मला खालील प्रश्न खूप वर्षांपासून पडलेला आहे. इतकी वर्षे मनातच ठेवला होता. मिपाकर नक्की उत्तर देतील असा विश्वास आहे.
मी बऱ्याचदा कोकणात फिरायला जाते. माझा एक मामा भालावली (राजापूर जवळ) मध्ये राहतो. एक दोन वर्षांनी त्याच्याकडे पण चक्कर होते. कधी सावंतवाडी, मालवण इत्यादी ठिकाणी देखील फिरणे होते. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे
"कोकणातील माणूस हा अतिक्शय आळशी माणूस वाटतो. म्हणजे आपली परिस्थिती सुधारायला हात पाय हलवायला पाहिजे ह्या गोष्टी वर विश्वासच नसावा वाटते. एक प्रकारचा भकासपणा म्हणा किंवा उदासपणा हा अगदी रक्तातच भिनलेला आहे. घरा भोवतीचा परिसर हा स्वच्छ ठेवणे म्हणजे काही पाप करतो असे वाटत असावे. मला आठवते ४ - ५ वर्षांपूर्वी मी काश्मीरला गेले होते. (येथे एक उल्लेख करावासा वाटतो. केसरी च्या भूलथापाना बळी पडून मुंबईतील उन्हाळा पासून थंड हवेच्या ठिकाणी जावे म्हणून गेलो होतो. श्रीनगरला गेलो तेव्हा आपण काश्मीर मध्ये आहोत कि मुंबई मध्ये असा प्रश्न पडला होता. लहानपणी अभ्यासाच्या पुस्तकात वाचले म्हणून गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने गेलो तर तिकडे एक फुल सुध्धा दिसले नाही आणि पहलगाम ला जो काही थोडासा बर्फ शिल्लक राहिला होता त्यात घोड्यांनी केलेल्या प्रातर्विधी शिवाय काही नव्हते. तेव्हा तुम्ही केसरी किंवा तत्सम tour operators ने केलेल्या भूलथापाना शक्यतो बळी पडू नका.
माफ करा थोडे विषयांतर झाले. सांगायचा मुद्दा हा होता कि सर्वसामान्य काश्मिरी माणूस हा त्याच्यावर आलेल्या संकटांमुळे मुळातच पिचलेला होते. कधी काय होईल ह्याचा नेम नाही. उद्याची कसलीच शाश्वती नाही. फिरायला आलेल्या माणसांनी काही खरेदी केली तर दोन घास खायला मिळतील अशी परिस्थिती. अश्या परीस्थितदेखील ह्या सर्वसामान्य लोकांची घरे स्वच्छ, आजूबाजूचा परिसर साफ आणि कोकणात आढळून येणारा उदासपणा नसणे हे एक वैशिष्ट जाणवले मला.
ह्या उलट आपल्या कोकणात कितीतरी करण्यासारखे आहे पण काही ना करता गोष्टी होत आहेत ना तर होऊ दे हा स्थायीभाव आहे आपल्या कोकणी माणसाचा असे वाटायला लागले आहे. कितीतरी गुजराथी किंवा साउथ इंडिअनस किंवा अगदी भय्यानि आपला मोर्चा कधीच वळवला आहे कोकणाकडे आणि उद्या आपला कोकणी माणूस काही ना करता आपल्या पोटा पानाच्या साधनांवर इतरांनी कब्जा केला आहे हे एखाद्या स्थितः प्रतन्या सारखा पाहत बसेल.
माझ्या मामाच्या घरासमोर मोठी वाडी आहे. सर्वत्र नुसता कचराच कचरा. मी समजू शकते कि प्रत्येक वेळी साफ सफाई शक्य नसते पण जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा थोडा आपला परिसर स्वच्छ ठेवायला काय हरकत आहे. मी मामला जेव्हा विचारले तेव्हा तो म्हणाला कि ह्या कचर्याचे पुढे मागे आपोआप खत बनेल. कदाचित खरे असेलही पण त्यामुळे सर्व भकास वातावरण निर्मिती होते त्याचे काय. देवळात पूल टाकले तर सर्वत्र काळोख आणि एक प्रकारचा डोक्यात जाणारा विचित्र वास. कधी बाहेर पडतो असे वाटते. कधी कोणत्या हॉटेल मध्ये जाऊन राहायचे म्हटले तर छानसे हॉटेल मिळेलच ह्याची guarantee नाही".
ह्या लेख बद्दल माफ करा. माझा हा पहिलाच लेख आहे आणि तो साहित्य मध्ये पोस्ट करायचा कि चर्चा मध्ये हे देखील माहित नाही आहे. तसेच काहीना हा लेख एकांगी किंवा पूर्व ग्रह दुषित वाटू शकेल. किंवा अगदी negative वाटू शकेल पण खरेच हा प्रश्न मला गेले काही वरचे खूप छळत आहे. येवा कोंकण आपलाच असा किंवा कोंकणाचा कॅलीफोर्णिया वगैरे राजकीय घोषणा ठीक आहेत पण मला वाटते जो पर्यंत कोंकणी माणसाची मानसिकता जो पर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण असेच मागासलेले राहणार.
मला कोणालाही दुखवायचे नव्हते आणि कदाचित आपल्याला आलेला अनुभव वेगळा असू शकेल. आणि लेख खूप लांबला आहे ह्या बद्दल देखील क्षमस्व.
प्रतिक्रिया
12 Apr 2012 - 12:26 pm | गवि
कोंकण आणि अस्वच्छ..? विशेषतः मूळ कोंकणी माणसांच्या स्वभावात अस्वच्छपणा?
प्र..चं..ड.. गैरसमज..
आळशीपणा म्हणून जे काही दिसलं असेल तो आळशीपणा नसतो.. ती एक लाईफस्टाईल आहे.
छ्या छ्या छ्या छ्या...
(कदाचित) प्रचंड प्रतिसादासाठी जागा राखीव..
12 Apr 2012 - 1:38 pm | कपिल काळे
सहमत !!
कोकणी आणि अस्वच्छ ?? गैरसमज आहे.
आळशी असेल कदाचित पण अस्वच्छ ?? बिल्कुल नाही.
एका माणसावरुन सगळ्यांना नका जोखू .
12 Apr 2012 - 12:33 pm | मोदक
एक दुसर्या अनुभवावरून निष्कर्श काढणे चुकीचे आहे असे वाटते.
कोकणातला माणूस आळशी आहे यावर पण विश्वास नाहीये माझा..
डॉ बाळ. जयगड का कुठेतरी प्रायवेट डॉक बांधणारे भटकळ / भाटकर.. ते दिवसेंदिवस मासेमारीकरता समुद्रात जाणारी बरीच मंडळी खूप कष्टाचे जीवन जगतात.
लेखाचा नीट उद्देश कळाला नाही. :-(
12 Apr 2012 - 12:37 pm | परिकथेतील राजकुमार
लेख काय पटला नाही !
प्रत्येक शहराची, गावाची, पेठेची, वाडीची आपापली एक जीवनशैली असते, आणि तीच त्यांची खासियत असते. उगाच दुसर्याचे बघून ते बदलायला जाऊ नये. अन्यथा 'घर का न घाट का' अशी अवस्था होते.
12 Apr 2012 - 3:09 pm | विजुभाऊ
परा शी सहमत आहे. लोक जेंव्हा पुण्याला , मुळा मुठेला नावे ठेवतात तेंव्हा असेच वाटते.
नागझरी ते संगम असा एक जलवाहतूक पर्यटन मार्ग काढायचा नवा क्रांतीकारी विचार पुण्यात जोर धरतोय
12 Apr 2012 - 7:22 pm | रमताराम
काय सांगता काय, होड्या सोडण्याचं कंत्राट तुम्हाला मिळालेलं दिसतय.
12 Apr 2012 - 12:42 pm | Madhavi_Bhave
खरे आहे. कष्टमय जीवन आहे आणि काही सन्माननीय अपवाद देखील नक्कीच आहेत. मी सर्व साधारणपाने आढळून येणार्या स्थितीबद्दल मत मांडले आहे. कोंकणी माणूस हा फणसा सारखा आहे असे म्हणतात म्हणजे बाहेरून काटेरी पण आतून गोड. मला थोडे वाईट वाटते एकंदरीत सर्वसामान्य माणसाच्या मानसिकतेबद्दल आणि ह्या गोष्टीवर नितांत विश्वास आहे कि हि परिस्थिती बदलू शकते. फक्त ते होत नाही हे शल्य आहे मनात म्हणून हा लेख लिहिला आहे.
12 Apr 2012 - 12:44 pm | परिकथेतील राजकुमार
पण का ?
परिस्थीती येवढी हालाखीची वा वाईट आहे का ? की ती बदलायलाच पाहिजे ?
12 Apr 2012 - 5:51 pm | किचेन
परिस्थिती हलाखीची वयाच्या आतच बदलली गेली पाहिजे.त्यांना ज्याअर्थी हा प्रश्न अनेक वर्ष छळतोय त्यार्थी त्यांना मामाच्या जमिनीव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी खटकल्या असणार.उगीचच आपण 'राज'करण्यांना निवडणुकीसाठी 'कोकणातून भय्ये आणि उडपी बाहेर गेलेच पाहिजेत ' असे विषय देण्यापेक्षा निसर्गरम्य कोकणचा एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा अशी मागणी केली पाहिजे.
12 Apr 2012 - 12:47 pm | मोदक
तू खूप Hypothetical बोलते आहेस असे वाटते आहे...
