नो किडिंग

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
27 Apr 2012 - 2:46 pm
गाभा: 

काही दिवसांपूर्वी बालगुन्हेगारी, बालगुन्हेगारांची मानसिकता, पालक आणि पाल्य ह्यात वाढत जाणारी दरी ह्या सर्वच विषयांची सांगड घालत काही एक लिखाण करत होतो. ह्या सगळ्यासाठी काही त्या त्या क्षेत्रातील मान्यवर लोकांची मते जाणून घेणे देखील आवश्यक होतेच. अशा काही लोकांना इकडच्या तिकडच्या ओळखी काढून भेटीसाठी जात होतो. अशातच सायबर क्राईम खात्यातील काही मान्यवरांची गाठ घेण्याचे ठरले. अर्थात त्यांच्यापर्यंत पोचणे हे नेहमीप्रमाणे अवघडच होते. अशातच आठवण झाली मिपाकर प्रसन्नदा अर्थात प्रसन्न केसकर ह्यांची. हाडाचा पत्रकार, सर्व थरात ओळखी असणारा हा माणूस सध्या DNA वर्तमानपत्रासाठी काम करत आहे. प्रसन्नदांना फोन करून अडचण सांगितल्यावरती ताबडतोब २/३ कॉन्टॅक्ट नंबर्स आणि नावे मिळून प्रश्न सूटला. मी काय विषयावरती लिहितोय हे जाणून घेतल्यावरती त्यांनी मला एका खास कार्यक्रमाचे ताबडतोब आमंत्रण देखील देऊन टाकले. कार्यक्रमाचे नाव होते 'नो किडिंग'.

**शुभम शिर्के या सोळा वर्षाच्या मुलाचे दिघीतील त्याच्या घरून त्याच्याच तीन किशोरवयीन मित्रांनी नुकतेच अपहरण केले. या मित्रांनी शुभमला आडबाजूला नेऊन ठार तर केलेच पण त्याच्या आईवडीलांकडून खंडणीही वसूल केली. शुभमच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शुभमच्या खुन्यांना पकडले तेव्हा त्यातील दोघे अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. या घटनेमुळे वाढत्या वयाच्या मुलांच्या प्रश्नाचे भयानक स्वरूप पुन्हा एकदा समोर आले. वाढत्या वयाची मुले आणि त्यांच्या पालकांमधील समन्वयाचा अभाव, अयोग्य जीवनशैलीमुळे निर्माण होणारे स्थूलतेसारखे विकार, मुलांशी कसे वागावे याबाबतचा पालकांमधील गोंधळ, माध्यमांमधून सातत्याने होणार्‍या हिंसाचाराच्या उदात्त्तीकरणाने मुलांमध्ये वाढत असलेली अनैतिकता आणि ननैतिकता असे अनेक प्रश्न आज पालकांना भेडसावत आहेत. या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन देखील अनेकदा सहजपणे मिळत नाही. या समस्येवर उपाय शोधण्यास पालकांना मदत करण्यासाठी डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या नाईन टू नाईंटिन क्लिनिकमधील तज्ज्ञांच्या सहकार्याने पुढाकार घेतला. डीएनए वृत्तपत्र आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल यांच्या वतीने वाढत्या वयाच्या मुलांच्या पालकांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी नो किडिंग या चर्चासत्राचे शनिवार दि. १४ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे स्वरूप साधारण असे होते :-
प्रास्ताविक - डॉ. वैशाली देशमुख
मुलांबाबत प्रश्न का निर्माण होतात - डॉ रश्मी गुपचुप
परिस्थिती नेमकी कशी बदलत आहे - डॉ प्रतिभा कुलकर्णी
शाळकरी मुलांना काय वाटते (मुलांशी बोलून जमवलेली माहिती) - पल्लवी इनामदार
चर्चासत्र - सहभाग डॉ विद्या जोशी, डॉ वाटवे, पल्लवी, वैशाली, श्री पत्की. सूत्रसंचालन डॉ सुनील गोडबोले.
समारोप - डॉ. सुनील गोडबोले. **

