माझं अन जे माझं ते त्यांचं ! आता माहेरच परकं वाटतं बघ !'
या पार्श्वभूमीवर वाटते की इतके उच्च शिक्षण घेतलेल्या अन बाह्य जगाचा अनुभव असलेल्या या तरुण तरुणींचं अन त्यांच्या आईवडिलांचं काही चुकतंय का ? तत्वांमध्ये सुधारणा करण्याची तयारी नसते का ? की लग्नसंस्था ही व्यक्तिगत आशा आकांक्षां अन मानसन्मानापुढे दुय्यम समजली जात आहे ? मुळात आज लग्नसंस्थेची कुणाला गरज तरी राहिली आहे का, अशी शंका ही घटस्फोटांची प्रकरणे पाहून येऊ लागली आहे. यावर विचारी वाचकांकडून कारणमिमांसा अपेक्षित आहेत.
घटस्फोटाचे प्रमाण का वाढले आहे ?
गाभा:
प्रतिक्रिया
9 May 2012 - 1:20 pm | गवि
हल्ली मिळतो लवकर म्हणून जास्त होतातसे वाटते घटस्फोट..
बाकी पूर्वीची उदाहरणं आणि आत्ताची यांची तुलना काय करावी?
संसार टिकवण्याची एकतर्फी जबाबदारी घेऊन तोंड दाबून सहन करणार्या जुन्या काळातल्या बायकांना एकदम श्रेष्ठत्व दिलं जातं आता.
पण इक्वालिटी अँड फ्रीडम कम्स विथ प्राईस टॅग. उलट बाजूने पाहू.. नव्या पिढीत ज्यांचे संसार टिकून आहेत त्यांच्यात मुस्कटदाबी सहन करावी लागण्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा कमी आहे हाही पॉझिटिव्ह मुद्दा लक्षात घ्या. एकाचा बळी देऊन टिकलेल्या विवाहसंस्थेपेक्षा हे बरं.
बादवे, माहेराहून दुसर्याच दिवशी परत बोलावणे हा पूर्वीच्या काळी सहसा प्रेमाचे भरते असा प्रकार नसून घरकामाची प्रचंड अडचण अन खोळंबा हे असायचं असं वाटतं.. ;)
9 May 2012 - 1:24 pm | स्पा
मान्यवर संसारी सदस्यांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत
-- बॅचलर मन्या
पॉपकॉर्न हवेत का रे कुणाला ?
9 May 2012 - 1:30 pm | गवि
नुस्ते पॉपकॉर्न गिळण्यापेक्षा पौष्टिक काहीतरी खात जा रे मन्या..
9 May 2012 - 1:33 pm | प्रचेतस
आजकाल खिचडी, पुर्या, खीर, बटाटा भाजी असे सत्याचे पौष्टिक पदार्थ खात असतो की तो.
9 May 2012 - 1:28 pm | योगप्रभू
<<मुळात आज लग्नसंस्थेची कुणाला गरज तरी राहिली आहे का, अशी शंका ही घटस्फोटांची प्रकरणे पाहून येऊ लागली आहे.>>
शेवटापासून सुरवात करुया. जर लग्नसंस्थेची गरज राहिलेली नाही, हे मान्य केले तर मग पर्यायी व्यवस्था काय? स्वतंत्रपणे जगणार्या स्त्री-पुरुषांचे पुढचे स्टेटस काय राहाणार?