12 Apr 2012 - 12:44 pm | कुंदन
काहीही काय.
आमचा एक कोकणी मित्र आहे आणि तो प्रचंड उद्योगी आहे; इतका की आताशा जालावरही दिसत नाही तो.
12 Apr 2012 - 12:47 pm | परिकथेतील राजकुमार
हम्म!
कुंद्या, अजून तुझा मूळचा भिकारचोट स्वभाव गेला नाही म्हणायचा! :)
12 Apr 2012 - 1:11 pm | प्यारे१
अरे तो तुला दिसत नसेल.... पण आजदेखील जालावरदेखील 'उद्योग' सुरु आहेत असे ऐकिवात आहे!
12 Apr 2012 - 1:01 pm | कवितानागेश
कुणीतरी विदा जमवा रे, 'जालावरचे कोकणी माणसाचे प्रमाण' यावरचा.
त्यावरुनच ठरेल कोण किती उद्योगी आहे ते! ;)
12 Apr 2012 - 4:20 pm | मोदक
"उद्योगी" पणाची व्याख्या काय आहे गं माऊ..?
;-)
12 Apr 2012 - 7:13 pm | राजो
हा विदा काय प्रकार आहे?? उपक्रमावर सुद्धा ब-याच ठिकाणी दिसला हा शब्द...
12 Apr 2012 - 9:23 pm | मराठे
विदा = DATA
12 Apr 2012 - 1:19 pm | मृत्युन्जय
येथे एक उल्लेख करावासा वाटतो. केसरी च्या भूलथापाना बळी पडून मुंबईतील उन्हाळा पासून थंड हवेच्या ठिकाणी जावे म्हणून गेलो होतो. श्रीनगरला गेलो तेव्हा आपण काश्मीर मध्ये आहोत कि मुंबई मध्ये असा प्रश्न पडला होता. लहानपणी अभ्यासाच्या पुस्तकात वाचले म्हणून गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने गेलो तर तिकडे एक फुल सुध्धा दिसले नाही आणि पहलगाम ला जो काही थोडासा बर्फ शिल्लक राहिला होता त्यात घोड्यांनी केलेल्या प्रातर्विधी शिवाय काही नव्हते. तेव्हा तुम्ही केसरी किंवा तत्सम tour operators ने केलेल्या भूलथापाना शक्यतो बळी पडू नका.
तुमचे नशीब प्रचंड वाईट होते म्हणायचे. मी १ ते ७ मे मध्ये गेलो होतो काश्मीरात. प्रचंड बर्फ होता आणि श्रीनगरातदेखील १३-१४ तापमान होते. पुण्यापेक्षा प्रचंडच सुसह्य. पहलगाम मध्ये तर ३-४ होते आणि सोनमर्ग आणि गुलमर्ग बर्फाने वेढलेले होते :)
12 Apr 2012 - 1:25 pm | कुंदन
केसरी वाल्यानी गायब केला असेल बरफ तर ?
12 Apr 2012 - 1:44 pm | सूड
>>केसरी वाल्यानी गायब केला असेल बरफ तर ?
हो हो, तैंना विचारा त्यांना बर्फाचे गोळे दिले होते का कॉम्लिमेंटरी आहे असं सांगून !! ;)
12 Apr 2012 - 1:46 pm | गणपा
ऑफ सिझनला किंवा सिझन संपता संपता गेल्यावर काय हाती लागणार म्हणा. बहुतेक घोड्यांच आणि तुमच 'टायमिंग' जुळल असाव. :)
या वाक्याने तर एकदम भाईकाकांची आठवण झाली. ;)
बाकी अलिकडेच कुणी तरी पुणेकरांवर धागा काढला होता. हा लेख त्या लेखाची 'उत्तर'पुजा म्हणुन बांधलाय का ? ;)
12 Apr 2012 - 7:27 pm | रमताराम
बहुतेक घोड्यांच आणि तुमच 'टायमिंग' जुळल असाव.
मेलो. =))
बाकी अलिकडेच कुणी तरी पुणेकरांवर धागा काढला होता. हा लेख त्या लेखाची 'उत्तर'पुजा म्हणुन बांधलाय का ?
अलिकडे???? अरे पलिकडे , डावीकडे, उजवीकडे, मागे, पुढे सगळीकडे आहेत असे धागे. नवी ब्रिगेड जशी स्थापन होताक्षणी प्रसिद्ध होणारी पुस्तके बारकाइने वाचून वादग्रस्त लिखाण शोधायला एखाद्या स्वतःला तज्ञ म्हणवू इच्छिणार्याला कामाला लावते, तसा संस्थळावर आलेला नवा सदस्य टीआरपीसाठी डोळे झाकून पुण्यावर वा पुणेरी पाट्यांवर चारोळी धागा टाकतो नि पदार्पणातच शतक काढतो. एरवी कुठेही न दिसणारे जुनेपुराणे सदस्यही तिथे आपली चिरकी 'बासरी' वाजवून जातात. आहेस कुठं.
अवांतर: 'उत्तर'पूजा की 'छट' पूजा म्हणायचंय तुला?
12 Apr 2012 - 1:24 pm | शैलेन्द्र
प्रचंड असहमत..
इतर कोणत्याही बाबीवर चर्चा होवु शकते पण कोकन आणी अस्वच्छ? मि सगळा भारत फिरलोय, पण कोकणात जी नैसर्गीक स्वच्छता दिसते, ती पश्चीम किनारपट्टीचा अपवाद वगळता कुठेच आढळत नाही, ओरीसा, बंगाल इथले किणारपट्टीचे लोक मला तरी अस्वछ वाटले..
बाकी आळशीपणावर सविस्तर प्रतिसाद देतो नंतर..
12 Apr 2012 - 1:28 pm | गवि
शैलेंद्र यांच्याशी प्रचंड सहमत..
12 Apr 2012 - 1:47 pm | यकु
1. गावाकडे दिसणार्या काडीकचर्यातून भकासपणा, अस्वच्छपणा जाणवतो.
2. आणि हा भकासपणा, अस्वच्छपणा 'गावाकडचे' लोक दूर करीत नाहीत त्याबद्दल लेखिकेला वाइट वाटले एवढेच कळले.
पण
3. लेखिका कोकणात गेली असल्याने 'कोकणी माणूस अस्वच्छ' असे काहीतरी झाले आणि सगळा गेमच फिसकटला असावा.
12 Apr 2012 - 1:48 pm | बाळ सप्रे
कोकणी माणूस आळशी आहे इतपत ठीक आहे.. पण अस्वच्छ.. नाही पटतं.. कोकणातली गावं घाटावरच्या (घाटावरचा हा कोकणीच्या विरुद्धअर्थी शब्द आहे त्याला भौगोलिक सीमा नाहीत :-) ) गावांपेक्षा खूपच स्वच्छ आहेत ..
त्यात खास सावंतवाडीचं म्हणाल तर हे मत अजिबातच पटतं नाही..
आणि
केसरीच्या भूलथापा ??? नाही हो.. आमचा केसरीचा अनुभव तर एकदम पंचतारांकीत आहे!!
12 Apr 2012 - 1:49 pm | सूड
काय सांगता कोकणी माणूस अस्वच्छ ?? एक रुममेट होता माझा, माझा तर समज असा झाला आहे की लोक जितके घारे आणि गोरे तितका स्वच्छतेकडे कल अधिक. तो महाभाग वीकेंड आला रे आला की झाडू घेऊन घर झाडायला निघायचा, जनाची नाही पण मनाची तरी बाळगून आम्हाला झकत मदत करावी लागायची. किचनमध्ये इकडचा चमचा तिकडे नको. कहर म्हणजे खाताना जमिनीवर जरा काही सांडता कामा नये. एक ना दोन, तुमचा समज गंडलेला आहे.
12 Apr 2012 - 1:52 pm | प्रभाकर पेठकर
कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि अस्वच्छ तर अज्जिबात नाहीत. तिथले जीवन संथ आहे.
मुंबई सारखी धावपळ त्यांच्या स्वभावात नाही. आता, मुंबईच्या माणसाला एखाद्या खेड्यात ठेवा १५-२० दिवस तो भयंकर अस्वस्थ होईल. कारण, मुंबईची धावपळ, घड्यालाशी बांधिलकी अनुभवास न मिळाल्याने तो चुळबुळ करीत राहतो.
12 Apr 2012 - 2:05 pm | गवि
अत्यंत अचूक शब्दात नेमका प्रतिसाद.. अनेक धन्यवाद.. आमचे पानभर टंकन खर्ची पडले असते.
कोंकणी माणूस आहे त्यात सुखी असतो. बाहेरुन तिथे येऊन ईर्षा, स्पर्धा, उभी करणार्यांना ते आळशी वाटतात.. पण ती त्यांची मूळ सुशेगाद वृत्ती आहे. पोफळीच्या वाडीत बनियन वर करुन पोटाला गार वारा देत आरामखुर्चीत पडलेला कोंकणी मनुष्य पाहताना सुखी माणसाचा बनियन काय असतो तो असंख्य वेळा पाहिला आहे. आपल्या आवारात उगवणारे लाल भात आणि वरी / नाचणी ..शिवाय एखादी आंबी, फणस, पोफळी, माड यांच्या आधारे तेवढ्यात चरितार्थ बसवून कोणत्याही रॅटरेसमधे न पडता भरपूर मोकळा वेळ मिळवणारी कोंकणी माणसं माझी आदर्श आहेत.
