काल दुपारी(२५ फेब्रुवारी) बरोब्बर चारला किल्यावर निघायचं असं म्हणता म्हणता,सहा कधी वाजले कळलं नाही.बरोबर येणारा आमचा एक मैतर अयत्यावेळी इचकला.पण माझ्यासाठी शिवाजी ट्रेलचा हा वार्षिक कार्यक्रम म्हणजे पंढरीच्या वारी सारखा खरोखर पुण्याचं संचित करवुन देणारा,म्हणुन ''वन मॅन आर्मी झिंदाबाद,शिवाजी महाराज की जय'' अशी घोषणा करुन मी एकदाचा निघालो...घनगड म्हणजेच येकोल्याच्या किल्यावर...हा किल्ला पुणे- ताम्हाणी घाटातुन ६९कि.मि.वर लोणावळ्याकडे जायला जो फाटा फुटतो,तिकडनं आत १८ कि.मि.वर आहे.अता ताम्हाणीघाट अगदी आमचाच सवईचा नित्याचा ओळखिचा झालेला असल्यामुळे कित्तीही अंधार असला,तरी तोच सोबतीला असल्यासारखा असतो.त्यामुळे लोणावळा फाट्यापर्यंत जाईस्तोवर मामला बिनबोभाट होता...(रस्ता खडतर...हो खडतरच,असला तरी..!)
फाट्यावर आत वळणार तेवढ्यात,''चला हो काका...'' अशी हाळी ऐकू आली.मी म्हटलं रात्री आठच्या निबिड अंधारात भटजीच्या ड्रेसवर नसतानाही हा ''मजाला वळिखणारा कोण आला..?'' पण आमच्या गाडीवर बांधलेल्या केळीच्या खुंटांचा तो प्रताप होता,हे मला ते दोघे माझ्या जवळ येई पर्यंत चटकन लक्षात आलं..तेही ट्रेलचेच वारकरी...मीही म्हटलं चला सोबत झाली या जंगलवाटेवरची.पण काही वेळातच ते दोघेजण का कोण जाणे एकदम जोरात पुढे निघुनच गेले.मी मागनं जोरात हॅर्नबिन देतोय,,,पण गायब झाले ते.नंतर काही वेळानी मला साक्षात्कार जाहला,की ते जोरात गेलेले नसुन मीच अंमळ हळुहळू चाललोय.कारण आमची छोट्या चाकाची गाडी...होंडा अॅक्टिव्हा...! रस्त्याला खडबडीत पणा जेवढा,तेवढीच वाळूही सुटलेली..त्याबरोबर गच्च अंधार..माझा स्पीड वीसपर्यंत कधी खाली आला,मलाच कळलं नाही.''वाळुवर 'ही' गाडी घसरते''...नावाची एक अनामिक भीती पूर्वी एकदोन शिरसाष्टांग नमस्कार घातलेले असल्यानी मनात इतकी खोलवर रुजलेली आहे,की वाळू माझ्या आधी गाडिला दिसते,आणी आपोआप वेग कमी होतो.मग मी नेहमीचा उपाय केला.बरोबर घेतलेल्या पानांच्या चवडितलं एक पान ''लावलं'' आणी कानात गाडिच्या स्पीड इतक्याच मंद अवाजात आमची आश्या वाटेवरची आवडती सरदारी बेगम मधली गाणी लावली. रस्त्यामुळे गाडीच्या चिपळ्या वाजत होत्याच,त्या बरोबर हे भजन लावलेलं असल्यानी माझी एकदिंडी यात्रा पुढे निघाली.रस्ता चुकायची भिती नव्हतीच कारण शिवाजी ट्रेलच्या शिलेदारांनी लावलेले बोर्ड अतिशय बरोब्बर असतात.