9 May 2012 - 3:50 pm | रमताराम
नाही म्हणजे लग्नसंस्थेची गरज वगैरे बहुतेकांना असते हे आम्हालाही मान्य आहे. लग्नसंस्था ही अन्य सोशल व्यवस्थांप्रमाणेच एक व्यवस्था आहे. फक्त ती सामाजिक रेकग्निशन असलेली असली तरी त्यात समाजाचा हक्क नाही. ती स्वीकारणे/नाकारणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर तुम्हाला सिंगल म्हणजे समाजाला कलंक वाटला तर तो तुमचा प्रश्न. पण लगेच सिंगल माणसांचे स्टेटस् काय म्हणून निकालातच काढलेत की हो. जर कलंक नव्हे तर तो/ती सामाजिक स्थानाच्या दृष्टीने कुठे असतील एवढा मर्यादित अर्थ तुमच्या म्हणण्याचा असेल तर असे म्हणेन की बहुसंख्य विवाहितांसारखाच असेल की. त्याचे जगण्याचे आधार काय हा तुमचा प्रश्न असेल तर केवळ कुटुंब हा एकच जगण्याचा आधार असतो काय? असा उलट प्रश्न विचारेन. याचे उत्तर हो असल्यास मतभेद व्यक्त करून थांबेन. एकट्याचे आयुष्य कदाचित जुलमाच्या रामरामापेक्षा अधिक सुखकर असूही शकेल. शक्यतेबद्दल बोलतोय मी. विवाहितांचे आयुष्य दु:खमय असण्याची जेवढी शक्यता तेवढीच इथेही असेलच कि. उलट सिंगल असणं हा जाणीवपूर्वक निवडलेला मार्ग असेल तर तो निर्णय अधिक डोळसपणे असण्याची शक्यता अधिक (न की देहभोगाचा समाजमान्य मार्ग म्हणून किंवा चार लोक काय म्हणतील म्हणून केलेले लगीन)
सिंगल असणं म्हणजे लगेच सोशल स्टिग्मा हो, आं? आपण स्वीकारलेले - खरंतर ते ही स्वीकारलेले म्हणणे धाडसाचेच, केवळ वारशाने मिळाले म्हणून पुढे चालू ठेवणे म्हणजे स्वीकारणे नव्हेच - तेच एकमेव, योग्य, श्रेष्ठ या मानसिकतेतून कधी बाहेर येणार आपण. परंपरेचा एवढा घट्ट विळखा घेऊन जगतो आपण, जगण्याचे पर्यायी मार्ग तेवढेच उपयुक्त, श्रेयस्कर असू शकतात हे खुल्या मनाने आपण कधी मान्य करणार.
9 May 2012 - 5:31 pm | योगप्रभू
जर विवाह ही संस्थाच मोडीत निघाली तर आज जसे ब्रह्मचारी/अविवाहित/विवाहित/विधवा/विधुर/घटस्फोटित अशा श्रेणी असतात त्या राहाणार नाहीत. सगळेच 'सिंगल' असतील तरी त्यातही पुन्हा कम्प्लिट बॅचलर, लिव्ह इन रिलेशनवाले, काँट्रॅक्ट कम्पॅनियन, नीड प्रोव्हायडर, गे आणि सो ऑन.... अशा नव्या जाती पडतीलच. असा गंमतीचा विचार मनात आला म्हणून मी तो प्रश्न विचारला.
बाकी तुमचे ते मानसिकतेबद्दलचे मुक्त चिंतन आपल्या तरी डोस्क्यात आलं नव्हतं बुवा. असो. घागर फुंकायला लागलाच आहात तर तुम्हाला नमस्कार करुन मी बाजूला सरकतो :)
9 May 2012 - 6:13 pm | रमताराम
हे काय बुवा. घागरी फुंकणे हे 'आमच्या संस्कृती'चा भाग नाही ब्वॉ, तुमचे काय ते तुम्ही तपासा.
आणि तुमच्या एका प्रश्नात एवढा खोऽल अर्थ दडलेला आमच्या सारख्या पामरांना कसा समजावा. लगीन नाही म्हणजे सिंगल असणे एवढाच पर्याय राहतो ना? बाकीचे स्टेटस् तर संस्कृतीबाह्य (!) नि कायद्यालाही मंजूर नसणारे. सो ते 'अनरेकग्नाईज्ड' (म्हणजे 'तेरी भी चूप...' पद्धतीने अनेक घृणास्पद गोष्टी वगैरे आपण अस्तित्त्वात नाहीतच अशी बतावणी करतो तसे) राहणार ना? ते तुमच्या डोक्यात असतील असा विचार करावा एवढा अध:पात आमचा झालेला नाही अजून... असं आम्हाला वाटंत होतं इतकंच. (आणि योगप्रभू 'गमतीचा' विचार करतील अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे अतीच झाले नाही का? ;) )
बाजूला सरकून वाट करून दिल्याबद्दल आशीर्वाद देऊन पुढे चलतो. :)
10 May 2012 - 12:04 am | योगप्रभू
<<घागरी फुंकणे हे 'आमच्या संस्कृती'चा भाग नाही ब्वॉ, तुमचे काय ते तुम्ही तपासा. >>
अहो आमचे आम्हाला ठाऊक असतेच ना? ते कशाला आम्ही तपासू? उलट आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये जे समोर पाहात आलो आहोत त्याचेच उदाहरण देणार ना? आमच्या संस्कृतीत अंगात संचार होऊन घुमायला लागण्यापूर्वी ट्रान्समध्ये जाण्यासाठी घागरी फुंकायचा मार्ग होता. आम्हाला तेवढाच ठाऊक हो. तुमच्या संस्कृतीत त्यासाठी आणखी काही नावीन्यपूर्ण मार्ग/साधने असतील तर आम्हा गरीबांना कुठून ठाऊक असणार? त्यातून तुमची संस्कृती मला फारशी समजलेली नाहीय. विचार आणि भाषेतून जाणवतीय तेवढ्यावरुन चित्र रंगवतो बापडा.
