एप्रिल अर्धा संपत आलाय. काही दिवसातच घरा घरांतुन आंब्यांचा सुगंध दरवळु लागेल. तस बाजारात आंब्यांच्या राजाच आगमन झालेल आहेच. पण सध्या त्यांचे नगा-गणीक भाव पहाता महागाईने आधीच फाटलेल्या खिशाला ठिगळं लावायची पाळी यायची. त्यामुळे तुर्तास अजुन काही दिवस वाट पहाण्या शिवाय गत्यंतर नाही.
माझं घर आणि आजोळ कोकणात (दोन्ही एकाच गावात समोरा समोर) असल्याने 'एप्रिल-मे'मध्ये घरी कधी आंब्यांचा दुष्काळ जाणवला नाही. एप्रिल महिन्याच्या मध्यावर मामा आंब्याची करंडी घेउन मुंबईतल्या घरी हजर असायचाच. मे महिन्यात शाळेला सुट्टी लागली की मग गावी आंब्यांचा फडशा पाडण्याच्या कामगीरीवर जातीने रुजु व्हायचो. आम्हा भावंडांमध्ये आंबे, ताडगोळे, शहाळी रिचवायच्या शर्यती लागायच्या. एप्रिलमध्ये लोणची, पन्हं, मुरांबे आदींच्या तावडीतुन वाचलेल्या कैर्या, आजी- मामाने माळ्यावर पेंड्यांमध्ये पिकायला ठेवलेल्या असायच्या. आम्ही गेलो की त्याचा फन्ना तर उडायचाच पण स्वतःच्या हाताने (दगड मारुन वा बेचकीने) वाडीतल्या झाडांवरचे आंबे पाडुन खाण्यात जी मजा असायची ती वेगळीच. असो तर सांगायचा मुद्दा काय तर बालपणी आम के आम आणि गुठलीयोंके दाम पण नाही.
मे महिन्यात हटकुन घरी होणारा पदार्थ म्हणजे बाठोणी (बाठ्यांच सासव.) इथे आफ्रिकेत तस पाहिल तर बारा महिने झाडांवर कैर्या लागलेल्याच असतात, पण आंब्यांचा खरा मौसम हाच, एप्रिल-मे. सध्या बाजारात सर्वत्र रायवळ आंबे दिसु लागलेत. काल आईच्या हातच्या बाठोणीची आठवण झाली. म्हटल मौका हे दस्तुर भी है. होउन जाउदे.
तसा हा पदार्थ बनवण्याच्या दृष्टीने काही फार पेश्शल नाही. मुळात रायवळ आंब्यांची आंबट गोड चव आणि त्यात थोडी मॉडिफिकेशन केलं की झालं. :)
साहित्य :
माणशी किमान दोन ते तीन बाठे येतील या हिशोबाने रायवळ (चोखायचे) आंबे घ्यावे. एक कुणाच्या दाढेलाहील लागणार नाही. ;)
मी सहा घेतले. :)
फोडणीसाठी :
१ मोठा चमचा जीरं.
१ लहान चमचा लाल तिखट.
१ लहान चमचा काळीमिरी पुड (भरड)
मीठ चवी नुसार.
२ मोठे चमचे साजुक तुप.
कृती :
आंबे, सालं सुटी होतील इतपत हलक्या हाताने दाबुन घ्यावे. सालं काढुन बाठे गरा सकट बाजुला काढावे. सालीत उरलेला गर चमच्याने काढुन घ्यावा. वाटल्यास दोन आंब्यांचा पुर्ण रस काढावा.
कढईत तुपावर जीर, काळीमिरी, लाल तिखट आणि मीठाची फोडणी करावी.
बाठे आणि रस अलगद फोडणीत सोडावे. चमच्याने हलकेच एकत्र करावे.
लहान आचेवर ५ मिनिटं शिजवावे.
शक्यतो गरमा-गरमच वाढावे. (वाटल्यास सोबतीला चपाती-पुरी-भाकरी. नाहीतर नुसतेच.)
आंब्याच्या आंबट गोड चवीला किंचित तिखट आणि मीठाची अफलातुन जोड.