कार्यक्रमाला पालकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. माझ्या लिखाणाला देखील अधिक काही खाद्य मिळेल ह्या हेतूने मी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली. पुणे असूनही कार्यक्रम अगदी ठरल्या वेळेनुसार सुरू झाला. एकदा कार्यक्रम सुरू झाल्यावरती निव्वळ टिपण्या घेण्याच्या हेतूने आलेलो मी त्या कार्यक्रमात कधी रंगून गेलो ते कळलेच नाही. एक पालक नसूनही ह्या कार्यक्रमात तज्ज्ञ मांडत असलेली मते, त्यांचे विचार एक नागरिक म्हणून कुठेतरी हालवून गेले.
'काय करू नये ह्या पेक्षा काय करावे ' हे पालकांनी मुलांना आधी समजावणे आवश्यक असल्याचे मत मांडत डॉक्टर वैशाली कुलकर्णी ह्यांनी ह्या चर्चासत्राची सुरुवात केली. त्यानंतर अनेक तज्ज्ञांनी आपली मते, विचार आणि अनुभव व्यक्त केले. त्या विचारातील काही मोजके विचार तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आणि त्यातून काही चांगली चर्चा घडण्याच्या हेतूने हा लेखन प्रपंच.

१) पालकांनी आणि शिक्षकांनी परस्परसंबंधाने मुलांवरती ठेवलेले लक्ष आणि संस्कार महत्त्वाचे.
२) कुठे चालला / चालली?, हे काय कपडे आहेत का? इ. इ. प्रश्नांनी 'वॉचडॉग अ‍ॅटिट्यूड' ठेवण्यापेक्षा मित्रत्वाचे नात्याने संवाद साधणे गरजेचे.
३) ह्या वयात मुलांच्या विचारांबरोबरच हार्मोन्समध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती बदल घडत असतात, मुले जास्ती आक्रमक होत असतात. हे सगळे ध्यानात घेणे महत्त्वाचे.
४) पालकत्वाची भिती बाळगणारे पालक ही देखील सध्या भेडसावत असलेली एक समस्या आहे.

ह्या सर्वांबरोबर अधिक विस्ताराने चर्चा करताना अनेक तज्ज्ञांनी दोन पिढ्यांमधील संवाद का तुटत असतो हे देखील समजावले. विशेषतः पालकांनी आपल्या आणि आजच्या पिढीतल्या फरकाकडे डोळझाक करणे चालणार नाही. पालकांची पिढी ही 'ह्याला हात लावू नको असे सांगितल्यावरती कायमच त्या गोष्टी पासून लांब राहणारी, तर आजची पिढी त्या वस्तूला हात लावून त्यातून स्वतःचे मत बनवणारी आणि अनुभव घेणारी आहे' हे लक्षात घेतले पाहिजे. जुन्या पिढीत आजसारखी रॅट रेस किंवा कटथ्रॉट कॉम्पिटिशन नव्हती हे देखील मान्य करायला हवे.

आजकाल खरे सांगायचे तर मुलांची विचार करण्याची बरीचशी ताकद ही संगणकाने खाऊन टाकलेली आहे. एका बटणात सगळ्या प्रश्नांची उत्तर उपलब्ध होत असल्याने बर्‍याचदा मुलांकडून मेंदूचा व्हायला हवा तेवढा वापर होत नाही, अशा रिकाम्या मेंदूत मग नको नको त्या कल्पना आकार घ्यायला लागतात. कधीतरी काहीही न करता शांत बसणे हे देखील मनासाठी आणि शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे हे मुलांच्या आणि पालकांच्या दोघांच्या ध्यानात येत नाही. मुळात हे लक्षात यायला मुलांनी आधी कधी आपल्या पालकांनाच असे करताना पाहिलेले नसते. सोमवार ते शनिवार काम आणि रविवारी मुलांना वेळ देऊ शकत नाही ह्या भावनेतून दिवसभर मांडलेला चित्रपट, हॉटेल, पार्क ह्यांचा खेळ. ह्यातून स्वस्थ बसलेले पालक मुलांना बघायला मिळणार तरी कधी?

कायद्याने सुजाण नाहीत म्हणून ही अडनिड्या वयातली मुले सुजाण नसतात असे बिलकुल समजू नये. ते काय विचार करतात, त्यांच्या आवडी निवडी काय आहेत, ते टीव्ही वरती नक्की काय पाहतात, कोणते खेळ खेळतात ह्या सर्वांमधून त्यांचे व्यक्तिमत्त्व दिसत असते, आणि त्याकडे प्रत्येक पालकाने डोळस नजरेने पाहणे हे मोठ्या गरजेचे आहे.