<<तुमच्या एका प्रश्नात एवढा खोऽल अर्थ दडलेला आमच्या सारख्या पामरांना कसा समजावा.>>
माझ्यासारखा उथळ विचारांचा कसला खोल अर्थ काढणार हो? जुन्याला कंटाळून नवा धर्म स्थापन केला तरी त्यात जाती पडतातच, हा इतिहास असल्याने वाटले, की विवाह संस्था नष्ट होऊन सगळेच 'सिंगल' झाले तरी पुन्हा नव्या जाती पडतीलच. इतका साधा विचार. त्यात कसले गहनगूढ शोधता? पण आता शोधताच आहात तर बसा शोधत.
<<योगप्रभू 'गमतीचा' विचार करतील अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे अतीच झाले नाही का?>>
अती झाले आणि हसू आले, अशी म्हण आहे आमच्याकडे. आणि हसू म्हणजे पुन्हा गंमतच ना? तरी बरं आमच्या 'सूडाची ठिणगी' मधील गंमत तुम्हीपण एन्जॉय केली होतीत. असो. चिल.. 'सिंगल' ऐवजी 'जिंगल' म्हणा बघू :)
10 May 2012 - 9:43 am | श्रावण मोडक
सिंगल आणि जिंगल नव्हे हो, सिंगल अँद रेडी टू मिंगल असे म्हणा! ;-)
9 May 2012 - 1:35 pm | रणजित चितळे
ज्यांचे घटस्फोट झाले नाहीत त्यांचे ठीकच चालले आहे असे समजायचे का.
9 May 2012 - 1:35 pm | परिकथेतील राजकुमार
कल्पना नै बॉ.
जालावरती काही स्वयंघोषीत वकील हिंडत असतात, त्यांना विचारले पाहिजे.
9 May 2012 - 1:54 pm | चिरोटा
तरूण्,तरूणी, दोघांच्याही अपे़क्षा वाढल्या आहेत. त्याचबरोबर स्वतःबद्दलचे गैरसमजही वाढले आहेत्. काही वर्षांपूर्वी एका मित्राचे लग्न झाले.बायको लहान शहरातली पण बर्यापकी श्रीमंत. शहरात आल्यावर संसार चालु झाला. एके दिवशी दोघेही फिरायला निघाले. रिक्षा मिळाली नाही म्हणून बस पकडली. बायकोचा 'अपमान'झाला. कारण लहानपणापासून ती बस मध्ये चढली नव्हती. बसमध्ये चढणे तिला कमीपणाचे वाटत होती. समजूत काढताना मित्राला नाकीनऊ आले.
9 May 2012 - 2:08 pm | विनायक प्रभू
कानुन और बिबी के हाथ बडे लंबे होते है.
9 May 2012 - 3:14 pm | नाना चेंगट
अच्छा हात का?
9 May 2012 - 2:08 pm | विनायक प्रभू
कानुन और बिबी के हाथ बडे लंबे होते है.
9 May 2012 - 2:35 pm | वारा
माघार कोण घेणार हा खरा प्रश्न आहे.
आपल्या कडेही असेच खट्टे मिठे प्रकार असतात.
पण सक्सेसफुल वन ईयर फिनिश.
9 May 2012 - 2:36 pm | वारा
माघार कोण घेणार हा खरा प्रश्न आहे.
आपल्या कडेही असेच खट्टे मिठे प्रकार असतात.
पण सक्सेसफुल वन ईयर फिनिश.
9 May 2012 - 2:58 pm | ज्ञानोबाचे पैजार
कमरेचे सोडुन डोक्याला गुंडाळायचे आणि उघडे राहीले म्हणुन लाजायचे. असेल करायचे तर पाश्चात्य लोकांचे संपुर्ण अनुकरण करा, फक्त स्वैराचाराचे आणि चंगळवादाचे नको.
उगाच उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायला जायचे आणि पडल्यावर रडायचे याला काय अर्थ आहे?
संत मंडळी सांगुन गेली ते काही उगाच नाही पायीची वहाण पायी बरी.