बघता काय सामिल व्हा. :)
प्रतिक्रिया
12 Apr 2012 - 4:08 am | बहुगुणी
कधी खाल्लं नाही, करून बघायलाच हवी अशी पाककृती, धन्यवाद!
12 Apr 2012 - 4:25 am | सुनील
अहाहा! अप्रतिम.
हा पदार्थ चाखायला एखाद्या कोकण्याचं घरच गाठावे लागते. हॉटेलात नाही मिळत.
12 Apr 2012 - 6:39 am | रेवती
शाकाहार्यांवर कृपा केलीस म्हणून धन्यवाद.
फोटू आणि पाकृ भारी.
माझ्याकडच्या पाकृच्या पुस्तकात याची पाकृ आहे पण चव कशी असेल या शंकेमुळे वाचनमात्रच राहिले.
त्यात फक्त एकच फरक म्हणजे थोडा गूळ घालायला सांगितलाय.
12 Apr 2012 - 12:52 pm | गणपा
रेवती आंबे जर जास्त गोड नसतील वा आंबट असतील तर मग त्यात थोडा गुळ घालतात.
काही ठिकाणी ओला नारळ आणी हिरव्या मिरच्यांच वाटण करुन ते ही घालतात. मी स्वतः मात्र नारळ घातलेल कधी चाखलं नाही. त्यामुळे आंब्यांची चव आणि रंग दोन्हीत फरक पडेल म्हणा. पण तेही एकदा करुन पहायला हवं. :)
12 Apr 2012 - 7:01 am | स्पंदना
मस्त हो गणपा भौ.
असाच एक साउथ इंडिअन प्रकार दही घालुन करतात, मला फार आवडतो तो.
12 Apr 2012 - 7:20 am | अत्रुप्त आत्मा
गंपा पाककृती टाके सारखा,खाण्यालाही उत चढे
तोंडात पाणि चहुकडे... ,नी आता अंबे शोधू कुणीकडे... :-)
12 Apr 2012 - 9:32 pm | सुहास..
खतरा !! जीवघेणे !!
12 Apr 2012 - 7:28 am | दिपाली पाटिल
व्वा, मस्त दिसतंय. काल एका मेक्सिकन शॅकमध्ये छोटूकसे आंबे दिसले होते ते आणून करून बघेन.
12 Apr 2012 - 8:02 am | सूड
झकासच !! घरी गेल्यानंतर करुन बघायला हरकत नाही.
12 Apr 2012 - 8:27 am | प्राजु
नवीनच प्रकार आहे.
मस्त आहे जे ही काही आहे ते.
12 Apr 2012 - 9:24 am | इरसाल
युपी चे आंबे यायला वेळ आहे रे अजुन.
12 Apr 2012 - 9:46 am | पियुशा
हायला !!!!
पहिल्यांदाच पाहीला हा प्रकार ,भारी दिसतोय करुन बघायला हवा :)
पण रायवळ आंबे घसा खवखवतात ना ?
12 Apr 2012 - 10:02 am | स्वानन्द
बाठ म्हणजे कोय का?
आणि कोयीचं काय करायचं? ती पण खायची?
12 Apr 2012 - 8:40 pm | साती
हो, बाठ म्हणजे कोयच.
तिचं काय करायचं?
तर जेवताना चपातीला लावून तिच्यावरचा गर संपवायचा. जेवून झाल्यावर ताटावरच हात सुकवत गप्पा मारताना बाठ चोखत चोखत तिच्या प्रत्येक तंतूतला रस चोखून घ्यायचा. पटाशीच्या दातांत बारीकशि फट असते तिथे बाठ अलगद घासून तिचा तंतू आणि तंतू(आम्ही बाठीचे केस म्हणतो) पांढरा करायचा.
मग हात धुवून एक काडी घेऊन दातात अडकलेले तंतू काढत अजून गप्पा मारत बसायचे.
गणपा, मस्त पाकृ.
12 Apr 2012 - 8:45 pm | गणपा
+१
आईतर इतकी वैतागते की बास आता बाठा फुटेल. दया कर त्याच्यावर अश्या विनवण्या करते. ;)
12 Apr 2012 - 8:57 pm | मेघवेडा
आम्रवंथ! स्वर्गसुख आहे स्वर्गसुख!