मधे काही ठिकाणी रस्ता या सरकारवर असा उखडला होता,की ज्याचं नाव ते...नुसती माती आणी दगडगोट्यांची लयलूट झालेली.रस्ता नक्की कुठाय..?हेच कळत नव्ह्त. त्यामुळे तिथे काही काळ ''आपुली वाट नक्की कोणती?सांगावयास एकही न सांगाती '',अशी माझी गत झालीवती खरी,पण अंधाररस्ते वहातुक आत्मानुभवानुसार-''जिथे झाडी मळलेली दिसेल,तिथुन गाडी लाइट फिरवत दामटावी-रस्ता आपणहुन दिसतो'' ही उक्ती फळाला आली,आणी आठरा कि.मि.साठी सव्वा तासाचं मोल मोजुन मी ''एकोले'' गावी गडपायथ्याला रात्रौ ९:१५ला डेरेदाखल झालो.
शिवाजी ट्रेलचे संस्थापक आधार असे सर्वकाही असलेले आमचे क्षीरसागर सर यांनी नेहमी प्रमाणे अगत्यानी माझी पुढिल सोय तात्काळ लाऊन दिली...रात्र फार झालेली नसली तरी मी रात्रीच्या मानानी फारच ''झालेलो'' होतो,त्यामुळे मी लगेच जेवण उरकुन,उतरलो होतो त्या खोल्यांच्या बाहेर ओसरीवर वार्याला पथारी टाकुन पसरलो सुद्धा...सकाळी ६वाजता उठाउठ झाली.आणी आंघोळ..चहा इत्यादी अवरुन मी आमच्या नेहमीच्या धोतर उपरणं ड्रेसवर आलो....आणी गडावर निघण्याची वाट बघायला लागलो.
गेली तीन वर्ष मी या शिवाजी ट्रेलच्या दुर्गपुजा अभियानाचा एक भाग झालेलो आहे.गेली पंधरा वर्ष ही संस्था हा दुर्गविकसनाचा एक अतिशय उपयुक्त कार्यक्रम यशस्वीपणे राबवत आहे.ही संस्था दरवर्षी एक गड दत्तक...होय दत्तकच घेते..आणी मग वर्षभर गडावरची सगळी डागडुजी,रोपिंग,पाण्याच्या टाक्या साफ करणे/सु-रक्षित करणे,पायर्या दुरुस्त करणे/आवश्यक आणी शक्य तिथे नव्या बनवणे...अशी अनेक कामं,अचाट परिश्रम,आणी अभंग निष्ठेनी करत असते.आणी हे सगळ काम चालतं ते कुठेही जाहिरातबाजी न करता,लोकांनी काम आणी ही गडकोटांप्रती असलेली ममता/निष्ठा पाहुन आपणहुन दिलेल्या वर्गणीतुन..या शिवाय जो उरलेला खर्चाचा मोठ्ठा भाग असतो,तो शिवाजी ट्रेलचे सभासद स्वतःच्या खिशातुन पूर्ण करतात...या कामातला ''आर्थिक'' भाग मी मुद्दाम आधी सांगितला,कारण शिवाजीचं नाव घेऊन राजकारण करणार्या/सत्तेवर येणार्यांना ही कामं करणं(आर्थिक दृष्ट्या) खरतर कित्ती सोप्पं,पण जिथे राजकीय मलिदा मिळत नाही,तिथे ही लोकं कधी ढुंकुनही बघत नाहीत... अश्या परिस्थितित या संस्थेनी येणारा पैसा आणी क्षीरसागर सरांच्या अफाट मॅनेजमेंट मधुन दरवर्षी वाढत्या संख्येनी जमणारी कार्यकुशल लोकं,,,एवढ्या बळावर शिवबाच्या या महाराष्ट्रातले पंधरा गड आज येण्यालायक/रहाण्याजोगे केलेले आहेत...
