भाजे लेणीतील गूढ शिल्प

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
21 Feb 2012 - 10:54 pm

भाजे लेणी. आंबेनळी, वाघजाई प्राचीन घाटवाटांच्या माथ्यावर मळवलीनजीक वसलेला महाराष्ट्रातील एक अतिप्राचीन लेणीसमूह. ह्या पूर्वीच्या लेखात भाजे लेणीचा परिचय करून दिलाच आहे. त्यात ओझरता उल्लेख केलेल्या सूर्यगुंफेतील गूढ शिल्पाचा सविस्तर परिचय करून देण्याचा आता प्रयत्न करत आहे.

सूर्यगुंफा ही भाजे लेणीतील क्र.२० ची लेणी. जवळजवळ शेवटी असलेली. ओसरी, ओसरीवर असलेले खांब आणि आतमध्ये प्रशस्त विहार अशी याची रचना. ओसरीतच डाव्या बाजूच्या असलेल्या कक्षाच्या दोन्हीही बाजूंना हे शिल्पपट कोरलेले आहेत.
भारतीय शिल्पकलेतील हे एक सर्वाधिक चर्चेत असलेले शिल्प.

१. सूर्यगुंफा बाहेरून

डावीकडच्या शिल्पपटात एक वीरपुरुष दोन स्त्रियांसहित चार घोडे असलेल्या रथातून एका वस्त्ररहित विशाल राक्षसीच्या अंगावरून दौडताना दिसतो.रा़क्षसीचे पाय हे उलट्या बाजूला वळलेले दाखविले आहेत. स्त्रियांपैकी एकीच्या हातात आहे छ्त्र तर दुसरीच्या हातात चामर. त्यांच्याबरोबरच काही अश्वारूढ स्त्रियाही दौडताना दिसतात. त्यापैकी एकीच्या पायात रिकीब दिसते. रिकीबीचे हे जगातील सर्वात प्राचीन दृश्य. भोवताली काही प्राणी सुद्धा कोरलेले आहेत.

२. डावीकडील शिल्पपट

३.रथाखाली तुडविली जाणारी राक्षसी

४. रिकीबीचे दृश्य(अत्यंत अस्पष्ट आहे)

उजवीकडच्या शिल्पपटात एक वीरपुरुष हत्तीवरून जाताना दिसतो. त्याच्या मागे त्याचा सेवक हातात ध्वज धरून बसला आहे. हत्तीने त्याच्या सोंडेत एक झाड उपटून धरले आहे. ह्या शिल्पपटाच्या आजूबाजूला तर असंख्य शिल्पे कोरलेली आहेत. हत्तीच्या पायापाशीच पुढेच एक भव्य वृक्ष दाखवला असून त्याच्या शेंड्यांवर नगरजन विहरत आहेत. खालच्या बाजूला नर्तिका नृत्यमुद्रेत आहे. शेजारीच एक स्त्री तबला वाजवताना दाखवली आहे. त्यापुढे अनेक नगरजन विविध भावमुद्रांमध्ये दाखविलेले आहेत. इथेही हत्ती, गाय, सिंह इ. प्राणी कोरलेले आहेत. यातले तबल्याचे शिल्पसुद्धा फार महत्वाचे. तबल्याच्या अविष्काराचे श्रेय १३ व्या शतकातल्या अमिर खुस्रोकडे जाते. पण हे शिल्प बहुत प्राचीन. सुमारे २००० वर्षांपूर्वीचे. नि:संशय भारतीय जनकत्व सिद्ध करणारे.

५. गजारूढ राजा(सर्वात पुढे हत्तीच्या पायाजवळ विशाल वृक्ष व त्याच्या शेंड्यांवर बागडत असलेले प्रजानन आहेत.)

६. झाड सोंडेत पकडलेला हत्ती

७. विलासी नगरजन

८. तबल्याचे सर्वात प्राचीन दृश्य.

