अॅलियम अर्सिनम, रॅमसन्स ,वाइल्ड गार्लिक,ब्रॉड लिव्ड गार्लिक अशा अनेक नावाने प्रसिध्द असलेल्या बेअरलाउखच्या जुड्या आठवडी बाजारात साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून दिसायला लागतात. ह्या पानांचे करतात तरी काय? असे आमच्या त्सेंटा आजीला विचारले असता तिने सांगितले याची पेस्टो करतात. ही पाने फक्त मार्च,एप्रिल मध्येच मिळतात म्हणून त्याची पेस्टो वर्षभर टिकेल अशी करुन ठेवता येते. हिरव्या रंगाची ही पेस्टो न्यूडल्स, पास्ता,सलाड, सूप इ. मध्ये वापरतात. ही पाने रानात भरपूर उगवतात पण अजून एक दोन प्रकारची पाने अगदी अशीच दिसतात आणि फसायला होतं, ही दुसरी पानं विषारी असतात त्यामुळे रानातून बेअरलाउख आणण्याचा अतिउत्साह न दाखवता आठवडी बाजारातूनच जुड्या घेण्याची सूचनाही केली.
पेस्टो करण्याच्या अनेक पध्दतींपैकी ही एक-
१जुडी वाइल्ड गार्लिक,
८-१० बदामबिया/काजूबिया
१ आक्रोड फोडून
१०-१२ पाइननट्स, २ चमचे सूर्यफूलाच्या बिया, २ चमचे भोपळ्याच्या बिया- (जर ह्या बिया उपलब्ध नसतील तर बदाम/काजू वाढवणे.)
१ वाटी किसलेले पार्मेसान चीज. (जर पार्मेसान उपलब्ध नसेल तर ग्राना पदानो चीज )
६-७ मिरी, १/२ चमचा मीठ, १ चमचा लिंबूरस ( एका फोडीचा रस) ,
साधारण १/२ वाटी सनफ्लॉवर ऑइल
१/२ वाटी ऑलिव्ह ऑइल
वाइल्ड गार्लिकची पाने धुवून एका फडक्यावर घालणे. पानातले पाणी टिपून घेणे.
बदाम, आक्रोड, पाइन नट्स, सुर्यफूल, भोपळा इ. बिया कोरड्याच हलक्या भाजून घेणे.
पाने मिक्सर मधून भरड वाटणे, त्यात ह्या रोस्टेड बिया घालणे आणि परत वाटणे.
मीठ, मिरपूड, चीज ,अर्धे तेल घालणे आणि वाटणे,चटणी सारखे व्हायला हवे.
आता हे मिश्रण वाडग्यात काढून घेणे, उरलेले तेल घालून कालवणे. लिंबाचा रस घालणे.
घट्ट झाकणाच्या बाटलीत भरणे. पेस्टो भरुन झाली कि वरुन परत तेल घालणे.
हवे तेव्हा पेस्टो काढून घेतली की परत तेल घालून ठेवणे म्हणजे पेस्टो टिकते.(आपण लोणचं टिकायला कसे जरा जास्त तेलाची फोडणी वरुन ओततो तसे.)
ही पेस्टो वापरुन अनेक प्रकारच्या रेसिप्या बनवता येतात, त्यातीलच हा एक पास्ता-
२ वाट्या पास्ता(पेन्नं किवा फुसिली), अर्धी वाटी जाडसर किसलेले गाजर, अर्धी वाटी मटारदाणे, २ चमचे बेअरलाउख पेस्टो,
२चमचे ऑलिव्ह ऑइल,१ ते १.५ कप दूध, २चमचे मैदा,चवीनुसार मीठ व मिरपूड, हवी असल्यास एखादी हिरवी मिरची आणि पेरभर आल्याचा तुकडा
पास्ता शिजवून घ्या आणि चाळणीवर टाकून निथळत ठेवा.
ऑलिव्ह ऑइल वर गाजर आणि मटार परतून घ्या.हवी असेल तर एक हिरवी मिरची बारीक चिरुन घाला,आले किसून घाला. मीठ व मिरपूड घाला आणि चमचाभर पेस्टो घाला.
दूधात मैदा विरघळवून घ्या, गुठळ्या होऊ देऊ नका. त्यात चमचाभर पेस्टो घालून चांगले ढवळून एकजीव करा.
आता हे मिश्रण परतलेल्या भाज्यांवर ओता व ढवळा. शिजत आले की त्यात पास्ता घाला व एक वाफ काढा.
बेअरलाउख पास्ता तयार आहे. खाताना हवे असल्यास पास्त्यावरही पेस्टो घेता येईल.