कोंकणात मी जन्मून मोठा झालो. कोंकण पुरेपूर अंतर्बाह्य पाहिलेलं आहे. कोंकणात मुळात गरीब (खाऊन पिऊन सुखी पण श्रीमंत नसलेले) बहुसंख्य आहेत.. पण.. त्याचवेळी मूलतः भिकारी नगण्य आहेत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्या नशिबी इतरांचे आर्थिक मिंधेपण येणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट मानली जाते.
कोंकणातला मनुष्य रेज द बार तत्वाने उंच उड्या मारत आयुष्यात वरवर चढत जाईलच असं नाही.. पण तो याला स्वतःचा नाकर्तेपणा समजून कुरतडत कुरकुरत बसणार नाही.. तो "साफल्य" नावाचं छोटं घर बांधून कृतार्थ असेल.
यातली मजा पैशात मोजता येणार नाही..
स्वच्छतेबाबत : मी अस्वच्छता हा प्रकार कोंकण सोडल्यावर पहिल्यांदा पाहिला एवढंच म्हणतो. "पालापाचोळा" याला अस्वच्छता म्हटले असावे बहुधा लेखिकेने.
आमच्या कोंकणातल्या गावी बाहेरुन आलेल्या एका कुटुंबाने एकदा रस्त्यावर मूल शी करायला बसवलं तेव्हा आख्खी आळी
एक होऊन त्यांच्याविरुद्ध गेली होती. पहिल्याच प्रसंगानंतर ही पद्धत हाणून पाडण्यात आली.. हे फक्त एक उदाहरण.
मी कोंकण सोडून देशावर आलो तर हागणदारी हा नॉर्म होता.. आणि न हगलेले रस्ते ही दुर्मिळ गोष्ट.
कोंकणात रस्त्याबाजूला वाहणार्या पावसाच्या पाण्यात ओंजळ बुडवून प्यायची इच्छा होईल इतकं स्वच्छ ते असायचं.. कसलाच कचरा, गाळही नाही..
12 Apr 2012 - 3:01 pm | अस्मी
सहमत. अतिशय उत्तम आणि चोख प्रतिसाद.
अगदी सोळा आणे सत्य!
१००% करेक्ट!!!
12 Apr 2012 - 3:36 pm | प्रीत-मोहर
मी कोकणातल जीवन सुशेगात आहे म्हणेन :)
12 Apr 2012 - 6:10 pm | श्रीरंग
लाख बोललास, मित्रा! प्रत्येक वाक्याशी सहमत आहे. :)
12 Apr 2012 - 7:21 pm | यशोधरा
पेठकर काका आणि गवि दोघांच्याही प्रतिसादांना अनुमोदन.
कोकण अस्वच्छ आहे हे म्हणणारी पहिलीच व्यक्ती पाहिली.
12 Apr 2012 - 9:05 pm | मेघवेडा
तंतोतंत.
12 Apr 2012 - 1:58 pm | स्पा
लेखाबद्दल प्रचंड असहमत
आमचे आडगावच किती सुंदर आहे...
बाकी कोकण बघायलाच नको
12 Apr 2012 - 2:16 pm | शैलेन्द्र
जुन ठाकुर्ली पाहिलयेस का? ते पण छान होतं
12 Apr 2012 - 2:19 pm | स्पा
अगदि :)
मस्त शेताडी... भरपूर झाड :)
12 Apr 2012 - 2:12 pm | तिमा
कोकणी माणसावर अस्वच्छतेचा डाग ? तुमचे काहीतरी चुकताय. गरीबीत सुद्धा स्वच्छ रहाणारा माणूस म्हणजे कोकणी !
12 Apr 2012 - 2:49 pm | Madhavi_Bhave
मी तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया समजू शकते आणि appreciate हि करत आहे. मुळात माझी पण पाळेमुळे कोंकणातच रोवलेली आहेत. आयुष्याची सुरवातीची दहा वर्षे मी वेंगुर्ल्यात काढलेली आहेत आणि वयाच्या अकराव्या वर्षी (मी सातवीला असताना) मुंबईला आले व गावाला कायमची पारखी झाले. जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा शैक्षणिक जीवनातील इयःत्ता पाचवी आणि सहावी (जी मी वेंगुर्ला शाळेत काढली) हि दोन वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे होती. एखादाच दिवस असा गेला असेल जेव्हा मी शाळेत मार खाल्ला नसेन. सुट्टीत फक्त हुंदडणे आणि रान मेवा खाणे (म्हणजे कुदने) ह्या शिवाय दुसरे काही केले नाही. पावसाळ्यातील कोंकण पूर्णपणे अनुभवले आहे. रात्री कौलांवर पडणाऱ्या मुसळधार पावसांमुळे होणारा तो आवाज, कडाडणाऱ्या विजा ह्यामुळे घाबरून गेलेली मी आईच्या कुशीत स्वताला घट्ट सामावून घ्याची आणि झोपून जात असे. इतक्या वर्षांनतर देखील ती दहा वर्षे आठवली कि मन अलगद हळवे होऊन जाते. वेन्गुर्लाच्या तो समुद्र किनारा, सातेरी आणि रामेश्वारचे देऊळ मनात घर करून आहेत.
त्यामुळे मुळात मी कोकणचीच. कदाचित मला लेखात काय म्हणायचे ते नीट मांडता आले नसेल. जेव्हा मी लेख लिहायला घेतला तेव्हा माझ्या मनातील दुख फक्त मांडले. लहानपणी काही कळत नव्हते पण आज जेव्हा मी कोकणात जाते तेव्हा वातावरणातील एकंदर असणारा तो उदासपणा आणि एकंदरीतच काही प्रमाणातील निष्क्रियता ह्यामुळे मला नेहमी वाईट वाटते.
नैसर्गिकरीत्या कोकण खूप सुंदर आहे ह्याबद्दल दुमत नाही किंवा वादही नाही. आपण आपले पहिले प्रेम कधी विसरू शकत नाही त्याप्रमाणे माझे आयुष्यच जेथे सुरु झाले ते कोकण मी कसे विसरेन. पण आज इतक्या वर्षांनी देखील कोकणातील माणूस आहे तिथेच आहे (अर्थात सन्माननीय अपवाद आहेतच) म्हणून वाईट वाटते. आपले कोकण मुळात इतके सुंदर आहे कि नीट infrastructure जर पुरवले तर खूप प्रगती होईल पण तसे होत नाही आणि त्याची जाणीव पण नाही असे दृश्य उभे रहाते.
मी जेव्हा अस्वच्छते बद्दल लिहिले आहे ते आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबद्दल असलेल्या अनास्थेबद्दल. प्रत्येकाचे घर आतून सारवलेले असते आणि बऱ्यापैकी स्वच्छ असते हे मान्य आहेच मला.
आणि मी काही एकदा दोनदा गेले नाही कोकणात. दर एक दोन वर्षांनी माझी चक्कर असतेच. इतक्या वर्षांनी माझे झालेले हे मत आहे जे अगदीच खोटे आहे किंवा चुकीचे आहे असे मला तरी वाटत नाही. तरी देखील जर कोण दुखावले गेले असेल तर क्षमस्व. बाकी आपल्या सर्वांच्या लाल मातीबद्दल असणाऱ्या अस्मितेला मनापासून दाद. मी पण कोकणवर मनापासून प्रेम करते ह्याबद्दल कोणीही शंका घेवू नये.
धन्यवाद.
आणि शेवटचे म्हणजे श्री गणपा ह्याच्यासाठी -
गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने
प्रेषक गणपा गुरुवार, 12/04/2012 - 13:46.
गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने गेलो तर तिकडे एक फुल सुध्धा दिसले नाही आणि पहलगाम ला जो काही थोडासा बर्फ शिल्लक राहिला होता त्यात घोड्यांनी केलेल्या प्रातर्विधी शिवाय काही नव्हते.
ऑफ सिझनला किंवा सिझन संपता संपता गेल्यावर काय हाती लागणार म्हणा. बहुतेक घोड्यांच आणि तुमच 'टायमिंग' जुळल असाव. Smile
श्री गणपा. बहुतेक घोड्यांच आणि तुमच 'टायमिंग' जुळल असाव. Smile
आपली हि कॉमेंट रुचली नाही. It was not in a good spirit.
12 Apr 2012 - 3:16 pm | कपिलमुनी
तीव्र शब्दात णिशेढ !!
नव्या लेखकांची भ्रुणहत्या खपवून घेतली जाणार नाही
12 Apr 2012 - 3:32 pm | शैलेन्द्र
"आपले कोकण मुळात इतके सुंदर आहे कि नीट infrastructure जर पुरवले तर खूप प्रगती होईल पण तसे होत नाही आणि त्याची जाणीव पण नाही असे दृश्य उभे रहाते."
कशाला हो वाट लावता कोकणाची.. मी कोकणातला नाही, पण कोकणच्या प्रेमात आहे.. इंफ्रास्ट्रक्चरने लवासा आनी आंबी व्हॅली बांधता येत.. कोकण कसं घडवणार? कोकण आहे तसच राहुद्या..
12 Apr 2012 - 4:32 pm | गणपा
नाही हो अगदी स्वच्छ मनाने दिला होता प्रतिसाद.
अधिक स्पष्टिकरण दिले असते पण मग सारवा सारव करतोय असा आरोप झाला असता म्हणुन माझे शब्द मागे घेतो.
