दैनिक सकाळ - १९ आक्टोबर २००७
अखंड तेजीची नको करू कामना ।।
(चंद्रशेखर चितळे)
एक आटपाट नगर होते. तेथे प्रजा आनंदाने राहत होती. उद्योजक, व्यावसायिक, सेवा पुरवठादार, नोकरदार... अशी सर्व प्रकारची जनता तेथे होती. तेथे अन्य प्राणी देखील वास्तव्यास होते. गाई-म्हशी, कुत्रे-मांजर पोपट-चिमण्या... आदी सारे होते.
डुकरांची जमातसुद्धा होती. संक्रांतीचा मुहूर्त साधून एका फिरंगी व्यावसायिकाने आटपाट नगरामध्ये टोप्या विकावयाचे दुकान टाकले. सुरवातीच्या कुतुहलामुळे दुकानामध्ये गर्दी जमली आणि हळूहळू साधारण व्यवसाय होऊ लागला. बाजारपेठेमधील डुकरांच्या रहदारी आणि वास्तव्यामुळे सर्वांनाच त्रास होत असे; परंतु प्रजा उदासीन होती. वैयक्तिक चर्चा मुबलक; परंतु सयुक्तिक उपाय शून्य, अशीच परिस्थिती होती.
फिरंगी टोपी विक्रेता मोठा हुशार. त्याने गावाबाहेर मोठे गोदाम भाड्याने घेतले. एका डुकरास १०० रुपये दाम लावले. जाहिरात केली. कामसू आणि रिकामटेकडे बरोबरीनेच कामाला लागले. डुकरांना जेरबंद करून गावाबाहेरील मोठ्या गोदामामध्ये जमा करू लागले. फिरंगी विक्रेत्याकडून डुकरामागे १०० रुपये घेऊ लागले. महिन्याभरात गावामधील डुकरे गोदामामध्ये रवाना झाली. त्यानंतर गावाबाहेरील माळरानामधून डुकरे येण्याची शक्यता लक्षात घेऊन फिरंगी विक्रेत्याने आता डुकरामागे १५० रुपये देण्याचे जाहीर केले. प्रजेचा उत्साह वाढला. आठवड्या-पंधरवड्यात माळरानामधील उरलीसुरली डुकरे गावाबाहेरील गोदामात नांदू लागली. विक्रेत्याने डुकरांचा भाव आणखी वाढवून २०० रुपये केला आणि प्रजा लांबवरून आणखी काही डुकरे पकडून गोदामामध्ये घेऊन आली. पंचक्रोशीमध्ये आता औषधाला देखील डुक्कर उपलब्ध नव्हते.
फिरंगी विक्रेता खूष झाला. त्याने डुकराचा भाव आता ५०० रुपये करून टाकला. दरम्यान, दुकानामधील टोप्या संपल्यामुळे दहा-पंधरा दिवस स्वदेशी जाऊन नवीन टोप्या घेऊन येतो आणि तोपर्यंत आपला विश्वासू नोकर व्यवसाय सांभाळेल, असे त्याने जाहीर केले. शिमग्याच्या दिवशी परतण्याचा वायदा केला.
एका डुकरामागे ५०० रुपयांची कमाई ऐकून प्रजा हुरळून गेली. प्रजेस डुकरे आणि नोटांची बंडले यांची स्वप्ने पडू लागली; पण करणार काय? आटपाट नगरामध्ये एकही डुक्कर नाही. लगतच्या माळरानामध्ये डुकरे नाहीत. लांबवरच्या रानामध्ये देखील डुक्कर नाही. पैसे कसे कमविणार? काही इरसाल तरुणांनी एक शक्कल लढविली. फिरंगी विक्रेत्याच्या नोकराचा यथोचित सत्कार केला आणि त्याचा विश्वास कमावला. मोक्याच्या क्षणी त्या नोकरास या तरुणांनी "ऑफर' दिली, ""गोदामामधील काही डुकरे आम्हास ४०० रुपयांना विक. टोपी विक्रेता परतल्यावर त्याला आम्ही ती ५०० रुपयांना विकू. व्यवहारामधील निम्मी रक्कम तुझी, निम्मी आमची. आहे कबूल?'' नोकर विरघळला. त्या तरुणांकडे काही डुकरे आली.