12 Apr 2012 - 11:33 pm | बिपिन कार्यकर्ते
+३
16 Apr 2012 - 8:51 pm | नेत्रेश
'कोकणस्थाने चोखलेल्या बाटीतुन झाड उगवत नाही 'असे म्हणतात, त्याचे कारण हेच असावे,
12 Apr 2012 - 10:04 am | प्रभाकर पेठकर
व्वा गणपा,
मस्तं पाककृती आणि कातिल छायाचित्रं. इथेच बोट, च् च् चमचा बुडवून खावेसे वाटत आहे.
सासव खाल्ले आहे. मस्त असते चव.
12 Apr 2012 - 10:07 am | अरुणा
नविन च आहे प्रकार ... पण आवडला ... :) करुन बघेन नक्की ...
12 Apr 2012 - 10:18 am | उदय के'सागर
पाकृ वाचता वाचता आंब्याचा वास अला :) ... झकास! आणि शाकाहारी पाकृ टाकल्याबद्दल विशेष धन्यवाद :)
12 Apr 2012 - 10:23 am | अमोल केळकर
सुरेख :)
अमोल केळकर
12 Apr 2012 - 10:23 am | प्रीत-मोहर
रायवळ आंब्यांच(घोंटां) सांसंव एकदम टेस्टी लागत.
असो. ८ दिवसात घरी जाणार असल्याने नो प्रॉब्लेम. आइ खाउ घालेलच :)
12 Apr 2012 - 10:39 am | प्रेरणा पित्रे
नविनच प्रकार दिसतोय्....पण झ्कास फोटो.. नक्किच करुन बघणार..
12 Apr 2012 - 10:46 am | अक्षया
वा!!!
दिसायलाच इतकी सुंदर डिश आहे. चवीला असणारच...
नक्की करून बघणार.. :)
12 Apr 2012 - 10:52 am | मृत्युन्जय
बाठ म्हणजे कोयच ना रे गणपा? ती पण खायची की काय रे?
12 Apr 2012 - 10:52 am | परिकथेतील राजकुमार
गंपाने शाकाहारी पाकृ टाकलेली बघून ड्वाले पाणावले.
पहिल्यांदाच ऐकतो / पाहतो आहे ही पाकृ. चव छान आलीये रे गणपा.
12 Apr 2012 - 11:02 am | गवि
वेगळ्या प्रकारची पा़कृ दिल्याबद्दल धन्यवाद..
कोंकणात असताना माझी आजी असाच पदार्थ कच्ची किंवा अर्धी पिकलेली कैरी वापरुन करायची..
"कोयाडं" म्हणतात का यालाच?
ते असेल तर, मला ते आवडायचं नाही. उकडलेल्या कैरीला खरंतर आंबट आमरसाला शिजवून गुळमट बनवून फोडणी दिल्यासारखं काहीतरी.
पण घरात बाकी सगळे हा पदार्थ आवडीने चट्टामट्टा करायचे, त्याअर्थी बहुतांश लोकांना आवडण्यासारखा असावा.
23 May 2012 - 1:46 pm | कपिलमुनी
कच्ची कैरी , बारीक चिरून आणि कोय ठेवायची बर का !
नंतर गुळ बारीक करून घालयचा , जिरे मोहरी कडीपत्ता यांची तुपासोबत फोडनी देउन शिजवायचे ...
अशी कृती असावी ..आमच्या कडे याला कायरस म्हणतात ..
12 Apr 2012 - 11:29 am | sneharani
नवीन प्रकार कळला आज! मस्त दिसतेय डिश!!
:)
12 Apr 2012 - 11:37 am | मदनबाण
गण्या गण्या अरे कशे कशे इमोशनल अत्याचार आमच्यावर करतोस रे बाबा !
च्यामारी कधी ऐकले नाही असे पदार्थ तू इतक्या सुंदरतेने सादर करतोस !
-^- नमस्कार करतो तुला... :)
12 Apr 2012 - 12:04 pm | शिल्पा नाईक
माझ्या माहेरी हा पदार्थ वटपोर्णिमेला केला जातो. पण त्याच नाव वेगळ आहे.
@गणपा - तुमच गाव वसई विरार च्या आसपास आहे का हो (मागे भुजींग ची पाक्रु तुम्हीच टाकली होती)
12 Apr 2012 - 12:14 pm | कवितानागेश
बाठोणी (बाठ्यांच साकव.) > इथे टायपो झालाय का?