ह्या दोन्ही शिल्पपटांचा अर्थ आतापर्यंत वेगवेगळा लावला गेलाय. कुणी म्हणतात हे सूर्य आणि इंद्राचे शिल्प असावे. नाणेघाटातल्या शिलालेखात सूर्य, इंद्राला वंदन केलेले आहे. सूर्याच्या रथाचे घोडे जरी सात असले तरी प्राचीन काळच्या शिल्पांत ते चारच दाखवले जात. त्या दोन स्त्रियांना सूर्यपत्नी संज्ञा आणि छाया यांची उपमा दिलेली आहे. अधःकाररूपी राक्षसीचा तो जणू नाश करतच चाललेला आहे.
उजवीकडच्या शिल्पपटाला ऐरावतावरून चाललेल्या इंद्राची उपमा दिलेली आहे. व सर्व नगरजन ही इंद्रप्रजा दर्शविली आहे.
पण बौद्ध लेण्यांत ही संकल्पना मान्य होण्याजोगी नाही. कारण ही लेणी सातवाहनांनी स्वतः खोदवलेली नाहीत तर त्यांच्या राजाश्रयाखाली बौद्ध श्रमणांनी खोदलेली आहेत.

कुणी म्हणतात की रथातून चाललेला राजा हा स्वत: गौतम बुद्ध असून गजारूढ योद्धा बुद्धशत्रू मार दाखवला आहे. पण मार हा शत्रू असूनही त्यांच्या युद्धकथांचे दाखले मिळत नाही.गौतमाला ज्ञानप्राप्ती होण्याच्या आधी त्याला निरनिराळ्या प्रकारची आमिषे दाखवून त्याला मायेत गुंतवण्याचा प्रयत्न करणारा असेच माराचे स्वरूप निरनिराळ्या कथांत दाखवलेले आहे.
शिवाय हे शिल्प हिनयानकाळातले. त्याकाळी बुद्धाच्या मूर्तीपूजेला मान्यता नसल्याने ह्या शिल्पपटांचा हाही अर्थ मागे पडतो. मग हे शिल्प नेमके असावे तरी कशाचे.

काही संशोधकांनी एक वेगळीच उपपत्ती मांडली आहे. ह्या शिल्पपटांचा संबंध त्यांनी मांधाता राजाच्या प्राचीन कथेशी जोडला आहे.
महाभारत, बौद्ध जातक कथा, दिव्यावदान इ. साहित्यात उत्तर कुरु देशाचे वर्णन अत्यंत सुखी, समृद्द, कलाप्रिय व विलासी जनांचे निवासस्थान म्हणून आले आहे. मांधाता राजाने पृथ्वी पादाक्रांत केल्यावर मेरू पर्वतावरील उत्तर कुरुंचे राज्य जिंकण्याचा निश्चय केला. उजवीकडच्या शिल्पपटात तो हत्तीवर बसून उत्तर कुरुंवर स्वारी करण्यासाठी जाताना दाखवला आहे. त्या शिल्पपटाला पार्श्वभूमी म्हणून उत्तर कुरुंचे विलासी सुखी जीवन कोरलेले आहे. पुढ्यातल्या वृक्षाला कल्पवृक्ष असे मानण्यात आले आहे. इच्छा करताच सर्व उपभोग्य वस्तूंची-अलंकार, खाद्यपेये, वाद्ये इत्यादींची प्राप्ती झाल्यामुळे त्यांचे विलासी जीवन हे तिथल्या विविध शिल्पांद्वारे दर्शवलेले आहे. तर डावीकडच्या शिल्पपटात मांधाता देवासुरांच्या संग्रामात इंद्राच्या मदतीला बाजूने भाग घेण्याकरिता आकाशमार्गाने वाटेतल्या असुरांचा नाश करत जात असता दाखवलेला आहे.असुरांवर जय मिळवून मांधात्याने इंद्राच्या सुधर्मा सभेत प्रवेश केला असे दिव्यावदानात म्हटले आहे.
मांधात्याची ही कथा बौद्धांमध्ये फार प्रसिद्ध होती. अमरावतीच्या (प्राचीन नाव धेनुकाटक-आंध्र प्रदेश) स्तुपातल्या कठड्यावर इंद्राने मांधात्याचा सत्कार केल्याचे तसेच मांधात्याचे इंद्रपदाच्या लोभामुळे स्वर्गपतन झाल्याचे दर्शवले आहे.
ही दोन्ही लेणी समकालीन असल्याने भाजेतील शिल्पपट हा मांधात्याच्या कथेचा असण्याची उपपत्ती अधिक ग्राह्य मानली जाते.