ही बातमी हा हा म्हणता आटपाट नगरामध्ये पसरली. गुप्त खबऱ्यांनी भाव फोडला. आता फिरंग्याचा नोकर ४२० रुपयांच्या भावावर आडला. गटा-तटाने प्रजा नोकरास गुप्तपणे भेटू लागली आणि दोन-चार दिवसांत मोठ्या गोदामामधील शेवटचे डुक्कर ४६० रुपयांस विकले गेले.
आठवड्याच्या उसंतीनंतर शिमगा आला. नटूनथटून रिकामे बटवे आणि भरलेली डुकरे घेऊन आटपाट नगरामधील प्रजा गावाबाहेरील मोठ्या गोदामासमोर उपस्थित झाली. सूर्य उगवल्यानंतर आलेल्या जनतेस खूपच मागे उभे राहावे लागले. कारण काही उत्साही वीर मध्यरात्रीस येऊन डुकरांसह तळ ठोकून उपस्थित होते.
आटपाट नगरामधील प्रजा टोपी विक्रेत्याची आतुरतेने वाट पाहत होती. तो अजून परतलेला नव्हता. मग प्रजेने त्याच्या नोकराचा माग काढला. गावामध्ये त्याचादेखील ठिकाणा नव्हता. दुपार झाली. गर्दीमधील काही चाणाक्ष व्यक्तींनी ४२० रुपयांना घेतलेली डुकरे रांगेमध्येच आधी ४४० रुपये नंतर ४३० रुपये आणि शेवटी ४२० रुपये १० पैशांना विकून घरचा रस्ता पकडला.
एव्हाना संध्याकाळी झाली. ना विक्रेत्याचा पत्ता ना त्याच्या नोकराचा! गर्दीमध्ये हळूहळू डुकरांचे सौदे सुरूच होते; पण जसजसा सूर्य मावळतीकडे कलला, तसतसा डुकरांचा बाजारभाव तुटू लागला. काहींनी आल्या भावास डुकरे विकून टाकली, तर काहींनी नुकसान झेलून डुकरांचा सौदा केला. सरतेशेवटी आटपाट नगरामधील डुक्कर विकत घेतलेल्या सर्वच व्यक्ती येईल त्या भावामध्ये डुक्कर विकण्यास तयार होत्या; पण समोर खरेदी करण्यास ना विक्रेता, ना त्याचा नोकर, ना अन्य कोणी व्यक्ती!
माजलेल्या डुकरांचा शेतीसाठी उपयोग नव्हता, राखणीसाठी उपयोग नव्हता, खाण्याच्याही लायकीची ती नव्हती. उलटपक्षी जवळ बाळगली तर पोसण्याचा खर्च आणि दुर्गंधीची कटकट. शेवटी डुकरांच्या मालकांनी त्यांची स्वतःपासून आणि स्वतःची त्यांच्यापासून सुटका केली. गावामधील डुकरे गावात परतली. माळरानातील डुकरे माळरानात विसावली आणि लांबच्या वनामधील डुकरे वनाच्या दिशेने निघाली.
दिवस शिमग्याचा असल्याने फिरंगी विक्रेत्याच्या मोठ्या गोदामाची होळी करण्याचा डाव गावकऱ्यांनी रचला; पण गोदामाचा मालक आडवा आला. प्रजेने विक्रेता म्हणून एका काठीवर मडके ठेवले. त्याला दगड-गोटे आणि लाथा-बुक्क्यांनी यथेच्छ तुडविले. विक्रेत्याच्या नावाने बोंब ठोकली. त्याच्या पुतळ्याभोवती वाळलेले गवत रचून होळी केली. जड अंतःकरणाने आणि रिकाम्या खिशाने प्रजा घरी परतली. झोपी गेली.अशा रीतीने संक्रांतीच्या मुहूर्तावर सुरू झालेली कहाणी शिमग्याच्या आरोळीवर संपली.