चर्चासत्र जवळजवळ २ तास चालले. त्या काळात अनेक पालकांनी आपल्या अडचणी देखील विचारल्या, काहींनी त्यांच्या घरात घडत असलेल्या गमती जमती देखील शेअर केल्या. ह्या सगळ्याच घटनाक्रमाचा संपूर्ण आढावा घेणे खरंच शक्य नसल्याने, ह्या कार्यक्रमाचे थोडेफार सार मांडण्याचा इथे प्रयत्न केला आहे.

धन्यवाद.

**प्रसन्नदांच्या कार्यक्रमाच्या माहितीतून साभार**

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

27 Apr 2012 - 2:50 pm | सुहास..

**प्रसन्नदांच्या कार्यक्रमाच्या माहितीतून साभार** >>

ग्रेट वर्क प्रसनदा !

धन्यवाद पराशेट :)

स्वाती दिनेश's picture

29 Apr 2012 - 2:53 pm | स्वाती दिनेश

**प्रसन्नदांच्या कार्यक्रमाच्या माहितीतून साभार** >>
ग्रेट वर्क प्रसनदा !
धन्यवाद पराशेट

सुहास सारखेच म्हणते,
स्वाती

झकास वृत्तांत.
तुमचे लिखाण प्रकाशित झाले असेल तर लिंक कुठे आहे? उत्सुकता वाढलीय.

चिंतामणी's picture

28 Apr 2012 - 1:10 pm | चिंतामणी

अंक विकत घ्यायला लागेल.

इथे थोडेफार लिहीतात हेच खूप झाले.;)

पाल्यासाठी संस्कार शिदोरी अगदी लहान पणापासून द्यायला हवी. अन्यथा त्याचे परिणाम दिसणारच.

sneharani's picture

27 Apr 2012 - 3:10 pm | sneharani

मस्त माहिती दिलीस कार्यक्रमाची, या विषयी आणखी लिखाण केलं असशील तर नक्की दाखवा .
:)

प्रीत-मोहर's picture

27 Apr 2012 - 3:10 pm | प्रीत-मोहर

DNA व दिनानाथ मंगेशकर इस्पितळ खुप छान काम करत आहे या बाबतीत.

गणपा's picture

27 Apr 2012 - 3:16 pm | गणपा

वेल डन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Apr 2012 - 3:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वृत्तांताबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

27 Apr 2012 - 4:21 pm | कुंदन

>>वृत्तांताबद्दल आभार.
असेच म्हणतो.

छोटा डॉन's picture

27 Apr 2012 - 5:16 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो.
कार्यक्रमाचा हेतु आणि वृत्तांत आवडला.

- छोटा डॉन

उत्तम लेख. पालक म्हणून अत्यंत उपयुक्त माहिती..

स्मिता.'s picture

27 Apr 2012 - 3:37 pm | स्मिता.

कार्यक्रमाचे थोडक्यात सार आवडले. बालगुन्हेगारी, बालगुन्हेगारांची मानसिकता याबद्दल आणखी जास्त कुठे वाचता येईल? तुम्ही लिहिलेले प्रकशित केले असल्यास लिंक द्यावी.

भडकमकर मास्तर's picture

27 Apr 2012 - 3:47 pm | भडकमकर मास्तर

कार्यक्रमाची माहिती देणारा छान लेख...

अल्पवयीन मुलांनी केलेल्या किडनॅपिन्ग आणि खुनाची बातमी सर्वांनाच बालमानसशास्त्रज्ञ , शिक्षक, पालक यांना अस्वस्थ करणारी होती, हे खरंच... याब्वर आय्बीएन लोकमत वर वागळ्यांनी एक आजचा सवाल केला त्यात नेहमीचंच सारं ऐकलं... आजची पिढी, चैनी सवयी , नकार न ऐकायची वृत्ती, मोठ्यांबद्दल आद र / धाक नसंणं , अति लाड, घरात संस्कार करायला आजी आजोबा नसणं, हिंसक खेळणी वापरणं , इन्टरनेट, आजचे टीवी चॅनल्स ही सारी कारणं कमी अधिक प्रमाणात असली तरी चर्चा सतत आजची पिढी / आजकालची मुलं अशावर घसरते आहे असं वाटतं..

साधारण छत्तीस सदतीस वर्षांपूर्वीच्या साध्यासुध्या पुण्यात जक्कल सुतार इ. कॉलेज तरुणांनीच हत्याकांड घडवली होती... त्यावेळीही अशाच चर्चा झाल्या असतील....