वर्षभर खपुन डागडुजी केलेल्या अश्या प्रत्येक गडावर फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी सत्यनारायण असतो... आणी क्षीरसागर सरांच्या एका शब्दावर वय वर्ष ७ ते वय वर्ष ७० ची अनेक मंडळी हजेरी लावत असतात... हा एक रविवार म्हणजे वर्षभर केलेल्या मेहेनतीचा खराखुरा लोकार्पण सोहळाच असतो.गडावर सत्यनारायण करण्याच्या निमित्तानी या सोहळ्याचा एक छोटासा भाग होण्याचं भाग्य मला मिळालं....एरवी गडांवरती मुद्दाम फिरायला जाणार्यांपैकी काही मी नव्हे.पण या संघटनेची शिस्त,जिद्द,चिकाटी,आणी कामावरची अभंग निष्ठा अशी काही वेड लावणारी,झपाटुन टाकणारी आहे,की 'एकदा जो शिवाजी ट्रेलला आला,तो शिवाजी ट्रेलचा झाला' असे बेलाशक समजावे...अश्या या शिवनिष्ठावंत संघटनेला/संस्थेला/कुटुंबाला माझा सादर प्रणाम. ---^---
१)पायथ्याला एकोले गावी असलेला मारुतराय
२)येणार्यांच्या उदरभरणाची सोय पहाणारे आमचे बल्लवाचार्य त्यांच्या सांगात्यांसह...
३)आम्चं सकाळी गडा-वर जाईस्तोवर जे इकडे/तिकडे भटकणं चालू होतं,त्यात सापडलेला हा दू-र्गम फोटू ;-) वळखा पाहू हे काय..?
४)मुलांना थंडी वाजत नव्हती,पण शेकोटी करायची हौस दांडगी
५)लॉयला हायस्कुलची वानरसेना आणी त्यांचे क्षीरसागर सर-मुलांना,पुढच्या कामगिरीच्या ऑर्डर
देताना
६)आंम्ही मार्गस्थ झालो...वानरसेनेकडुन पुजेचं सामान गडावर चाललय
७)गड कोणताही कित्तीही दुर्गम असो,ट्रेलचे लोक रोड मार्किंग सारखी सगळी बारीक/सारीक कामंही रविवारच्या आधी पूर्ण करतात
८)बोर्ड लावण्यासाठीचे भारी/भक्कम अँगल वर नेताना-वा-नरसेना
९)वा-नर सेना
१०) ह्हा...हुश्श्श...! गडमध्य-गारजाई माता मंदीर
११)गारजाई माता
१२)गारजाई माता-साडी/मुखवटा...लेऊन
१३)ट्रेल बोर्ड-किल्याची त्रोटक माहिती व नकाशा
१४)ही गारजाई मंदिरात केलेली सत्य-नारायण पुजा... -१)
-२) आणी हे काही मागाहुन मला मिळालेले माझेच ;-) फोटो...
१५) पहिली तटबंदी आणी तिचं ट्रेलनी केलेलं बांधकाम(व्हाइटिश शेड)
१६)शेवटच्या टप्यात शि.ट्रेलनी बसवलेली लोखंडी शिडी
१७)पायर्या डागडुजी...
१८)गारवारा आणी थंड सावली ची नैसर्गिक सोय
१९)थंड सावली घेतल्यावर मनाला शांत करणारी त्याच शिळपोकळीतली देवी
२०)जीथे रोप वे नाही तिथे येणार्यांसाठी भर उन्हात वानर सेना मदतीच्या हातासह उभी असते...दिवसभर!
२१)पाण्याचे टाके...आधी
सफाई नंतर
गडावर पाण्याच्या सुविधेसह हेही एक अत्यावश्यक काम
२२)तैला-बैला पर्वत
२३)गडावर गेल्यानंतर आजुबाजुची खुणावणारी पर्वतराई
२४)आणी काही नजरेचा थांग लागू न देणार्या दर्या
२५)वरुन मध्यावरची दिसणारी मोकळी विस्तीर्ण पठारं...
२६)( गडावर मध्यभागी फ्लॅग पोस्ट)- ''शिवबाचा गजर करी नामाचा झेंडा रोविला''...
प्रतिक्रिया
27 Feb 2012 - 2:56 am | पाषाणभेद
चवथ्या फोटोतला तू कोणता अआ?
बाकी क्षीरसागर सरांचे कार्य फारच मोलाचे आहे ते समजले. एरवी आताच्या काळात कोण गडकिल्यांची काळजी घेतो?