साकव म्हणजे छोटा पूल. सासव म्हणजे वरचा फोटुतला खाउ!
याला गुजराथी लोक गोळ्केरी म्हणतात असे वाटतय. आणि धणेपूड्पण घालतात.
असेच कच्च्या करवंदाचे पण करतात.
- उगीच ज्ञान पाजळणारी माउ
12 Apr 2012 - 12:22 pm | प्यारे१
अफ्टर रिअल लाँग गणपा शेफ हॅज पुट हीज पाकृ... दॅट टू अ व्हेज पाकृ!
माईन्ड बॉगलिंग पाकृ.. अॅज इट इज सीन व्हेरी अममम ब्युटीफुल इट मस्ट बी टेस्टींग पण वेरी गुड.
कीपीडप! :)
- प्यारेश कोठारे
12 Apr 2012 - 12:28 pm | मुक्त विहारि
एकदा करुन बघायला हरकत नाही...
12 Apr 2012 - 1:16 pm | स्मिता.
ही एक वेगळीच पाकृ दिसतेय!
या आधी आंबा कधी शिजवलेला पाहिला नव्हता. कल्पना करूनही चवीचा अंदाज येत नाहीये, पण गणपा भाऊंचं रेकमेंडेशन असल्याने एकदा करून बघेन :)
12 Apr 2012 - 1:16 pm | गणपा
@ aparna akshay,
हा अनवट पदार्थ दिसतो. पाकृ येउदे की मग. :)
@ पिवशे,
देठा कडला भाग काढुन टाकायचा. त्यात कंजुशी करायची नाही. ;)
मग नाही घसा खवखवणार. :)
@ स्वानंद /मृत्युन्जय,
होय बाठा/बाठ/घोट म्हणजे कोयच. पण जोवर कैरी कोवळी असते तोवर ती कोय, पण एकदा का त्यावरच आवरण कडक झालं की मग तो बाठा/बाठ/घोट. नाही तो खाण्याची हिंमत आजवर झाली नाही. ;) पण तो फुटेल की काय इतपत दातांवर घासुन घासुन सगळा रस / गर गिळंकृत करतो.
@ गवि,
"कोयाडं" वेगळ. ते अर्धव कच्च्या कैर्या/आंब्या पासुन करतात.
हे संपुर्ण पिकलेल्या आंब्यांच करतात.
@ शिल्पा नाईक,
वसई विरार च्या पुढे डहाणुरोड हे माझ गाव. बाकी आमचे सगळे नातेवाईक याच पट्ट्यात वसलेले.
@ लीमाउजेट ,
धन्स.. वेंधळेपणा लक्षात आणुन दिलास. :)
हे कधी चाखलं काय पाहिलं ही नाही. कच्ची करवंद म्हटली की ती खार्या पाण्यातली किंवा लोणच्यातली इतपतच धाव.
बाकी सर्व वाचक प्रतिसादकांच्या सहभागा बद्दल धन्स. :)
12 Apr 2012 - 6:10 pm | चित्रा
होय बाठा/बाठ/घोट म्हणजे कोयच. पण जोवर कैरी कोवळी असते तोवर ती कोय, पण एकदा का त्यावरच आवरण कडक झालं की मग तो बाठा/बाठ/घोट.
परफेक्ट.
धन्यवाद.
सासव मस्तच.
आमच्या घरी काहीजण आमरसातही नुसती काळी मिरी, किंचित मीठ घालून खातात.
12 Apr 2012 - 1:20 pm | स्वाती दिनेश
मस्तच रे गणपा..
( थोडा गूळ घालून केलेले सासव मस्तच लागते. आंबट, गोड, तिखट चवींचे मिश्रण.. अहाहा..)
अननसाचेही सासव करतात, ते ही मस्त लागते.
स्वाती
12 Apr 2012 - 1:26 pm | मेघवेडा
आगागागा... तुडुंब हळवा झालेलो आहे!