प्रतिक्रिया
9 Apr 2012 - 2:31 pm | परिकथेतील राजकुमार
पाकृ मस्तच आणि फटू देखील. त्सेंटा आजी आणि तू दोघींचे आभार.
आता इकडे वाइल्ड गार्लिक आणि भोपळ्याच्या बिया कुठे मिळतील ते पिडांकाकांना विचारायला हवे.
9 Apr 2012 - 2:55 pm | स्वाती दिनेश
पर्या, वाइल्ड गार्लिक नाही मिळाली तर लसणीची पात वापरता येते हो.
आणि राहिल्या, भोपळ्याच्या बिया .. तर मंडईत भोपळा मिळतो बरं..
त्यामुळे एवढ्या तेवढ्या साठी शोधाशोध नको करायला, ;)
स्वाती
9 Apr 2012 - 2:51 pm | सहज
सोबत सॉसेज / चिकन / फिश काहीतरी पाहीजे बॉ! (चित्रात दाखवलेल्या पास्तापैकी एक चतुर्थांशच फार तर दोन पंचमांश एका सर्व्हिंग मधे पुरे !)
बाकी गार्लीक व पास्ता म्हणले की आमचे मत अॅग्लीओ ऑलीओ.
9 Apr 2012 - 2:48 pm | ५० फक्त
धन्यवाद एका वेगळ्या प्रकाराची माहिती दिल्याबद्दल.
@ परा, वेगळी चौकशी कशाला करायला पाहिजे, सध्या गार्लिक अन भोपळा दोन्हीचे भाव एवढे वाईल्डली वाढलेत की वेगळी वाईल्ड जात हुडकायची गरजच नाही.
9 Apr 2012 - 2:54 pm | गणपा
मस्तच गो स्वाती ताय.
सहजरावांशी सहमत.
:)
9 Apr 2012 - 3:43 pm | पिंगू
चवीची कल्पना करतोय. कशी असेल बरे चव?
- (चवीचे चोचले पुरवणारा) पिंगू
9 Apr 2012 - 3:54 pm | पहाटवारा
पास्ता म्हणजे आपलि एकदम फेवरीट डिश .. मस्त दिस्तोय फोटुत ..
- आभारप्रदर्शी पास्तनजी ..
9 Apr 2012 - 5:04 pm | रेवती
अगदी नाविन्यपूर्ण पेस्टो.
पास्त्याची कृतीही आवडली.
9 Apr 2012 - 8:31 pm | स्वाती२
मस्त!
10 Apr 2012 - 6:34 am | दिपाली पाटिल
छान, वाइल्ड गार्लिक पेस्टो पहील्यांदा पाहीला.
10 Apr 2012 - 4:56 pm | सानिकास्वप्निल
छान :)
10 Apr 2012 - 7:52 pm | बिपिन कार्यकर्ते
ग्गंग्गंग्गंग्गं!
10 Apr 2012 - 9:39 pm | सुनील
अरे वा! वेगळीच पाकृ.
पेस्टो न करता ताजी वाइल्ड गार्लिकची पाने वापरून काय करता येईल काय?
10 Apr 2012 - 9:45 pm | स्वाती दिनेश
वाइल्ड गार्लिक सलाड करता येईल.
स्वाती
10 Apr 2012 - 10:54 pm | मदनबाण
मला पास्ता एव्हढा आवडत नाही,पण फोटु पाहुन नक्कीच चवदार असणार याची खात्री वाटते. :)
19 Apr 2012 - 2:19 pm | प्राजक्ता पवार
मस्तंच :)
6 Mar 2015 - 5:15 pm | कवितानागेश
ओल्या लसणीचे दिवस आलेत. म्हणून ही पाकृ वर काढतेय.
24 May 2016 - 7:48 pm | स्रुजा
हाय स्वाती ताई,
आज तुझ्या रेसिपीने बेअरलाऊख पेस्टो केला आहे. इथे फार्मर'स मार्केत मधे वाईल्ड गार्लिक मिळाला , तुझी रेसिपी आठवली लगेच :)
मला थोडे प्रश्न आहेत पण.
१. मी चव घेऊन पाहिली , छान लागते आहे पण घास संपता संपता पेस्टो हलकासा कडवट लागतो. वाईल्ड गार्लिक ची चव असावी का ती? का माझं काही चुकलं?
२. पास्ता करणार आहे आज संध्याकाळी मी पण अजुन कशात वापरु शकते मी हे? तू लिहिलं आहेस की बर्याच गोष्टीत वापरता येतो म्हणुन.
३. किती दिवस टिकतो साधारण ? डीप फ्रीझ मध्ये टाकु का?