बाकी लग्न सराईचा सिझन स्लॅक झाला की काय तुझा? नाही तू गडावरच्या सत्यनारायणाच्याही आर्डरी घेतो आहेस म्हणून म्हटलं भटजीबुवा. :-)
27 Feb 2012 - 7:40 am | अत्रुप्त आत्मा
@चवथ्या फोटोतला तू कोणता अआ? >>>माझा यात एकही फोटो नाही... :-) (माझा फोटू बघायचा असल्यास माझ्या खरडवहीत जाणे.. ;-) )
@बाकी लग्न सराईचा सिझन स्लॅक झाला की काय तुझा? नाही तू गडावरच्या सत्यनारायणाच्याही आर्डरी घेतो आहेस म्हणून म्हटलं भटजीबुवा. >>> सिझन फुल्ल चालू आहे ;-) पण माझी स्वतःची इनव्हॉलमेंट असलेली काही कामं आहेतच,आणी अर्थातच त्यांच्यापुढे पैसा गौण आहे...अता या पुढे माझा फेब्रुवारीचा शेवटचा शनिवार/रविवार कायमच मोकळा रहाणार,,,,असणार... :-)
6 Mar 2012 - 2:38 pm | अत्रुप्त आत्मा
@चवथ्या फोटोतला तू कोणता अआ? >>> अता मी ''यात'' आलोय(फोटू क्रमांक-१४च्या पुढे),पर्वा शिवाजी ट्रेलच्या एका मित्रानी आपली ही मिपावरची पोस्ट पाहुन आणी प्रतिक्रीया वाचुन त्यांनी काढलेल्यातले दोन फोटो मला मेलनी पाठवले आणी इथे डकवण्याचा आग्रह केला,,, त्याच्या वर तुमच्याच प्रतिक्रीयेचा परिणाम झाला असणार हो पा.भे. ;-) त्यामुळे चिकटवलेत..अता बघा आंम्हाला ;-)
27 Feb 2012 - 7:29 am | ५० फक्त
धन्य आहात, पुढच्या पिढिसाठी हा वारसा जपणा-या क्षिरसागर सरांचे अनेक आभार.
27 Feb 2012 - 9:06 am | प्रचेतस
मस्त रे भटा.
कालचा कट्टा चुकवलास, पण जीवनभराचं संचित मिळवलंस.
फोटो आणि वर्णन छानंच. शिवाजी ट्रेलच्या दुर्गनिष्ठेलाही सलाम.
ताम्हिणी ते लोणावळा ह्या रस्त्याचा अनुभव तर कितीतरी वेळा घेतलाय. व्हर्जिन निसर्गाने अगदी ओतप्रोत भरलेला आहे तो. वाटेत कुंडलिका दरी ओलांडली की सिनेर खिंडीतल्या डोंगरात लेणीवजा एक खोदीव बांधकाम दिसते, तिथे एकदा जायचा मानस आहे. भांबर्ड्याची ती तीन शिखरं अफाट.
परतीच्या वाटेवरून लोणावळ्यामार्गे आलात काय. सालतर खिंड ओलांडली की तिकडील रस्ता खूपच चांगला आहे.
27 Feb 2012 - 10:48 pm | अत्रुप्त आत्मा
@परतीच्या वाटेवरून लोणावळ्यामार्गे आलात काय. >>> नाही,पुन्हा ताम्हाणीतनच आलो.
27 Feb 2012 - 9:24 am | जयंत कुलकर्णी
गडावर आपण पूजा घातलीत. वाचून बरे वाटले ! अतृप्त आत्मा हे नाव टाकून द्या आता....
27 Feb 2012 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा
@अतृप्त आत्मा हे नाव टाकून द्या आता.... >>> :shock: का बरं ..? आपल्या अश्या म्हणण्या मागचं कारण काही केल्या कळत नाहीये...खरडीमधे सांगितलत तरी चालेल,योग्य असल्यास तशी कृती मी नक्की करेन
@अन्या> इतकं सर्व करुनही तुमचा आत्मा अजुन अत्रुप्तच कसा काय???>>> बरेचदा सांगितलय,पण पुन्हा एकदा..अहो त्रुप्ती झाली तर पुढे काम करण्याची इच्छा रहात नाही ना...म्हणुनच कायम मी=अत्रुप्त आत्मा
27 Feb 2012 - 10:48 am | अन्या दातार
इतकं सर्व करुनही तुमचा आत्मा अजुन अत्रुप्तच कसा काय???