पैजारबुवा,
9 May 2012 - 6:35 pm | Pearl
पैजारबुवा,
कृपया
१)'पायीची वहाण पायी बरी.' हे कशाबद्दल बोलता आहात ते स्प्ष्ट कराल का.
२)आणि तुम्हाला एकूणच नेमके काय म्हणायचे ते या विषयालाबद्दल ते नीटसे कळले नाही, ते ही सांगाल का?
9 May 2012 - 9:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
विवाह संस्थाच मुळात ओव्हररेटेड गोष्ट आहे. त्यातून येणार्या अडचणी, घटस्फोटांसारखे प्रकार, एकनिष्ठता वगैरे गोष्टी त्यामुळे हायपररेटेड आहेत. अशा तुच्छ गोष्टींचा उगाच बाऊ का करावा? 'पायीची वहाण पायी बरी.' असल्या बिनमहत्त्वाच्या गोष्टी (विवाहसंस्था आणि तद्जन्य अडचणी) दुर्लक्षाने मारलेल्याच बर्या. पैजारशेटच्या प्रतिसादाचा अर्थ मी असा लावला आहे.
11 May 2012 - 2:53 pm | ज्ञानोबाचे पैजार
अरे बापरे.....
प्रतिसाद लिहीताना महीला वर्गाच्या प्रतिक्रिया काय येतील याचा विचारच केला नव्हता.
"पायीची वहाण पायी बरी" हे पाश्चात्य संस्कॄती बद्दल लिहीलेले आहे. एकंदरच त्या संस्कॄतीला किंवा त्याचे अंधानुकरण करणार्या इतरांना फाट्यावर मारावे. असे झाले तर घटस्फोटांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी होईल.
उत्तम संस्कार हाच आदर्श संसाराचा पाया असतो. सुखी आणि दिर्घकालीन लग्नांचे यश विवाहीत दांपत्या पेक्षा त्यांच्या आई वडिलांच्या हातात असते.
आजकालच्या वापरा आणि फेकाच्या जमान्यात लग्नासारख्या महत्वाच्या विषयाकडे सुध्दा तेवढ्या गंभिरपणे पाहीले जात नाही.
9 May 2012 - 3:15 pm | नाना चेंगट
पूर्वी टाकल्या जाणार्या, ठेवल्या जाणार्या बायकांचे प्रमाण जास्त होते त्यापेक्षा रितसर घटस्फोट काय वाईट?
9 May 2012 - 3:25 pm | ऋषिकेश
विषय अनंत आहे.
9 May 2012 - 3:35 pm | चौकटराजा
तिची संसारातील रांधा वाढा नि शेज सजवा मधून सुटका होतेय पण जास्त झाले की कशाचेही ही साइड इफेक्ट दिसायला लागतात.स्वत्वाच्या कल्पनांचा , वैयक्तिक आकाक्षांचा वावर इथेतिथे व्हायला लागला की बायका काय , मुले, म्हातारे , तरूण सारेच भरकटतात. बाकीच्या नात्यात
घटस्फॉटाची सोय नाही. म्हणून नाईलाजाने ती नाती टिकतात. पदरी पडले पवित्र झाले असा मार्ग च जास्तीत जास्त जणांचा असतो. माझ्या
आईच्या एका मैत्रेणीने गप्पात वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्याला नवरा बरोबर मिळाला नाही हे दु:ख माझ्याकडे व्यक्त केले. तर वयाच्या
८३ व्या वर्षी माझ्या आत्याने आपल्याला नवरा चांगला मिळाला ही देवाची कृपा असेही उदगार काढले. याला जीवन ऐसे नाव !
9 May 2012 - 4:56 pm | अमोल केळकर
म्हणून म्हणतो ' लग्न पत्रिका ' काढण्याआधी आम्हाला ' पत्रिका ' दाखवा म्हणून ;)
अमोल
9 May 2012 - 5:11 pm | यकु
रा. रा. माननीय परा यांनी मागे
'मुलीची पत्रिका पाहून पुढे घटस्फोट झाल्यास पोटगी मिळेल की नाही ' हे कळू शकते काय असा मोलाचा सवाल टाकला होता त्याची आठवण झाली ;-)
9 May 2012 - 5:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुळात आज लग्नसंस्थेची कुणाला गरज तरी राहिली आहे का, अशी शंका ही घटस्फोटांची प्रकरणे पाहून येऊ लागली आहे. यावर विचारी वाचकांकडून कारणमिमांसा अपेक्षित आहेत.
लग्नसंस्थेचं काय माहिती नाही पण, हायकोर्ट म्हणतं ”बायकोने सीतेसारखे वागावं” आता काय बोलावं काही समजत नाही. आजच्या काळात सीतेसारखं राहणं जमेल काय ?