आय एम स्वारी. :)
12 Apr 2012 - 3:09 pm | पिंगू
प्रचंड मोठा गैरसमज. तुम्ही कोकणात जाऊन काय फक्त अस्वच्छताच पाहिली? कोकणात जे दिसले, त्या पालापाचोळ्याला तुम्ही जर अस्वच्छता म्हणत असाल, तर मात्र कमालच झाली..
बाकी स्वच्छतेचे धिंडवडे काढलेले बघायचे असतील तर जरा सोलापूर, बीड अशा ठिकाणी जाऊन बघा.
- पिंगू
12 Apr 2012 - 3:26 pm | कपिलमुनी
आंजा वर सुद्धा अनुशेष बाकी आहे का ?
मराठ्वाडा , विदर्भ मधले कोणी आहे का मिपा वर ??
12 Apr 2012 - 3:29 pm | इरसाल
असले तरी ते वैदर्भीय "मिसळबोंडापाव" वर असतिल.
12 Apr 2012 - 3:27 pm | निश
मुळात कोकणातील माणुस हा ठेवीले अनंते तैसेची रहावे ह्या विचारसरणीचा आहे.
मी खुद्द वेंगुर्ला दाभोली ह्या गावचा आहे. आजही मी वर्षांतुन ३ ते ४ वेळा तिथे जातो पण मला कुठेही घाण व अस्वच्छता दिसत नाही. उलट गावाला गेल्यावर कामाचा जो ताण असतो तो एकदम निघुन जातो. तुम्हाला स्वच्छतेच एक उदाहरण देतो....
दाभोली मठ येथे कुडाळदेशकर गौड ब्राम्हण लोकांचा मठ आहे. तिथे आजही वेदाभ्यास चालतो तो बघुन या अतिशय स्वच्छ व देखणा आहे तो मठ..
किंवा कुडाळ पिंगुळि येथिल राऊळ महाराजांचा मठ आहे. तो बघा निवळ्ळ अप्रतिम आहे.
12 Apr 2012 - 4:31 pm | विशाखा राऊत
अजिबात पटले नाही
12 Apr 2012 - 4:50 pm | मिसळपाव
माणसाने तिथे येऊन घाण करून ठेवली असली तर कृपा करुन त्यावरनं तिथल्या कोकण्याला उल्लेखू नका. गेल्याच नोव्हेंबरात रत्नागिरीत पांढर्या समुद्रावर जाताना मी याचं क्लेशदायक उदाहरण बघितलं आहे.
शैलेंद्र, तुझ्या वाक्यात थोडा बदल करून १००००००००% सहमत;
"कशाला हो वाट लावता कोकणाची.. मी नशिबाने कोकणातला आहे आणि कोकणच्या प्रेमात आहे.. इंफ्रास्ट्रक्चरने लवासा आनी आंबी व्हॅली बांधता येत.. कोकण कसं घडवणार? कोकण आहे तसच राहुद्या.."
12 Apr 2012 - 5:14 pm | सुहास झेले
कैच्याकै.... !!!!
12 Apr 2012 - 5:34 pm | चौकटराजा
कोकण नैसर्गिक रित्या सुंदर असणे हा एक भाग झाला. दुसरा भाग एखाद्याने आपला परिसर स्वच्छ ठेवणे हा दुसरा भाग झाला. खालील बाबतीत मात्र दुमत होउ नये.
१.देशावरची खेडी इनवेरिबली अस्वच्छ आहेत. त्यामानाने कोकणातील गावे अधिक स्वच्छ.
२, काश्मीरी लोक आपला परिसर चांगला ठेवतात. केसरीवाले नैसर्गिक बाग व बाब नियंत्रित करू शकत नाहीत.
३.भारतात दक्षिणेतील गावात दिसणारी टापटीप उत्तरेकडे जावे तशी कमी होत जाते. ( अपवाद हिमालयीन भाग व काश्मीर)
12 Apr 2012 - 5:38 pm | सविता००१
अजिबात म्हणजे अजिबातच नाही पटले.
12 Apr 2012 - 6:03 pm | प्रीती
मला वाटत तुम्ही कोकणात फक्त पर्यटनापुरतेच फिरत असाव्यात....
कारण तिथलं रहाणीमान जरका जवळून पाहीलत तर ते अजिबात अस्वच्छ नाही.
हां हाटेलांच्या बाबतीत म्हणाल तर हे थोडफार खर आहे.....कारण कोकणी माणुस अजून त्या बाबतीत पुढारलेला नाही किंवा
थोडा अनुत्साही आहे.(एका अथीर् ते बरच आहे...कारण त्यामुळेच तिथलं नैसगिक सौंदर्य टिकुन आहे.)
मात्र कोकणी माणुस अत्यंत स्वच्छ आणि कष्टाळू आहे........आणि हे अकालाबाधित सत्य आहे.
कोकणकन्या...प्रीती
12 Apr 2012 - 6:32 pm | चिरोटा
हे केवळ कोकणच नाही तर सर्वत्र लागू होते- मोठी शहरे आणि खेडी,जिल्हा शहरे ह्यांच्या राहणीमानात तफावत असल्याने तसे आपल्याला वाटते. उ.दा.मोठ्या शहरांमध्ये दुकाने ९.३० -१० पर्यंत चालु असतात तर ईतरत्र भारतात ८ वाजले की आवरते घ्यायला चालू होते.
मल्याळी,उडपी लोकांचा कष्टाळू म्हणून मुंबईत उल्लेख केला जातो. पण दक्षिण कर्नाटकातली,उत्तर केरळातील गावे पाहिलीत तर ती "उदासपणात्,निष्क्रियतेत' कोकणाला मागे टाकतील.
12 Apr 2012 - 6:29 pm | योगप्रभू
चला कोकणातले-बाहेरचे-देशावरचे-मराठवाडी-खानदेशी-वैदर्भी असे वेगवेगळे गट करुन उभे राहा बघू मुलांनो. मुंबईकर-नागपूरकर-कोल्हापूरकर-पुणेकर असेही गट चालतील. तुम्हाला हवा तो गट निवडा. समोरासमोर उभे राहा आणि शिव्यागाळी सुरु करा. (त्वेषाने शेजारी जमिनीवर थुंकायला परवानगी आहे.) अंगावर धाऊन जाणारा गडी बाद.
हा खेळ खेळल्यावर मग शांत बसा. प्रमुख पाहुणे आल्यावर तुम्हाला सगळ्यांना एका सुरात 'प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' हे गीत गायचे आहे. आजचे प्रमुख पाहुणे श्री. कचरे हे आपल्याला 'हागणदारीमुक्त गाव मोहिमेचे यश' या विषयावर दोन शब्द सांगतील. नंतर प्रत्येकाने तीन टाळ्या वाजवायच्या आहेत.
शेवटी फक्त क्लास मॉनिटर सुकुमार दांडगे आणि गर्ल्स मॉनिटर कु. सुनयना तिरळे हे दोघेच 'जय हिंद' अशी घोषणा देतील. तुम्ही सर्वांनी 'जय महाराष्ट्र' असे मागोमाग म्हणायचे आहे.
यात काही बेशिस्त दिसली तर याद राखा. उद्यापासून सर्वांची रवानगी माळावर (गुरं राखण्यासाठी)
-तुमचा प्रेम्मळ-
ज. रा. शौचे गुरुजी
12 Apr 2012 - 6:33 pm | परिकथेतील राजकुमार
प्रभुदेवा __/\__
14 Apr 2012 - 4:57 am | चौकटराजा
आयशपथ ,
भाण्णं हा आमच्या म्हारास्ट्र देशाचा प्रानच हाय ! लातूरकर , नांदेडकर, बारामतीकर, मालवणकर, ठाणेकर , कलानगरकर , दादरकर आन आनखी कंची यादी पायज्यल हाय ? म्हून शान मुक्यमंतरी तिकाडन येतुया ! त्ये बर, त्ये झालं राजकारनाचं ! हिकडं बी सुबोधवाले, दुर्बोधवाले, प्रसादगुनवाले, यांची बी भांडानं हायतच की ! तवा कयाला कुनी कुनाचं त्वांड दाबायचं म्हन्तो म्या !
आप्ला खौ रा.
12 Apr 2012 - 6:48 pm | गोंधळी
कोकण हे अतिशय सुंदर आहे.
गावी गेल्यावर खरच refresh व्हायला होते.
कोकणातली माणस अतिशय मेहनति असतात.
पण कोकणाचा जेवढा विकास व्हायला हवा होता तेवढा होत नाहि आहे.याला फक्त आपले राजकारणी जबाबदार आहेत.
12 Apr 2012 - 6:53 pm | परिकथेतील राजकुमार
प्रचंड सहमत आहे.
घरं कशी पोराबाळांनी बहरलेली असतात.
12 Apr 2012 - 7:05 pm | गोंधळी
मुळातच व्यवसायिकतेचा अभाव कोकणी(मराठी)माणसात असल्याने पर्यटनाच्या बाबतीत मागे आहे.याचि खंत वाटते.
12 Apr 2012 - 8:33 pm | मराठी_माणूस
वरच्या काही प्रतिक्रिया मध्ये कोकण स्वच्छ असुन देशावरच घाण आहे असे म्हटले आहे , मग ती स्वच्छता सोडुन एव्हढे लोक देशावरच्या घाणीत का बरे आले
12 Apr 2012 - 8:53 pm | साती
कोंकणी माणूस आळशी का आहे?
एक कामसू माणूस(घाटावरचा असेल बहुदा) कोंकणात आला. माडाखाली पंचा टाकून भरदुपारी निजलेल्या कोंकण्यास म्हणाला-
"अरे आळशी कोंकण्या,उठ. भर दुपारी काय झोपलास?"