मना सज्जन ।।
अखंड तेजीची नको करू कामना ।।
दिवसामागे रात्र येते ।
तेजीमागे मंदी असते ।।
वास्तवाची या असो कल्पना।।
लाभांश-नफ्याची वाजती कामना ।।
गुंतवणुकीकडे पोचली सुख-समाधाना ।।
प्रतिक्रिया
19 Oct 2007 - 12:23 pm | सहज
चांगल्या पैदाशीची डूकर घेऊन बसायच अन मग बघायच. ते खत देतात, कचरा निर्मुलन करतात, अजून नवीन डूकरं देतात. आजानं घेतलेली डूकरं पुढच्या पिढ्यानपिढ्या पोसू शकतात.
असली तसली, वाटल ती डूकर, कोणी सोम्या, गोम्या घेऊन आला, दहा-पंधरा दिवस साठीच, जो तो पाळतोय म्हणून पाळू लागला, गावात इतरही प्राणी आहेत ते सोडून सगळेच डुकराच्याच मागे लागले म्हणजे असलच व्हायाच.
अस्सल (फंडामेंटल) डूकरच बाळगा, तसेच जर्सी गायी पाळा, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, शहामृग, घोडे, गाढवे, मासे, रेशीमकीडे, मधमाश्या सूद्धा!! मग तेजीच तेजी आयुष्यभरासाठी. वीरेन बटला इचारा
सहज वेन्च्यूरा
19 Oct 2007 - 4:47 pm | धनंजय
अशा काही वस्तू असतात, ज्यांची किंमत केवळ खरेदी-विक्रीतून ठरते, त्यांच्यातून होणार्या खर्या उत्पन्नातून नव्हे. उदाहरणार्थ : आटपाट नगरात डुक्कर खात नसावेत असे दिसते - तर डुकरांची किंमत खाद्य उत्पादनातून पडताळता येत नाही, केवळ एकमेकांना विकायचा प्रयत्न करावा, आणि अशा प्रकारे बाजारभाव जाणावा.
अशा वस्तूंच्या अर्थकारणाबद्दल मोठी रोचक दृष्टांत-कथा घाटपांडे सरांनी दैनिक सकाळ मधून इथे दिली आहे.
काही विशिष्ट प्रकारचे प्रतिभूत कागद (सेक्युरिटीझ) अशा प्रकारचा माल असतो.
पण शैक्षणिक दृष्टीने परिपूर्ण करण्या साठी या दृष्टांत-कथेतील पैशांचा नीट हिशोब लावला पाहिजे. आटपाट नगरात टांकसाळ दिसत नाही. म्हणजे परदेशी व्यापार्याने मुळात दिलेले १००-५०० रुपये हे आटपाट नगरात बाहेरून आलेले वैभव आहे. त्यामुळे डुकरांना खराखरचा भाव आला आहे. तुम्ही म्हणाल की ते पैसे व्यापार्याने परदेशातून आणले नाहीत, तर टोप्यांच्या विक्रीतून कमावले, आणि डुकरांवर खर्च केले. तसे असल्यास आटपाट नगरात "टोप्या" हा उपयुक्त माल बाहेरून आला, आणि त्याच्या बदल्यातले पैसे आटपाट नगरातच राहिले. त्याचा अर्थ हा की डुकरांच्या बाजारभावाचा "उपयुक्त वस्तूंच्या बदल्यात" हिशोब लागतो - जोपर्यंत परदेशी व्यापारी गावात होता तोवरच!