12 Apr 2012 - 2:12 pm | प्राध्यापक
आंब्यापासून असल काही बनेल याचा कधीच विचार केला नव्हता,एरवी नेहमी फक्त आमरस हादड्णार्यांना हा बदल नक्कीच आवडेल यात काही शंका नाही, एकदम मस्त आहे फोटो आणी माहीतीही ,
एक प्रश्न : हा पदार्थ बनवायला फक्त रायवळ आंबाच पाहीजे की दुसरा कुठचाही चालतो ?
12 Apr 2012 - 2:23 pm | गणपा
आंब्यांचे दोन मुख्य प्रकार एक रायवळ आणि दुसरा कलमी आंबा. बाकी जाती आणि पोट जाती बक्कळ आहेत.
या पदार्थासाठी रायवळ आंबेच हवेत असं नाही. कुठलाही रसाळ आंबा असला की झाल. :)
उद्या खिशाला परवडणार असेल तर मग हापुस आंबा वापरायलाही हरक नाही. पण या पदार्थासाठी तोतापुरी सारख्या आंब्यांच्या फंदात न पडलेल बर. :)
12 Apr 2012 - 2:24 pm | गवि
शेपू आंबाही चांगला ठरावा.. त्याचा खास फ्लेवर ज्यांना आवडत असेल त्यांच्यासाठी.. मला तर आवडतो बुवा.
12 Apr 2012 - 2:21 pm | स्पा
यम्मी :)
मस्त हो गणपा सेठ
12 Apr 2012 - 3:19 pm | नगरीनिरंजन
रस करून खाता येणार नाहीत असे आंबे असतील तेव्हा करून खायला बरी आहे पाकृ.
पहिल्यांदाच गणपाच्या पाकृला "बरी" म्हणून बोळवता आले. :-)
12 Apr 2012 - 4:35 pm | गणपा
हा हा हा ननि, मागे माझा मिपावर झालेला 'पोपट' तुमच्या पहाण्यात आलेला दिसत नाही. ;)
12 Apr 2012 - 4:55 pm | पिंगू
ह्यावेळेस आंबे खरेदी केल्यावर पहिली हीच पाककृती करेन.
- पिंगू
12 Apr 2012 - 5:01 pm | स्वातीविशु
ते गोंड्स आंबे आणि सासवचा फोटो पाहून तों. पा. सु. :)
12 Apr 2012 - 5:07 pm | सुहास झेले
लैच भारी रे भाऊ...... तोंडाला पाणी सुटले :) :)
12 Apr 2012 - 5:27 pm | बिपिन कार्यकर्ते
:(
12 Apr 2012 - 5:41 pm | यकु
बिका, भरीत पाहून ठीक आहे पण आंबे पाहुन सुद्धा :( हे म्हणजे अंमळ बुचकळ्यात पडलो आहे ;-)
पाकृ आवडेश गंपाशेठ!
आयुष्यात पहिल्यांदाच आंब्याला फोडणी दिलेली पाहिली आहे.
घरी कधी करुन पाहताना आणि ते घरच्या लोकांनी पाहुन उडालेला गहजब कमी करण्यासाठी थोडेसे समुपदेशन करावे लागणार हे नक्की :)
12 Apr 2012 - 6:26 pm | स्मिता.
आजकाल कुठल्याही पाकृवर फक्त :( करून का निघून जाताय?
12 Apr 2012 - 7:05 pm | परिकथेतील राजकुमार
सध्या फक्त चिरमुरे आणि लाही पिठ खातात म्हणे ते.
12 Apr 2012 - 7:02 pm | रोहन कुळकर्णी
गणपा, यामधे थोडे मेथिचे दाणे घालुन बघ...छान चव येते....
12 Apr 2012 - 8:11 pm | श्रावण मोडक
च्यायला...
गणप्या, तुझ्या मानेवर भुतासारखा बसणार आहे. कित्येक दिवस इथं तुझे आणि सोक्याचे धागे उघडले नव्हते. आज उघडला आणि मेलो. आता मानेवर बसणार तुझ्या. सासव खाऊ घातलंस तरच सुटका.
12 Apr 2012 - 8:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, या भल्या माणसाच्या पाककृत्या पाहिल्या नसत्या तर जगात काय काय करुन खाल्ल्या जातं हे कळ्ळ असतं का असा प्रश्न मला गंपाच्या पाककृतीनंतर नेहमीच पडतो.