"उठून काय करू?"
"काई कामधंदा कर"
"मग काय होइल?"
"पैसे मिळतील."
"मग?"
"ते गुंतवून मोठा उद्योग काढ."
"मग?"
"आणखी पैसे मिळतील"
"मग?"
"शहरात राहा,घर घे,गाडी घे"
"मग"
"आणखी कष्ट कर्,आणखी पैसे कमव"
"मग?"
"कुठल्यातरी निसर्गरम्य खेड्यात फार्म हाऊस बांध"
"मग?"
"सुट्टीच्या दिवशी मस्त निवांत तिथे जाऊन झाडांच्या सावलीत आराम कर"
"मग,आत्ता काय करतोय वेगळे,शिंच्या? " असं आमचा कोंकणी म्हणतो.
मिपावर आज बर्वेबाई,गणपा सगळे या ना त्या प्रकारे कोंकणाचीच आठवण करून देतायत. आज रात्रभर स्वम्नात माड,पोफळी नी आंबेच दिसणार बहुदा.
12 Apr 2012 - 8:56 pm | गणपा
सौ सुनार की.................
=))
12 Apr 2012 - 9:58 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
12 Apr 2012 - 9:19 pm | सानिकास्वप्निल
आवडले नाही :(
अजिबातच पटले नाही
कोकणातली माणसं खूपचं प्रेमळ व कष्टाळू असतात
12 Apr 2012 - 9:41 pm | ईन्टरफेल
कोकन सुरगाना सटाना नाहि का?
फक्त कोकन रत्नागिरि ....आपन म्हनता ...ते ....कोकन ..आहे का ?
आंम्हि सर्वानां कोकनि समझतो !
आपन कोनते कोकनि ???????????????/
12 Apr 2012 - 9:58 pm | बिपिन कार्यकर्ते
चला, आता इथे कोकण कुठे मिळेल ते शोधणे आला. परा, कॅन यु हेल्प?
12 Apr 2012 - 10:07 pm | पैसा
भावेबाई, तुम्ही फारच थोडं कोकण आणि कोकणी माणूस पाहिला असावा. लहान असताना वेंगुर्ल्याला रहात होता हे लक्षात घेतलं तरीही हेच म्हणते. कोकण स्वच्छ करायची गरजच पडत नाही, कारण पावसाळ्यात सगळं पार धुऊन निघतं! कोकणी माणसं पण स्वच्छताप्रेमीच. तुम्ही झाडाखालचा पातेरा खत म्हणून वापरण्याबद्दल लिहिलंय , तेही अगदी व्यवहार्य आहे. शिवाय खताचे पैसेही वाचले ना! अगदी गावातली लोकं सुद्धा नीटनेटकी असतात. मी लहान असताना रत्नागिरीजवळच्या खेड्यात रहात होते, पण तिथेही लोकांकडे संडास असायचे. रस्त्याच्या कडेला पोरांनी हगून ठेवलंय असं मी कोकणात कधीच पाहिलं नाही.
उदासीनता म्हणताय त्याला एक कारण कदाचित असू शकेल की बहुतेकांची मुलंबाळं मुंबईत नाहीतर परदेशात सुद्धा जातात, कोकणात लागवड करण्यासारखी जमीन फार कमी आहे. देशावर जसं थोड्या श्रमात भरपूर पीक घेता येतं ते कोकणात शक्य नाही. कोकणातली सगळी पिकं फार मेहनतीने घ्यावी लागतात, मग ते आंबे असोत, नारळ असो, की भातशेती. कोकणी माणूस आळशी हे मला प्रचंड विनोदी विधान वाटतं. इतके कष्ट करून हातात पैसेही फार येत नाहीत. आणि कोकणी माणूस सतत उद्योगात राहिल्यामुळे तमाशा वगैरे अवांतर गोष्टी कोकणात बघायलासुद्धा मिळणार नाहीत. ती सगळी घाटावरच्या पैसेवाल्या आणि भरपूर वेळ हाताशी असलेल्या लोकांची मिरासदारी.
कोकणात पर्यटन उद्योग फार वाढला नाही तर बरं, कारण मग सगळी झाडी तोडून रिसॉर्ट बांधायच्या मागे लोक लागतील आणि गोव्यातल्यासारख्या सगळ्या गोष्टी कमर्शियल होऊन बसतील. कोकणचा विकास म्हणजे तरी काय हो? शिक्षणाचं प्रमाण देशावरच्यापेक्षा जास्तच आहे. पुरेसे पैसे कष्ट करून मिळतायत. फुकटचा बडेजाव आणि पैशांची उधळमाधळ फार दिसणार नाही. कोणीही भीक मागत फिरत नाही. आणखी काय हवं?
12 Apr 2012 - 10:11 pm | सुनील
लेख वाचून आश्चर्य वाटले.
कदाचित "अस्वच्छ" ह्या शब्दाच्या व्याखेबाबतच काही गैरसमज असावा.
राहिलेले, खरकटे अन्न, मानवी मल-मूत्र आदी गोष्टी मी तरी कुठल्याही कोकणातील घराजवळ किंवा गावातील रस्यांवर पाहिलेल्या नाहीत. झाडाखाली जमलेल्या पालापचोळ्याला अस्वच्छता म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी!
खाजगी घरे तर सोडाच पण कोकणातील सार्वजनिक देवळे पहावीत. परीसर तर स्वच्छ असतोच शिवाय देवळाबाहेर भिकारी-कुष्टरोग्यांची गर्दीदेखिल नसते. आणि हे काही फक्त आडगावातील देवळांबाबतीतच नव्हे तर जिथे भक्त आणि पर्यटकांचा सतत राबता असतो अशा प्रसिद्ध देवळांबाबतीतदेखिल खरे आहे. देशातील अन्य भागातील प्रसिद्ध देवळाशी तुलना केलीत तर, कोकणातील देवळांची स्वच्छता आणि भिकारीमुक्त परिसर डोळ्यांना सुखावतो.
उरला भाग आळशीपणाचा. कोकणच्या लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण किती याची काही कल्पना आहे? कोकणची जमीन सुपीक नाही. भात हे काही नगदी पिक नाही. निर्यातयोग्य आंबा सर्वत्र होत नाही. तरुण रक्ताचा अभाव. मनि-ऑर्डर इकॉनॉमी वर भर. असे असूनही कोकणातील किती शेतकर्यांनी आत्महत्या केल्यात?
पर्यटन - आपल्या घरातील एखाद-दुसरी खोली पर्यटकांना राहण्यासाठी द्यायची. त्यांच्या खाण्या-पिण्याची घरगुती सोय करायची. ही संकल्पना अत्यंत यशस्वीपणे कोकणात राबवलेली दिसेल. आज अक्षरशः हजारो कुटुंबे अशा पद्धतीने - फार नाही पण चार पैसे - जास्तीचे कमावीत आहेत.
असो, बरेच काही लिहिता येईल. पण तूर्तास इतकेच पुरे.
12 Apr 2012 - 11:24 pm | विनोद१८
मा_भा ना नमस्कार..!!! मिपावर कोकण आणल्याबद्दल.
मी मुम्बईत जन्मलेला माणुस आजोळ कोकणातले आणी मुळ गाव सुद्धा त्यामुळे अगदी लहानपणापासुन कोकणात जाणारा व तिकडे रमणारा. आजही नियमीतपणे कोकणात जाणारा.
# कोकणी माणुस ह आळशी अजिबात नसुन तो उद्योगीच आहे, बरीच मेहनत केल्याशीवय त्याला सुखासुखी काही मिळत नाही. कोकणचा एकन्दरीत भूगोल , शेती व उद्योग्धन्दे पाहीले म्हणजे लक्षात येते. ज्यान्ची मनीओर्डेरची सुद्धा सोय नाही त्यान काबाड्कष्टाशिवाय दुसरा पर्याय नसतोच तो आळ्शी कसा ??..देश स्वतन्त्र होउन ६५ वर्षे झाली कोकणात किती विकास झाला. हा, तो तुम्च्या आम्च्यासारखा नाइलाजाने घड्याळाशी बान्धलेला शहरी माणसासारखा घाईगडबडीत दिसत नसेल कदाचीत. म्हणून तो आळशी नव्हे.
# राहता राहीला प्रश्ण स्वछतेचा कोकणातले घर व आन्गण हे स्वछ ठेवावेच लागते त्याला पर्याय नाही व ते तसे असते. आन्गणाबाहेर सगळे प्रचन्ड रान असते त्याची झाड्लोट शक्य नसते त्याच्या आकार्-मानामुळे, तिकडे पडलेला पालापाचोळा, झुडपे व वेड्यावाक्ड्या झाडान्मुळे आपल्याला अस्वछ वाटले असावे.
(कोकणी ) विनोद१८
13 Apr 2012 - 12:05 am | रेवती
मलातरी कोकणी माणूस अजिबातच अस्वच्छ वाटला नाही. पालापाचोळा असणे म्हणजे अस्वच्छता नव्हे.
देवळाच्या आत आणि आजूबाजूचा परिसर प्रचंड स्वच्छ होता. तिथल्या गुरवांकडे आम्ही जेवलो तर अतिषय स्वच्छ, चवदार आमटीभात आणि लोणचे वाढले. माझे काका कोकणात गेली पन्नास वर्षे तरी राहतायत. त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यावर द्यायला पैसे नसले तर लोक शेतातले काहीबाही आणून देतात पण फुकट काही नको असते. मला तरी वर्षानुवर्षे चांगलाच अनुभव आला आहे. यापुढे बिल्डर्स, नेतेमंडळी काय वाट लावतील ती वेगळी.