९. अमरावतील स्तूपाचे दृश्य (विकीपेडीयाच्या सौजन्याने)

भाजे लेणीतील सूर्यगुंफेतील हा गूढ शिल्पपट आवर्जून बघावा असाच. अत्यंत प्राचीन असे हे लेणे आजही सालंकृतपणे सज्ज आहे.

प्रतिक्रिया

अन्नू's picture

21 Feb 2012 - 11:57 pm | अन्नू

छान माहीती दिली आहे वल्ली आणि लेणींचे प्रचि सुद्धा उत्तम.
मी प्रत्यक्ष अशा लेंण्या कधीच पाहील्या नाहीत, परंतु त्या दगडांमधील विभिन्न आकारात पद्धतशीर कोरलेल्या लेण्यांबद्दल मला सतत एक औत्सुक्य नक्कीच वाटत आले आहे.

पियुशा's picture

22 Feb 2012 - 10:08 am | पियुशा

+१ हेच म्हणते :)

वल्लीशेठ,
बारकावे आधी पकडण्‍याच्या आणि नंतर समजावून देण्याच्या शैलीला सलाम!
लेख पूर्ण होईपर्यंत मूर्तींच्या आसपासच कुठेतरी फिरतोय असे वाटले.
कृपया खूप फिरा, खूप लिहा.
हेरिटेज हेरिटेज म्हणतात तो हाच आणि त्यातलं एवढ्या नजाकतीनं समजाऊन देऊ शकणारे फार विरळा.

अन्या दातार's picture

22 Feb 2012 - 11:30 am | अन्या दातार

अत्यंत सहमत. आता पुन्हा एकदा कार्ले-भाजे करायलाच हवे; तेही वल्लीशेठबरोबर. :)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2012 - 2:20 pm | अत्रुप्त आत्मा

@बारकावे आधी पकडण्‍याच्या आणि नंतर समजावून देण्याच्या शैलीला सलाम!
लेख पूर्ण होईपर्यंत मूर्तींच्या आसपासच कुठेतरी फिरतोय असे वाटले.>>>+++++१११११११११११ मनातलं बोल्लात यक्कूशेठ...मी अता अजुन वेगळा प्रतिसाद द्यायची आवश्यकताच नाही...
आमच्या तर्फे वल्लींना---^---^---^--

चित्रा's picture

22 Feb 2012 - 7:21 am | चित्रा

सुरेख चित्रे, आणि विचार करण्यासारखी मते आहेत. धन्यवाद. पण या लेण्यांत मांधाता का हे गूढ मला उलगडलेले नाही.

मला अर्थ कळला आहे असे म्हणायचे नाही. पण मला वाटते दोन्ही चित्रांमध्ये कोसलाचा राजा प्रसेनजित दाखवला आहे. राजा पासेनदी किंवा प्रसेनजित हा बुद्धाचा अनुयायी होता असे अनेक कथांमध्ये आले आहे. प्रसेनजित या लेण्यांमध्ये दाखवला असल्यास आश्चर्य वाटायला नको.