क्षीरसागर सर व तुम्हालाही __/\__
27 Feb 2012 - 11:55 am | मी-सौरभ
आमचाही सा. न.
27 Feb 2012 - 1:41 pm | गणेशा
अप्रतिम .. वाचुन खुप छान वाटले..
सर्व टीम ला धन्यवाद !
27 Feb 2012 - 1:45 pm | प्रचेतस
गणेशा, पेढे पाहिजेत राव आता.
27 Feb 2012 - 2:11 pm | ५० फक्त
लग्नाला बोलावुन लाडु देत होता तेंव्हा नाही गेलात आणि आता... असो.
27 Feb 2012 - 2:03 pm | गवि
अत्यंत सुंदर अनुभव..
27 Feb 2012 - 2:45 pm | धन्या
मस्तच हो भटजीबूवा.
ताम्हीणीची वाट आमच्या पायाखालची असली तरी ताम्हीणीतून लोनावळ्याला जायची खुप इच्छा आहे. बघूयात वल्लीशेठ कधी प्लान बनवतात ते. :)
27 Feb 2012 - 2:55 pm | सागर
अतृप्त आत्मा...
आज तुमच्या अतृप्ततेचे कारण कळाले.
खूपच छान फोटो आहेत.
एका सुंदर (पण दुर्लक्षित) गडाची ओळख करुन दिल्याबद्दल आभारी आहे.
''वाळुवर 'ही' (अॅक्टीव्हा) गाडी घसरते'' हा अनुभव मी पण घेतला आहे ;)
बाकी शिवाजी ट्रेल वाल्यांचे खरेच कौतुक वाटते की गडांच्या संवर्धनासाठी शासन एकीकडे पूर्ण दुर्लक्ष करत असताना ही मंडळी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखे गडांवर तुटून पडतात आणि सर्वसामान्यांच्या वहिवाटीसाठी योग्य बनवतात. त्याबद्दल ते कौतुकास नक्कीच पात्र आहेत. शासनाने यांच्याकडून काही शिकायला हवे. पण तेही जमत नसेल तर किमान यांना सरकारी अनुदान देऊन आर्थिक भार उचलायचे तरी काम केलेच पाहिजे.
अवांतरः अजून एक दुर्गप्रेमी मित्र मला मिपामुळे भेटला त्याचा मनस्वी आनंद होतो आहे :)
27 Feb 2012 - 8:23 pm | गणामास्तर
फोटू दिसत नाहीत... ( पापी असल्यामुळे कि काय? ;) )
27 Feb 2012 - 9:44 pm | प्रचेतस
छे छे. तुमचा गणेशा झाला असावा.
27 Feb 2012 - 10:26 pm | अत्रुप्त आत्मा
@छे छे. तुमचा गणेशा झाला असावा.>>> गणेशा नै...श्रीगणेशा
27 Feb 2012 - 10:49 pm | सोत्रि
खीक्क...
:))
- (अजुन एकदाही 'गणेशा' न झालेला) सोकाजी
27 Feb 2012 - 8:48 pm | अभिजीत राजवाडे
योग्य वयात लहान मुलांवर इतिहास आणि दुर्ग महात्म्य बिंबवणार्या क्षीरसागर सरांना आणि तुमच्या ग्रुपला मानाचा मुजरा.
पुढिल दुर्गपुजेला सहभागी व्हायला आवडेल.