-दिलीप बिरुटे
9 May 2012 - 8:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्यासारखे समजूतदार पुरूष समाजात आहेत म्हणून हो! नाहीतर घटस्फोटांचं प्रमाण महास्फोटापेक्षा अधिक जास्त झालं असतं!
10 May 2012 - 1:06 am | विकास
न्यायमुर्तींचे उदाहरण चुकले, असबंद्ध होते असे नक्की म्हणता येईल. पण संदर्भ जरा वेगळा होता. यात पत्नी नवर्याबरोबर पोर्टब्लेअरला जायला तयार नव्हती आणि तिला मुंबईतच रहायचे होते, अर्थात हे बराच कळ चालले होते म्हणून त्याने घटस्फोट मागितला. तेंव्हा न्यायमुर्तींनी सीता कशी वनवासात गेली म्हणत बायकोला समजवाण्याचा प्रयत्न केला. अर्थात न पटणारे उदाहरणच आहे पण कोर्टाला शक्यतो घटस्फोट टाळायचा होता. या केसमधे कोर्टाच्या सांगण्यावरून ९ वर्षाच्या मुलीकरता नवरा तडजोडीस तयार होता पण बायको तयार नाही अशी अवस्था आहे...
काही बाबतीत पुर्वीच्या काळात मारूनमुकटून लग्न टिकली असे नक्की म्हणता येईल. आत्ता देखील अनेकदा स्त्रीयांवर मारहाण करणारे नवरे असतात. अर्थात मारहाण हा केवळ एकच प्रकारचा त्रास झाला... त्याच बरोबर उलट देखील उदाहरणे असतात जेथे कदाचीत नवर्याला मारहाण होत नसेल पण इतर अनेक प्रकारचे त्रास दिले जाऊ शकतात...
पण अशी टोकाची (आणि जेन्युईन) उदाहरणे सोडून दिली तर हल्लीच्या काळात विविध कारणाने कुटूंब पद्धती बदलल्याने देखील, सगळेच मनाने दूर गेलेत (जरी फेसबुक वर एकमेकांना अपडेट करत असले तरी). परीणामी बाहेरच्या ताणतणावात काम करणारे नवरा-बायको यांचा सगळा ताण हा वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर पडत त्याचे पर्यवसन हे अहंकार-भांडण ते घटस्फोट असे होऊ शकते असे वाटते. शिवाय ते डायल्यूट करायला ना धड घरात इतर कोणी ना धड इतर कोणी जवळ असे काहीसे घडू लागते.
ते कसे टाळले जाऊ शकते तर त्यासाठी, किमान घरात तरी "आय" हा आयफोन/आयपॉड/आयपॅड पुरताच मर्यादीत ठेवावा, नुसताच "आय" वापरला जाऊ नये. टाळी एका हाताने वाजत नाही ह्याचे भान ठेवणे. "जयाचेनी संगे, समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे..." अशा व्यक्तींपासून चार हात दूर रहावे... आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलांना जन्माला घातले आहे तर त्यांचे संगोपन करून त्यांना आई-वडीलांचे प्रेम मिळवून देणे ह्या कर्तव्याला देखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्याच वेळेस मान्य केले आहेत याचे भान ठेवावे असे वाटते. मुले, आईवडीलांना कामानिमित्त फिरायला लागते हे समजू शकतात पण आईवडीलांनी वेगळे होणे शेवटी मान्य केले तरी मुलांसाठी कायमचे ओरखडे ठरू शकतात, दुष्परीणाम देखील होऊ शकतात... असे वाटते.
9 May 2012 - 7:34 pm | सूर्यपुत्र
की लोकसंख्या वाढतेय, म्हणून घटस्फोटाचे प्रमाण पण वाढतेय. ;)
-सूर्यपुत्र.
9 May 2012 - 11:01 pm | चिरोटा
मला वाटते लग्नाचे प्रमाण वाढलेय म्हणून घटस्फोटाचे प्रमाण पण वाढलेय.
बोहल्यावर उभे रहायचे प्रमाण कमी झाले की घटस्फोटांची संख्या पण कमी होईल. काय?
11 May 2012 - 5:10 pm | संजय क्षीरसागर
जर दोघांचं जमत असेल तर मग कोणत्याही परिस्थितीत दोघं एकमेकांना साथ देतील कारण दोघातलं नातं हीच तर संसारातली माजाये.