पहिले - मधल्या दाराकडे बघताना डावीकडचे - चित्र:

मधील एका शिल्पात एका राजाचे वरील पटांप्रमाणेच चार घोड्यांच्या रथावरचे काम आहे. हे प्रसेनजिताचे चित्र आहे असे समजले जाते.

http://www.ibiblio.org/britishraj/RhysDavids/img/p009Fig1KingPasenadi.jpg

यात भर अशी असू शकते की

तसेच उजवीकडचे चित्रही प्रसेनजिताच्या आयुष्यातील कथेबद्दलचे आहे असे वाटते.

http://www.tipitaka.net/tipitaka/dhp/verseload.php?verse=327
कथा थोडक्यात अशी की पावेयक म्हणून एक हत्ती होता. म्हातारा झाल्यावर पाणी प्यायला गेला आणि चिखलात अडकला. हे कळल्यावर राजा प्रसेनजिताने त्याला बाहेर काढायला एक माहूत पाठवला. या माहुताने सैन्यात वीरश्री चढवण्यास योग्य अशी वाद्ये गोळा करून एकच कल्लोळ माजवला. यामुळे या हत्तीला असे वाटले की लढाई सुरू झाली, आणि त्याने सर्व शक्तीनिशी स्वत: ला चिखलातून उचलले आणि तो सज्ज झाला. बुद्धाने यावर बौद्ध भिख्खूंना असा उपदेश केला की ज्याप्रमाणे हत्तीने स्वतःला चिखलातून बाहेर काढले तसेच तुम्हीही उठा, अनैतिकतेच्या कर्दमातून बाहेर पडा.

--- पण तरी उजवीकडील चित्राबद्दल माझ्या मनात थोडा संभ्रम आहेच.
हे चित्र अजातशत्रूचेही असू शकते. मगधाचा राजा अजातशत्रू हा कोसल देशाच्या प्रसेनजिताकडून हरला, मग प्रसेनजिताने त्याला आपली मुलगी दिली. याचा ठमठमाट जास्त असल्यानेही वाद्ये, ताशे ढोल आणि सगळे असू शकते.
पण झाडाला लोंबकाळणारे नागरिक म्हटले आहेत. त्यावरून पहिली गोष्ट अधिक योग्य वाटते. प्रसेनजिताचा बुद्धाशी अधिक जवळून संबंध होता असे वाटते त्यावरून ह्या दोन्ही कथा प्रसेनजिताशी संबंधित असाव्यात असा माझा समज झाला.

प्रसेनजिताच्या शिल्पाबाबतची शक्यता नाकारता येणार नाही. पण एकंदरीत हत्तीची उभी राहण्याची ढब, त्याच्यावर बसलेले राजा आणि ध्वजधारी सेवक, हत्तीने उपटून सोंडेत पकडलेले झाड यावरून हत्तीच्या अफाट ताकदीची कल्पना यावी. निदान या शिल्पावरून तरी हा हत्ती म्हातारा, चिखलात रूतलेला असावा असे वाटत नाही. निदान स्वतः राजा तरी म्हातार्‍या हत्तीवर आरूढ होणार नाही.

बाकी अजातशत्रू आणि प्रसेनजिताच्या या कथांबद्दल मला फारसे माहिती नाही पण तुम्ही म्हणता तसे हे शिल्प त्यावर आधारीत असूही शकेल.

अमरावतीच्या स्तूपाच्या कठड्यावरील मांधात्याच्या स्वर्गारोहण व स्वर्गपतनाच्या कोरीव शिल्पावरून भाजे लेणीतील हे शिल्प मांधात्याचेही असू शकेल.

चित्रा's picture

22 Feb 2012 - 9:39 am | चित्रा

सुरेख चित्रे, आणि विचार करण्यासारखी मते आहेत. धन्यवाद. पण या लेण्यांत मांधाता का हे गूढ मला उलगडलेले नाही.

मला अर्थ कळला आहे असे म्हणायचे नाही. पण मला वाटते दोन्ही चित्रांमध्ये कोसलाचा राजा प्रसेनजित दाखवला आहे. राजा पासेनदी किंवा प्रसेनजित हा बुद्धाचा अनुयायी होता असे अनेक कथांमध्ये आले आहे. प्रसेनजित या लेण्यांमध्ये दाखवला असल्यास आश्चर्य वाटायला नको.