आंब्यापासून आमरस एवढंच आम्हाला माहिती आहे. भो चालू दे तुझं...! हे आम्ही पहिल्यांदाच पाहतोय, वाचतोय. :)
-दिलीप बिरुटे
12 Apr 2012 - 8:35 pm | प्रचेतस
येकदम भन्नाट.
12 Apr 2012 - 8:45 pm | सानिकास्वप्निल
बाठोणी / बाठवणी पाहून तोंडाला पाणी सुटले
लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या गणपाभौ
आम्ही पण ह्यात थोडा गुळ घालतो :)
बाकी तुमच्या पाकृ आणी सादरीकरणाला सलाम :)
12 Apr 2012 - 8:49 pm | पैसा
एक तर अजून आंबे प्रचंड महाग आहेत, वरनं हे असले फोटो! कुठे फेडशील हे पाप? आँ?
आम्ही याला सासव म्हणतो कारण त्यात खोबर्याबरोबर थोड्या मोहर्या, अगदी अर्धा चमचा, वाटून घालतो. (गोव्यात मोहरीला सासवा म्हणतात.) असलं सासव अंबाडे, अननस यांचही करतात. अंबाड्यात गूळ घालतात. हा पदार्थ असा आहे, की आंबट तिखट आणि गोड या तिन्ही चवी समप्रमाणात लागल्या पाहिजेत. पोळ्यांबरोबर रस खाऊन झाला की कोय चोखून खाताना अशी काही ब्रह्मानंदी टाळी लागते की बस!
12 Apr 2012 - 9:28 pm | सुनील
असलं सासव अंबाडे, अननस यांचही करतात
लहानपणी अनेकदा खाल्लेली अनसा-फणसाची भाजी आठवली!
हा पदार्थ असा आहे, की आंबट तिखट आणि गोड या तिन्ही चवी समप्रमाणात लागल्या पाहिजेत.
अगदी हेच उडीद-मेथी दाणे घालून केलेल्या उडीद-मेथीबाबत म्हणता येईल.
15 Apr 2012 - 12:00 am | chipatakhdumdum
तुम्ही दिलेली पाकक्रुतीच खर्या सासव ची आहे.
आमच्याकडे मालवणला सारस्वत सोडून बाकीचे याला आंब्याच रायत म्हणतात.
ofcourse, u know RAYATA is always different than SASAV.
तुम्ही काकडीच, भोपळ्याच, आंबाड्याच, आणि अगदीच तर मिरचीच रायत करु शकता.
पण पण पण सासव फक्त आंब्याचच.
12 Apr 2012 - 11:06 pm | jaypal
आत्मा त्रुप्त झाला.
पुर्वी खालेल्या (स्पाईसी मेंगोची) चटपटा आमची आठवण जागी झाली. पण ही पा.क्रु. त्या हुन सरस व निराळी आहे.
मी तरी प्रथमच पाहतो आहे.
12 Apr 2012 - 11:16 pm | जागु
वा छान प्रकार आहे.
12 Apr 2012 - 11:20 pm | इन्दुसुता
<<(गोव्यात मोहरीला सासवा म्हणतात.) >>
वाचून हसता हसता खुर्चीतून पडले हो.
बाकी पाकृ मस्तच... करून पाहायलाच हवी. गंपाभौ आणखी शाकाहारी पाकृ येऊ द्या हां.
13 Apr 2012 - 4:35 pm | अमृत
आंबे बाजारात आल्यावर.
बाकी पाकृ जबर्या....
अमृत
13 Apr 2012 - 4:43 pm | चिगो
जबरा दिसतंय, मालक.. करुन बघणार.
13 Apr 2012 - 5:08 pm | गणपा
धागा वर आला आहेच तर
पुन्हा एकदा सर्व नव्या वाचक / प्रतिसादकांच्या सहभागा बद्दल धन्स. :)
14 Apr 2012 - 3:22 pm | प्राजक्ता पवार
नविनच प्रकार कळला .
3 Jun 2016 - 1:55 pm | प्रसाद गोडबोले
भारी आहे हे :)
1 May 2020 - 12:14 pm | प्रचेतस
खल्लास आहे, आंब्याच्या दिवसात गणपाशेठची ही जबरदस्त पाककृती.