20 Oct 2007 - 4:15 pm | लबाड बोका
>>>म्हणजे परदेशी व्यापार्याने मुळात दिलेले १००-५०० रुपये हे आटपाट नगरात बाहेरून आलेले वैभव आहे
परदेशी व्यापा-याने दिलेले १००-१५० रुपये हे त्याने केलली गुंतवणुक आहे. त्या पैशामुळे गावात अचानक पैसा आला. लोकांना हाव सुठली. हे वैभव नाही कारण नोकराच्या सहाय्याने त्याने गुंतवणुक दुप्पट तिप्पट दराने काढुन घेतली. नोकराचे पळुन जाणे हेच दर्शविते.
गावातील लोकांनी आपली बचत जमापुंजी व्यापा-याच्या बोलण्यावे विश्वास ठेवुन नोकरामार्फत व्यापा-याला दिली
या कामासाठीच परदेशी व्यापा-याने बाहेरुन पैसे आणले. गावातील लोक त्याला वैभव समजले.
परदेशी व्यक्तींवर विश्वास ठेवु नका असे नाहि पण त्यांचे हेतु पहायलाच हवेत.
अजुन एक डुक्कर मागणी
५००० डोलर्सचा प्रोग्रामर अमेरिकेत ठेवण्यापेक्षा भारतीय कंपनीला २००० डोलर्स दिले तरी भागते कारण ते सुमारे ९०००० रुपये (४५ भावाने) होतात त्यातुन ती कंपनी २०-२५००० रुपये देवुन माणुस ठेवते जास्ती पैशे मिळतात म्हणुन कुशल कामगार सुद्धा अकुशल कामे करतात
(माझा मित्र BE, MBA 15 years expereince project oordinator म्हणुन एका महान (?) आय टी कंपनी मध्ये काम करतो,
काम काय तर तासातासाला पलिकडील बिनडोक गो-याला status data पुरविणे
पगार सहा आकडी प्रति महीना
डोक्याचा वापर शुन्य)
डुक्करांना सध्या खुपच भाव आहे
21 Oct 2007 - 1:09 pm | प्रकाश घाटपांडे
माझा मित्र BE, MBA 15 years expereince project oordinator म्हणुन एका महान (?) आय टी कंपनी मध्ये काम करतो,
काम काय तर तासातासाला पलिकडील बिनडोक गो-याला status data पुरविणे
पगार सहा आकडी प्रति महीना
डोक्याचा वापर शुन्य)
अच्युत गोडबोले नावाची आयटी मधील बहुआयामी व्यक्ती हेच म्हणते फक्त डुक्कर शब्द न वापरता. इथे वाचा
प्रकाश घाटपांडे
19 Oct 2007 - 7:25 pm | विकास
हा लेख आणि त्यातील मतितार्थ आवडला, पण "डुक्कर" या शब्दाचा त्यासाठी झालेला वापर जरा जास्त वाटले. सहजराव आणि धनंजयरावांचे विचार पटले.
एखाद्या गोष्टीची किंमत म्हणजे काय यावरचा एक चित्रपट आठवला: "गॉड मस्ट बी क्रेझी", पाहीला नसला तर अवश्य पहा (पहीला भाग, दुसरापण चांगला आहे पण पहील्या इतका नाही). अफ्रिकेतील झूलू का अशाच कुठल्याशा पिग्मी जमातीच्या डोक्यावरून एक कमी उंचीवरून टू सीटर विमान जात असते. त्यातील एक माजरट जाता जात एक कोकची बाटली खाली फेकतो. संपूर्ण निसर्गाशी बांधील असलेल्या या लोकांना कळत नाही की देवाने वरून जात असताना अचानक हे काय फेकले. त्याचा (बाटलीचा) ते वेगवेगळा उपयोग करून पहातात आणि शेवटी ठरवतात की असली निरूपयोगी वस्तू फेकायला "गॉड मस्ट बी क्रेझी". मग त्यांच्यातील एक प्रौढ (हिरो) ती बाटली टाकायला जगाच्या टोकापाशी जायला लागतो. तिथे जात असताना एक ब्रिटीश, (अर्धा हिरो) त्याला आवडणारी गोरी शिक्षिका, अफ्रिकेतील बंडखोर, हुकूमशहाचे सैन्य वगैरे भेटत जाते. शेवटी तो या अर्ध्या हिरोस मदत करतो तेंव्हा त्याला तो भरपूर पैशांच्या नोटा देतो. हा पठ्ठ्या घेतो बघतो आणि याचा काय उपयोग असे आविर्भाव करत हसत हसत फेकून देऊन चालतचालत निवांत पणे "जगाच्या टोकाला" जाऊन (धब्धब्यात) बाटली फेकून परत आपल्या माणसांमधे मिसळून सुखाने राहतो...