पहिले - मधल्या दाराकडे बघताना डावीकडचे - चित्र:

मधील एका शिल्पात एका राजाचे वरील पटांप्रमाणेच चार घोड्यांच्या रथावरचे काम आहे. हे प्रसेनजिताचे चित्र आहे असे समजले जाते.

http://www.ibiblio.org/britishraj/RhysDavids/img/p009Fig1KingPasenadi.jpg

यात भर अशी असू शकते की प्रसेनजिताने मनावर ताबा मिळवला आहे हे दाखवण्यासाठी राक्षस घोड्यांच्या पायाखाली आला आहे असे दाखवले असावे.

तसेच उजवीकडचे चित्रही प्रसेनजिताच्या आयुष्यातील कथेबद्दलचे आहे असे वाटते.

http://www.tipitaka.net/tipitaka/dhp/verseload.php?verse=327
कथा थोडक्यात अशी की पावेयक म्हणून एक हत्ती होता. म्हातारा झाल्यावर पाणी प्यायला गेला आणि चिखलात अडकला. हे कळल्यावर राजा प्रसेनजिताने त्याला बाहेर काढायला एक माहूत पाठवला. या माहुताने सैन्यात वीरश्री चढवण्यास योग्य अशी वाद्ये गोळा करून एकच कल्लोळ माजवला. यामुळे या हत्तीला असे वाटले की लढाई सुरू झाली, आणि त्याने सर्व शक्तीनिशी स्वत: ला चिखलातून उचलले आणि तो सज्ज झाला. बुद्धाने यावर बौद्ध भिख्खूंना असा उपदेश केला की ज्याप्रमाणे हत्तीने स्वतःला चिखलातून बाहेर काढले तसेच तुम्हीही उठा, अनैतिकतेच्या कर्दमातून बाहेर पडा.

--- पण तरी उजवीकडील चित्राबद्दल माझ्या मनात थोडा संभ्रम आहेच.
हे चित्र अजातशत्रूचेही असू शकते. मगधाचा राजा अजातशत्रू हा कोसल देशाच्या प्रसेनजिताकडून हरला, मग प्रसेनजिताने त्याला आपली मुलगी दिली. अजातशत्रूचा (प्रसेनजिताच्या मानाने) ठमठमाट जास्त असल्यानेही त्याने बरोबर आपला लवाजमा नेला असावा. ह्याचेही उल्लेख अजातशत्रूच्या कथेत आहेत. तो बुद्ध असलेल्या आंब्याच्या बागेपर्यंत हत्तीवरून थाटामाटात गेला. मग त्यानंतर त्याला पाय उतार व्हावे लागले असेही उल्लेख आहेत.

(तरी प्रसेनजिताचा बुद्धाशी अधिक जवळून संबंध होता असे वाटते त्यावरून ह्या दोन्ही कथा प्रसेनजिताशी संबंधित असाव्यात असा माझा समज झाला. हत्तीने झाड सोंडेत पकडले आहे यावरून आधी नलगिरी हत्तीची कथा वाटली, पण बहुतेक तसे नसावे, बहुदा हत्ती चिडला आहे असे वाटले.).

चित्रा's picture

22 Feb 2012 - 7:23 pm | चित्रा

>निदान या शिल्पावरून तरी हा हत्ती म्हातारा, चिखलात रूतलेला असावा असे वाटत नाही. निदान स्वतः >राजा तरी म्हातार्‍या हत्तीवर आरूढ होणार नाही.

वरच्या प्रतिसादात प्रसेनजिताने माहुत पाठवला असा उल्लेख आला आहे. माहुत गळ्यात एवढी मोठी माळ घालेल का, कल्पना नाही. वरील कथेत पुढे बसलेल्या व्यक्तीच्या हातात हत्तीसाठी अंकुश आहे. राजा असा हातात अंकुश ठेवेल का कल्पना नाही. पण वरील कथेबद्दल संभ्रम मी व्यक्त केला आहेच. :) प्रसेनजित जेव्हा आनंदाला भेटायला गेला तेव्हा तो हत्तीवरून गेला असे उल्लेख आहेत.