अशा वेळी प्रश्न पडतो की "समाजात गुन्हेगार वृत्तीचे लोक कायमच असतात का?" आणि प्रश्न आहे लवकरात लवकर / शक्य झाल्यास गुन्हा घडण्यापूर्वी त्यांना शोधण्याचा .... ( गुन्हेगार का बनतो? जनुकीय आणि पर्यावरणीय अशी दोन्हीही कारणे असावीत... कान्सन्ट्रेशन फक्त पर्यावरणीय कारणांवर होते नेहमीच)

तिमा's picture

27 Apr 2012 - 8:47 pm | तिमा

भडकमकर मास्तरांशी सहमत.
अगदी लहानपणापासून माझ्या भोवतालची मुले व आत्ताच्या पिढीतली लहान मुले यांचे प्रदीर्घ निरीक्षण मी केले आहे. मुलांना कसे वातावरण मिळते हे महत्वाचे आहेच पण जनुकीय कारणांमुळे काही लहान मुले जन्मतःच दुष्ट प्रवृत्तीची असतात हे मी अनेक अनुभवांवरुन सांगू शकतो. अशा मुलांवर जास्त लक्ष ठेवून त्यांचे वागणे सुधारण्याचा खास प्रयत्न त्यांच्या पालकांनी केला पाहिजे.

संजय क्षीरसागर's picture

27 Apr 2012 - 4:01 pm | संजय क्षीरसागर

त्या चर्चासत्रानुसार काय प्रमुख कारण आहे मुलं बिघडण्याच?

इरसाल's picture

27 Apr 2012 - 4:49 pm | इरसाल

एक उत्तम प्रकल्पाबद्दल माहिती दिल्याबद्दल.

परा,
एका ज्वलंत विषयाला तुम्ही यानिमित्ताने तोंड फोडले आहेत.

अनेक तज्ज्ञांनी दोन पिढ्यांमधील संवाद का तुटत असतो हे देखील समजावले. >>>>
हेच जाणून घेण्याची आज खरी गरज आहे.

दोन पिढ्यांमधील संवाद तुटत असतो, तसाच आज व्यक्तीव्यक्तीतील संवादही तुटत चालला आहे. समोरच्या माणसातील चांगुलपणा नजरेसच पडू नये इतके माणसांचे वर्तन अनोळखी माणसांप्रती कोरडे होत चाललेले आहे.

समोरची व्यक्ती मोठी असल्याने आपले अहित कसे चिंतेल इथपासून, तर कुठलाही परका माणूस आपले अहितच करेल इथपर्यंत, मुलांना वेगवेगळ्या विचारांत वाढवले जात असते. जग जसे आहे तसे त्याकडे पाहता यावे हीच खरी गरज आहे. घराबाहेर जातांना मित्राच्या फोनवरील आमंत्रणाचा स्वीकार करणार्‍या शुभमला त्यांच्या संगतीत स्वतःस कसे जपावे हे उमजले नाही, साधता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

http://nvgole.blogspot.in/2012/04/blog-post_04.html#links
ह्या दुव्यावर मी मुलांना खुल्या जगाकडे खुल्या नजरेने पाहत असता स्वतःस सांभाळावे कसे हे शिकवण्याकरता, त्यांना आजवर पुरवलेली सुरक्षेची कवच-कुंडले कायम स्वरूपी न राखता हळूहळू कशी काढून घ्यावीत ह्याबद्दल लिहिले आहे.