13 Apr 2012 - 1:04 am | खादाड_बोका
ईथे अमेरीकेत राहुन जेव्हा भारतात जाता...तेव्हा मला तर कोंकणीच नाही तर प्रत्येक भारतीय माणुस अस्वच्छ आणी आळ्शी वाटतो. आणी येवढेच नाही तर अडाणी सुध्धा. साधा "सिव्हीक सेन्स" नाही आहे. माझ्याकडे अगणीत उदाहरण आहेत.
तुम्ही काहीही म्हणा मला कही फरक पडणार नाही. बाकी तुमचे चालु द्या.
13 Apr 2012 - 1:27 am | गणपा
प्रतिसाद कळला नाही.
जर वाद उकरून काढायचा प्रयत्न असेल तर तो फारच क्षीण वाटला.
जर वरच मत खरच असेल तर मग तिथली सिटिझनशीप घेउन खुशाल तिथेच सुखाने रहा.
हाकानाका. :)
13 Apr 2012 - 5:15 am | पक्या
गणपाभाऊ, त्यांनी उपहासाने लिहीलयं असं वाटतयं.
13 Apr 2012 - 11:18 am | Madhavi_Bhave
मी एकदम सपशेल माघार घेते आणि माझी चूक मान्य करते तेव्हा हा विषय आपण येथेच थांबवूया. फक्त एक लक्षात घ्याल अशी अपेक्षा करते "मी कोकणी माणसाचा उपहास करण्याच्या दृष्टीने हा लेख लिहिला नव्हता कारण मी स्वताला कोकणीच समजते. कोठेतरी मनात माझ्या सल होता आणि कोठेतरी अशी तळमळ देखील आहे कि मनात आणले तर कोकणी माणूस खूप पुढे जावू शकतो आणि तो जाइलही". विषय मला नीट मांडता आला नाही असेच मी समजते.
बाकी माझ्या कोकण विषयीच्या आपुलकीबद्दल कोणी शंका घेवू नये. जरी मी फक्त दहाच वर्षे वेन्गुर्लायला काढली असली तरी देखील माझ्यासाठी माझे बालपण म्हणजे माझे वेन्गुल्यातील बालपणच आणि ते मला अगदी नीट आठवते आहे. बाकी सर्वांनी माझ्या पहिल्याच लेखाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या पण बर्याच समझुती दूर झाल्या. ह्याचे फलित म्हणजे पुढच्या वेळी कोकणात जाताना मी वेगळ्या दृष्टीने कोकण बघण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
13 Apr 2012 - 12:31 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
इथे एक निरिक्षण नोंदवावेसे वाटते.
मी खुप पूर्वी पासून गणपतीपुळे येथे नियमितपणे दर्शनाला जातो.
अगदी तिथले गणेशमंदीर कौलारु होते तेव्हापासून.
पण आपल्या स्वयंघोषीत महागुरुंचा एक भंपक चित्रपट आला होता काही वर्षांपूर्वी "नवरा माझा नवसाचा" तो चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तिथे गर्दी प्रचंड वाढली. गणेश दर्शनाचा मुळ उद्देश बाजुला पडून समुद्र किनार्यावर धिंगाणा करण्याचा उद्देश डोके वर काढू लागला.
त्या प्रकाराच्या धिंगाण्याला अजिबात विरोध नाही, पण हे करतांना त्या सुंदर, स्वच्छ किनार्याचे रुपांतर एका अस्वच्छ आणि ओंगळ जागेत होऊ लागले.
आता यात कोकणी माणसाचा सहभाग अगदी नगण्य आहे, कारण हि अस्वच्छता पसरण्याचे महान कार्य तिथे येणार्या पर्यटकाचे आहे. कोकणी माणसाचा दोष असेल तर तो इतकाच कि, अस्वच्छता पसरविण्यार्यांवर वचक ठेवायचे काम, तिथल्या शासन यंत्रणेला जमले नाही. तिथल्या शासन यंत्रणेवर कोकणी माणसचं आहेत. पण त्यांना याची फार पर्वा दिसत नाही.
आजची गणपतीपुळ्यातली परिस्थिती पाहीली कि मला देऊळ चित्रपट आठवतो. देऊळ मधील गाव तर दुर्लक्षित होते, मागासलेले होते, पण गणपतीपुळे तसे अजिबात नव्हते. अगदी काही वर्षांपूर्वी जिथे अत्यंत शांत आणि सुस्वरुप गाव नांदत होते तेथे आज प्रचंड कलकलाट आणि उबग आणणारी दृश्य दिसतात.
तिथे किनार्यावर "वॉटर स्पोर्टस्" या गोंडस नावाखाली पर्यावरणाचा यथेच्छ र्हास चालू आहे. आणि हे सगळं करणारी माणसे कोकणी वाटत नाही.
विषाद एकाच गोष्टीचा वाटतो कि थोड्याश्या फायद्यासाठी कोकणी माणूस हे सगळं सहन करतो.
आता मंदिर एकदम झकपक झाले, निवासाच्या चांगल्या सोयी झाल्या. पंचतारांकित रिसॉर्टस झाली, पण या सगळ्याची किंमत भयंकर आहे, आणि ती कोकणी माणसालाच मोजावी लागणार, पर्यटकांना नाही. ते काय, नविन ठिकाण शोधतील. पण गावाचा र्हास हा गावकर्यांच्या येणार्या पिढ्यांनाच भोगावा लागेल!
हि फक्त गणपतीपुळे याच ठिकाणची परिस्थिती असेल असे वाटत नाही. पण इतर ठिकाणी मी जास्त फिरलो नसल्यामुळे त्यावर काही बोलत नाही.
मला कुठल्याही वादात शिरण्याची इच्छा नाही पण जे काही चालले आहे ते काही फार भूषणावह नाही, इतकेच म्हणेन.
13 Apr 2012 - 7:44 pm | प्रदीप
एखाद्या व्यक्तिसमूहास दिले गेलेले विशेषण अनेकदा तुलनात्मक असते. तसे ते इथेही भावेबाईंच्या लेखात दिसते आहे. कोकणी लोकांना 'आळशी' संबोधणे रोखठोक व थोडेसे कठोर आहे खरे, पण असे विशेषण अर्थात इतर प्रांतातल्या लोकांच्या तुलनेच्या संदर्भात आहे, हे लक्षात घेणे जरूरीचे आहे. ह्या बाबतीत, अनेक वर्षे भारतात व जवळजवळ तेव्हढीच वर्षे परदेशी काढल्यामुळे, मीही माझे तुलनात्मक मत (जे संपूर्ण anecdotal आहे, माझ्या निरीक्षणांवर, माहितीवर आधारलेले आहे, त्यास कुठलाही 'विदा' नाही) नोंदवतो... जगातील इतर अनेक देशांतील लोकांच्या तुलनेत, सर्वसाधारण भारतीय कामगार/ मजूर (ह्यात प्रोफेशनल्सचा समावेश नाही), कामतत्परता, कामाची शिस्त, कार्यक्षमता असा अनेक बाबींचा विचार करता, बराच मागे आहे. आणि भारतातील प्रांतांच्या संदर्भात हाच विचार केला तर सर्वसाधारणपणे मराठी माणूस, व महाराष्ट्राच्या प्रांतांपुरता विचार केला तर कोकणी माणूस अशाच परिमाणांनुसार बराच मागे आहे, असे मला वाटते.
वर आलेल्या अनेक प्रतिसादांतून असा सूर दिसतो की कोकणी माणूस जगण्याच्या बाबतीत फारश्या अपेक्षा ठेवत नाही, थोडक्यात तो आनंद मानतो. तो 'आहे त्यात सुखी' असतो, कुठल्याही रॅटरेसमधे पडायची त्याला आवश्यकता भासत नाही. थोडक्यात, तो जे काही थोडेसे अगदी जरूरीपुरते करतो, त्यात त्याला आनंद आहे, (त्याला ह्याची कसलीच खंत नाही, तुम्हा बाहेरून आलेल्यांना/ बाहेरून हे न्याहाळत असलेल्यांना ह्याबद्दल काय वाटायचे ते वाटो). ही कारणमीमांसा जरी बरोबर मानली तरी ह्यातून त्याचा दिवसेंदिवस तोटाच होत आलेला आहे, व ह्यापुढेही होत रहाणार आहे. कोकण काही जगापासून वेगळे असलेले बेट नाही. त्याचे त्याच्या परिसराशी संबंध आहेत. तिथे, अगदी 'कमीतकमी अपेक्षेने' रहायचे कुणी म्हटले तरी तेथील जनतेस बाहेरून अनेकानेक ( कोकणच्या संदर्भात तर बहुसंख्य) जिन्नस व सेवा आयात कराव्या लागणार. हे करतांना त्यांना त्या बाहेरील जीवघेण्या स्पर्धेच्या भागीदारांशीच व्यवहार करावा लागणार. म्हणजे 'चढ्या' भावाने त्याला त्या खरीदाव्या लागणार. अर्थात त्यास स्वतःची क्रयशक्ति वाढवणे भाग आहे? वैद्यकीय सेवेचे एक साधे उदाहरण घेऊयात. ही सेवा देणारे बाहेरून शिक्षण घेऊन आलेले असणार, त्यांचे दवाखाने, हॉस्पिटले स्थापन करून ती चालवण्यासाठी त्यांनी बाहेरूनच उपकरणे घेतलेली असणार. तेव्हा त्यांना स्वतःचा किमान चरितार्थ चालवायचा तर काही वाजवी 'सेवाशुल्क' घ्यावे लागणार. ('लोकप्रभे'त लिहीत असलेले सेवाभावी डॉ. कुळकर्णी व तत्सम उदाहरणे अपवाद आहेत, त्यांच्या ह्या चर्चेत विचार करणे इष्ट नाही). तर अगदी जुजबी उत्पन्न असलेला कोकणी माणूस हा खर्च कसा, व कितपत करू शकेल?