>अमरावतीच्या स्तूपाच्या कठड्यावरील मांधात्याच्या स्वर्गारोहण व स्वर्गपतनाच्या कोरीव शिल्पावरून >भाजे लेणीतील हे शिल्प मांधात्याचेही असू शकेल.

असूही शकेल, पण मला शक्यता कमी वाटते.
'चक्रवर्ती'चे चित्र हे चक्रासोबत असावे असा संकेत आहे.

हा प्रसेनजिताखेरीज इतर कोणी राजा असल्यास अजातशत्रू असू शकेल असे वाटते.
दाराच्या दोन बाजूंना विरोधी चित्र दाखवलेले असू शकते. प्रसेनजिताने मनावर ताबा मिळवला होता, याउलट अजातशत्रू पूर्णपणे बौद्ध मताचा नव्हता. त्यामुळे त्याच्या बरोबर लवाजमा घेऊन तो जाणे शक्य आहे.

तुम्ही तुमची करत असालच, पण माझीही मते या विषयातील कोणा ज्ञानी व्यक्तीबरोबर जरूर शेअर करा, आणि ते काय म्हणतात तेही इथे लिहा अशी विनंती करते.

प्रचेतस's picture

22 Feb 2012 - 9:33 pm | प्रचेतस

तुम्ही म्हणता तसे असूही शकेल.
बाकी माझी मते मी मिपाव्यतिरिक्त कुणाशीही आतापर्यंत शेअर केलेली नाहीत. काही संदर्भग्रंथ आणि मी केलेल्या लेण्यांच्या कित्येक भटकंती हाच एकमेव आधार आहे सध्यातरी. तुमच्या प्रतिसादांतूनही बरीच नविन माहिती मिळत आहे. जातक कथा आता वाचल्यास पाहिजेत असे वाटू लागले आहे.

५० फक्त's picture

22 Feb 2012 - 10:44 pm | ५० फक्त

काही संदर्भग्रंथ आणि मी केलेल्या लेण्यांच्या कित्येक भटकंती हाच एकमेव आधार आहे सध्यातरी. -

भावना पोहोचल्या, शक्य झाल्यास योग्य जागी पोहोचवल्या जातील, चिंता नसावी. एक कॉलर आणि एक जेवणाचं आमंत्रण लक्षात ठेवा.

प्यारे१'s picture

22 Feb 2012 - 11:26 am | प्यारे१

छान छान माहितीपूर्ण लेख!

जागु's picture

22 Feb 2012 - 11:41 am | जागु

छान.

सूड's picture

22 Feb 2012 - 11:51 am | सूड

चान चान !!

चौकटराजा's picture

22 Feb 2012 - 1:21 pm | चौकटराजा

मावळात २५ वर्षे व हवेलीत २३ वर्षे राहूनही भाजाला जाणे झाले नाही याची मनस्वी शरम वाटते. सोमनाथपूर ऐहोल, पत्तदकल, बेलूर हळेबीड
कोणार्क, पुरी खजुराहो सगळे पाहिले पण का बुबा हे राहिले ?
वल्ली बुबा कमाल आहे ! मी व्यक्ति आहे पण तू " रिअल" वल्ली आहेस राव !

हंस's picture

22 Feb 2012 - 1:32 pm | हंस

वल्लींचा धागा आणि चित्राताईंचे प्रतिसाद दोन्ही ज्ञानात भर घालनारे आहे. लगे रहो!

