नुकताच केम्ब्रिज ला जाण्याचा योग आला. आला म्हणजे काय आणलाच!
भारतात परतण्यापूर्वी २/४ महिन्यात राहिलेल्या ठिकाणांना भेट देण्याचा विचार आहे. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज पहायची इच्छा होतीच. त्या अंतर्गत केम्ब्रिज विद्यापीठ पहायचे ठरले. अशा गावाना धावती भेट देणेच परवडते. एक तर युरोपातले देश लहान, त्यामुळे एकदिवसीय भेट शक्य असते आणि तिथे रहाणे महाग पडते हे पण एक मोठे कारण आहे.
सकाळी जाऊन ९-१० वाजता पोहोचायचे, बशीतुन किंवा चालत-चालत गाव बघायचे, मधेच दुपारी कुठे तरी चरायचे आणि पाच च्या सुमाराला परत फिरायचे. कुणी सहकारी तयार झाला तर ठीक, नाहीतर एकटेच!
मग बस चे जालावर आरक्षण करून एका शनिवारी दाखल झालो. भौगोलिक स्थान इंग्लंडच्या मधोमध असल्याने कुठूनही दोन तासात पोहोचता येते. ऑक्सफर्ड ते केम्ब्रिज १३० कि. मी. साठी सतत शटल बस सेवा सुरु असते. बस वा रेल्वेने मध्यवर्ती असलेल्या मिल्टन येथे आले की यापैकी कुठेही जाणारी बस पंधरा मिनिटात मिळते.
ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज बाबत खूप उत्सुकता आहे , कारण त्यांचे रस भरीत वर्णन शाळेत असताना इंग्रजी च्या तासाला बरेच ऐकले होते. . केम्ब्रीज विद्यापीठ म्हणजे एक मोठे आवार असेल असा समज होता. पण इथे एकतीस महाविद्यालये मिळून विद्यापीठ झाले आहे. किंग्ज आणि क्वीन्स महाविद्यालय, डार्विन , चर्चिल, ह्युजेस वगैरे बरीच महाविद्यालये आहेत. साधारण हजार वर्षांचा इतिहास असलेल्या या संस्था अतिशय सुस्थितीत ठेवल्या आहेत. गल्ली बोळातून तसेच काही मोठ्या रस्त्यातून फिरावे लागते ही सर्व कॉलेजेस बघायला.
जालावरून थोडीफार माहिती घेतली होतीच. विद्यापीठाच्या संकेत स्थळावर छान माहिती आहेच.
प्राचीन काळी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास, भाषा शिकवणाऱ्या विद्यापीठात आता इंजीनियारिंग आणि व्यवस्थापन इ. नव्या शाखा जोडल्या आहेत. केम्ब्रिज चा उदय आता फार्मसी आणि संबंधित विषयांचे संशोधन केंद्र म्हणून होतो आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी इथे आपली केंद्रे उघडली आहेत आणि हे औषध संशोधनाचे हब झाले आहे. साहजिकच भरपूर भारतीय इथे स्थायिक होतानां दिसतात.
एकदा परिसरातून चक्कर मारणे हा मोठा आनंददायक अनुभव होता.
चला तर मग, थोडेसे फोटो पाहूयात!
१.
केम्ब्रिज साठी जाणारी बस.
२.
केम्ब्रिज चे पहिले दर्शन
३.
कॅम नदी
४.
कॅम नदी आणि त्या नदीवरचा हा पूल म्हणून म्हणे केम्ब्रिज नाव पडले. हे नवीनच ऐकले. या पुलावर कुणाचेही नाव नाही याचे आश्चर्य वाटले. किमान कुणी आणि कधी उद्घाटन केले कळले असते! पण चौदाव्या शतकात तेवढी प्रगती झाली नसावी.
मागच्या शतकात जिकडे तिकडे राणीने केलेली उद्घाटने दिसतात. त्यात स्कॉटलंड चे पूल, बर्मिंघम विमानतळ इतकेच काय, आमच्या कंपनीची इमारत सुधा राणीच्या हस्ते!
५.
केम्ब्रिज नगरपालिका : इथे कुणाचेच होर्डिंग नाही ! कसे काय रहातात देव जाणे..
६.
सहसा कुठे न दिसणारे गोल आकाराचे चर्च..
७.
शनिवार असून ही काही कार्यक्रमामुळे हे महाविद्यालय चालू आहे. पालक आणि विद्यार्थी जमले होते. तर व्हायोलीन च्या साथीत काही जण समूहगान करत होते. एकूण काय सारे आनंदी वातावरण होते.
८.
एका इंग्रजाने ' न्यूटन चे सफरचंदाचे झाड ' इथे ( ट्रिनीटी कोलेज बाहेर ) आहे असे सांगितले होते . म्हणून अंदाजाने फोटो घेतला. झाड तर सफरचंदाचे होते. शंका होतीच. मग विकी वर पाहिले तर ते झाड वेगळेच आहे. म्हणजे मी भलत्याच झाडाचा फोटो घेतलाय हे कळले. असो, कळले हेही नसे थोडके. असे इतर काही वेळा पण होत असेलच! असो!
९.
केम्ब्रिज विद्यापीठ म्हणजे एक इमारत अशी नाहीच असे कळले. सगळ्या संस्था मिळून एकत्रित हे विद्यापीठ.
हे मागडेलीन. १४२८ मधले!
१०. हे किंग्ज आणि क्वीन्स कॉलेज. उजेड कमी झाल्यामुळे हा स्पष्ट आलां नाही.
११. प्रसिध्द कॉर्पस घड्याळ. निळे एल ई डी वेळ दाखवत आहेत. याला काटे नाहीत. त्या ऐवजी एल इ डी च्या सहाय्याने ते वेळ दाखविते. एकेक वर्तूळ तास, मिनिट, सेकंद दाखविते.
याच्याविषयी अधिक माहितीसाठी कृपया विकी लिंक पहा.
इतके सारे पहाता पहाता संध्याकाळ झाली, पावसाची लक्षणे पाहून भ्रमंती आटोपती घेऊन बस कडे निघालो...आता ऑक्सफर्ड ला कधी जाणे होते बघू.
जाणकारांकडून अधिक मार्गदर्शन आणि माहितीची अपेक्षा !
प्रतिक्रिया
14 Apr 2012 - 12:57 am | चित्रा
फोटो छान.
>>जाणकारांकडून अधिक मार्गदर्शन आणि माहितीची अपेक्षा !
मिपावर सदस्य असलेल्या पुष्करिणी याबद्दल अधिक सांगू शकतील.
14 Apr 2012 - 1:20 am | शिल्पा ब
मस्त. युरोपियन गावं वगैरे फोटोत अगदी रोमँटीक दिसतात हे निरीक्षण आहे.
14 Apr 2012 - 3:16 am | रेवती
सगळे फोटो मस्तच.
कॅम नदीचा अगदी आवडला.
तुम्हाला पुलाचे उद्घाटन, होर्डींग्जची बरीच आठवण येत असल्याचे समजले.;)
14 Apr 2012 - 6:11 am | बबलु
मस्त फोटू.
14 Apr 2012 - 10:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त फोटू आणि माहिती. धन्स.
-दिलीप बिरुटे
14 Apr 2012 - 11:12 am | मुक्त विहारि
आणि
उत्तम फोटो..
14 Apr 2012 - 6:02 pm | यकु
फोटो आवडले.
२२१ बी, बेकर स्ट्रीट वरही जाऊन या.
15 Apr 2012 - 5:17 pm | खेडूत
हो, धन्यवाद,
तिथेही जाऊन आलोय. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.