27 Feb 2012 - 10:44 pm | अत्रुप्त आत्मा
@पुढिल दुर्गपुजेला सहभागी व्हायला आवडेल.>> नक्की अगदी... पुढल्या वर्षी फेब्रुवारीत येऊ इच्छिणार्यांसाठी एक माहिती धागा काढणार आहेच...पण तरिही अत्ता या निमित्तानी सांगतो...हा उपक्रम प्रतिवार्षिक आहे.आणी येऊ इच्छिणार्या सगळ्यांसाठी खुला आहे,वरती शिवाजी ट्रेलचा मोबॉइल नंबर फोटो क्रमांक १३ मधे दिसतो आहे,त्या नंबरवर सर्व माहिती दिली जाते.दर वर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम होतो.
4 Mar 2012 - 8:48 am | सुहास झेले
मस्त... मी नक्की येणार. :) :)
तुमची फुलांची सजावट नेहमीप्रमाणे सुंदर !!!
28 Feb 2012 - 12:06 pm | वपाडाव
क्षीरसागर यांच्या निष्ठेला सलाम...
अन भटजीबुवा, तुमच्यासारखा मित्र आम्हाला लाभला याचा अभिमान आहे...
27 Feb 2012 - 10:11 pm | जाई.
छान वृत्तांत
तुम्हाला आणि क्षीरसागर सराना सलाम
27 Feb 2012 - 10:52 pm | सोत्रि
झक्कास हो भटजीबुवा !
क्षीरसागर सरांच्या कार्याला सलाम _/\_
- (दुर्गप्रेमी) सोकाजी
28 Feb 2012 - 4:02 pm | मनराव
मस्त उपक्रम भटजी बुवा......... :)
3 Mar 2012 - 7:46 pm | कान्होबा
वाचुन आनंद झाला.
१ मनाला भिड्णारा कार्यक्रम चुकल्याची रुखरुख पुढ्ल्या कार्याक्रमा पर्यन्त राहील.
असो पुढ्ल्या वेळेला १ मावळा वाढला असेल.
4 Mar 2012 - 4:21 pm | अत्रुप्त आत्मा
@पुढ्ल्या वेळेला १ मावळा वाढला असेल. >>> ढाल-तलवारीसह यायचे हो....! ;-)
11 Mar 2012 - 7:43 pm | कान्होबा
ढाल-तलवारीसह यायचे हो....! एकदम हत्यार बंद येतो.
4 Mar 2012 - 8:51 am | सुहास झेले
खूप सुखावणारा अनुभव... गडांची काळजी घेणाऱ्या, ऐतेहासिक महत्व जपणाऱ्या लोकांचा मला नेहमीच आदर वाटतो. मी सुद्धा जमेल त्या मार्गाने ह्या कार्याला हातभर लावेन
4 Mar 2012 - 4:49 pm | Pearl
मस्त वृत्तांत आणि छान फोटो. दोन्ही आवडले.
असे काही छान उपक्रम चालू आहेत हे माहिती नव्हते. माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद.
आणि शिवाजी ट्रेल टीम चे या चांगल्याकामाबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा.
7 Mar 2012 - 6:31 am | प्राजु
सुंदर वृत्त्तांत.
क्षिरसागर सर आणि त्यांच्या पूर्ण ग्रुप ला सलाम!
तुमचेही तितकेच कौतुक!!
:)
7 Mar 2012 - 4:40 pm | मी-सौरभ
तुमचे नवे फोटो मला दिसत नैय्येत.
(गणेशा प्रसण्ण!! ;))
11 Mar 2012 - 9:22 pm | पैसा
एका अतिशय चांगल्या उपक्रमामधे भाग घेताय. क्षीरसागर सरांना आमचे धन्यवाद आणि दंडवत कळवा!
11 Mar 2012 - 11:34 pm | बॅटमॅन
आमच्या तर्फे येक साष्टांग दंडवत या ग्रूपला आणि लेखकालाही. जी गोष्ट कोणीतरी केली पाहिजे, केली पाहिजे म्हणून लोक नुसते ओरडत असतात ती गोष्ट हे लोक प्रत्यक्ष करून दाखवताहेत.. _/\_
22 Feb 2013 - 1:43 am | शुचि
वा!
अप्रतिम लेख आहे. गारजाई माता तर इतकी आवडली.