अनेकांनी कोकणी प्रदेश किती खडतर आहे, त्यात फारशी पिके घेता येत नाहीत, वगैरे लिहीले आहे. हाच निकष लावायचा म्हटला तर फिलीपीन्स, ऑस्ट्रेलिया, नेपाळ ह्या देशांतील जनतेने काय म्हणावे? ऑस्ट्रेलिया तूर्तास सोडून देऊ. फिलीपीन्सचे उदाहरण घेऊ. द्वीपसमूहाचा बनलेला, नैसर्गिक आपत्यांना सदैव तोंड देत झगडणारा हा देश. पण तेथील अनेकानेक पुरूष व प्रामुख्याने स्त्रिया परदेशांत मोलमजूरी करतात, व भरपूर पैसा देशात धाडतात. मी रहातो त्या, आग्नेय आशियातील एका शहरातच सुमारे २ लाख फिलीपिना घरांघरांतून मोलकरणींची कामे करतात. आमच्या जवळच्याच अशाच एक दोन शहरांतूनही त्या अशाच संखेने आहेत, तसेच त्यांतील अनेक दुबाई व मध्य पूर्वेच्या अनेक शहरांतूनही हीच कामे करत आहेत. ह्यांचे काम पाहून घ्यावे! अत्यंत सुबक, नीटनेटके, तत्पर काम त्या करतात. त्यामुळे त्यांना परदेशात ह्या कामांसाठी मागणी असते. नेपाळ्यांचे असेच. आपल्या तुलनेने बराच मागासलेला हा देश. पण येथील जनताही आमच्या व आजूबाजूच्या शहरांतून रेस्टॉरंट्समधे कामे करतांना आढळून येतात. सेवातत्पर, हसतमुख, व कार्यक्षम असल्याने त्यांना येथे मागणी आहे.
तर प्रश्न हा, कोकणी माणसास शेतीशिवाय इतर पर्याय नाहीत का? कोकणी माणसेही वर दिलेल्या उदाहरणांतील फिलीपिना अथवा नेपाळींप्रमाणे परप्रांतात, परदेशात का बरे जाऊ शकत नाहीत? संधि उपलब्ध नाहीत, हे सरळ उत्तर थोडे फसवे आहे. कारण मग केरळीयांना अशा संध्या परदेशात, आणी उत्तर भारतीयांना सर्व भारतभर त्या कश्या उपलब्ध होतात? आणि कामे करण्याची, कामे शिकून पुढे जाण्याची मानसिकता मुळात असावयास पाहिजे. मुंबईचेच उदाहरण घेऊ यात. कोकणी माणूस इथे इतरांच्या अगोदर बहुसंख्येने दाखल झाला, तो बहुतेक सर्वच्या सर्व कापड गिरण्यात कामे करण्यासाठी. तो बर्याच अंशी तेच करत राहिला, त्यातून त्याला राजकारणात अत्यंत रस, व स्वतःच्या हक्कांविषयी नको तितकी जागरूकता. तेव्हा तो संप करीत राहिला, सर्वाथाने होता तिथेच राहिला. शेवटचा 'संप' तर त्याने अजून मागे घेतलेला नाही. त्यात तो मुंबईबाहेर फेकला गेला. त्या तुलनेने मागाहून मुंबईत आलेले माथाडी कामगार पहा, मावळातून आलेले डबेवाले पाहा.
कोकणी आंब्याच्या संदर्भात मला एक प्रश्न नेहमी पडत आलेला आहे. ह्या आंब्यात खराब होण्याचे प्रमाण, इतर प्रांतांतून आलेल्या आंब्यांच्या तुललेने बरेच जास्त वाटते. आमच्या येथे थायलंड, ऑस्ट्रेलिया येथून आंबा येतो. त्यात इतके रिजेक्षन असत नाही. आपला कोकणी आंबा चवीस ह्या सार्या आंब्यांच्या अनेक पटींनी मधूर आहे. पण त्यात रिजेक्षन रेट बराच जास्त आहे. असे का असावे? पॅकेजिंगचा परिणाम? का मालच तसा, इतर आंब्यांच्या तुलनेत पटकन खरब होणारा, जास्त 'सेन्सेटिव्ह'? तसे आहे तर मग त्यावर उपाय का शोधले जात नाहीत?
शेतीशिवाय इतर उद्योगधंदे कोकणात का येऊ शकत नाहीत? टूरिझमबद्दलचा पैसा ह्यांनी मांडलेला आक्षेप मला, भारतीय संदर्भात मान्य आहे. (बाहेर टूरिझम आले तरीही जागेचे स्वत्व टिकवून ठेवता येते, बाली हे एक सुंदर उदाहरण. पण भारतात हे शक्य नाही, कारण बेधुन्द राजकारण्यांना कुठे थांबायचे हे समजत नसल्याने, एखाद्या ठिकाणात टूरिझम बेफाट वाढवून त्याची रया घालवण्याचे कार्य ते तत्परतेने करतात. गोव्याचे उदाहरण आपल्यापूढे आहेच).
असो. लेखिकेने चर्चाविषय चांगल्या रीतिने सादर केला आहे, चर्चाही भावनाविवश न होता व्हावी.
13 Apr 2012 - 9:11 pm | साती
प्रदीप प्रतिसाद आवडला.
असंच काही या लेखाचं शीर्षक वाचून लिहणार होते. पण लेखिकेने एकदम पाल्यापाचोळ्याचा कचरा केला म्हणून नाही लिहीलं.
केवळ वैद्यकीय सेवेतच नव्हे तरशिक्षक,अधिकारी,पर्यटन या सर्वच क्षेत्रात आमच्या अल्पसंतुष्ट वृत्तीने ईतर लोकांची संया वाढवली आहे आणि आम्ही 'हे साले घाटी कोकनाची वाट लावतंत' अशा शिव्या देत आहोत तिथेच.
कोंकणात इंडस्ट्र्या नकोत, पर्यटनाधारीत धंदे नकोत मग तुमचा विकास व्हावा म्हणुन काय पाहिजे?
माझ्या घरात राहाणारे सारे भाडेकरू कुणि पूण्याचे तर कुणी पार गुजरातचे. बांधकाम,खाणककरी, फोटो स्टुडियो असे धंदे करून लाखोंनी कमावून गेले पण गावातल्या कुणाला चार महिने भातशेती आणि नंतर किरकोळ भाजीपाला याशिवाय दुसरे काही करावेसे वाटत नाही.
13 Apr 2012 - 10:03 pm | गणपा
प्रदिपयांचा प्रतिसाद आवडला.
पण साती अग सगळेच शेती सोडुन इतर उद्योगाला लागले तर आम्ही कोंबड्या आणि मासेच किती खायच्या म्हणतो मी? (खर तर माझी याला काही हरकत नाही) ;)
13 Apr 2012 - 8:09 pm | प्रभाकर पेठकर
कोकणी माणसास शेतीशिवाय इतर पर्याय नाहीत का? कोकणी माणसेही वर दिलेल्या उदाहरणांतील फिलीपिना अथवा नेपाळींप्रमाणे परप्रांतात, परदेशात का बरे जाऊ शकत नाहीत?
मध्य पूर्वेतील देशांपैकी मस्कतमध्ये मी गेली ३१ वर्षे रहात आहे. पर्यटन निमित्ताने दुबाई, शारजा, अबुधाबी, बाहरेन इत्यादी शहरांना भेटी दिल्या आहेत. इथे, उपहारगृह आणि कापड, जोडे आणि सरसाधारण वस्तूंच्या दुकानांमधून कोकणी माणूस मी आल्या दिवसा पासून पाहतो आहे. ८१ साली आलो तेंव्हा, बाजारात, मराठी भाषा ऐकू यायची ती ह्या लोकांच्या तोंडूनच. १२ -१२ तास नोकरी/व्यवसाय करणारी ही जमात आहे.
फिलीपिनो सुद्धा आहेत. सर्वच नाहीत पण, बहुसंख्य फिलीपिनो स्त्रीया अनैतिक व्यवसायात आहेत. घरगड्यांची कामे करता करता इतर 'कमाई'कडे आकर्षित होतात. त्यांच्या संस्कृतीत ह्यात गैर मानीत नाहीत असे ऐकले आहे. फिलीपिनो स्त्रीयांच्या खालोखाल श्रीलंकन स्त्रीया ह्या व्यवसायात आहेत.आपल्या कोकणी स्त्रीयांचे असे काही उद्योग नाहीत. जे कोकणी आहेत ते पुरुष कर्मचारी आहेत. कष्टकरी आहेत. त्यांची कुटुंब इथे असली तरी ती गृहीणी पदावर संतुष्ट आहेत. इतर 'कमाई'चा प्रश्नच उद्भवत नाही.