झकासराव's picture

22 Feb 2012 - 1:38 pm | झकासराव

वाह वल्लीशेठ !!!!!!!!!!!!!!!!!!!!
एकदा तुमच्यासोबत लेणी बघायला याव लागेल. लेणी बघण्याची नजर आणि समजुन घेण्याची थॉट प्रोसेस मिळेल आम्हाला. :)

गवि's picture

22 Feb 2012 - 2:30 pm | गवि

अगदी..

पूर्ण सहमत.. याच्यासोबत लेणी पाहणे हा अद्भुत अनुभव ठरेल.

प्यारे१'s picture

22 Feb 2012 - 3:01 pm | प्यारे१

>>>याच्यासोबत लेणी पाहणे हा अद्भुत अनुभव ठरेल.

अहो पण आधी आपल्या वल्लीबरोबर दुसरं कुणी नाही ना ;) याची चौकशी करायला हवी! ;)

गणेशा's picture

22 Feb 2012 - 2:26 pm | गणेशा

निशब्द ... काही बोलु शकत नाही.. सुंदर लेख
अवांतरः

मागच्याच आठवड्यात केलेल्या कार्ला लेण्या येथे देण्याचे योजीले होते ..
पण आधी मनरावचा धागा आणि आता तुमचा हा सुंदर धागा त्यामुळे आता डायरेक्ट राजगडचा च वृत्तांत देतो ..

मनराव's picture

22 Feb 2012 - 2:56 pm | मनराव

एकदम मस्त...विश्लेषण....

जयंत कुलकर्णी's picture

22 Feb 2012 - 3:18 pm | जयंत कुलकर्णी

ज्यांना या विषयात रस आहे, त्यांनी फेसबूक वर या ग्रूपवर सभासदत्व स्विकारावे.
http://www.facebook.com/groups/331575973297/
Ancient monuments of India a Photo Journey.

वल्ली, तुझ्या शिल्पे बघण्याच्या नजरेला सलाम.
अरे जन्म गेला रे आम्चा शेजारची वेरूळची भव्य शिल्प बघण्यात अन् कार्ल्या भाज्यालाही चकरा झाल्या.
पण नाही रे बाबा, हे असले इतके बारकावे काही लावता नाही आले.
आम्ही पडलो पढतपंडित. निरिक्षणशक्ती दे रे बाबा आम्हाला थोडी.

चित्रातैंचाही प्रतिसाद वाचनीय.

आणि हो, वल्लीला औ.बदला यायचे माझे आमंत्रण, साला वेरूळ- अजिंठ्यास चल. मी स्पॉन्सर करतोय(आणि त्यानिमित्ताने फुकटाचा गाइअड मिळवतोय;) )

शनिवार - रविवारी ठरवा रे.. मी पण येईन.

अजंठा वेरूळ मागच्याच वर्षी बघितले आहे पण वल्ली बरोबर ते बघणे हा ही एक "अनुभव" असेल याची खात्री आहे.

५० फक्त's picture

22 Feb 2012 - 10:44 pm | ५० फक्त

लई भारी माहिती अन चर्चा, वल्लीशेट धन्यवाद.

हुप्प्या's picture

22 Feb 2012 - 10:50 pm | हुप्प्या

नोंदी ठेवण्यात कायम कमी पडणार्‍या भारतीयांनी शिल्पाच्या रुपात इतिहास नोंदवला आहे हे आपले भाग्य. कधीतरी कुणी ह्याची उकल करेल अशी आशा.

पाषाणभेद's picture

23 Feb 2012 - 2:46 am | पाषाणभेद

वल्लीशेट, कुठून मिळवली ही अभ्यासू वृत्ती? आपल्या तपश्चर्येला सलाम. तुमचे थोडेतरी गुण आमच्यात असायला हवे होते.
सुंदर लेख.

बहुगुणी's picture

23 Feb 2012 - 4:22 am | बहुगुणी

वल्ली: तुमच्या अभ्यासू वृत्तीला, चिकाटीला आणि नम्रतेलाही सलाम!