विवाहसंस्था हा समग्र जीवनाचा (जन्म ते मृत्यू) विचार करून माणसानं लावलेला अत्यंत बुद्धीमान शोध आहे असं मी मानतो.
तुम्हाला इंटरेस्ट असेल तर याविषयीचे माझे विचार मी इथे मांडलेत http://www.manogat.com/node/22471
11 May 2012 - 5:21 pm | यकु
>>> विवाहसंस्था हा समग्र जीवनाचा (जन्म ते मृत्यू) विचार करून माणसानं लावलेला अत्यंत बुद्धीमान शोध आहे असं मी मानतो.
--- ब्रह्मचर्य हादेखील समग्र जीवननोत्तर/पश्चात विचार करुन माणसानं लावलेला अत्यंत बुद्धीमान शोधच आहे असं आपल्याला उद्या नक्की सुचेल आणि तेव्हाही आपण प्रतिसाद संपादित करुन इथे ते लिहाल आणि नंतर एक लंबंचौडं स्वगत आपल्याला सुचेल ज्याच्या लिंका आपण इथे द्यायला विसरणार नाही म्हणून हे बूच मारले जात आहे. :p :p :p :p
10 May 2012 - 12:35 am | साती
लेख वाचून मनात आलं - वा.मस्त. आता त्या आत्यासारखं सुखी वैवाहिक आयुष्य पाहिजे असेल तर बालविवाह मस्त.
लहानपणापासून एकत्र असल्यावर मनं जुळलेलीच राहणार.
जरा भारत सरकारला कळवता का कुणी?
11 May 2012 - 3:53 pm | मस्त कलंदर
भारत सरकारला जर कळवणारच असाल तर, मीही त्यात थोडी भर घालावी म्हणते.
१. मुलींना शिकू द्यायचं नाही. जिकडे पहावे तिकडे सगळ्या परिक्षांत मुलीच पुढे. अशाने मुलांना प्रथम यायला संधीच मिळत नाहीत.
२. या शिकलेल्या मुली गप्प न बसता नोकर्या करतात. त्यामुळे
२अ. मुलांच्या नोकरीच्या संधी कमी होतात.
२ब. आर्थिक स्वातंत्र्य असल्याने नवर्यासोबत/सासरी पटेना की तिला मानसिक घुसमट की कायसंसं म्हणत घटस्फोट हवा असतो. जवळ पैसाच नसेल आणि ते कमवायचं साधन नसेल तर जाईलच कुठे?
२क. मुली नोकरी करत असल्याने त्यांना घरात स्वयंपाकघर कुठे आहे हेही माहित नसते. ज्या कारणांसाठी घरी सून आणायची(स्वयंपाक-घरकाम-शिवण-टिपण इ.इ) तेच काम जर त्या करत नसतील तर काय कामाच्या त्या? बघा बरं, या आत्या हे सगळं इतकं नीट करताहेत तर आहे ना त्यांचा संसार सुखी? अश्शी हाक मारली की वस्तू हातात यायला हवी, पुरूषांनी का घरभर शोधाशोध करायची?
२ड. मुलींना शिकल्यावर बरीच शिंगं फुटतात. त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्व हवं असतं, काय विचार-बिचार करायला लागतात म्हणे त्या. मग उगीच स्त्रीस्वातंत्र्य-समानता वगैरे फालतू गोष्टी दळत राहतात. सगळ्यांच्याच डोक्याला नसता ताप! आता या धाग्यातल्या दुसर्या सुनेने नाटकात काम केलं नसतं तर काय आभाळ कोसळलं असतं?
३. सून म्हणून घरी शक्यतो मुलगाच घरी आणावा. त्याचे फायदे:
३अ. कपड्यांचे दोन जोड पुरतात. कपाटभर कपडे असतानाही माझ्याकडे घालायला काही नाही म्हणून तो गळे काढत नाहीत.
३ब. भारंभार दागिन्यांची (सहसा) आवड नसते. तोही खर्च वाचतो. पण हो, घरच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं असेल तर मात्र अडचण येऊ शकते ब्वॉ.
३क. पुरूषांसोबत कसलेही जोक्स करता येतात. ते अगदी उच्चविभूषित नसले तरी! घरी मग काव्यशास्त्रविनोदाच्या मैफिलींना उधाण येईल.
11 May 2012 - 4:06 pm | यकु
>>३क. पुरूषांसोबत कसलेही जोक्स करता येतात. ते अगदी उच्चविभूषित नसले तरी! घरी मग काव्यशास्त्रविनोदाच्या मैफिलींना उधाण येईल.