चांगली माहिती व चांगला चर्चा विषय.
भडकमकर मास्तरांच्या प्रतिसादाशी भयंकर सहमत.
माझे टंकनकष्ट वाचवले त्यांनी.
आईवडीलांची 'मुलांसाठी' झटण्याची किती तयारी आहे हेही पहायला हवे.
माझ्या मुलाला मागच्या वर्षी दुसर्‍याच शाळेतल्या मुलाकडून टाऊनच्या मैदानावर त्रास सुरू झाला. आमचाही वीर काही साधा नाही. उगीच दुसर्‍यांच्या मुलाला कशाला नावं ठेवायची म्हणून दहा एक दिवस मुलाच्या तक्रारी ऐकत राहिले. त्याकाळात एकदा तो मुलगा कोण आहे (भारतीयच आहे), त्याच्या आईशी ओळख करून घेणे ई. प्राथमिक प्रकार केले. मैदानावर हजर राहणे, नक्की कसला त्रास होतो याची चौकशी झाली आणि महिनाभरात अभ्यासात स्वारी गडगडली. घरात चिडचिड,तब्येत खालावलेली, मनातले न सांगणे असे केले. आम्ही समजावून, गोड बोलून , रागावून उपयोग नाही. मग मात्र आमची झोप उडाली. दोन महिन्यांनंतर मॉलबाहेर गाडी पार्क केली आणि बघते तर हा ढसाढसा रडायला लागला. मनावरचे ओझे असह्य झाले. बाबांनी मग संधी न सोडता सगळे काही बोलू दिले आणि तो मुलगा धमक्या देतो, मारून टाकीन म्हणतो, शिव्या देतो, मारतो अशी मोठी यादी सांगितली. त्या मुलाला शाळेत असेच काहीसे वागल्यामुळे एव्हाना १५ दिवस काऊन्सिलींग आणि आईवडीलांची सक्तीची देखरेख यावर ठेवला होता. काउन्सेलर मैत्रिणीच्या सल्ल्याने आमच्या मुलाचे पुढे सगळे एखाद्या महिन्यात निस्तरले पण 'त्या' मुलाची नंतर दया येऊ लागली. आईवडीनांच्या करियरच्या हट्टापायी या मुलाची मनस्थिती फारच ढासळलेली असल्याचे लक्षात आले. सगळ्यांचेच असे होत नाही पण हे एक उदाहरण. नाहीतर करियरवाले आईवडील धावून यायचे अंगावर.

भडकमकर मास्तर's picture

27 Apr 2012 - 9:44 pm | भडकमकर मास्तर

या गोष्टीमुळे असेच शाळेत धमकावणार्‍या आणि मारणार्‍या काही मुलांची आठवण झाली... काही दिवसांसाठी माझीही अशीच अवस्था झालीहोती असे आठवते...

आपल्याकडेही ( देशावर )सगळ्या शाळांमध्ये कौन्सेलर असतात का?
असल्या मुलांना शोधून कढायची प्रोसेस कशी असते / असावी?

मितान ही आपल्या मिपावर असलेली सदस्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सेलींग (बहुधा पुण्यात) करते असे तिच्या लेखांवरून समजले. आम्ही आमच्या मुलाला आधी डॉ. कडे नेऊन मग त्यांच्या सल्ल्याने काउन्सेलींगसाठी न्यायचा विचार केला होता पण त्या आधी एका काउन्सेलर मैत्रिणीला (डॉ. गौरीला) प्रकार सांगितला असता तिनेही आम्हाला डॉ. कडे जाण्यास सुचवले पण त्याआधी मुलाला सुरक्षित वाटावे म्हणून स्कूलबसमध्ये चढण्यापासून ते उतरेपर्यंत निरिक्षण करावयास सुचवले. दुसर्‍या शाळेतला हा मुलगा स्कूलबसमधून उतल्याक्षणीच बखोट धरून लहान मुलांना पिडताना पाहिला आणि नवर्‍याने त्याच्या वडीलांचा फोन क्र. मागितला. त्याने टाळाटाळ केल्यावर व नंतर भेटताक्षणीच माझ्यापासून पळ काढणार्‍या आईवडीलांनाच लक्ष देण्यास फारसा इंट्रेस्ट नव्हता हे लक्षात आले. मग अजूनही मुले खेळत असताना मैदानावर चक्कर मारणे, स्कूलबसमधून उतरून मुलगा घरी येईपर्यंत लांबूनच बघत राहणे. एकंदरीत मुले या प्रकारांना योग्य रितीने तोंड देतात की नाही ते पाहणे. सगळीकडे आपण पुढे आले पाहिजे असे नव्हे. तसेच आता माध्यमिक शाळेत जाणार असल्याने बुलींगला तोंड कसे द्यायचे यावर (शाळेतच) दोनेक महिने (अठवड्यातून एकदा याप्रमाणे)वर्ग घेतले त्याचा खूप उपयोग झाला. आपल्यासारख्या मित्रांचा गट करून सध्या न घाबरता (किंवा तसे न दाखवता) खेळणे चालू असते. शिवाय बाबांचे घड्याळ घालून फिरल्याने त्याला बरे वाटते म्हणून तसे करतो.;) मुलेच नंतर बारीकसारीक गोष्टींवर उपाय शोधून काढतात पण लक्ष मात्र ठेवण्याला पर्याय नाही. त्या मुलाच्या आईवडीलांचे सहकार्य मिळणार नाही हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Apr 2012 - 3:55 am | llपुण्याचे पेशवेll