19 Oct 2007 - 11:57 pm | सर्किट (not verified)
मागे उपक्रमावर अशीच कथा तात्यांनी दिल्याचे आठवते.
- सर्किट
20 Oct 2007 - 10:34 am | प्रकाश घाटपांडे
पुर्वी यासदृष कथा 'माकड ' हा प्राणी घेउन आली ह्नोती. सकाळ मध्येच मी वाचली होती नेटवर पण आली होती.
प्रकाश घाटपांडे
20 Oct 2007 - 10:55 am | विसोबा खेचर
कथा आणि श्लोक छान...
माकडांची कथाही मला नेटवरच वाचायला मिळाली होती, मी ती उपक्रमावर टाकली होती..
तात्या.
20 Oct 2007 - 2:06 pm | ईत्यादि
आजच्या जगात ही कथा मुळीच पटत नाही. जगभर हा व्यवसाय चालला असताना मराठी मानुस येवढा बुरसतलेला का?
ईत्यादि
5 Nov 2007 - 7:36 pm | लबाड बोका
/
26 Aug 2019 - 2:16 pm | जालिम लोशन
सद्य परिस्थितीला लागु!
26 Aug 2019 - 2:40 pm | जॉनविक्क
26 Aug 2019 - 5:32 pm | सर टोबी
बाजाराची अभूतपूर्व उसळी आणि तेजी याचे श्रेय व्यापाराची उपजतच जाण असलेल्या गुजराथी समाजातून आलेल्या पंतप्रधानांना द्यायचे आणि बाजार कोसळण्याचे कारण सांगताना शास्त्रीय विवेचन करायचे असे कसे चालेल? इथे स्ट्रॉंग फंडामेंटल असलेले शेअर्स गारठलेत त्याचे काय कारण सांगाल?
27 Aug 2019 - 11:46 am | Rajesh188
मंदी म्हणजे मागणी कमी होणे अशी सरळ व्याख्या करता येईल .
मागणी कमी झाली की उत्पादन सुद्धा कमी होते आणि नवीन गुंतवणूक सुद्धा होत नाही असे दृष्टचक्र आहे .
लोकांची क्रयशक्ती घटली की मागणी कमी होते .
हे एक मंदीचं कारण आहे .
उद्योगांनी नवीन उद्योग निर्माण करण्यासाठी प्रचंड कर्ज घेतले आहे पण त्यांचे प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्या मुळे रिटर्न मिळत नाही आणि इकडे कर्जाचे व्याज वाढत आहे त्यामुळे उद्योग अडचणीत आले आहेत .
हे सुध्दा मंदीचं कारण असू शकत .
खेळता पैसा बाजारात निर्माण करायचा असेल तर कमी व्याजावर कर्ज उपलब्ध केली जातात पण ते सुद्धा काही मर्यादा बाहेर धोक्याच च असते .
कृत्रिम फुगवटा निर्माण करून अर्थ व्यवस्था तात्पुरती तेजीत दिसते पण कर्ज वसुली झाली नाही तर ती प्रचंड वेगाने कोसळते आणि भीषण परिस्थिती निर्माण होवू शकते .जास्त पैसा बाजारात आला तर महागाई सुद्धा वाढण्याची शक्यता असते
त्या मुळे मंदी वर उपाय योजना करताना सावध पने केली पाहिजे