--- अच्छा! असं होतं होय ते.
आमची अंमळ गल्लत झाली होती.
काहीही विचारणा करु नये.
;-)
11 May 2012 - 5:06 pm | सस्नेह
सातीताई, कृपया हे लक्षात घ्यावे की बालविवाह प्रथेचे इथे समर्थन केले नसून त्याची ही एक बाजू समोर आणली आहे. आजकाल तरुणीचे विवाह तिशीच्या आसपास होताना दिसतात. त्याचा तर लग्ने टिकण्यावर परिणाम होत नाही, याचाही विचार व्हावा म्हणून.
11 May 2012 - 6:19 pm | नितिन थत्ते
ज्या काळी मुलींची लग्ने १२ व्या वर्षी होत असत त्या काळी ती ३० व्या वर्षी झाली असती तरी ती "टिकली" असती. कारण घटस्फोटाचा पर्याय (स्त्रियांसाठी) उपलब्धच नव्हता.
त्याही काळी लग्ने तांत्रिक दृष्ट्या टिकत असली तरी टिकण्यायोग्य व्यवहार नवराबायकोमध्ये होत असत असं काही नाही.
10 May 2012 - 8:51 am | कवितानागेश
घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे>>
वाईट काय त्याच्यात??
10 May 2012 - 10:14 am | मूकवाचक
युद्ध हे मानवी प्रश्नांचे उत्तर असू शकत नाही असे कुणीसे म्हटलेच आहे. तरीही नळावरची भांडणे ते आंतरराष्ट्रीय युद्धे होत होती, होत आहेत आणि होतच राहतील. तद्वतच लग्न, घटस्फोट, पुनर्विवाह, लिव्ह-इन, लफडी, कुलंगडी, डेटिंग, वियोग, नियोग, योगायोग यापैकी कुठलीही किंवा तत्सम कुठलीच गोष्ट मानवी प्रश्नांचे उत्तर असू शकत नाही. स्थळ, काळ आणि परिस्थितीप्रमाणे टक्केवारी थोडीफार बदलली तरीही या सगळ्या गोष्टी होत होत्या, होत आहेत आणि होतच राहतील. असो.
10 May 2012 - 9:20 am | नितिन थत्ते
घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे म्हणजे काय?
घटस्फोट हा १९५५ पासून (उच्चवर्गीयांसाठी*) अधिकृतपणे उपलब्ध झाला. त्या आधी घटस्फोटाचे प्रमाण शून्यच असणार. [पण घटस्फोटसदृश घटना पूर्वीही घडतच असणार- बायकोला टाकून देणे, बायको पळून जाणे, तिने जीव देणे, एकाच घरात राहूनही जवळजवळ वेगळे असणे वगैरे]
जेव्हापासून घटस्फोट अधिकृतपणे उपलब्ध झाला त्यानंतरही त्याचा प्रत्यक्ष वापर करणार्यांची संख्या सुरुवातीस कमीच असणार. आणि हळूहळू ती वाढणार. (भीड चेपणे, समाजाला शॉकिंग नसणे या दृष्टीने)
त्याखेरीज घटस्फोट घेतल्यावर (विशेषतः) स्त्रियांना जी आर्थिक ताकद लागेल ती यापूर्वीच्या काळात ३० वर्षांपूर्वी ४० वर्षांपूर्वी कमी असणार. म्हणजे त्यांना घटस्फोट घेतल्यावर माहेरच्या माणसांवर अवलंबून रहावे लागणार. तेव्हा घटस्फोट घेण्याचे प्रमाण कमीच असणार.
पूर्वीच्या काळीही एकमेकांना सोडायला हवे असे वाटले तरी ते (स्त्रियांच्या बाजूने) आर्थिक दृष्ट्या शक्य नसल्याने घटस्फोट कमी होत होते. आज ती आर्थिक ताकद काही प्रमाणात आली आहे म्हणून कुचंबणा होत एकत्र राहण्याची गरज कमी झाल्यामुळे घटस्फोट वाढले आहेत.
*उच्चवर्गीयांखेरीज इतर वर्गांत घटस्फोट/काडीमोड ही रूढी म्हणून उपलब्ध होतीच.
10 May 2012 - 11:08 am | रणजित चितळे
मस्त प्रतिसाद
10 May 2012 - 9:26 am | चित्रा
म्हणून तर नाही ना?! ;)
ह. घ्या.
पहिल्या उदाहरणात नवराबायकोचे विशेष जमणार नाही हे स्पष्टच दिसते आहे. उगाच एकत्र राहून काय फायदा?