मलाही एकदा लहानपणी वर्गातल्या एका मुलामुळे आणि त्याच्या मुलांमुळे असा त्रास झाला होता. मी दादाला (जो माझ्या वरच्या वर्गात होता) जाऊन सांगितले. मग दादाने एकट्याने त्या चौघा जणाना बडव बडव बडवले. नंतर ती मुले आमच्या कंपूत सामिल होऊन वैर संपले. इति.
थोडक्यात. प्रत्येक कुटुंबात एकाशी दुसरा(री) असावीत. :)

शिल्पा ब's picture

27 Apr 2012 - 10:54 pm | शिल्पा ब

तुमच्या उदा. मधील मुलाला मदतीची खुप गरज आहे. कारण अशानेच व्हर्जिनीया टेक वगैरेसारख्या घटना घडतात. ते त्याच्या घरच्यांपर्यंत पोहोचलं तर देवाचे आभार. आपल्या करीअर पाई बाळाचा बळी का द्या? :(

तुमच्य लेकाला याच्यापासुन दुरच रहायला सांगा.

दुसरं म्हणजे नुसतं दादागिरी करायला म्हणुनसुद्धा मुलं अशा धमक्या देतात. त्यामुळे दुसराही तितकाच खमक्या आहे म्हंटल्यावर वातावरण निवळते..बहुतेकदा.

वरती मास्तर अन तिमा यांच्याशी प्रचंड सहमत आहे.

मुळ लेखाबद्दलः उत्तम काम. आपल्या आई बापाचा आपल्यावर विश्वास आहे हा एक मोठा आधार असतो. तोच डळमळला तर आपल्या मुलावर/ मुलीवर विनाकारण काहीही संशय घेतला जातो अन खास करुन मुलांचे मानसिक संतुलन धोक्यात येते हे भारतीय आई बापांच्या ध्यानात येईल तो दिवस सोन्याचा!

रेवती's picture

27 Apr 2012 - 11:19 pm | रेवती

सहमत.

प्रभाकर पेठकर's picture

27 Apr 2012 - 8:21 pm | प्रभाकर पेठकर

मुलं अगदी लहान असल्यापासून त्यांच्याशी संवाद असला पाहीजे असे मला वाटते. मी तसा प्रयत्न करत असतोच. अभ्यास करत नाही (त्या बाबतीत आळशी आहे) ह्या व्यतिरिक्त आमची काहीच तक्रार नाही. बाकी, 'हल्लीच्या पिढी'तले काही सर्वसामान्य दोष दिसून येतात पण ते तितकेसे गंभीर नाहीत आणि ते कायम राहणार नाहीत अशी आशा आहे.

सानिकास्वप्निल's picture

27 Apr 2012 - 9:54 pm | सानिकास्वप्निल

उत्तम माहिती व लेख :)

दोघांचे ही कौतुक वाटते. धन्यवाद.
पॅपीलॉन कोशातुन बाहेर येतानचा प्रवास खरोखरीच खुप गुंतागुंतीचा + नाजुक् + धोकादायक असतो.

पैसा's picture

27 Apr 2012 - 11:26 pm | पैसा

छान वृत्तांत. रॅगिंगमुळे आय आय टी सोडून आलेल्या आणि सगळं आयुष्य बिघडून गेलेल्या एका मुलाची केस आमच्या नात्यात घडली आहे. मुलं एवढी मोठी झाल्यानंतर अशी घाबरली तर त्याना कसं सावरणार प्रश्नच आहे.

माझ्यामते एकदम मोठं झाल्यावर घाबरत नसणार तर लहानपणापासुनच (शाळकरी असल्यापासुन) कोणालाही न घाबरता किंवा प्रेशरला न घाबरता रहायची शिकवण दिली तर असा मेल्टडाउन(?) होणार नाही.

घाबरुन घरीच बसलं तर कसं होणार? आयुष्याला तोंड तर द्यावच लागतं.

Pearl's picture

28 Apr 2012 - 5:56 am | Pearl

लेख आवडला.
अशा प्रकारच्या चर्चासत्रांना जायला हवं खर तर.
हे चर्चासत्र सर्वांसाठी खुले होते का फक्त आमंत्रितांसाठी होते.

अमितसांगली's picture

28 Apr 2012 - 9:20 am | अमितसांगली

विषय खूपच गंभीर आहे...व लेखही उत्तम आहे....