चित्रा ताई: तुमचा इतिहासाचा, जातककथांचा अभ्यास अशा धाग्यांत नेहेमीच दिसतो. वेळ मिळेल तेंव्हा बुद्ध-कालातील कलेविषयी एखादी लेखमाला लिहिता आली तर पहा.

चित्रा's picture

25 Feb 2012 - 7:29 pm | चित्रा

एकंदरीत शिल्पकलेत इंटरेस्ट असला तरी लेखमाला म्हटली की संपले. असे लेख प्रकाशित करण्याआधी तपासावे लागतात, मला ते वेळेअभावी बहुदा कधीच जमणार नाही. प्रतिसाद देणे सोपे आहे. :)

आत्मशून्य's picture

23 Feb 2012 - 1:21 pm | आत्मशून्य

नेक्स्ट टायमाला लेणी बघायच्या वेळी आमंत्रण द्यायचं हं :) . अथवा एखादा केवळ लेण्यांसाठी असा थोडासा मोठा (७-८ दिस ? ) ऐतीहासीक ट्रेक्/ट्रीप्/कट्टा काढाच.

पैसा's picture

23 Feb 2012 - 2:16 pm | पैसा

इंडियाना जोन्स, मस्तच लेख. ती शिल्पे आमच्यासारखे लोक बघतात, फोटो काढून गप्प बसतात, पण इतकी बारकाईने बघून त्यावर विचार करणं हे फक्त वल्लीसारखे लोक करू जाणे!

चिगो's picture

24 Feb 2012 - 11:38 am | चिगो

>> इंडियाना जोन्स, मस्तच लेख. ती शिल्पे आमच्यासारखे लोक बघतात, फोटो काढून गप्प बसतात
हेच तर ताई.. झालंच तर त्यांच्या सोबत आपले फोटो काढून आपल्या भेटीची टामटूम करतात.. एवढ्या बारकाईने अवलोकन करुन त्यावर अभ्यासु मते मांडणारा विरळा..

वल्लीशेठ, धन्यवाद.. आणखी येऊ द्यात.

सुहास..'s picture

23 Feb 2012 - 2:50 pm | सुहास..

छान च रे , ईंडियाना वल्ली ! ;)

नेहमी प्रमाणेच नतमस्तक -----^---- :) अप्रतिम एकदा यायलाच हवे तुमच्या = लेणी बघायला..

श्रीयुत संतोष जोशी's picture

24 Feb 2012 - 6:33 pm | श्रीयुत संतोष जोशी

छान माहिती . धन्यवाद.

जेनी...'s picture

25 Feb 2012 - 9:36 am | जेनी...

मस्त ...

खूपच अभ्यासु लेख वाटला ..
विश्लेषण अतिशय स्पष्ट...

खूप छान ..
पूढच्या लेखनाला शुभेछा.

वल्ली मित्रा,

चित्राताईंच्या या लेखामुळे हा धागा गवसला आणि तुझ्या अजून एका करामतीचे वाचन-नेत्र सुख मिळाले
सुंदर व माहितीपूर्ण लेख आणि तितकीच सुंदर छायाचित्रे :)

तर्री's picture

26 Mar 2012 - 7:35 pm | तर्री

तबल्याचा "जन्म " भारतीय आहे हे वाचून बरे वाटले.
तुमच्या "दृष्टी" सलाम.

एकदा हंपीला चला म्हणतो .

वल्लीशेठ, जबर लेख. तबल्याचा फोटो ८ नं ला टाकलात तो विशेषत्वाने आवडला. नरहर कुरुंदकरांनी त्यांच्या "मागोवा" मध्ये भारतीय संगीताच्या इतिहासात स्पष्ट लिहिले आहे की अमीर खुसरोने तबल्याचा शोध लावला हे साफ चुकीचे आहे. त्यांनी बरेच ग्रांथिक पुरावे दिलेत, पण त्याला आज अगदी निर्विवाद शिल्परूपी पुरावा मिळाला तुम्ही टाकलेल्या फोटोच्या रूपाने!!!ही घ्या टाळी:)*