13 Apr 2012 - 8:25 pm | प्रदीप
तिथे कोकणी अनेक वर्षांपासून आहेत हे वाचून आनंद झाला. पण त्यांची संख्या किती आहे? 'विदा' ह्या अर्थाने हे विचारत नाही, तर ज्याप्रमाणे फिलीपिना, अथवा गेली काही वर्षे, इंडोनेशियन स्त्रीया, प्रचंड संख्येने इतर देशात असतात, ज्यातून त्या बर्यापैकी पैसा मायदेशात पाठवू शकतात, त्यांच्या तुलनेत कोकणी माणसे कितपत असावीत, असा अंदाज यावा म्हणून विचारतोय. त्यांची संख्या बर्यापैकी असल्यास ते बराच पैसा कोकणात पाठवत असावेत, व त्यातून तिथे थोडीफार सुबत्ता दिसावी. तसे प्रत्यक्ष आहे असे वाटत नाही. म्हणून विचारतोय.
तिथे केरळीय मजूर/ कोकणी मजूर ह्यांचे प्रमाण अंदाजाने काय असावे?
आग्नेय आशियातील अनेक मोठ्या शहरांतून फिलीपिना अत्यंत निगुतीने मोलकरणीची कामे करत आहेत. अल्पशा शरीरविक्रयसंबंधी व्यवसायात आहेत, पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. आमच्या येथे श्रीलंकन स्त्रीयाही बर्याच प्रमाणात मोलकरणीची कामे करीत असतात. त्यांपैकी फाश्या कुणी शरीरविक्रयसंबंधी व्यवसायात आहेत असे पाहण्यात आलेले नाही.
13 Apr 2012 - 8:49 pm | प्रभाकर पेठकर
फिलीपिना, अथवा गेली काही वर्षे, इंडोनेशियन स्त्रीया, प्रचंड संख्येने इतर देशात असतात.
फिलीपिनोंपेक्षा कोंकणी कितीतरी जास्त असावेत असे दिसते आहे. चिपळूण, रत्नागिरी, खेड इथले रहिवाशी जास्त आहेत. खेडच्या तर जवळ जवळ प्रत्येक घरातील एक व्यक्ती आखातात आहे असे म्हंटले जायचे. ह्यातील अतिशयोक्ती (असल्यास) वगळता अनेक कोंकणी आखातात आहेत. मुद्दा त्यांच्या कमाईचा किंवा त्यांनी पाठवलेल्या पैशातून कोंकण विकासाचा नाही तर कोंकणी माणूसही शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायात आणि भारता बाहेर कार्यरत आहे हे मला सांगायचे आहे.
तिथे केरळीय मजूर/ कोकणी मजूर ह्यांचे प्रमाण अंदाजाने काय असावे?
केरळीय मजूर सर्वत्रच जास्त आहेत. उलट त्यांनीच आखातातील रोजगार मिळेल त्या रोजंदारीवर स्विकारून इतरांची कोंडी केली आहे. केरळात घरोघर जास्त मुलं आहेत आणि त्यांनी पैसे कमाऊन घरी पाठवले नाहीत तरी घरातील एक खायचे तोंड कमी झाले हिच वडिलांना मदत अशी विचारधारा आहे. केरळीय मजूर कधी कधी ५-६ वर्ष भारतात घराकडे परतत नाहीत. अशी परिस्थिती आहे. नोकरी बरोबर बेकायदेशिर रित्या दारू विकणे, सीडीज् विकणे, निळ्या चित्रफिती भाड्याने देणे आदी धंदे करतात. आपल्या मित्रांना, भावंडांना आखातात नोकर्या मिळवून देणे असे उद्योगही करतात. पण कोंकणी कामगारांच्या तुलनेत केरळीय कामगार जास्त आहेत ह्यात शंका नाही.
13 Apr 2012 - 9:00 pm | प्रदीप
कोकणी माणसे बर्याच संख्येने मध्य पूर्वेत आहेत हे तुमचे निरीक्षण आहे, ते मान्य करतो. पण त्यांच्या मिळकतीचा कोकणावर अगदी अल्प परिणाम दिसतो, ह्याचे आश्चर्य मात्र वाटतच राहील. केरळात तर (म्हणे) आखाती मजूरांनी बंगले बांधले, (त्यातील काही मग देशोधडीलाही लागले, पण हे प्रमाण अल्प असावे), तिथे सुबत्ता आली. कोकण होता तसाच राहिला, असे सकृतदर्शनी दिसत आहे.
14 Apr 2012 - 2:06 am | प्रभाकर पेठकर
श्री. प्रदीप,
केरळात तर (म्हणे) आखाती मजूरांनी बंगले बांधले.
माझ्या आधीच्या प्रतिसादात पुढील विधान आहे:
(केरळीय माणसे) नोकरी बरोबर बेकायदेशिर रित्या दारू विकणे, सीडीज् विकणे, निळ्या चित्रफिती भाड्याने देणे आदी धंदे करतात.
पैसा कमविण्यासाठी केरळीय माणूस काहीही करतो. ८२-८३ च्या काळात दुबाई मध्ये एक घटना घडल्याचे कानावर आले होते. एक केरळीय जोडपे टॅक्सीने चालले होते. टॅक्सी ड्रायव्हरही केरळीय होता. मागे बसलेल्या जोडप्यातील स्त्री, त्या माणसाची पत्नी, रडत होती. आणि तो माणूस, तिचा नवरा, तिला एका अरबाकडे एकदाच शेवटचे जायला विनवत होता. कशाला हे मी तुम्हाला सांगायलाच पाहीजे असे नाही. त्या टॅक्सी ड्रायव्हरने त्यांचा संवाद ऐकला आणि संतापाने दोघांनाही आपल्या टॅक्सीतून खाली उतरवून त्या नवर्याला न भूतो न भविष्यती अशा शिव्या घातल्या आणि टॅक्सी घेऊन निघून गेला.
सगळे केरळीय असे आहेत असे मला म्हणायचे नाही पण अनैतिक, बेकायदेशीर कामे करायला ते मागे-पुढे पाहात नाहीत. साध्यात साध्या डुप्लीकेट सीडीज विकण्यापासून ते वरील (३० वर्षात) एकदाच ऐकलेल्या घटने पर्यंत काहीही करून पैसा कमवितात. कोकणी माणसांचे नांव ह्या प्रकारांमध्ये कानावर येत नाही. त्यामुळे त्यांच्या हाती पैसा कमी असतो. ते सुद्धा उरलेल्या पैशातून गावच्या घराची डागडुजी करतात, जमीनीचा तुकडा विकत घेतात. पण केरळीयांपेक्षा त्यांच्या हाती पैसा बराच कमी असतो.
सज्जन आणि सरळमार्गी केरळीयही बरेच आहेत माझ्या पाहण्यात/ओळखित. तसेच, मोठे उद्योजकही आहेत. साधा इंजिनियर म्हणून आलेल्या केरळीय माणसाने स्वतःच्या कंपन्या चालू करून भरपूर माया कमविली आहे. तसे उदाहरण कोकणी माणसांमध्ये कुठे दिसत नाही हे सत्य आहे. बिचारे कष्टकरी म्हणून आले आणि कष्टकरीच राहिले. पुन्हा कमी उत्पन्नात संतुष्ट राहिले पण गैरमार्गाने माया कमविली नाही आणि उद्योजक म्हणूनही पुढे आले नाहीत.
13 Apr 2012 - 11:01 pm | सुनिल पाटकर
कोकणी माणूस आळशी आणि अस्वच्छ आहे या आपल्या मताशी मी सहमत नाही .कोकणातील भातशेती यासाठी वारेमाप मेहनत करावी लागते. बहरलेली वाडी, आंबे हे सर्व एका वर्षात उभे राहिलेले नाही.कोकणात गेल्या काही वर्षात विकसित होणारे पर्यटन कोकणी माणसाच्या आळशीपणामुळे नक्किच नाही.आपल्या वृद्ध आईवडीलांना गावी ठेवून मुंबईत कष्टाची भाकरी खात गावी मनीआँर्डर पाठविणारा कोकणी आळशी कसा काय ? .राहिला प्रश्न स्वच्छतेचा ...ती तर व्यक्तीनिहय असते, तरी पण सुंदर सारवलेले अंगण ,,नियमीत स्नान करून होणारी देवपूजा....मला वाटतं आपला निष्कर्ष योग्य नाही
14 Apr 2012 - 8:07 am | ५० फक्त
फुटकळ वादावरुन चर्चा माहितीपुर्ण आणि अर्थशास्त्रीय मुद्यांकडे वळविल्याबद्दल श्री.प्रदीप यांना धन्यवाद. पेठकर काकांचेही प्रतिसाद माहितीपुर्ण.
14 Apr 2012 - 10:38 pm | रघुनाथ.केरकर
असा ह्या तुमचा वैयक्ती क मत अस्सात.......
कोक्णात ह्या असाच चल्ता असा काय नाय.....
आम्चे झिल्गे सुधा आता फुद्ड्ला शिक्शान घेवन बिजिनिस करुक लाग्लेय्त.
रव्ता रवली गोश्ट घरा फुड्ल्या कचर्याची..... ता काय सगळ्यान कडेच नसता...
माजो कोकण आळ्शी नाय आसा.... वायच जरा हात तोक्डे पडतत केवा तरी......
15 Apr 2012 - 9:25 pm | खटपट्या
आजच मी कोकणातून मुम्बईला आलो. माझेही गाव भालवली जवळच आहे. मला मात्र भालवलि गाव आवडला. मी ही माझे घर साफ केले काल. आजुबाजुचा परिसर साफ करताना कम्बर मोडली हो. वाट्ते तितके हे काम सोपे नाहि आहे हो.