आजचे युग हे वेगवान व धावपळीचे आहे. सर्व भौतिक सुखसोयी पायाशी लोळण घेत आहेत. गाडी, पैसा आहे, वेगवान रस्ते, प्रगत तंत्रज्ञान आहे, चकाकणारे मॉल्स आहेत, सगळीकडे शीला आणि मुन्नी पण आहेत, इंटरनेटचे मायाजाल आहे. पटकन कुणाशीही संवाद साधता येतो. आवडत गाण किंवा गेम बटन दाबताच व्याकूळ न होता मिळतंय. सर्व जगच जणू आपल्या मुठीत आहे. पण आपल्याकडे वेळ नाही. आपल्यात संवाद नाही. आपल्याला स्वताशीच संवाद साधायला वेळ नाही, जगाशी तर नाहीच. कोणी खात्रीपूर्वक सांगू शकेल का....माझ्याकडे ओंजळभर शांतता नि समाधान आहे ...

पैशाने सर्व सुख विकत घेता येतात असा आपला गोड गैरसमज आहे. आज कुठेही एकत्र कुटुंबपद्धती नाही. पालक दिवसभर नौकरी करतात. मुलांची काळजी घेण्यास, त्यांच्याशी प्रेमाचे चार शब्द बोलण्यासही त्यांच्याकडे वेळ नाही. लहान मुलांचे आयुष्य बागेत किंवा सवंगड्याबरोबर न जाता काम्पुटर गेम, टी.व्ही.,बर्गर,पिझ्झा नि एकांतात चालले आहे. लहान वयातच त्यांना प्रोढासारखे वागावे लागत आहे. पालकांनी वेळेची भरपाई म्हणून जे मागेल ते देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना कोणी नकार दिला कि हिंसक प्रवृत्ती वाढत आहेत.

आज किती घरी मुलांना शुभंकरोती, गणपती स्त्रोत तसेच गोष्टीमधून संस्काराचे धडे दिले जातात? मोठ्या व्यक्तींचा सन्मान करायला शिकविले जाते? किती जणांच्या घरी पुस्तकांचे समृद्ध कपाट आहे? किती जण आपल्या मुलांना व्याख्यान, पुस्तक प्रदर्शन किंवा चांगले नाटक बघायला घेऊन जातात ? घरी देवाची गाणी, अभंग किंवा उत्तम संगीत असते? कितीजण परिवाराबरोबर सहभोजन, सहप्रवास करतात ? दुर्दैवाने यातील बऱ्याच प्रश्नाची उत्तरे नाही अशीच आहेत. हेच सर्व अप्रत्यक्षरित्या जबादार असते अशा मनोवृत्तीला.

शिल्पा ब's picture

28 Apr 2012 - 9:45 am | शिल्पा ब

<<<आज किती घरी मुलांना गोष्टीमधून संस्काराचे धडे दिले जातात? मोठ्या व्यक्तींचा सन्मान करायला शिकविले जाते? किती जणांच्या घरी पुस्तकांचे समृद्ध कपाट आहे? किती जण आपल्या मुलांना व्याख्यान, पुस्तक प्रदर्शन किंवा चांगले नाटक बघायला घेऊन जातात ? घरी देवाची गाणी, अभंग किंवा उत्तम संगीत असते? कितीजण परिवाराबरोबर सहभोजन, सहप्रवास करतात ?

आम्ही स्वतः अन ओळखीतले बहुतेक लोक करतात. अहो साहेब, काही अपवाद म्हणजे नियम नसतात. असं काही झालं की लगेच " संस्कृती बुडाली" ,"आजकाल हे असंच" वगैरे म्हणायला नको. फक्त आपल्या मुलांशी नियमीत सुसंवाद साधला पाहीजे..क्वालिटी टाइम दिला पाहीजे. मुलांना पालकांचा विश्वास जर वाटला नाही तर बरेच प्रश्न निर्माण होतात.

सुत्रधार's picture

28 Apr 2012 - 2:35 pm | सुत्रधार

सहमत, गाढ विश्वास आणि अतुट नातं निर्माण झालं पाहिजे..

आणि वृत्तांत सगळे छान आहे.