>इतके उच्च शिक्षण घेतलेल्या अन बाह्य जगाचा अनुभव असलेल्या या तरुण तरुणींचं अन त्यांच्या >आईवडिलांचं काही चुकतंय का ? तत्वांमध्ये सुधारणा करण्याची तयारी नसते का ?
आक्रस्ताळेपणा हा बहुदा कुठच्याही एका पिढीचा गुणविशेष नसावा. कोणत्याही काळात मतलबी, किंवा बाणेदार, किंवा प्रेमळ अशा नवराबायकोंची वानवा नसावी. पूर्वीच्या नवराबायकोंची तत्वे काय होती?
> की लग्नसंस्था ही व्यक्तिगत आशा आकांक्षां अन मानसन्मानापुढे दुय्यम समजली जात आहे ?
लग्नसंस्था ही दोन्ही पार्टींनी खुशीने मान्य करण्याची गोष्ट आहे, लादली जाऊ नये. व्यक्तिगत आकांक्षांमध्ये प्रेमप्राप्ती ही सर्वात मुख्य आकांक्षा असते. पण प्रेमप्राप्तीसाठी लग्नाची गरज नसते असे वाटते. तेच अपत्यप्राप्तीसाठी. पण अपत्यसंगोपनासाठी लग्नसंस्थेची, एकत्रित जबाबदारीची गरज असते. पण लग्नसंस्थेला टिकवणे ही समाजाची जबाबदारी नसून समाजाला टिकवणे ही अशा व्यवस्थेची जबाबदारी असावी. मात्र जर जुनी व्यवस्था अधिकतम लोकांना उपयुक्त वाटत नसली, तर ती आपोआप दूर होईलच.
10 May 2012 - 10:10 am | शिल्पा ब
जमलं तर ठीक नाहीच जमलं तर (अन आर्थिक बळ असेल तर)घुसमटुन राहण्यापेक्षा वेगळं झालेलं काय वाईट? पुन्हा निवड करताना अनुभव गाठीशी असतो नै का!
10 May 2012 - 10:23 am | गवि
मान्य.
मुलं झालेली असली की त्या प्रॉब्लेममधे आणखी गुंता वाढतो. आईवडील एकत्र न राहणं याने मुलांच्या रोजच्या जगण्यावर भयंकर परिणाम होतो. विशेषत: आजुबाजूला शाळेत वगैरे आलबेल दिसणार्या कुटुंबातली मुलं असताना.
पण एकत्र राहून केवळ मुलांसाठी म्हणून न भांडण्याचा संयम ठेवणं हे पतीपत्नींसाठीही भयंकर अवघड असावं बहुधा.
अशावेळी रोज एकमेकांना शाब्दिकरित्या ओरबाडत किंवा मारहाण करत कुचमत जगणारे आईवडील एकत्र असूनही मुलांच्या मनाची जास्तच हिंसा होत असावी. त्यापेक्षा सिंगल पेरेंटसोबत शांततेत राहिलेलं "तुलनेत" बरं.
तेव्हा त्याही अर्थाने घटस्फोट हा दोन एव्हिल्स मधला बेटर एव्हिल आहे असं म्हणता येईल..
अजून एक. सिंगल पेरेंटसोबत राहणारी पोरं तरी शांततेत जगू शकतात का? की त्यांचे वेगळे प्रॉब्लेम्स सुरु होतात? विशेषत: आपल्या अडनिड्या वयात आई / बाबांचं अन्यत्र नातं जुळणं.. किंवा एकटी पडलेल्या आईचं / बाबांचं (बाप लगेच दुसरं लग्न करतो अशी एक समजूत आहे) एकटेपणाचं डिप्रेशन / रोजचा चिडचिडेपणा मुलावर खोलवर रोज परिणाम करणं.
त्यांचं त्यांनाच माहीत..
10 May 2012 - 10:29 am | शिल्पा ब
ओळखीत एक व्यक्ती आहे तिला दोन मुलं आहेत अन ते लहान असल्यापासुनच हे जोडपं विभक्त आहे. आई बाप एकदुसर्याविषयी बरं बोलत नाहीत अन आता मुलांना हे समजलंय की एकत्र राहणे अशक्य आहे. आईचा बॉयफ्रेंड आहे अन बापाला मधुनमधुन गर्लफ्रेंड असते.
आता एकत्र राहुन डिसफंकशनल कुटुंब असण्यापेक्षा हे काय वाईट? दोन्ही बाबतीत चांगले अन वाईट परीणाम आहेतच.