गेल्या काही दिवसात घडलेल्या तीन घटनांनी भारतीयांनी जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतत चाललेल्या भारताला या घटनांनी पुन्हा एकदा भरारीचे पंख मिळाले आहेत.
१. अग्नी-५
अग्नी-५ या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे सरंक्षण क्षेत्रात भारतीयांनी जगाला दखल घ्यावयास भाग पाडले. आज पर्यंत भारताच्या सर्व शहरांवर चीन हल्ला करू शकत होता. अग्नी-५ मुळे आता चीनमधील प्रमुख शहरे तसेच संपूर्ण आशिया व आफ्रिकेतील काही भाग आपल्या टप्यात आला आहे. चीनची वाढती महत्वाकांक्षा रोखण्यासाठी व आशियात शांतता निर्माण करण्यासाठी अग्नी-५ ची अत्यंत आवश्यकता होती.
२. लेक टॅपिंग
दुसरी घटना आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोयना धरणात अत्यंत महत्वाकांक्षी असा लेक टॅपिंग प्रकल्प यशस्वीपणे सुरु झाला.
तेरा वर्षापूर्वी महाराष्ट्राची विजेची गरज भागविण्यासाठी कोयना धरणाच्या पाण्याचा वापर करून वीजनिर्मिती सुरु करण्यात आली होती. हा टप्पा सातत्याने चालू ठेवण्यासाठी ज्या बोगद्यातून पाणी घेण्यात येत होते, तेथील पाण्याची न्यूनतम पातळी 630 मीटरवर ठेवणे आवश्यक होते. तसे न केल्यास पाणी कमी पडून उन्हाळ्यात वीजनिर्मितीच थांबवावी लागत होती. धरणात पाणी असूनही वापर करता येत नव्हता.
लेक टॅपिंग म्हणजे काय? एखादा बोगदा खणतात. दोन्ही बाजू मोकळ्या असतील, तर दोन्ही बाजूंनी काम करून बोगदा पूर्ण करता येतो. पण समजा एका बाजूला मोठा जलाशय असेल व त्यातील पाणी बोगद्याद्वारे वाहून न्यावयाचे असेल, तर असा बोगदा काढणे खूपच अवघड असते, कारण बोगदा एका बाजूने काढला तरी तो जलाशयाला जोडायचा कसा? जलाशयाच्या तळाला मोठे छिद्र पाडून पाणी बोगद्यांत घेणे म्हणजेच लेक टॅपिंग. हे मोठे जोखमीचे काम आहे.
या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होणार आहे व दुष्काळी भागासाठी वरदान ठरू शकणाऱ्या टेंभू, ताकारी-म्हैसाळ या योजनांसाठी जास्त पाणी उपलब्ध होऊ शकेल.
३. 'रिसॅट-१'
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी 'रिसॅट-१' चे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या पोलर सॅटेलाइट लॉंच व्हेईकलच्या माध्यमातून करण्यात आले. ढगांचे आच्छादन असताना जमिनीवरील छायाचित्रे मिळविण्यासाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. याबाबतीत भारत सध्या कॅनडाच्या उपग्रहावर अवलंबून होता. आता 'रिसॅट-१'मुळे ही उणीव दूर होणार आहे.
यासाठी हजारो शास्त्रज्ञ अहोरात्र कष्ट घेत होते. त्या सर्व शास्त्रज्ञाना मानाचा मुजरा....
प्रतिक्रिया
28 Apr 2012 - 9:51 am | प्रभाकर पेठकर
ह्या नुसत्या दूरदर्शनच्या बातम्या झाल्या. त्या आम्ही दूरदर्शनवर पाहिल्या आहेतच. ह्या शिवाय ह्या विषयातील विस्तृत माहिती दिली असती तर वाचायला नक्कीच आवडली असती.
असो. तरीपण भविष्यातले काही आशादायी चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पण, ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दुष्काळ, बिहारमधील मागासलेपणा, एकूणच आरोग्यसेवेची आणि शिक्षण सुविधांची पातळी इ.इ.चे चित्र संभ्रमात टाकणारे आहे.
28 Apr 2012 - 9:58 am | गणामास्तर
>>>>>>ह्या नुसत्या दूरदर्शनच्या बातम्या झाल्या. त्या आम्ही दूरदर्शनवर पाहिल्या आहेतच. ह्या शिवाय ह्या विषयातील विस्तृत माहिती दिली असती तर वाचायला नक्कीच आवडली असती.
असेच म्हणतो.
28 Apr 2012 - 12:36 pm | गणपा
धागा उघडुन पोपट झाला.
28 Apr 2012 - 12:31 pm | विजय_आंग्रे
उगा क्रंमाक २ ची बातमी वजा केली, तर क्रंमाक १ आणि २ या बातम्यांचा सर्वसामन्याना काय फायदा?
29 Apr 2012 - 10:56 am | खटासि खट
सचिनची खासदारकी पण टाकायचं होतं
29 Apr 2012 - 12:26 pm | परिकथेतील राजकुमार
'मिपावरील पोल-खोल लेखनाने आणि मिपाकरांच्या प्रतिक्रियांमुळे धास्तावलेल्या प्रतिभातैंनी त्यांची बंगल्यासाठीची जमिन परत केली' ही ठळक बातमी कुठे आहे ?
तसेच
बातमी क्रं. १ पाठी मागे मदनबाण व सुकांच्या लेखनाचा
बातमी क्रं. २ मागे पाषाणभेदांच्या दुष्काळी कवितांचा
मोठा वाटा आहे हे देखील नमूद केलेले नाही. त्यांच्या लेखनाने सरकारच्या डोळ्यावरची मस्ती उतरली आणि ते जनहितासाठी कटिबद्ध झाले.