अमोल खरे's picture

28 Apr 2012 - 7:05 pm | अमोल खरे

माझ्या माहितीत घडलेली एक घटना. ठाण्यात घडलेली. एक दिवस माझा मोठा भाऊ ऑफिसात निवांत काम करत असताना त्याची बॉस त्याच्याकडे आली आणि मी घरी जातेय, काही प्रॉब्लेम आले तर सांभाळुन घे असं म्हणाली. तिच्या चेह-यावरचे टेन्शन पाहुन माझ्या भावाने "काही सिरिअस आहे का"? असे विचारले तर उद्या सांगते म्हणुन निघुन गेली. नंतर दुस-या दिवशी तिने सर्व हकीकत सांगितली. झालं असं की ही बॉस आणि तिचा नवरा असे दोघेही उच्चपदावर काम करणारे होते. घरात अफाट पैसा. मुलाकडे लक्ष नाही. तर त्यादिवशी शाळेतुन हिला फोन की तुमचा मुलगा आज शाळेत आलाच नाही म्हणुन. हिने घरी फोन केला तर मोलकरीण म्हणाली की हा तर शाळेत गेलाय. (९वी मध्ये आहे). हिने त्या मुलाच्या मोबाईल वर फोन केला तर मोबाईल स्विच्ड ऑफ. मग हिचा धीर कोसळला आणि ही आणि हीचा नवरा शाळेत पोहोचले. तिथे ह्यांच्यासारखे किमान १५-२० जण होते. सगळ्यांची केस सेम. आणि त्याच सुमारास ठाण्यात काही किडनॅपिंगच्या केसेस झाल्या होत्या. म्हणुन हे सर्व आणखी टेन्शन मध्ये. भरीस भर म्हणुन ह्या सर्व कारट्यांचे मोबाईल पण बंद. पण नशिबाने ह्या बॉसच्या नव-याचा एक जवळचा मित्र एका मोबाईल कंपनीत टोप पोजिशनला होता. आणि ह्याच्या मुलाचा मोबाईल त्याच कंपनीचा होता. ह्या कंपन्यांकडे एक सोय असते ज्याने त्यांना मोबाईल बंद असला तरी त्याचे लोकेशन ट्रेस करता येते. त्यानुसार ठाण्यातल्या एका थिएटर चा पत्ता मिळाला. ही सर्व लोकं तिथे गेली आणि त्या थिएटर च्या मालकाला सांगुन तो शो मध्येच थांबवला आणि पाहिलं तर ही पोरं तिथेच होती. सर्व जण नॉर्मल कपड्यांमध्ये (शाळेच्या युनिफॉर्म मध्ये नाही). म्हणे युनिफॉर्म मुळे आम्हाला आत सोडलं नसतं म्हणुन दप्तरात साधे कपडे आणले आणि एका मित्राच्या घरी (ज्याकडे कोणीही नसते) त्याकडे चेंज केले. असे प्रकार त्यांनी ह्याआधीपण केले होते. फक्त ह्यावेळी शाळेने पालकांना फोन केल्यामुळे ते पकडले गेले. हे सर्व ऐकल्यावर सर्व पालक अक्षरशः सुन्न झाले होते. सर्व मुलं चांगल्या घरची. पालक सुशिक्षित तरीही असे झाले. शालेचे प्रिन्सिपॉल ह्या सर्वांना रस्टिकेट करायला निघाले होते पण ह्या सर्व पालकांनी हातापाया पडुन विनवणी केली म्हणुन नुसत्या वॉर्निंग वर सुटले. इतकी लहान मुले इतकी लपवाछपवी करु शकतात हे मी कधीही इमॅजिन करु शकलो नसतो.

आणखी एका केस मध्ये मी शिकत असलेल्या शाळेतली काही मुलं नॅशनल पार्क मध्ये गेली होती. आमच्या पीटीच्या सरांना कळल्यावर ते लगेच तिथे गेले. पण ती मुलं युनिफॉर्म मध्ये होती. त्यामुळे लगेच पकडले गेले. तिथे काहीतरी धबधबा आहे. ह्या धबधब्यावर दरवर्षी अनेक लोकं मरतात. तेथेच ही मुले खेळत होती. नशिबाने आमच्या सरांनी त्यांना परत आणलं पण काही झालं असतं तर ? ही इतक्या लहान वयाची मुलं हे सर्व कुठुन शिकतात हे न कळण्यातील आहे.

शिल्पा ब's picture

29 Apr 2012 - 2:49 am | शिल्पा ब

अरे बापरे!!! माझं बाळ पण आता मोठं होतंय अन हे असं वाचलं की खुपच टेन्शन येतं.

अशा विधायक उपक्रमांचे नुसतेच धावते समालोचन देण्यापेक्षा सविस्तर वृत्तांत दिला तर बरे.